७७-९३

ग्रामसभा: प्रभावी शासन प्रशासनासाठी

ग्रामपातळीवरील शासन-प्रशासन

नितीन आरोटे 1 , Vijay Bhagat 2

1.अगस्ति कला, वाणिज्य आणि दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले - ४२२६०१, जि. अहमदनगर, महाराष्ट्र (भारत).

2.Post-graduate Research Centre in Geography, Agasti Arts, Commerce and Dadasaheb Rupwate Science College, Akole-422601, Ahmednagar, Maharashtra (India).

01-02-2017
01-01-2017
01-01-2017
01-02-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

  1. ग्रामसभा ही तळापासून काम करणारी परिणामकारक संस्था आहे.
  2. शासन विविध विभागांच्यामार्फत गावात येऊन विकासकार्ये करते.
  3. ग्रामसभा आपले दृष्टीकोण-अपेक्षा ठराद्वारे शासनापर्यंत पोहचवू
  4. ग्रामसभा अधिकारी व कर्मचारी यांच्या कार्यावर नियंत्रण ठेऊ शक

सारांश

भारतीय शासन व्यवस्थेत गाव हा सुरवातीपासूनच राज्य कारभारचा स्थानिक घटक आहे. वर्तमान शासन व्यवस्थेत ग्रामपंचायत ग्रामपातळीवर कार्यरत असली तरी वरिष्ठ शासन-प्रशासनातील विविध यंत्रणा व विभागांचे अधिकारी, कर्मचारी देखील ग्रामपाळीवर कार्यरत आहेत. गावाच्या हद्दीत काम करणार्‍या प्रत्येक घटकाचे कार्ये व जबाबदारी यांचा ग्रामसभेशी असणार्‍या संबंधाचे विश्लेषण या प्रकरणात केलेले आहे.

पारिभाषिक शब्द

ग्रामशासन-प्रशासन , ग्रामपंचायत , विकास प्रशासन , शासकीय उपक्रम

1 . प्रस्तावना

भारतीय शासन व्यवस्थेत गाव हा सुरुवातीपासूनच राज्यकारभाराचा स्थानिक स्वलक्षण घटक आहे. असे असले तरी आधुनिक शासन व्यवस्थेत मात्र शासन, प्रशासन व विकासासंबंधीचे निर्णय व कामे ही केंद्र, घटकराज्य व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या लोकशाही स्वरूपाचे (प्रातिनिधिक) शासन व प्रशासकीय यंत्रणेच्या आधारे केली जातात. गावातील लोक, साधनसंपदा यांच्याविषयीचे निर्णय याच उतरंडीची रचना असलेल्या शासन, प्रशासन व्यवस्थेतून होतात. तेच शासन या गावाच्या क्षेत्रात राहणार्‍या लोकांच्या विकासासाठी विविध विभागांच्या माध्यमातून गावात कार्य करते. उदा. शिक्षण, आरोग्य, 

महसूल, वन, कृषी, लघु पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, वीज पुरवठा, पतपुरवठा, पोस्ट ऑफिस, सहकारी संस्था, पशुवैद्यकीय उपचार, इत्यादी. हे सर्व होत असताना प्रत्येक गाव स्वलक्षण असूनही हे विविध विभाग गावातील साधनसंपदा, तेथे राहणारे लोक व त्यांच्या गरजा विचारात घेतातच असे नाही. म्हणून गावांच्या क्षेत्रात असलेल्या साधनसामग्रीचा वापर करून मानवी दृष्टिकोणातून नागरिकांच्या भारतीय शासन व्यवस्थेत गाव हा सुरुवातीपासूनच राज्यकारभाराचा स्थानिक स्वलक्षण घटक आहे. असे असले तरी आधुनिक शासन व्यवस्थेत मात्र शासन, प्रशासन व विकासासंबंधीचे निर्णय व कामे ही केंद्र, घटकराज्य व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या लोकशाही स्वरूपाचे (प्रातिनिधिक) शासन व प्रशासकीय यंत्रणेच्या आधारे केली जातात. गावातील लोक, साधनसंपदा यांच्याविषयीचे निर्णय याच उतरंडीची रचना असलेल्या अपेक्षेप्रमाणे त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्या गावातील लोकांचे मत व दृष्टिकोन विचारात घेणे आवश्यक आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून त्यांचे विचार आणि दृष्टिकोन विचारात घेता येणे शक्य आहे. अधिनियमानुसार ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात काम करणार्‍या सर्व शासकीय, निमशासकीय, पंचायतराज कर्मचार्‍यांनी गावातील ग्रामसभा बैठकीला उपस्थित राहून आपल्या विभागाशी संबंधित बाबींवर ग्रामसभेशी विचारविनिमय करणे अपेक्षित आहे. ग्रामसभा स्थानिक माहिती व आपली ग्रामविकासविषयक भूमिका या कर्मचार्‍यांमार्फत वरिष्ठ शासनापर्यंत पोहोचवू शकते. ज्यातून वरिष्ठ शासनाला विकास कार्यक्रमांच्या नियोजनात मदत होते.

2 . अधिकारी व कर्मचारी : महसूल व मुलकी प्रशासन

२.१ तलाठी

महसूल विभाग गाव पातळीवर तलाठी कार्यालयामार्फत काम करीत असून तलाठी व कोतवाल हे त्या कार्यालयाचे दोन प्रमुख घटक आहेत. तलाठी हा या कार्यालयाचा मुख्य घटक असून कोतवाल हा त्याच्या कामात मदत करतो. महसूल प्रशासनाचा गावातील मुख्य घटक म्हणून गावात विविध कामे व निर्णयांची अंमलबजावणी करताना तलाठी प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून काम करतो. स्वातंत्र्यपूर्व काळात शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात सन १९१८ मध्ये कुलकर्णी हे वतन रद्द करून पगारी तलाठी नेमले.

