संवादगाथा
चाकोरीबद्ध शिक्षणाच्या पलीकडे, मोकळेपणाने, कल्पकतेने आणि स्वतःला विचार करायला प्रवृत्त करणारी शाळा मुलांचे भविष्य घडविते. त्यासाठी प्रचलित चाकोरीबद्ध शिक्षणात पुरेशी व्यवस्था आढळत नाही, त्यामुळे मुलांचे शिक्षण खुंटलेले, कोमेजलेले आहे. म्हणून मुलांना मुक्त, कल्पकतेनं आणि विचार करायला प्रवृत्त करणारं शिक्षण देण्यासाठी मा. सुरेश खोपडे यांनी ‘कुडाची शाळा’ सुरु केलेली आहे. प्रत्येक व्यक्ती जन्मत:च वेगळी, अनन्य असते. कोणत्याही दोन माणसांची कौशल्ये, गुण, दोष सारखे असत नाहीत. तर मग एकच चाकोरीबद्ध शिक्षण सर्वांना यशस्वी कसे करेल? मासा, हत्ती, पक्षी, कुत्रा या सर्वांना झाडावरच चढायला लावून कसं चालेल? स्वतःची कौशल्ये स्वतःच ओळखणे आवश्यक आहे. यासाठी पूरक वातावरण शाळांमध्ये उभे करावे लागेल. असे वातावरण उभारण्याचे आदर्श उदाहरण म्हणजे ‘कुडाची शाळा’ होय.
सुरेश खोपडे , मुक्त शिक्षण , ध्येयवेडी मानसं , निसर्ग शाळा , मोरगाव
चाकोरीबद्ध शिक्षणाच्या पलीकडं, मोकळेपणानं, कल्पकतेनं आणि स्वतःला विचार करायला प्रवृत्त करणारी शाळा मुलांचे भविष्य घडवते. त्यासाठी प्रचलित चाकोरीबद्ध शिक्षणात पुरेशी व्यवस्था आढळत नाही, त्यामुळं मुलांचे शिक्षण खुंटलेलं, कोमेजलेलं आहे. म्हणून मुलांना मुक्त, कल्पकतेनं आणि विचार करायला प्रवृत्त करणारं शिक्षण देण्यासाठी मा. सुरेश खोपडे यांनी ‘कुडाची शाळा’ सुरु केलेली आहे. प्रत्येक व्यक्ती जन्मत:च वेगळी, अनन्य असते. कोणत्याही दोन माणसांची कौशल्ये, गुण, दोष सारखे असतं नाहीत. तर मग एकच चाकोरीबद्ध शिक्षण सर्वांना यशस्वी कसं करेल? मासा, हत्ती, पक्षी, कुत्रा या सर्वांना झाडावरच चढायला लावून कसं चालेल? स्वतःची कौशल्ये स्वतःच ओळखणं आवश्यक आहे. यासाठी पूरक वातावरण शाळांमध्ये उभे करावं लागेल. असे वातावरण उभारण्याचं आदर्श उदाहरण म्हणजे ‘कुडाची शाळा’ होय.
गव्हाचे काड, ज्वारी-बाजरीची वैरण, झाडाझुडपांच्या फांद्या, झावळ्या, लाकडी काठ्या यांच्यापासून बनविलेल्या भिंतीला कुडाची भिंत म्हणतात. अशा कुडाच्या भिंती व झाडांच्या झावळ्यांपासून बनविलेले छप्पर, शेणानं सारवलेली जमीन असलेल्या पूर्वी शाळा असायच्या. त्या शाळांच्या दरवाज्यांना दारंच नसायची. कुडाच्या भिंतींना असलेल्या फटी म्हणजेच खिडक्या असायच्या. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी त्यांच्या मनाप्रमाणे निसर्गाच्या सानिध्यात शिकत असतं. पक्षांचा किलबिलाट, मांजरींची म्याव-म्याव, कुत्र्यांचे भुंकणं, गाई-वासरांचं हंबरणं, गाढवांच ओरडणं असे विविध आवाज मुलं-मुली ऐकायची. मुलं झुळझुळणाऱ्या पाण्यात, चिखलात खेळायची, पावसात भिजायची, उन्हात तापायची आणि सोसाट्याच्या वाऱ्यात आडोशाला लपायची. झाडावर चढायची, विहिरीत पोहायची तसेच आई-बापाबरोबर शेतात राबायची, कामाचा अनुभव घ्यायची आणि शाळेत उपस्थित नव्हती म्हणून शिक्षकांचा मारही खायची. मा. सुरेश खोपडे (IPS) सुद्धा अशाच कुडाच्या शाळेत शिकले. ते पोलिस अधिकारी असले तरी त्यांचे मन अत्यंत