१-१२

भगवान बुद्ध

प्रस्तावना

14-10-2017
18-09-2017
18-09-2017
18-09-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

सारांश

पारिभाषिक शब्द

1 . प्रस्तावना

पालि वाड्‍ःमयात तिपिटक (त्रिपिटक) नावाचा ग्रंथसमुदाय प्रमुख आहे. त्याचे सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक असे तीन भेद आहेत. सुत्तपिटकात बुद्धाच्या आणि त्याच्या अग्रशिष्यांच्या उपदेशाचा प्रामुख्याने संग्रह केला आहे. विनयपिटकात भिक्षूंनी कसे वागावे, यासंबंधाने बुद्धाने केलेले नियम, ते करण्याची कारणे, वेळोवेळी त्यात केलेले फेरफार आणि त्यांच्यावर केलेली टीका, यांचा संग्रह केला आहे. अभिधम्मपिटकात सात प्रकरणे आहेत. त्यात बुद्धाच्या उपदेशात आलेल्या कित्येक मुद्दयांचा ऊहापोह करण्यात आला आहे.

दीघनिकाय, मज्झिमनिकाय, संयुत्तनिकाय, अंगुत्तरनिकाय आणि खुद्दकनिकाय असे सुत्तपिटकाचे मोठे पाच विभाग आहेत. दीघनिकायात मोठमोठाल्या चौतीस सुत्तांचा संग्रह करण्यात आला आहे. दीर्घ म्हणजे मोठी (सुत्ते). त्यांचा यात संग्रह असल्यामुळे याला दीघनिकाय म्हणतात.

मज्झिमनिकायात मध्यम प्रमाणाची सुत्ते संग्रहित केली आहेत, म्हणून त्याला मज्झिम-(मध्यम)-निकाय हे नाव देण्यात आले. संयुत्तनिकायात गाथामिश्रित सुत्ते पहिल्या भागात आली आहेत आणि नंतरच्या भागात निरनिराळ्या विषयांवरील लहानमोठी सुत्ते संग्रहित केली आहेत. यामुळे याला संयुत्तनिकाय, म्हणजे मिश्रनिकाय, असे नाव देण्यात आले. अंगुत्तर म्हणजे ज्यात एका एका अंगाची वाढ होत गेली तो, त्यात एकक निपातापासून एकादसक निपतापर्यंत अकरा निपातांचा संग्रह आहे. एकक निपात म्हणजे एकाच वस्तूसंबंधाने बुद्धाने उपदेशिलेली सुत्ते ज्यात आहेत तो. त्याचप्रमाणे दुक-तिक-निपात वगैरे जाणावे.

खुद्दकनिकाय म्हणजे लहान प्रकरणाचा संग्रह. त्यात पुढील पंधरा प्रकरणे येतात- खुद्दकपाठ, धम्मपद, उदान, इतिवुत्तक, सुत्तनिपात, विमानवत्थु, पेतवत्थु, थेरगाथा, थेरीगाथा, जातक, निद्देस, पटिसंभिदामग्ग, अपदान, बुद्धवंस व चरियापिटक. हा सुत्तपिटकाचा विस्तार. विनयपिटकाचे पाराजिका, पाचित्तियादि, महावग्ग, चुल्लवग्ग व परिपाठ असे पाच विभाग आहेत.

तिसरे अभिधम्मपिटक. याची धम्मसंगणि, विभंग, धातुकथा, पुग्गलपञ्ञत्ति, कथावत्थु, यमक व पट्ठान अशी सात प्रकरणे आहेत.

बुद्धघोषाच्या समकाली म्हणजे इसवी सनाच्या सरासरी चौथ्या शतकात या सर्व ग्रंथसमुदायांतील वाक्यांना किंवा उताऱ्यांना पालि म्हणत असत. बुद्धघोषाच्या ग्रंथांत तिपिटकातील वचनांचा निर्देश ‘अयमेत्थ पालि (ही येथे पालि)’ किंवा ‘पालियं वुत्तं (पालीत म्हटले आहे)’ अशा शब्दांनी केला आहे. पाणिनि जसा ‘छंदसि’ या शब्दाने वेदांचा आणि ‘भाषायाम्’ या शब्दाने स्वसमकालीन संस्कृत भाषेचा उल्लेख करतो, तसाच बुद्धघोषाचार्य ‘पालियं’ या शब्दाने तिपिटकातील वचनांचा आणि ‘अट्ठकथाथं’ या वचनाने त्या काळी सिंहली भाषेत प्रचलित असलेल्या ‘अट्ठकथां’तील वाक्यांचा उल्लेख करतो.

अट्ठकथा म्हणजे अर्थासहित कथा, त्रिपिटकातील वाक्यांचा अर्थ सांगावयाचा व जरूर असेल तेथे एखादी गोष्ट द्यावयाची असा परिपाठ सिंहलद्वीपात होता. कालांतराने ह्या अट्ठकथा लिहून ठेवण्यात आल्या; पण त्यांत बरेच पुनरुक्तिदोष होते; आणि पुन्हा त्या सिंहलद्वीपाबाहेरील लोकांना फारशा उपयोगी पडण्याजोग्या नव्हत्या. यास्तव बुद्धघोषाचार्याने त्यांपैकी प्रमुख अट्ठकथांचे संक्षिप्त रूपांतर त्रिपिटकाच्या भाषेत केले. ते इतके चांगले वठले की, त्याचा मान त्रिपिटक ग्रंथाइतकाच होऊ लागला. (‘पालिं विय तमग्गहुं’). अर्थात् त्या अट्ठकथांना देखील पालिच म्हणू लागले. खरे म्हटले तर ‘पालि’ हे भाषेचे नावच नव्हे. या भाषेचे मूळचे नाव मागधी असे आहे; आणि हे नाव अशा रीतीने तिला मिळाले.