जमिनीविषयीच्या नोंदी ठेवून पीक परिस्थितीप्रमाणे महसुलाची वसुली करणे, नागरिकांना जमिनीचे उतारे देणे ही जमीनविषयक महत्वाची कामे तलाठी करतो. गावातील नागरिकांच्या जीवनाच्या या महत्वाच्या घटकाशी त्याचे कार्य जोडलेले आहे. ग्रामपातळीवर आधुनिक काळात होणारे बहुतेक तंटे हे याच जमिनीच्या वादामधून होतात. बहुतेक वेळा या नोंदी योग्यरीतीने केलेल्या नसल्याने जमिनीसंबंधीच्या हक्कांत गोंधळ निर्माण होतो. म्हणून गावात असलेल्या जमिनीच्या हक्कांबद्दल ग्रामसभा बैठकीत चर्चा केल्यास, गावातील जाणकार लोकांकडून सामूहिकरीत्या चर्चा झाल्यास अशा प्रकारच्या तंट्यांची संख्या कमी होऊन त्यांचे गांभीर्य शिथील होऊ शकते. पीक पाहणी अशा ग्रामसभा बैठकीत चर्चिली गेल्यास सामूहिकरित्या त्यांची योग्य रितीने नोंदणी होऊन शासनालादेखील योग्य महसूल मिळेल. ग्रामसभेने आपल्या बैठकीत गावातील आरोग्यविषयक व्यवस्थेबद्दल चर्चा करून त्यासंबंधीचा अहवाल तलाठ्याला दिल्यास त्याला प्रशासकीय कार्यवाहीसाठी वरिष्ठांकडे त्यासंबंधीची माहिती देऊन योग्य ती कार्यवाही करता येईल. ग्रामसभेने आपदग्रस्त, निराधार लोकांची यादी करून तलाठ्याला दिल्यास अधिक योग्य लोकांची निवड होऊन त्यांच्यासंबंधीच्या योजनाही तळातल्या माणसापर्यंत पोहोचविणे शक्य होईल.

महसूल वसुली, तगई वसुली, दुष्काळ निवारण, कुटुंबंनियोजन कार्यक्रम याबाबतची कामे, जमिनीच्या अधिकारपत्राच्या नोंदी ठेवणे, साथीच्या रोगांची माहिती आरोग्य अधिकार्‍यांकडे पाठविणे, आपदग्रस्त व निराधार कुटुंबांचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करणे, जमिनीची पैसेवारी ठरविणे, कायदा व सुव्यवस्थेबाबत आलेल्या कागदपत्रांची नोंदणी करणे इत्यादी कार्य त्याला गावपातळीवर करावी लागतात. ही सर्व कामे करताना तलाठ्याने गावपातळीवर ग्रामसभेला विश्वासात घेऊन कार्य केल्यास त्याचे कार्य अधिक परिणामकारक होणे शक्य आहे.

२.२ पोलिस पाटील

गावात कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस पाटलाची असून अवैध दारू विक्री व जुगार व्यवसाय, चोरी, दरोडेखोरी, फौजदारी स्वरूपाचे गुन्हे या बाबतची माहिती तो पोलिसांना कळवितो. गावात निर्माण होणारे तंटे व संघर्ष गावपातळीवर मिटविणारी पोलिस विभागाच्या 'महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान मोहीम' राबविण्यास मदत करणे, नैसर्गिक आपत्तीच्या काळात आपत्तीची माहिती तहसीलदारांना देणे, इत्यादी कामे पोलिस पाटील करतो. त्याच्या या कामात कोतवालच त्याला मदत करतो.

गावाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्थेच्या संबंधात प्रश्न निर्माण झाल्यास त्यासंबंधी ग्रामसभा ठराव करून आपले म्हणणे पोलिस यंत्रणेमार्फत शासनापर्यंत पोहोचवू शकते. या बाबी नागरिक एकट्या एकट्याने शासन व्यवस्थेसमोर मांडू शकत नाहीत. त्यांची त्यांच्याच सभेत चर्चा झाल्यास त्या योग्य रितीने शासनापर्यंत पोहोचू शकतात. उदा. ग्रामसभा ठरावाद्वारे पोलिस पाटलामार्फत गावात पोलिस चौकी उभारण्याची मागणी करू शकते.

२.३ कोतवाल

कोतवाल हा गावातील मुलकी प्रशासनाचा प्रमुख पोलिस पाटील, महसूल प्रशासनाचा प्रमुख तलाठी व ग्रामपंचायतीचा सचिव ग्रामसेवक यांना त्यांच्या कामात मदत करणारा शासनाचा कर्मचारी आहे. गावात दवंडी देऊन सरकारी सूचना जाहीर करणे, गुन्ह्यांसंबंधी माहिती पोलिस पाटलास देणे, जन्म - मृत्यू, विवाह नोंदणीची माहिती ग्रामसेवकास देणे, तलाठी कार्यालय व चावडी येथे स्वच्छता ठेवणे, इत्यादी कार्ये तो करतो. ग्रामसभा बैठकीची दवंडी कोतवालामार्फतच दिली जाते.

3 . ग्रामपंचायत

भारतीय पंचायत राज शासनपद्धती ही प्रामुख्याने लोकांच्या सहभागातून विकासात्मक कामे करणारी यंत्रणा आहे. ग्रामपातळीवर लोकांचा सहभाग घेऊन काम करणारी ग्रामपंचायत ही पंचायतराजची प्राथमिक घटक संस्था आहे. गावपातळीवर काम करताना जिल्हा परिषद काही कामे व योजना थेट गावात जाऊन राबविते तर काही कामे व योजना पंचायत समितीच्यामार्फत ग्रामपंचायतीकडून अमलात आणतो. अशा प्रकाच्या योजनांची आखणी करून गावपातळीवर प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामसभा ग्रामपंचायतीबरोबर सहभाग नोंदवू शकते.

