१०९-१३५

भगवान बुद्ध

श्रावकसंघ

14-10-2017
18-09-2017
18-09-2017
18-09-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

  1. कौण्डिन्य, वाष्प, भद्रिक, महानाम आणि अश्वजित् या पाचांचा प्रथम भिक्षूसंघ बनला.
  2. भिक्षूसंघ बहुजनहितासाठी धर्मप्रचार करीत होता.
  3. एकोपा टिकविण्यासाठी भिक्षूसंघाच्या संधटनात्मक रचनेवर बुद्धाने भर दिला.
  4. बुद्धाने भिक्षुणीसंघाची स्थापना केली.
  5. बुद्धाने भिक्षूसंघाच्या प्रतिष्ठेला महत्व दिले.

सारांश

गोतम बोधिसत्त्व बुद्धाने सर्वप्रथम कोण्डञ्‍ञ (कौण्डिन्य), वप्प (वाष्प), भद्दिय (भद्रिक), महानाम आणि अस्सजि (अश्वजित्) यांना नवीन धर्ममार्ग, ‘धम्म’ सांगितला. हे पंचवर्गीय भिक्षू बुद्धाच्या मार्गाने चालू लागले. या पाचांचा भिक्षूसंघ बनला. भिक्षूसंघात मोठ्या संख्येने तरुण सामील झाले. त्याच्या मार्गाने चालू लागले. भिक्षूसंघ बहुजनहितासाठी धर्मप्रचार करीत होता. भिक्षूसंघात एकोपा राहून तो अधिक कार्यक्षम व्हावा यासाठी बुद्धाने त्याच्या संघटनात्मक रचनेवर विशेष लक्ष दिले. अनेक नियम लोकरूढीवरून ठरविले. साधेपणावर भर देवून वागणुकीचे नियम केले. शरीरोपयोगी पदार्थांच्या वापराबाबत सावधगिरी बाळगली. बुद्धाने स्त्रियांना प्रवज्जा घेण्यास परवानगी देवून भिक्षुणीसंघाची स्थापना केली. भिक्षुणीसंघासाठी त्याने खास नियम केले. बुद्धाने भिक्षूसंघाच्या प्रतिष्ठेला विशेष महत्व देऊन संघच सर्वांचा पुढारी असल्याचे सांगितले.

पारिभाषिक शब्द

पंचवर्गीय भिक्षू , बहुजन , भिक्षुसंघ , श्रमणसंघ , संघटना , भिक्षुणीसंघ , राहुल

1 . पंचवर्गीय भिक्षूंची माहिती

ज्या पंचवर्गीय भिक्षूंना बुद्ध भगवंताने पहिला धर्मोपदेश केला, त्यांची माहिती सुत्तपिटकात फारच थोडी सापडते. पहिल्या प्रथम ज्याला बौद्धधर्माचा तत्त्वबोध झाला, तो अज्ञात कौण्डिन्य चिरकालाने राजगृहाला आला, व त्याने बुद्धाला साष्टांग प्रणिपात केला, असा उल्लेख संयुत्तनिकायांतील वंगीस संयुत्तांत (नं.९) सापडतो. दुसरा पंचवर्गीय भिक्षु अस्सजि (अश्वजित्) राजगृह येथे आजारी होता व त्याला भगवंताने उपदेश केला अशी माहिती खन्धसंयुत्ताच्या ८८ व्या सुत्तात आली आहे. या दोघांशिवाय बाकी तिघांची नावे सुत्तपिटकात मुळीच सापडत नाहीत.

जातकाच्या निदानकथेत व इतर अट्ठकथांतून या पंचवर्गीय भिक्षूंची थोडीबहुत माहिती सापडते, तिचा सारांश असा:

रामो धजो लक्खणो चापि मन्ती

कोण्डञ्‍ञो च भोजो सुयामो सुदत्तो |

एते तदा अट्ठ अहेसं ब्राह्मणा

  छळंगवा मन्तं व्याकरिंसु ||

‘राम, ध्वज, लक्खण (लक्ष्मण), मन्ती (मंत्री), कोण्डञ्‍ञ (कौण्डिन्य), भोज, सुयाम आणि सुदत्त हे आठ षडंग वेद जाणणारे ब्राह्मण होते, त्यांनी बोधिसत्त्वाचे भविष्य वर्तविले.’

यापैकी सातांनी बोधिसत्त्व गृहस्थाश्रमात राहिला, तर चक्रवर्ती होईल, आणि गृहस्थाश्रम सोडून संन्यासी झाला तर सम्यक् संबुद्ध होईल, असे द्विधा भाकित केले. या आठांत कौण्डिन्य अगदी तरुण होता. त्याने बोधिसत्त्व निस्संशय सम्यक् संबुद्ध होणार असे एकच भविष्य वर्तविले. द्विधा भविष्य वर्तविणा-या सात ब्राह्मणांनी घरी जाऊन आपल्या मुलांना सांगितले की, “आम्ही आता वृद्ध झालो आहोत, आणि सिद्धार्थ राजकुमार बुद्ध झाला, तर ते पाहण्याचे आमच्या नशिबी नाही. तो जर बुद्ध झाला तर तुम्ही त्याच्या संघात प्रवेश करा.”

बोधिसत्त्वाने गृहत्याग केला, तेव्हा एकटा कौण्डिन्य हयात होता. बाकी सात  ब्राह्मणांच्या मुलांपाशी जाऊन तो म्हणाला, “सिद्धार्थकुमार परिव्राजक झाला आहे. तो खात्रीने बुद्ध होणार. त्याच्या मागोमाग आपणही परिव्राजक होऊ.” त्या तरुणांपैकी चौघांनी कौण्डिन्याचे वचन मान्य केले; व त्याच्या बरोबर प्रव्रज्या घेऊन ते बोधिसत्त्वाच्या मागोमाग गेले. हे पाच जण पुढे पंचवर्गीय या नावाने प्रसिद्धीस आले. त्यांची नावे महावग्गात आणि ललितविस्तरात सापडतात, ती येणे प्रमाणे:- कोण्डञ्‍ञ (कौण्डिन्य), वप्प (वाष्प), भद्दिय (भद्रिक), महानाम आणि अस्सजि (अश्वजित्).

परंतु वर दिलेली पंचवर्गीयांची माहिती दंतकथात्मक दिसते. गोतमकुमार बुद्ध होणार अशी जर कौण्डिन्याची खात्री होती, तर त्याला उरुवेलेत सोडून कौण्डिन्य वाराणसीला का गेला? बोधिसत्त्वाने शरीराला लागणारा आहार घेण्याला सुरवात केल्याबरोबर कौण्डिन्याची पूर्ण श्रद्धा कशी नष्ट झाली? मला वाटते की, हे पंचवर्गीय भिक्षु पूर्वी आळार कालामाच्या पंथातील असून शाक्यांच्या किंवा त्याच्या आसपासच्या प्रदेशात राहत असत. तेथे त्यांची व बोधिसत्त्वाची मैत्री जमली. ते सर्वच ब्राह्मण होते, असेही म्हणता येत नाही. आळार कालामाच्या आणि उद्दक रामपुत्ताच्या संप्रदायात तथ्य न वाटल्यामुळे बोधिसत्त्व पुढील मार्ग शोधण्याच्या हेतूने राजगृहाला आला, तेव्हा त्याच्या बरोबर हे पंचवर्गीय भिक्षु देखील आले असावेत. बोधिसत्त्वाला नवीन धर्ममार्गाचा बोध झाला तर त्याच मार्गाने आपण देखील जाऊ असा त्यांचा विचार होता. पण बोधिसत्त्वाने तपस्या आणि उपोषणे सोडून दिली तेव्हा त्यांचा विश्वास उडाला आणि ते वाराणसीला निघून गेले.

