सारांश
या प्रकरणात बुद्ध काळातील धार्मिक परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. आर्य आणि दासांच्या संघर्षामुळे सप्तसिंधूच्या प्रदेशात यज्ञयागाची संस्कृति अस्तित्त्वात आली. असे असले तरी समाजातील अनेक लोक अहिंसा हे तत्त्व मानीत. या तपस्वींमध्ये जातिभेदाला थारा नव्हता. त्यामुळे कोसंबी रामायणात आलेली शंबूकाची कथा काल्पनिक असल्याचे सांगतात. त्याकाळी अनेक श्रमणसंघ होते. संघातील श्रमण अनेक प्रकारच्या तपश्चर्या करीत. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी आदर होता. असे असले तरी राजे लोक युद्धात जय मिळावा म्हणून यज्ञयाग करीत असत. तर सामान्य लोक कर्मकांडात बुडालेले होते. गुप्तांच्या काळापासून जातिभेद बळावला होता. बालविवाहाची प्रथा देखील अस्तित्त्वात आलेली होती.
पारिभाषिक शब्द
यज्ञसंस्कृती , जातिभेद , श्रमण , परिव्राजक , तपस्विता , आहारव्रत , साध्वी संघ , बालविवाह , तपश्चर्या , श्रमणसंघ
1 . भ्रामक विचार
आजकालच्या पुष्कळ विद्वानांची अशी समजूत दिसते की, प्रथमतः ब्राह्मणांचा वेदांवर सर्व भार होता, नंतर त्यांनी यज्ञयागाचे स्तोम माजवले, त्यातून उपनिषदाचे तत्त्वज्ञान निघाले आणि मग बुद्धाने त्या तत्त्वज्ञानात सुधारणा करून आपला संप्रदाय स्थापला. ही विचारसरणी अत्यंत भ्रममूलक आहे. ती सोडून दिल्याशिवाय बुद्धचरित्राचा यथातथ्य बोध होणे शक्य नाही. म्हणून या प्रकरणात बुद्धसमकाली धार्मिक परिस्थिति कशा प्रकारची होती याचे संक्षिप्त वर्णन करणे योग्य वाटते.
2 . यज्ञसंस्कृतीचा प्रवाह
पहिल्या प्रकरणात सांगितले आहे की, आर्यांच्या आणि दासांच्या संघर्षामुळे सप्तसिंधूच्या प्रदेशात यज्ञयागाची संस्कृति उद्भवली, आणि परीक्षित् आणि त्याचा मुलगा जनमेयज यांच्या कारकीर्दीत या वैदिक संस्कृतीने कुरू देशात आपले कायमचे ठाणे दिले. परंतु त्या संस्कृतीचा प्रवाह कुरूंच्या पलीकडे पूर्वेला जोराने वाहत गेला नाही. त्या प्रवाहाची गति कुरू देशातच कुंठित झाली. याचे मुख्य कारण पूर्वेकडील देशात ऋषिमुनींच्या अहिंसेला आणि तपश्चर्येला महत्त्व देणारे लोक पुष्कळ होते.
3 . तपस्वी ऋषिमुनि
जातकअट्ठकथेत तपस्वी ऋषिमुनींच्या अनेक गोष्टी आल्या आहेत. त्यावरून असे दिसते की, हे लोक जंगलात जाऊन तपश्चर्या करीत. त्यांच्या तपश्चर्येचा मुख्य विषय म्हटला म्हणजे कोणत्याही प्राण्याला दुखवावयाचे नाही आणि शक्य तेवढे देहदंडन करावयाचे. हे लोक एकाकी किंवा संघ बनवून राहत असत. एकेका संघात पाचशे पाचशे तपस्वी परिव्राजक असल्याचा उल्लेख अनेक जातककथात सापडतो. जंगलातील कंद, फळे वगैरे पदार्थांवर ते आपला निर्वाह करीत, आणि प्रसंगोपात्त खारट अणि आंबट पदार्थ (लोण-अम्बिल-सेवनत्थं) खाण्यासाठी लोकवस्तीच्या ठिकाणी येत. त्यांच्याविषयी लोकांना फार आदर वाटत असे आणि त्यांना लागणा-या पदार्थांची ते वाण पडू देत नसत. या ऋषिमुनींचे लोकांवर फार वजन होते; पण ते लोकांना धर्मोपदेश करीत नसत. त्यांच्या उदाहरणाने लोक अहिंसेला मानीत, एवढेच काय ते.
4 . ऋषिमुनींचे भोळेपण
हे तपस्वी लोक व्यवहारानभिज्ञ असल्याकारणाने कधी कधी प्रपंचात फसत. ऋष्यशृंगाला बायकांनी फसवून आणल्याचे आणि पराशर सत्यवतीशी रत झाल्याचे वर्णन पुराणात आहेच. याशिवाय जातकअट्ठकथेत देखील ऋषिमुनि भलत्याच मार्गाला लागल्याच्या अनेक गोष्टी आढळून येतात. त्यापैकी येथे एक देतो:
प्राचीन काळी वाराणसी नगरीत ब्रह्मदत्त राजा राज्य करीत असता बोधिसत्त्व काशी राष्ट्रात औदिच्य ब्राह्मणकुलात जन्मला. वयात आल्यावर त्याने प्रव्रज्या घेतली; आणि तो पाचशे शिष्यांसहवर्तमान हिमालयाच्या पायथ्यापाशी राहू लागला. पावसाळा जवळ आला, तेव्हा त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “आचार्य, आपण लोकवस्तीत जाऊन खारट आणि आंबट पदार्थ सेवन करू या.” आचार्य म्हणाला, “आयुष्मन्तांनो, मी इथेच राहतो. तुम्ही जाऊन शरीराला अनुकूल पदार्थ खाऊन या.”
ते तपस्वी वाराणसीला आले. राजाने त्यांची कीर्ति ऐकून त्यांना आपल्या उद्यानात चातुर्मासात राहण्याची विनंती केली; व त्यांच्या जेवण्याखाण्याची व्यवस्था आपल्याच राजवाड्यात करविली. एक दिवस शहरात सुरापानमहोत्सव चालला होता. परिव्राजकांना जंगलात दारू मिळणे कठीण म्हणून राजाने या तपस्व्यांना उत्तम दारू देवविली. तपस्वी दारू पिऊन नाचू लागले, गाऊ लागले, आणि काही अव्यवस्थितपणे खाली पडले. जेव्हा ते पूर्वस्थितीवर आले, तेव्हा त्यांना फार पश्चात्ताप झाला. त्याच दिवशी राजाचे उद्यान सोडून ते हिमालयाकडे वळले; आणि क्रमश: आपल्या आश्रमात येऊन आचार्याला नमस्कार करून एका बाजूला बसले. आचार्य त्यांना म्हणाला, “तुम्हाला लोकवस्तीत भिक्षेचा त्रास झाला नाही ना? आणि तुम्ही समग्रभावाने राहिलात ना?” ते म्हणाले, “आचार्य! आम्ही सुखाने राहिलो; मात्र ज्या पदार्थाचे पान करू नये त्याचे पान केले.
अपायिम्ह अनच्चिम्ह अगायिम्ह रुदिम्ह च |
विसञ्ञकरणिं पित्वा दिट्ठा नाहुम्ह वानरा ||
आम्ही प्यालो, नाचलो, गाऊ लागलो आणि रडलो. उन्मत्त करणारी (दारू) पिऊन आम्ही वानर बनलो नाही, एवढेच काय ते!”१
5 . ऋषिमुनीत जातिभेद नव्हता
तपस्वी ऋषिमुनीत जातिभेदाला मुळीच थारा नव्हता. कोणत्याही जातीचा मनुष्य तपस्वी झाला, तरी त्याचा सर्व समाजात बहुमान होत असे. उदाहरणादाखल येथे जातकात आलेली मातंग ऋषीची गोष्ट२ संक्षेपाने देत आहे:
मातंग वाराणसी नगरच्या बाहेर चांडालकुलात जन्मला. तो वयात आल्यावर एके दिवशी त्याची व वाराणसी श्रेष्ठीच्या दृष्टमंगलिका नावाच्या तरुण कन्येची रस्त्यात गाठ पडली. तेव्हा मातंग एका बाजूला उभा राहिला. आपल्या परिवारातील नोकरांना दृष्टमंगलिकेने विचारले की, हा बाजूला उभा राहिलेला मनुष्य कोण? तो चांडाल आहे, असे तिच्या नोकराने सांगितल्याबरोबर अपशकुन झाला असे समजून ती तेथूनच मागे फिरली.
दृष्टमंगलिका महिन्या दोन महिन्यांनी एकदा उद्यानात जाऊन आपल्या बरोबरच्या व तेथे जमणा-या इतर लोकांना पैसे वाटत असे. ती माघारी घरी गेल्यामुळे त्या लोकांची निराशा झाली. त्यांनी मातंगाला झोडपून निश्चेष्ट करून रस्त्यात पाडले. मातंग काही वेळाने शुद्धीवर आला आणि दृष्टमंगलिकेच्या बापाच्या दरवाजात पायरीवर आडवा पडून राहिला. “हा त्रागा का करतोस?” असे जेव्हा त्याला विचारले तेव्हा तो म्हणाला, “दृष्टमंगलिकेला घेतल्यावाचून मी येथून हलणार नाही.” सात दिवस तसाच पडून राहिल्यावर श्रेष्ठीने निरुपाय होऊन आपल्या मुलीला त्याच्या स्वाधीन केले. तिला घेऊन तो चांडालग्रामात गेला.