लोकशाही शासन व्यवस्थेत तळाच्या पातळीवर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नियंत्रणाखाली कार्य करणारी ग्रामपंचायत ही लोकप्रतिनिधींची सभा असून सरपंच हा गावाचा प्रथम नागरिक व ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो. ग्रामसेवक हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून त्याला त्याच्या कामात मदत करतो. पंचायत व प्रशासन अशा दोन भागांत ग्रामपंचायतीचे काम चालते. ग्रामसभा बैठक बोलविण्याची व तिचे संचलन करण्याची प्राथमिक जबाबदारी ग्रामपंचायतीवर असून आपल्या कामांचे परीक्षण ग्रामपंचायतीला ग्रामसभेकडून करून घ्यावे लागते; त्यामुळे अधिनियमानेच ग्रामपंचायतीच्या कार्यासंबंधी ग्रामसभेची भूमिका निश्चित केली आहे.

३.१ सरपंच

आपल्या क्षेत्रातील जनतेच्या गरजांपैकी ग्रामपंचायतीच्या अधिकारात येणार्‍या नागरिकांच्या गरजा ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करणे आणि ज्या गरजांची पूर्तता ग्रामपंचायतीच्या अधिकाराबाहेर असेल त्या संबंधित यंत्रणेकडून अशा गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहणे, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती व शासकीय संस्था यांचे कर्मचारी यांपैकी जे ग्रामपंचायत क्षेत्रात कार्यरत असतील त्यांच्याशी संपर्क ठेवणे आणि ग्रामपंचायतीच्या कामात त्यांचा सहभाग घेऊन गावाचा विकास करणे याबाबतची संपूर्ण जबाबदारी सरपंचाची आहे. आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान चार बैठका बोलावण्याची कायदेशीर जबाबदारी सरपंचाची असून ग्रामसभा सभासदांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, ग्रामसभा सभासदांना मार्गदर्शन करणे, ग्रामसभेचा ग्रामविकासविषयक दृष्टिकोन लक्षात घेऊन विकासाचे नियोजन करणे, दुर्बल व मागास घटकांचा ग्रामसभा बैठकीतील सहभाग वाढीसाठी प्रयत्न करणे, ग्रामसभेच्या ठरावांची ग्रामपंचायतीमार्फत अंमलबजावणी करणे, इत्यादी कार्ये ग्रामपंचायतीचा प्रमुख म्हणून सरपंचाला करावी लागतात.

३.२ ग्रामपंचायत सदस्य

ग्रामपंचायतीने बोलविलेल्या प्रत्येक मासिक सभेला व ग्रामसभा बैठकीला उपस्थित राहून अजेंड्यावरील विषयांवर बैठकीत अभ्यासपूर्ण व विधायक चर्चा घडवून आणणे, नागरिकांचे प्रश्न व समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणे, ग्रामपंचायत मालमत्ता व निधी यांच्या गैरवापरास प्रतिबंध करणे, ग्रामपंचायतीच्या चुकीच्या कारभाराला विरोध करणे, इत्यादी बाबतची जबाबदारी ग्रामपंचायत सदस्यांची आहे. प्रत्येक ग्रामसभा बैठकीला उपस्थित राहणे, नागरिकांच्या समस्या व गरजा समजावून घेऊन त्यांवर ग्रामसभा बैठकीत चर्चा घडवून आणणे, त्यावर उपाययोजना सुचविणे, लाभकारी योजनांसाठी योग्य व गरजू लाभार्थीची निवड होईल यासाठी ग्रामसभेमार्फत प्रयत्न करणे, आपल्या प्रभागातील नागरिकांना ग्रामसभा बैठकीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे, गावातील महत्वाचे प्रश्न आणि समस्या सोडवणुकीसाठी ग्रामसभेला मार्गदर्शन करणे, ग्रामसभा ठराव मंजूर करून घेण्यात भूमिका बजाविणे इत्यादी कार्ये ग्रामपंचायत सदस्यांची आहेत.

३.३ ग्रामपंचायतीच्या समित्या

मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायतीला ग्रामसूचीतील विषयांना अनुसरून जी निरनिराळी कामे पार पाडावयाची असतात उदा. कृषी विकास व कृषी उत्पन्न वाढ, पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास, वने व गायरान, समाजकल्याण, शिक्षण प्रौढ शिक्षणासह, वैद्यकीय सोयी आणि स्वच्छता व आरोग्य, इमारती व दळणवळण, लघुपाटबंधारे, ग्रामीण उद्योगधंदे व कुटीरउद्योग विकास, सहकार, ग्रामसंरक्षण, सामान्य प्रशासन आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा इत्यादी या कामांचे स्वरूप व व्याप लक्षात घेऊन पंचायतीचे काम योग्यरित्या व परिणामकारक होण्यासाठी पंचायत ठराव करून तिच्या सदस्यांच्या समित्या स्थापन करते. प्रत्येक समितीची सदस्य संख्या, समितीची कामे व कामाची रीत, समितीचे अधिकारक्षेत्र इत्यादी बाबी सदर ठरावात नमूद केल्या जातात. समितीने तिच्या अधिकारक्षेत्रात केलेले काम हे पंचायतीने केलेले काम समजले जाते. ग्रामपंचायतीच्या समित्या पुढीलप्रमाणे:

  1. शिक्षण समिती
  2. आरोग्य समिती
  3. बांधकाम समिती
  4. दिवाबत्ती समिती
  5. बाजार समिती
  6. पाणी पुरवठा समिती
  7. ग्रामसंरक्षण समिती
  8. फेर करआकारणी समिती इत्यादी.

याशिवाय काही प्रासंगिक समित्याही विशिष्ट उद्देशाने गठीत केल्या जातात. मात्र ग्रामपंचायतीच्या या उपसमित्यांची परिणामकता मर्यादित राहिल्याने सरकारने अलीकडे ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, अंमलबजावणी अधिकारी यांचा समावेश असलेल्या ग्रामविकास समित्या ग्रामसभेच्या सहभागातून स्थापन करण्यावर भर दिला आहे.

