२३-४३

भगवान बुद्ध

समकालीन राजकीय परिस्थिती

14-10-2017
18-09-2017
18-09-2017
18-09-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

  1. बुद्ध काळातील सोळा राष्ट्रांची माहिती दिलेली आहे.
  2. या प्रकरणात आठ राजकुलांचे वर्णन केलेले आहे.
  3. बुद्ध काळात गणसत्ताक राज्ये होती.
  4. गणराजे आपली राज्ये ठरलेल्या कायद्यांप्रमाणे चालवीत असत.
  5. गणराज्याचा नाश होऊन बहुतेक राज्यात महाराजसत्ता स्थापन झाल्या.

सारांश

या प्रकरणात बुद्ध काळातील सोळा राष्ट्रे आणि आठ कुलांचे वर्णन आलेले आहे. बौद्ध ग्रंथांमध्ये गोतम बुद्धाच्या शाक्य कुलाची माहिती सविस्तर आलेली आहे. या काळात गणराज्य व्यवस्था होती. गणमुख्य गणराज्यात ठरलेल्या कायद्यांप्रमाणे राज्यव्यवस्था चालवीत व न्यायदानाचे कार्य करीत असत. याच काळात अनेक राज्यात गणराज्यांचा नाश होऊन महाराजसत्ता स्थापन होत होत्या. गणराजे वंश परंपरेने सत्तेवर येत होते. त्यामुळे त्यांचा सामान्य जनांवर जुलूम वाढत चाललेला होता. 

पारिभाषिक शब्द

अंगा , मगधा , कासी , कोसला , वज्जी , मल्ला , चेती , वंसा , कुरू , पञ्चाला , मच्छा , सूरसेना , अस्सका , अवंती , गंधारा , कंबोजा , कुल , गण , गणराज्य

1 . सोळा राष्ट्रे

यो इमेसं सोळसन्नं महाजनपदानं पहुतसत्तरतनान इस्सराधिपच्चं रज्जं कारेय्य, सेय्यथीदं- (१) अंगानं (२) मगधानं (३) कासीनं (४) कोसलानं (५) वज्जीनं (६) मल्लानं (७)चेतीनं (८) वंसानं (९) कुरूनं (१०) पञ्चालानं (११) मच्छानं (१२) सूरसेनानं (१३) अस्सकानं (१४) अवंतीनं (१५) गंधारानं (१६) कंबोजानं.

हा उतारा अंगुत्तरनिकायात चार ठिकाणी सापडतो. ललितविस्तराच्या तिस-या अध्यायातही बुद्ध जन्माला येण्यापूर्वी जंबुद्वीपात (हिंदुस्थानात) निरनिराळी सोळा राज्ये होती असा उल्लेख आहे; पण त्यापैकी आठ राज्यातील राजकुलांचे तेवढे वर्णन आढळते. या सर्व देशांचा उल्लेख बहुवचनी आहे. यावरून असे दिसून येते की, एके काळी हे देश महाजनसत्ताक होते. यातील महाजनांना राजे म्हणत आणि त्यांच्या अध्यक्षाला महाराजा म्हणत असत. बुद्धसमकाली ही महाजनसत्ताक पद्धति दुर्बल होऊन नष्ट होण्याच्या मार्गाला लागली; आणि तिच्या जागी एकसत्ताक राज्यपद्धति जोराने अंमलात येत चालली होती. या घडामोडीची कारणे काय असावीत याचा विचार करण्यापूर्वी वरील सोळा देशांसंबंधाने सापडणारी माहिती संक्षेपरूपाने येथे दाखल करणे योग्य वाटते.

१.१ अंगा

अंगांचा देश मगधाच्या पूर्वेला होता. त्याच्या उत्तर भागाला अंगुत्तराप म्हणत. मगध देशाच्या राजाने अंग देश जिंकल्यामुळे तेथील महाजनसत्ताक पद्धति नष्ट झाली. पूर्वीच्या महाजनांचे किंवा राजांचे वंशज होते, तरी त्यांची स्वतंत्र सत्ता राहिली नाही; आणि कालांतराने ‘अंगमगधा’ असा त्या देशाचा मगध देशाशी द्वंद्वसमासात निर्देश होऊ लागला.

बुद्ध भगवान त्या देशात धर्मोपदेश करीत असे व त्या देशाच्या मुख्य शहरात-चंपा नगरीत-गग्गरा राणीने बांधलेल्या तलावाच्या काठी तो मुक्कामाला राहत असे, असा त्रिपिटक ग्रंथात पुष्कळ ठिकाणी उल्लेख सापडतो. पण हे चंपा नगर देखील एखाद्या जुन्या राजाच्या ताब्यात नव्हते. बिंबिसार राजाने ते सोणदंड नावाच्या ब्राह्मणाला इनाम दिले. या इनामाच्या उत्पन्नावर सोणदंड ब्राह्मण मधून मधून मोठमोठाले यज्ञयाग करीत होता.

१.२. मगधा

बुद्धकाळच्या राज्यात मगध आणि कोसल या देशांची एकसारखी भरभराट होत चालली होती; आणि ती राष्ट्रे एकसत्ताक राज्यपद्धतीच्या कह्यात पूर्णपणे सापडली होती. मगधांचा राजा बिंबिसार आणि कोसलांचा राजा पसेनदि (प्रसेनजित्) हे दोघेही महाराजे उदारधी असल्यामुळे त्यांची एकसत्ताक राज्यपद्धति प्रजेला फार सुखावह झाली. हे दोघेही राजे यज्ञयागांना उत्तेजन देत होते खरे, तथापि श्रमणांना (परिव्राजकांना) त्यांच्या राज्यात आपला धर्मोपदेश करण्याला पूर्णपणे मुभा होती. एवढेच नव्हे, तर बिंबिसार राजा त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था करून त्यांना उत्तेजन देत असे. गोमत जेव्हा प्रथमतः संन्यास घेऊन राजगृहाला आला तेव्हा बिंबिसार राजाने पांडवपर्वताच्या पायथ्याशी जाऊन त्याची भेट घेतली, आणि त्याला आपल्या सैन्यात मोठी पदवी स्वीकारण्याची विनंती केली. पण गोतमाने आपला तपश्चर्या करण्याचा निश्चय ढळू दिला नाही. गयेजवळ उरुवेला येथे जाऊन त्याने तपश्चर्या आरंभिली, आणि शेवटी तत्त्वबोधाचा मध्यम मार्ग शोधून काढला. वाराणसीला पहिला उपदेश करून आपल्या पाच शिष्यांसह बुद्ध भगवान जेव्हा राजगृहाला आला, तेव्हा बिंबिसार राजाने त्याला आणि त्याच्या भिक्षुसंघाला राहण्यासाठी वेळुवन नावाचे उद्यान दिले. या उद्यानात एखादा विहार होता, असा उल्लेख कोठेच सापडत नाही. बिंबिसार राजाने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला येथे निर्विघ्नपणे राहण्याची परवानगी दिली, एवढाच या वेळुवनाचा अर्थ समजला पाहिजे. परंतु त्यावरून भिक्षुसंघाविषयी त्याचा आदर स्पष्ट दिसतो.

केवळ बुद्धाच्याच भिक्षुसंघासाठी नव्हे, तर या वेळी जे श्रमणांचे मोठमोठाले संघ होते त्यांनाही बिंबिसार राजाने आश्रय दिला होता. एकाच वेळी हे श्रमणसंघ राजगृहाच्या आसपास राहत होते, असा उल्लेख दीघनिकायांतील सामञ्‍ञफलसत्ताक आणि मज्झिमनिकायातील (नं.७७) महासकुलुदायिसुत्तात आढळतो.

बिंबिसार राजाचा मुलगा अजातशत्रु आपल्या अमात्यांसह पौर्णिमेच्या रात्री प्रासादाच्या गच्चीवर बसला आहे. त्या वेळी त्याला कोणातरी एखाद्या मोठ्या श्रमणनायकाची भेट घ्यावी अशी इच्छा होते. तेव्हा त्याच्या अमात्यांपैकी प्रत्येकजण एकेका श्रमणसंघाच्या नायकाची स्तुति करतो व राजाला त्याच्याजवळ जाण्यास विनवितो. त्याचा गृहवैद्य मुकाट्याने बसला होता. त्याला अजातशत्रु प्रश्न करतो; तेव्हा जीवक बुद्ध भगवंताची स्तुति करून त्याची भेट घेण्यास राजाचे मन वळवितो. आणि जरी या श्रमणसंघांच्या पुढा-यांत बुद्ध वयाने लहान होता आणि त्याचा संघ नुकताच स्थापन झाला होता, तरी त्याचीच भेट घ्यावी असे अजातशत्रु ठरवतो, आणि सहपरिवार बुद्धाच्या दर्शनासाठी जीवकाच्या आम्रवनात जातो.

