सारांश
पारिभाषिक शब्द
बोधिसत्त्व , लुम्बिनी , शुद्धोदन , शाक्य , कालाम , कोसल , मायादेवी , समाधि , गृहत्याग , राहुल
1 . गोतमाची जन्मतिथि
गोतमाच्या जन्मतिथीसंबंधाने अर्वाचीन पंडितात बराच मतभेद आढळतो. दिवाण बहादूर स्वामीकन्नू पिल्ले यांच्या मते बुद्धाचे परिनिर्वाण ख्रिस्तापूर्वी ४७८ व्या वर्षी झाले. इतर काही पंडितांचे म्हणणे की, ते ख्रिस्तापूर्वी ४८६-८७ व्या वर्षी घडले. पण आजकाल लागलेल्या नवीन शोधावरून महावंस आणि दीपवंस यात दिलेली बुद्धपरिनिर्वाणाची तिथीच योग्य ठरते.१ या ग्रंथावरून बुद्धाचे परिनिर्वाण ख्रिस्तापूर्वी ५४३ व्या वर्षी झाले, असे सिद्ध होते; अणि बुद्धपरिनिर्वाणाची ही तिथि गृहीत धरली, तर बुद्धाचा जन्म ख्रिस्तापूर्वी ६२३ व्या वर्षी झाला असे म्हणावे लागते.
2 . बोधिसत्त्व
गोतमाच्या जन्मापासून बुद्धत्वापर्यंत त्याला बोधिसत्त्व म्हणण्याची वहिवाट फार प्राचीन आहे. पालि वाड्ःमयात सगळ्यात प्राचीन जो सुत्तनिपात त्यात म्हटले आहे की,
सो बोधिसत्तो रतनवरो अतुल्यो |
मनुस्सलोके हितसुखताय जातो |
सक्यानं गामे जनपदे लुम्बिनेय्ये |
श्रेष्ठ रत्नाप्रमाणे अतुलनीय असा जो बोधिसत्त्व लुम्बिनी जनपदात शाक्यांच्या गावी मानवांच्या हितसुखासाठी जन्मला.
बोधि म्हणजे मनुष्याच्या उद्धाराचे ज्ञान, आणि त्यासाठी प्रयत्न करणारा जो प्राणि (सत्त्व) तो बोधिसत्त्व होय. आरंभी गोतमाच्या जन्मापासून त्याला संबोधिज्ञान होईपर्यंत हे विशेषण लावीत असावे. होता होता त्याने त्या जन्मापूर्वी दुसरे अनेक जन्म घेतले, अशी कल्पना प्रचलित झाली; आणि त्या पूर्व जन्मात देखील त्याला बोधिसत्त्व हे विशेषण लावण्यात येऊ लागले. त्याच्या पूर्वजन्मीच्या कथांचा संग्रह जातकात केला आहे; त्या गोष्टींमध्ये जे कोणी मुख्य पात्र असेल, त्याला बोधिसत्त्व ही संज्ञा लावून तो पूर्वजन्मीचा गोतमच होता असे म्हटले आहे. ज्या कथेत योग्य पात्र सापडले नाही, तेथे बोधिसत्त्वाला कथेशी विशेष संबंध नसलेल्या एखाद्या वनदेवतेचे किंवा दुस-या एखाद्या व्यक्तीचे स्वरूप देऊन कसा तरी संबंध जुळवून आणला आहे. अस्तु. येथे गोतमाच्या जन्मापासून बुद्धत्वापर्यंत त्याला बोधिसत्त्व या नावाने संबोधावयाचे आहे. त्याच्या पूर्वजन्माशी या विशेषणाचा काही संबंध नाही, असे समजावे.
3 . बोधिसत्त्वाचे कुल
बोधिसत्त्वाच्या कुळाची आणि बालपणाची माहिती त्रिपिटकात फार थोडी सापडते. ती प्रसंगवशात् उपदेशिलेल्या सुत्तांत आली असून तिचा आणि अट्ठकथांत सापडणा-या माहितीचा कधी कधी मुळीच मेळ बसत नाही. यास्तव, या परस्परविरोधी माहितीची नीट छाननी करून त्यातून काय निष्पन्न होते ते पाहणे योग्य आहे.
मज्झिमनिकायाच्या चूळदुक्खक्खन्ध सुत्ताच्या अट्ठकथेत गोतमाच्या कुटुंबाची माहिती सापडते ती अशी-
“शुद्धोदन, शुक्लोदन, शाक्योदन, धोतोदन आणि अमितोदन हे पाच भाऊ. अमितादेवी त्यांची बहीण. तिष्यस्थविर तिचा मुलगा. तथागत आणि नंद शुद्धोदनाचे मुलगे. महानाम आणि अनुरुद्ध शुक्लोदनाचे आणि आनन्दस्थविर अमितोदनाचा मुलगा. तो भगवंतापेक्षा लहान आणि महानाम मोठा.”
येथे दिलेल्या अनुक्रमाप्रमाणे अमितोदन शेवटला भाऊ दिसतो व त्याचा मुलगा आनंद भगवंतापेक्षा वयाने लहान होता, हे ठीकच आहे. परंतु मनोरथपूरणी अट्ठकथेत अनुरुद्धासंबंधाने लिहिताना ‘अमितोदनसक्कस गेहे पटिसंधिं गण्ही’ (अमितोदन शाक्याच्या घरी जन्मला) असे म्हटले आहे!२ एकाच बुद्धघोषाचार्याने लिहिलेल्या दोन अट्ठकथांत असा विरोध दिसतो. पहिल्या अट्ठकथेत आनंद अमितोदनाचा मुलगा होता असे म्हणतो; आणि दुस-या अट्ठकथेत अनुरुद्ध त्याचा मुलगा म्हणतो. तेव्हा शुक्लोदन इत्यादि नावे देखील काल्पनिक आहेत की काय असा संशय येतो.
4 . बोधिसत्त्वाचे जन्मस्थान
सुत्तनिपाताच्या वर दिलेल्या अवतरणात बुद्धाचा जन्म लुम्बिनी जनपदात झाला असे आहे. आजला देखील या ठिकाणाला लुम्बिनीदेवी असे म्हणतात आणि त्या ठिकाणी जो जमिनीत गाडून गेलेला अशोकाचा शिलास्तंभ सापडला, त्याच्यावरील लेखात “लुंमिनिगामे उबालिके कते” हे वाक्य आहे. अर्थात् बोधिसत्त्वाचा जन्म लुम्बिनी गावात झाला असे पूर्णपणे सिद्ध होते.
दुस-या अनेक सुत्तांतून महानाम शाक्य कपिलवस्तूचा राहणारा होता अशा अर्थाचा उल्लेख सापडतो. पण शुद्धोदन कपिलवस्तूत होता असा महावग्गात तेवढा उल्लेख आहे. लुम्बिनीग्राम आणि कपिलवस्तु यांच्यामध्ये १४/१५ मैलाचे अंतर होते. तेव्हा शुद्धोदन कधी कधी लुम्बिनी गावाच्या आपल्या जमीनदारीत राहत होता व तेथेच बोधिसत्त्व जन्मला असे म्हणावे लागेल. पण खाली दिलेल्या अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपातातील १२४ व्या सुत्तावरून या विधानालाही बळकट बाधा येते.
5 . कालामाचा आश्रम
एके समयी भगवान कोसल देशात प्रवास करीत करीत कपिलवस्तूला आला. तो आल्याचे वर्तमान ऐकून महानाम शाक्याने त्याची भेट घेतली. तेव्हा महानामाला त्याने आपणाला एक रात्र राहण्यासाठी जागा पाहण्यास सांगितले. परंतु भगवंताला राहण्यासाठी योग्य जागा महानामाला कोठेच सापडली नाही. परत येऊन तो भगवंताला म्हणाला, “भदन्त, आपणासाठी योग्य जागा मला सापडत नाही. आपला पूर्वीचा सब्रह्मचारी भरण्डु कालाम याच्या आश्रमात आपण एक रात्र राहा.” भगवंताने महानामाला तेथे आसन तयार करावयास सांगितले व तो त्या रात्री त्या आश्रमात राहिला.