2 . पंचवर्गीय भिक्षुसंघ

गोतम बोधिसत्त्व बुद्ध होऊन वाराणसीला ऋषिपत्तनात आला तेव्हा त्या पंचवर्गीय भिक्षूंनी त्याचा आदरसत्कार देखील करू नये असा बेत केला होता, इत्यादिक मजकूर पाचव्या प्रकरणात आलाच आहे. अखेरीस या पंचवर्गीयांनी बोधिसत्त्वाचा धर्ममार्ग ऐकून घेतला आणि त्या प्रसंगी एका तेवढ्या कौण्डिन्याने आपली समंति दर्शविली. तेव्हा बुद्ध भगवान उद्गगारला, ‘‘कौण्डिन्याने जाणले (अञ्‍ञासि वत भो कौण्डञ्‍ञो).” त्यामुळे कौण्डिन्याला ‘अञ्‍ञासि कौण्डञ्‍ञ (अज्ञात कौण्डिन्य)’ हेच नाव पडले. आणि ह्या एकाच गोष्टीवरून बौद्ध वाड्‍ःमयात कौण्डिन्याला प्रसिद्ध स्थान मिळाले. ह्यानंतर त्याने कोणतीही महत्त्वाची कामगिरी केल्याचा उल्लेख मुळीच सापडत नाही. प्रथमतः त्याने एकट्यानेच बुद्धाच्या नवीन धर्ममार्गाचे अभिनंदन केले, हाच त्याचा पुरुषार्थ समजला पाहिजे.

तदनंतर बुद्ध भगवंताने वप्प (बाष्प) आणि भद्दिय (भद्रिक) या दोघांची समजूत घातली. आणि काही दिवसांनी त्यांना देखील या नवीन धर्ममार्गाचा बोध झाला. नंतर काही काळाने महानाम व अस्सजि (अश्वजित्) यांना या नवीन धर्ममार्गाचा बोध झाला. आणि हे पंचवर्गीय भिक्षु बुद्धाचे एकनिष्ठ भक्त झाले. या कामी किती वेळ गेला याचा कोठे उल्लेख नाही. पण पंचवर्गीय भिक्षु प्रथमतः बुद्धाचे शिष्य झाले, आणि या पाचांचा भिक्षुसंघ बनला, याबद्दल सुत्तपिटकाची आणि विनयपिटकाची एकवाक्यता आहे.

3 . यश आणि त्याचे साथी

पंचवर्गीयांबरोबर बुद्ध भगवान ऋषिपत्तनात राहत असता त्याला आणखी ५५भिक्षु कसे मिळाले आणि त्या चातुर्मासानंतर भगवंताने राजगृहापर्यंत प्रवास करून भिक्षुसंघात केवढी मोठी भर घातली याचे वर्णन महावग्गात सापडते. त्याचा सारांश येथे देत आहे.

वाराणसीत यश नावाचा एक सुसंपन्न तरुण राहत होता. एकाएकी प्रपंचातून त्याचे मन उठले आणि शांत स्थानाचा शोध करीत तो ऋषिपत्तनात आला. बुद्धाने धर्मोपदेश करून त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले. त्याच्या शोधासाठी त्याचे आईबाप आले. त्यांना बुद्धाने उपदेश केला आणि ते देखील बुद्धाचे उपासक झाले.

यश भिक्षु होऊन बुद्धाच्या संघात दाखल झाला, हे वर्तमान वाराणसी नगरात राहणा-या त्याच्या विमल, सुबाहु, पुण्णजि (पूर्णजित) आणि गवंपति (गवांपति) ह्या चार मित्रांना समजले आणि ऋषिपत्तनात येऊन ते देखील बुद्धाच्या भिक्षुसंघात प्रविष्ट झाले. त्या सर्वांचे पन्नास तरुण मित्र होते. त्यांनी ऋषिपत्तनात येऊन बुद्धोपदेश ऐकला आणि आपल्या मित्रांप्रमाणेच संघात प्रवेश केला. याप्रमाणे साठ भिक्षूंचा संघ ऋषिपत्तनांत गोळा झाला.

4 . बहुजनहितासाठी धर्मप्रचार

चातुर्मासाच्या शेवटी बुद्ध भगवान या आपल्या भिक्षुसंघास म्हणाला, “भिक्षुहो, प्रापंचिक आणि स्वर्गीय पाशातून मी मुक्त झालो आहे, आणि तुम्ही देखील या पाशातून मुक्त झाला आहात. तेव्हा आता, भिक्षुहो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, देवांच्या आणि मनुष्यांच्या कल्याणासाठी, धर्मोपदेश करण्यास प्रवृत्त व्हा. एका मार्गाने दोघे जाऊ नका. प्रारंभी कल्याणप्रद, मध्यंतरी कल्याणप्रद आणि शेवटी कल्याणप्रद अशा या धर्ममार्गाचा लोकांना उपदेश करा.”

याप्रमाणे बुद्ध भगवंताने आपल्या साठ भिक्षूंस चारी दिशांना पाठविले. ते इतर तरुणांना भगवंतापाशी आणीत आणि भगवान त्यांना प्रव्रज्या देऊन आपल्या भिक्षुसंघात दाखल करून घेत असे. पण त्या कामी साठ भिक्षूंना व तरुण उमेदवारांना त्रास पडू लागला; म्हणून परस्परच प्रव्रज्या देऊन आपल्या संघात दाखल करून घेण्याला त्याने भिक्षूंना परवानगी दिली व तो स्वत: ऊरुवेलेकडे जाण्यास निघाला.

5 . भद्रवर्गीय भिक्षु

वाटेत भद्दवग्गीय नावाचे तीस तरुण एका उद्यानात आपल्या स्त्रियांसह क्रीडा करण्यासाठी आले होते. त्यांपैकी एकाची बायको नव्हती म्हणून त्याच्यासाठी एक वेश्या आणली होती. ते तीस आसामी व एकोणतीसांच्या बायका मौजमजेत गुंतून बेसावधपणे वागत असता शक्य तेवढ्या वस्तू घेऊन ती वेश्या पळून गेली! त्या वेळी बुद्ध भगवान या उपवनात एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी बसला होता. उपयुक्त वस्तू घेऊन वेश्या पळून गेली, हे जेव्हा त्या तीस तरुणांना समजले, तेव्हा ते तिचा शोध करीत भगवान बसला होता तिकडे आले, आणि म्हणाले, “भदंत, ह्या बाजूने गेलेली एक तरुण स्त्री तुम्ही पाहिली आहे काय?”

भगवान म्हणाला, “तरुण गृहस्थहो, एखाद्या तरुण स्त्रीच्या शोधात लागून फिरत राहावे, किंवा आत्मबोध करावा यापैकी तुम्हाला कोणते बरे वाटते?”

ते बुद्धाचे वचन ऐकून ते त्याच्याजवळ बसले; आणि बराच वेळ बुद्धाचा उपदेश ऐकून घेतल्यावर गृहस्थाश्रमाचा त्याग करून त्यांनी भिक्षुसंघात प्रवेश केला.