अजातशत्रूने आपल्या बापाला कैद करून ठार केले व गादी बळकावली. तथापि बापाने जो श्रमणांचा आदर ठेवला होता, तो त्याने कमी पडू दिला नाही. बिंबिसार राजाच्या मरणानंतर बुद्ध भगवान क्वचितच राजगृहाला येत असे. त्यापैकी वर सांगितलेला एक प्रसंग होता. गादी मिळण्यापूर्वी अजातशत्रूला आपल्या बाजूला वळवून देवदत्ताने बुद्धावर नालगिरि नावाचा उन्मत्त हत्ती सोडण्याचा कट केला होता, इत्यादि गोष्टी विनयपिटकात वर्णिल्या आहेत. त्यात कितपत तथ्य असावे हे सांगता येत नाही. तथापि एक गोष्ट खरी की, अजातशत्रूचा देवदत्ताला चांगलाच पाठिंबा होता. आणि त्यामुळेच बुद्ध भगवान राजगृहापासून दूर राहत असावा. पण जेव्हा तो राजगृहाला आला तेव्हा त्याची भेट घेण्याला अजातशत्रु कचरला नाही. आणि त्याच वेळी राजगृहाच्या आजूबाजूला मोठमोठाल्या श्रमणसंघांचे सहा नेते राहत असत. ही गोष्ट लक्षात घेतली म्हणजे अजातशत्रु आपल्या बापापेक्षा देखील श्रमणांचा आदर विशेष ठेवीत होता, असे स्पष्ट दिसून येते. किंबहुना त्याच्या कारकीर्दीत मगध देशातील यज्ञयाग नष्टप्राय होत चालले आणि श्रमणसंघांची भरभराट होत गेली.

मगधांची राजधानी राजगृह ही जागा बिहार प्रांतात तिलय्या नावाच्या स्टेशनापासून सोळा मैलांवर आहे. चारी बाजूंना डोंगर असून त्याच्या मध्यभागी हे शहर वसले होते. शहरात जाण्याला डोंगराच्या खिंडीतून दोनच रस्ते असल्यामुळे शत्रूपासून शहराचे रक्षण करणे सोपे काम वाटल्यावरून येथे हे शहर बांधण्यात आले असावे. पण अजातशत्रूचे सामर्थ्य इतके वाढत गेले की, त्याला आपल्या रक्षणासाठी या डोंगरातील गोठ्यात (गिरिव्रजांत) राहण्याची गरज वाटली नाही. बुद्धाच्या परिनिर्वाणापूर्वी तो पाटलिपुत्र येथे एक नवीन शहर बांधीत होता; आणि पुढे त्याने आपली राजधानी त्याच ठिकाणी नेली असावी.

अजातशत्रूला वैदेहीपुत्र म्हटले आहे. यावरून त्याची आई विदेह राष्ट्रातील असावी असे सकृद्दर्शनी दिसून येते. आणि जैनांच्या ‘आचारांग’ सूत्रादिकातही त्याची आई वज्जी राजांपैकी एका राजाची कन्या होती असा उल्लेख आढळतो. परंतु कोसलसंयुत्ताच्या    दुस-या वग्गाच्या चौथ्या सुत्ताच्या अट्ठकथेत त्याला पसेनदीचा भाचा म्हटले आहे, आणि वैदेही शब्दाचा अर्थ ‘पंडिताधिवचनमेतं, पंडितित्थिया पुत्तो ति अत्थो’ असा केला आहे. ललितविस्तरात मगध देशाच्या राजकुलाला वैदेहीकुल हीच संज्ञा दिली आहे. यावरून असे दिसते की, हे कुल पितृपरंपरेने अप्रसिद्ध होते. आणि पुढे त्यातील एखाद्या राजाचा विदेह देशातील राजकन्येशी संबंध जडल्यामुळे ते नावारूपास आले; आणि काही राजपुत्र आपणास वैदेहीपुत्र म्हणवून घेऊ लागले.

अजातशत्रूने बिंबिसाराला ठार मारल्याची बातमी ऐकली तेव्हा अवंतीचा चंडप्रद्योत राजा फार रागावला व अजातशत्रूवर स्वारी करण्याचा त्याने घाट घातला. त्याच्या भयाने अजातशत्रूने राजगृहाच्या तटाची डागडुजी केली. पुढे चंडप्रद्योताच्या स्वारीचा बेत रहित झाला असावा. चंडप्रद्योतासारखा परकीय राजा अजातशत्रूवर रागावला, पण मगधातील प्रजेचा प्रक्षोभ मुळीच झाला नाही. यावरून या देशात एकसत्ताक राज्यपद्धति कशी दृढमूल झाली होती, याचे चांगले अनुमान करता येते.

१.३ कासी

कासी किंवा काशी यांची राजधानी वाराणसी होती. तेथल्या बहुतेक राजांना ब्रह्मदत्त म्हणत असत, असे जातक अट्ठकथेवरून दिसून येते. त्यांच्या राज्यपद्धतीसंबंधाने फारशी माहिती सापडत नाही. तथापि काशीचे राजे (महाजन) फारच उदारधी होते. त्यांच्या राज्यात कलाकौशल्याचा उत्तम विकास झाला होता. बुद्धसमकाली देखील उत्कृष्ट पदार्थांना ‘कासिक’ म्हणत असत. कासिक वस्त्र, कासिक चंदन इत्यादि शब्द त्रिपिटक वाड्‍ःमयात पुष्कळ ठिकाणी आढळतात. वाराणसीतील अश्वसेन राजाच्या वामा राणीच्या उदरी पार्श्वनाथ-जैनांचा तेविसावा तीर्थंकर-जन्मला. त्याने आपल्या उपदेशाला सुरुवात गोतम बुद्धाच्या जन्मापूर्वी सरासरी २४३ व्या वर्षी केली असावी. म्हणजे काशीचे महाजन केवळ कलाकौशल्यातच नव्हे, तर धार्मिक विचारात देखील अग्रणी होते, असे म्हणावे लागते. परंतु बुद्धसमकाली या देशाचे स्वातंत्र्य पार नष्ट होऊन कोसल देशात त्याचा समावेश झाला होता. ‘अंगमगधा’ च्या समासाप्रमाणेच ‘कासीकोसला’ हा देखील शब्द प्रचारात आला होता.

१.४ कोसला

कोसल देशाची राजधानी श्रावस्ती. ही अचिरवती (सध्या राप्ती) नदीच्या काठी होती; आणि तेथे पसेनदि (प्रसेनजित्) राजा राज्य करीत असे. तो वैदिक धर्माचा पूर्ण अनुयायी असून मोठमोठाले यज्ञ करीत होता, असे कोसलसुत्तातील एका सुत्तावरून दिसून येते. तथापि त्याच्या राज्यात श्रमणांचा मान ठेवला जात असे. अनाथपिंडिक नावाने प्रसिद्धीस आलेल्या एका मोठ्या श्रेष्ठीने बुद्धाच्या भिक्षुसंघासाठी श्रावस्ती येथे जेतवन नावाचा विहार बांधला. विशाखा नावाच्या प्रसिद्ध उपासिकेने देखील पूर्वाराम नावाचा एक मोठा प्रासाद भिक्षूंसाठी बांधून दिला. या दोन्ही ठिकाणी बुद्ध भगवान भिक्षुसंघासह मधून मधून राहत असे. त्याचे पुष्कळ चातुर्मास येथेच गेले असावेत, का की, बुद्धाने सर्वांत जास्त उपदेश अनाथपिंडिकाच्या आरामात केल्याचा दाखला त्रिपिटक वाड्‍ःमयात सापडतो. पसेनदि राजा जरी यज्ञयागांचा भोक्ता होता, तरी मधूनमधून तो बुद्धाच्या दर्शनासाठी अनाथपिंडिकाच्या आरामात जात असे. त्याला अनेकदा बुद्धाने केलेल्या उपदेशाचा संग्रह कोसलसुत्तांत सापडतो.

ललितविस्तरातील या राजवंशाच्या वर्णनावरून असे दिसून येते की, ते राजे मातंगांच्या हीन जातीतून उदयाला आले. धम्मपद-अट्ठकथेत सापडणा-या विडूडभाच्या (विदुर्दभाच्या) गोष्टीवरून देखील ललितविस्तरातील विधानाला बळकटी येते.

पसेनदि राजा बुद्धाला फार मानीत होता. त्याच्या शाक्यकुळातून एखाद्या राजकन्येशी लग्न करण्याचा पसेनदीने बेत केला. पण शाक्य राजे कोसलराजकुलाला नीच मानीत असल्यामुळे त्यांना आपली कन्या कोसलराजाला देणे योग्य वाटत नव्हते. तथापि शाक्यांवर कोसलराजाचीच सत्ता चालत असल्यामुळे त्याची मागणी नाकबूल करता येईना. त्यांनी अशी युक्ती योजिली की, महानाम शाक्याची दासीकन्या वासभखत्तिया हिला महानामाने आपली स्वतःची कन्या म्हणून कोसल राजाला द्यावी. कोसल राजाच्या अमात्यांना ही कन्या पसंत पडली. महानाम तिच्याबरोबर बसून जेवल्यामुळे ती त्याची मुलगी अशी त्यांची खात्री झाली; आणि ठरल्याप्रमाणे वासभखत्तियेचा शुभमुहूर्तावर कोसलराजाशी विवाह झाला. राजाने तिला पट्टराणी केले. तिचा मुलगा विडूडभ सोळा वर्षांचा झाल्यावर आपल्या आजोळी शाक्यांकडे गेला. शाक्यांनी आपल्या संस्थागारात(नगरमंदिरात) त्याचा योग्य सन्मान केला; पण तो निघून गेल्यावर त्याचे आसन धुण्यात आले; आणि आपण दासीपुत्र आहोत, ही गोष्ट विडूडभाच्या कानी गेली.