वर सांगितलेले त्रिपिटकाचे विभाग राजगृह येथे भरलेल्या पहिल्या सभेत ठरविण्यात आले, असे बुद्धघोषाचार्याचे म्हणणे आहे. भगवान् बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर भिक्षु शोकाकुल झाले. तेव्हा एक सुभद्र नावाचा वृद्ध भिक्षु म्हणाला, “आमचा शास्ता परिनिर्वाण पावला, हे बरे झाले. तुम्ही अमुक केले पाहिजे आणि तमुक करता कामा नये, अशा प्रकारे तो आम्हांस सतत बंधनात ठेवीत होता. आता वाटेल तसे वागण्यास मोकळीक झाली.” हे ऐकून महाकाश्यपाने विचार केला की, जर धर्मविनयाचा संग्रह केला नाही, तर सुभद्रासारख्या भिक्षूंना स्वैराचार करण्यास मुभा मिळेल, म्हणून ताबडतोब भिक्षुसंघाची सभा बोलावून धर्म आणि विनय यांचा संग्रह करून ठेवला पाहिजे. त्याप्रमाणे महाकाश्यपाने राजगृह येथे त्या चातुर्मासात पाचशे भिक्षूंना गोळा केले; आणि सभेत प्रथमतः उपालीला विचारून विनयाचा संग्रह करण्यात आला; आणि नंतर आनंदाला प्रश्न करून सुत्त आणि अभिधम्म या दोन पिटकांचा संग्रह करण्यात आला. कित्येकांच्या मते खुद्दकनिकायाचा अंतर्भाव अभिधम्मपिटकातच केला गेला होता. पण इतर म्हणत की, त्याचा अंतर्भाव सुत्तपिटकातच करावयास पाहिजे.

हा सुमंगलविलासिनीच्या निदानकथेत आलेल्या मजकुराचा सारांश आहे. हाच मजकूर समन्तपासादिका नावाच्या विनय अट्ठकथेच्या निदानकथेतही सापडतो. पण त्याला तिपिटक ग्रंथात कोठेच आधार नाही. बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर राजगृहात भिक्षुसंघाची पहिली सभा झाली असेल; पण तीत सध्याचे पिटकाचे विभाग किंवा पिटक हे नाव देखील आले असेल असे दिसत नाही. अशोककालापर्यंत बुद्धाच्या उपदेशाचे धर्म आणि विनय असे दोन भाग करण्यात येत असत; पैकी धर्माची नऊ अंगे समजली जात असत; ती अशी- सुत्त, गेय्य, वेय्याकरण, गाथा, उदान, इतिवुत्तक, जातक, अब्भुतधम्म आणि वेदल्ल. या अंगांचा उल्लेख मज्झिमनिकायातील अलगद्दूपमसुत्तात, आणि अंगुत्तरनिकायात सात ठिकाणी सापडतो.

सुत्त हा पालि शब्द सूक्त किंवा सूत्र या दोन ही संस्कृत शब्दांबद्दल असू शकेल. वेदात जशी सूक्ते आहेत, तशीच ही पालि सूक्ते होत, असे कित्येकांचे म्हणणे; परंतु महायानसंप्रदायाच्या ग्रंथांत यांना सूत्रे म्हटले आहे; आणि तोच अर्थ बरोबर असावा. अलीकडे सूत्रे म्हटली म्हणजे पाणिनीची आणि तशाच प्रकारची इतर सूत्रे समजली जातात. पण आश्वलायन गृह्यसूत्र वगैरे सूत्रे या संक्षिप्त सूत्रांहून थोडीशी विस्तृत आहेत; आणि तशाच अर्थाने पालि भाषेतील सूत्रे आरंभी रचली गेली असावी. त्या सूत्रांवरून आश्वलायनादिकांनी आपल्या सूत्रांची रचना केली किंवा बौद्धांनी त्यांच्या सूत्रांना अनुसरून आपल्या सूत्रांची रचना केली, या वादात शिरण्याची आवश्यकता नाही. एवढे खरे की, अशोककालापूर्वी जी बुद्धाची उपदेशपर वचने असत त्यांना सुत्ते म्हणत; आणि ती फार मोठी नव्हती.

गाथायुक्त सूत्रांना गेय्य म्हणतात, असे अलगद्दसुत्ताच्या अट्ठकथेत म्हटले आहे आणि उदाहरणादाखल संयुत्तनिकायाचा पहिला विभाग देण्यात आला आहे; परंतु जेवढ्या म्हणून गाथा आहेत, त्या सर्वांचा गेय्यामध्ये संग्रह होतो; तेव्हा गाथा नावाचा निराळा विभाग का पाडण्यात आला, हे सांगता येत नाही. गेय्य म्हणजे अमुकच प्रकारच्या गाथा अशी समजूत असल्यास नकळे.

वेय्याकरण म्हणजे व्याख्या. एखादे सूत्र घेऊन त्याचा थोडक्यात किंवा विस्तारपूर्वक अर्थ सांगणे याला वेय्याकरण म्हणतात. (अर्थात् या शब्दाचा संस्कृत व्याकरणाशी काही संबंध नाही).