6 . काश्यपबन्धु

त्या उपवनातून भगवान उरुवेलेला आला. तेथे उरुवेलकाश्यप, नदीकाश्यप व गयाकाश्यप हे तिघे जटिल बन्धु अनुक्रमे पाचशे, तीनशे व दोनशे जटाधारी शिष्यांसह अग्निहोत्र सांभाळून तपश्चर्या करीत होते. त्यांपैकी वडील बन्धूच्या आश्रमात बुद्ध भगवान राहिला; आणि अनेक अद्भुत चमत्कार दाखवून त्याने उरुवेलकाश्यपाला आणि त्याच्या पाचशे शिष्यांना आपल्या भिक्षुसंघात दाखल करून घेतले. उरुवेलकाश्यपाच्या मागोमाग त्याचे धाकटे बंधु आणि त्यांचे सर्व अनुयायी बुद्धाचे शिष्य झाले.

7 . मोठ्या भिक्षुसंघासह राजगृहात प्रवेश

या एक हजार तीन भिक्षूंना बरोबर घेऊन बुद्ध भगवान राजगृहाला आला. तेथे एवढ्या मोठ्या भिक्षुसंघाला पाहून नागरिकांत एकच खळबळ उडून गेली. बिंबिसार राजा आणि त्याचे सर्व सरदार बुद्धाचे अभिनंदन करण्यास आले. बिंबिसाराने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला दुस-या दिवशी राजवाड्यात भिक्षा घेण्याला आमंत्रण दिले अणि त्यांचे जेवण संपल्यावर वेणुवन उद्यान भिक्षुसंघाला दान दिले.

8 . सारिपुत्त आणि मोग्गल्लान

राजगृहाजवळ संजय नावाचा एक प्रसिद्ध परिव्राजक आपल्या पुष्कळ शिष्यांसहवर्तमान राहत असे. सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे दोघे संजयाचे प्रमुख शिष्य होते. पण त्या संप्रदायात त्यांचे मन रमेना. त्यांनी असा संकेत केला होता की, ‘जर दोघांपैकी एकाला सद्धर्ममार्ग दाखविणारा दुसरा कोणी सापडला तर त्याने दुस-याला ही गोष्ट सांगावी आणि दोघांनी मिळून त्या धर्माची कास धरावी.’

एके दिवशी अस्सजि भिक्षु राजगृहात भिक्षाटन करीत होता. त्याची शांत आणि गंभीर मुद्रा पाहून हा कोणी तरी निर्वाण मार्गाला लागलेला परिव्राजक असावा असे सारिपुत्ताला वाटले; अस्सजीशी संभाषण करून त्याने जाणले की, अस्सजि बुद्धाचा शिष्य आहे आणि बुद्धाचाच धर्ममार्ग खरा आहे. ही गोष्ट सारिपुत्ताने मोग्गल्लानाला कळविली; आणि ते दोघेही संजयाच्या पंथातील दोनशे पन्नास परिव्राजकांसह बुद्धाजवळ येऊन भिक्षुसंघात प्रविष्ट झाले.

9 . ऐतिहासिक कसोटी

यश आणि इतर ५४ तरुण भिक्षु झाले, या कथेपासून येथपर्यंत कथन केलेला मजकूर हा महावग्गातून सारांश रूपाने घेतलेला आहे. आता या कथेला ऐतिहासिक कसोटी लावून पाहिली पाहिजे. बोधिसत्त्वाने उरुवेला येथे तपश्चर्या केली आणि तत्त्वबोध प्राप्त करून घेतला. अर्थात् बुद्ध भगवंताला उरुवेलेच्या प्रदेशाची चांगली माहिती असली पाहिजे. उरुवेलकाश्यप आणि त्याचे दोघे धाकटे बंधु हजार जटाधारी शिष्यांसहवर्तमान त्याच प्रदेशात राहत होते. त्यांना अद्भुत चमत्कार दाखवून जर भगवंताला आपले शिष्य करावयाचे होते, तर त्यांना सोडून भगवान काशीपर्यंत का गेला? आपला धर्म 

पंचवर्गीयांशिवाय दुसरे कोणी जाणणार नाहीत, असे त्याला का वाटले? त्यावेळी त्याला अद्भुत चमत्कार दाखविण्याची शक्ति नव्हती, आणि काशीला जाऊन पंचवर्गीयांना उपदेश केल्यानंतर ती शक्ति मिळाली, असे समजावे की काय?

ऋषिपत्तनात पंचवर्गीयांशिवाय जे पंचावन भिक्षु बुद्धाला मिळाले, त्यापैकी फक्त पाचांचीच नावे महावग्गात दिली आहेत; बाकी पन्नासांपैकी एकाचे देखील नाव नाही. तेव्हा भिक्षूंची संख्या फुगविण्यासाठी पन्नासाची भर घातली असावी असे वाटते.

वाटेत तीस तरुण पुरुष स्त्रियांसह क्रीडा करीत असता चुटकीसरशी बुद्ध भगवंताने त्यांना भिक्षु बनविले, हे संभवत नाही. तसे करावयाचे होते, तर उरुवेलेहून काशीला जाण्याचे त्याने प्रयास का केले? उरुवेलेच्या आसपास मौजमजा करणारे कोणी तरुण त्याला सापडले नसते काय? मध्येच या तीस तरुणांची गोष्ट का घुसडून दिली, हे समजत नाही.

बुद्ध भगवान एक हजार तीन जटिलांना भिक्षु करून आणि बरोबर घेऊन राजगृहाला आला, त्या वेळी सर्व राजगृह उचंबळून गेले असता सारिपुत्ताला बुद्ध कोण आहे याची बिलकूल माहिती नव्हती, हे कसे? अस्सजि पंचवर्गीयांपैकी एक. त्याला इतर पंचवर्गीयांबरोबर काशीच्या आसपास धर्मोपदेश करण्याला पाठवून भगवान उरुवेलेला व तेथून राजगृहाला आला. असे असता हा अस्सजि एकाएकी राजगृहाला कसा पोचला? तात्पर्य, पंचवर्गीयांना, यशाला आणि त्याच्या चार साथ्यांना भिक्षुसंघात दाखल करून घेतल्यानंतर काशीहून राजगृहापर्यंत भगवंताच्या प्रवासाची महावग्गात आलेली हकीकत बहुतांशी दंतकथात्मक आहे, असे म्हणावे लागते.

10 . ललितविस्तरांतील यादी

खरा प्रकार काय घडला हे जरी निश्चित सांगता आले नाही, तरी ललितविस्तराच्या आरंभी जी भिक्षूंची यादी दिली आहे, तिच्यावरून भिक्षुसंघाची प्राथमिक माहिती अल्प प्रमाणात जुळविता येण्याजोगी असल्यामुळे ती यादी येथे देण्यात येत आहे.

१) ज्ञानकौण्डिन्य (अञ्‍ञाकोण्डञ्ञ), २) अश्वजित् (अस्सजि), ३) वाष्प (वप्प),  ४) महानाम, ५) भद्रिक (भद्दिय), ६) यशोदेव (यस), ७) विमल, ८) सुबाहु, ९) पूर्ण (पुण्णजि), १०) गवाम्पति (गवम्पति), ११) उरूवेलकाश्यप (उरूवेलकस्सप),           १२) नदीकाश्यप, १३) गयाकाश्यप, १४) सारिपुत्र (सारिपुत्त), १५) महामौद्गल्यायन (महामोग्गल्लान), १६) महाकाश्यप (महाकस्सप), १७) महाकात्यायन (महाकच्चान), १८) कफिल(?), १९) कौण्डिन्य (?), २०) चुनन्द (चुन्द), २१) पूर्ण मैत्रायणीपुत्र (पुण्ण मन्ताणिपुत्त), २२) अनिरुद्ध (अनुरुद्ध), २३) नन्दिक (नन्दक), २४) कस्फिल (कप्पिन), २५) सुभूति, २६) रेवत, २७) खदिरवनिक, २८) अमोघराज (मोघराज), २९) महापारणिक (?), ३०) वक्कुल (बक्कुल), ३१) नन्द, ३२) राहुल, ३३) स्वागत (सागत), ३४) आनन्द.