दृष्टमंगलिका जरी त्याच्याशी पत्नीच्या नात्याने वागण्यास तयार होती, तथापि त्याने तिला तशा रीतीने न वागवता अरण्यात जाऊन घोर तपश्चर्या आरंभिली. सात दिवसांनी मातंग परत आला आणि दृष्टमंगलिकेला म्हणाला, “तू जाहीर कर की, माझा पति मातंग नसून महाब्रह्मा आहे; व तो पौर्णिमेच्या दिवशी चन्द्रमंडळातून खाली उतरणार आहे.” त्याप्रमाणे दृष्टमंगलिकेने हे वर्तमान सर्वांना सांगितले. पौर्णिमेच्या दिवशी रात्री मोठा जनसमुदाय चांडालग्रामात तिच्या घरासमोर जमला. तेव्हा मातंग ऋषि
चन्द्रमंडळातून खाली उतरला; आणि आपल्या झोपडीत शिरून त्याने दृष्टमंगलिकेच्या नाभीला आपल्या अंगठ्याने स्पर्श केला.
तेथे जमलेल्या ब्रह्मभक्तांनी हा अद्भुत चमत्कार पाहून दृष्टमंगलिकेला उचलून वाराणसी नगरीत नेले आणि नगरीच्या मध्यभागी एक मोठा मंडप उभारून तिची पूजा चालविली. लोक तिला नवस करू लागले. नऊ महिन्यानंतर त्याच मंडपात तिला मुलगा झाला. मंडपात जन्मल्यामुळे त्याचे नाव मांडव्य ठेवण्यात आले. लोकांनी त्या मंडपाजवळच एक मोठा प्रासाद बांधला, आणि त्या मातापुत्रांना त्या प्रासादात ठेवले. त्यांची पूजा चालू होती.
लहानपणापासून मांडव्यकुमाराला शिकविण्यासाठी मोठमोठाले वैदिक पंडित स्वेच्छेने आले. तो तीनही वेदांत पारंगत झाला. आणि ब्राह्मणांना पुष्कळ मदत करू लागला. एके दिवशी मातंग ऋषि त्याच्या दारात भिक्षेसाठी उभा राहिला असता मांडव्य त्याला म्हणाला, “चिंध्या पांघरून पिशाचासारखा येथे उभा राहणारा तू कोण आहेस?”
मातंग- तुझ्या घरी अन्नपान पुष्कळ आहे. यास्तव काही खरकटे मला मिळेल, या हेतूने मी येथे उभा आहे.
मांडव्य- पण हे अन्न ब्राह्मणांसाठी आहे. तुझ्यासारख्या हलकटाला देण्यासाठी नाही.
दोघांचाही बराच संवाद झाल्यावर मांडव्याने मातंगाला आपल्या तीन द्वारपालांकडून धक्के मारून घालवून दिले. पण त्यामुळे त्याची बोबडी वळली, डोळे पांढरे फटफटीत झाले आणि तो निश्चेष्टित होऊन पडला. त्याच्या बरोबरच्या ब्राह्मणांची देखील काही कमी प्रमाणात हीच स्थिति झाली. तोंडे वेडीवाकडी करून ते गडबडा लोळू लागले. हा प्रकार पाहून दृष्टमंगलिका घाबरून गेली. एका दरिद्री तपस्व्याच्या प्रभावाने आपल्या मुलाची व इतर ब्राह्मणांची ही स्थिति झाल्याचे जेव्हा तिला समजले, तेव्हा त्या तपस्व्याचा शोध करण्यासाठी ती निघाली. मातंग ऋषि एका ठिकाणी बसून भिक्षाटनात मिळालेली पेज खात होता. दृष्टमंगलिकेने त्याला ओळखले आणि आपल्या मुलाला क्षमा करण्याची विनंती केली. आपल्या उष्ट्या पेजेचा काही भाग त्याने तिला दिला आणि सांगितले की, ही पेज मुलाच्या आणि इतर ब्राह्मणांच्या तोंडात घाल, म्हणजे ते बरे होतील. त्याप्रमाणे दृष्टमंगलिकेने केल्यावर ते सर्व ब्राह्मण पूर्वस्थितीवर आले. पण चांडाळाच्या उष्ट्याने ब्राह्मण बरे झाल्याचे वर्तमान सर्व वाराणसीत पसरले. तेव्हा लोकांना लाजून ते मेज्झ (मेध्य) राष्ट्रात गेले. मांडव्य मात्र तेथेच राहिला.
मातंग ऋषि काही काळाने प्रवास करीत मेज्झ राष्ट्रात जाऊन पोचला. हे वर्तमान मांडव्याबरोबरच्या ब्राह्मणांना समजल्याबरोबर त्यांनी मेज्झराजाची अशी समजूत करून दिली की, हा नवीन आलेला भिकारी मायावी आहे आणि तो सर्व राष्ट्राचा नाश करील. हे ऐकल्याबरोबर राजाने आपले शिपाई मातंगाच्या शोधासाठी पाठविले. त्यांनी त्याला एका भिंतीजवळ बसून भिक्षेत मिळालेले अन्न खात असताना गाठले आणि तेथेच ठार केले. त्यामुळे देवता क्षोभल्या आणि त्यांनी ते राष्ट्र ओस पाडले.
मातंगाच्या हत्येमुळे मेज्झ राष्ट्र ओस पडल्याचा उल्लेख अनेक जातकात सापडतो. या दंतकथेत कितपत तथ्य आहे हे सांगता येत नाही. तथापि मातंग ऋषि चांडाळ होता व त्याची पूजा ब्राह्मण आणि क्षत्रिय देखील करीत होते, हे वसलसुत्तांतील खालील गाथांवरून स्पष्ट होते.
तदमिना पि जानाथ यथा मेदं निदस्सनं |
चंडालपुत्तो सोपाको मातंगो इति विस्सुतो ||१||
सो यसं परमं पत्तो मातंगो य सुदुल्लभं |
आगच्छुं तस्सुपट्ठानं खत्तिया ब्राह्मणा बहू ||२||
देवयानं अभिरुय्ह विरजं सो महापथं |
कामरागं विराजेत्वा ब्रह्मलोकूपगो अहु ||
न न जाति निवारेसि ब्रह्मलोकूपपत्तिया ||३||
- ह्याला मी एक उदाहरण देतो. कुत्र्याचे मास खाणा-या चांडाळाचा एक पुत्र मातंग या नावाने प्रसिद्ध होता.
- त्या मातंगाला अत्यंत श्रेष्ठ आणि दुर्लभ यश मिळाले. त्याच्या सेवेस पुष्कळ क्षत्रिय आणि ब्राह्मण हजर असत.
- विषयवासनेचा क्षय करणाच्या थोर मार्गाचा व देवयानाचा (समाधीचा) अवलंब करून तो ब्रह्मलोकाला गेला. ब्रह्मलोकी उत्पन्न होण्यास त्याचा जन्म त्याला आड आला नाही.
6 . शंबूकाची कथा काल्पनिक
शंबूक नावाचा शूद्र अरण्यात तपश्चर्था करीत होता. त्यामुळे एका ब्राह्मणाचा मुलगा मरण पावला. रामाला ही गोष्ट समजल्यावर त्याने अरण्यात जाऊन शंबूकाचा शिरच्छेद केला आणि ब्राह्मणाच्या मुलाला जिवंत केले. ही कथा रामायणात अत्यंत खुलवून वर्णिली आहे. काही सौम्य स्वरूप देऊन भवभूतीने हा प्रसंग उत्तररामचरितात देखील दाखल केला आहे. पण असा प्रकार बुद्धाच्या पूर्वी किंवा बौद्धधर्म हिंदुस्थानात असेपर्यंत घडून आल्याचा कोठेच पुरावा सापडत नाही. राजाने असे वर्तन केले पाहिजे, एवढेच दाखविण्याचा ही कथा रचणा-याचा हेतु असावा.
7 . श्रमण
जंगलात राहणा-या या ऋषिमुनींना तापस किंवा परिव्राजक म्हणत असत; ते तपश्चर्या कशी करीत याची विशेष माहिती सापडत नाही. याच तपस्वी लोकांच्या संघामधून लोकवस्तीत फिरून लोकांना उपदेश करणारे निरनिराळे श्रमणसंघ निघाले. श्रमण हा शब्द श्रम् धातूपासून निघाला आहे. त्याचा अर्थ कष्ट करणारा असा होतो. आज जसे शारीरिक कष्ट करणा-या मजुरांचे महत्त्व वाढत चालले आहे, तसे ते बुद्धसमकाली श्रमणांचे वाढत चालले होते. पण मजुरांमध्ये आणि यांच्यामध्ये फरक असा की, मजूर समाजाला उपयोगी पडणा-या वस्तू उत्पादन करण्यासाठी कष्ट करतात आणि हे श्रमण लोक समाजात आध्यात्मिक जागृति पैदा करण्यासाठी कष्ट करीत. कदाचित शरीराला तपश्चर्येच्या योगाने हे लोक श्रम देत असत, म्हणून यांना श्रमण ही संज्ञा लावण्यात येत असावी पण जंगलात राहणारे ऋषिमुनि देखील तपश्चर्येने शरीर कष्टवीत असतच; तरी त्यांना श्रमण म्हणत नसत. तेव्हा लोकांच्या हितासाठी स्वतः श्रम करणारे म्हणूनच यांना श्रमण म्हणत, हे अधिक संभवनीय दिसते.