दुस-या दिवशी सकाळी महानाम भगवंताच्या भेटीला गेला. तेव्हा भगवान त्याला म्हणाला, “या लोकी, हे महानाम, तीन प्रकारचे धर्मगुरू आहेत. पहिला कामोपभोगांचा समतिक्रम (त्याग) दाखवितो, पण रूपांचा आणि वेदनांचा समतिक्रम दाखवीत नाही. दुसरा कामोपभोगांचा व रूपांचा समतिक्रम दाखवतो, पण वेदनांचा समतिक्रम दाखवीत नाही. तिसरा ह्या तिहिंचाही समतिक्रम दाखवितो. ह्या धर्मगुरुंचे ध्येय एक आहे की भिन्न आहे?”
त्यावर भरण्डु कालाम म्हणाला, “हे महानाम, या सर्वांचे ध्येय एकच आहे असे म्हण.” पण भगवान म्हणाला, “महानामा, त्यांचे ध्येय भिन्न आहे असे म्हण.” दुस-यांदा व तिस-यांदाही भरण्डुने त्यांचे एकच ध्येय असे म्हणण्यास सांगितले; व भगवंताने त्यांची ध्येये भिन्न आहेत असे म्हणण्यास सांगितले. महानामासारख्या प्रभावशाली शाक्यासमोर श्रमण गोतमाने आपला उपमर्द केला असे वाटून भरण्डु कालाम जो कपिलवस्तूहून चालता झाला, तो कधीही परत आला नाही.
6 . भरण्डु-कालाम-सुत्तावरून होणारा उलगडा
या सुत्ताचे समग्र भाषांतर येथे दिले आहे. त्यावरून बुद्ध चरित्रातील दोन तीन गोष्टींचा चांगला उलगडा होतो. त्यात पहिली ही की, बुद्ध झाल्यानंतर भगवान गोतम मोठ्या भिक्षुसंघासह कपिलवस्तूला आले नाही; आणि त्याचा शाक्यांनी बहुमान केला नाही. तो एकाकी आला अणि त्याच्यासाठी योग्य जागा शोधण्याला महानामाला मोठा त्रास पडला. शुद्धोदन राजाने जर बोधिसत्त्वासाठी तीन प्रासाद बांधले होते, तर त्यापैकी एक खाली करून बुद्धाला का देण्यात आला नाही? शाक्यांचे कपिलवस्तूमध्ये एक संस्थागार (म्हणजे नगर-मंदिर) असल्याचा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. बुद्धाच्या उतार वयात शाक्यांनी हे संस्थागार पुन: बांधले आणि त्यात प्रथमतः बुद्धाला भिक्षुसंघासह एक रात्र राहावयास विनंती करून धर्मोपदेश करावयास लावले.३ पण वरच्या प्रसंगी बुद्धाला त्या संस्थागारात राहण्यास मिळाले नाही. म्हणजे बुद्ध शाक्यांपैकी एक सामान्य तरुण असून त्याची कपिलवस्तूत फारशी महती नव्हती असे दिसते.
दुसरी गोष्ट ही की, गोतमाने गृहत्याग करण्यापूर्वी कपिलवस्तूमध्ये हा कालामाचा आश्रम अस्तित्वात होता. कालामाचा धर्म जाणण्यासाठी त्याला मगधांच्या राजगृहापर्यंत प्रवास करण्याची मुळीच आवश्यकता नव्हती. कालामाचे तत्त्वज्ञान तो कपिलवस्तूमध्ये शिकला, हे या सुत्तावरूनच सिद्ध होते.
तिसरी गोष्ट ही की, महानाम शाक्य बुद्धाचा चुलतभाऊ असता तर त्याची व्यवस्था त्याने भरण्डु कालामाच्या आश्रमात न करता आपल्या घराशेजारी कोठे तरी प्रशस्त जागी केली असती. श्रमण गृहस्थाच्या घरी तीन दिवसांपेक्षा जास्त राहत नसत. येथे तर एका रात्रीपुरतीच राहण्याची व्यवस्था पाहिजे होती; आणि ती देखील महानामाला आपल्या घरी किंवा आपल्या अतिथीगृहात करता आली नाही. एक तर महानामाचे घर अगदीच लहान असावे, किंवा बुद्धाला एक रात्र आश्रय देण्याचे त्याला कारण वाटले नसावे.
या सर्व गोष्टींचा विचार केला असता असे वाटते की, महानाम शाक्य आणि भगवान बुद्ध यांचा फार निकट संबंध नव्हता; आणि शुद्धोदन शाक्य तर कपिलवस्तूहून चौदा मैलांच्या अंतरावर राहत होता. त्याचा आणि कपिलवस्तूचा फार थोडा संबंध असावा. शाक्यांची सभा भरली, तरच तो कपिलवस्तूला जात असावा.
7 . भद्दिय राजाची कथा
महापदानसुत्तात शुद्धोदनाला राजा म्हटले असून त्याची राजधानी कपिलवस्तू होती असे म्हटले आहे. परंतु विनयपिटकातील चुल्लवग्गात जी भद्दियाची कथा आली आहे, तिचा या विधानाशी पूर्णपणे विरोध येतो.
अनुरुद्धाचा थोरला भाऊ महानाम पित्याच्या मरणानंतर घरची सर्व व्यवस्था पाहत असे. अनुरुद्धाला प्रपंचाची माहिती मुळीच नव्हती. बुद्ध भगवंताची सर्वत्र प्रसिद्धी झाल्यावर थोर थोर शाक्य कुळातील तरुण भिक्षु होऊन त्याच्या संघात प्रवेश करू लागले. हे पाहून महानाम अनुरुद्धाला म्हणाला, “आमच्या कुळातून एकही भिक्षु झाला नाही, तेव्हा तू तरी भिक्षु हो, किंवा मी तरी भिक्षु होतो.” अनुरुद्ध म्हणाला, “मला हे काम झेपणार नाह; तुम्हीच भिक्षु व्हा.”
महानामाने ही गोष्ट कबूल केली व धाकट्या भावाला तो प्रपंचाची माहिती करून देऊ लागला. तो म्हणाला, “प्रथमत: शेत नांगरले पाहिजे. नंतर पेरणी केली पाहिजे. त्यानंतर त्याला कालव्याचे पाणी द्यावे लागते. पाणी बाहेर काढून त्याची खुरपणी करतात आणि ते पिकले म्हणजे कापणी करावी लागते.”
अनुरुद्ध म्हणाला, “ही खटपट फारच मोठी दिसते. घरचा व्यवहार तुम्हीच सांभाळा. मी भिक्षु होतो.” पण या कामी त्याला आपल्या आईची संमति मिळेना आणि तो तर हट्ट धरून बसला. तेव्हा ती म्हणाली, “शाक्यांचा राजा भद्दिय जर तुझ्याबरोबर भिक्षु होत असेल तर मी तुला भिक्षु होण्यास परवानगी देते.”
भद्दिय राजा अनुरुद्धाचा मित्र होता. पण तो राज्यपद सोडून भिक्षु होणार नाही, असे अनुरुद्धाच्या आईला वाटले, आणि म्हणूनच तिने ही अट घातली. अनुरुद्ध आपल्या मित्राजवळ जाऊन त्यालाही भिक्षु होण्यास आग्रह करू लागला. तेव्हा भद्दिय म्हणाला, “तू सात वर्षे थांब, मग आपण भिक्षु होऊ” पण इतकी वर्षे अनुरुद्ध वाट पाहण्याला तयार नव्हता. सहा वर्षे, पाच वर्षे, चार वर्षे, तीन, दोन, एक वर्ष, सात महिने, असे करता करता भद्दिय सात दिवसांनी अनुरुद्धाबरोबर जाण्यास कबूल झाला आणि सात दिवसानंतर भद्दिय, अनुरुद्ध, आनंद, भगु, किम्बिल व देवदत हे सहा शाक्यपुत्र आणि त्यांच्याबरोबर उपालि नावाचा न्हावी असे सात असामी चतुरंगिनी सेना सज्ज करून त्या सेनेसह कपिलवस्तूपासून दूर अंतरावर गेले; व तेथून सैन्य मागे फिरवून त्यांनी शाक्य देशाची सीमा उल्लंघिली. त्या वेळी भगवान मल्लांच्या अनुप्रिय नावाच्या गावी राहत होता. तेथे जाऊन या सात असामींनी प्रव्रज्या घेतली.