वयात आल्यावर विडूडभाने जबरदस्तीने कोसल देशाचे राज्य बळकावले व वृद्ध पसेनदीला श्रावस्तीतून हाकलून दिले. पसेनदि आपला भाचा अजातशत्रु याच्या आश्रयाला जाण्यासाठी अज्ञात वेषाने राजगृहात जात असता अत्यंत कष्ट पावून राजगृहाबाहेरच्या एका धर्मशाळेत निवर्तला.

बापाच्या निधनानंतर विडूडभाने शाक्यांवर स्वारी करण्याचा बेत केला. भगवान बुद्धाने त्याला उपदेश करून त्याचा हा बेत दोनदा रहित करविला. परंतु तिस-या वेळी मध्यस्थी करण्याला बुद्धाला सवड न मिळाल्यामुळे विडूडभाने आपला बेत पार पाडला. त्याने शाक्यांवर स्वारी करून त्यांची दाणादाण केली. जे शरण आले किंवा पळून गेले त्यांना सोडून इतरांची बायकामुलांसकट कत्तल केली व त्यांच्या रक्ताने आपले आसन धुवावयास लावले.

शाक्यांचा निःपात करून विडूडभ श्रावस्तीला येऊन अचिरवतीच्या काठी आपल्या सैन्याचा तळ देऊन राहिला. आसपासच्या प्रदेशात अकालमेघाचा भयंकर वर्षाव होऊन अचिरवतीला महापूर आला आणि सैन्यातील काही लोकांसह विडूडभ त्या पुरात सापडून वाहून गेला.

मगध देशाप्रमाणेच कोसल देशात देखील एकसत्ताक राज्यपद्धति बळकट होत चालली होती, हे विडूडभाच्या कथेवरून स्पष्ट होते. त्याने आपल्या लोकप्रिय बापाची गादी बळकावली असताही कोसलांनी त्याविरुद्ध एक ब्र देखील काढला नाही.

१.५  वज्जी

महाजनसत्ताक राज्यात तीनच राज्ये स्वतंत्र राहिली होती. एक वज्जींचे आणि दोन पावा व कुशिनारा येथील मल्लांची. त्यात वज्जींचे राज्य बलाढ्य असून भरभराटीत होते, तरी त्याचा अस्त देखील फार दूर नव्हता. तथापि पहाटेच्या प्रहरी शुक्राच्या चांदणीप्रमाणे ते चमकत होते. बुद्ध भगवान अशाच एका महाजनसत्ताक राज्यात जन्मला. पण शाक्यांचे स्वातंत्र्य पूर्वीच नष्ट झाले होते. वज्जी आपल्या एकीने व पराक्रमाने बुद्धाच्या हयातीत स्वतंत्र राहिल्यामुळे बुद्धाला त्यांच्याविषयी आदर असणे साहजिकच होते. महापरिनिब्बानसुत्तांत भगवान दुरून येणा-या लिच्छवींकडे पाहून भिक्षूंना म्हणतो, “भिक्षूंनो, ज्यांनी तावत् त्रिंशत् देव पाहिले नसतील, त्यांनी या लिच्छवींच्या समुदायाकडे पाहावे!”

वज्जींची राजधानी वैशाली नगरी होती. तिच्या आसपात राहणा-या वज्जींना लिच्छवी म्हणत. त्यांच्या पूर्वेला पूर्वी विदेहांचे राज्य होते, जेथे जनकासारखे उदारधी राजे होऊन गेले. विदेहांचा शेवटचा राजा सुमित्र मिथिलानगरीत राज्य करीत होता, असे ललितविस्तरावरून दिसून येते. त्याच्या पश्चात् विदेहांचे राज्य वज्जींच्या राज्याला जोडण्यात आले असावे.

बुद्ध भगवंताने वज्जींना अभिवृद्धीचे सात नियम उपदेशिल्याचे वर्णन महापरिनिब्बानसुत्ताच्या आरंभी आणि अंगुत्तरनिकायाच्या सत्तकनिपातात सापडते. महापरिनिब्बानसुत्ताच्या अट्ठकथेत या नियमावर विस्तृत टीका आहे. तिजवरून असे अनुमान करता येते की, वज्जींच्या राज्यात एक प्रकारची ज्यूरीची पद्धति होती व सहसा निरपराधी माणसाला शिक्षा होत नसे. त्यांचे कायदे लिहिलेले असत व त्याप्रमाणे चालण्याविषयी ते दक्षता बाळगीत.

१.६ मल्ला

मल्लांचे राज्य वज्जींच्या पूर्वेस व कोसल देशाच्या पश्चिमेस होते. तेथे वज्जींप्रमाणेच गणसत्ताक राज्यपद्धति प्रचलित होती. परंतु मल्लात फूट पडून त्यांचे पावा येथील मल्ल व कुशिनारा येथील मल्ल असे दोन विभाग झाले होते.

मगध देशातून कोसल देशाकडे जाण्याचा रस्ता मल्लांच्या राज्यातून असल्यामुळे बुद्ध भगवान तेथून वारंवार प्रवास करीत असे. बुद्ध भगवंताने पावा येथे राहणा-या चुन्द लोहाराचे अन्न ग्रहण केले; आणि तो आजारी झाला; व तेथून कुसिनारेला गेल्यावर त्या रात्री परिनिर्वाण पावला. आजला त्या ठिकाणी एक लहानसा स्तूप व मंदिर अस्तित्वात आहे. त्याच्या दर्शनाला अनेक बौद्ध यात्रेकरू जातात. पावा किंवा पडवणा हा गावही येथून जवळच आहे. तेव्हा पावा येथील मल्ल व कुसिनारा येथील मल्ल जवळ जवळ राहत असे दिसते. या दोन राज्यांतून बुद्धाचे बरेच शिष्य होते. ही राज्ये स्वतंत्र होती खरी, पण त्यांचा प्रभाव वज्जींच्या गणसत्ताक राज्याएवढा खास नव्हता. किंबहुना वज्जींच्या बलाढ्य राज्याच्या अस्तित्वामुळे ती राहिली असावी.

१.७ चेती

या राष्ट्राची माहिती जातकातील चेतिय जातक आणि वेस्संतर जातक या दोन जातकात आली आहे. त्याची राजधानी सोत्थिवती (स्वस्तिवती) होती असे चेतिय जातकात (नं.४२२) म्हटले आहे; आणि तेथील राजांची परंपराही दिली आहे. शेवटला राजा उपचर किंवा अपचर हा खोटे बोलला आणि आपल्या पुरोहिताच्या शापामुळे नरकात पडला. त्याचे पाच मुलगे पुरोहिताला शरण गेले. पुरोहिताने ते राज्य सोडून जाण्यास त्यांना सांगितले आणि त्याप्रमाणे त्यांनी बाहेर जाऊन निरनिराळी पाच शहरे वसविली, असे वर्णन या जातकात आढळते.

वेस्संतराची पत्नी मद्दी (माद्री) ही मद्द (मद्र) राष्ट्रातील राजकन्या होती. याच राष्ट्राला चेतिय राष्ट्र म्हणत असे वेस्संतर जातकातील कथेवरून दिसून येते. खुद्द वेस्संतराचा देश शिवि हा या चेतिय राष्ट्राच्या जवळ होता. तेथल्या शिविराजाने आपले डोळे ब्राह्मणाला दिल्याची कथा जातकात प्रसिद्ध आहे. वेस्संतर राजकुमाराने देखील

आपला मंगल हत्ती, दोन मुले आणि बायको ब्राह्मणांना दान दिल्याची कथा वेस्संतर जातकात आली आहे. यावरून फार तर एवढे सिद्ध होते की, शिवींच्या आणि चेतींच्या (चैद्यांच्या) राष्ट्रात ब्राह्मणांचे फार वर्चस्व असे आणि त्यामुळे ही राज्ये कोठे तरी पश्चिमेच्या बाजूला असावी. बुद्धकाळी शिवीचे व चेतीचे नाव अस्तित्वात होते; पण बुद्ध त्यांच्या राज्यांत गेल्याचे किंवा अंगाचा जसा मगधांच्या राज्यात समावेश झाला, तसा या राज्यांचा दुस-या राज्यात समावेश झाल्याचेही दिसून येत नाही. काही असो, बुद्ध भगवंताच्या चरित्राशी या राज्यांचा कोणत्याही रीतीने संबंध आला नाही एवढे खास.

१.८ वंसा (वत्स)

याची राजधानी कोसम्बी (कौशाम्बी). बुद्धसमकाली येथील गणसत्ताक राज्यपद्धति नष्ट झाली व उदयन नावाचा मोठा चैनी राजा सर्वसत्ताधिकारी झाला, असे दिसते. धम्मपद अट्ठकथेत या राजाची एक गोष्ट आली आहे, ती अशी:

उदयनाचे आणि उज्जयिनीचा राजा चंडप्रद्योत याचे अत्यंत वैर होते. लढाईत उदयनाला जिंकणे शक्य नसल्यामुळे प्रद्योताला काहीतरी युक्ति लढवून उदयनास धरण्याचा बेत करावा लागला. उदयन राजा हत्ती पकडण्याचा मंत्र जाणत होता; आणि जंगलात हत्ती आल्याबरोबर शिकारी लोकांना घेऊन तो त्याच्यामागे लागत असे. चंडप्रद्योताने एक कृत्रिम हत्ती तयार करविला व त्याला वत्सांच्या सरहद्दीवर नेऊन ठेवण्यास लावले. आपल्या सरहद्दीवर नवीन हत्ती आल्याची बातमी समजल्याबरोबर उदयन राजा त्याच्या मागे लागला. या कृत्रिम हत्तीच्या आत दडून राहिलेल्या मनुष्यांनी तो हत्ती चंडप्रद्योताच्या हद्दीत नेला. उदयन त्याच्या मागोमाग पळत गेला असता तेथे दबा धरून राहिलेल्या प्रद्योताच्या शिपायांनी त्याला पकडून उज्जयिनीला नेले.