धम्मपद, थेरगाथा आणि थेरीगाथा हे तीन ग्रंथ गाथा सदराखाली येतात, असे बुद्धघोषाचार्याचे म्हणणे आहे. परंतु थेर आणि थेरी गाथा बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर तीन चार शतके अस्तित्वात असतील असे वाटत नाही; आणि धम्मपद तर अगदीच लहानसा ग्रंथ. तेव्हा गाथा म्हणजे एकच ग्रंथ होता किंवा दुस-या काही गाथांचा या विभागात समावेश होत असे सांगणे कठीण आहे.

वर दिलेल्या खुद्दकनिकायाच्या यादीत उदानाचा उल्लेख आलाच आहे. त्यातील उदाने व तशाच प्रकारची सुत्तपिटकात इतर ठिकाणी आलेली वचने यांना उदान म्हणत असत, असे बुद्धघोषाचार्याचे म्हणणे आहे. परंतु त्यांपैकी अशोकसमकाली किती उदाने अस्तित्वात होती हे सांगता येणे शक्य नाही. मागाहून त्यांच्यांत भर पडत गेली यात शंका नाही.

इतिवुत्तक प्रकरणात ११२ इतिवुत्तकांचा संग्रह आहे. त्यांपैकी काही इतिवुत्तके अशोककाली किंवा त्यानंतर एखाद्या शतकात अस्तित्वात होती; मागाहून त्यांची संख्या वाढत गेली असावी.

जातक नावाच्या कथा सुप्रसिद्ध आहेत; आणि त्यांपैकी काही कथातील देखावे सांची आणि बर्हुत येथील स्तूपांच्या आजूबाजूला कोरलेले आढळतात. यावरून अशोकसमकाली जातकाच्या ब-याच कथांचा बौद्धवाड्‍ःमयात प्रवेश झाला होता. असे अनुमान करता येते.

अब्भुतधम्म म्हणजे अद्भुत चमत्कार. बुद्धभगवंताने आणि त्याच्या प्रमुख श्रावकांनी केलेल्या अद्भुत चमत्कारांचे ज्यात वर्णन होते असा एखादा ग्रंथ त्या काळी अस्तित्वात होता असे दिसते. परंतु आता या अद्भुत धर्माचा मागमूस राहिला नाही. त्यातले सर्व भाग सध्याच्या सुत्तपिटकात मिसळून गेले असावेत. बुद्धघोषाचार्याला देखील अद्भुतधर्म काय होता, हे सांगणे कठीण पडले. तो म्हणतो, “चत्तारोमे भिक्खवे अच्छरिया अब्भुता धम्मा आनन्दे ति आदिनयपत्ता सब्बे पि अच्छरियब्भुतधम्मपटिसंयुत्ता सुत्तन्ता अब्भुतधम्मं ति वेदितब्बा|” (‘भिक्षुहो, हे चार आश्चर्य अद्भुतधर्म आनन्दामध्ये वास करतात, इत्यादि प्रकारे अद्भुतधर्माने सुरू झालेली आश्चर्य-अद्भुतधर्मांनी युक्त असलेली सर्व सूत्रे अब्भुतधम्म समजावी.’) पण या अद्भुतधर्माचा आणि मूळच्या अब्भुतधम्म ग्रंथाचा काही संबंध दिसत नाही.

महावेदल्ल व चूळवेदल्ल अशी दोन सूत्रे मज्झिमनिकायात आहेत. त्यावरून वेदल्ल हे प्रकरण कसे होते याचे अनुमान करता येते. त्यांपैकी पहिल्या सुत्तात महाकोट्ठित सारिपुत्ताला प्रश्न विचारतो आणि सारिपुत्त त्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे देतो. दुसऱ्यात धम्मदिन्ना भिक्षुणी आणि तिचा पूर्वाश्रमातील पति विशाख या दोघांचा तशाच प्रकारे प्रश्नोत्तररूपाने संवाद आहे. ही दोन्ही सुत्ते बुद्धभाषित नव्हत; परंतु तशाच रीतीच्या संवादांना वेदल्ल म्हणत असत. श्रमण, ब्राह्मण आणि इतर लोकांबरोबर बुद्ध भगवंताचे जे संवाद झाले असतील, त्यांचा एक निराळा संग्रह करण्यात आला होता व त्याला वेदल्ल हे नाव देण्यात आले होते , असे दिसते.

ही नऊ अंगे अस्तित्वात येण्यापूर्वी सुत्त आणि गेय्य ह्या दोनच अंगांत बाकीच्या अंगांचा समावेश करण्यात येत होता असे महासुञ्ञतासुत्तातील खालील मजकुरावरून दिसून येते: बुद्ध भगवान आनंदाला म्हणतो, “न खो आनन्द अरहति सावको सत्थारं अनुबन्धितुं यदिदं सुत्तं गैय्यं वेय्याकरणस्स हेतु| तं किस्स हेतु| दीघरत्तं हि वो आनन्द धम्मा सुत्ता धाता वचसा परिचिता...” (‘हे आनन्द, सुत्त आणि गेय्य यांच्या वेय्याकरणासाठी (स्पष्टीकरणासाठी) श्रावकाने शास्त्या (गुरुच्या) बरोबर फिरणे योग्य नाही. का की, तुम्ही या गोष्टी ऐकल्याच आहेत; आणि तुम्हाला त्या परिचित आहेत.’) म्हणजे सुत्त आणि गेय्य एवढ्यांतच बुद्धोपदेश होता आणि वेय्याकरण किंवा स्पष्टीकरण श्रावकावर सोपविण्यात आले होते. होता होता त्यात आणखी सहा अंगांची भर पडली, आणि पुढे त्यातील काही अंगांची भेसळ करून सध्याची बरीच सुत्ते बनविण्यात आली. त्यात बुद्धाचा खरा उपदेश कोणता व बनावट कोणता हे सांगणे जरी कठीण जाते, तरी अशोकाच्या भाब्रा किंवा भाब्रू शिलालेखाच्या आधारे पिटकांतील प्राचीन भाग कोणते असावेत याचे अनुमान करता येणे शक्य आहे.