8 . त्रेसष्ट श्रमणपंथ
बुद्धसमकाली असे लहानमोठे त्रेसष्ट श्रमणसंघ अस्तित्वात होते. ‘यानि च तीणियानि च सट्ठि’ या वाक्यात जी तीन आणि साठ मते सांगितली आहेत, त्यात बौद्धमताचा देखील समावेश होतो की काय हे सांगता येत नाही. तो होतो असे जर गृहीत धरले, तर पालि वाड्ःमयात अनेक ठिकाणी सापडणा-या बासष्ट मतांच्या (द्वासट्ठिदिट्ठिगतानि) उल्लेखाचा अर्थ बरोबर लागतो. म्हणजे बुद्धाच्या श्रमणपंथाबाहेर या वेळी आणखी बासष्ट श्रमणपंथ अस्तित्वात होते असे ठरते. या बासष्ट श्रमणपंथांची मते तपशीलवार दाखविण्याचा प्रयत्न दीघनिकायाच्या पहिल्या ब्रह्मजालसुत्तात केला आहे. पण तो कृत्रिम दिसतो. ज्या वेळी हे सुत्त लिहिले, त्या वेळी बासष्ट या संख्येशिवाय तपशीलवार माहिती अस्तित्वात राहिली नव्हती. तेव्हा सुत्त रचणा-याने बासष्ट ही संख्या भरून काढण्यासाठी नवीन तपशील रचून या सुत्तात घातला. या जुन्या बासष्ट श्रमणपंथांची माहिती नष्ट होण्याचे कारण असे दिसते की, त्यापैकी प्रसिद्ध असे फारच थोडे श्रमणपंथ होते आणि लहानसहान संप्रदायांचा मोठ्या संप्रदायात समावेश होत गेला. आजकालच्या बुवा, बैरागी वगैरे पंथांची नीट मोजणी केली, तर ते किती तरी भरतील. पण त्यात नाव घेण्याजोगे कबीर, दादू, उदासी वगैरे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच शिल्लक राहतील.
9 . तपश्चर्येचे प्रकार
बुद्धाच्या वेळी सर्वात मोठे श्रमणसंघ सहाच होते आणि त्यात देखील निर्ग्रंथ श्रमणांच्या संप्रदायाचा नंबर पहिला लागतो. या पंथाचा ऐतिहासिक संस्थापक पार्श्वमुनि होय. त्याचे परिनिर्वाण बुद्धाच्या जन्मापूर्वी १९३ व्या वर्षी झाले, असे अनुमान करता येते. त्यापूर्वी चाळीस पन्नास वर्षे तरी पार्श्व तीर्थंकर आपल्या धर्माचा उपदेश करीत असावा. याच्या आणि इतर श्रमणसंघनायकांच्या मताचा विचार पुढे करण्यात येईल. सध्या या लोकांच्या तपश्चर्येचे प्रकार कोणते होते हे निर्दिष्ट करणे इष्ट वाटते. का की, त्यामुळे तापसांच्या तपश्चर्येचा देखील अल्पस्वल्प बोध होऊ शकेल. श्रमणांच्या तपश्चर्येचे प्रकार अनेक सुत्तात सापडतात. पण त्यापैकी मज्झिमनिकायातील महासीहनाद सुत्तात आलेले तपश्चर्येचे वर्णन विशेष महत्त्वाचे वाटल्याकारणाने त्याचा गोषवारा येथे देत आहे.
बुद्ध भगवान सारिपुत्ताला म्हणतो, “हे सारिपुत्ता, मी चार त-हेचे तप आचरले होते हे मला आठवते. मी तपस्वी झालो, रुक्ष झालो, जुगुप्सी झालो आणि प्रविवित्त झालो.
10 . तपस्विता
“हे सारिपुत्त, माझी तपस्विता कशी होती ती सांगतो-
(नि) मी नागवा राहत असे. लौकिक आचार पाळीत नसे. हातावर भिक्षा घेऊन खात असे. ‘भदन्त, इकडे या’ असे कोणी म्हटले तर ते ऐकत नसे. ‘भदन्त, उभा रहा’ असे कोणी म्हटले तर ते ऐकत नसे. बसल्या ठिकाणी आणून दिलेल्या अन्नाचा, मला उद्देशून तयार केलेल्या अन्नाचा आणि निमंत्रणाचा मी स्वीकार करीत नसे. ज्यात अन्न शिजविले, त्याच भांड्यांतून अन्न आणून दिले तर ते घेत नसे. उखळातून खाण्याचा पदार्थ आणून दिला तर तो घेत नसे. उंबरठ्याच्या आणि दांडक्याच्या पलीकडे राहून दिलेली भिक्षा घेत नसे. दोघे जेवीत असताना एकाने उठून दिलेली भिक्षा घेत नसे. गर्भिणी, मुलाला पाजणारी किंवा पुरुषाशी एकांतात असणारी, अशा स्त्रियांकडून भिक्षा घेत नसे. मेळ्यात आणि जत्रेत तयार केलेल्या अन्नाची भिक्षा घेत नसे. जेथे कुत्रा उभा असेल, किंवा माश्यांची गर्दी आणि गोंगाट असेल तेथे भिक्षा घेत नसे. मत्स्य, मांस, सुरा, वगैरे पदार्थ घेत नसे.३ एकाच घरात भिक्षा घेऊन एकाच घासावर मी राहत असे. किंवा दोन घरांत भिक्षा घेऊन दोन घासावर, याप्रमाणे सात दिवस वाढवीत जाऊन सात घरी भिक्षा घेऊन सात घास खाऊन राहत असे. पळाभरच अन्न घेत असे. याप्रमाणे सात दिवस वाढवीत जाऊन सात पळे अन्न घेऊन त्यावर निर्वाह करीत असे. एका दिवसाआड जेवीत असे. दोन
दिवसांआड जेवीत असे याप्रमाणे उपासाची मर्यादा वाढवीत जाऊन, सात दिवसांआड किंवा पंधरवाड्यातून एक दिवस जेवीत असे.
(इ) “शाक, श्यामक, नीवार, चांभाराने फेकलेले चामड्याचे तुकडे, शेवाळ, कोंडा, करपलेले अन्न, पेंड, गवत किंवा गाईचे शेण खाऊन राहत असे; किंवा अरण्यात सहजासहजी मिळालेल्या फळमुळांवर निर्वाह करीत असे. मी सणाची वस्त्रे धारण करीत असे. मिश्र वस्त्रे धारण करीत असे. प्रेतावर टाकलेली वस्त्रे धारण करीत असे, रस्त्यांतील चिंध्यांची वस्त्रे बनवून ती धारण करीत असे. वल्कले धारण करीत असे. अजिनमृगचर्म धारण करीत असे. कुशांचे बनविलेले चीवर धारण करीत असे. वाकाचे चीवर धारण करीत असे. मनुष्यांच्या केसांची कांबळ किंवा घोड्यांच्या केसांची कांबळ अथवा घुबडांच्या पिसांचे बनविलेले चीवर धारण करीत असे.
(नि) “मी दाढीमिशा आणि केस उपटून काढीत असे. उभा राहून तपस्या करीत असे. उकिडव्याने बसून तपस्या करीत असे.
(इ) “मी कंटकांच्या शय्येवर निजत असे. दिवसातून तीनदा स्नान करीत असे. अशा प्रकारे अनेक परींनी देहदंडन करत होतो. ही माझी तपस्विता.”
11 . रुक्षता
“हे सारिपुत्त, माझी रुक्षता कशी होती हे सांगतो-
(नि) अनेक वर्षांच्या धुळीने माझ्या अंगावर मळाचा थर चढला होता. जसा एखादा तिंदुक वृक्षाचा सोट अनेक वर्षांच्या धुळीने माखला जातो, तसा माझा देह झाला होता. पण मला असे वाटत नव्हते की, हा धुळीचा पापुद्रा मी स्वतः किंवा दुस-या कोणी तरी हाताने झाडावा. अशी माझी रुक्षता होती.”
12 . जुगुप्सा
“आता माझी जुगुप्सा कशी होती हे सांगतो-
(नि) मी मोठ्या काळजीपूर्वक जात येत असे. पाण्याच्या थेंबावर देखील माझी तीव्र दया होती. अशा विषम अवस्थेत सापडलेल्या सूक्ष्म प्राणाचा माझ्या हातून नाश होऊ नये, याबद्दल मी अत्यंत काळजी घेत असे. अशी माझी जुगुप्सा होती” (जुगुप्सा म्हणजे हिंसेचा कंटाळा.)
13 . प्रविविक्तता
“हे सारिपुत्त, आता माझी प्रविविक्तता कशी होती हे सांगतो-
(इ) मी एखाद्या अरण्यात राहत असता कोणा तरी गुराख्याला, गवत कापणा-याला, लाकडे नेणा-याला किंवा जंगलाची देखरेख ठेवणा-या माणसाला पाहून गहन जंगलातून, खोलगट किंवा सपाट प्रदेशातून एकसारखा पळत सुटे. हेतु हा की, त्यांनी मला पाहू नये आणि मी त्यांना पाहू नये. जसा एखादा अरण्यमृग मनुष्यांना पाहून पळत सुटतो, तसा मी पळत सुटत असे. अशी माझी प्रविविक्तता होती.”
