ठळक मुद्दे
- या प्रकरणात बुद्धपूर्व समाजाचा आढावा घेतलेला आहे.
- आर्यांची सप्तसिंधूवरची स्वारी इ.स.पूर्वी सतराशे वर्षापलीकडे जाऊ शकत नाही.
- दास् शब्दाचा मूळचा अर्थ दाता, उदार (Noble) असा असला पाहिजे.
- दिवोदासाच्या साहाय्याने इन्द्राने दासांची शहरे तोडली. साम्राज्य स्थापन केले.
- आर्यांनी आपसात भांडणा-या दासांना अनायासे जिंकले असल्यास त्यात मुळीच नवल नाही.
- दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षाने उत्पन्न झालेली वैदिक भाषा निव्वळ देववाणी होऊन बसली.
- इन्द्राची यज्ञयागाची संस्कृति आणि त्याचे वर्चस्व कृष्ण मान्य करण्यास तयार नव्हता.
- मध्य हिंदुस्थानातील प्राचीन अहिंसात्मक संस्कृतीचा सामान्य जनतेवर थोडाबहुत प्रभाव टिकाव धरून राहिला होता.
सारांश
भगवान बुद्धाचे जीवन व तत्वज्ञान मांडण्यापूर्वी धर्मानंद कोसंबींनी बुद्धपुर्वीच्या समाज व्यवस्थेचे चित्रण केलेले आहे. उदार असलेले ‘दास’ आर्यांच्या आक्रमणाने गुलाम बनले व तंबूत राहणारे आर्य कालक्रमाने घरे बांधून राहू लागले. दास आपसात भांडत असत, त्याचा फायदा आर्यांनी घेतला. दिवोदासाच्या साहाय्याने इन्द्राने दासांची शहरे तोडली व आपले साम्राज्य स्थापन केले. कृष्णाने इन्द्राच्या यज्ञयागाची संस्कृति आणि वर्चस्व नाकारले. हिंसात्मक यज्ञपद्धतीला कंटाळून अनेकजन जंगलात जाऊन राहत. याही काळात लोक अहिंसात्मक संस्कृतीला चिकटून राहिले होते.
पारिभाषिक शब्द
सप्तसिंधुप्रदेश , इश्तर , आर्य , दास , इन्द्र , कृष्ण , वैदिक भाषा , यज्ञयाग , सप्तसिंधु , अट्ठकथा , अहिंसा
1 . उषादेवीची सूक्ते
ऋग्वेदात जी उषादेवीची सूक्ते आढळतात, त्यांच्या अनुरोधाने लो. टिळक यांनी आपल्या The Arctic Home in the Vedas या पुस्तकात आर्य उत्तर ध्रुवाकडे राहत होते, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सदृशीरद्य सदृशीरिदु श्वो दीर्घ सचन्ते वरुणस्य धाम |’ ऋ. १|१२३|८ (आज आणि उद्या ह्या सारख्याच आहेत. त्या दीर्घकालपर्यंत वरुणाच्या गृहात जातात.)१ लोकमान्यांच्या मते ही आणि अशा त-हेच्या दुस-या ऋचा उत्तर ध्रुवाकडील उषःकालाला उद्देशून लिहिलेल्या आहेत. दीर्घकाळपर्यंत उषा वरुणगृहांत जातात, म्हणजे तिकडे सहा महिनेपर्यंत अंधार असतो, असा अर्थ असला पाहिजे.
परंतु याच सूक्ताच्या बाराव्या ऋचेत ‘अश्वावतीर्गोमतीविश्ववारा’ ही उषादेवीची विशेषणे सापडतात. ‘ज्यांच्याकडे पुष्कळ घोडे आणि गाई आहेत, आणि ज्या सर्वांना पूज्य आहेत’ असा त्यांचा अर्थ.२ उत्तर ध्रुवाकडे सध्या घोडे आणि गाई नाहीतच; आणि ते प्राणी हजारो वर्षांपूर्वी तिकडे होते यालाही काहीच आधार सापडलेला नाही. ह्या एकाच सूक्तात नव्हे, तर उषादेवीच्या इतर सूक्तातून देखील ती घोडे आणि गाई देणारी, गाईंची जन्मदात्री, इत्यादि विशेषणे भरपूर सापडतात. यावरून ह्या ऋचा किंवा ही सूक्ते उत्तर ध्रुवाकडे रचली नाहीत हे सिद्ध होते.