8 . भद्दियाच्या कथेवरून निघणारा निष्कर्ष
बुद्ध भगवंताची कीर्ति ऐकून पुष्कळ शाक्य कुमार भिक्षु होऊ लागले; आणि तोपर्यंत शाक्यांच्या गादीवर भद्दिय राजा होता. मग शुद्धोदन राजा झाला कधी ? शाक्यांच्या राजाला सगळे शाक्य एकत्रित होऊन निवडीत असत, किंवा त्याची नेमणूक कोसल महाराजाकडून होत असे, हे सांगता येत नाही. शाक्यांनी जर त्याची निवड केली म्हणावी, तर त्यांना त्याच्यापेक्षा वडील महानाम शाक्यासारखा एखादा शाक्य सहज निवडता आला असता. याशिवाय अंगुत्तरनिकायाच्या पहिल्या निपातात, उच्च कुलात जन्मलेल्या माझ्या भिक्षुश्रावकात कालिगोधेचा पुत्र भद्दिय श्रेष्ठ आहे, असे बुद्धवचन सापडते. केवळ उच्च कुळात जन्मल्याने शाक्यांसारखे गणराजे भद्दियाला आपला राजा करतील हे संभवनीय दिसत नाही. कोसल देशाच्या पसेनदि राजाकडूनच त्याची नेमणूक झाली असावी, हे विशेष ग्राह्य दिसते. काही झाले तरी शुद्धोदन कधीही शाक्यांचा राजा झाला नाही, असे म्हणावे लागते.
9 . शाक्यांचा मुख्य धंदा शेती
त्रिपिटक वाड्ःमयात मिळणा-या माहितीची अशोकाच्या लुम्बिनीदेवी येथील शिलालेखाच्या आधारे छाननी केली असता असे दिसून येते की, शुद्धोदन शाक्यांपैकी एक असून लुम्बिनी गावात राहत होता, आणि तेथेच बोधिसत्त्व जन्मला. वर दिलेल्या महानामाच्या आणि अनुरुद्धाच्या संवादावरून सिद्ध होते की, शाक्यांचा मुख्य धंदा शेतीचा होता. महानामासारखे शाक्य जसे स्वत: शेती करीत; तसाच शुद्धोदन शाक्यही करीत होता. जातकाच्या निदानकथेत शुद्धोदनाला महाराजा बनवून त्याच्या शेतीचे वर्णन केले आहे, ते येणेप्रमाणे-
“एके दिवशी राजाच्या पेरणीचा समारंभ (वप्पमंगलं) होता. त्या दिवशी सगळे शहर देवांच्या विमानाप्रमाणे शृंगारीत असत. सर्व दास आणि कामगार नवीन वस्त्र नेसून आणि गंधमालादिकांनी भूषित होऊन राजवाड्यात एकत्र होत. राजाच्या शेतीवर एक हजार नांगरांचा उपयोग होत असे. त्या दिवशी सातशे नव्याण्णव नांगरांच्या दो-या, बैल आणि बैलांची वेसणे रूप्याने मढवलेली असत आणि राजाचा नांगर वगैरे शंभर नंबरी सोन्याने मढविलेली असत... राजा सोन्याने मढविलेला नांगर धरी आणि रुप्याने मढविलेले सातशे नव्याण्णव नांगर अमात्य धरीत. बाकीचे (२००) इतर लोक घेत व सर्वजण मिळून शेत नांगरीत. राजा सरळ इकडे तिकडे नांगर फिरवीत असे.”
या कथेत पराचा कावळा झाला असला तरी एवढे तथ्य आहे की, शुद्धोदन स्वतः शेती करीत होता. आजकाल महाराष्ट्रात आणि गुजराथेत जसे वतनदार पाटील स्वतः शेती करतात आणि मजुरांकडूनही करवून घेतात, त्यांच्यासारखेच शाक्य होते. फरक एवढाच की, आजकालच्या पाटलांना राजकीय अधिकार फार थोडे आहेत आणि शाक्यांना ते बरेच होते. आपल्या जमिनीतील कुळांचा आणि मजुरांचा न्याय ते स्वत: करीत व आपल्या देशाची अन्तर्गत व्यवस्था संस्थागारात एकत्र जमून पाहत असत. परस्परांमध्ये काही तंटा बखेडा उपस्थित झाला, तर त्याचा निकाल ते स्वतःच देत. मात्र कोणाला हद्दपार करावयाचे असले किंवा फाशी द्यावयाचे असले तर त्यासाठी त्यांना कोसल राजाची परवानगी घ्यावी लागत असे, असे चुळसच्चकसुत्तांतील खालील संवादावरून दिसून येईल-
“भगवान म्हणतात, ‘हे अग्गिवेसन, पसेनदि कोसलासारख्या किंवा मगधांच्या अजातशत्रूसारख्या मूर्धावसिक्त राजाला आपल्या प्रजेपैकी एखाद्या अपराध्याला देहांतशिक्षा देण्याचा, दंड करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा पूर्ण अधिकार आहे की नाही?’ ”
“सच्चक, ‘भो गोतम, वज्जी आणि मल्ल या गणराजांना देखील आपल्या राज्यातील अपराध्याला फाशी देण्याचा, दंड करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा अधिकार आहे; तर मग पसेनदि कोसल राजाला किंवा अजातशत्रूला हा अधिकार आहे हे सांगावयास नको.’ ”
या संवादावरून जाणता येईल की, गणराज्यांपैकी वज्जींचे आणि मल्लांचे तेवढे पूर्ण स्वातंत्र्य कायम होते; आणि शाक्य, कोलिय, काशी, अंग इत्यादि गणराजांना अपराध्याला देहान्त शासन देण्याचा, तसाच मोठा दंड करण्याचा किंवा हद्दपार करण्याचा अधिकार राहिला नव्हता. त्यासाठी शाक्य, कोलिय व काशी या गणराजांना कोसल राजाची व अंग गणराजांना मगधराजाची परवानगी घ्यावी लागत असे.
10 . मायादेवीची माहिती
बोधिसत्त्वाच्या आईची माहिती फारच थोडी मिळते. तिचे नाव मायादेवी होते, यात शंका नाही. पण शुद्धोदनाचे लग्न कोणत्या वयात झाले आणि मायादेवी बोधिसत्त्वाला कोणत्या वयात प्रसवली, इत्यादि गोष्टींची माहिती कोठेच सापडत नाही. अपदान ग्रंथात महाप्रजापती गोतमीचे एक अपदान आहे. त्यात ती म्हणते-
पच्छिमे च भवे दानि जाता देवदहे पुरे |
पिता अञ्जनसक्को मे माता सुलख्खणा ||
ततो कपिलवत्थुस्मिं सुद्धोदनघरं गता |
‘आणि ह्या शेवटल्या जन्मी मी देवदह नगरात जन्मले. माझा पिता अञ्जन शाक्य, आणि माझी माता सुलक्षणा. नंतर (वयात आल्यावर) मी कपिलवस्तूला शुद्धोदनाच्या घरी गेले. (म्हणजे शुद्धोदनाबरोबर माझे लग्न झाले.)’
या गोतमीच्या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे सांगता येत नाही. ‘कपिलवस्तूला शुद्धोदनाच्या घरी गेले,’ हे म्हणणे वर दिलेल्या विवेचनाशी जुळत नाही.४ पण ज्या अर्थी अञ्जनशाक्याची आणि सुलक्षणेची ही मुलगी होती, ह्या म्हणण्याला बाधा येईल असा मजकूर कोठेच सापडला नाही, त्या अर्थी ती व तिची वडील बहीण मायादेवी अञ्जनशाक्याच्या मुली होत्या व त्या दोघींचीही लग्ने शुद्धोदनाबरोबर झाली, असे म्हणण्यास हरकत नाही. पण ती लग्ने एकदम झाली की कालान्तराने झाली हे समजण्यास मार्ग नाही.
बोधिसत्त्व जन्मल्यावर सातव्या दिवशी मायादेवी परलोकवासी झाली, ही गोष्ट बौद्ध वाड्ःमयात सुप्रसिद्ध आहे. त्यानंतर बोधिसत्त्वाची हयगय होऊ लागल्याकारणाने शुद्धोदनाने मायादेवीच्या धाकट्या बहिणीशी लग्न केले असावे हे विशेष संभवनीय दिसते. एवढे खरे की गोतमीने बोधिसत्त्वाचे लालनपालन आईप्रमाणे अत्यंत प्रेमाने केले. त्याला ख-या आईची कधीच वाण भासली नसावी.