14 . विकट भोजन
(इ) “जेथे गाई बांधण्याची जागा असे व जेथून नुकत्याच गाई चरावयास गेलेल्या असत, तेथे हातापायावर चालत जाऊन मी वासराचे शेण खात असे. जोपर्यंत माझे मलमूत्र कायम असे, तोपर्यंत त्यावरच मी निर्वाह करीत होतो. असे माझे महाविकट भोजन होते.”
15 . उपेक्षा
(नि) “मी एखाद्या भयानक अरण्यात राहत असे. जो कोणी अवीतरागी त्या अरण्यात प्रवेश करी, त्याच्या अंगावर काटा उभा राहावयाचा, इतके ते भयंकर होते. हिवाळ्यात भयंकर हिमपात होत असता मी मोकळ्या जागी राहत होतो, आणि दिवसा जंगलात शिरत होतो. उन्हाळ्याच्या शेवटल्या महिन्यात दिवसा मोकळ्या जागी राहत असे आणि रात्री जंगलांत शिरत असे. मी स्मशानात माणसांची हाडे उशाला घेऊन निजत असे. गावंढळ लोक येऊन माझ्यावर थुंकत, लघवी करीत, धूळ फेकीत अथवा माझ्या कानात काड्या घालीत. तथापि त्यांच्याविषयी माझ्या मनात कधीही पापबुद्धि उत्पन्न झाली नाही.”
16 . आहारव्रत
(इ) “आहाराने आत्मशुद्धि होते, अशी कित्येक श्रमणांची आणि ब्राह्मणांची दृष्टि आहे. ते केवळ बोरे खाऊन राहतात, बोरांचे चूर्ण खातात, बोरांचा काढा पितात, किंवा दुसरा कोणताही पदार्थ बोरांचाच करून खातात. मी एकच बोर खाऊन राहत असल्याची मला आठवण आहे. हे सारिपुत्ता, तू असे समजू नकोस की, त्या काळी बोरे फार मोठी होती. आजला जशी बोरे आहेत, तशी ती त्या काळीही असत. याप्रमाणे एकच बोर खाऊन राहिल्यामुळे माझे शरीर अत्यंत कृश होत असे. आसीतक वल्लीच्या किंवा कालवल्लीच्या गाठीप्रमाणे माझे सांधे स्पष्ट दिसत असत. माझा कटिबंध उंटाच्या पावलासारखा दिसे. सुताच्या चात्यांच्या माळेप्रमाणे माझा पाठीचा कणा दिसे. मोडक्या घराचे वासे जसे खालीवर होतात, तशा माझ्या बरगड्या झाल्या. खोल विहीरीत पडलेल्या नक्षत्रांच्या छायेप्रमाणे माझी बुबुळे खोल गेली. कच्चा कडू भोपळा कापून उन्हात टाकला असता जसा कोमेजून जातो, तशी माझ्या डोक्याची चामडी कोमेजून गेली. मी पोटावरून हात फिरवण्यास जाई तो पाठीचा कणाच माझ्या हाती लागे. त्यावर हात फिरवी, तेव्हा पोटाची चामडी हाताला लागे. येणेप्रमाणे माझा पाठीचा कणा आणि पोटाची चामडी ही एक झाली होती. शौचाला किंवा लघवीला बसण्याचा प्रयत्न केला, तर मी तेथेच पडत असे. अंगावरून हात फिरवला तर माझे दुर्बल झालेले लोम खाली पडत. त्या उपोषणाच्या योगाने माझी स्थिती तशी झाली.”
“कित्येक श्रमण आणि ब्राह्मण मूग खाऊन राहतात, तीळ खाऊन राहतात किंवा तांदूळ खाऊन राहतात. या पदार्थांनी आत्मशुद्धि होते अशी त्यांची समजूत आहे. हे सारिपुत्ता, मी एकच तीळ, एकच तांदूळ किंवा एकच भूग खाऊन राहत होतो. त्या वेळी हे दाणे फार मोठे होते असे समजू नकोस. आजकालच्या सारखेच हे दाणे होते. या उपोषणाने माझी स्थिति तशीच (वर वर्णिल्याप्रमाणे) होत असे.”
बुद्धघोषाचार्यांचे म्हणणे की, भगवंताने ही तपश्चर्या एका पूर्वजन्मी केली. त्या काळी बोरे वगैरे पदार्थ आताच्या सारखेच होत असत, या मजकुरावरून बुद्धधोषाचार्यांचे म्हणणे संयुक्तीक आहे असे दिसून येते. बुद्धसमकाली चालू असलेल्या भिन्न भिन्न तपश्चर्यांचे निरर्थकत्व दाखवून देण्यासाठी सुत्ताच्या कर्त्याने वरील मजकूर भगवंताच्या तोंडी घातला आहे, हे सांगणे न लगे.
टिपेत दिलेल्या फरकाशिवाय (नि) सदराखाली आलेली तपश्चर्या निर्ग्रंथ (जैन साधु) करीत असत. आजलाही केस उपटण्याची, उपासतापास करण्याची प्रथा त्यांच्यात चालू आहे.
(इ) सदराखाली तपश्चर्या इतर पंथांचे श्रमण आणि ब्राह्मण करीत असत. त्यांतील बहुतेक प्रकार बुवा, वगैरे लोकात अद्यापि चालू आहेत.
17 . मलमूत्र खाण्याची चाल
स्वतःचे मलमूत्र खाण्याची चाल अद्यापिही अघोरीसारख्या पंथात चालू असल्याचे दिसून येते. काशीत तेलंगस्वामी म्हणून एक प्रसिद्ध संन्यासी होऊन गेले. ते नागवे राहत. त्यांच्यासारखे नागवे फिरणारे दुसरेही पुष्कळ परमहंस काशीला होते. त्यावेळी गोड्विन् नावाचा (याला काशीचे लोक गोविंद साहेब म्हणत) मोठा लोकप्रिय कलेक्टर होता. हिंदु लोकांच्या चालीरीतीची त्याने सहानुभूतिपूर्वक माहिती करून घेतली; आणि या नंग्या बुवांनी लंगोटी लावून फिरावे म्हणून खालील युक्ती योजिली.
रस्त्यात फिरणारा नंगा बुवा भेटल्याबरोबर पोलीस त्याला साहेबाकडे घेऊन जात आणि साहेब त्याला विचारी, “तू परमहंस आहेस का?” त्याने होय म्हणून सांगितल्याबरोबर त्याला तो आपले अन्न खाण्यास सांगत असे. अर्थातच ते नंग्या बुवाला पसंत नसे. तेव्हा गोविंद साहेब म्हणे “परमहंस कसलाच भेद ठेवीत नसतो, असे शास्त्रात सांगितले आहे; आणि तुमच्या मनात तर भेदभाव आहे; तेव्हा तुम्ही नग्न हिंडता कामा नये”. येणेप्रमाणे पुष्कळशा नंग्या बुवांना त्याने लंगोटी लावण्यास भाग पडले.
असाच प्रसंग एकदा तेलंगस्वामीवर आला. पोलीस स्वामीला घेऊन कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर गेल्याचे वर्तमान समजताच त्याचे शिष्य व चाहाते, मोठमोठे पंडित व इतर वजनदार लोक साहेबाच्या बंगल्यावर गेले. साहेबाने सर्वांस बसवून घेऊन तेलंगस्वामीला प्रश्न केला, “तुम्ही परमहंस आहात काय?” स्वामीकडून ‘होय’ असे उत्तर मिळाल्यावर साहेबाने दुसरा प्रश्न केला, “माझ्याकडचे अन्न खाल काय?” त्यावर स्वामी म्हणाले, “तुम्ही माझे अन्न खाल काय?” “मी जरी परमहंस नाही, तरी कोणाचेही अन्न खातो,” साहेबाने उत्तर केले.
स्वामींनी तेथल्या तेथे आपल्या हातावर शौचविधि केला व तो हात पुढे करून स्वामी गोविंद साहेबाला म्हणाले, “हे घ्या माझे अन्न. हे तुम्ही खाऊन दाखवा.” साहेब अत्यंत कंटाळला आणि संतापून म्हणाला, “हे काय माणसाने खाण्याजोगे अन्न आहे?” तेव्हा स्वामींनी ते पार खाल्ले आणि हात चाटून साफसूफ केला! साहेबाने स्वामीला सोडून दिले, इतकेच नव्हे, पण पुन्हा त्याची चौकशी देखील केली नाही!
मी १९०२ साली काशीला असताना ही गोष्ट काशीच्या पंडितांनी मोठ्या आदराने सांगितलेली ऐकली आहे. आणि त्यापूर्वी ती तशाच आदरबुद्धीने ‘काशीयात्रा’ या पुस्तकात लिहिलेली मी वाचली.
18 . आधुनिक तपस्या
हेच तेलंगस्वामी भर थंडीच्या दिवसात केवळ डोके वर ठेवून गंगेत बसत; आणि भर उन्हाळ्यात ज्या ठिकाणी चालल्याने पायाला फोड येई, त्या गंगेच्या वाळवंटात बसत.
लोखंडाच्या काट्यांच्या खाट बनवून त्याच्यावर निजणारे बैरागी पुष्कळांनी पाहिले असतील. १९०२ साली असा एक बैरागी काशीत बिंदुमाधवाच्या मंदिराजवळ राहत होता. लाकडाची लंगोटी घालून फिरणारे बुवाबैरागीही माझ्या पाहण्यात आले आहेत.