अशोकाच्या भाब्रू शिलालेखात खालील सात बुद्धोपदेश भिक्षूंनी, भिक्षुणींनी, उपासकांनी आणि उपासिकांनी वारंवार ऐकावे व पाठ करावे अशी सूचना केली आहे. ते उपदेश असे:

१) विनयसमुकसे, २) अलियवसानि, ३) अनागतभयानि, ४) मुनिगाथा, ५) मोनेयसुते, ६) उपतिसपसिने, ७) लाघुलोवादे मुसावादं अधिगिच्य भगवता बुद्धेन भासिते.

या सातपैकी नं. ७ मज्झिमनिकायातील राहुलोवाद सुत्त (नं. ६१) आहे असे ओल्डेनबर्ग आणि सेनार या दोन पाश्चात्य विद्वानांनी दाखवून दिले. बाकीच्यांची माहिती देण्याचा प्रयत्न प्रो. ऱ्हिस डेविड्स यांनी केला. पण सुत्तनिपातांतील मुनिसुत्त याच्याशिवाय त्यांनी जी दुसरी सुत्ते दर्शविली ती सर्व चुकीची होती. नंबर २, ३, ५ आणि ६ ही चार सुत्ते कोणती असावीत याचा ऊहापोह मी १९१२ सालच्या फेब्रुवारीच्या ‘इंडियन अँटिक्वेरी’ च्या अंकात केला आहे. त्यात दर्शविलेली सुत्ते आता सर्वत्र ग्राह्य झाली आहेत. फक्त पहिल्या सुत्ताचा मला त्यावेळी थांग लागला नव्हता. ‘विनयसमुकसे (विनयसमुत्कर्ष)’ याचा विनयग्रंथाशी काही तरी संबंध असला पाहिजे असे वाटले आणि अशा तऱ्हेचा उपदेश कोठेच न सापडल्यामुळे ते सूत्र कोणते हे मला सांगता आले नाही.

परंतु विनय शब्दाचा अर्थ विनयग्रंथ करण्याचे काही कारण नाही. ‘अहं खो केसि पुरिसदम्मं सण्हेन पि विनेमि फरुसेन पि विनेमि|’ (अंगुत्तर चतुक्कनिपात, सुत्त नं. १११); ‘तमेनं तथागतो उत्तरिं विनेती |’ (मज्झिम, सुत्त नं. १०७). ‘यन्नूनाहं राहुलं उत्तरिं आसवानं खये विनेय्यं ति |’ (मज्झिम, सुत्त नं. १४७). इत्यादि ठिकाणी विपूर्वक नी धातूचा अर्थ शिकविणे असा आहे; आणि त्याच्यावरूनच नंतर विनयाच्या नियमांना विनयपिटक म्हणण्यात येऊ लागले. बुद्धाने ज्या वेळी भिक्षु गोळा करण्यास आरंभ केला, त्या वेळी विनयग्रंथाचे अस्तित्व मुळीच नव्हते. जी काही शिकवणूक होती ती सुत्ताच्या रूपानेच. पहिल्याप्रथम पञ्चवर्गीय भिक्षूंना बुद्धाने आपले शिष्य केले ते ‘धम्मचक्क-पवत्तन-सुत्त’ उपदेशून. तेव्हा विनय शब्दाचा मूळचा अर्थ शिकवणूक असाच घेतला पाहिजे, आणि त्या विनयाचा समुत्कर्ष म्हणजे बुद्धाचा उत्कृष्ट धर्मोपदेश. ‘समुक्कंस’ हा शब्द जरी पालि वाड्‍ःमयात बुद्धोपदेशवाचक आढळत नाही, तथापि ‘सामुक्कंसिका धम्मदेसना’ हे वाक्य अनेक ठिकाणी सापडते. उदाहरणार्थ, दीघनिकायातील अम्बट्ठसुत्ताच्या शेवटी आलेला हा मजकूर पाहा,- ‘यदा भगवा अञ्‍ञासि ब्राह्मणं पोक्खरसातिं कल्लचित्तं मुदुचित्तं विनीवरणचित्तं उदग्गचित्तं प्रसन्नचित्तं, अथ या बुद्धानं सामुक्कंसिका धम्मदेसना तं पकासेसि दुक्खं समुदयं निरोधं मग्गं |” (‘जेव्हा भगवंताने जाणले की पौष्करसादि ब्राह्मणाचे चित्त प्रसंगाला उचित, मृदु, आवरणांपासून विमुक्त, उदग्र आणि प्रसन्न झाले आहे, तेव्हा बुद्धाची जी सामुत्कर्षिक धर्मदेसना ती त्याने प्रकट केली ती कोणती? तर दु:ख, दुःखसमुदय, दु:खनिरोध आणि दु:खनिरोधाचा मार्ग.’)