2 . इश्तर
तर मग दीर्घकालपर्यंत उषा पाताळात जातात याचा अर्थ कसा करावा? बाबिलोनियन लोकात फार प्राचीन काळापासून प्रचलित असलेल्या इश्तर देवतेच्या दंतकथा लक्षात घेतल्या म्हणजे याचा अर्थ सहज जाणता येतो. तम्मुज किंवा दमुत्सि (वैदिक दमूनस्) या देवावर इश्तरचे प्रेम जडते. पण तो एकाएकी मरण पावतो. त्याला जिवंत करण्यासाठी अमृत आणण्याच्या हेतूने इश्तर पाताळात प्रवेश करते. तेथील राणी अल्लतु ही इश्तरची बहिण. तरी ती इश्तरचा भयंकर छळ करते; क्रमशः तिचे सर्व दागिने काढून घ्यावयास लावून तिला रोगी बनवते आणि कैदेत टाकते. चार किंवा सहा महिने अशा रीतीने दु:ख आणि कैद भोगल्यावर अल्लतूकडून इश्तरला अमृत मिळते; आणि ती पुन्हा पृथ्वीवर येते.३ इश्तरच्या दुस-या अनेक दंतकथा आहेत, पण त्यांत ही दंतकथा प्रमुख दिसते. हिचे वर्णन सर्व बाबिलोनियन वाड्ःमयात आढळते. ऋग्वेदातील वरच्या सारख्या ऋचांचा संबंध या दंतकथेशी आहे यात संशय बाळगण्याचे कारण नाही.
इश्तर पाताळातून वर येते; तेव्हा तिचा त्या ऋतूंत उत्सव मानण्यात येत होता; तांबड्या बैलांच्या गाडीतून तिची रथयात्रा काढीत असत. घोड्यांचा शोध लागल्यानंतर तिचा रथ घोडे ओढीत. ‘एषा गोभिररुणभिर्युजाना’ ऋ.५|८०|३ (ही उषा, जिच्या रथाला तांबडे बैल लावले आहेत.) ‘वितद्ययुररुणयुग्भिरश्वै:’ ऋ.६|६५|२ (अरुणवर्ण घोड्यांच्या रथातून उषादेवी आल्या.)
3 . घोड्यांचा लढाईत उपयोग
इ.स.पूर्वी दोन हजार वर्षे बाबिलोनियात घोड्याचा उपयोग मुळीच माहीत नव्हता. रथाला बैल किंवा गाढवे जुंपीत असत; आणि ते लोक घोड्यांना जंगली गाढवे म्हणत. बाबिलोनियाच्या उत्तरेस डोंगरी प्रदेशात राहणारे केशी लोक प्रथमतः माल वाहून नेण्याच्या कामी घोड्यांचा उपयोग करू लागले. या जंगली गाढवांना लगामात आणून आणि त्यांच्यावर स्वार होऊन धान्य गोळा करण्याच्या वेळी ते बाबिलोनियात येत; आणि तेथील शेतक-यांना मदत करून मजुरीबद्दल मिळालेले धान्य आपल्या घोड्यांवरून वाहून नेत. केशी लोकांना युद्धकला मुळीच माहीत नव्हती. ती कला ते बाबिलोनियन लोकांपासून शिकले, आणि त्यांनी प्रथमतः लढाईत घोड्याचा उपयोग केला.४
आपल्या घोडदळाच्या बळावर केशींच्या गदश नावाच्या राजाने इ.स.पूर्वी १७६० या वर्षी बाबिलोनियात सार्वभौम राज्य स्थापन केले. आणि त्यानंतर त्याच्या वंशजांची परंपरा सुरू राहिली.५ ‘मुद्दयाची गोष्ट ही की, इ.स.पूर्व अठराशे वर्षांमागे घोड्याचा लढाईत उपयोग केला गेल्याचा दाखला कोठेच सापडत नाही; आणि वेदांत तर जिकडे तिकडे घोड्याचे महत्त्व वर्णिले असून केशींचा आणि घोड्यांचा निकट संबंध दाखविलेला आहे. यावरून आर्यांची सप्तसिंधूवरची स्वारी इ.स.पूर्वी सतराशे वर्षापलीकडे जाऊ शकत नाही, हे स्पष्ट होते.
4 . दास
आर्य येण्यापूर्वी सप्तसिंधुप्रदेशात (सिंध आणि पंजाब प्रांतात) दासांचे राज्य होते. दास या शब्दाचा अर्थ गुलाम असा होऊन बसला आहे. परंतु वेदांत दास् आणि दाश् या दोन धातूंचा प्रयोग ‘देणे’ या अर्थी होतो; आणि तसाच तो अलीकडच्या कोशातही देण्यात आला आहे. म्हणजे दास् शब्दाचा मूळचा अर्थ दाता, उदार (Noble) असा असला पाहिजे. आवेस्तांतील फर्वदीन यस्तमध्ये दास देशातील पितरांची पूजा आहे. त्यांत त्यांना ‘दाहि’ म्हटले आहे. (We worship the Fravashis of the holy men in the Dahi countries).