३.४ ग्रामसेवक व कर्मचारी

ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कारभाराची जबाबदारी ग्रामसेवकांवर आहे. तो ग्रामपंचायत आणि ग्रामसभेचा सचिव असून ग्रामपंचायतीच्या सभा व ग्रामसभेच्या बैठका यांचा अजेंडा बनविणे, तो प्रसिद्ध करणे, ग्रामसभा बैठकीची सूचना विहित मुदतीत व पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहचविणे, जन्म-मृत्यू, विवाह नोंद करणे, स्थावर मालमत्ता नोंद करणे, ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण काढणे, रोजगार हमी योजना अंमलबजावणी करणे, गावाच्या विकासाचा पंचवार्षिक आराखडा बनविणे, ग्रामपंचायत क्षेत्रात ग्राम माहिती केंद्राची स्थापना करून दूरदर्शन संच, रेडिओ व वाचनालय यांच्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामपंचायत व ग्रामस्थांना देणे, वार्षिक प्रशासन अहवाल बनविणे, ग्रामपंचायतीच्या सर्व प्रकारच्या अभिलेख्यांचे जतन करणे, इत्यादी कामे ग्रामसेवक करतो. तसेच त्याचा गावातील शेतकरी, शेतमजूर, कारागीर, लहान व्यावसायिक अशा सर्वसाधारण लोकांशी प्रत्यक्ष संबंध येत असतो. ग्रामपातळीवर कार्यरत शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना आठवड्यातून किमान एक दिवस ग्रामपंचायतीमध्ये एकत्र आणून ग्रामस्थांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही करणे ही मुख्य जबाबदारी ग्रामसेवकाची आहे. सरपंचांशी विचारविनिमय करून ग्रामसभा बैठकीचा अजेंडा बनवून तो सभासदांपर्यंत पोहोचविणे, नियमाप्रमाणे ग्रामसभा बैठकीची नोटीस देणे, मागील ग्रामसभा बैठकीतील ठरावांवरील अंमलबजावणीची माहिती ग्रामसभेला देणे, ग्रामसभा बैठकीची व्यवस्था करणे, उपस्थित ग्रामसभा सदस्यांच्या सह्या घेणे, ग्रामसभेने केलेल्या ठरावांची कार्यवाही सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या मदतीने करणे, बैठकीचा वृत्तांत सात दिवसांच्या आत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणे इत्यादी कार्ये त्याच्याकडून केली जातात.

ग्रामसेवकाला त्याच्या कार्यात मदत करण्यासाठी साधारणतः तीन हजार लोकसंख्येपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी गरजेनुसार एक किंवा त्यापेक्षा अधिक लिपिक अथवा वसुली कारकून नेमण्यात येतात. प्रशासकीय कामकाज चालविण्यात मदत करणे, ग्रामपंचायतीचे दप्तर सांभाळणे इत्यादी कामे लिपिकाकडून केली जातात. त्याशिवाय गावाची पाणी पुरवठ्याची व्यवस्था पाहण्यासाठी पाणी पुरवठा कर्मचारी नेमला जातो. पाणी शुद्धीकरण, नियमित व पुरेसा पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कर्मचार्‍याची असते. गरजेनुसार एक किंवा त्यापेक्षा अधिक सफाई कर्मचार्‍यांचीही नियुक्ती केली जाते. सार्वजनिक रस्ते, बाजारतळ व परिसर स्वच्छता, इत्यादी कामे या सफाई कर्मचार्‍यांकडून केली जातात. ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांना त्यांच्या कामात मदत करण्यासाठी गरजेप्रमाणे शिपाई नियुक्त केला जातो. ग्रामपंचायत सदस्य बैठकीची कार्यक्रमपत्रिका सदस्यांपर्यंत पोहोचवणे, ग्रामसभा बैठकीसाठी पूर्वतयारी करणे, ग्रामपंचायत कार्यालयाची स्वच्छता ठेवणे, दिवाबत्तीची व्यवस्था ठेवणे, इत्यादी कामे हा शिपाई करतो.

ग्रामसेवकांसह ग्रामपंचायतीच्या सर्व कर्मचार्‍यांवर व त्यांच्या कामावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण असते. ग्रामसभेने केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे हे ग्रामपंचायतीच्या कर्मचार्‍यांचे कर्तव्य आहे. याबाबत त्यांनी कुचराई केल्यास ग्रामसभा त्यांच्या विभागीय चौकशीसाठी शिफारस करू शकते.

३.५ ग्रामपंचायतीची ग्रामसभेबाबत कर्तव्ये

गाव पातळीवर काम करणारी ग्रामपंचायत ही स्थानिक व्यवस्था असल्याने ग्रामसभेचे कार्य सुलभ करून तिला सक्षम बनविण्यासाठी ग्रामपंचायतीवर पुढील जबाबदार्‍या सोपविण्यात आल्या आहेत :

  1. ग्रामसभा बैठकीच्या आदल्या दिवशी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात यावी व त्यात ग्रामसभा बैठकीत मांडण्यात येणार्‍या विषयांवर विचारविनिमय करावा.
  2. ग्रामसभा बैठकीच्या आदल्या दिवशी ग्रामसभेच्या महिला सभासदांची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी.
  3. प्रत्येक सहामाहीमध्ये एकदा ग्रामपंचायत क्षेत्रात चालू असलेल्या विकासविषयक कामांवर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभा बैठकीपुढे ठेवावा व त्याची माहिती पंचायतीच्या सूचना फलकावर लावावी.
  4. प्रत्येक वित्तीय वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक ते वर्ष सुरू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत ग्रामपंचायतीने आयोजित करावी.
  5. आपल्या अधिकारात येणारी कोणतीही जमीन शासकीय प्रयोजनार्थ संबंधित भूमी संपादन प्राधिकरणाकडून संपादित केली जाण्यापूर्वी ते प्राधिकरण पंचायतीशी विचारविनिमय करते. याबाबत पंचायतीला अशा प्राधिकरणाला आपले मत कळविण्यापूर्वी ग्रामसभेशी विचारविनिमय करावा लागतो.