याच सुत्तात नव्हे, तर मज्झिमनिकायातील उपालिसुत्तासारख्या दुस-या सुत्तात, आणि विनयपिटकात अनेक ठिकाणी हेच वाक्य आले आहे. फरक एवढाच की येथे हे पोक्खरसाति ब्राह्मणाला उद्देशून आहे आणि तेथे उपालि वगैरे गृहस्थांना उद्देशून आहे. यावरून विनयसमुत्कर्ष म्हणजे ही सामुत्कर्षिका धर्मदेशना. एका काळी ह्या चार आर्यसत्यांच्या उपदेशाला विनयसमुक्कंस म्हणत असत, यात शंका राहत नाही. ‘धम्मचक्कपवत्तन-सुत्त’ हे नाव अशोकानंतर बऱ्याच काळाने प्रचारात आले असावे. चक्रवर्ती राजाच्या कथा लोकप्रिय झाल्यानंतर बुद्धाच्या ह्या उपदेशाला असे भपकेदार नाव देण्यात आले.

‘विनयसमुकसे’ हेच धम्मचक्कपवत्तनसुत्त आहे असे गृहीत धरले, तर भाब्रू शिलालेखात निर्देशिलेले सात उपदेश बौद्ध वाड्‍ःमयात सापडतात, ते येणेप्रमाणे:

  1. विनयसमुकसे = धम्मचक्कपवत्तनसुत्त
  2. अलियवसानि = अरियवंसा (अंगुत्तर चतुक्कनिपात)
  3. अनागतभयानि = अनागतभयानी (अंगुत्तर पञ्चकनिपात)
  4. मुनिगाथा = मुनिसुत्त (सुत्तनिपात)
  5. मोनेयसूते = नाळकसुत्त (सुत्तनिपात)
  6. उपतिसपसिने = सारिपुत्तसुत्त (सुत्तनिपात)
  7. लाघुलोवाद = राहुलोवाद (मज्झिम, सुत्त नं. ६१)

या सातांपैकी धम्मचक्कपवत्तन जिकडे तिकडे सापडते. तेव्हा याचे महत्त्व विशेष आहे हे सांगावयालाच नको; आणि त्याप्रमाणे ते अशोकाने अग्रभागी दिले आहे. बाकीच्यांपैकी तीन एका लहानशा सुत्तनिपातात आहेत. त्यावरून सुत्तनिपाताचे प्राचीनत्व सिद्ध होते. त्याच्या शेवटल्या दोन वग्गांवर व खग्गविसाणसुत्तावर निद्देस नावाची विस्तृत टीका असून तिचा समावेश ह्याच खुद्दकनिकायात करण्यात आला आहे. सुत्तनिपाताचे हे भाग निद्देसापूर्वी एकदोन शतके तरी अस्तित्वात होते असे समजले पाहिजे, आणि त्यावरून देखील सुत्तनिपाताचे प्राचीनत्व सिद्ध होते. त्यात सर्वच सुत्ते अतिप्राचीन असतील असे नव्हे. तथापि बहुतेक सुत्ते नि:संशय फार जुनी आहेत. प्रस्तुत ग्रंथात बुद्धचरित्रासंबंधाने किंवा बुद्धाच्या उपदेशासंबंधाने जी चर्चा करण्यात आली आहे ती अशाच प्राचीन सुत्तांच्या आधाराने.

आता आपण खास बुद्धचरित्राकडे वळू. त्रिपिटकात एकाच ठिकाणी सबंध बुद्धचरित्र नाही. ते जातकट्ठकथेच्या निदानकथेत सापडते. ही अट्ठकथा बुद्धघोषाच्या समकाली म्हणजे पाचव्या शतकात लिहिली असली पाहिजे. त्याच्यापूर्वी ज्या सिंहली अट्ठकथा होत्या त्यातील बराच मजकूर ह्या अट्ठकथेत आला आहे. हे बुद्धचरित्र मुख्यत्वे ललितविस्तराच्या आधारे लिहिले आहे. ललितविस्तर इसवी सनाच्या पहिल्या शतकात किंवा त्यापूर्वी काही वर्षे लिहिला असावा. तो महायानाचा ग्रंथ आहे; आणि त्यावरूनच जातकट्ठकथाकाराने आपली बुद्धचरित्राची कथा रचली आहे. ललितविस्तर देखील दीघनिकायातील महापदानसुत्ताच्या आधारे रचला आहे. त्या सुत्तात विपस्सी बुद्धाचे चरित्र फार विस्ताराने दिले आहे; आणि त्या चरित्रावरून ललितविस्तरकाराने आपले पुराण रचले. अशा रीतीने गोतम बुद्धाच्या चरित्रात भलत्याच गोष्टी शिरल्या.

महापदानसुत्तातील काही भाग निराळे काढून ते गोतम बुद्धाच्या चरित्राला सुत्तपिटकातच लागू केलेले दिसून येतात. उदाहरणार्थ, तीन प्रासादांची गोष्ट घ्या. विपस्सी राजकुमाराला राहण्यासाठी तीन राजवाडे होते, ह्या कथेवरून गोतम बुद्धाला राहण्यासाठी तसेच प्रासाद असले पाहिजेत, अशी कल्पना करून गोतम बुद्धाच्या तोंडीच असा मजकूर घातला आहे की, त्याला राहण्याला तीन प्रासाद होते; आणि तो त्या प्रासादात अत्यंत चैनीने राहत असे. ह्या कथेची असंभवनीयता मी दाखवून दिलीच आहे (पृष्ठ ८०). परंतु ती कथा अंगुत्तरनिकायात आली आहे, आणि त्याच निकायात अशोकाच्या भाब्रू शिलालेखातील दोन सुत्ते येतात. तेव्हा मला ती कथा एके काळी ऐतिहासिक भासली. पण विचारान्ती असे दिसून आले की ह्या अंगुत्तरनिकायात पुष्कळ भाग मागाहून घातले आहेत. तीन वस्तूंसंबंधाने ज्या गोष्टी असतील त्यांचा तिकनिपातात संग्रह केला. त्यात अर्वाचीनतेचा आणि प्राचीनतेचा विचार करण्यात आलेला दिसत नाही.