19 . श्रमणांचा तपश्चर्येविषयी आदर
वर दिलेल्या तपश्चर्येच्या प्रकारापैकी शाक, शामाक व अरण्यातील सहज मिळालेली फळेमुळे खाऊन राहणे, हा प्रकार अरण्यात राहणारे ऋषिमुनि आचरीत असत. ते वल्कले नेसत आणि बहुतेक अग्निहोत्रही ठेवीत. परंतु हे जे नवीन श्रमणसंप्रदाय निघाले त्यांनी अग्निहोत्राला फाटा दिला आणि अरण्यात राहणा-या ऋषिमुनींच्या ब-याच तपश्चर्या घेऊन त्यांत चामड्याचे तुकडे वगैरे खाण्याच्या तपश्चर्यांची भर घातली.
बुद्धाच्या वेळी निर्ग्रंथांचा (जैनांचा) संप्रदाय जोमात होता हे वर सांगितलेच आहे. त्याशिवाय पूरणकाश्यप, मक्खलि गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कात्यायन आणि संजय बेलट्ठपुत्त या पाच श्रमणनायकांचे श्रमणसंप्रदाय फार प्रसिद्ध होते. या लोकांच्या तत्त्वज्ञानाचा विचार संक्षेपाने सातव्या प्रकरणात केला आहे. त्यावरून असे दिसून येईल की, तत्त्वाविषयी त्यांचा फार मोठा मतभेद होता; तथापि दोन गोष्टीत त्यांची एकवाक्यता होती-
१) या सर्वांना यज्ञयाग पसंत नव्हते, आणि
२) तपश्चर्येविषयी थोड्याबहुत प्रमाणात त्यांचा आदर होता.
20 . श्रमणांचे प्रचारकार्य
या आणि इतर श्रमणांचे वजन लोकांवर फार होते, हे वर सांगितलेच आहे. हे श्रमण पूर्वेला चंपा (भागलपूर), पश्चिमेला कुरूंचा देश, उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेला विंध्य, यांच्या मधल्या प्रदेशात पावसाळ्याचे चार महिने खेरीज करून बाकी आठ महिने सारखे फिरत आणि आपापल्या मतांचा लोकांना उपदेश करीत. त्यामुळे लोकात यज्ञयागाविषयी अनादर आणि तपश्चर्येबद्दल आदर उत्पन्न झाला.
21 . यज्ञयागांची व्याप्ति
परंतु राजे लोकांना युद्धात जय मिळावा म्हणून यज्ञयाग करणे आवश्यक वाटत होते. यज्ञयाग चालू ठेवण्यासाठी कोसलांच्या पसेनदि राजाने उक्कट्ठा नावाचा गाव पोक्खरसाति (पौष्करसादि) आणि सालवतिका गाव लोहिच्च (लौहित्य) ब्राह्मणाला, त्याचप्रमाणे मगध देशात बिंबिसार राजाने चंपा सोणदण्ड ब्राह्मणाला व खाणुमत गाव कूटदन्त ब्राह्मणाला इनाम दिल्याचा दाखला दीघनिकायात सापडतो. याशिवाय खुद्द पसेनदि राजा यज्ञयाग करीत होता असे कोसलसंयुत्तातील नवव्या सुत्तावरून दिसून येते. पण या यज्ञयागांची व्याप्ति कोसलाचा पसेनदि आणि मगधाचा बिंबिसार यांच्या राज्यापुरतीच होती. कारण मोठमोठाले यज्ञयाग करणे राजांना आणि इनामदार ब्राह्मणांनाच काय ते शक्य होते.
असले अवाढव्य यज्ञयाग करणे सामान्य जनतेच्या शक्तीपलीकडचे असल्यामुळे यज्ञयागाच्या लघू आवृत्त्या निघाल्या होत्या. अमुक त-हेच्या लाकडाच्या अमुक त-हेच्या दर्वीने, तुसाचा, कोंड्याचा, अमुक त-हेच्या तांदळांचा, अमुक प्रकारच्या तुपाचा, अमुक प्रकारच्या तेलाचा, अमुक प्राण्यांच्या रक्ताचा होम केला असता अमुकतमुक कार्यसिद्धि होते, असे सांगून ब्राह्मणलोक सामान्य जनतेला हे होम करावयास लावीत व काही श्रमण देखील यात भाग घेत असत, असे दीघनिकायातील मजकुरावरून दिसून येते.४ कार्यसिद्धीसाठी हे लोक होम करीत असले, तरी त्याची गणना धार्मिक विधीत करीत नसत असे वाटते. कारण, ते होम करणा-या ब्राह्मणांना आणि श्रमणांना लोक फारसे मानीत नसत.
22 . देवतांची पूजा
आजकाल हिंदु लोक जसे देवदेवता, यक्ष, पिशाच इत्यादिकांना मानतात व त्यांची समजूत करण्यासाठी बलिदान देतात, तसेच बुद्धसमकालचे हिंदु लोक देवतांना मानीत व बलिकर्म करीत. विशेष एवढाच होता की सध्याच्या ब-याच दैवतांना पुजारी लागतात आणि ते बहुधा ब्राह्मण असतात. याशिवाय सध्याची दैवते जरी बुद्धसमकालच्या दैवतांप्रमाणेच काल्पनिक असली, तरी त्यांपैकी बहुतेकांची पुराणे होऊन बसली आहेत. हा प्रकार बुद्धसमकाली नव्हता. वडासारख्या झाडावर, एखाद्या डोंगरावर किंवा वनात महानुभाव देवता राहतात आणि त्यांना नवस केले असता त्या पावतात, अशी लोकांची समजूत होती; आणि बकरे, कोंबडी वगैरे प्राण्यांचा बळी देऊन ते आपला नवस फेडीत असत. पलास जातकाच्या (नं. ३०७) कथेवरून असे दिसते की, देवतांची पूजा ब्राह्मण देखील करीत असत, पण त्यांनी त्या देवतांचा पुजारीपणा स्वतःची वृत्ति म्हणून बळकावल्याचा पुरावा कोठेच सापडत नाही. जसे आज दगडोबा म्हसोबाला किंवा जाखाई जोखाईला पुजारी ब्राह्मण नाहीत, तसे त्या वेळी सर्वच देवतांना नव्हते. लोक नवस करीत आणि मध्यस्थीशिवाय आपल्या हातानेच बलिदान देत. सुजातेने वटवृक्षवासी देवतेला दुधाच्या खिरीचा नवस केला आणि शेवटी त्या झाडाखाली बसलेल्या गोतम बोधिसत्त्वालाच तिने ती खीर दिली, ही कथा बौद्धवाड्ःमयात प्रसिद्ध आहे आणि बौद्ध चित्रकलेवर तिचा उत्तम परिणाम झाल्याचे दिसून येते. तात्पर्य, या देवदेवतांच्या पूजेत पुजारी ब्राह्मणांची आवश्यकता नव्हती.
23 . श्रमणांचा उत्कर्ष
या देवतांच्या मागे पुराणे आणि पुजारी नसल्यामुळे त्यांना आजकालचे धार्मिक स्वरूप आले नव्हते. सर्व दर्जाचे लोक आपल्यावरची आपत्ति टाळण्यासाठी, किंवा आपण केलेल्या नवसाला देवता पावली म्हणून, तिला बलिदान देत. पण हे कृत्य धार्मिक समजत नसत. ब्राम्हणांच्या यज्ञयागांना वेदांची आणि वैदिक वाड्ःमयाची पुष्टि मिळाल्यामुळे त्यांची गणना धार्मिक कृत्यात होत होती. पण हे यज्ञयाग फारच खर्चाचे असल्यामुळे, सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यात शेकडो गाईबैल मारण्यात येत. शेतीला उपयोगी पडणारी ही जनावरे राजे आणि इतर प्रतिष्ठित लोकांना जबरदस्तीने हिरावून घ्यावी लागल्यामुळे सामान्य जनतेला हे यज्ञयाग अत्यंत अप्रिय होत चाललेले होते. याच्या उलट श्रमणांना सामान्य लोक आदरातिथ्याने वागवीत, चातुर्मासात झोपड्या वगैरे बांधून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करीत आणि त्यांचा उपदेश ऐकण्याला तत्पर असत. म्हणजे श्रमणसंघांची एकसारखी भरभराट होत चालली होती.
24 . उपनिषत्कालीन ऋषि
सांप्रत अशी एक समजूत प्रचलित आहे की, वेदापासून उपनिषदे आणि त्यांच्यापासून बौद्ध, जैन वगैरे धर्म निघाल्यामुळे ते देखील वैदिक धर्मच आहेत. बौद्धांची आणि जैनांची परंपरा वेद किंवा उपनिषदे यापासून निघाली नसून ती वेदकालापूर्वी मध्य हिंदुस्थानात अस्तित्वात असलेल्या ऋषिमुनींच्या परंपरेपासून निघाली, हे वरील विवेचनावरून स्पष्ट होईल असा भरवसा वाटतो. तथापि उपनिषदांत वर्णिलेल्या ब्राह्मणांची बुद्धसमकाली कशी स्थिति होती, याचा थोडक्यात विचार करणे अप्रस्तुत होनार नाही.