संवेदनशील असल्यानं त्यांचे मुलांच्या शिक्षणाकडं लक्ष गेलं. आजच्या शाळांमध्ये चाकोरीबद्ध शिक्षण दिले जातं. मुलांचा निसर्गाशी, माणसांशी, अनुभवांशी संबंध राहिलेला नाही. त्यांना जीवन अनुभव मिळेनासा झाला आहे. पुस्तकी शिक्षण आणि परीक्षेतून मिळालेले गुण यांनाच शिक्षण संबोधले जाऊ लागलं आहे. अशा चाकोरीमध्ये चार भिंतीत कोंडलेलं शिक्षण मुलांचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. मुलांनी निरीक्षण करायला शिकले पाहिजे. प्रयोग करणं, प्रश्न विचारणं, भांडण करणं, मैत्री करणं अशा अनेक गोष्टी करायला हव्यात. फक्त गुण मिळविण्यासाठी शाळेत जाणं हा शाळेचा उद्देश असू शकत नाही. त्यामुळेच कुडाच्या शाळेत मा. खोपडे साहेबांसारख्या अनेकांना मिळालेले शिक्षण आजच्या शिक्षणापेक्षा खूपच वेगळं आणि सरस होते हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून आपण जशा शाळेत शिकलो तशी मुलांना अनुभव देणारी शाळा निर्माण करावी असा विचार मा. खोपडे यांनी केला आणि बिनभिंतीची पण विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी शाळा सुरु केली, तीच ‘कुडाची शाळा’ होय. मा. सुरेश खोपडे सांगतात की, “मानवाने पहिला शोध अग्नीचा लावला. त्यासाठी त्याने लाकडावर लाकूड घासले आणि त्यातून ठिणगी उडाली. तर असाच विचारांची ठिणगी उडवी त्यासाठी ही बिना भिंतीची प्रयोगशाळा. त्यालाच चिंतन पार्क असेही नाव दिले आहे. हे दोन लाकडे अग्नी पेटवण्यासाठी एकमेकावर घासावे लागतात त्याचे प्रतिक म्हणून उभे केले आहेत.”
मा. सुरेश खोपडे सांगतात की, “माझे वर्गमित्र, सहकारी सर्वच जन म्हणतात की तुम्ही निवृत्त झाले आहेत, इथे हॉटेल, कार्यालय असे व्यवसाय सुरु करून उत्त्पन्न येऊ शकते ते सोडून हे शाळा सुरु केली आहे. तुम्हाला एवढं काय पडलं आहे? तर त्याचे उत्तर देण्यासाठी मला दोन प्रश्न्नांची उत्तरे देणे गरजेचे वाटते - पहिला म्हणजे ही व्यवस्था बदलायची कोणी? जर तुम्ही नाही तर कोण? (if not you then who?). माझा उद्यावर भरोसा नाही. दुसरा प्रश्न म्हणजे आत्ता नाही तर कधी? (if not now then when?)” प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं एक ध्येय (Purpose of Life) असतं. प्रत्येकाला आपला स्वतःचा आतला आवाज असतो. हा आतला आवाज आपल्याला ध्येय, आकांक्षा, स्वप्न सांगत असतो. ‘मी कोण?’ या प्रश्नाचे उत्तर देतो. परंतु या आतल्या आवाजाची तीव्रता प्रत्येक माणसात कमी-जास्त असते. ज्या माणसांमध्ये तीव्रता कमी असते त्यांचा आवाज व्यवस्थेत दाबला जातो. मा. सुरेश खोपडे यांचा आतला आवाज मात्र तीव्र आहे, त्यांनी त्यांचा हा आतला आवाज दबून दिला नाही, त्यांनी तो आवाज लक्षपूर्वक ऐकला आणि इतरांकडे बोट दाखवण्याऐवजी स्वतःच शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचे ठरवलं. विद्यार्थ्यांना २१ व्या शतकातल्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाता येईल अशा शिक्षणाचा पाया रचला जाईल अशी शाळा मा. खोपडे साहेबांनी मोरगाव (बारामती) येथे सुरु केली.