प्राचीन पर्शियन भाषेत संस्कृत स चा उच्चार ह होत असे. उदाहरणार्थ, सप्तसिंधूला आवेस्तात हप्तहिंदु म्हटले आहे. त्यालाच अनुसरून दासी किंवा दास याचे रूपांतर दाहि असे झाले आहे.
5 . आर्य
आर्य हा एक शब्द ऋ धातुपासून साधला आहे; आणि निरनिराळ्या गणात जे ऋ धातु सापडतात ते बहुतेक गत्यर्थ आहेत. म्हणजे आर्य या शब्दाचा अर्थ फिरस्ते असा होता. आर्यांना घरेदारे करून राहणे आवडत नसे असे दिसते. मोगल लोक जसे तंबूमध्ये राहत असत, तसेच आर्य लोक तंबूतून किंवा मंडप घालून राहत असावेत. एका बाबतीत त्यांची ही परंपरा अद्यापि कायम राहिली आहे. बाबिलोनियात यज्ञयागाच्या जागा म्हटल्या म्हणजे मोठमोठ्या मंदिरांची आवारे असत. आणि हरप्पा महिंजो-दारो या दोन ठिकाणी जे प्राचीन नगरावशेष सापडले आहेत, त्यांत देखील दाहि लोकांची मंदिरे यज्ञयागाच्या जागा असत असे तज्ज्ञांना वाटते. ही परंपरा आर्यांनी मोडून टाकली. यज्ञयाग करावयाचा म्हटला म्हणजे तो मंडपातच केला पाहिजे अशी त्यांनी वहिवाट पाडली. आर्यांचे वंशज तंबूतली राहणी सोडून कालक्रमाने घरे बांधून राहू लागले, पण यज्ञाला मंडपच पाहिजे ही प्रथा अद्यापि टिकून राहिली आहे.
6 . दासांचा पराजय का झाला?
अशा या फिरस्त्या लोकांनी दासांसारख्या पुढारलेल्या लोकांचा पराजय केला कसा? याचे उत्तर इतिहासाने- विशेषत: हिंदुस्थानच्या इतिहासाने- वारंवार दिले आहे. एका राजवटीखाली लोक आरंभी सुखी आणि सधन झाले, तरी अखेरीला एका लहानशा वर्गाच्या हातात सत्ता एकवटते, तो वर्ग तेवढा चैनीत राहतो आणि आपसात अधिकारासाठी भांडत असतो. त्यामुळे लोकांवर कराचा भार वाढत जातो; आणि ते या सत्ताधाऱ्यांचा द्वेष करतात. अशा वेळी मागासलेल्या लोकांना चांगले फावते. एकजुटीने असल्या साम्राज्यशाहीवर हल्ला चढवून ते ती पादाक्रांत करतात. तेराव्या शतकाच्या आरंभी जंगली मोगलांना एकवटून झगिशखानाने किती साम्राज्ये लयाला नेली? तेव्हा आर्यांनी आपसात भांडणा-या दासांना अनायासे जिंकले असल्यास त्यात मुळीच नवल नाही.
7 . शहरे तोडणारा इन्द्र
दास लहान लहान शहरातून राहत असत. आणि या शहरांचे एकमेकात वैर चालत होते असे दिसते. का की, दासांपैकी दिवोदास हा इन्द्राला सामील झाल्याचा उल्लेख ऋग्वेदात अनेक ठिकाणी आढळतो. दासांचे नेतृत्व वृत्र ब्राह्मणाकडे होते. त्याचाच नातलग त्वष्टा; त्याने इन्द्राला एकप्रकारचे यंत्र (वज्र) तयार करून दिले. त्याच्या साहाय्याने इन्द्राने दासांची शहरे तोडली व अखेरीस वृत्र ब्राह्मणाला ठार मारले. पुरंदर म्हणजे शहरे तोडणारा हे विशेषण इन्द्राला ऋग्वेदात अनेक ठिकाणी लावले आहे.६
8 . इन्द्राची परंपरा
इन् आणि द्र या दोन शब्दांच्या समासाने इन्द्र शब्द बनला आहे. इन् म्हणजे योद्धा. उदाहरणार्थ, ‘सह इना वर्तते इति सेना.’ द्र शब्द शिखर किंवा मुख्य अशा अर्थी बाबिलोनियन भाषात सापडतो. तेव्हा इन्द्र म्हणजे सैन्याचा अधिपति किंवा सेनापति. होता होता हा शब्द राजवाचक बनला. जसे देवेन्द्र, नागेन्द्र, मनुजेंद्र इत्यादि. पहिल्या इन्द्राचे नाव शुक्र होते. त्यानंतर त्याची परंपरा बरीच वर्षे चालली असावी. नहुषाला इन्द्र केल्याची दन्तकथा पुराणात आलीच आहे. ‘अहं सप्तहा नहुषो नहुष्टर:’ असा उल्लेख ऋग्वेदात (१०|४९|८) सापडतो. अर्थात् या दन्तकथेत काही तथ्य असले पाहिजे.