चंडप्रद्योत त्याला म्हणाला, “हत्तीचा मंत्र शिकवशील तर मी तुला सोडून देईन, नाही तर येथेच ठार करीन.” उदयन त्याच्या लालचीला किंवा शिक्षेला मुळीच घाबरला नाही. तो म्हणाला, “मला नमस्कार करून शिष्य या नात्याने मंत्राध्ययन करशील तरच मी तुला मंत्र शिकवीन; नाही तर तुला जे करावयाचे असेल ते कर.” प्रद्योत अत्यंत अभिमानी असल्यामुळे त्याला हे रुचले नाही. पण उदयनाला मारुन मंत्र नष्ट करणेही योग्य नव्हते. म्हणून तो उद्यानाला म्हणाला, “दुस-या एखाद्या माणसाला तू हा मंत्र शिकविलास, तर मी तुला बंधमुक्त करीन.”

उदयन म्हणाला, “जी स्त्री किंवा जो पुरुष मला नमस्कार करून शिष्यत्वाने मंत्राध्ययन करील, तिला किंवा त्याला मी तो शिकवीन.”

चंडप्रद्योताची कन्या वासुलदत्ता (वासवदत्ता) मोठी हुशार होती. मंत्र ग्रहण करण्याला ती समर्थ होती खरी; पण उदयनाला आणि तिला एकत्र येऊ देणे प्रद्योताला योग्य वाटले नाही. तो उदयनाला म्हणाला, “माझ्या घरी एक कुबडी दासी आहे, ती पडद्याच्या आड राहून तुला नमस्कार करील आणि तुझे शिष्यत्व पत्करून मंत्र शिकेल. तिला जर मंत्रसिद्धि मिळाली, तर तुला मी बंधमुक्त करून तुझ्या राज्यात पाठवीन.”

उदयनाने ही गोष्ट कबूल केली. प्रद्योताने वासवदत्तेला सांगितले की, “एक श्वेतकुष्ठी मनुष्य हत्तीचा मंत्र जाणतो. त्याचे तोंड न पाहता त्याला नमस्कार करून तो मंत्र ग्रहण केला पाहिजे.” त्याचप्रमाणे वासवदत्तेने उदयनाला पडद्याआडून नमस्कार करून मंत्र शिकण्यास सुरुवात केली. तो शिकत असता काही अक्षरे तिला नीट उच्चारता येईनात. तेव्हा उदयन रागावून म्हणाला, “हे कुबडे, तुझे ओठ फारच जाड असले पाहिजे!” ते ऐकून वासवदत्ता अत्यंत संतापली व म्हणाली, “अरे कुष्ठ्या, राजकन्येला कुबडी म्हणतोस काय?”

उदयनाला हा काय प्रकार आहे ते समजेना. ते जाणण्यासाठी त्याने एकदम पडदा बाजूला सारला. तेव्हा त्या दोघांनाही प्रद्योताचा मतलब समजला. ताबडतोब दोघांचे परस्परांवर प्रेम जडले व अवंतीहून पळून जाण्याचा त्यांनी बेत रचला. शुभ मुहूर्तावर मंत्रसिद्धीसाठी एक औषधी आणली पाहिजे म्हणून वासवदत्तेने आपल्या बापाकडून भद्रवती नावाची हत्तीण मागून घेतली. आणि प्रद्योत उद्यानक्रीडेला गेला आहे, असे पाहून तिने व उदयनाने त्या हत्तीणीवर बसून पळ काढला. उदयन हत्ती चालवण्यात पटाईत होताच तथापि त्याच्या मागोमाग पाठवलेल्या शिपायांनी त्याला वाटेत गाठले. वासवदत्तेने बापाच्या खजिन्यातून शक्य तेवढ्या सोन्याच्या नाण्यांच्या पिशव्या बरोबर आणल्या होत्या. त्यापैकी एक पिशवी सोडून तिने नाणी रस्त्यात फैलावली. शिपाई ती वेचण्यात गुंतले असता उदयनाने हत्तीणीला पुढे हाकले. पुन्हा शिपायांनी हत्तीणीला गाठले, तेव्हा तसाच प्रयोग करण्यात आला आणि या उपायाने त्या दोघांनी कौशाम्बी गाठली.

उदयन एकदा आपल्या उद्यानात क्रीडेसाठी गेला असता तेथेच झोपला. पिंडोल भारद्वाज भिक्षु जवळच्या एका वृक्षाखाली बसला होता. राजाला झोप लागली आहे, असे पाहून त्याच्या बायका पिंडोल भारद्वाजापाशी गेल्या आणि त्याचा उपदेश ऐकत बसल्या. इतक्यात राजा जागा झाला व रागावून पिंडील भारद्वाजाच्या अंगावर तांबड्या मुंग्या सोडण्याचा त्याने प्रयत्न केला, असा उल्लेख संयुत्तनिकायाच्या अट्ठकथेत सापडतो. पण पुढे पिंडोल भारद्वाजाचाच उपदेश ऐकून उदयन बुद्धोपासक झाला.

कौशाम्बी येथे घोषित, कुक्कुट आणि पावारिक या तीन श्रेष्ठींनी बुद्धाच्या भिक्षुसंघाला राहण्यासाठी अनुक्रमे घोषिताराम, कुक्कुटाराम आणि पावारिकाराम असे तीन विहार बांधल्याचा उल्लेख अंगुत्तरनिकायाच्या अट्ठकथेत अणि धम्मपदअट्ठकथेत सापडतो. उदयनाची एक प्रमुख राणी सामावती आणि तिची दासी खुज्जुत्तरा (कुब्बा उत्तरा) या बुद्धाच्या दोन मुख्य उपासिका होत्या. यावरून असे दिसते की, उदयन राजा जरी फारसा श्रद्धाळू नव्हता, तरी कौशाम्बीच्या लोकात बुद्धभक्त पुष्कळ होते आणि भिक्षूंचा योगक्षेम नीट चालवण्यास ते उत्सुक असत.

१.९ कुरू

या देशाची राजधानी इन्द्रप्रस्थ नगर होते. बुद्धसमकाली तेथे कौरव्य नावाचा राजा राज्य करीत असे, एवढीच काय ती माहिती सापडते. पण तेथील राज्यव्यवस्था कशी चालत होती, याची माहिती कोठे सापडत नाही. या देशात बुद्धाच्या भिक्षुसंघासाठी एक देखील विहार नव्हता. बुद्ध भगवान उपदेश करीत त्या देशात जाई, तेव्हा एखाद्या झाडाखाली किंवा अशाच दुस-या ठिकाणी मुकामाला राहत असे. तथापि या देशात बुद्धोपदेशाचे चाहते बरेच होते असे दिसते. त्यापैकी राष्ट्रपाल नावाचा धनाढ्य तरुण भिक्षु झाल्याची कथा मज्झिमनिकायात विस्तारपूर्वक दिली आहे. कुरू देशातील कम्मासदम्म (कल्माषदम्य) नावाच्या नगराजवळ बुद्ध भगवंताने सतिपट्ठानासारखी काही उत्तम सुत्ते उपदेशिल्याचा उल्लेख सुत्तपिटकात सापडतो. त्यावरून असे दिसते की, तेथील सामान्य जनसमूह बुद्धाला मानीत असला, तरी अधिकारी वर्गात त्याचा कोणी भक्त नव्हता आणि वैदिक धर्माचे येथे फारच वर्चस्व होते.

१.१० पञ्चाला (पांचाला) आणि मच्छा(मत्स्या)

उत्तरपाञ्चालांची राजधानी कम्पिल्ल (काम्पिल्य) होती, असा उल्लेख जातक अट्ठकथेत अनेक ठिकाणी सापडतो; पण मत्स्य देशाच्या राजधानीचा पत्ता नाही. यावरून असे दिसून येते की, बुद्धसमकाली या दोन देशांना फारसे महत्त्व राहिले नव्हते आणि त्या देशांतून बुद्धाने प्रवास केला नसल्यामुळे तेथील लोकांसंबंधाने किंवा शहरासंबंधाने बौद्धग्रंथात फारशी माहिती सापडत नाही.

१.११ सूरसेना (शूरसेना)

यांची राजधानी मधुरा (मथुरा). येथे अवंतिपुत्र नावाचा राजा राज्य करीत होता. 

वर्णाश्रमधर्मासंबंधाने त्याचा व महाकात्यायनाचा संवाद मज्झिमनिकायातील मधुरसुत्तात वर्णिला आहे. या देशात बुद्ध क्वचितच जात असे. मधुरा त्याला फारशी आवडत नसावी, असे खालील सुत्तावरून दिसून येते.