प्राचीन भारतीय शिक्षणप्रणाली जसे वैदिक, बौद्ध, इस्लामिक, गांधीजींची नई तालीम, कृष्ण्मुर्तींचे शिक्षणावरील विचार तसेच आधुनिक ज्ञानरचनावाद अशा विविध शैक्षणिक विचार प्रवाहांचा मा. सुरेश खोपडे यांनी ही कुडाची शाळा सुरु करण्याआधी अभ्यास केला. कुडाच्या शाळेत मिळणारं शिक्षण जीवनाला सक्षमपणे समोरे जायला उपयोगी पडते, ते अनुभव मुलांना स्वतः शिकायला प्रवृत्त करतात. हा विचार डोक्यात ठेऊन कुडाच्या शाळेची रचना केलेली आहे. या कुडाच्या शाळेत कोणीही व्यक्ती मुलांना शिकवीत नाही तर प्रत्येक व्यक्ती स्वतःच शिकत असते आणि शाळेतील प्रत्येक घटक जसे झाडे, पक्षी, विविध दालने मुलांना शिकवितात. उंच उंच वाढलेली झाडं, झाडावरची पानं-फुलं, झाडावर खोपा विणणाऱ्या सुगरणी, पिल्लांना अळ्या भरवणाऱ्या चिमण्या, पाने हळूहळू कुरतडणाऱ्या अळ्या, तळं आणि विविध दालनांमध्ये उपलब्ध केलेल्या शैक्षणिक वस्तू आणि साहित्य अशा अनेक गोष्टी मुलांना शिकवितात. या शाळेत अनेक प्रकारची माहिती तर मिळतेच पण मुले निसर्गात विचार करायला शिकतात. मुलांना प्रश्न पडतात. शिक्षण ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. या कुडाच्या शाळेत प्रत्येकाच्या शिक्षणाची सुरुवात होते. तेथे येणारे प्रत्येक मुलं, पालक, अगदी शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधिकारी सुद्धा विद्यार्थीच असतात. शाळेच्या गेटमधून आत आलेली प्रत्येक व्यक्ती ही या शाळेचा विद्यार्थी असते आणि बाहेर जाताना काही प्रमाणात का होईना शिक्षक बनते. पारंपारिक शाळा जेथे संपते तेथे ही (कुडाची) शाळा सुरु होते. ज्या गोष्टी चाकोरीबद्ध शाळेत शिकविल्या जातनाहीत त्या कुडाच्या शाळेत शिकल्या जातात. पाठांतर करून मार्क्स मिळविण्यापेक्षा मुलं आत्मशोध घ्यायला शिकतात, मुलांमध्ये नाविन्याच्या शोधासाठी कुतूहल वाढीस लागतं, मुलांची चिकित्सक बुद्धी विकसित होते. कुडाच्या शाळेत काही मुले पक्षी बघतात, कोणी झाडे बघतात, कोणी ऐतिहासिक वस्तू बघतात तर कोणी तलावातील होडीत बसून सफारी करतात, जीवन अनुभव घेतात, त्यातून त्यांना प्रश्न तर पडतातच पण वेगवेगळी कौशल्ये विकसित करण्याची प्रेरणा मिळते, आपली कौशल्ये ओळखून मोठी स्वप्ने बघण्याची दृष्टी विकसित होते, मुलांच्या विचारशक्तीला उंच भरारी घेण्यासाठी पंख फुटतात. विद्वान माणसे अशाच शाळेत घडतात.
मा.सुरेश खोपडे यांची जेजुरी-मोरगाव रस्त्यावर मोरगाव येथे पाच एकर वडिलोपार्जित जमीन आहे. त्यांनी त्यांच्या संकल्पनेतील कुडाची शाळा याच जमिनीवर उभारलेली आहे. या शाळेत पारंपारिक शिक्षक नाहीत, नियमित विद्यार्थी नाहीत आणि भिंतीही नाहीत. या शाळेत आपल्याला ७५० प्रकारच्या औषधी व इतर वनस्पती पाहायला मिळतात. जसे सफरचंद, एगफ्रुट, चेरी, बांबू, इ. वनस्पती पाहायला मिळतात. तसेच पोपट, टर्की, कबुतरे, वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या यांसारखे देशी-विदेशी पक्षांचे निरीक्षण करता येते. विविध मासेही बघायला मिळतात.
मुख्य फाटकातून आत येताच आपल्याला कुडाच्या शाळेची संकल्पना सांगणारी भिंत दिसते. पुढे विश्वाची निर्मिती कशी झाली हे सांगणाऱ्या ‘बिग बँग थेरी’ बद्दल माहिती मिळते. त्याशिवाय मानवी उत्क्रांतीचा इतिहास सांगणारी विविध चित्रे, पोस्टर, फोटो दिसतात. विश्वनिर्मितीपासून ते मानव चंद्रावर कसा पोहोचला यांची माहिती येथे मिळते.
शाळेतील म्युझियममध्ये काही हजार वर्षापूर्वी नष्ट झालेल्या सजीवांचे जीवाश्म, अनेक प्रकारच्या गारगोटी येथे पाहायला मिळतात. साधारणपणे १० हजार वर्षापूर्वी पृथ्वीवरून नाहीसा झालेला महाकाय वूलीमॅमथ (Wollymamoth) चा सायबेरियामध्ये सापडलेला केस तसेच सहारा वाळवंटामध्ये सापडलेला उल्केचा अवशेष येथे ठेवलेले आहेत. ‘टायगर ऑफ द सी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शार्क माशाचे दातही या म्युझियम मध्ये पाहायला मिळतात. तसेच डमरू, बासरी, तंबोरा, चिपळ्या, टाळ, लेझीम, घुंगरू यांसारखी विविध पारंपारिक वाद्ये येथे ठेवलेली आहेत. धर्मग्रंथ, तलवार, धनुष्यबाण आणि भारतीय व परदेशी खेळाचे साहित्य येथे संग्रहित केलेले आहेत.