9 . इन्द्रपूजा
सार्वभौम राजांना यज्ञात बोलावून आणून त्यांना सोम देण्याचा विधि बाबिलोनियात होत असे. त्या प्रसंगी स्तुतीने भरलेली त्यांची स्तोत्रे गाण्यात येत. इन्द्राची बहुतेक सूक्ते अशाच प्रकारची आहेत. इन्द्राची संस्था नष्ट झाल्यानंतर देखील ही स्तोत्रे तशीच राहिली आणि त्यांचा अर्थ भलताच होऊ लागला. इन्द्र आकाशातील देवांचा राजा आहे, अशी कल्पना होऊन बसली; आणि ह्या सूक्तांचा अर्थ अनेक ठिकाणी कोणाला काहीच समजेनासा झाला. त्यांच्या नुसत्या शब्दात मांत्रिक प्रभाव आहे असे लोक गृहीत धरून चालू लागले.
10 . इन्द्राचा स्वभाव
सप्तसिंधूवर स्वामित्व स्थापन करणारा सेनापति इन्द्र मनुष्य होता याला पुरावा ऋग्वेदात भरपूर सापडतो. त्याच्या स्वभावाचे थोडेसे दिग्दर्शन कौषीतकि उपनिषदात आढळते. ते येणेप्रमाणे.
दिवोदासाचा पुत्र प्रतर्दन युद्ध करून आणि पराक्रम दाखवून इन्द्राच्या आवडत्या वाड्यात गेला. त्याला इन्द्र म्हणाला, ‘हे प्रतर्दना, तुला मी वर देतो,’ प्रतर्दन म्हणाला, ‘जो मनुष्याला कल्याणकारक होईल असा वर दे.’ इन्द्र- ‘वर दुस-याकरिता घेत नसतात, स्वतःसाठी वर मागून घे.’ प्रतर्दन- ‘माझ्यासाठी मला वर नको’. तेव्हा इन्द्राने सत्य गोष्ट होती, ती सांगितली. कारण इन्द्र सत्य आहे. तो म्हणाला, ‘मला जाण. तेच मनुष्याला हितकारक आहे, की जेणेकरून मला तो जाणेल. त्वष्ट्याच्या मुलाला-त्रिशीर्षाला-मी ठार मारले. अरुर्मग नावाच्या यतींना कुत्र्यांकडून खाववले. पुष्कळ तहांचे अतिक्रमण करून दिव्यलोकी प्रल्हादाच्या अनुयायांना, अंतरिक्षात पौलोमांना आणि पृथ्वीवर कालकाश्यांना मी ठार मारले. त्याप्रसंगी माझा एक लोम देखील वाकला नाही. अशा प्रकारे जो मला ओळखील, त्याने मातृवध, पितृवध, चौर्य, भ्रुणहत्या इत्यादि पापे केली असता किंवा तो करीत असता त्याला दिक्कत वाटणार नाही, किंवा त्याच्या तोंडाचा नूर पालटणार नाही.’
आपले साम्राज्य स्थापण्याच्या वेळी इंद्राने ह्या उताऱ्यात दिलेले बरेच अत्याचार केल्याचा निर्देश खुद्द ऋग्वेदातच आढळतो. पण इन्द्रच का, कोणत्याही मनुष्याला साम्राज्य स्थापावयाचे असल्यास आपपरभाव, दयामाया ठेवता येत नाही. तह मोडण्याचे भय बाळगता येत नाही. शिवाजीने चन्द्रराव मो-यांना ठार मारले, ते न्याय्य होते की अन्याय्य होते, हे वाद निरर्थक आहेत. न्यायान्यायाचा विचार करीत बसला असता, तर शिवाजी साम्राज्य स्थापू शकला नसता. साम्राज्यान्तर्गत लोक देखील असल्या पापपुण्यांचा विचार करीत बसत नाहीत. ते एवढेच पाहतात की, एकंदरीत या साम्राज्याच्या स्थापनेपासून सामान्य जनतेचा फायदा झाला आहे की काय?