11 . बोधिसत्त्वाचा जन्म
“मायावती दहा महिन्यांची गरोदर होती. तेव्हा तिने माहेरी जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. शुद्धोदन राजाने तिची इच्छा जाणून कपिलवस्तूपासून देवदह नगरापर्यंत सर्व मार्ग साफसूफ करून ध्वजपताकादिकांनी शृंगारला, आणि तिची सोन्याच्या पालखीतून मोठ्या लवाजम्यासह माहेरी रवानगी केली. तिकडे जात असता वाटेत लुम्बिनीवनात ती एका शाल वृक्षाखाली प्रसूत झाली.” हा जातकाच्या निदानकथेतील वर्णनाचा सारांश. शुद्धोदन राजा जर एक सामान्य जमीनदार होता तर तो एवढा सगळा मार्ग शृंगारू शकेल हे संभवनीयच नाही. दुसरे हे की, दश मास पूर्ण झाल्यावर गरोदर स्त्रीला कोणीही माहेरी पाठविणार नाहीत. तेव्हा या गोष्टीत फारच अल्प तथ्य आहे असे दिसते.
महापदानसुत्तात बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो. तिथपासून जन्मल्यानंतर सात दिवसांचा होईपर्यंत एकंदरीत सोळा लोकोत्तर विशेष (धम्मता) घडून येतात, असे वर्णिले आहे. त्यापैकी (९) बोधिसत्त्वाची आई दहा महिने पूर्ण झाल्यावरच प्रसूत होते, (१०) ती उभी असताना प्रसूत होते आणि (८) बोधिसत्त्व जन्मल्यावर सात दिवसांनी मरण पावते. हे तीन लोकोत्तर विशेष गोतम बोधिसत्त्वाच्या आयुष्यातून घेतले असावेत. बाकीचे सर्व काल्पनिक असून हळूहळू त्यांचाही प्रवेश गोतमाच्या चरित्रात झाला असे दिसते. सारांश, बोधिसत्त्वाची माता उभी असताना प्रसूत झाली आणि त्याच्या जन्मानंतर सात दिवसांनी निवर्तली असे गृहीत धरून चालण्यास हरकत नाही. जातकाच्या निदानकथेत ती शाल वृक्षाखाली प्रसूत झाली आणि ललितविस्तरात प्लक्ष वृक्षाखाली झाली असे वर्णन आहे. लुम्बिनी गावात शुद्धोदनाच्या घरी बाहेर बगीच्यात फिरत असता ती प्रसूत झाली, मग ती शाल वृक्षाखाली असो किंवा प्लक्ष वृक्षाखाली असो. मात्र उभी असताना प्रसूत झाली, एवढेच ह्या वर्णनात तथ्य आहे, असे समजावे.
12 . बोधिसत्त्वाचे भविष्य
“बोधिसत्त्व जन्मल्यानंतर त्याला मातेसह घरी आणून शुद्धोदनाने मोठमोठ्या पंडित ब्राह्मणांकडून त्याचे भविष्य वर्तविले. पंडितांनी त्याची बत्तीस लक्षणे पाहून हा एकतर चक्रवर्ती राजा होणार किंवा सम्यक् संबुद्ध होणार असे भविष्य सांगितले.” अशा अर्थाची विस्तृत वर्णने जातकाच्या निदानकथेत, ललितविस्तरात आणि बुद्धचरित काव्यात आली आहेत. त्या काळी या लक्षणांवर लोकांचा फार भरवसा होता यात शंका नाही. त्रिपिटक वाड्ःमयात त्यांचा अनेक ठिकाणी सविस्तर उल्लेख आला आहे. पोक्खरसाति ब्राह्मणाने तरुण अम्बष्ठाला बुद्धाच्या शरीरावर ही लक्षणे आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी पाठविले. त्याने तीस लक्षणे स्पष्ट पाहिली; पण त्याला दोन दिसेनात. बुद्धाने अद्भूत चमत्कार करून ती त्याला दाखविली.५ अशा रीतीने बुद्धचरित्राशी या लक्षणाचा जिकडे तिकडे संबंध दाखविला आहे. बुद्धाची थोरवी गाण्याचा हा भक्तजनांचा प्रयत्न असल्यामुळे त्यात विशेष तथ्य आहे असे समजण्याची आवश्यकता नाही. तथापि बोधिसत्त्वाच्या जन्मानंतर असित ऋषीने येऊन त्याचे भविष्य वर्तविले, ही कथा फार प्राचीन दिसते. तिचे वर्णन सुत्तनिपातातील नालकसुत्ताच्या प्रस्तावनेत सापडते. त्याचा गोषवारा येथे देतो.
“चांगली वस्त्रे नेसून व इंद्राचा सत्कार करून देव आपली उपवस्त्रे आकाशात फेकून उत्सव करीत होते. त्यांना असित ऋषीने पाहिले आणि हा उत्सव कशासाठी आहे असे विचारले. लुम्बिनीग्रामात शाक्यकुलात बोधिसत्त्वाचा जन्म झाला आहे व त्यामुळे आपण उत्सव करीत आहोत, असे त्या देवांनी असिताला सांगितले. ते ऐकून असित ऋषि नम्रपणे शुद्धोदनाच्या घरी आला आणि त्याने कुमाराला पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. शाक्यांनी बोधिसत्त्वाला असितासमोर आणले, तेव्हा त्याची लक्षणसंपन्नता पाहून ‘हा मनुष्यप्राण्यात सर्वश्रेष्ठ आहे,’ असे उद्गार असिताच्या तोंडून निघाले. पण आपले आयुष्य थोडे राहिले आहे, हे लक्षात आल्याने असितऋषीच्या डोळ्यातून आसवे गळू लागली. ते पाहून कुमाराच्या जीवाला काही धोका आहे की काय, असा शाक्यांनी प्रश्न केला. तेव्हा असिताने, ‘हा कुमार पुढे संबुद्ध होणार आहे, परंतु माझे आयुष्य थोडेच अवशिष्ट राहिले असल्यामुळे मला त्याचा धर्म श्रवण करण्याची संधी मिळणार नाही, म्हणून वाईट वाटते,’ असे सांगून शाक्यांचे समाधान केले आणि त्यांना आनंदित करून असित ऋषि तेथून निघून गेला.”
13 . बोधिसत्त्वाचे नाव
स शाक्यसिंह: सर्वार्थसिद्धः शौद्धोदनिश्च सः |
गौतमश्चार्कबंधुश्च मायादेवीसुतश्च सः ||
अमरकोशात ही बोधिसत्त्वाची सहा नावे दिली आहेत. त्यापैकी शाक्यसिंह, शौद्धोदनि आणि मायादेवीसुत ही तीन विशेषणे व अर्कबंधु हे त्याच्या गोत्राचे नाव आहे. बाकी सर्वार्थसिद्ध आणि गौतम या दोन नावांपैकी त्याचे खरे नाव कोणते? किंवा ही दोन्हीही त्याची नावे होती की काय? असा प्रश्न उपस्थित होतो.
त्रिपिटक वाड्ःमयात बोधिसत्त्वाचे सर्वार्थसिद्ध नाव आहे, असा उल्लेख कोठेच सापडला नाही. जातकाच्या निदानकथेत तेवढे सिद्धत्थ (सिद्धार्थ) हे त्याचे नाव आले आहे. पण ते देखील ललितविस्तरावरून घेतले असावे. त्या ग्रंथात म्हटले आहे की-
‘अस्य हि जातमात्रेण मम सर्वार्था: संसिद्धा: | यन्न्वहमस्य सर्वार्थसिद्ध इति नाम कुर्याम् | ततो राजा बोधिसत्त्वं महता सत्कारेण सत्कृत्य सर्वार्थसिद्धोऽयं कुमारो नाम्ना भवतु इति नामास्याकार्षीत् ||’
सर्वार्थसिद्ध हेच नाव अमरकोशात दिले आहे. पण ललितविस्तरात बोधिसत्त्वाला वारंवार सिद्धार्थकुमार असेही म्हटले आहे आणि त्याचे ‘सिद्धत्थ’ हे पालि रूपांतर. सर्वार्थसिद्ध याचे पालि रूपान्तर सब्बत्थसिद्ध असे झाले असते; आणि चमत्कारिक दिसत असल्यामुळे जातकअट्ठकथाकाराने सिद्धत्थ हेच नाव वापरले असावे. अर्थात् सर्वार्थसिद्ध किंवा सिद्धार्थ ही दोन्ही नावे ललितविस्तरकाराच्या अथवा तशाच एखाद्या बुद्धभक्त कवीच्या कल्पनेतून निघाली असली पाहिजेत.