आरण्यके आणि उपनिषदे बुद्धकालानंतर ब-याच वर्षांनी रचण्यात आली हे मी ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ या पुस्तकात दाखवून दिले आहे. (पृ.४८-५० पहा.) परंतु बुद्धसमकाली उपनिषदात वर्णिलेल्या ब्राह्मणांसारखे काही ब्राह्मण आणि क्षत्रिय होते, असे समजण्यास मुळीच हरकत नाही. पण त्यापैकी बहुतेक होमहवनाचा धर्म सोडून शुद्ध श्रमण होत असत, असे जातकातील पुष्कळशा गोष्टीवरून दिसून येते. उदाहरणार्थ, नंगुट्ठजातकाचा (नं.१४४) गोषवारा येथे देतो.
वाराणसीत ब्रह्मदत राज्य करीत असता बोधिसत्त्व औदीच्य ब्राह्मणकुलात जन्मला. त्याच्या जन्मदिवशी आईबापांनी जाताग्नि ठेवला आणि तो सोळा वर्षांचा झाल्यावर त्यांनी त्याला म्हटले, “बाबारे, तुझ्या जन्मदिवशी हा अग्नि स्थापित केला आहे. जर तुला गृहस्थ होऊन राहावयाचे असेल, तर तीन वेदांचे अध्ययन कर; पण जर ब्रह्मलोकपरायण होण्याची इच्छा असेल, तर हा अग्नि घेऊन अरण्यात जा आणि त्याच्या सेवेने ब्रह्मदेवाची आराधना करून ब्रह्मलोकपरायण हो.”
बोधिसत्त्वाला गृहस्थाश्रम नको होता. आपला जाताग्नि घेऊन तो अरण्यात गेला आणि तेथे आश्रम बांधून त्या अग्नीची सेवा करीत राहिला. एके दिवशी बोधिसत्त्वाला एका शेतक-याने दक्षिणेदाखल एक बैल दिला. त्याचा बळी देऊन अग्निभगवंताची पूजा करण्याचा बोधिसत्त्वाचा विचार होता. पण आश्रमात मीठ शिल्लक नव्हते. ते आणण्यासाठी तो गावात गेला असता, इकडे काही गुंड लोकांनी त्या बैलाला मारून अग्निहोत्रावर आपणाला पाहिजे तेवढे त्याचे मांस शिजवून खाल्ले व बाकीचे बरोबर नेले.
बोधिसत्त्व मीठ घेऊन परत आला आणि पाहतो, तो बैलाचे कातडे, शेपूट आणि हाडे तेवढी शिल्लक होती. तो स्वत:शीच म्हणाला, “हा अग्निभगवान् याच्या बलीचेच रक्षण करू शकत नाही; मग माझे रक्षण कसे करील?” असे म्हणून त्याने आपले अग्निहोत्र पाण्यात फेकून दिले आणि ऋषिप्रव्रज्या घेतली.
बुद्धाचा उपदेश ऐकून उरुवेलकाश्यप, नदीकाश्यप आणि गयाकाश्यप या तिघा ब्राह्मणबंधूंनी आपली अग्निहोत्रे नदीत फेकून दिल्याची कथा बौद्धवाड्ःमयात प्रसिद्ध आहे.
25 . उपनिषदृषि
काही ब्राह्मणांना अशा रीतीने उघडपणे श्रमणधर्म स्वीकारण्याचे धाडस नव्हते. ते वैदिक यज्ञयाग आणि श्रमणांचे तत्त्वज्ञान यांच्या दरम्यान हेलकावे खात असत; अश्वमेधावर वगैरे रूपके रचून त्यातूनच आत्मतत्त्व काढण्याचा प्रयत्न करीत. उदाहरणार्थ बृहदारण्यकोपनिषदाच्या पहिल्या अध्यायातील दुस-या ब्राह्मणाच्या आरंभी आलेली कथा पाहा. तेथे ऋषि म्हणतो, “या जगात उत्पत्तीच्या पूर्वी काही एक नव्हते. मृत्यूने हे सर्व झाकले होते, ते का तर खाण्याच्या इच्छेने. कारण, खाण्याच्या इच्छेलाच मृत्यु म्हणतात. त्याला आत्मवान् व्हावे असे वाटले... मोठ्या यज्ञाने मी पुनरपि यजन करावे अशी तो मृत्यु कामना करता झाला. अशी कामना करून तो श्रांत झाला; तप करू लागला. त्या श्रांत व तपाने तप्त झालेल्या मृत्यूपासून यश व वीर्य उत्पन्न झाले. प्राण हे यश आणि हेच वीर्य आहे. याप्रमाणे ते प्राण शरीर सोडून निघून गेले असता ते प्रजापतीचे शरीर फुगले. तथापि त्याचे मन त्या शरीरात होते. माझे हे शरीर मेध्य (यज्ञिय) व्हावे व त्यायोगे मी आत्मवान् (आत्मन्वी) व्हावे, अशी तो कामना करता झाला. ज्याअर्थी ते शरीर माझ्या वियोगाने यश आणि वीर्य यांनी विरहित होत चालले, फुगले, त्याअर्थी तो अश्व (फुगलेला) झाला. आणि ज्याअर्थी ते मेध्य झाले त्याअर्थी तेच अश्वमेधाचे अश्वमेधत्व आहे. जो या अश्वाला याप्रमाणे जाणतो तोच अश्वमेधाला जाणतो.”
यात अश्वमेधाच्या मिषाने तपश्चर्याप्रधान अहिंसाधर्म सांगण्याचा प्रयत्न दिसतो. खाण्याची इच्छा हाच मृत्यु. तो आत्मवान् झाला म्हणजे त्याला व्यक्तित्व आले आणि क्रमश: त्याला यज्ञाची इच्छा उद्भवली. त्या इच्छेपासून यश आणि वीर्य हे दोन गुण निघाले, ते खरे प्राण होत. ते जर निघून गेले, तर शरीर मरून फुगल्यासारखे (अश्वयित) समजावे. आणि ते जाळून टाकण्याला योग्य आहे. हे तत्त्व जो जाणतो तोच अश्वमेध जाणतो.
छांदोग्य उपनिषदात प्रवाहण जैवलि अरुणाच्या पुत्राला म्हणतो, “हे गौतमा, द्युलोक हाच अग्नि आहे. त्याची आदित्य हीच समिधा, किरण हा धूम, दिवस ही ज्वाला, चन्द्रमा हे निखारे, आणि नक्षत्रे किटाळे (विस्फुलिंग) आहेत.” (छां. उ. ५|४)
यावरून असे दिसून येईल की, या ब्राह्मण ऋषींच्या मनावर श्रमण संस्कृतीचा पूर्ण पगडा बसला होता; पण व्यवहारात ती तत्त्वे उघड उघड प्रतिपादणे त्यांना इष्ट वाटत नव्हते; आणि म्हणूनच अशा रूपकात्मक भाषेचा ते प्रयोग करीत.
26 . उपनिषदृषि देखील जातिभेद मानीत नव्हते
पूर्वीचे ऋषिमुनि, श्रमण आणि उपनिषदृषि यांच्यामध्ये एका बाबतीत एकवाक्यता होती. ही बाब म्हटली म्हणजे जातिभेदाची होय. मातंग ऋषीची गोष्ट वर आलीच आहे. तिजवरून ऋषिमुनीत जातिभेद नव्हता हे स्पष्ट होते. श्रमणसंघात तर जातिभेदाला मुळीच थारा नव्हता आणि उपनिषदृषि देखील जातीला फारसे महत्त्व देत नसत हे खालील गोष्टीवरून दिसून येईल.
सत्यकाम आपली आई जबाला हिला म्हणाला, “आई, मी ब्रह्मचर्याचे आचरण करू इच्छितो. (ब्रह्मज्ञान मिळविण्याची इच्छा करतो.) माझे गोत्र कोणते हे सांग.” ती त्याला म्हणाली, “बाळ, हे मला माहीत नाही. तरुणपणी मी पुष्कळांपाशी राहिले (बव्हहं चरन्ती) आणि तू जन्मलास. तेव्हा तुझे गोत्र मी जाणत नाही. माझे नाव जबाला आणि तुझे नाव सत्यकाम आहे. म्हणून तू सत्यकाम जाबाल आहेस असे सांग.”
तो (सत्यकाम) हारिद्रुमत गौतमाला म्हणाला, “आपणापाशी ब्रह्मज्ञान शिकण्याच्या उद्देशाने मी आलो आहे.”
गौतम म्हणाला, “तुझे गोत्र कोणते?”
सत्यकाम म्हणाला, “ते मला माहीत नाही. आईला मी विचारले. पण ती मला म्हणाली की, तारुण्यात पुष्कळ पुरुषांशी संबंध असल्यामुळे आपणाला गोत्र माहीत नाही. तेव्हा तू सत्यकाम जाबाल आहेस असे सांग.”
त्याला गौतम म्हणाला, “तू सत्यापासून च्युत झाला नाहीस. अब्राह्मणाला हे शक्य नव्हे. म्हणून समिधा घेऊन ये. तुझे उपनयन करतो.” असे म्हणून या ऋषीने त्याचे उपनयन केले. (छां. उ. ४|४).