ग्रामसभा बैठकीच्या कामकाजाचा संक्षिस वृत्तांत बांधणी केलेल्या पुस्तकाच्या स्वरूपात मराठीत ठेवणे आणि कामकाजाची एक प्रत बैठक झाल्यापासून सात दिवसांच्या आत जिल्हा ग्रामपंचायत अधिकार्‍याकडे पाठविणे.

३.६ आदिवासी क्षेत्र: ग्रामपंचायतीची ग्रामसभेबाबत कर्तव्ये

आदिवासी क्षेत्रातील गावांची भौगोलिक परिस्थिती, तेथील समाज समूहाची स्वतंत्र सामाजिक, सांस्कृतिक ओळख, आर्थिक रचना इत्यादी बाबी विचारात घेऊन या क्षेत्रातील ग्रामपंचायतींवर ग्रामसभेबाबत अधिकच्या जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :

  1. ग्रामपंचायतीने आखलेल्या व ग्रामसभेने मान्यता दिलेल्या योजना, प्रकल्प, कार्यक्रम यासाठी खर्च करण्याची परवानगी ग्रामपंचायत ग्रामसभेकडून घेते तसेच खर्च झालेल्या निधीच्या विनियोगाबाबतचे प्रमाणपत्रदेखील ग्रामपंचायतीने ग्रामसभेकडून घेणे आवश्यक आहे.
  2. पंचायतीच्या अधिकारात असलेली अनुसूचित क्षेत्रातील कोणतीही जमीन विकास प्रकल्पांसाठी आणि अनुसूचित क्षेत्रातील अशा प्रकल्पांनी बाधा पोहोचलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या पुनर्वसाहतीसाठी किंवा पुनर्वसनासाठी संपादीत करण्यापूर्वी भूमी संपादन प्राधिकारी पंचायतीशी विचारविनिमय करतो. मात्र त्याला आपले विचार कळविण्यापूर्वी पंचायतीने ग्रामसभेशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे.
  3. अनुसूचित क्षेत्रामध्ये गौण खनिजांच्या समुपयोजनासाठी संबंधित परवाना (लायसन) प्राधिकारी यांना ग्रामपंचायत ग्रामसभेशी विचारविनिमय केल्याखेरीज कोणतीही सवलत अथवा कोणतीही परवानगी देणार नाही. याबाबत ग्रामसभेचा निर्णय संबंधित प्राधिकारी आणि पंचायत यांच्यावर बंधनकारक असतो.
  4. पंचायत संबंधित गावामध्ये कार्यरत असणार्‍या समाजिक क्षेत्रातील संस्था व पदाधिकारी यांच्या कार्याचे पर्यवेक्षण व पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना कळविते. मात्र अशा शिफारशी कळविण्यापूर्वी पंचायतीला ग्रामसभेशी विचारविनिमय करावा लागतो.
  5. अनुसूचित क्षेत्रातील जमिनीच्या अन्य संक्रमणास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने आणि बेकायदेशीरपणे अन्य संक्रमित केलेली जमीन परत मिळविण्याच्या दृष्टीने, अनुसूचित जमातीच्या या व्यक्तींच्या जमिनीचे अन्य संक्रमण करण्याच्या संबंधात पंचायत जिल्हाधिकार्‍याला शिफारस करू शकते. मात्र अशा शिफारशी पूर्वी पंचायतीने ग्रामसभेशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे.
  6. सावकारीसाठी कोणताही परवाना (लायसन) देण्याकरिता संबंधित प्राधिकार्‍याला पंचायत शिफारस करू शकते. मात्र अशा शिफारशीपूर्वी पंचायतीने ग्रामसभेशी विचारविनिमय करावा. तसेच सावकारी धंद्याचे व्यवस्थापन करणे हे पंचायतीचे कर्तव्य आहे.
  7. आपल्या क्षेत्रात गाव बाजार स्थापन करण्यासाठी ग्रामसभेकडून मान्यता मिळाल्यास ती स्थापन करून चालविण्याचे कर्तव्य पंचायतीचे आहे.
  8. गाव क्षेत्रातील झाडे पाडण्याबाबत संबंधित प्राधिकार्‍याला पंचायत शिफारस करू शकते. मात्र त्यापूर्वी ग्रामपंचायतीला ग्रामसभेशी विचारविनिमय करावा लागतो.
  9. ग्रामपंचायतीला स्वत:चा अर्थसंकल्प तयार करून त्यास ग्रामसभेकडून मान्यता घ्यावी लागते. ग्रामसभेचा याबाबतचा निर्णय हा पंचायतीवर बंधनकारक असतो.
  10. ग्रामपंचायतीच्या अधिकारात असलेली जमीन, जंगल, जल आणि इतर सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती यांच्या संबंधात कोणत्याही प्राधिकार्‍याशी विचारविनिमय करण्यापूर्वी त्याबाबत पंचायतीने ग्रामसभेशी विचारविनिमय करणे आवश्यक आहे.
  11. सामाजिक व आर्थिक विकासासाठी अंमलात आणावयाच्या योजना, कार्यक्रम व प्रकल्प यांना ते अंमलात आणण्याकरिता हाती घेण्यापूर्वी संबंधित ग्रामसभेची मान्यता घेणे पंचायतीचे कर्तव्य आहे.
  12. पंचायत ग्रामसभेशी विचारविनिमय करून आपल्या क्षेत्रातील लघुजलसंचयाचे व्यवस्थापन करण्यास सक्षम आहे.
  13. ग्रामपंचायत ग्रामसभेशी विचारविनिमय करून आपल्या क्षेत्रातील गौण वनोत्पादनांचे समुपयोजन, व्यवस्थापन आणि व्यापार यांचे विनियमन करण्यास सक्षम आहे.

आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायत ही ग्रामसभेची कार्यकारी समिती असून तिला ग्रामसभेचे नियंत्रण व निर्देश याप्रमाणे कार्य करावे लागते.