11 . आर्यांच्या सत्तेपासून फायदे
ह्या दृष्टीने विचार केला असता इन्द्राच्या किंवा आर्यांच्या साम्राज्यापासून सप्तसिंधूतील जनतेचा फार मोठा फायदा झाला असला पाहिजे. लहान लहान शहरांमधून जी वारंवार युद्धे होत असत, ती बंद पडल्यामुळे लोकांना एक प्रकारचे सुखस्वास्थ्य मिळाले. पेशव्यांच्याच नातलगांनी शनिवार वाड्यावर इंग्रजांचा झेंडा लावला; आणि पेशवाई बुडाल्यावर इतर हिंदूंनी तर मोठाच उत्सव केला म्हणतात. त्याचप्रमाणे वृत्र जरी ब्राह्मण होता तरी त्याला मारून सप्तसिंधूतील अंत:कलह बंद पाडल्याबद्दल इन्द्राचे देव्हारे तेथील प्रजेने माजविणे अगदी साहजिक होते. तेव्हा दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षापासून जे काही सुपरिणाम घडून आले, त्यातला पहिला हा समजला पाहिजे की, सप्तसिंधूमध्ये एक प्रकारची शांतता नांदू लागली. दुसरी गोष्ट ब्राह्मणांचे जे वर्चस्व राजकारणात होते ते नष्ट झाले. इन्द्राने त्वष्ट्याच्या मुलाला-विश्वरूपाला-पुरोहितपद दिले आणि तो बंड करील या भयाने त्यालाही ठार मारले, असा उल्लेख खुद्द ऋग्वेदात आणि यजुर्वेदात सापडतो.७ तथापि पुरोहिताची पदवी कोणत्या ना कोणत्या ब्राह्मणाकडे राहिली. राजकारणापासून अलिप्त राहिल्यामुळे ब्राह्मण समाजाला वाड्ःमयाची अभिवृद्धि करता अली.
12 . वैदिक भाषा
दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षाने एक नवीन भाषा उत्पन्न झाली. हीच वैदिक भाषा होय. मुसलमानांच्या आणि हिंदूंच्या संघर्षाने जशी हिंदुस्थानात उर्दू नावाची नवीन भाषा उत्पन्न झाली, तशी ही भाषा होती. पण वैदिक भाषेइतके उच्च स्थान उर्दूला कधीही मिळाले नाही आणि मिळण्याचा संभव नाही. वैदिक भाषा निव्वळ देववाणी होऊन बसली!
या वैदिक भाषेचा नीट अर्थ लावावयाचा असल्यास बाबिलोनियन भाषांच्या ज्ञानाची फार आवश्यकता आहे. काही मूळच्या शब्दांचे अर्थ कसे उलटले आहेत हे दास आणि आर्य या दोन शब्दांवरूनच दिसून येते. दास शब्दाचा मूळचा अर्थ दाता असून सध्या गुलाम असा होऊन बसला आहे; आणि आर्य शब्दाचा मूळचा अर्थ फिरस्ता असता थोर, उदार, श्रेष्ठ असा झाला.
13 . आर्यांच्या जयाने झालेली हानी
दासांच्या आणि आर्यांच्या संघर्षाने जी मोठी हानी झाली, ती ही की, दासांची घरे आणि नगरे बांधण्याची कला नष्टप्राय होऊन गेली. सिंध आणि पंजाब प्रांतात सापडलेल्या प्राचीन नगरांची आणि घरांची परंपरा हिंदुस्थानात राहिली नाही. दुसरी गोष्ट ही की, जंगलात राहणारे यति कशा रीतीने वागत, हे समजण्याचा मार्ग राहिला नाही. वरच्या उताऱ्यात इन्द्राने त्यांना कुत्र्याकडून खाववले असा उल्लेख आला आहे. मूळचा शब्द ‘सालावृक’. ह्याचा अर्थ लांडगे किंवा कुत्रे असा होऊ शकतो. टीकाकाराने सालावृक म्हणजे लांडगे असाच अर्थ केला आहे. परंतु इन्द्राजवळ पुष्कळ शिकारी कुत्रे होते आणि त्याने ते यतींच्या अंगावर घातले, हे अधिक संभवनीय दिसते. या यतींचे वजन समाजावर फार असल्याशिवाय इन्द्राने त्यांना मारण्याचे काहीच कारण नव्हते. पण ते वागत होते कसे, लोक त्यांना का मानीत, इत्यादि गोष्टी समजण्याला काही मार्ग राहिला नाही.