बोधिसत्त्वाचे खरे नाव गोतम होते यात शंका नाही. थेरीगाथेत महाप्रजापती गोतमीच्या ज्या गाथा आहेत त्यापैकी एक ही-
बहूनं वत अत्थाय माया जनयि गोतमं |
व्याधिमरणतुन्नानं दुक्खक्खन्धं व्यपानुदि ||
‘पुष्कळांच्या कल्याणासाठी मायेने गोतमाला जन्म दिला. व्याधि आणि मरण ह्यांनी पीडित झालेल्या जनांचा दुःखराशि त्याने नष्ट केला.’
परंतु महापदानसुत्तात बुद्धाला ‘गोतमो गोत्तेन’ असे म्हटले आहे. त्याचप्रमाणे अपदानग्रंथात अनेक ठिकाणी ‘गोतमी नाम नामेन’ आणि ‘गोतमी नाम गोत्तेन’ असे दोन प्रकारचे उल्लेख सापडतात. त्यावरून बोधिसत्त्वाचे नाम आणि गोत्र एकच होते की काय असा संशय येतो. पण सुत्तनिपातातील खालील गाथांवरून तो दूर होण्याजोगा आहे.
उजुं जानपदो राजा हिमवन्तस्स पस्सतो |
धनविरियेन संपन्नो कोसलेसु निकेतिनो ||
आदिच्चा नाम गोत्तेन साकिया नाम जातिया |
तम्हा कुला पब्बजितोऽम्हि राज न कामे अभिपत्थयं ||
(पब्बज्जासुत्त, गा. १८-१९).
(बोधिसत्त्व बिंबिसार राजाला म्हणतो)- ‘हे राजा, येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशी एक धनाने आणि शौर्याने संपन्न असा प्रदेश आहे. कोसल राष्ट्रात त्याचा समावेश होतो. तेथल्या लोकांचे गोत्र आदित्य असून त्यांना शाक्य म्हणतात. त्या कुळातून मी परिव्राजक झालो, तो, हे राजा, कामोपभोगांच्या इच्छेने नव्हे.’
या गाथांत शाक्यांचे गोत्र आदित्य होते असे म्हटले आहे. एकाच काळी आदित्य आणि गोतम ही दोन गोत्रे असणे शक्य दिसत नाही. सुत्तनिपात प्राचीनतम असल्यामुळे आदित्य हेच शाक्यांचे खरे गोत्र असावे. वर दिलेल्या अमरकोशाच्या श्लोकात अर्कबंधु हे जे बुद्धाचे नाव, ते त्याचे गोत्रनाव आहे असे समजले पाहिजे. कारण ते ‘आदिच्चा नाम गोत्तेने’ या वाक्याशी चांगले जुळते. बोधिसत्त्वाचे खरे नाव गोतम होते व तो बुद्धपदाला पावल्यावर त्याच नावाने प्रसिद्धीला आला. ‘समणो खलु भो गोतमो सक्यकुलापब्बजितो’ अशा प्रकारचे उल्लेख सुत्तपिटकात किती तरी ठिकाणी आहेत.
14 . बोधिसत्त्वाचे समाधिप्रेम
“वर निर्दिष्ट केलेल्या शुद्धोदन राजाच्या कृषिसमारंभाच्या वेळी बालपणी बोधिसत्त्वाला नेण्यात आले होते आणि त्याच्या दायांनी त्याला एका जंबुवृक्षाखाली बिछान्यावर निजविले. सिद्धार्थकुमार निजला आहे, असे पाहून दाया कृषिसमारंभ पाहावयास गेल्या. इतक्यात बोधिसत्त्व उठून आसनमांडी ठोकून ध्यानस्थ बसला. ब-याच वेळाने दाया येऊन पाहतात, तो इतर वृक्षांची छाया उलटली होती. पण या जंबुवृक्षाची पूर्वीप्रमाणेच राहिली! हा अद्भुत चमत्कार पाहून शुध्दोधन राजाने बोधिसत्त्वाला नमस्कार केला.” जातकातील दंतकथेचे हे सार आहे. बोधिसत्त्वाच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या गोष्टीला अशा प्रकारे अद्भुत चमत्काराचे स्वरूप दिल्यामुळे तिच्यात काहीच अर्थ राहिला नाही. खरी गोष्ट अशी दिसते की, बोधिसत्त्व बापाबरोबर शेतावर जाऊन नांगरणीचे वगैरे काम करी आणि सुटीच्या वेळी एका जम्बुवृक्षाखाली ध्यानस्थ बसत असे.
मज्झिमनिकायातील महासच्चकसुत्तात बुद्ध भगवान सच्चकाला उद्देशून म्हणतात-
“मला आठवते की, माझ्या पित्याच्या शेतावर गेलो असता जम्बुवृक्षाच्या शीतल छायेखाली बसून कामोपभोगांपासून आणि अकुशल विचारापासून विमुक्त होऊन सवितर्क सविचार आणि विवेकापासून उत्पन्न होणारे प्रीतिसुख ज्यात आहे असे प्रथमध्यान मी संपादन करीत होतो. हाच तर बोधाचा खरा मार्ग नसेल ना? त्या माझे विज्ञान स्मृतीला अनुसरले आणि हाच तो बोधाचा मार्ग असावा असे मला वाटले. हे अग्गिवेस्सन, मी माझ्याशीच म्हणालो, ‘जे सुख कामोपभोगापासून आणि अकुशल विचारापासून अलिप्त आहे, त्या सुखाला मी का भितो?’ नंतर मी विचार केला की, त्या सुखाला मी भिता कामा नये. परंतु ते सुख अशा (देहदंडाने झालेल्या) दुर्बल शरीराने प्राप्त करून घेता येणे शक्य नाही; म्हणून पुनः पुरेसे अन्न खाणे योग्य आहे.”
बोधिसत्त्वाने सात वर्षे देहदंडन चालविल्यानंतर त्याला बापाच्या शेतातील जम्बुवृक्षाखाली बसून मिळणा-या प्रथमध्यानाची एकाएकी आठवण झाली, आणि तोच मार्ग तत्त्वबोधाचा असला पाहिजे असे गृहीत धरून त्याने देहदंडन सोडून दिले, आणि आहार सेवन करण्यास आरंभ केला.
परंतु बोधिसत्त्व लहानपणीच हे ध्यान कोणाकडून शिकला? किंवा ते त्याला आपोआपच प्राप्त झाले? जातकअट्ठकथाकाराने, ललितविस्तरकाराने किंवा बुद्धचरित्रकाराने हे ध्यान अत्यंत बालपणी बुद्धाला प्राप्त झाले असे वर्णिले असल्यामुळे ते त्याला आपोआपच मिळाले, व तो एक अद्भुत चमत्कार होता असे म्हणावे लागते. पण वर दिलेल्या भरण्डुकालामसुत्ताचा विचार केला असता ह्या अद्भुत चमत्काराचा सहज उलगडा होतो. कालामाचा आश्रय कपिलवस्तूमध्ये होता. म्हणजे शाक्य लोकात त्याचा संप्रदाय जाणणारे पुष्कळ होते, असे म्हटले पाहिजे. पुढे जी कालामाची हकीकत येणार आहे तिजवरून दिसून येईल की, कालाम ध्यानमार्गी असून तो समाधीच्या सात पाय-या शिकवीत होता. त्यापैकी पहिली पायरी जे प्रथमध्यान ते बोधिसत्त्वाला घरी असताच प्राप्त झाले असले तर त्यात अद्भुत चमत्कार कोणता? काही चममत्कार असला तर तो एवढाच की लहाणपणी शेती करताना देखील बोधिसत्त्वाची वृत्ति धार्मिक असून तो वेळोवेळी ध्यानसमाधीचा अभ्यास करीत होता.