4 . अधिकारी व कर्मचारी : जिल्हा परिषद व पंचायत समिती

गावपातळीवर काम करणारी जिल्हा परिषद व पंचायत समितीची स्वतंत्र यंत्रणा असून आपल्या अधिकार व कार्याला अनुसरून ही यंत्रणा लोकांना सेवासुविधा देण्याबरोबरच विकास कामे करते.

४.१ आरोग्य सेवक व सेविका

साधारणतः एक ते चार गावांसाठी मिळून जिल्हा परिषदेचे एक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्यात येते. पुरुष आरोग्यसेवक, महिला आरोग्यसेविका व मदतनीस अशा तीन व्यक्तींकडून गावाच्या आरोग्याचे व्यवस्थापन केले जाते. ० ते ५ वर्षे या वयोगटातील मुलांचे लसीकरण, गर्भवती व स्तनदा मातांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, उपजत व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, साथीचे आजार व दुर्धर आजारांचे निर्मूलन, नागरिकांसाठी प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करणे, पाणी शुद्धीकरणाची तपासणी, इत्यादी कामे या कर्मचार्‍यांकडून गावपातळीवर केली जातात.

४.२ शिक्षक व शालेय प्रशासन

प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात काम करणारे शिक्षक हे जिल्हा परिषदेचे गाव पातळीवर काम करणारे कर्मचारी आहेत. शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा टिकविणे, १०० % पट नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करणे, शालाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शालेय विद्यार्थ्यांची गळती थांबविणे, शिक्षण विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची गाव पातळीवर अंमलबजावणी करणे, इत्यादी कामे शिक्षक व शालेय प्रशासनाकडून केली जातात.

४.३ पशुधन पर्यवेक्षक

साधारणत: एक ते तीन गावांसाठी मिळून एक पशुधन पर्यवेक्षक गाव पातळीवर कार्यरत असतो. पशुवैद्यकीय चिकित्सा व मदत, कृत्रिम रेतन सेवा उपलब्ध करून देणे, संकरित व दुधाळ जनावरांच्या संगोपनासाठी मार्गदर्शन, जनावरांचे दुर्धर व साथीच्या आजारांपासून रक्षण करणे, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण, इत्यादी कामे पशुधन पर्यवेक्षकांकडून केली जातात. विशेषतः आदिवासी भागात पाऊस काळात साथीच्या आजारातून जनावरे दगावतात म्हणून या सुविधेला या भागात विशेष महत्च आहे.

४.४ शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम

साधारणतः ३० ते ३५ गावांसाठी एक शाखा अभियंता गाव पातळीवर काम करतो. जिल्हा परिषद निधीतून होणारी बांधकामे उदा. प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा खोल्या, इत्यादी याशिवाय सार्वजनिक इमारती बांधकाम व डागडुजी करणे, इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग, गावांतर्गत रस्ते सर्वेक्षण करणे, रस्ते नव्याने बांधणे, त्यांची दुरुस्ती, डांबरीकरण, इत्यादी कामे शाखा अभियंता करतो. त्यांच्या नियंत्रणाखाली एक स्थापत्य अभियंता कार्यरत असतो.

४.५ शाखा अभियंता लघुपाटबंधारे

साधारणतः ३० ते ३५ गावांसाठी एक अभियंता गाव पातळीवर काम करतो. शून्य ते दोनशे पन्नास हेक्टर लाभक्षेत्रापर्यंतची कामे या अधिकार्‍यांकडून केली जातात. नवीन पाझर तलाव, सिमेंट बंधारे, के. टी. वेअर, साठा बंधारा यांचे सर्वेक्षण करणे, मंजूर प्रकल्प कार्यवाही करणे, त्यांची दुरुस्ती करणे, नळ पाणी पुरवठा योजनांसाठी तांत्रिक सल्ला देणे, भूजल पातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करणे, लघुसिंचनाच्या योजनांची अंमलबजावणी करणे, उदा. शिवकालीन पाणी साठवण योजना, इत्यादी कामे गाव पातळीवर या अधिकार्‍याकडून केली जातात.

४.६ अंगणवाडी सेविका व मदतनीस

० ते ६ वर्षे या वयोगटातील बालकांचे पोषण व आरोग्यविषयक स्थिती सुधारण्याच्या दृष्टिकोणातून गावपातळीवर अंगणवाडी सेविका व मदतनीस कार्यरत आहेत. त्यांच्यावर  पर्यवेक्षिका - एकात्मिक बालविकास यांचे नजिकचे नियंत्रण असते. बालकांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक विकासाचा पाया घालणे, गर्भवती व स्तनदा मातांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे, विविध सप्ताह उदा. स्तनपान सप्ताह, पूरक पोषण आहार सप्ताह साजरे करणे, हागणदारीमुक्त गाव, कुपोषणमुक्त गाव याबाबत महिलांमध्ये जागृती करणे, गावातील कुटुंबांचे सर्व्हे करणे, इत्यादी कार्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकडून गावपातळीवर केली जातात.

गावपातळीवर काम करताना या सर्व विभागांना एकमेकांशी जोडून गावाचे स्वतंत्र व्यक्तिमत्व विचारात घेऊन ग्रामसभा आपली मते, दृष्टिकोन या कर्मचार्‍यांमार्फत जिल्हापरिषद व पंचायत समितीपर्यंत पोहोचवू शकते.

5 . अधिकारी व कर्मचारी - विकास प्रशासन

घटकराज्य प्रशासन गावपातळीवर विविध विभागांमार्फत विकासाची कामे करते. विकास प्रशासनाचे खालील घटक गावात येऊन कार्य करतात.

५.१ कृषी सहाय्यक

कृषी सहाय्यक हा राज्य प्रशासनाचा कृषी विकासासाठी काम करणारा गावातील घटक होय. त्याचे कार्यक्षेत्र साधारणत: दोन ते तीन गावांपुरते मर्यादित असते. हा गाव पातळीवर कार्य करणारा कर्मचारी असून त्याच्यावर नजीकचे नियंत्रण मंडल कृषी अधिकार्‍याचे असते. सुधारित व संकरीत बी-बियाणांचा प्रचार व प्रसार करणे, शेती उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करणे, पाणलोट क्षेत्र विकास, मृद व जलसंवर्धन कार्यक्रम आणि कृषी विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करणे, आपत्कालीन सर्वेक्षण व मदत करणे, गावाचा वार्षिक कृषी आराखडा तयार करणे व तो ग्रामसभेत वाचणे, इत्यादी कामे कृषी सहाय्यक गाव पातळीवर करतो.

