सारांश
डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी या ‘कासाळगंगा’ नदीखोऱ्यातील जलसंधारण, ग्रामीण अर्थव्यवस्था, समाज व राजकीय व्यवस्थेचा ऐतिहासिक, आर्थिक व समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून सखोल अभ्यास करून या पुस्तकात मांडलेला आहे. या अभ्यासासाठी डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी अभ्यास क्षेत्रास अनेक भेटी देऊन स्थानिक नागरिक, या विषयातील तज्ञ आणि धुरीण यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अनेक मुलाखती घेऊन महत्वाच्या नोंदी घेतलेल्या आहेत. सदर अभ्यासात आकडेवारी बरोबरच गुणात्मक आकलन आणि विश्लेषणाला विशेष महत्व देण्यात आलेले आहे.
1 . कासाळगंगा : कहाणी लोकसहभागातून जलविकासाची
डॉ. सोमीनाथ घोळवे
प्रस्तावनेतच पुस्तकाने स्वीकारलेला प्रागतिक दृष्टीकोन वाचकांच्या लक्षात येतो. लेखकाने भारतातील शेतीचे स्वरूप, निसर्गाधारीत समस्या आणि प्रगतीच्या अडून माणसाने निर्माण केलेले शेतीतील प्रश्न अगदी स्पष्टपणे मांडलेले आहेत. दुष्काळात शेती, ग्रामीण जीवन आणि एखाद्या प्रदेशातील अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होऊन जाते. म्हणून लेखकाने दुष्काळ, दुष्काळाची ऐतिहासिक व प्रादेशिक व्याप्ती, दुष्काळाबद्दल राज्यकर्ते व शासनाचा दृष्टीकोन, इतिहास काळापासून शासनाने दुष्काळ निवारणासाठी केलेली कामे आणि यशापयश यांचा सखोल धांडोळा घेतलेला आहे. महाराष्ट्रातील शेतीचे स्वरूप, कोरडवाहू व सिंचनाच्या सुविधा असलेल्या क्षेत्रातील पीकपद्धती, जलसिंचनाच्या सुविधा व पिकपद्धतीचा सिंचन व्यवस्थेवरील ‘ताण’, इत्यादी बाबी लेखकाने अत्यंत जबाबदारीने स्पष्ट केलेल्या आहेत. मृदा, पाणी, शेती आणि नैसर्गिक साधनसंपदा यांचे व्यवस्थापन, त्या संबंधीचे कायदे व नियम आणि त्यांचे मानवी जीवनातील महत्व समजून घेण्यासाठी समाजात जाणीवपूर्वक जागृती करणे आवश्यक असल्याचे सांगायला लेखक विसरत नाहीत.
महाराष्ट्रात स्वातंत्र्योत्तर काळात अनेक योजना राबवुन मृदा-पाणी-वन संवर्धनाच्या माध्यमातून दुष्काळ निवारणाचे रचनात्मक काम उभारण्यात आलेले आहे. अलीकडे महाराष्ट्र शासनाने ‘जलयुक्त शिवार’ नावाची योजना राबवुन जलप्रवाह खोदून जलमय करण्याचा संकल्प करून तशी योजना राबविलेली आहे. मात्र, या योजनेची उद्दिष्ट्ये यशस्वी झाली नसल्याचे डॉ. विवेक घोटाळे आणि डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झालेले आहे. महाराष्ट्रात दुष्काळ निवारण व कृषी विकासाची अनेक ‘मॉडेल्स’ सर्वस्तृत आहेत. शासनाने व अनेक संस्थांनी त्या प्रकल्पांच्या आधारावर दुष्काळ निवारणाचे प्रकल्प हाती घेतलेले होते, तरीपण प्रत्यक्षात विस्तृत क्षेत्रावर याकामी यश संपादन करता आलेले नाही. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्राच्या दुष्काळी क्षेत्रातील ‘कासाळगंगा’ नदीखोऱ्यात विविध संस्थांच्या सहकार्यातून राबविलेला जलविकास प्रकल्प आणि त्या माध्यमातून झालेले ग्रामीण व्यवस्थेचे मूल्यवर्धन अधिक उठून दिसते. डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी या ‘कासाळगंगा’ नदीखोऱ्यातील जलसंधारण, ग्रामीण अर्थव्यवस्था, समाज व राजकीय व्यवस्थेचा ऐतिहासिक, आर्थिक व समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून सखोल अभ्यास करून या पुस्तकात मांडलेला आहे. या अभ्यासासाठी डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी अभ्यास क्षेत्रास अनेक भेटी देऊन स्थानिक नागरिक, या विषयातील तज्ञ आणि धुरीण यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करून अनेक मुलाखती घेऊन महत्वाच्या नोंदी घेतलेल्या आहेत. सदर अभ्यासात आकडेवारी बरोबरच गुणात्मक आकलन आणि विश्लेषणाला विशेष महत्व देण्यात आलेले आहे.
‘कासाळगंगा’ नदीखोऱ्यातील भौगोलिक, आर्थिक आणि सामाजिक माहितीच्या विश्लेषणाबरोबरच जल टंचाई, नापिकी, मजुरांचे स्थलांतर, इत्यादी समस्यांचे सखोल आकलन या पुस्तकात मांडलेले आहे. क्षेत्रातील दुष्काळाचे निवारण करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन व लोक सहभागातून आराखडा तयार करून त्याच्या आधारे विकास कामांची मांडणी करण्यात आलेली आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी विविध संस्थांकडून निधी उपलब्ध करण्यात आला तसाच लोकसहभागही या कामी महत्वाचा ठरलेला आहे. दुष्काळ निवारणातील पाण्याचे महत्व अधोरेखित करतानाच शेतीच्या नियोजनालाही महत्व देण्यात आलेले आहे.
उपलब्ध पाण्याचा वापर करून कमीत कमी पाणी वापरून अधिकाधिक उत्पन्न मिळविणे व मिळविलेल्या कृषी उपन्नाला अधिक बाजारभाव मिळवून त्यांचे मूल्यवर्धन घडवून आणणे, हे कृषीआधारित ग्रामीण अर्थव्यवस्था विकसित करण्याचे सूत्र या पुस्तकात नेमकेपणाने मांडलेले आहे. ‘कासाळगंगा’ नदीखोऱ्यात राबविलेल्या विकास प्रकल्पात मिश्रशेती, कमी पाण्यात उभी राहिलेली बाजाराभिमुक पीक रचना व जोडीला पशुपालन, दुग्ध व कुक्कुटपालन व्यवसाय यांचा सहभाग दिसून येतो. नदीखोऱ्यातील दुष्काळ निवारण करून विकास साधण्यासाठी लोकसहभागाबरोबरच ‘गटशेती’ सारखे व्यवस्थापनाचे नवीन प्रयोगसुद्धा करण्यात आलेले दिसून येतात.
द युनिक फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने सुरू असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील अभ्यास प्रकल्पांपैकी या अत्यंत महत्वाच्य अहवालाचे डॉ. सोमीनाथ घोळवे यांनी नेमकेपणाने आणि जबाबदारीने मानवतावादी दृष्टीकोन मनात ठेऊन मांडणी केलेली आहे. त्यासाठी द युनिक फाउंडेशन, पुणे व डॉ. सोमीनाथ घोळवे यांच्या प्रति प्रेम व्यक्त करतो.
----------------------------
प्राध्यापक (डॉ.) विजय भगत.