महावग्गात दिलेल्या नाव नसलेल्या भिक्षूंची संख्या वगळली तर ह्या यादीतील पंधरा भिक्षूंच्या परंपरेचा आणि महावग्गाच्या कथेचा मेळ बसतो; आणि त्यावरून असे अनुमान करता येते की, पंचवर्गीयांनंतर भगवंताला यश आणि त्याचे चार मित्र मिळाले. ह्या दहांना बरोबर घेऊन भगवान उरूवेलेला गेला आणि तेथे त्याच्या संघात तिघे काश्यपबंधु सामील झाले. या तेरा शिष्यांसहवर्तमान भगवान राजगृहाला गेला. तेथे संजयाच्या शिष्यांपैकी सारिपुत्त व मोग्गल्लान संजयाचा पंथ सोडून बुद्ध भगवंताचे शिष्य झाले. ह्या दोघांच्या आगमनामुळे भिक्षुसंघाची महती फार वाढली. का की, राजगृहात त्यांची बरीच प्रसिद्धि होती. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा ह्या दोघांनीही कसा विकास केला, याची साक्ष सुत्त आणि विनयपिटक देत आहेत. बहुतेक अभिधम्मपिटक तर सारिपुत्तानेच उपदेशिला असे समजण्यात येते.

यानंतर आलेल्या २९ भिक्षूंची परंपरा मात्र ऐतिहासिक दिसत नाही. आनंद आणि अनुरुद्ध एकाच वेळी भिक्षु झाले, असे चुल्लवग्गात (भा.७) सांगितले असता येथे अनुरुद्धाचा नंबर २२, व आनंदाचा ३४ दिला आहे. यांच्या बरोबर उपालि न्हाव्याने प्रव्रज्या घेतली, आणि तो पुढे विनयधर झाला, असे असता ह्या यादीत त्याचे नाव सापडत नाही. तेथे दिलेल्या बहुतेक भिक्षूंची चरित्रे ‘बौद्धसंघाचा परिचय’ या पुस्तकाच्या तिस-या भागात आली आहेत. जिज्ञासु वाचकांनी ती वाचावी.

11 . भिक्षूंची संख्या

आता राजगृहापर्यंत बुद्धाने गोळा केलेल्या भिक्षूंची संख्या या पंधरा भिक्षूंपेक्षा अधिक होती की काय याचा थोडक्यात विचार करू. बुद्धाला वाराणसी येथे साठ भिक्षु मिळाले; उरुवेलेला जात असताना वाटेत तीस आणि उरुवेला येथे एक हजार तीन, मिळून एकंदरीत १०९३ भिक्षूंचा संघ एकत्रित झाल्यावर भगवंताने राजगृहात प्रवेश केला. तेथे सारिपुत्त आणि मोग्गल्लान यांजबरोबर संजय परिव्राजकाचे अडीचशे शिष्य येऊन बौद्ध संघाला मिळाले. म्हणजे त्या वेळी भिक्षुसंघाची संख्या १३४५ झाली. परंतु तेवढा भिक्षुसंघ बुद्धापाशी असल्याचा उल्लेख सुत्तपिटकात कोठेही सापडत नाही. बुद्ध भगवान परिनिर्वाणापूर्वी एकदोन वर्षे राजगृहाला आला तेव्हा त्याच्याबरोबर १२५० भिक्षु होते, असे सामञ्ञफलसुत्तात म्हटले आहे. परंतु दीघनिकायाच्या दुस-या आठ सुत्तात भिक्षुसंघाची संख्या ५०० दिली आहे; आणि भगवंताच्या शेवटच्या प्रवासात देखील त्याच्याबरोबर ५०० च भिक्षु होते असे दिसते. भगवंताच्या परिनिर्वाणानंतर राजगृह येथे जी भिक्षूंची पहिली परिषद भरली तिच्यात देखील ५०० च भिक्षु होते. तेव्हा भगवंताच्या परिनिर्वाणापर्यंत भिक्षुसंघाची संख्या ५०० वर गेली नव्हती, असे अनुमान करता येते.

बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर ही संख्या फुगविण्याचा क्रम सुरू झाला असावा. ललितविस्तराच्या आरंभीच श्रावस्ती येथे भगवंताबरोबर बारा हजार भिक्षु आणि बत्तीस हजार बोधिसत्त्व होते, असे म्हटले आहे. अशा रीतीने आपल्या संप्रदायाचे महत्त्व वाढविण्यासाठी त्या काळच्या भिक्षूंनी पूर्वकालीन भिक्षूंची संख्या वाढविण्यास आरंभ केला, आणि महायान पंथाच्या ग्रंथकारांनी तर त्यात वाटेल तेवढ्या बोधिसत्त्वांची भर घातली! बौद्ध धर्माच्या अवनतीला जर कोणते प्रमुख कारण झाले असेल तर ते हेच होय. आपल्या धर्माचे आणि संघाचे स्तोम माजविण्यासाठी बौद्ध भिक्षूंनी भरमसाट दंतकथा रचण्यास सुरुवात केली आणि ब्राह्मणांनी त्याच्याहीपेक्षा विलक्षण दंतकथा रचून भिक्षूंचा पूर्ण पराभव केला!

12 . प्रसिद्ध सहा श्रमणसंघ

बुद्धसमकालीन बुद्धाच्या संघापेक्षा मोठे आणि प्रसिद्ध असे सहा श्रमणसंघ अस्तित्वात होते आणि पूरण कास्सप, मक्खलि गोसाल, अजित केसकंबल, पकुध कच्चायन, संजय बेलट्ठपुत्त व निगण्ठ नाथपुत्त या त्या सहा संघांच्या पुढा-यांचा लोकात फार मान असे. यासंबंधी मज्झिमनिकायांतील चूळसारोपम सुत्तात खालील उतारा सापडतो.

येमे भो गोतम समणब्राह्मणा संघिनो गणिनो गणाचरिया त्राता यसस्सिनो तित्थकरा साधुसम्मता बहुजनस्स,  सेय्यथीदं पूरणो कस्सपो, मक्खलि गोसालो, अजितो केसकम्बलो, पकुधो कच्चायनो, सञ्जयो बेलट्ठपुत्तो, निगण्ठो नाथपुत्तो.

(पिंगल कौत्स भगवंताला म्हणतो), “भो गोतम, हे जे संधी, गणी, गणाचार्य, प्रसिद्ध, यशस्वी, तीर्थंकर आणि बहुजनांना मान्य असलेले (सहाजण आहेत), ते कोणते? पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, अजित केसकम्बल, पकुध कच्चायतन, संजय बेलट्ठपुत्त व निगंठ नाथपुत्त.”