पञ्‍चिमे भिक्खवे आदीनवा मधुरायं| कतमे पञ्च? विसमा, बहुरजा, चण्डसुनखा, वाळयक्खा, दुल्लभपिण्डा| इमे खो भिक्खवे पञ्च आदीनवा मधुरायं ति |    (अंगुत्तरनिकाय पञ्चकनिपात)

भिक्षुहो, मथुरेत हे पाच दोष आहेत. कोणते पाच? तिचे रस्ते खडबडीत, धूळ फार, कुत्रे द्वाड, यक्ष क्रूर आणि तेथे भिक्षा मिळणे फार कठीण. भिक्षु, मथुरेत हे पाच दोष आहेत.

१.१२ अस्सका (अश्मका)

सुत्तनिपातातील पारायणवग्गाच्या आरंभी ज्या वत्थुगाथा आहेत, त्यावरून असे दिसून येते की, अस्सकांचे राज्य कोठेतरी गोदावरी नदीच्या आसपास होते. बावरी नावाच्या श्रावस्ती येथे राहणा-या ब्राह्मणाने आपल्या सोळा शिष्यांसह वर्तमान या राज्यात वस्ती केली.

सो अस्सकस्स विसये अळकस्स समासने |

वसी गोदावरीकूले उञ्छेन च फलेन च ||

तो (बावरी) अश्वकाच्या राज्यात आणि अळकाच्या राज्याजवळ गोदावरीतीरी भिक्षेवर आणि फळावर निर्वाह करून वास करिता झाला.

अस्सक आणि अळक हे दोन (अन्धक) राजे होते व त्यांच्या राज्याच्या दरम्यान बावरीने आपल्या सोळा शिष्यांसह वर्तमान एक वसाहत केली आणि ती उत्तरोत्तर वाढत गेली, असे अट्ठकथाकाराचे म्हणणे आहे. वैदिक धर्मप्रचारकांची दक्षिणेत ही पहिली वसाहत होती, असे म्हणण्यास हरकत नाही. बुद्ध किंवा तत्समकाली भिक्षु येथवर पोचले नसल्यामुळे या राज्याची विशेष माहिती बौद्ध वाड्‍ःमयात सापडत नाही. तथापि बुद्धाची कीर्ति येथवर जाऊन थडकली होती. ती ऐकून बावरीने आपल्या सोळाही शिष्यांना बुद्धदर्शनाला पाठविले. ते प्रवास करीत मध्यप्रदेशात आले व अखेरीस राजगृह येथे बुद्धाला गाठून त्याचे शिष्य झाल्याची हकीकत वर निर्देशिलेल्या पारायणवग्गांतच आहे. परंतु त्यानंतर त्यांनी परत जाऊन गोदावरीच्या प्रदेशात उपदेश केल्याचा उल्लेख कोठे आढळत नाही.

१.१३ अवंती

अवंतीची राजधानी उज्जयिनी व त्यांचा राजा चंडप्रद्योत यांच्या संबंधाने बरीच माहिती आढळते. चंडप्रद्योत आजारी पडला असता त्याच्या आमंत्रणावरून मगध देशातील प्रसिद्ध वैद्य जीवक कौमारभृत्य त्याला बरे करण्यासाठी उज्जयिनीला गेला. प्रद्योताच्या अत्यंत क्रूर स्वभावामुळे त्याला चंड हे विशेषण लावीत; आणि ही गोष्ट जीवकाला चांगली माहित होती. राजाला औषध देण्यापूर्वी जीवकाने जंगलात जाऊन औषधे आणण्याच्या निमित्ताने भद्दवती नावाची हत्तीण मागून घेतली आणि राजाला औषध देऊन त्या हत्तीणीवर बसून पळ काढला. इकडे औषध घेतल्याबरोबर प्रद्योताला भयंकर वांत्या होऊ लागल्या. त्यामुळे तो खवळला; आणि त्याने जीवकाला पकडून आणण्याचा हुकूम सोडला. परंतु जीवक तेथून निसटला होता. त्याचा पाठलाग करण्यासाठी राजाने काक नावाच्या आपल्या दासाला पाठविले. काकने कौशाम्बीपर्यंत प्रवास करून जीवकाला गाठले. जीवकाने त्याला एक औषधी आवळा खाण्यास दिला, त्यामुळे काकाची दुर्दशा झाली आणि जीवकाने भद्दवतीवर बसून सुखरूपपणे राजगृहाला प्रयाण केले. इकडे प्रद्योत साफ बरा झाला. काक दासदेखील बरा होऊन उज्जयिनीला गेला. रोग नष्ट होऊन प्रकृति पूर्वीप्रमाणे बरी झाल्याकारणाने प्रद्योताची जीवकावर मर्जी बसली आणि त्याला अर्पण करण्यासाठी प्रद्योताने सिवेय्यक नावाच्या उत्तम वस्त्रांची जोडी राजगृहाला पाठविली.

या गोष्टीत आणि धम्मपद अट्ठकथेतील गोष्टीत बरेच साम्य आहे; परंतु एकीवरून दुसरी रचण्यात आली किंवा त्या भिन्न भिन्न काळी घडून आल्या, हे सांगता येत नाही. या दोन्ही गोष्टींवरून प्रद्योताची चंडप्रकृति व्यक्त होते आणि तो सर्वसत्ताधारी राजा होता, असे दिसून येते.

बुद्ध भगवान प्रद्योताच्या राज्यात कधीही गेला नाही. परंतु त्याच्या प्रमुख शिष्यांपैकी एक-महाकात्यायन-प्रद्योताच्या पुरोहिताचा मुलगा होता. पित्याच्या मरणानंतर त्याला पुरोहितपद मिळाले; पण त्यात समाधान न मानता तो मध्य देशात जाऊन बुद्धाचा भिक्षुशिष्य झाला. महाकात्यायन परत स्वदेशी आल्यावर प्रद्योताने आणि इतर लोकांनी त्याचा चांगला आदरसत्कार केला. त्याचा आणि मथुरेचा राजा अवंतिपुत्र यांचा जातिभेदाविषयीचा संवाद मज्झिमनिकायातील मधुर किंवा मधुरिय सुत्तांत सापडतो. मथुरेत आणि उज्जयिनीत महाकात्यायन जरी प्रसिद्ध होता, तरी या प्रदेशात बुद्ध भगवंताच्या हयातीत बौद्धमताचा फारसा प्रसार झाला होता, असे दिसत नाही. बुद्धाचे भिक्षुशिष्य तुरळक असल्यामुळे या प्रदेशात पाच भिक्षूंना देखील दुस-या भिक्षूला 

उपसंपदा देऊन संघात दाखल करून घेण्याची बुद्ध भगवंताने परवानगी दिली.  या कामी मध्य देशात कमीत कमी वीस भिक्षूंची जरूरी लागत होती.

१.१४ गंधारा (गांधारा)

यांची राजधानी तक्कसिला (तक्षशिला). येथे पुक्कुसाति नावाचा राजा राज्य करत होता. त्याने उतारवयात आपले राज्य सोडले व राजगृहापर्यंत पायी प्रवास करून भिक्षुसंघात प्रवेश केला. तदनंतर पात्र आणि चीवर शोधण्यासाठी फिरत असता त्याला एका उन्मत्त गाईने ठार केले. त्याला गाईने मारल्याची कथा मज्झिमनिकायाच्या धातुविभंगसुत्तांत आली आहे. तो तक्षशिलेचा राजा होता आणि त्याची बिंबिसार राजाची मैत्री कशी झाली, इत्यादि सविस्तर वर्णन या सुत्ताच्या अट्ठकथेत सापडते. त्याचा सारांश असा:

तक्षशिलेतील काही व्यापारी राजगृहाला आले. बिंबिसार राजाने वहिवाटीप्रमाणे त्यांचा आदरसत्कार करून त्यांच्या राजाची प्रवृत्ति विचारली. तो अत्यंत सज्जन असून वयाने आपल्या एवढाच आहे, असे समजल्यावर बिंबिसार राजाच्या मनात त्याच्याविषयी प्रेमादर उत्पन्न झाला; आणि त्याने त्या व्यापा-यांचा कर माफ करून पुक्कुसाती राजाला दोस्तीचा निरोप पाठविला. त्यामुळे पुक्कुसाति बिंबिसारावर फार प्रसन्न झाला. मगध देशातून येणा-या व्यापा-यांवर असलेला कर त्याने माफ केला आणि आपल्या नोकरांकडून त्या व्यापा-यांबरोबर बिंबिसार राजासाठी आठ पंचरंगी बहुमोल शाली पाठविल्या. बिंबिसार राजाने या भेटीचा मोबदला एक सुवर्णपट उत्तम करंडकात घालून पाठविला. त्या सुवर्णपटावर बुद्ध, धर्म आणि संघ यांचे गुण उत्कृष्ट हिंगुळाने लिहिले होते. तो मजकूर वाचून पुक्कुसातीला बुद्धाचा निदिध्यास लागला; आणि शेवटी राजत्याग करून तो राजगृहापर्यंत पायी चालत आला.

तेथे एका कुंभाराच्या घरी त्याची व बुद्धाची गाठ कशी पडली, त्याला बुद्धाने कोणता उपदेश केला आणि शेवटी उन्मत्त गाईकडून तो कसा मारला गेला, हा मजकूर वर निर्देशिलेल्या धातुविभंगसुत्तातच सापडतो.