14 . आर्यांच्या संस्कृतीला कृष्णाचा विरोध
सप्तसिंधूच्या प्रदेशावर इन्द्राची पूर्ण सत्ता स्थापन झाल्यावर त्याचा मोर्चा मध्य हिंदुस्थानाकडे वळला असल्यास नवल नाही. पण तेथे त्याला मोठाच प्रतिस्पर्धी भेटला. देवकीनंदन कृष्ण केवळ गाईंचा प्रतिपालक राजा होता. इन्द्राची यज्ञयागाची संस्कृति आणि त्याचे वर्चस्व तो मान्य करण्यास तयार नव्हता. यास्तव इन्द्राने त्याच्यावर हल्ला केला. कृष्णाजवळ घोडदळ नव्हते. तथापि त्याने माऱ्याची अशी जागा शोधून काढली की इन्द्राचे त्याच्यासमोर काही चालले नाही. बृहस्पतीच्या मदतीने तो कसा तरी आपला जीव सांभाळून मागे हटला. ऋग्वेदात (८|९६|१३-१५) सापडणा-या काही ऋचांवरून आणि भागवत इत्यादि पुराणात आलेल्या दंतकथांवरून या विधानाला बरीच बळकटी येते८.
कृष्ण यज्ञयागांची संस्कृति मानण्याला तयार नव्हता. मग तो मानीत होता तरी काय? त्याला आंगिरस ऋषीने यज्ञाची एक साधी पद्धति शिकविली. त्या यज्ञाच्या दक्षिणा म्हटल्या म्हणजे तपश्चर्या, दान, सरळपणा (आर्जव), अहिंसा आणि सत्यवचन या होत. ‘अर्थ यत्तपो दानमार्जवमहिंसा सत्यवचनमिति ता अस्य दक्षिणाः|’ (छां. उ.३| १७|४-६). यावरून असे दिसते की, आर्यांच्या आणि दासांच्या संघर्षात जी यतींची संस्कृति सप्तसिंधु प्रदेशात नष्ट झाली, तिचा काहीसा अंश गंगायमुनेच्या प्रदेशात कायम राहिला होता. तपश्चर्या करणा-या अहिंसक मुनीची कृष्णासारखे राजे या प्रदेशात पूजा करीत होते, हे वरील उताऱ्यावरून दिसून येते.
15 . वैदिक संस्कृतीचा विकास
परंतु या अहिंसात्मक संस्कृतीची फारशी उन्नति झाली नाही. ब्राह्मणांनी राजकारणातून अंग काढून घेतल्यावर वाड्ःमयाकडे आणि इतर लोकोपयोगी गोष्टींकडे चांगले लक्ष पुरवले. हिंदुस्थानात सगळ्यात प्राचीन विश्वविद्यालय म्हटले म्हणजे तक्षशिला येथे होते. तेथे ब्राह्मण वेद तर शिकवीतच; आणि त्याशिवाय धनुर्विद्या, वैद्यक इत्यादि शास्त्रेही शिकवीत. सप्तसिंधूतून इन्द्राच्या परंपरेचे साम्राज्य नष्ट झाले, तरी त्या परंपरेपासून उद्भवलेल्या नवीन संस्कृतीचे राज्य सुरू झाले, आणि त्याची वाढ होत गेली.