13 . बौद्ध संघाची कर्तव्यनिष्ठा

हे सहाही आचार्य वयाने बुद्ध भगवंतापेक्षा वडील होते आणि त्यांच्या भिक्षूंची संख्या  देखील बरीच मोठी होती. बुद्ध या सर्व आचार्यांत वयाने लहान, आणि त्याच्या भिक्षूसंघाची संख्या देखील कमी, असे असता ह्या लहानशा नवीन भिक्षुसंघाने सर्वांना मागे टाकले आणि हिंदुस्थानावरच नव्हे, तर सर्व आशिया खंडावर आपला प्रभाव पाडला, हे कसे?

याला उत्तर हे की, वरील सहा श्रमणसंघ जरी संख्येने मोठे होते, तरी सामान्य जनसमुदायाची ते फारशी काळजी बाळगत नसत. त्यापैकी बहुतेकांचे तपश्चर्येच्या मार्गाने मोक्ष मिळवावा हे ध्येय होते. गावात किंवा शहरात प्रवेश करून ते गृहस्थांकडून भिक्षा घेत आणि प्रसंगोपात्त आपल्या संप्रदायाचे तत्त्वज्ञान शिकवीत. तथापि गृहस्थांच्या हितसुखासाठी त्यांचा विशेष प्रयत्न नव्हता.

बौद्ध संघाची गोष्ट याच्या उलट होती. ‘लोकांच्या हितासाठी आणि सुखासाठी तुम्ही चारी दिशांना जा, एका मार्गाने दोघे जाऊ नका,’ हा बुद्धाचा उपदेश वर दिलाच आहे. हा उपदेश महावग्गात आणि मारसंयुत्तांत सापडतो आणि तशा अर्थाचे उपदेश सुत्तपिटकांत अनेक ठिकाणी आढळतात. ह्या बुद्ध भगवंताच्या उपदेशाला अनुसरून वागल्यामुळे त्याचा भिक्षुसंघ बहुजन समाजाला प्रिय अणि मान्य झाला, व सर्व लोकांवर त्याचा प्रभाव पडला.

परस्परांशी भांडणा-या लोकांकडे पाहून बोधिसत्त्वाला वैराग्य झाले, हे चवथ्या प्रकरणात सांगितलेच आहे. ती भांडणे राजसत्तेकडून मिटविता येणे शक्य नव्हते. जोपर्यंत लोकात हिंसात्मक बुद्धि राहील, तोपर्यंत समाजातील तंटेबखेडे मिटणे शक्य नाही. म्हणून राजसत्तेपासून निवृत्त होऊन मनुष्यजातीच्या मुक्तीचा मार्ग शोधून काढण्यास बोधिसत्त्व प्रवृत्त झाला. सात वर्षे तपश्चर्येचे अनेक अनुभव घेतल्यानंतर त्याला मागल्या प्रकरणात दिलेला मध्यम मार्ग सापडला; आणि त्याचा सर्व लोकांत प्रसार करण्याचा त्याने बेत ठरविला. याच कामासाठी बुद्ध भगवंताने संघाची स्थापना केली. तेव्हा इतर संघांतील श्रमणांपेक्षा बौद्ध श्रमण सामान्य जनतेच्या हितसुखाची विशेष काळजी घेत यात नवल नाही.

14 . आध्यात्मिक शेतीची आवश्यकता

समाजाने शेती, व्यापार वगैरे धंदे सुरू केले, पण समाजात जर एकोपा नसला, तर त्या धंद्यापासून फायदा होणार नाही; एकाने पेरलेले शेत दुसरा कापून नेईल व एखाद्या व्यापा-याला दुसरा चोर लुटील. अशा रीतीने समाजात अव्यवस्था सुरू झाली, तर त्या समाजातील व्यक्तींना फार कष्ट भोगावे लागतील. हा एकोपा शस्त्रबळाने उत्पन्न करता आला, तरी तो टिकाऊ होत नाही. परस्परांच्या सौजन्याने आणि त्यागाने उत्पन्न झालेली एकीच खरी एकी म्हणता येईल. सामान्य जनसमूहात अशी एकी उत्पन्न करण्याचा बुद्धाचा हेतु होता, असे सुत्तनिपातांतील कासिभारद्वाज सुत्तावरून दिसून येते. त्याचा सारांश येणेप्रमाणे-

एके दिवशी बुद्ध भगवान भिक्षाटन करीत असता भारद्वाज ब्राह्मणाच्या शेतावर गेला. तेथे भारद्वाज ब्राह्मण आपल्या मजुरांना जेवण देत होता. भगवान भिक्षेसाठी उभा आहे, असे पाहून तो म्हणाला, “माझ्याप्रमाणे तू देखील शेत नांगर, पेर, धान्य गोळा कर आणि खा. भिक्षा का मागतोस?”

भगवान म्हणाला, “मी देखील शेतकरी आहे. मी श्रद्धेचे बी पेरतो. त्यावर तपश्चर्येची (प्रयत्नाची) वृष्टि होते. प्रज्ञा माझा नांगर आहे. पापलज्जा इसाड, चित्त दो-या, स्मृति (जागृति) नांगराचा फाळ आणि चाबूक आहे. कायेने आणि वाचेने मी संयम पाळतो. आहारात नियमित राहून सत्याच्या योगे (मनोदोषांची) मी खुरपणी करतो. संतोष ही माझी सुटी आहे. उत्साह माझे बैल; आणि माझे वाहन अशा दिशेकडे जाते की, जेथे शोक करण्याची पाळी येत नाही!”

या म्हणण्याचा अर्थ भारद्वाजाला तत्काळ समजला व तो बुद्धाचा शिष्य झाला.

ह्या उपदेशात बुद्धाने शेतीचा निषेध केलेला नाही. पण त्या शेतीला नीतिमत्तेचे पाठबळ नसले, तर तिच्यापासून समाजाला सुख न होता दुःख होईल, एवढाच त्या उपदेशाचा निष्कर्ष आहे. एकाने पेरलेली शेती पिकाच्या वेळी दुस-याने बळकावली, तर शेती करण्याला कोणी प्रवृत्त होणार नाही आणि समाजात भयंकर अव्यवस्था माजेल. म्हणून प्रथमत: परस्परांचे हितसंबंध अहिंसात्मक असावयास पाहिजेत. तशा प्रकारची मानसिक शेती केल्याशिवाय या भौतिक शेतीचा उपयोग होणार नाही, हे जाणून बुद्धाने आपल्या संघाला समाजाची नैतिक जागृति करण्यासाठी प्रवृत्त केले. त्यामुळे बौद्ध संघ अल्पसंख्याक असतानाही थोडक्याच काळात सामान्य लोकसमूहाला प्रिय झाला; आणि आपल्या कर्तबगारीने इतर श्रमणसंघांना त्याने मागे टाकले.

15 . संघाची संघटना

आपला संघ कार्यक्षम व्हावा, यास्तव बुद्ध भगवंताने फार काळजी घेतली. संघाची रचना त्याने अशी केली की, आपल्या पश्चात् त्यात एकोपा राहावा आणि त्याच्याकडून लोकसेवा अव्याहत घडून यावी. वज्जींच्या गणराज्यातील पुढा-यांनी एकत्रित होऊन विचारविनिमय करण्याची आणि परस्परांच्या हिताचे नियम ठरविण्याची जी पद्धति, तीच थोडेबहुत फेरफार करून बुद्ध भगवंताने आपल्या भिक्षुसंघाला लागू केली असावी, असे महापरिनिब्बानसुत्ताच्या आरंभी आलेल्या मजकुरावरून दिसून येते.