गांधारांचा आणि त्यांच्या राजधानीचा (तक्षशिलेचा) उल्लेख जातक अट्ठकथेत अनेक ठिकाणी आहे. तक्षशिला जशी कलाकौशल्यात तशीच विद्वतेतही आघाडीवर होती. ब्राह्मणकुमार वेदाभ्यास करण्यासाठी, क्षत्रिय धनुर्विद्या व राज्यकारभार शिकण्यासाठी आणि तरुण वैश्य शिल्पकला व इतर धंदे शिकण्यासाठी दूरदूरच्या प्रदेशांतून तक्षशिलेला येत असत. राजगृह येथील विख्यात वैद्य जीवक कौमारभृत्य याने आयुर्वेदाचा अभ्यास याच ठिकाणी केला. हिंदुस्थानातील अगदी प्राचीन असे प्रसिद्ध विश्वविद्यालय तक्षशिलेलाच होते.

१.१५ कंबोजा (काम्बोज)

यांचे राज्य वायव्य दिशेला असून त्यांची राजधानी द्वारका होती, असे प्रो. ऱ्हिस डेव्हिड्स यांचे मत आहे.१० परंतु मज्झिमनिकायातील अस्सलायनसुत्तांत ‘योनकंबोजेसु’ असा त्या देशाचा यवनांबरोबर उल्लेख केला असल्यामुळे हा देश गांधारांच्याही पलीकडे होता असे दिसते. त्याच सुत्तांत यवनकाम्बोज देशात आर्य आणि दास अशा दोनच जाती आहेत व कधी कधी आर्याचा दास आणि दासाचा आर्य होत असतो असेही म्हटले आहे. गांधारांच्या देशात वर्णाश्रमधर्म दृढमूल झाला असल्याचे काही जातककथांवरून स्पष्ट होते. खुद्द तक्षशिलेत बहुतेक गुरू ब्राह्मणजातीचे असत; पण काम्बोजात चातुर्वर्ण्याचा प्रवेश झाला नव्हता. तेव्हा तो देश गांधाराच्या पलीकडे होता असे म्हणावे लागते.

या देशातील लोक जंगली घोडे पकडण्यात पटाईत होते असे कुणालजातकाच्या अट्ठकथेवरून दिसून येते. घोडे पकडणारे लोक जंगली घोडे ज्या ठिकाणी पाणी पिण्यास येत त्या पाण्यावरच्या शेवाळाला आणि जवळच्या गवताला मध फाशीत. घोडे ते गवत खात खात त्या लोकांनी तयार केलेल्या एका मोठ्या कुंपणात शिरत. ते आत शिरल्याबरोबर घोडे पकडणारे कुंपणाचा दरवाजा बंद करीत आणि त्या घोड्यांना हळूहळू आपल्या कह्यात आणीत असत. (आजकाल अशाच काही उपायांनी म्हैसुरात हत्ती पकडत असतात हे सर्वश्रुत आहेच.) जंगली घोड्यांना लगामात आणून त्यांना हे लोक काम्बोजातील व्यापा-यांना विकत असावेत. व्यापारी लोक घोड्यांना तेथून मध्यदेशात बनारस वगैरे ठिकाणी आणून विकीत.११

काम्बोज देशातील बहुजन किडे, पतंग वगैरे प्राण्यांना मारल्यानेच आत्मशुद्धि होते असे समजत.

कीटा पतंगा उरगा च भेका

हन्त्वा किमिं सुज्झति मक्खिका च |

एते हि धम्मा अनरियरूपा

कम्बोजकानं वितथा बहुन्नं ||१२

‘किडे, पतंग, सर्प, बेडूक, कृमि आणि माशा मारल्याने मनुष्यप्राणी शुद्ध होतो, असा अनार्य आणि अतथ्य धर्म काम्बोजांतील बहुजन मानतात.’

यावरून हे लोक, सध्या जसे सरहद्दीवरचे लोक आहेत, तसेच मागासलेले होते असे दिसते.

मनोरथपूरणी अट्ठकथेत महाकप्पिनाची गोष्ट आली आहे. तो सरहद्दीवरील कुक्कुटवती नावाच्या राजधानीत राज्य करीत होता, आणि पुढे बुद्धाचे गुण ऐकून मध्यदेशात आला. चन्द्रभागा नदीच्या काठी त्याची आणि भगवान बुद्धाची गाठ पडली. तेथे भगवंतांनी कप्पिनाला त्याच्या अमात्यांसह भिक्षूसंघात घेतले इत्यादि.१३

महाकप्पिन राजा होता व तो कुक्कुटवतीत राज्य करीत होता याला आधार संयुत्तनिकायाच्या अट्ठकथेत सापडतो. परंतु ही कुक्कुटवती राजधानी काम्बोजात होती, किंवा त्याच्या जवळच्या कुठल्यातरी दुस-या डोंगराळ संस्थानात होती, हे काहीच समजत नाही. एवढे खरे की, बुद्धाच्या हयातीतच त्याची कीर्ति आणि प्रभाव या सरहद्दीवरच्या रानटी लोकात पसरला होता. याला एक आजकालचे उदाहरण देता येण्यासारखे आहे. पंजाबच्या जातिनिविष्ट लोकांत जेवढे गांधीजीचे वजन आहे, त्याच्यापेक्षा किती तरी पटीने जास्त सरहद्दीवरच्या पठाणांत दिसून येते. असाच काहीसा प्रकार बुद्धाच्या वेळी घडून आला असल्यास त्यात आश्चर्य मानण्यासारखे काही नाही.

2 . सोळा राज्यांचा ललितविस्तरात उल्लेख

या सोळा राज्यांचा उल्लेख ललितविस्तरात सापडतो, असे वर म्हटलेच आहे. प्रसंग असा आहे की, बोधिसत्त्व तुषितदेवभवनात असता कोणत्या राज्यात जन्म घेऊन लोकोद्धार करावा याचा विचार करतो. त्याला निरनिराळे देवपुत्र भिन्नभिन्न राजकुलांचे गुण सांगतात व दुसरे काही देवपुत्र त्या कुलांचे दोष दाखवितात.

२.१ मगधराजकुल

१) कोणी देवपुत्र म्हणाले, “मगध देशामध्ये हे वैदेहिकुल फार संपन्न असून बोधिसत्त्वाला जन्मण्याला ते स्थान योग्य आहे.” यावर दुसरे देवपुत्र म्हणाले, “हे कुल योग्य नाही कारण, ते मातृशुद्ध आणि पितृशुद्ध नसून चंचल आहे; विपुल पुण्याने अभिषिक्त झालेले नाही. उद्यान, तडाग इत्यादिकांनी त्यांची राजधानी सुशोभित नसून जंगली लोकांना शोभेल अशी आहे.”

२.२ कोसलराजकुल

२) दुसरे देवपुत्र म्हणाले, “हे कोसलकुल सेना, वाहन व धन यांनी संपन्न असल्यामुळे बोधिसत्त्वाला प्रतिरूप आहे.” त्यावर दुसरे म्हणाले, “ते मातंगच्युतीपासून उत्पन्न झाले असून मातृपितृशुद्ध नाही, आणि हीन धर्मावर श्रद्धा ठेवणारे आहे. म्हणून ते योग्य नव्हे.”

२.३ वंशराजकुल

३) दुसरे म्हणाले, “हे वंशराजकुल भरभराटीला आलेले व सुक्षेम असून त्याच्या देशात संपन्नता असल्याकारणाने ते बोधिसत्त्वाला योग्य आहे.” त्यावर दुसरे म्हणाले, “ते प्राकृत आणि चंड आहे. परपुरुषांपासून त्या कुलातील पुष्कळ राजांचा जन्म झाला आहे. आणि त्या कुलातील सध्याचा राजा उच्छेदवादी (नास्तिक) असल्याकारणाने ते बोधिसत्त्वाला योग्य नाही.”

२.४ वैशालीतील राजे

४) दुसरे देवपुत्र म्हणाले, “ही वैशाली महानगरी भरभराटीला चढलेली, क्षेम, सुभिक्ष, रमणीय, मनुष्यांनी गजबजलेली घरे आणि वाडे यांनी अलंकृत, पुष्पवाटिका आणि उद्याने यांनी प्रफुल्लित अशी असल्यामुळे जणू देवांच्या राजधानीचे अनुकरण करीत आहे. म्हणून बोधिसत्त्वाला जन्मण्यास ती योग्य दिसते.” त्यावर दुसरे म्हणाले, “तेथल्या राजांचे परस्परांविषयी न्याय्य वर्तन नाही. ते धर्माचरणी नव्हत आणि उत्तम,  मध्यम, वृद्ध व ज्येष्ठ इत्यादिकांविषयी ते आदर बाळगीत नाहीत. प्रत्येक जण आपल्यालाच राजा समजतो. कोणी कोणाचा शिष्य होऊ इच्छित नाही. कोणी कोणाची चाड ठेवीत नाही. म्हणून ती नगरी बोधिसत्त्वाला अयोग्य आहे.”

२.५ अवंतिराजकुल

५) दुसरे देवपुत्र म्हणाले, “हे प्रद्योताचे कुल अत्यंत बलाढ्य, महावाहनसंपन्न व शत्रुसेनेवर विजय मिळवणारे असल्याकारणाने बोधिसत्त्वाला योग्य आहे.” त्यावर दुसरे म्हणाले, “त्या कुलातील राजे चंड, क्रूर, कठोर बोलणारे आणि धाडशी आहेत. कर्मावर त्यांचा विश्वास नाही. म्हणून ते कुल बोधिसत्त्वाला शोभण्यासारखे नाही.”