अशा कथांतून बुद्धचरित्रासंबंधाने विश्वसनीय गोष्टी कशा काढता येतील, दाखविण्याच्या उद्देशानेच मी हे पुस्तक लिहिले आहे. अशा काही उपयुक्त गोष्टी माझ्या दृष्टोत्पत्तीला आल्या नसतील; आणि ज्या काही गोष्टींना महत्त्व देऊ नये त्यांना माझ्याकडून महत्त्व दिले गेले असेल. पण संशोधन करण्याच्या पद्धतीत माझी चूक असेल, असे मला वाटत नाही. ह्या पद्धतीचा अवलंब केल्यास बुद्धचरित्रावर आणि त्याकाळच्या इतिहासावर विशेष प्रकाश पडेल, असा मला भरवसा वाटतो; आणि त्याच उद्देशाने मी हे पुस्तक लिहिले आहे. यातील काही लेख काही वर्षामागे ‘पुरातत्त्व’ नावाच्या त्रैमासिकात आणि ‘विविधज्ञानविस्तारा’त छापले होते. पण ते जसेच्या तसे या पुस्तकात घेतले नाहीत. त्यात पुष्कळच फेरफार केला आहे. त्यातला बराच मजकूर या पुस्तकात दाखल केला असला, तरी हे पुस्तक अगदी स्वतंत्र आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

प्रस्तुत ग्रंथाचे हस्तलिखित नवभारत ग्रंथमालेच्या संपादकांनी वाचून पाहिले, तेव्हा ग्रंथामध्ये ज्यांचे विशेष विवेचन आलेले नाही असे काही मुद्दे माझ्या नजरेस आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांचा येथेच थोडक्यात विचार करणे योग्य होईल असे वाटल्यावरून तसे करीत आहे.

१) बुद्धाच्या जन्मतिथीसंबंधाने निरनिराळ्या मतांचा उपन्यास करून साधकबाधक प्रमाणांनिशी ऊहापोह प्रस्तुत करावयास नको होता काय? आपल्या प्राचीन अथवा मध्ययुगीन इतिहासातील राज्यकर्ते, धर्मगुरू, ग्रंथकार इत्यादिकांचे चरित्र वर्णन 

करावयाच्या अगोदर त्यांचा काल ठरविण्यासाठी विद्वानांना पुष्कळच मजकूर खर्ची घालावा लागतो, तसे या ग्रंथांत केलेले दिसत नाही.

या मुद्दयासंबंधाने माझे म्हणणे असे: मध्ययुगीन कवि आणि ग्रंथकार हे शककर्ते नव्हते. त्यांच्या जन्मतिथीसंबंधी कितीही वाद केला तरी त्या नक्की ठरविता येतील असे वाटत नाही. बुद्धाची गोष्ट तशी नाही. त्याच्या परिनिर्वाणापासून तहत आजपर्यंत त्याचा शक चालू आहे. मध्यंतरी पाश्चात्य पंडितांनी वादविवाद करून ह्या तिथीत ५६ पासून ६५ वर्षांपर्यंत फरक आहे, असे सिद्ध करण्याची प्रयत्न केला. पण अखेरीस जी परंपरा सिंहलद्वीपात चालू आहे, तीच बरोबर ठरली. पण समजा बुद्धाच्या जन्मतिथीत थोडासा कमीजास्त फरक पडला तरी त्यापासून त्याच्या चरित्राला काही गौणत्व येईल असे वाटत नाही. मुद्दयाची गोष्ट जन्मतिथी नसून त्याच्या पूर्वीची स्थिति काय होती आणि त्या स्थितीतून बुद्धाने नवीन धर्ममार्ग कसा शोधून काढला ही होय; आणि ती जर विशद करता आली, तर आजकाल बुद्धासंबंधाने प्रचलित असलेल्या अनेक भ्रामक कल्पना नष्ट होतील व आम्हाला त्या काळचा इतिहास नीटपणे समजेल. तेव्हा तिथीवर पुष्कळ पाने खर्ची न घालता बुद्धाच्या चरित्रावर प्रकाश पडेल अशाच गोष्टींकडे मी विशेष लक्ष दिले आहे.

२) बुद्धाने उपदेशिलेल्या अहिंसेने हिंदी समाज नेभळट झाला व त्यामुळेच परकीयांकडून तो जिंकला गेला, असे मत कित्येक ठिकाणी प्रतिपादीले जाते. त्याला या ग्रंथात उत्तर असावयास पाहिजे होते.

उत्तर- बुद्धाच्या चरित्राचा आणि या प्रतिपादनाचा काही संबंध आहे, असे मला वाटत नाही. बुद्धाचे परिनिर्वाण इ.स. पूर्वी ५४३ व्या वर्षी झाले. त्यानंतर दोन शतकांनी चंद्रगुप्ताने साम्राज्य स्थापन केले. स्वतः चंद्रगुप्त जैनधर्मी होता असे म्हणतात. पण ग्रीक लोकांना या देशांतून हाकलून देण्याला अहिंसाधर्म त्याला आड आला नाही. त्याचा नातू अशोक पूर्णपणे बौद्ध झाला, तरी मोठे साम्राज्य चालवीत होता.