वस्सकार ब्राह्मण बुद्धापाशी येतो आणि वज्जींवर स्वारी करण्याचा आपल्या धन्याचा- अजातशत्रूचा- बेत भगवंताला कळवितो. आपण घालून दिलेल्या सात नियमांप्रमाणे जोपर्यंत वज्जी चालतील, तोपर्यंत त्यांना जिंकणे शक्य नाही, असे भगवान वस्सकार ब्राह्मणाला सांगतो. आणि वस्सकार निघून गेल्यावर भिक्षुसंघाला म्हणतो: “भिक्षुहो, मी तुम्हाला सात अभिवृद्धीचे नियम सांगतो. १) जोपर्यंत भिक्षु पुष्कळदा एके ठिकाणी जमतील, तोपर्यंत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही. २) जोपर्यंत भिक्षु एकमताने जमतील आणि आपल्या संघकर्मांचा एकदिलाने विचार करून उठतील तोपर्यत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही. ३) जोपर्यंत संघाने न केलेला नियम, केला होता, असे म्हणणार नाहीत आणि केलेला नियम मोडणार नाहीत, नियमाचे रहस्य जाणून त्याप्रमाणे वागतील, तोपर्यंत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही. ४) जोपर्यंत भिक्षु वृद्ध, शीलवान पुढा-यांचा मान ठेवतील, ५) जोपर्यंत भिक्षु पुनः पुनः उत्पन्न होणा-या तृष्णेला वश होणार नाहीत, ६) जोपर्यंत भिक्षु एकांतवासाची आवड धरतील, ७) जोपर्यंत भिक्षु, न आलेले सुज्ञ सब्रह्मचारी यावे आणि आलेले सुज्ञ सब्रह्मचारी सुखाने राहावे, यासाठी नेहमी जागृत राहतील, तोपर्यंत भिक्षूंची अभिवृद्धीच होईल, परिहानि होणार नाही.”

यावरून असे दिसून येईल की, संघाने एकत्रित जमण्याचे, एकमताने संघकृत्ये करण्याचे, वृद्ध शीलवान भिक्षूंना मान राखण्याचे वगैरे विनयपिटकात सापडणारे नियम बुद्ध भगवंताने वज्जींसारख्या स्वतंत्र गणराज्यात प्रचलित असलेल्या पद्धतीवरून घेतले.

16 . संघाचे काही नियम लोकरूढीवरून ठरविले

परंतु राज्यानुशासनाचे सर्वच नियम संघाला लागू करता येणे शक्य नव्हते. संघात एखाद्या भिक्षूने काही अपराध केला तरी त्याला जास्तीत जास्त दंड म्हटला म्हणजे संघातून हाकून देणे हा होता; याच्या पलीकडे दुसरा कठोर दंड नव्हता. का की, संघाचे सर्व नियम अहिंसात्मक होते. त्यांपैकी बरेचसे नियम केवळ चालू असलेल्या लोकरूढीवरून घेतले होते. उदाहरणार्थ, खालील नियम घ्या-

बुद्ध भगवान आळवी येथे अग्गाळव चेतियात राहत होता. त्या काळी आळवक भिक्षु बांधकाम करीत असता जमीन खोदवीत. त्यांच्यावर लोक टीका करू लागले. ही गोष्ट समजली तेव्हा भगवंताने त्यांचा निषेध करून भिक्षूंना नियम घालून दिला, तो असा:

जो भिक्षु जमीन खणील किंवा खणवील, त्याला पाचित्तिय होते. 

भिक्षूंनी लहानशी कुटी किंवा बेताचा विहार बांधून त्यात राहावे, एवढी परवानगी भगवंताने दिली होती; आणि त्या कामी जमीन स्वत: खोदणे किंवा दुस-यास खोदावयास लावणे पाप आहे, असे नव्हते. तथापि हा नियम केवळ लोकांच्या समाधानार्थ करावा लागला. बहुतेक श्रमण लहानसहान जंतूचा नाश होऊ नये म्हणून खबरदारी घेत. ते रात्रीचा दिवा देखील पेटवीत नसत. का की, त्या दिव्यावर पतंग वगैरे प्राणी येऊन पडण्याचा संभव होता. आणि त्यांचे हे आचार लोकांच्या आंगवळणी पडले होते. एखादा श्रमण  स्वतः कुदळ घेऊन जमीन खोदावयास लागला, तर सामान्य जनांच्या मनाला धक्का बसणे अगदी साहजिक होते. त्यांच्याशी वादविवाद करून त्यांचा दृष्टिकोण बदलण्याची बुद्ध भगवंताला जरूर भासली नाही. तपश्चर्येत वृथा काल न घालविता भिक्षूंना जनतेला धर्मोपदेश करण्यास आणि ध्यानसमाधीच्या योगे स्वचित्ताचे दमन करण्यास अवकाश मिळाला म्हणजे संघाचा कार्यभाग सुलभ होईल हे बुद्ध भगवान जाणून होता; आणि म्हणूनच ज्या रीतीभाती निरुपद्रवी होत्या, त्या संघाला लागू करण्यास भगवंताला हरकत वाटली नाही.

17 . भिक्षुसंघाचा साधेपणा

भगवंताला इतर संघात चालू असलेली तपश्चर्या मुळीच पसंत नव्हती, तथापि आपल्या संघातील भिक्षूंनी अत्यंत साधेपणाने वागावे याबद्दल भगवान फार काळजी घेत असे. भिक्षू जर परिगृही बनले तर ते आपल्या परिग्रहासह चारी दिशांना जाऊन प्रचारकार्य कसे करू शकतील? सामञ्ञलसुत्तांत भगवान बुद्ध अजातशत्रु राजाला म्हणतो,

सेय्यथापि महाराज पक्खी सकुणो येन येनेव डेति सपत्तभारो व डेति | एवमेव महाराज भिक्खु संतुट्ठो होति, कायपरिहारिकेन चीवरेन, कुच्छिपरिहारिकेन पिण्डपातेन | सो येन येनेव पक्कमति समादायेव पक्कमति |

 ‘हे महाराज, जसा एखादा पक्षी ज्या दिशेला उडतो त्या त्या दिशेला आपल्या पंखासहच उडतो. त्याचप्रमाणे, हे महाराज, भिक्षु शरीराला लागणा-या चीवराने आणि पोटाला लागणा-या पिंडाने (भिक्षेने) संतुष्ट होतो. तो ज्या ज्या दिशेला जातो, त्या त्या दिशेला आपले सामान बरोबर घेऊनच जातो.’

अशा भिक्षूजवळ फार झाले तर खालील गाथेत दिलेल्या आठ वस्तू असत.

तिचीवरं च पत्तो च वासि सूचि च बन्धनं |

परिस्सावनेन अट्ठेते युत्तयोगस्स भिक्खुनो ||

‘तीन चीवरे, पात्र, वासि (लहानशी कु-हाड), सुई, कमरबंध व पाणी गाळण्याचे फडके, या आठ वस्तू योगी भिक्षूला पुरे आहेत.’

18 . वागणुकीचे नियम

याप्रमाणे भिक्षूंनी अत्यंत साधेपणाने वागावे असा बुद्ध भगवंताचा उपदेश होता. तथापि मनुष्यस्वभावाला अनुसरून काही भिक्षु या वस्तू स्वीकारण्यात देखील अतिरेक करीत; म्हणजे तीन चीवरापेक्षा जास्त वस्त्रे घेत; मातीचे किंवा लोखंडाचे पात्र ठेवण्याऐवजी तांब्यापितळेचे पात्र स्वीकारीत; चीवरे प्रमाणाबाहेर मोठी बनवीत. येणेकरून परिग्रहाला वाव मिळत असे. यास्तव त्याला आळा घालण्यासाठी पुष्कळसे नियम करावे लागले. अशा नियमांची संख्या बरीच मोठी आहे.