२.६ मथुराराजकुल

६) दुसरे म्हणाले, “ही मथुरा नगरी समृद्ध, क्षेम, सुभिक्ष आणि मनुष्यांनी गजबजलेली आहे. कंसकुलातील शूरसेनाचा राजा सुबाहु त्याची ही राजधानी आहे. ही बोधिसत्त्वाला योग्य होय.” त्यावर दुसरे म्हणाले, “हा राजा मिथ्यादृष्टि कुलात जन्मलेला असून दस्युराजा असल्यामुळे ही नगरी देखील बोधिसत्त्वाला योग्य नाही.”

२.७ कुरुराजकुल

७) दुसरे म्हणाले, “या हस्तिनापुरामध्ये पांडव कुलातील शूर आणि सुस्वरूप राजा राज्य करीत आहे. परसैन्याचा पराभव करणारे ते कुल असल्यामुळे बोधिसत्त्वाला योग्य आहे.” त्यावर दुसरे म्हणाले, “पांडव कुलांतील राजांनी आपला वंश व्याकुळ करून टाकला आहे. युधिष्ठिराला धर्माचा, भीमसेनाला वायूचा, अर्जुनाला इन्द्राचा आणि नकुल-सहदेवांना अश्विनांचे पुत्र म्हणतात. यास्तव हे देखील कुल बोधिसत्त्वाला योग्य नाही.”

२.८ मैथिलीराजकुल

८) दुसरे म्हणाले, “मैथिल राजा सुमित्र याची राजधानी ही मिथिला नगरी अत्यंत रमणीय असून हत्ती, घोडे, पायदळ यांनी तो राजा संपन्न आहे. सोने, मोती आणि जवाहिर त्याजपाशी आहेत. सामन्त राजांची सैन्ये त्याच्या पराक्रमाला घाबरतात. तो मित्रवान आणि धर्मवत्सल आहे. म्हणून हे कुल बोधिसत्त्वाला योग्य होय.” त्यावर दुसरे म्हणाले, “असा हा राजा आहे खरा,परंतु त्याला पुष्कळ संतति असून तो अतिवृद्ध असल्याकारणाने पुत्रोत्पादन करण्याला समर्थ नाही. म्हणून ते देखील कुल बोधिसत्त्वाला अयोग्य आहे.”

“याप्रमाणे त्या देवपुत्रांनी जंबुद्वीपातील सोळा राज्यात (षोडश जानपदेषु) जी लहान मोठी राजघराणी होती ती सर्व पाहिली, पण ती त्यांना सदोष दिसली.”१४

3 . आठच कुलांची माहिती

सोळा जनपदांपैकी येथे आठांच्याच राजकुलांचे वर्णन आहे. त्यापैकी सुमित्राचे कुल त्याच्या मागोमागच नष्ट होऊन विदेहांचा अंतर्भाव वज्जींच्या राज्यात झाला असावा. बाकी राहिलेल्या सातात पांडवांच्या परंपरेत कोणता राजा राज्य करीत होता, हे सांगितले नाही आणि त्याची माहिती इतर बौद्ध ग्रंथातही सापडत नाही. कुरुदेशात कौरव्य नावाचा राजा राज्य करीत होता असा उल्लेख रट्ठपाल सुत्तात आहे. तो पांडवकुलातील होता याजबद्दल कोठे पुरावा नाही. राहिलेल्या सहा राजकुलांची जी माहिती येथे दिली आहे, तशीच कमीजास्त प्रमाणात त्रिपिटक ग्रंथात सापडते.

4 . शाक्यकुल

बौद्ध ग्रंथांत शाक्यकुलाची माहिती विस्तारपूर्वक दिली आहे. असे असता वरील सोळा जनपदात शाक्यांचा नामनिर्देश मुळीच नाही. हे कसे? याला उत्तर हे की, ही यादी तयार होण्यापूर्वीच शाक्यांचे स्वातंत्र्य नष्ट होऊन त्या देशाचा समावेश कोसलांच्या राज्यात झाला, आणि म्हणूनच या यादीत त्यांचा निर्देश सापडत नाही.

बोधिसत्त्व गृहत्याग करून राजगृहाला आला असता बिंबिसार राजाने त्याची भेट घेऊन तू कोण आहेस असा प्रश्न विचारला. तेव्हा तो म्हणाला-

उजुं जानपदो राजा हिमवन्तस्स पस्सतो |

धनविरेयेन सम्पन्नो कोसलेसु निकेतिनो ||

आदिच्चा नाम गोत्तेन, साकिया नाम जातिया |

तम्हा कुला पब्बजितोम्हि राज न कामे अभिपत्थयं ||

(सुत्तनिपात, पब्बज्जासुत्त)

‘हे राजा, येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशी कोसल देशांपैकी एक जानपद (प्रान्त) आहे. त्याचे गोत्र आदित्य व जाति शाक्य. त्या कुलातून, हे राजा, मी कामोपभोगांची इच्छा सोडून परिव्राजक झालो आहे.’

ह्या गाथात ‘कोसलेसु निकेतिनो’ हे शब्द महत्त्वाचे आहेत. कोसल देशात ज्यांचे घर आहे, म्हणजे जे कोसल देशात गणले जातात. यावरून शाक्यांचे स्वातंत्र्य कधीच नष्ट झाले होते असे सहज दिसून येते.

शाक्य कोसलराजाला कर देत असत आणि अन्तर्गत व्यवस्था आपण पाहत. महानामाच्या दासीकन्येशी पसेनदीचा विवाह झाल्याची हकीकत वर दिलीच आहे. याविषयी प्रो. ऱ्हिस डेव्हिड्स शंका प्रदर्शित करतात. कोसल राजाचा सर्वाधिकार जर शाक्यांना मान्य होता, तर आपली मुलगी त्याला देण्याला शाक्यांना हरकत का वाटावी, असे त्यांचे म्हणणे दिसते.१५ परंतु हिंदुस्थानातील जातिभेद किती तीव्र होता हे त्यांना माहीत नसावे. उदेपूरच्या प्रतापसिंहाला अकबराचे सार्वभौमत्व मान्य असेल तरी आपली मुलगी अकबराला देण्याला तो तयार नव्हता. कोसलकुल ‘मातंगच्युत्युत्पन्न’ असे ललितविस्तरात म्हटले आहे. त्यावरून हे कुल मातंगांच्या (मांगांच्या) जातीतून उदयाला आले असावे असे वाटते. अशा घराण्याशी शाक्यांनी शरीरसंबंध करणे नाकारले असल्यास त्यात आश्चर्य मानण्याजोगे काही नाही.

5 . गणराज्यांची व्यवस्था

ही राज्ये एका काळी गणसत्ताक किंवा महाजनसत्ताक होती, असे वर म्हटलेच आहे. वज्जी, मल्ल किंवा शाक्य यांच्या संबंधाने जी माहिती त्रिपिटक ग्रंथात सापडते, तिजवरून असे दिसून येते की, या राज्यांतील गावोगावच्या पुढा-यांना राजा म्हणत. हे सर्व राजे एकत्र जमून आपल्यापैकी एखाद्याला अध्यक्ष निवडीत. त्याची मुदत तहहयात किंवा काही कालपर्यंतच असे, यासंबंधी काहीच माहिती मिळत नाही. वज्जींमध्ये कोणी तरी महाराजा होता असेही दिसून येत नाही. वज्जींच्या सेनापतीचा उल्लेख आहे, पण महाराजाचा नाही; कदाचित तेवढ्या वेळेपुरता अध्यक्ष निवडून ते काम चालवीत असतील. या गणराज्यात न्यायदानासंबंधाने आणि राज्यव्यवस्था कशी ठेवावी यासंबंधाने काही कायदे ठरलेले असत आणि त्यांना अनुसरूनच हे गणराजे आपली राज्ये चालवीत.

6 . गणराज्यांच्या नाशाची कारणे

सोळा जनपदांच्या गणराजांचा नाश होऊन बहुतेक राज्यात महाराजसत्ता स्थापन झाली होती. आणि मल्लांची लहानशी दोन व वज्जींचे बलाढ्य एक मिळून जी तीन गणसत्ताक स्वतंत्र राज्ये बाकी राहिली, ती पण एकसत्ताक राज्यपद्धतीच्या आहारी जाण्याच्या बेतात होती. याची कारणे काय झाली असावी? माझ्या मते गणराजांचा ऐषआराम आणि ब्राह्मणांचे राजकारणात वर्चस्व, ही या क्रांतीची प्रमुख कारणे असली पाहिजेत.

गणराजांना कोणी निवडून देत नसे. बापाचा मुलगा त्याच्या मागोमाग राजा होत असे. वंशपरंपरेने हा अधिकार भोगावयास मिळाल्यामुळे हे चैनी आणि बेजबाबदार होणे साहजिक होते. वर जे ललितविस्तरातून वज्जींचे वर्णन दिले आहे, त्याचा विचार केला असता, ते गणराजे जरी प्रबळ होते, तरी परस्परांविषयी त्यांचा आदर नसून प्रत्येक जण आपणालाच राजा समजत होता असे दिसते. त्यामुळे बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर अजातशत्रूला वज्जींच्या गणराजांत फूट पाडून ते राज्य अनायासे काबीज करता आले.