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील जुनी घरे विशिष्ट प्रकारची होती. त्यांची रचना आणि वस्तूही विशिष्ट होत्या. त्या घरांची छप्परे झावळ्या, कौल, पत्रा किंवा मातीच्या धाब्याची असायची. त्यात मातीची चूल, जातं, उखळ, मुसळ, मातीची भांडी, मडक्यांची उतरंड, लाकडी सामान यासारख्या विशिष्ट प्रकारच्या वस्तू असतं. यासर्वांचे जतन १०० वर्षापूर्वीच्या त्यांच्या आजोबांच्या घरात केलेलं आहे. आता ग्रामीण भागातसुद्धा सिमेंटची घरे बांधलेली आहेत, त्यामुळे हा आपल्या आजी-आजोबांचा इतिहास पुसला जात आहे. या इतिहासाचा वारसा नव्या पिढ्यांना मिळावा यासाठी त्यांनी यावस्तुंचे ‘आजोबांचे घर’ या दालनामध्ये जतन केला आहे.
शाळेत भिंतीविरहीत अभ्यासिका उभारलेली आहे त्याला त्यांनी चिंतन पार्क नाव दिलेलं आहे. लाकडावर लाकूड घासून अग्नी प्रज्वलीत करणं हा माणसाचा पहिला शोध. लाकडावर लाकूड घासून एक ठिणगी निर्माण होतं, त्यातून अग्नी प्रज्वलीत होतो. मानवी चिंतनाची सुरुवातही अशाच एखाद्या विचार-ठिणगीने होते. म्हणून या चिंतन पार्कच्या प्रवेश द्वारावर लाकडावर लाकूड घासून अग्नी प्रज्वलीत करण्याची प्रतिकृती उभारलेली आहे. या चिंतन पार्क मध्ये सर्व जाती, धर्म, पंथातील, सर्व वयोगटाच्या आर्थिक गटातील ग्रामीण-शहरी माणसांसाठी चिंतन करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी विषयाची मर्यादा नाही. या पार्कच्या जवळच असलेल्या दालनात शिवाजी महाराजांच्या काळापासूनची जुनी नाणी, अनेक देशांची चलने, त्यांचे झेंडे अशा गोष्टी देखील ठेवलेल्या आहेत.
शिक्षणाबरोबरच करमणूक आणि पर्यटनाची सुद्धा येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. तेथे बोटिंग, रेन डान्स, भारतीय खेळ अशा गोष्टी करायला मिळतात. तसेच येथे भेट देणाऱ्या लोकांना ग्रामीण भागातील खाद्यपदार्थ आणि जेवणाचाही आनंद घेता येतो. येथे ५० लोकांची कापडी तंबूमध्ये राहण्याची सोय केलेली आहे.
एकंदर पुणे-बारामती मुख्य रस्त्यावर असलेल्या वडिलोपार्जित ५ एकर जमिनीवर मा. खोपडे साहेबांनी सुधारणावादी विचारांनी प्रेरित होऊन नाविन्यपूर्ण कुडाची शाळा उभारली. खरंतर या मोक्याच्या जमिनीवर निवृत्तीनंतर एखादी भांडवली वास्तू, हॉटेल यासारखे व्यवसाय उभारून त्यांना नफा मिळविता आला असता. यामुळेच लोक शाळा सुरु करण्याच्या या उद्योगावर हसत आहेत. मा. खोपडे साहेब मात्र याकडे सकारात्मक पद्धतीने पाहत आहेत, ते म्हणतात, “जसे लोक माझ्यावर हसतात मीही त्यांच्यावर हसतो. ही हसण्याची ताकत मला वाचनातून, शिक्षणातून, अभ्यासातून येते.” खरच समाजात अशा ध्येयवादी माणसांची आणि नवनवीन प्रयोगांची गरज आहे. चार भिंतीमध्ये, चाकोरीबद्ध संकुचित शैक्षणिक वातावरणात विद्वान तयार होत नाहीत, त्यासाठी खुल्या, विचार करायला प्रेरित करणाऱ्या, कुतूहल निर्माण करणाऱ्या, प्रश्न विचारायला संधी देणाऱ्या शैक्षणिक व्यवस्थेची गरज आहे. मा. सुरेश खोपडे यांनी उभारलेली कुडाची शाळा हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.