महंमद इब्न कासीम याने इ.स. ७१२ साली सिंध देशावर स्वारी केली, तेव्हा बौद्धधर्म पश्चिम हिंदुस्थानातून लोप पावला होता; आणि ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व वाढत गेले होते. असे असता खलिफाच्या या अल्पवयी सरदाराने सिंध देश हा हा म्हणता पादाक्रांत केला, आणि तेथील हिंदु राजाला ठार मारून त्याच्या मुली आपल्या खलिफाला नजराण्यादाखल पाठवून दिल्या.

मुसलमानांनी सिंध आणि पंजाब देशाचा काही भाग ताब्यात घेतल्यानंतर शंभर वर्षांनी शंकराचार्य उदयाला आले. त्यांच्या वेदान्ताचा सर्व रोख म्हटला म्हणजे शूद्रांनी वेदाध्ययन करता कामा नये हा! जर शूद्रांनी वेदवाक्य ऐकले, तर त्याचे कान शिशाने किंवा लाखेने भरावे; वेदवाक्य उच्चारले तर त्याची जीभ कापावी; आणि वेदमंत्र धारण केला तर त्याला ठार मारावे. हा त्यांचा वेदान्त! मुसलमान जेत्यांपासून तरी हे आमचे सनातनी धडा शिकले काय? बुद्ध तर त्यांचा शत्रूच, त्याच्यापासून शिकण्यासारखे होते काय?

रजपूत लोक चांगले सनातनी, ते अहिंसेला निखालस मानीत नसत. प्रसंग पडेल तेव्हा आपसात येथेच्छ लढाया करीत. हिंसेच्या ह्या शूर भक्तांना महमूद गझनीने घोड्याच्या पायाखालच्या धुळीसारखे उध्वस्त कसे केले? ते बुद्धाची अहिंसा मानीत होते म्हणून की काय?

आमची पेशवाई तर खास ब्राह्मणांच्याच हाती होती. शेवटला बाजीराव कर्मठपणाबद्दल प्रसिद्ध आहे. हिंसेची तर पेशवाईत परमावधि झाली. इतरांशी लढाया तर राहूच द्या, पण घरच्या घरीच एकदा दौलतराव शिंद्याने पुणे लुटले, तर दुस-यांदा यशवंतराव होळकराने लुटले! अशा या निस्सीम हिंसाभक्तांचे साम्राज्य सर्व हिंदुस्थानावर व्हावयास नको काय? त्यांना त्यांच्यापेक्षा शतपटीने अहिंसक असलेल्या इंग्रजांना शरण का जावे लागले? एकामागून एक मराठे सरदार इंग्रजांचे अंकित का झाले? ते बुद्धाचा उपदेश मानीत होते म्हणून काय?

जपान आजला हजार बाराशे वर्षे बौद्धधर्मी आहे. १८५३ साली त्यांच्यावर कमोडोर पेरीने तोफा रोखल्याबरोबर त्यांची जागृती होऊन एकी कशी झाली? बौद्धधर्माने त्यांना नेभळट का बनविले नाही?

या प्रश्नांची उत्तरे लब्धप्रतिष्ठित टीकाकारांनी अवश्य द्यावीत. ‘मिरविसि सुज्ञत्व वृथा अन्याला स्वकृत ताप लावूनि,’ हे आर्यार्ध मोरोपंताने जणू काय ह्या लब्धप्रतिष्ठित लोकांना उद्देशूनच लिहिले असावे! यांनी आणि यांच्या पूर्वजांनी जी पापे केली, त्यांचे सर्व खापर बुद्धावर फोडून हे खुशाल सोवळेपणाचा शहाणपणा मिरवीत फिरत आहेत!

३) बुद्धाच्या संबोधिज्ञानानंतर त्याच्या चरित्राचा कालक्रमपूर्वक आराखडा का देण्यात आला नाही?

उत्तर- सध्या उपलब्ध असलेल्या प्राचीन वाड्‍ःमयाच्या आधारे तसा आराखडा तयार करता येणे शक्य नाही. बुद्धाचे उपदेश कालक्रमपूर्वक दिलेले नाहीत. इतकेच नव्हे, तर जे उपदेश आहेत त्यांत पुष्कळच भर पडलेली आहे. त्यातून सत्य शोधून काढणे बरेच अवघड जाते. तो प्रयत्न मी या ग्रंथात केलाच आहे. पण कालक्रमानुसार बुद्धचरित्राचा आराखडा तयार करणे शक्य झाले नाही.

४) ‘वैदिक संस्कृति’ आर्यांचे भरतखंडात आगमन झाल्यानंतर उपस्थित झाली; त्यापूर्वी ‘दासांची’ म्हणजे ब्राह्मणांची संस्कृति होती याला आधार कोणते?

उत्तर- याचा विचार मी ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात केला आहे. तो ग्रंथ या पुस्तकाबरोबर वाचल्यास पुष्कळ गोष्टींचा नीट खुलासा होईल. माझे म्हणणे सर्व लोकांनी स्वीकारावे असा मुळीच आग्रह नाही. ते विचारणीय वाटल्यामुळे वाचकांसमोर मांडले आहे. ह्या दासांच्या आणि आर्यांच्या संस्कृतीचा बुद्धाच्या चरित्राशी फार थोडा सबंध येतो. त्या दोन्ही संस्कृतींच्या संघर्षाने उत्पन्न झालेली वैदिक संस्कृति बुद्धाच्या वेळी प्रतिष्टित होऊन बसली होती, एवढे दाखविण्यासाठी पहिले प्रकरण या ग्रंथात घातले आहे. 