27 . गुप्तांच्या कारकीर्दीपासून जातिभेद बळावला
उपनिषदृषि जरी जातिभेद पाळीत असत, तरी जातीपेक्षा सत्याला ते विशेष मान देत हे सत्यकामाच्या गोष्टीवरून सिद्ध होते. परंतु त्याच उपनिषदांचा समन्वय करू पाहणारे बादरायण व्यास आणि भाष्यकार शंकराचार्य जातिभेदाचे किती स्तोम माजवतात पाहा-
श्रवणाध्ययनार्थप्रतिषेधात्स्मृतेश्च | अ.१|३|३८.
इतश्च न शुद्रस्याधिकारः| यदस्य स्मृतेः श्रवणाध्ययनार्थप्रतिषेधो भवति | वेदश्रवणप्रतिषेधो वेदाध्ययनप्रतिषेधस्तदर्थज्ञानानुष्ठानयोश्चप्रतिषेधः शुद्रस्य स्मर्यते | श्रमणप्रतिषेधस्तावत् ‘अथास्य वेदमुपशृण्वतस्त्रपुजतुभ्यां श्रोत्रप्रपूरणम्’ इति | ‘पद्युह वा एतत् स्मशानं यच्छूद्रस्तस्माच्छूद्रसमीपे नाध्येतव्यम्’ इति च | अत एवाध्ययनप्रतिषेधः| यस्य हि समीपेऽपि नाध्येतव्य भवति, स कथमश्रुतमधीयीत | भवति च वेदोच्चारणे जिव्हाच्छेदो धारणे शरीरभेद इति अत एव चार्थादर्थनानुष्ठानयोः प्रतिषेधो भवति ‘न शूद्राय मतिं दद्यात्’ इति | (ब्रह्मसूत्रशांकरभाष्य अ.१|३|३८.)
“आणि म्हणूनच शूद्राला (ब्राह्मज्ञानाचा) अधिकार नाही. कारण, स्मृतीने त्याला वेद ऐकण्याचा व अध्ययन करण्याचा प्रतिषेध केला आहे. वेदश्रवणाचा प्रतिषेध, वेदाध्ययनाचा प्रतिषेध आणि त्यांचे अर्थज्ञान व अनुष्ठान यांचा प्रतिषेध स्मृतीने शूद्राला केला आहे. श्रवणप्रतिषेध असा, ‘त्याने वेदवाक्य ऐकले तर त्याचे कान लाखेने आणि शिशाने भरावे.’ ‘शूद्र म्हणजे पाय असलेले स्मशान होय. म्हणून शूद्राच्या जवळपास अध्ययन करू नये.’ आणि म्हणूनच अध्ययनप्रतिषेध देखील होतो. कारण ज्याच्या जवळपास देखील अध्ययन करता कामा नये, तो स्वतः श्रुतीचे अध्ययन कसे करील? आणि त्याने वेदोच्चारण केले असता त्याचा जिव्हाच्छेद करावा, (वेदमंत्राचे) धारण केले असता ठार मारावे (शरीरभेद करावा), असे सांगितले आहे. यास्तव त्याने वेदाचे अर्थज्ञान आणि अनुष्ठान करू नये. असे सिद्ध होते. ‘शूद्राला मति देऊ नये.’ ”
शंकराचार्यांनी शूद्रांचा छळ करण्यासाठी घेतलेले आधार गौतमधर्मसूत्र इत्यादि गुप्त राजांच्या समकाली झालेल्या ग्रंथांतील आहेत. म्हणजे समुद्रगुप्तापासून (इ.स.च्या चवथ्या शतकापासून) तहत शंकराचार्यापर्यंत (इ.स. च्या नवव्या शतकाच्या आरंभापर्यंत) आमच्या ब्राह्मण पूर्वजांचा शूद्रांना दाबून आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न अव्याहत चालू होता असे दिसते. धर्मसूत्रकार आणि शंकराचार्य यांच्यामध्ये फरक एवढाच की, सूत्रकारांच्या वेळी मुसलमान लोकांनी या प्रदेशात प्रवेश केला नव्हता आणि शंकराचार्यांच्या वेळी सिंध देश मुसलमानांच्या ताब्यात गेला असून तेथे मुसलमानी धर्माचा एकसारखा प्रसार होत होता. त्यंच्याकडून तरी आमच्या आचार्यांनी समानत्वाचा धडा शिकावयास पाहिजे होता. तसे न करता हे आचार्य आपले जातिभेदाचे घोडे तसेच दामटीत राहिले. त्याचे परिणाम या हतभागी देशाला कसे भोगावे लागले, हे इतिहास सांगतच आहे.
28 . स्त्री साध्वींचे संघ
तपस्वी ऋषिमुनींत किंवा वैदिक ऋषींत स्त्रियांचा समावेश झाला नव्हता. गार्गी वाचक्नवी सारख्या स्त्रिया ब्रह्मज्ञानाच्या चर्चेत भाग घेत होत्या.५ परंतु त्यांचे स्वतंत्र संघ नव्हते. स्त्रियांचे स्वतंत्र संघ बुद्धकालापूर्वी एकदोन शतके स्थापन झाले. त्यापैकी सर्वात जुना जैन साध्वींचा संघ होता, असे वाटते. या जैन साध्वी वादविवादात पटाईत होत्या, हे भद्रा कुंडलकेशा६ इत्यादिकांच्या गोष्टीवरून समजून येईल.
पूर्वीचे ऋषिमुनि जंगलात राहत आणि गावात क्वचितच संचार करीत. यास्तव त्यांना स्त्रियांचे संघ स्थापन करणे शक्य नव्हते. परंतु श्रमण लोक वस्तीच्या आसपास राहत आणि त्या काळची परिस्थिति अनुकूल असल्यामुळे त्यांना स्त्रियांचे संघ स्थापता आले. बौद्ध आणि जैन वाड्ःमय वाचले असता एक विशेष गोष्ट दिसून येते ती ही की, त्या काळी स्त्रिया धार्मिक बाबतीत पुरुषांप्रमाणेच पुढारलेल्या होत्या. याचे कारण गणसत्ताक राज्यात स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य असे. बुद्ध भगवंताने वज्जींना जे उन्नतीचे सात नियम घालून दिले त्यापैकी पाचवा, ‘स्त्रियांचा मान राखला पाहिजे; विवाहित किंवा अविवाहित स्त्रीवर कोणत्याही प्रकारे बलात्कार होऊ देता कामा नये’ हा आहे. आणि त्याला अनुसरून बुद्धाच्या मरणापर्यंत तरी वज्जी लोक वागत असत. वज्जींप्रमाणेच मल्लांच्या राज्यात देखील बायकांचा मान ठेवण्यात येत होता असे मानण्यास हरकत नाही. अंग, काशी, शाक्य, कोलिय इत्यादि गणसत्ताक राज्यांचे स्वातंत्र्य नष्ट झाले होते, तरी अन्तर्गत व्यवस्था त्यांच्या हातात असल्यामुळे त्यांच्या राज्यांत स्त्रीस्वातंत्र्याला फारसा धक्का पोचला नाही.
मगध आणि कोसल या देशांत एकसत्ताक राज्यपद्धति दृढमूल झाली असली, तरी त्या देशाच्या राजांना मूळच्या गणसत्ताक राज्यपद्धतीचे समूळ उन्मूलन करता आले नाही. बिंबिसार महाराजाने किंवा पसेनदि महाराजाने कोणत्याही स्त्रीला जबरदस्तीने आपल्या झनानखान्यात आणल्याचा दाखला कोठेच सापडत नाही.
29 . काही एकसत्ताक राज्यात स्त्रियांचा मान
गणसत्ताक राज्यपद्धति लोकांच्या स्मृतिपंथातून जात चालली आणि एकसत्ताक राज्यपद्धति जसजशी प्रबल होत गेली, तसतसे स्त्रियांचे स्वातंत्र्य देखील संपुष्टात येत चालले. तथापि काही राजे स्त्रियांचा योग्य मान ठेवीत असे उन्मादयन्तीच्या (उम्मदंतीच्या) गोष्टीवरून दिसून येईल.७
बोधिसत्व शिवि राजकुलात जन्मला. त्याला शिविकुमार असेच म्हणत. शिविराजाच्या सेनापतीचा पुत्र अभिपारक अणि शिविकुमार समवयस्क होते. तक्षशिलेला जाऊन त्या दोघांनी शास्त्राध्ययन केले. बापाच्या मरणानंतर शिविकुमार राजा झाला आणि सेनापतीच्या मरणानंतर त्याने अभिपारकाला सेनापति केले. अभिपारकाने उन्मादयन्ती नावाच्या अत्यंत सुस्वरूप श्रेष्ठिकन्येशी लग्न केले. राजा नगरप्रदक्षिणेला निघाला असता खिडकीत उभी असलेल्या उन्मादयंतीची व त्याची दृष्टादृष्ट झाली. राजा तिच्यावर मोहीत होऊन उन्मत्त झाला व राजवाड्यात जाऊन बिछान्यावर पडून राहिला. अभिपारकाला हे वर्तमान समजले, तेव्हा राजाजवळ जाऊन आपल्या बायकोचा स्वीकार करून उन्मत्तपणा सोडून देण्याबद्दल राजाची त्याने प्रार्थना केली. त्यामुळे राजा शुद्धीवर येऊन म्हणाला, “हा शिवींचा धर्म नव्हे. मी शिवींचा पुढारी आहे आणि शिवींचा धर्म अनुपालन करणे माझे कर्तव्य आहे; म्हणून माझ्या चित्तविकाराला वश होणे मला योग्य नव्हे.”