५.२ वैद्यकीय अधिकारी (ग्रामीण रुग्णालय)

साधारणतः ५० गावांसाठी एक ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. सर्व प्रकारच्या रोगांचे निदान आणि उपचार, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेबीज प्रतिबंधक लस, प्राथमिक आरोग्य केंद्राकडून गंभीर आजाराच्या उपचारासाठी पाठविलेल्या रुग्णांवर उपचार करणे, तातडीची आवश्यकता म्हणून रुग्णवाहिकेची सेवा पुरविणे, इत्यादी सुविधा ग्रामीण जनतेला ग्रामीण रुग्णालयत मोफत दिल्या जातात.

५.३ शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम

साधारणत: २० ते २५ गावांसाठी एक अभियंता गाव पातळीवर काम करतो. त्याच्या मदतीला रोड कारकून, मैल बिगारी असतात. स्थानिक मागणीवर आधारित रस्ते, पूल, मोर्‍या, शासकीय इमारती यांचे सर्वेक्षण करणे, अंदाजपत्रक बनविणे, संबंधित यंत्रणेकडून योग्य त्या पद्धतीने काम करवून घेणे, तांत्रिकदृष्ट्या मोजमाप लिहून देणे, इत्यादी कामे गावपातळीवर शाखा अभियंता करतो.

५.४ शाखा अभियंता लघुपाटबंधारे

साधारणत: ६० ते ७० गावांसाठी एक शाखा अभियंता गाव पातळीवर कार्यरत आहे. त्याच्या मदतीसाठी एक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असतो. स्थानिक पातळीवर धरणे, कॅनॉल यांचे सर्वेक्षण करणे, त्यांचे अंदाजपत्रक बनविणे, मंजूर कामे करून घेणे, स्थानिक मागणीनुसार गावतळी, गावतलाव यांतील गाळ काढणे, त्यांची दुरुस्ती व डागडुजी याबाबतचा आराखडा बनवून वरिष्ठ पातळीवर मंजुरीसाठी पाठविणे, इत्यादी कामे शाखा अभियंता गाव पातळीवर करतो.

५.५ वनरक्षक

वनरक्षक हा जंगलांचे संरक्षण करणारा राज्य प्रशासनाचा कर्मचारी आहे. साधारणत: १० ते १२ गावांसाठी एक या प्रमाणे वनरक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यावर नजीकचे नियंत्रण वनपालाचे असते. वनरक्षकाच्या नियंत्रणाखाली वनमजूर स्थानिक पातळीवर काम करतात. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, नवीन वृक्ष लागवड करणे, गाव पातळीवर वन विभागाच्या वेगवेगळ्या योजनांची अंमलबजावणी करणे, वृक्ष लागवड व संगोपनाबाबत लोकांचे प्रबोधन करणे, इत्यादी कामे करतो.

५.६ वनरक्षक वन्यजीव (अभयारण्य)

अभयारण्य क्षेत्रातील गावांत वनरक्षक वन्यजीव काम करतात. साधारणत: ३ ते ४ गावांसाठी एक याप्रमाणे वनरक्षक नियुक्त करण्यात येतात. त्यांच्यावर नजीकचे नियंत्रण वनपाल वन्यजीव यांचे असते. वनरक्षकाच्या नियंत्रणाखाली वनमजूर स्थानिक पातळीवर काम करतात. स्थानिक नागरिकांच्या मदतीने आपल्या हद्दीतील वन्यजीव, दुर्मिळ प्राणी व पक्षी यांचे संगोपन, देखभाल, त्यांचे खाद्य व्यवस्थापन, अधिवासाचे रक्षण करणे, दुर्मिळ वनस्पती, औषधी वनस्पती यांचे उत्पादन वाढविणे, वन्यजिवांची गणना, वन्यजिवांकडून होणारा उपद्रव याबाबतच्या तक्रारींचे निवारण, वन उत्पादनांचा लिलाव करणे, वन्यजीव संरक्षण सप्ताह साजरा करणे, वन्यजीव संरक्षणाबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, इत्यादी कामे वनरक्षक वन्यजीव गावपातळीवर करतो.

५.७ लागवड अधिकारी

वृक्ष लागवड करताना व्यापारीदृष्ट्या महत्वाच्या वृक्षांची लागवड करण्याऐवजी सामाजिकदृष्ट्या स्थानिक लोकांना इंधन, चारा, जळाऊ लाकूड या दृष्टीने फायदा होईल अशा वृक्षांच्या लागवडीला प्रधान्य देणे, रोपवाटीका तयार करणे, रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, स्थानिकांच्या मदतीने लोकसहभागातून सार्वजनिक व खासगी पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करणे, शालेय विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवड व संवर्धन याबाबत जाणीव जागृती निर्माण करणे, इत्यादी कार्ये गावपातळीवर तालुका लागवड अधिकारी करतो.

याशिवाय पशुचिकित्सालये, पाटबंधारे विभाग, जलसंपदा विभाग, इत्यादी विभागांचे राज्य प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी ग्राम पातळीवर कार्य करतात.