15 . बोधिसत्त्वाच्या समाधीचा विषय
बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा विषय कोणता, हे सांगणे सोपे नाही. प्रथमध्यान ज्यावर साधते, असे एकंदरीत सव्वीस विषय६ आहेत. त्यापैकी बोधिसत्त्वाच्या ध्यानाचा विषय कोणता हे नक्की सांगता येणे जरी कठीण आहे, तरी मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार विषयांपैकी एखाद्या विषयावर तो ध्यान करीत असावा, असे अनुमान अप्रस्तुत होणार नाही. का की, ते त्याच्या प्रेमळ स्वभावाला अनुसरून होते आणि त्याला एक दुसरा आधार सापडतो तो असा-
“बुद्ध भगवान कोलिय देशात हरिद्रवसन नावाच्या कोलियांच्या शहराजवळ राहत असता काही भिक्षु सकाळच्या प्रहरी भिक्षाटन करण्यापूर्वी इतर परिव्राजकांच्या आरामात गेले, तेव्हा ते परिव्राजक त्यांना म्हणाले, ‘आम्ही आमच्या श्रावकांना उपदेश करतो की मित्रहो, चित्ताचे उपक्लेश आणि चित्ताला दुर्बल करणारी जी पाच नीवरणे आहेत,७ ती सोडून तुम्ही मैत्रीसहगत चित्ताने एक दिशा भरून टाका, दुसरी, तिसरी व चौथी भरून टाका. त्याचप्रमाणे वर, खाली व चोहोबाजूला सर्व जगत् विपुल, श्रेष्ठ, निस्सीम, अवैर व द्वेषरहित मैत्रीसहगत चित्ताने भरून टाका. करुणासहगत चित्ताने... मुदितासहगत चित्ताने... उपेक्षासहगतचित्ताने भरून टाका. श्रमण गोतम देखील असाच उपदेश करतो. मग त्याच्या आणि आमच्या उपदेशात फरक कोणता?” (बोज्झंगसंयुत्त, वग्ग ६, सुत्त ४).
शाक्य आणि कोलिय शेजारी असून त्यांचा निकट संबंध होता, आणि कधी कधी रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने त्यांच्यात भांडणे उपस्थित होत, असा उल्लेख जातकअट्ठकथेत आणि इतर अट्ठकथातून पुष्कळ ठिकाणी आला आहे. त्या कोलियांच्या राज्यात अन्य पंथातील परिव्राजक बौद्ध संघातील भिक्षूंना वरील प्रश्न विचारतात. हे परिव्राजक तेथे ब-याच वर्षांपासून राहत असले पाहिजेत. त्यांचा आश्रम बुद्धाने धर्मोपदेश करण्याला सुरवात केल्यानंतर स्थापन झाला नाही; तो पूर्वीपासूनच तेथे होता हे खास. आणि हे परिव्राजक मैत्री, करुणा, मुदिता व उपेक्षा ह्या चार ब्रह्मविहारांची पावना करावी, असा उपदेश करीत.८ तेव्हा ते कालामाच्याच पंथातील होते, असे समजण्याला हरकत कोणती? निदान हे ब्रह्मविहार बोधिसत्त्वाला तरुणपणीच माहीत होते आणि तो त्यांजवर ध्यान करून प्रथमध्यान संपादीत असे, या विधानाला बाधा येत नाही.
16 . बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाला कारण कोणते?
त्यानंतरचा महत्त्वाचा प्रसंग म्हणजे बोधिसत्त्व आपल्या प्रासादातून उद्यानभूमीकडे जातो, हा होय. शुद्धोदन महाराजाने त्याच्या वाटेत कोणी म्हातारा, व्याधित किंवा मृत मनुष्य येऊ नये असा बंदोबस्त केला असताही देवता एक निर्मित म्हातारा त्याच्या निदर्शनाला आणतात; आणि बोधिसत्त्व विरक्त होऊन परत आपल्या प्रासादात जातो. दुस-या खेपेला व्याधित, तिस-या खेपेला मृत आणि चौथ्या खेपेला देवता त्याला एक परिव्राजक दाखवितात; त्यामुळे तो पूर्ण विरक्त होऊन व गृहत्याग करून तत्त्वबोधाचा मार्ग शोधून काढण्याला प्रवृत्त होतो. ह्या प्रसंगाची रसभरित वर्णने ललितविस्तरादिक ग्रंथात सापडतात. ती सर्वथैव ग्राह्य नाहीत असे म्हणावे लागते. जर बोधिसत्त्व बापाबरोबर किंवा एकटाच शेतावर जाऊन काम करीत होता, आणि आडार कालामाच्या आश्रमात जाऊन त्याचे तत्त्वज्ञान शिकत होता, तर त्याने म्हातारा, व्याधित आणि मृत मनुष्य पाहिला नाही हे संभवेल कसे?
शेवटच्या दिवशी बोधिसत्त्व उद्यानात गेला असता “देवतांनी एक उत्तम परिव्राजक निर्माण करून त्याच्या निदर्शनाला आणला. तेव्हा बोधिसत्त्वाने सारथ्याला प्रश्न केला, ‘हा कोण आहे बरे?’ जरी त्यावेळी-बोधिसत्त्व बुद्ध झाला नसल्या कारणाने-परिव्राजक किंवा परिव्राजकाचे गुण सारथ्याला माहीत नव्हते तरी देवतांच्या प्रभावाने तो म्हणाला, ‘हा परिव्राजक आहे’ आणि त्याने प्रव्रज्येचे गुण वर्णिले,” असे जातकअट्ठकथाकारांचे म्हणणे. पण जर कपिलवस्तूमध्ये आणि शाक्यांच्या शेजारच्या राज्यात परिव्राजकांचे आश्रम होते, तर बोधिसत्त्वाला किंवा त्याच्या सारथ्याला परिव्राजकांची मुळीच माहिती नसावी, हे आश्चर्य नव्हे काय?
अंगुत्तरनिकायाच्या चतुक्कनिपातात(सुत्त नं.१९५) वप्प शाक्याची गोष्ट आली आहे. तो निर्ग्रंथ (जैन) श्रावक होता. एकदा त्याचा व महामोग्गल्लानाचा संवाद चालला असता बुद्ध भगवान तेथे आला आणि त्याने वप्पाला उपदेश केला. तेव्हा वप्प म्हणाला, “निर्ग्रंथांच्या (जैन साधूंच्या) उपासनेपासून मला काही फायदा नाही. आता मी भगवंताचा उपासक होतो.” अट्ठकथाकार वप्प हा भगवंताचा चुलता होता असे म्हणतो. हे म्हणणे महादुक्खक्खन्धसुत्ताच्या अट्ठकथेशी जुळत नाही. काहीही असो, वप्प नावाचा एक वयोवृद्ध शाक्य जैन होता यात शंका नाही. म्हणजे बोधिसत्त्वाच्या जन्मापूर्वीच शाक्य देशात जैन धर्माचा प्रसार झाला होता. तेव्हा बोधिसत्त्वाला परिव्राजकाची माहिती नव्हती हे मुळीच संभवत नाही.
मग ह्या सर्व अद्भुत गोष्टी बोधिसत्त्वाच्या चरित्रात आल्या कोठून? महापदानसुत्तातून.९ वृद्ध मनुष्याला पाहिल्यावर बोधिसत्त्वाने सारथ्याला प्रश्न कसा केला, यासंबंधी जातकअट्ठकथाकार म्हणतो, “महापदाने आगतनयेन पुच्छित्वा” (महापदानसुत्तात आलेल्या कथेला अनुसरून प्रश्न विचारून). म्हणजे या सर्व अद्भुत कथा महापदासुत्तावरून घेतल्या आहेत, असे म्हणावे लागते.
तर मग बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाला कारण काय झाले असावे? याचे उत्तर अत्तदण्डसुत्तात स्वतः बुद्ध भगवानच देत आहे.
अत्तदण्डा भयं जातं, जनं पस्सथ मेधकं |
संवेगं कित्तयिस्सामि यथा संविजितं मया ||१||
फन्दमानं पजं दिस्वा मच्छे अप्पोदके यथा |
अञ्ञमञ्ञेहि व्यारुद्ध दिस्वा मं भयमाविसि ||२||
समन्तमसरो लोको, दिसा सब्बा समेरिता |
इच्छं भवनमत्तनो नद्दसासिं अनोसितं |
ओसाने त्वेव व्यारुद्धे दिस्वा मे अरती अहु ||३||
१) शस्त्रधारण भयावह वाटले. (त्यामुळे) ही जनता कधी भांडते पहा! मला संवेग (वैराग्य) कसा उत्पन्न झाला हे सांगतो. २) अपु-या पाण्यात मासे असे तडफडतात,
त्याप्रमाणे परस्परांशी विरोध करून तडफडणा-या प्रजेकडे पाहून माझ्या अन्तःकरणात भय शिरले. ३) चारी बाजूंना जग असार दिसू लागले, सर्व दिशा कंपित होत आहेत असे वाटले आणि त्यात आश्रयाची जागा शोधीत असता निर्भय स्थान सापडेना. कारण शेवटपर्यंत सर्व जनता परस्परांशी विरुद्ध झालेलीच दिसून आल्यामुळे मला कंटाळा आला.