समान्य जनतेचा या गणराज्यांना पाठिंबा असणे शक्य नव्हते. जो तो राजा आपल्या परीने लोकांवर जुलूम करू लागला, तर त्याला आळा घालण्याचे सामर्थ्य लोकांत किंवा इतर राजांत नव्हते. त्यापेक्षा हे सर्व राजे नष्ट होऊन एकच सर्वाधिकारी राजा असणे सामान्य माणसाच्या दृष्टीने अधिक सोईवार होते. महाराजा आपल्या        अधिका-यांवर जोरजुलूम करी, राजधानीच्या आजूबाजूला एखादी सुस्वरूप तरुणी सापडली, तर तिला आपल्या झनानखान्यात घाली. असले काही थोडेबहुत जुलुमाचे प्रकार त्याच्याकडून घडले, तरी ते गणराजाइतके असणे शक्यच नव्हते. गणराजे गावोगावी असल्याकारणाने त्यांचा जुलूम सुरू झाला, तर त्यातून बहुजनांपैकी कोणीही सुटू शकत नव्हता. कराच्या आणि बेगारीच्या रूपाने हे राजे सर्वांनाच त्रास देत असावेत. एकसत्ताक महाराजाला अशा रीतीने शेतक-यांना सतावण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. त्यांच्या ऐषआरामापुरता पैसा त्याला नियमित कराच्या रूपाने सहज वसूल करता येत होता. तेव्हा सामान्य लोकांना, ‘दगडापेक्षा वीट मऊ,’ या नात्याने एकसत्ताक राज्यपद्धतीच बरी वाटली असल्यास नवल नाही.

एकसत्ताक राज्यात पुरोहिताचे काम वंशपरंपरेने किंवा ब्राह्मणसमुदायाच्या संमतीने ब्राह्मणालाच मिळत असे. मुख्य प्रधानादिकांची कामे देखील ब्राह्मणांनाच मिळत. अर्थात् ब्राह्मण एकसत्ताक राज्यपद्धतीचे मोठे भोक्ते झाले. ब्राह्मणी ग्रंथात गणसत्ताक राजांचा नामनिर्देश देखील नाही, ही गोष्ट विचार करण्याजोगी आहे. यावरून असे दिसते की, ब्राह्मणांना गणसत्ताक राज्यपद्धति मुळीच पसंत नव्हती. शाक्यांसारखे गणराजे ब्राह्मणांना मान देत नाहीत, असा अंबष्ठ ब्राह्मणाने त्यांच्यावर आरोप केल्याचा अंबट्ठसुत्तांत उल्लेख आहे.१६ गणराज्यात यज्ञयागांना मुळीच उत्तेजन मिळत नव्हते, आणि एकसत्ताक राज्यांत तर महाराजे यज्ञयाग चालविण्यासाठी ब्राह्मणांना वंशपरंपरेने इनामे देत. एका बिंबिसाराच्या राज्यात सोणदंड, कुटदंत वगैरे ब्राह्मणांना, त्याचप्रमाणे कोसल देशात पोक्खरसाति (पौष्करसादि), तारुक्ख (तारुक्ष) वगैरे ब्राह्मणांना मोठमोठाली इनामे होती, असे सुत्तपिटकातील त्यांच्या वर्णनावरून दिसून येते. तेव्हा ‘परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ’ या न्यायाने ब्राह्मणजातीचे आणि एकतंत्री राज्यपद्धतीचे परस्परांच्या साहाय्याने वर्चस्व वृद्धिंगत होणे साहजिक झाले.

बुद्धसमकाली ब्राह्मणांपेक्षा श्रमणांचे (परिव्राजकांचे) महत्त्व अधिकाधिक वाढत चालले होते, हे पुढील प्रकरणावरून स्पष्ट दिसून येईल. या श्रमणांना गणसत्ताक राज्याविषयी आदर होता. कारण, अशा राज्यातून यज्ञयागांना कोणी विचारीत नसे. तथापि अध्यात्मचिंतनात गुंतून गेल्यामुळे राजकीय बाबतीत विचार करून या गणसत्ताक राज्यांची सुधारणा कशी करता येईल, ह्याचा मार्ग शोधून काढण्याला त्यांना अवकाशच नव्हता. जे काही चालले आहे ते अपरिहार्य असावे, अशी त्यांची समजूत झाली होती असे दिसते.

गणराजांसंबंधाने बुद्धाचा आदर स्पष्ट दिसतो. वज्जींना त्याने उन्नतीचे सात नियम घालून दिल्याचा उल्लेख वर आलाच आहे. परंतु त्याने देखील या जुन्या राज्यघटनेतून नवीन सुव्यवस्थित घटना कशी तयार करता येईल यासंबंधाने आपले विचार प्रकट केल्याचे दिसून येत नाही. गणराजांपैकी एखाद्या राजाने जर जुलूम केला, तर इतर राजांनी एकवट होऊन त्याला आळा घालावा? किंवा या सर्वच गणराजांना लोकांनी वेळोवेळी निवडून देऊन त्यांच्यावर आपला दाब ठेवावा? इत्यादि विचार बौद्ध वाड्‍ःमयात कोठेच सापडत नाहीत.

बुद्धाच्या अनुयायांनी तर गणसत्ताक राज्याची कल्पना निखालस सोडून दिली. दीघनिकायात नमुनेदार राज्यपद्धति दर्शविणारी चक्कवत्तिसुत्त आणि महासुदस्सनसुत्त अशी दोन सुत्ते आहेत. त्यात चक्रवर्ती राजाचे महत्त्व अतिशयोक्तिपूर्वक वर्णिले आहे. ब्राह्मणांच्या सम्राटामध्ये आणि या चक्रवर्तीमध्ये फरक एवढाच की, पहिला सामान्य जनतेची काळजी न करता पुष्कळ यज्ञयाग करून ब्राह्मणांची तेवढी काळजी घेतो, आणि दुसरा सर्व जनतेला न्यायाने वागवून सुखी करण्यात दक्ष असतो. राज्यात शांतता स्थापित झाल्याबरोबर तो लोकांना उपदेश करतो की,

‘पाणो न हन्तब्बो, अदिन्नं नातातब्बं, कामेसु मिच्छा न चरितब्बा, मुसा न भासितब्बा, मज्जं न पातब्बं|

‘प्राण्याची हत्या करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये, दारू पिऊ नये.’

म्हणजे बौद्ध गृहस्थांचे जे पाच शीलनियम आहेत, त्यांचे पालन करण्यास हे चक्रवर्ती राजे उपदेश करीत असत. एवंच ब्राह्मणांच्या दृष्टीने काय किंवा बुद्धाच्या अनुयायांच्या दृष्टीने काय, एकसत्ताक राज्यपद्धतीच चांगली ठरली. तत्त्वाचा फरक नसून तपशिलाचा तेवढा फरक राहिला.

परंतु खुद्द गौतम बोधिसत्त्वावर गणसत्ताक राज्यपद्धतीचा चांगला परिणाम झाला होता. संघाची रचना बुद्धाने गणसत्ताक राज्यांच्या राज्यपद्धतीवरूनच केली असली पाहिजे. यास्तव या गणसत्ताक राज्यांची मिळणारी अल्पस्वल्प माहिती विशेष महत्त्वाची वाटते.

7 . तळ टिपा

१. दीघनिकाय ‘सोणदण्डसुत्त’ पाहा.

२.  माज्झिमानिकायातील गोपकमोग्गलानसुत्ताची  अट्ठकथा पाहा.

३.  याचे खरे नाव सुदत्त होते. अनाथांना तो जेवण (पिण्ड) देत असे, म्हणून त्याला अनाथपिंडिक  म्हणत.

४. या संयुत्ताच्या पहिल्याच सुत्तात पसेनदि बुद्धाचा उपासक झाल्याची कथा आहे; पण नवव्या सुत्तात पसेनदीच्या महायज्ञाचे वर्णन येते. तेव्हा पसेनदि राजा खरा बुद्धोपासक झाला होता, असे म्हणता येत नाही.

५. सिविजातक (नं.४९९) पाहा.

६. ‘बौद्धसंघाचा परिचय’, पृ. २३७-२४५ पाहा.

७. महावग्ग,भाग ८ पाहा.

८. महावग्ग,भाग ८; ‘बौद्धसंघाचा परिचय’, पृ १६५-१६८ पाहा.

९.महावग्ग,भाग ८ पाहा; ‘बौद्धसंघाचा परिचय’, पृ. ३०-३१.

१०. Buddhist India, p.28.

११. उदाहरणार्थ, तण्डुलनालिजातक पाहा.

१२. भूरिदत्तजातक, श्लोक ९०३.

१३. ‘बौद्धसंघाचा परिचय’, पृ. २०३ पाहा.

१४. हे मूळ उताऱ्यांचे संक्षिप्त रुपांतर आहे.

१५. Buddhist India p.11-12.

१६. चण्डा भो गोतम सक्यजाति... इब्भा सन्ता इब्भा समाना न ब्राह्मणे रुंगकरोन्ति, न ब्राह्मणे मानेन्ति, इत्यादि|| (दीघनिकाय, अम्बट्ठसुत्त).

संदर्भ