विनयपिटकांत भिक्षुसंघासाठी एकंदरीत २२७ निषेधात्मक नियम दिले आहेत. त्यांना ‘पातिमोक्ख’ असे म्हणतात. त्यापैकी दोन अनियत (अनियमित) आणि शेवटचे ७५ सेखिय, म्हणजे खाण्यापिण्यात, चालण्याबोलण्यात शिष्टाचाराने कसे वागावे, या संबंधाचे नियम आहेत. एवढे वजा जाता, बाकी १५० नियमांनाच अशोककालाच्या सुमाराला पातिमोक्ख म्हणत असत, असे वाटते. त्या कालापूर्वी हे सर्व नियम अस्तित्वात नव्हते; आणि जे होते त्यांत मूलभूत नियम सोडून बाकी नियमांत योग्य फेरफार करण्याचा संघाला पूर्णपणे अधिकार होता. परिनिर्वाण पावण्यापूर्वी भगवान आनंदाला म्हणतो, “ हे आनंदा, जर संघाची इच्छा असेल तर माझ्या पश्चात् संघाने बारीकसारीक नियम गाळावे.”

यावरून बारीकसारीक नियम गाळण्याला किंवा देशकालानुसार सामान्य नियमांत फेरफार करण्याला भगवंताने संघाला पूर्णपणे मुभा दिली होती, हे स्पष्ट होते.

19 . शरीरोपयोगी पदार्थ वापरण्यात सावधगिरी

भिक्षूला लागणा-या पदार्थांत चीवर, पिण्डपात (अन्न), शयनासन (राहण्याची जागा) आणि औषध हे चार पदार्थ मुख्य असत. पातिमोक्खाच्या नियमानुसार त्याचा उपभोग

 

घेत असताना देखील विचारपूर्वक वागावे, असे भगवंताचे म्हणणे होते.

चीवर वापरताना भिक्षूला म्हणावे लागे- ‘नीट विचार करून हे चीवर वापरतो, ते केवळ शीत, उष्ण, डास, माशा, वारा, ऊन, साप यांची बाधा न व्हावी म्हणून आणि गुह्येंद्रिय झाकण्याच्या उद्देशाने.’

पिण्डदान सेवन करताना म्हणावे लागे- ‘नीट विचार करून हा पिण्डपात सेवन करतो, तो शरीर क्रीडा करण्यास समर्थ व्हावे, मस्त व्हावे, मण्डित आणि विभूषित व्हावे, म्हणून नव्हे, तर केवळ या देहाचा संभाळ व्हावा, त्रास नष्ट व्हावा आणि ब्रह्मचर्याला मदत व्हावी म्हणून. याप्रमाणे (भुकेची) जुनी वेदना नाहीशी करीन, आणि (जास्त खाऊन) नवीन वेदना उत्पन्न करणार नाही. यामुळे माझी शरीरयात्रा चालेल, लोकापवाद राहणार नाही आणि जीवन सुखकर होईल.’

शयनासन वापरताना म्हणावे लागे- ‘नीट विचार करून हे शयनासन वापरतो, ते केवळ शीत, उष्ण, डास, माशा, वात, ऊन, साप यांची बाधा न व्हावी म्हणून आणि एकांतवासातील विश्रांतीसाठी.’

औषधि पदार्थ वापरताना म्हणावे लागे- ‘नीट विचार करून हा औषधि पदार्थ वापरतो, तो केवळ उत्पन्न झालेल्या रोगाच्या नाशासाठी आणि आरोग्य प्राप्त होईल तोपर्यंतच.’

20 . देवदत्ताने केलेला संघभेद

संघात सरळपणा आणि मैत्रीभाव राहावा यासंबंधी भगवान फार खबरदारी घेत असे. तथापि मनुष्यस्वभाव असा काही विचित्र आहे की, त्याच्या समुदायात मतभेद होऊन तट पडावयाचेच. याला मुख्य कारण म्हटले म्हणजे अभिमान आणि त्याच्या मागोमाग अज्ञान. मनुष्य कितीही साधेपणाने वागला, तरी तो जर पुढारी होण्याची इच्छा बाळगीत असला, तर दुस-याच्या गुणांना अवगुणांचे स्वरूप देऊन आपला मोठेपणा वाढविण्याचा प्रयत्न केल्यावाचून राहणार नाही. त्याच्या जाळ्यात जर अज्ञानी लोक सापडले, तर त्याला सहज एखादा विलक्षण संप्रदाय स्थापता येतो.

 बौद्ध संघात अशा प्रकारचा भिक्षु म्हटला म्हणजे देवदत्त होय. हा शाक्यांपैकी एक असून बुद्धाचा नातेवाईक होता. याने संघाचे पुढारीपण आपल्या स्वाधीन करावे, अशी भगवंताला विनवणी केली. भगवंताने ती मान्य केली नाही तेव्हा अजातशत्रू राजाकडून बुद्धाला मारण्यासाठी त्याने मारेकरी पाठविले. पण ते बुद्धाचा खून न करता उलट त्याचेच शिष्य झाले. तेव्हा देवदत्ताने गृध्रकूट पर्वताच्या एका टेकडीवरून बुद्धावर एक मोठी धोंड टाकली. तिची एक चीप बुद्धाच्या पायाला लागून त्याला जखम झाली. ती बरी झाल्यावर भगवान राजगृहात भिक्षाटनास गेला असता देवदत्ताने त्याच्यावर नालगिरी नावाचा मदोन्मत्त हत्ती सोडावयास लावले. त्याने भगवंताची पदधूलि मस्तकावर घेतली आणि तो पुन्हा आपल्या पागेत जाऊन उभा राहिला. याप्रमाणे सर्व मसलती फसल्यावर देवदत्ताने संघाला तपश्चर्येचे कडक नियम घालून देण्याची भगवंताला विनंती केली आणि ती भगवंताला मान्य न झाल्यामुळे संघात तट पाडून व काही भिक्षूंना बरोबर घेऊन तो गयेला गेला.

देवदत्ताची ही कथा सविस्तरपणे चुल्लवग्गात आली आहे. परंतु तिच्यात ऐतिहासिक तथ्य फार थोडे दिसते. का की देवदत्त जर खून करण्याइतका दुष्ट होता, तर त्याला संघात तट पाडता येणे शक्य झाले नसते आणि काही भिक्षु त्याचे भक्त बनले नसते.

अजातशत्रु युवराज असतानाच त्याची आणि देवदत्ताची मैत्री जमली आणि तेव्हापासून देवदत्त पुढारीपणासाठी प्रयत्न करू लागला, असे लाभसत्कारसंयुत्ताच्या ३६ व्या  सुत्तावरून दिसून येते. त्या सुत्ताचा सारांश असा-

 ‘बुद्ध भगवान राजगृह येथे वेळुवनात राहत होता. त्याकाळी अजातशत्रु राजकुमार ५०० रथ बरोबर घेऊन सकाळी संध्याकाळी देवदत्ताच्या दर्शनास जात असे आणि देवदत्ताला ५०० पात्रांचे जेवण पाठवीत असे. काही भिक्षूंनी ही गोष्ट भगवंताला सांगितली. तेव्हा भगवान म्हणाला, “भिक्षुहो, देवदत्ताच्या लाभसत्काराची स्पृहा करू नका. लाभामुळे देवदत्ताची हानीच होणार आहे, वृद्धि होणार नाही.” ’

याशिवाय देवदत्ताला उद्देशून भगवंताने म्हटलेली खालील गाथा दोन ठिकाणी आढळते.