ही कथा विस्तृत आणि रोचक आहे. तिचे सार तेवढे येथे दिले आहे. ही रचणाराच्या वेळी गणसत्ताक राज्यपद्धति पार नष्ट झाली होती असे दिसते. तथापि शिवींसारख्या गणसत्ताक राजांचे स्त्रियांविषयीचे कर्तव्य त्याला पूर्णपणे माहीत होते; आणि ते सर्वसत्ताधारी राजांनी लक्षात ठेवावे असा त्याचा हेतु होता. शिविकुमाराच्या भाषणाच्या शेवटी त्याने ही गाथा घातली आहे-
नेता पिता उग्गतो रट्ठपालो
धम्मं शिवीनं अपचायमानो |
सो धम्ममेवानुविचिन्तयन्तो
तस्मा सके चित्तवसे न वत्ते ||
‘मी शिवींचा नेता, पिता आणि राष्ट्रपालक पुढारी आहे. म्हणून शिवींच्या कर्तव्याला मान देऊन आणि शिवींच्या धर्माचा नीट विचार करून माझ्या स्वत:च्या चित्तविकाराला मी वश होणार नाही.’
30 . बालविवाहाची प्रथा
या गोष्टीचा परिणाम बौद्ध राजावर तरी चांगलाच झाला असला पाहिजे. पण त्यामुळे दुसरीच एक वाईट चाल निघाली असावी. ब्रम्हदेशांतील राजे विवाहित स्त्रीला आपल्या झनानखान्यात ठेवीत नसत; जरी विवाहित स्त्रीच्या पतीने आपल्या बायकोशी काडीमोड करून तिला राजाच्या हवाली करण्याचे कबूल केले, तरी हा मोठा अधर्म समजत असत. पण अविवाहित स्त्रीला तिच्या आईबापांच्या संमतीशिवाय खुशाल उचलून घेऊन जात. राजा आपल्या मुलीला जबरदस्तीने नेईल या भयाने आईबाप मुलींचे लग्न लहानपणीच करून त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधीत. ही लग्ने साफ खोटी असत. मुली नव-याच्या घरी जात नसत, एवढेच नव्हे तर पहिला नवरा सोडून वाटेल त्या नव-याशी लग्न लावण्यास त्यांना पूर्ण मुभा असे. केवळ राजांच्या जुलमापासून मुलींचे रक्षण करण्याचा हा उपाय होता. हिंदुस्थानात बालविवाहाची दृढमूल झालेली चाल अशाच परिस्थितीतून निघाली की काय, हे सांगता येणे शक्य नाही. पण ही चाल बुद्धसमकाली सार्वत्रिक झाली नव्हती आणि एकसत्ताक राज्यपद्धति बळकट झाल्यावर ती धार्मिक होऊन बसली, याबद्दल शंका नाही. हिंदुस्थानात गणसत्ताक राज्यपद्धतीचा विकास झाला असता, तर बालविवाहाला मुळीच थारा मिळाला नसता, हे सांगावयालाच नको.
31 . चार प्रकारचे श्रमण ब्राह्मण
बुद्धकालापर्यंत चार प्रकारचे श्रमण ब्राह्मण झाले, याच्यावर एक रूपक व त्याचे स्पष्टीकरण मज्झिमनिकायातील निवापसुत्तात सापडते. त्याचा सारांश असा-
बुद्ध भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडिकाच्या आरामात राहत असता भिक्षूंना उद्देशून म्हणाला, “भिक्षुहो, कुरण लावणारा मनुष्य ते मृगांच्या कल्याणासाठी लावीत नसतो. या कुरणातील गवत खाऊन मृग प्रमत्त व्हावेत व सर्वस्वी आपल्या ताब्यात यावेत, असा त्याचा हेतु असतो.”
(१) “भिक्षुहो, अशा एका कुरणामध्ये मृग शिरले आणि ते यथास्थित गवत खाऊन प्रमत्त झाल्यामुळे त्या कुरण लावणा-या मनुष्याच्या ताब्यात गेले. (२) ते पाहून दुस-या काही मृगांनी असा विचार केला की, या कुरणात शिरणे अतिशय अनिष्ट आहे. ते कुरण सोडून देऊन ते ओसाड अरण्यात गेले. उन्हाळ्याचे दिवस आल्यावर तेथे त्यांना चारापाणी मिळेनासे झाले आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात बळ राहिले नाही. उदरपीडेने त्रस्त होऊन ते त्या कुरणात शिरले आणि प्रमत्तपणे चारापाण्याचा उपभोग घेऊ लागल्यामुळे त्या मनुष्याच्या ताब्यात गेले. (३) तिस-या काही मृगांनी हे दोन्ही मार्ग सोडून देऊन कुरणाच्या जवळच्या जंगलाचा आश्रय धरला व मोठ्या सावधगिरीने ते कुरणातील गवत खाऊ लागले. बराच काळपर्यंत कुरणाच्या मालकाला ते समजले नाही. काही काळाने त्याने त्या मृगांचे आश्रयस्थान शोधून काढले आणि त्या जागेभोवती जाळी पसरून त्या मृगांना हस्तगत केले. (४) पण चौथे मृग फार हुशार होते. त्यांनी कुरणापासून दूर अंतरावर गहन अरण्यात वस्ती केली; आणि तेथून ते कुरणातील चारापाण्याचा सावधगिरीने उपभोग घेऊ लागले. त्यांच्या आश्रयस्थानाचा पत्ता कुरणाच्या मालकाला लागला नाही.
“भिक्षूहो, मी हे रूपक केले आहे. कुरण लावणारा मनुष्य दुसरा कोणी नसून मार आहे. (१) ज्या श्रमण ब्राह्मणांनी विषयसुखामध्येच आनंद मानला, ते पहिले मृग होत. (२) विषयसुखाच्या भयाने ज्यांनी अरण्यवास पत्करला आणि जे सर्व जगापासून वेगळे झाले, ते दुसरे मृग. (३) जे श्रमण ब्राह्मण विषयांचा उपभोग मोठ्या सावधगिरीने घेऊन ‘जग हे शाश्वत आहे की अशास्वत आहे, आत्मा अमर आहे की नाशवंत आहे’ इत्यादि प्रश्नांविषयी वादविवाद करतात व आपला वेळ फुकट घालवतात, ते तिसरे मृग. (४) परंतु जे असल्या वादविवादात न पडता आपले अंत:करण निष्कलंक ठेवण्याविषयी काळजी घेतात, ते चौथे मृग होत.”
या सुत्तांत सांगितलेले पहिले श्रमण ब्राह्मण म्हटले म्हणजे यज्ञयागात व सोमरसपानात धर्मसर्वस्व समजणारे वैदिक ब्राह्मण होत. वैदिक हिंसेला आणि सोमपानाला कंटाळून जे अरण्यात शिरले, आणि तेथील कंदमुळांवर निर्वाह करू लागले, ते ऋषिमुनी दुस-या प्रकारचे श्रमण ब्राह्मण समजावेत. अरण्यात फळेमुळे मिळेनाशी झाली, किंवा खारट अगर आंबट पदार्थ खाण्याची इच्छा झाली, म्हणजे ते लोक गावात येत आणि प्रपंचाच्या जाळ्यात फसत. याचे एक उदाहरण वर (पृ. ८०-८१) दिलेच आहे. ऋषिमुनींचा फळांमुळावर निर्वाह करण्याचा मार्ग सोडून ज्यांनी भिन्न भिन्न श्रमणसंप्रदाय स्थापन केले, ते तिस-या प्रकारचे श्रमण ब्राह्मण होत. हे परिवव्राजक गहन जंगलात न जाता लोकवस्तीच्या आश्रयाने राहत आणि लोकांकडून मिळालेल्या अन्नवस्त्राचा मोठ्या सावधगिरीने उपभोग घेत. पण ते ‘आत्मा आहे किंवा नाही’ इत्यादि वादात गढून जात. त्यामुळे त्यांची आत्मशुद्धि न होता ते माराच्या जाळ्यात सापडत. बुद्धाने हे सर्व निरर्थक वाद सोडून देऊन अध्यात्मशुद्धीचा मार्ग शोधून काढला. त्याच्या भिक्षूंची चौथ्या श्रमण ब्राह्मणात गणना केली आहे. इतर श्रमण ब्राह्मणांच्या आणि बुद्धाच्या आत्मवादात कसा फरक होता, याचे स्पष्टीकरण सातव्या प्रकरणात करण्यात येईल. येथे एवढेच सांगावयाचे आहे की, या चार प्रकारच्या श्रमण ब्राह्मणात उपनिषदृषींचा मुळीच समावेश होत नाही; आणि यावरून उपनिषदांपासून बौद्धधर्म निघाला, ही कल्पना निराधार ठरते.
32 . तळ टिपा
१. सुरापान जातक (नं.८१)
२. मातंग जंतक (नं.४९७)
३. जैन साधु मत्स्य आणि मांस घेत असत; पण सुरा घेत असल्याचा दाखला सापडत नाही. मांसाहाराची चर्चा अकराव्या प्रकरणात केली आहे.
४. दीघनिकाय- ब्रह्मजाल, सामाञ्ञफल वगैरे सुत्ते पाहा.
५. बृहदारण्यक उपनिषद ३|६|१ इत्यादि.
६. बौद्धसंघाचा परिचय, पृ.२१४-२१७ पाहा.
७. उम्मदंतीजातक नं. ५२७.