16 . वैदिक संस्कृतीचा मध्यदेशांत विजय
कृष्णाने इन्द्राचा पराभव केल्यानंतर सहाशे-सातशे वर्षांनी परीक्षित् आणि त्याचा मुलगा जनमेजय या दोन पांडवकुलोत्पन्न राजांनी सप्तसिंधूंत तयार झालेल्या आर्यसंस्कृतीची संस्थापना गंगायमुनांच्या प्रदेशात केली. पांडव आर्यसंस्कृतीचे भोक्ते होते याला आधार वैदिक वाड्ःमयात सापडत नाही. कृष्णामध्ये आणि पांडवांमध्ये तर निदान सहाशे वर्षांचा काळ लोटला असला पाहिजे. महाभारतात ज्या कृष्णाच्या कथा येतात, त्या वरवर वाचल्या तरी प्रक्षिप्त असाव्याशा वाटतात. निदान इन्द्राबरोबर युद्ध करणारा कृष्ण आणि महाभारतातील कृष्ण एक नव्हत, असे मानावे लागते. पांडवांचे वंशज परीक्षित् आणि जनमेजय या दोघांनी मात्र वैदिक संस्कृतीला भरपूर आश्रय दिला, हे अथर्ववेदावरून (काण्ड २०, सू. १२७) चांगले सिद्ध होते.९
सप्तसिंधूत यतींची संस्कृति साफ नष्ट झाली, तरी ती प्रामुख्याने मध्य हिंदुस्थानात वास करीत होती, हे वर दिलेल्या छांदोग्य उपनिषदाच्या उता-यावरून आणि पालि वाड्ःमयातील सुत्तनिपातात सापडणा-या ‘ब्राह्मणधाम्मिक’ सुत्तावरून दिसून येते.१० सप्तसिंधूतील चातुर्वर्ण्य मध्य हिंदुस्थानात देखील स्थिरावले होते. फरक एवढाच की, सप्तसिंधूतील ब्राह्मणांनी आर्यांच्या विजयामुळे उत्पन्न झालेली यज्ञयागांची पद्धति पूर्णपणे स्वीकारली. मध्य हिंदुस्थानात जरी ब्राह्मण अग्निपूजा करीत असत, तरी त्या पूजेत प्राण्यांचे बलिदान होत नसे. तांदूळ, जव वगैरे पदार्थांनीच ते अग्निदेवतेची पूजा करीत. परंतु परीक्षित् आणि जनमेजय यांनी यज्ञयागाला सुरुवात केल्यानंतर ही जुनी अहिंसात्मक ब्राह्मणसंस्कृति नष्टप्राय झाली, आणि तिच्या जागी हिंसात्मक यज्ञयागाची प्रथा जोराने पसरू लागली. सप्तसिंधूच्या ऐवजी गंगायमुनांच्या मधला प्रदेशच आर्यावर्त बनला!
17 . अहिंसा टिकाव धरून राहिली
जुनी अहिंसात्मक अग्निहोत्रपद्धति मृतप्राय झाली खरी, तथापि ती अगदीच नाश पावली नाही. तिने राजदरबारातले आणि वरच्या दर्जांतील लोकातले आपले वर्चस्व सोडून देऊन जंगलाचा आश्रय धरला. म्हणजे जे लोक अहिंसात्मक संस्कृतीला चिकटून राहिले, त्यांनी आपली तपश्चर्या जंगलांतील फळामुळांवर निर्वाह चालवून कायम ठेवली. जातकअट्ठकथेत अशा लोकांच्या अनेक गोष्टी आल्या आहेत. नवीन स्थापन झालेल्या हिंसात्मक यज्ञपद्धतीला कंटाळून अनेक ब्राह्मण आणि इतर वर्णीय लोक देखील जंगलात जात आणि आश्रम बांधून तपःसाधन करीत. वर्षातून काही दिवस हे लोक आंबट आणि खारट पदार्थ खाण्यासाठी लोकवस्तीत येत आणि पुन्हा आपल्या आश्रमात परत जात. तात्पर्य, सप्तसिंधूतील यतींप्रमाणे मध्य हिंदुस्थानातील ऋषिमुनि नष्टप्राय न होता जंगलाच्या आश्रयाने तपश्चर्या करीत कसे तरी बचाव धरून राहिले.
18 . आधुनिक उदाहरण
याला आधुनिक इतिहासातील एक उदाहरण देता येण्याजोगे आहे. पश्चिम सिंहलद्वीप पोर्तुगीजांनी काबीज केले, आणि तेथील बुद्धमंदिरे आणि भिक्षूंचे विहार जमीनदोस्त करून सर्वांना जबरदस्तीने रोमन कॅथॉलिक धर्माची दीक्षा दिली. या प्रसंगी सिंहलराजाने बुद्धाची दंतधातु बरोबर घेऊन क्यांडीच्या जंगलात पळ काढला; आणि तेथे डोंगराआड आपली नवीन राजधानी स्थापन केली. पश्चिम सिंहलद्वीपातून पोर्तुगीजांच्या हातून बचावलेले भिक्षु शक्य तेवढे बौद्ध ग्रंथ बरोबर घेऊन डोंगराळ प्रदेशात क्यांडीच्या राजाच्या आश्रयाला जाऊन राहिले. हाच प्रकार काही अंशी गोव्यात घडून आला. पोर्तुगीजांनी साष्टी, बार्देश आणि तिसवाडा हे तीन तालुके प्रथमत: जिंकले, आणि काही वर्षांनी त्या तालुक्यातील देवळे जमीनदोस्त करून लोकांना जबरदस्तीने रोमन कॅथॉलिक करण्याचा सपाटा चालविला. अशा वेळी काही हिंदूंनी आपल्या इस्टेटींवर पाणी सोडून आणि देवदेवतांना बरोबर घेऊन पळ काढला व जवळच्या संवदेकर संस्थानिकाच्या मुलखाचा आश्रय धरला. आजला पूर्वीची साष्टी प्रांतातील हिंदूंची सर्व दैवते या संवदेकर संस्थानात आहेत. पुढे हा प्रांत देखील पोर्तुगीजांनी जिंकला; पण पुन्हा हिंदूंच्या धर्मांत त्याने हात घातला नाही. तीच स्थिती काही अंशी मध्य हिंदुस्थानातील अहिंसात्मक संस्कृतीची झाली असे म्हणण्यास हरकत नाही.