6 . अधिकारी व कर्मचारी सहकारी संस्था

ग्रामपातळीवर जनतेच्या कृषी व पतपुरवठाविषयक गरजा भागविण्यासाठी सहकारी संस्था कार्य करतात. या सहकारी संस्थांचे गावपातळीवर कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे:

६.१ सचिव (विविध कार्यकारी सेवा सोसायटी)

एक किंवा त्यापेक्षा अधिक गावांसाठी एक याप्रमाणे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांची स्थापना करण्यात येते. सभासदांनी निवडलेले संचालक मंडळ सोसायटीचा कारभार चालविते. सचिव हा सोसायटीचा प्रशासकीय कर्मचारी असतो. शेतकर्‍यांसाठी अल्प व दीर्घ मुदतीच्या कृषी कर्जाचे वाटप, सुधारित बी-बियाणांची उपलब्धता, रासायनिक खतांची उपलब्धता अशा ग्रामीण आणि शेती क्षेत्राशी संबंधित विविध सेवा ना नफा ना तोटा या तत्वावर सोसायटी लोकांना पुरविते.

६.२ क्षेत्राधिकारी (सहकारी साखर कारखाना)

गावपातळीवर चार ते पाच गावांसाठी एक क्षेत्र अधिकारी व त्याच्या नियंत्रणाखाली दोन स्लीपबॉय काम करतात. ऊस उत्पादन क्षेत्रात उत्पादन वाढीला चालना देणे, सुधारित व संकरित ‘बेणे’ उपलब्ध करून देणे, ऊस उत्पादकांना उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करणे, ऊस तोडीचे नियोजन करणे, इत्यादी कामे कारखान्याचा प्रतिनिधी म्हणून क्षेत्र अधिकारी गाव पातळीवर करतो.

६.३ अधिकारी व कर्मचारी (जिल्हा सहकारी बँक)

ग्रामीण आणि आदिवासी भागात वित्तीय सेवा पुरविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक साधारणत: १० गावांसाठी एक याप्रमाणे बँक शाखा निर्माण करते. कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी कृषी, कृषिपूरक व्यवसाय, बचत गट यांना कर्ज उपलब्ध करून देणे, आपत्कालीन सरकारी मदत निधींचे वाटप करणे, सरकारी योजनांचे धनादेश वटविणे, इत्यादी कार्ये सहकारी बँकेकडून केली जातात. तसेच विविध राष्ट्रीयीकृत बँकांकडून गाव पातळीवर लघु उद्योग, कुटीर उद्योग, शेतीपूरक व्यवसाय उदा. शेळी पालन, गायी पालन या बाबींना अनुसरून शेतकर्‍यांना वित्तीय सहाय्य पुरविणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज पुरविणे, इत्यादी कार्ये बँक करते.

याशिवाय मजूर सहकारी संस्था, पाणीपुरवठा व पाणी वापर सहकारी संस्था, संयुक्त सहकारी वन व्यवस्थापन संस्था, इतर ग्रामीण उद्योग सहकारी संस्था, इत्यादी संस्था ग्रामीण भागात कार्यरत आहेत.

६.४ कर्मचारी

शासकीय उपक्रम व महामंडळे स्वातंत्र्योत्तर काळात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करताना सरकारकडून जनतेला विविध सेवा पुरविणारे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. या उपक्रमांद्वारे ग्रामीण जनतेला स्थानिक पातळीवर सेवा देणारे व ग्रामीण जनतेशी संबंधित असणारे प्रमुख कर्मचारी पुढीलप्रमाणे:

६.५ पोस्टमन

पोस्टमन गावातील सर्वात प्रमुख संदेशवाहक असल्याने त्याचा गावातील नागरिकांशी जवळचा संबंध असतो. गावातील नागरिकांचे टपाल उदा. पत्र, रजिस्टर, मासिके, मनी ऑर्डर, पार्सल पोहोचविणे, बचत पत्राची योजना चालवून ग्रामीण भागात बचतीला प्रोत्साहन देणे, इत्यादी कार्य करतो.

६.६ टेलिफोन मॅकॅनिक

भारत संचार निगम मर्यादित या शासकीय उपक्रमाचा गाव पातळीवर काम करणारा कर्मचारी म्हणजे टेलिफोन मेकॅनिक होय. त्याच्यावर नजीकचे नियंत्रण उपविभागीय अभियंता ग्रामीण विभाग यांचे असते. टेलिफोन एक्स्चेंज पॉवर पॉईंट मेन्टेन करणे, ग्रामीण भागात दूरध्वनी सुविधा जोडणी देणे, दूरध्वनी दुरुस्ती व देखभाल करणे, महामंडळाच्या आर्थिक प्रगतीसाठीच्या योजना ग्राहकांना समजावून सांगणे, ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे, इत्यादी कामे करतो.

६.७ तारतंत्री

साधारणत: प्रत्येक गावासाठी एक याप्रमाणे गावपातळीवर वीज वितरण कंपनीचा कर्मचारी तारतंत्री (वायरमन) कार्यरत असतो. त्याच्यावर नजीकचे नियंत्रण कनिष्ठ अभियंता वीज वितरण कंपनी यांचे असते. नवीन कनेक्शन जोडणे, ग्राहकांना नियमित व पूर्ण दाबाने वीज पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करणे, वीज वितरण यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करणे, अपारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, सरकारच्या विविध ऊर्जाविषयक योजनांची अंमलबजावणी करणे, इत्यादी कार्य गावपातळीवर तारतंत्री करतो.

याशिवाय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, कृषी पणन महामंडळ, कृषी उद्योग विकास महामंडळ, इत्यादी संस्था व उपक्रमांचे कर्मचारीदेखील गाव पातळीवर काम करतात.

ग्रामपातळीवर काम करणार्‍या या सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांना अधिनियमानुसार ग्रामसभा बैठकीला उपस्थित राहणे बंधनकारक आहे. प्रचलित ग्रामसभा या सर्वच कर्मचार्‍यांच्या कार्यांचे मूल्यमापन करून तसा अहवाल गटविकास अधिकार्‍याला देऊ शकते. तसेच विकास योजनांबद्दलच्या आपल्या अपेक्षा वरिष्ठ शासनांपर्यंत या कर्मचार्‍यांमार्फत पोहचवू शकते. म्हणून ग्रामपातळीवर प्रभावी शासन प्रशासनासाठी ग्रामसभा हे तळापासून काम करणारे प्रभावी साधन ठरते.