रोहिणी नदीच्या पाण्यासाठी शाक्य आणि कोलिय भांडत होते; एके वेळी दोघांनीही आपले सैन्य तयार करून रोहिणी नदीपाशी नेले; आणि त्याप्रसंगी बुद्ध भगवान दोन्ही सैन्याच्या मध्ये येऊन त्याने हे सुत्त उपदेशिले, असा उल्लेख जातकअट्ठकथेत अनेक ठिकाणी आला आहे. पण तो विपर्यस्त असावा असे वाटते. शाक्यांना आणि कोलियांना भगवान बुद्धाने उपदेश केला असेल आणि त्यांची भांडणेही मिटविली असतील. परंतु त्या प्रसंगी हे सुत्त उपदेशिण्याचे काही कारण दिसत नाही. आपणाला वैराग्य कसे झाले व आपण घरातून बाहेर का पडलो, हे या सुत्तात भगवान सांगत आहे. रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने किंवा अशाच क्षुद्र कारणास्तव शाक्य आणि कोलिय यांची भांडणे होत. त्या प्रसंगी आपण शस्त्र धरावे की नाही हा बोधिसत्त्वाला प्रश्न पडला असावा. पण शस्त्राने ही भांडणे मिटविणे शक्य नव्हते. शाक्य आणि कोलिय यांची भांडणे जबरदस्तीने मिटवली गेली, तरी ती मिटली नसती. का की, ती मिटविणा-याला पुन्हा शेजारच्या राजाशी शस्त्र धरावे लागले असते; आणि जर त्याने त्यालाही जिंकले, तर त्याच्या पलीकडच्या राजाला जिंकणे त्याला भाग पडले असते. याप्रमाणे शस्त्रग्रहणामुळे जिकडे तिकडे जय मिळाल्यावाचून गत्यंतर राहिले नसते. पण जय मिळविला तरी त्याला शांति कोठून मिळणार होती? पसेनदि कोसल आणि बिंबिसार यांचे पुत्रच त्यांचे शत्रु झाले. तर मग या शस्त्रग्रहणापासून लाभ काय? शेवटपर्यंत भांडत राहावे हाच! या सशस्त्र प्रवृत्तिमार्गाचा प्रेमळ बोधिसत्त्वाला कंटाळा आला आणि त्याने शस्त्रनिवृत्तिमार्ग स्वीकारला.
सुत्तनिपातातील पब्बज्ज्या सुत्तात आरंभीच खालील गाथा आहेत.
पब्बजं कित्तयिस्सामि, यथा पब्बजि चक्खुमा,
यथा वीमंसमानो सो पब्बजं समरोचयि ||१||
संबाधोऽयं घरावासो रजस्सायतनं इति |
अब्भोकासो च पब्बज्जा इति दिस्वान पब्बजि ||२||
१) ‘चक्षुष्मन्ताने प्रव्रज्या का घेतली, आणि ती त्याला कोणत्या विचारामुळे आवडली हे सांगून (त्याच्या) प्रव्रज्येचे मी वर्णन करतो.’
२) ‘गृहस्थाश्रम म्हणजे अडचणीची आणि कच-याची जागा व प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा, असे जाणून तो परिव्राजक झाला.’
या म्हणण्याला आधार मज्झिमनिकायातील महासच्चक सुत्तातही सापडतो. तेथे भगवान म्हणतो, “हे अग्गिवेस्सन, संबोधिज्ञान होण्यापूर्वी, बोधिसत्त्व असतानाच मला वाटले, ‘गृहस्थाश्रम अडचणीची व कच-याची जागा आहे. प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा. गृहस्थाश्रमात राहून अत्यंत परिपूर्ण आणि परिशुद्ध ब्रह्मचर्य आचरणे शक्य नाही. म्हणून मुंडन करून आणि काषाय वस्त्रे धारण करून घरातून बाहेर पडून परिव्राजक होणे योग्य आहे.’ ”
परंतु अरियपरियेसनसुत्तात याच्यापेक्षा थोडेसे भिन्न कारण दिले आहे. भगवान म्हणतो, “भिक्षुहो, संबोधिज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्त्व असतानाच मी स्वतः जन्मधर्मी असताना, जन्माच्या फे-यात सापडलेल्या वस्तूंचा (पुत्र, दारा, दासी, दास इत्यादिकांच्या) मागे लागलो होतो. (म्हणजे माझे सुख त्याजवर अवलंबून आहे असे मला वाटे.) स्वतः जराधर्मी असताना, व्याधिधर्मी असताना, मरणधर्मी असताना, शोकधर्मी असताना, जरा, व्याधि, मरण, शोक यांच्या फे-यात सापडलेल्या वस्तूंच्याच मागे लागलो होतो. तेव्हा माझ्या मनात असा विचार आला की, मी स्वतः जन्म, जरा, मरण, व्याधि व शोक यांनी संबद्ध असता त्यांनीच संबद्ध जे पुत्रदारादिक त्यांच्या मागे लागलो आहे, हे ठीक नव्हे; तर मग मी या जन्मजरादिकांनी होणारी हानि पाहून अजात, अजर, अव्याधि, अमर आणि अशोक असे जे परमश्रेष्ठ निर्वाणपद त्याचा शोध करावा हे योग्य आहे.”
याप्रमाणे बोधिसत्त्वाच्या प्रव्रज्येला साधारणपणे तीन कारणे दिली आहेत. १) आपल्या आप्तांनी परस्परांशी लढण्यासाठी शस्त्र धारण केल्यामुळे त्याला भय वाटले; २) घर अडचणीची व कच-याची जागा आहे असे वाटले; आणि ३) आपण जन्म, जरा, मरण, व्याधि यांनी संबद्ध असता अशाच प्रकारच्या वस्तूंवर आसक्त होऊन राहता कामा नये असे वाटले. या तिन्ही कारणांची संगति लावता येणे शक्य आहे.
बोधिसत्त्वाचे जातभाई शाक्य व कोलिय यांच्यामध्ये तंटे बखेडे उत्पन्न झाले, आणि त्या प्रसंगी त्यात आपण शिरावे की नाही हा बोधिसत्त्वाला प्रश्न पडला. मारामारीने हे खटले मिटणार नाहीत हे त्याने जाणले. पण त्यात जर आपण शिरलो नाही तर लोक आपणाला भित्रा म्हणतील व गृहस्थाचा धर्म पाळला नाही असे होईल. अर्थात गृहस्थाश्रम त्याला अडचणीची जागा भासू लागली. त्यापेक्षा संन्यासी होऊन निरपेक्षपणे रानावनात हिंडत राहणे काय वाईट होते? परंतु त्याचे आपल्या पत्नीवर आणि मुलावर प्रेम असल्यामुळे गृहत्याग करणे फार कठीण होते. तेव्हा त्याला आणखीही विचार करावा लागला. मी स्वतः जाति-जरा-व्याधि-मरणधर्मी असता अशाच स्वभावाने बद्ध झालेले जे पुत्रदारादिक त्यांच्यावर आसक्त होऊन ह्या अडचणीच्या आणि कच-याच्या गृहस्थाश्रमात पडून राहणे योग्य नाही असे त्याला वाटले; आणि म्हणून तो परिव्राजक झाला. या तिन्ही कारणात मुख्य कारण म्हटले म्हणजे शाक्यांच्या आणि कोलियांच्या मारामा-या होत, हे लक्षात ठेवले असता बोधिसत्त्वाने पुढे बुद्ध होऊन शोधून काढलेल्या मध्यम मार्गाचा अर्थ बरोबर समजेल.
17 . राहुल कुमार
बोधिसत्वाचे लग्न तरुणपणी होऊन गृहत्याग करण्यापूर्वी राहुल नावाचा मुलगा झाला, याला त्रिपिटकात अनेक ठिकाणी आधार सापडतात. जातकाच्या निदानकथेत राहुल कुमार ज्या दिवशी जन्मला त्याच रात्री बोधिसत्त्वाने गृहत्याग केला, असे म्हटले आहे. पण दुस-या अट्ठकथाकारांचे म्हणणे असे दिसते की, राहुल कुमार जन्मल्यानंतर सातव्या दिवशी बोधिसत्त्वाने गृहत्याग केला. या दोन्ही विधानांना आधार प्राचीन वाड्ःमयात सापडत नाही. एवढे खास की, बोधिसत्त्वाने गृहत्याग करण्यापूर्वी त्याला राहुल नावाचा एक मुलगा होता. गोतम बोधिसत्त्व बुद्ध होऊन कपिलवस्तूला आला आणि त्याप्रसंगी त्याने राहुलाला दीक्षा दिली, अशी वर्णने महावग्गात व इतर ठिकाणी सापडतात. त्या वेळी राहुल सात वर्षांचा होता, असे अट्ठकथांत अनेक ठिकाणी म्हटले आहे. राहुलाला भगवंताने श्रामणेर केले की काय आणि तो त्या वेळी किती वर्षांचा असावा याचा विचार सहाव्या प्रकरणात करण्यात येईल. का की, श्रामणेराचा संबंध भिक्षुसंघाशी येतो.