19 . अहिंसेचा प्रभाव
परीक्षित् किंवा जनमेजय राजाने जोरजुलमाने बलिदानपूर्वक यज्ञयागांची प्रथा लोकांवर लादली नाही. पण त्या प्रथेला राजाश्रय मिळाल्याबरोबर ब्राह्मणांनी ती आपण होऊनच पत्करली आणि ज्यांना ती पसंत नव्हती, त्यांना जंगलाच्या व तपश्चर्येच्या आश्रयाने आपली जुनी परंपरा कायम ठेवणे भाग पडले. पोर्तुगीजांनी ख्रिस्ती केलेल्या बौद्धांवर किंवा हिंदूंवर जसा आजलाही बौद्ध आणि हिंदु संस्कृतीचा प्रभाव राहिला आहे, तसा मध्य हिंदुस्थानातील प्राचीन अहिंसात्मक संस्कृतीचा देखील सामान्य जनतेवर थोडाबहुत प्रभाव टिकाव धरून राहिला. जंगलात राहणारे ऋषिमुनि जेव्हा गावात किंवा शहरात येत, तेव्हा लोक त्यांची परमादराने पूजा करीत. बाकीच्या वेळी यज्ञयाग आणि बलिदान हे पण प्रकार चालू असत.
20 . यज्ञसंस्कृतीची वाढ
ऋषिमुनींचा मान बराच होता खरा, पण त्या संस्कृतीने काहीच उन्नति केली नाही सप्तसिंधूच्या प्रदेशात तक्षशिलेसारखी जी विश्वविद्यालये स्थापन झाली तीच शिक्षणाची केंद्रे होऊन बसली. जातक-अट्ठकथेतील अनेक गोष्टींवरून दिसून येते की, ब्राह्मणकुमार वेदाध्ययन करण्यासाठी आणि राजकुमार धनुर्विद्या शिकण्यासाठी तक्षशिलेसारख्या दूरच्या सप्तसिंधुप्रदेशात जात असत.
सप्तसिंधूच्या प्रदेशात काय किंवा मध्य हिंदुस्थानात काय, इन्द्राच्या सारखे एक बलाढ्य साम्राज्य राहिले नाही. परीक्षित् किंवा जनमेजय यांच्या राज्याची इन्द्राच्या राज्याशी तुलना करता येत नाही. त्यांनी बलिदानपूर्वक यज्ञयागांना उत्तेजन दिले, आणि त्यांच्या प्रयत्नामुळे गंगायमुनांच्या मधला प्रदेश आर्यावर्त झाला, एवढेच काय ते. त्यांच्या कारकीर्दीनंतर सप्तसिंधु आणि मध्य हिंदुस्थान प्रदेशाचे लहानसहान भाग पडले असावे. तथापि आर्यांच्या आणि दासांच्या संघर्षातून उत्पन्न झालेली बलिदानपूर्वक यज्ञयागांची संस्कृति मात्र दृढ होऊन बळावली.
21 . टिपा
१. The Arctic Home in the Vedas; पृष्ठ १०३ पाहा.
२. येथे उषा बहुवचनान्त आहे.
३. Lewis Spence: Myths and Legends of Babylonia and Assyria, (1926), pp. 125-131.
४. L.W. King: A History of Babylon, (1915), p. 125.
५. L.W. King: A History of Babylon, (1915), p. 214.
६. विशेष माहितीसाठी ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ पृष्ठ १७-१९ पाहा.
७. ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’, पृष्ठ १९-२० पाहा.
८. ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ पृष्ठ २२-२५ पाहा.
९. ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’, पृष्ठ ३७-३८ पाहा.