५) उपनिषदे व गीता बुद्धानंतर रचली गेली याला आधार कोणते?

उत्तर- याची देखील सविस्तर चर्चा ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ या ग्रंथात येऊन गेली आहे, म्हणून त्या विषयाची पुनरुक्ति या पुस्तकात केली नाही. उपनिषदेच काय, तर आरण्यके देखील बुद्धानंतर लिहिली गेली हे मी सबळ पुराव्यानिशी दाखवून दिले आहे. शतपथ ब्राह्मणात आणि बृहदारण्यक उपनिषदात जी वंशावली दिली आहे, तिच्यावरून बुद्धानंतर ३५ पिढ्यांपर्यंत त्यांची परंपरा चालू होती, असे दिसते. हेमचंद्र रायचौधरी दर पिढीला तीस वर्षांचा काळ देतात. पण कमीत कमी पंचवीस वर्षांचा काळ दिला तरी बुद्धानंतर ८७५ वर्षापर्यंत ही परंपरा चालली होती, असे म्हणावे लागते. म्हणजे समुद्रगुप्ताच्या काळापर्यंत ही परंपरा चालू होती; आणि तेव्हा ब्राह्मण आणि उपनिषदे स्थिर झाली. त्यापूर्वी त्यांत यथायोग्य ठिकाणी फेरफार झाले नसतील, असे नाही. पालि वाड्‍ःमयाचा देखील असाच प्रकार झाला आहे. बुद्धघोषापूर्वी सरासरी दोनशे वर्षे पालि वाड्‍ःमय स्थिर झाले; आणि बुद्धघोषाने अट्ठकथा (टीका) लिहिल्यावर त्याच्यावर शेवटचा शिक्का बसला. उपनिषदांची टीका तर शंकराचार्यांनी नवव्या शतकात लिहिली. त्याच्यापूर्वी गौडपादाच्या माण्डूक्यकारिका लिहिल्या गेल्या. त्यात तर जिकडे तिकडे बुद्धाची स्तुति आहे. फार कशाला, अकबराच्या कारकीर्दीत लिहिलेल्या अल्लोपनिषदाचा देखील उपनिषदांत समावेश करण्यात आला आहे.

उपनिषदांनी आत्मवाद व तपश्चर्या श्रमण संप्रदायाकडून घेतली यात शंका बाळगण्याचे कारण नाही. का की, ह्या दोन गोष्टींचा यज्ञयागाच्या संस्कृतीशी काही एक संबंध नाही. आजकाल असे आर्य आणि ब्राह्मण समाज बायबलाचा एकेश्वरी वाद वेदांवर किंवा उपनिषदादिक ग्रंथांवर लादू पाहतात, तशाच रीतीने आत्मवाद आणि तपश्चर्या 

वेदांवर लादण्याचा उपनिषदांचा प्रयत्न दिसतो. मात्र त्यांनी श्रमणांची अहिंसा स्वीकारली नाही. तेवढ्याने ते वैदिक राहिले. असे असता कर्मठ मीमांसक आजला देखील उपनिषदांना वैदिक म्हणण्यास तयार नाहीत!

ज्यांना पालि वाड्‍ःमय किंवा त्याची इंग्रजी भाषान्तरे वाचणे शक्य असेल, त्यांना बौद्धकालीन इतिहास संशोधनाच्या कामी ह्या पुस्तकाचा उपयोग होईल अशी मी आशा बाळगतो; पण ज्यांना तशी सवड नसेल, त्यांनी निदान खाली दिलेली पाच पुस्तके अवश्य वाचावी.

१. बुद्ध, धर्म आणि संघ.

२. बुद्धलीलासारसंग्रह.

३. बौद्धसंघाचा परिचय

४. समाधिमार्ग.

५. हिंदी संस्कृति आणि अहिंसा.

हे पुस्तक लोकप्रियता संपादण्यासाठी लिहिले नाही; केवळ सत्यान्वेषणबुद्धीने लिहिले आहे. ते  लोकादराला कितपत पात्र होईल याची शंका आहे. असे असता सुविचार प्रकाशन मंडळाच्या संचालकांनी या पुस्तकाला आपल्या ग्रंथमालेत स्थान दिले, याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. निर्विकार मनाने प्राचीन इतिहासाचा विचार करणारे पुष्कळ महाराष्ट्रीय वाचक आहेत आणि ते ह्या ग्रंथाला आश्रय देऊन सुविचार प्रकाशन मंडळाचा प्रयत्न सफल करतील असा मला भरवसा वाटतो.

प्रा. श्रीनिवास नारायण बनहट्टी यांनी प्रुफे वाचण्याच्या कामी मदत केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.  

धर्मानंद कोसंबी

 

2 . तळटीपा

१. महापदान सुत्तातील विपस्सी बुद्धाच्या दन्तकथा गौतम बुद्धाच्या चरित्रात खण्डश: कशा शिरल्या वत्यांपैकी सुत्तपिटकात कोणत्या सापडतात, हे पहिल्या परिशिष्टात पाहावे.

२. ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’, पृ.४८-५० आणि १७०-१७२पाहा.

संदर्भ