18 . राहुलमाता देवी
राहुलाच्या आईला महावग्गात आणि जातकअट्ठकथेत सर्वत्र ‘राहुलमाता देवी’ म्हटले आहे. यसोधरा (यशोधरा) हे तिचे नाव फक्त अपदान ग्रंथात सापडते. जातकाच्या निदानकथेत म्हटले आहे की, “ज्या वेळी आमचा बोधिसत्त्व लुम्बिनी वनात जन्मला, त्याच वेळी राहुलमाता देवी, छन्न अमात्य, काळुदायि (काळा उदायि) अमात्य, कंथक अश्वराजा (बुद्धगयेचा), महाबोधि वृक्ष आणि चार निधिकुंभी (द्रव्याने भरलेले रांजण) उत्पन्न झाले.” यात बोधिवृक्ष आणि ठेव्याचे रांजण त्याच वेळी उत्पन्न झाले, ही शुद्ध दंतकथा समजली पाहिजे. पण बोधिसत्त्व, राहुलमाता, छन्न आणि काळा उदायि ही एकाच वेळी जन्मली नसली तरी समवयस्क होती असे मानण्याला हरकत नाही. राहुलमातेचे देहावसान ७८ व्या वर्षी म्हणजे बुद्धाच्या परिनिर्वाणापूर्वी दोन वर्षे झाले असावे. अपदानात (५८४) ती म्हणते,
अट्ठसत्ततिवस्साहं पच्छिमो वत्तति भवो |
⋯ ⋯ ⋯ ⋯
पहाय वो गमिस्सामि कतम्मे सरणमत्तनो ||
‘मी आज ७८ वर्षांची आहे. हा माझा शेवटला जन्म. तुम्हाला मी सोडून जाणार. माझी मुक्ति मी संपादिली आहे.’
या शेवटल्या जन्मी आपण शाक्य कुलात जन्मलो असेही ती म्हणते. परंतु त्या कुलाची माहिती कोठेच सापडली नाही. ती भिक्षुणी होऊन राहिली आणि ७८ व्या वर्षी बुद्धाजवळ जाऊन तिने वर दिल्याप्रमाणे भाषण केले, असे अपदानकाराचे म्हणणे दिसते. पण भिक्षुणी झाल्यावर तिने कोणताही उपदेश केल्याचे किंवा तिचा कशाही प्रकारे बौद्धसंघाशी संबंध आल्याचे आढळून येत नाही. तेव्हा ती खरोखरच भिक्षुणी झाली की नाही, हे निश्चयाने सांगता येणे कठीण आहे. अपदान ग्रंथात तिचे नाव यशोधरा आणि ललितविस्तरात गोपा असे आले आहे. तेव्हा यापैकी खरे नाव कोणते किंवा ही दोन्ही तिची नावे होती, हे समजत नाही.
19 . गृहत्यागाचा प्रसंग
बोधिसत्त्वाने गृहत्याग केला त्या रात्री तो आपल्या प्रासादात बसला होता. त्याच्या परिवारातील स्त्रियांनी वाद्यगीतादिकांनी त्याला रंजविण्याचे पुष्कळ परिश्रम केले. पण बोधिसत्त्व त्यात रमला नाही. शेवटी त्या स्त्रिया कंटाळून झोपी गेल्या. कोणी बडबडत होत्या; तर कुणाच्या तोंडातून लाळ गळत होती. त्याला त्यांचा भयंकर कंटाळा आला; व खाली जाऊन त्याने छन्न सारथ्याला हाक मारून जागे केले. छन्नाने कंथक नावाच्या घोड्याला सज्ज करून आणले. त्यावर बोधिसत्त्व आरूढ झाला व छन्न घोड्याची शेपटी धरून बसला. देवतांनी त्या दोघांसाठी नगरद्वार खुले केले. त्यातून बाहेर पडून ते दोघेही अनोमा नावाच्या नदीतीरावर गेले. तेथे बोधिसत्त्वाने आपले केस आपल्या तलवारीने कापून टाकले. आणि दागदागिने छन्नाच्या स्वाधीन करून बोधिसत्त्व राजगृहाला गेला. बोधिसत्त्वाच्या वियोगामुळे कंथकाने अनोमा नदीवरच देहविसर्जन केले आणि छन्न सारथि दागदागिने घेऊन कपिलवस्तूला गेला.
हा निदानकथेतील गोष्टीचा सारांश आहे. निदान कथेत, ललितविस्तरात आणि बुद्धचरित्र काव्यात या प्रसंगाची रसभरित वर्णने आढळतात; आणि त्यांचा बौद्ध चित्रकलेवर चांगला परिणाम झाला आहे. परंतु त्यांच्यात तथ्य मुळीच नाही, किंवा फारच थोडे असावे, असे वाटते. का की, प्राचीनंतर सुत्तातून ह्या असंभाव्य दंतकथेला मुळीच आधार सापडत नाही.
अरियपरियेसनसुत्तात स्वत: भगवान बुद्धाने आपल्या गृहत्यागसमयाची हकीगत दिली आहे, ती अशी-
सो खो अहं भिक्खवे अपरेन समयेन दहरो व समानो सुसु काळकेसो भद्रेन योब्बनेन समन्नागतो पठमेन वसया अकामकानं मातापितुन्नं अस्सुमुखानं रुदन्तानं केसमस्सुं ओहारेत्वा कासावानि वत्थानि अच्छादेत्वा अगारस्मा अनगारियं पब्बजिं |
‘भिक्षुहो, असा विचार करीत असता काही काळाने, जरी मी त्या वेळी तरुण होतो, माझा एकही केस पिकला नव्हता, मी भरज्वानीत होतो आणि माझे आईबाप मला परवानगी देत नव्हते, डोळ्यातून निघणा-या अश्रुप्रवाहाने त्यांची मुखे भिजली होती, ते सारखे रडत होते, तरी मी (त्या सगळ्यांची पर्वा न करता) शिरोमुंडन करून, काषाय वस्त्रांनी देह आच्छादून, घरातून बाहेर पडलो (मी संन्याशी झालो).’
हाच उतारा जशाचा तसाच महासच्चकसुत्तात सापडतो. यावरून बोधिसत्त्व घरच्या माणसांना कळू न देता छन्नासह कंथकावर स्वार होऊन पळून गेला हे म्हणणे साफ चुकीचे आहे असे दिसते. बोधिसत्त्वाची खुद्द आई मायादेवी सातव्या दिवशी जरी निवर्तली असली तरी त्याचे पालन महाप्रजापती गोतमीने स्वतःच्या मुलाप्रमाणेच केले. अर्थात वरील उता-यात तिला बुद्ध भगवंताने आई म्हटले असले पाहिजे. शुद्धोदनाला व गोतमीला तो परिव्राजक होणार, हे पुष्कळ दिवसांपासून माहीत होते आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध व त्यांच्या समक्षच त्याने प्रव्रज्या घेतली हे या उता-यावरून स्पष्ट होते.
20 . तळ टिपा
१. The Early History of India by V. A. Smith, (Oxford 1924), p.49-50.
२. बौद्धसंघाचा परिचय, पृ.१५४ पाहा.
३. सळायतन संयुत्त, आसीविसवग्ग, सुत्त ६ पाहा.
४. कारण भरण्डूच्या कथेवरून शुद्धोदन कपिलवस्तूत राहत नव्हता असे ठरते.
५. दीघनिकाय, अम्बट्ठसुत्त.
६. बुद्धघोषाचार्यांच्या आणि अभिधर्माच्या मते पंचवीस विषय; पण उपेक्षेवर देखील प्रथमध्यान साध्य होते, असे गृहीत धरले तर सव्वीस विषय. समाधिमार्ग, पृ.६८-६९ पाहा.
७. समाधिमार्ग, पृ.३१-३५ पाहा.
८. ह्या ब्रह्मविहाराचे स्पष्टीकरण समाधिमार्गाच्या पाचव्या प्रकरणात केले आहे.