फलं वे कदलिं हन्ति फलं वेळुं फलं नळं |

सक्कारो कापुरिसं हन्ति गब्भो अस्सतरिं यथा ||

‘फळ केळीचा नाश करते, फळ वेळूचा आणि फळ नळाचा नाश करते; आणि खेचरीचा गर्भ खेचरीचा नाश करतो. त्याचप्रमाणे सत्कार कापुरुषाचा नाश करतो.’

यावरून देवदत्त अधिकार मिळविण्यासाठी अजातशत्रूच्या साहाय्याने कशी खटपट करीत होता याचे अनुमान करता येते. अजातशत्रु बापाला मारून गादीवर आला तरी देखील देवदत्ताने त्याची संगति सोडली नाही आणि त्याच्याच मदतीने संघात फूट पाडून ब-याच भिक्षूंना त्याने आपल्या नादी लावले. हे त्याचे कृत्य बुद्ध भगवंताला आवडले नाही यात आश्चर्य कसले? परंतु देवदत्ताने पाडलेली फूट संघाला हानिकारक न होता त्या संकटातून संघ सुखरूपपणे पार पडला.

21 . भिक्षुसंघातील दुसरे एक भांडण

दुसरे एक भिक्षुसंघात साधारण भांडण कौशाम्बी येथे उद्भवल्याचे सविस्तर वर्णन महावग्गात सापडते. महावग्गाच्या कर्त्याने किंवा कर्त्यांनी संघाला ह्यासारख्या इतर प्रसंगी उपयोगी पडेल अशा रीतीने या कथेची रचना केली आहे. त्याच्या म्हणण्याचा सारांश असा की, दोघा विद्वान भिक्षूंत विनयाच्या एका क्षुद्र नियमासंबंधाने मतभेद होऊन हे भांडण उपस्थित झाले. त्या वेळी भगवंताने त्यांना दीर्घायूची गोष्ट सांगितली. परंतु ते ऐकेनात. त्यापैकी एक भिक्षु म्हणाला, “भदन्त, आपण स्वस्थ राहा. आम्ही या भांडणाचे काय होते ते पाहून घेऊ.” त्या सर्वांची मने कलुषित झाली आहेत असे पाहून भगवान कौशाम्बीहून प्राचीन वंसदाव उपवनात गेले. तेथे अनुरुद्ध, नंदिय व किम्बिल हे तिघे भिक्षु राहत असत. त्यांचा एकोपा पाहून भगवंताने त्यांचे अभिनंदन केले; आणि तेथून भगवान पारिलेय्यक वनात गेला. त्याच वेळी एका हत्तीच्या कळपाचा पुढारी हत्ती आपल्या कळपाला कंटाळून त्या वनात एकटाच राहत होता. त्याने भगवंताचे स्वागत केले. भगवान त्या ठिकाणी काही काळ राहून श्रावस्तीला आला.

इकडे कौशाम्बी येथील उपासकांनी त्या भांडणा-या भिक्षूंना ताळ्यावर आणण्यासाठी त्यांचा कोणत्याही रीतीने आदरसत्कार करू नये आणि त्यांना भिक्षा देऊ नये, असा बेत केला. त्यामुळे वठणीला येऊन ते भिक्षु श्रावस्तीला गेले. तेव्हा भगवंताने भांडण कसे मिटवावे यासंबंधाने काही नियम करून उपालि वगैरे भिक्षूंकडून ते भांडण मिटविले.

मज्झिमनिकायातील उपक्किलेससुत्तात (नं.१२८) महावग्गाच्या मजकुरापैकी बराच भाग आला आहे. पण त्याच्यामध्ये दीर्घायूची गोष्ट तर नाहीच आणि त्या सुत्ताची समाप्ति प्राचीन वंसदाव वनातच होते. पारिलेय्यक वनात बुद्ध भगवान गेल्याचा भाग त्या सुत्तात नाही. तो उदानवग्गात सापडतो.

कोसम्बियसुत्तात यापेक्षा निराळाच मजकूर आहे. त्याचा सारांश असा-

भगवान कौशाम्बी येथे घोषितारामात राहत होता. त्या वेळी कौशाम्बीतील भिक्षु परस्परांशी भांडत होते. भगवंताला ही गोष्ट समजली. तेव्हा त्याने त्या भिक्षूंना बोलावून आणले; आणि भगवान त्यांना म्हणाला, “भिक्षुहो, जेव्हा तुम्ही परस्परांशी भांडता तेव्हा तुमचे परस्परांविषयी कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्म मैत्रीमय होणे शक्य आहे काय?”

“नाही,” असे त्या भिक्षूंनी उत्तर दिले. तेव्हा भगवान म्हणाला, “जर असे नाही, तर तुम्ही भांडता काशाला? निरर्थक माणसांनो, अशा प्रकारचे भांडण तुम्हाला चिरकाल हानिकारक आणि दुःखकारक होईल.”

पुन्हा भगवान म्हणाला, “भिक्षुहो, ह्या सहा संस्मरणीय गोष्टी भांडणे तोडण्याला, सामग्रीला आणि एकोप्याला कारणीभूत होतात. त्या कोणत्या? १) मैत्रीमय कायिक कर्मे, २) मैत्रीमय वाचसिक कर्मे, ३) मैत्रीमय मानसिक कर्मे, ४) उपासकांकडून मिळालेल्या दानधर्माचा सर्व संघाबरोबर समविभागाने उपभोग घेणे, ५) आपल्या शीलात यत्किंचित् उणीव असू न देणे, आणि ६) आर्यश्रावकाला शोभण्यासारखी सम्यक् दृष्टि ठेवणे.”

या सम्यक् दृष्टीचे भगवन्ताने बरेच विवेचन केले आहे. ते विस्तारपूर्वक येथे देण्याची आवश्यकता वाटत नाही. या उपदेशाच्या शेवटी त्या भिक्षूंनी भगवन्ताच्या भाषणाचे अभिनंदन केले.

याचा अर्थ असा की, हे भांडण तेथल्या तेथेच मिटले. नाही तर भगवन्ताच्या भाषणाचे त्या भिक्षूंनी अभिनंदन कसे केले असते? महावग्गात आणि उपक्किलेस सुत्तात त्या भिक्षूंनी भगवन्ताचे अभिनंदन केल्याचा उल्लेख नाही; ते भांडतच राहिले आणि त्यांना कंटाळून भगवान तेथून निघून प्राचीन वंसदाव वनात गेला असे तेथे म्हटले आहे. तेव्हा या परस्पर विरोधाचा मेळ कसा घालावा?

अंगुत्तर निकायातील चतुक्क निपाताच्या २४१ व्या सुत्तात हा मजकूर आहे-

एके वेळी भगवान कौशाम्बी येथे घोषितारामात राहत होता. तेव्हा आयुष्मान आनंद त्याजपाशी येऊन नमस्कार करून एका बाजूला बसला. त्याला भगवान म्हणाला, “आनंदा, तो खटला मिटला की नाही?”

आ.- भदन्त, खटला मिटणार कसा? अनुरुद्धाचा शिष्य बाहिय जणू काय संघभेद करण्यासाठी प्रवृत्त झाला आहे; आणि अनुरुद्ध त्याला एक शब्द देखील बोलत नाही.

भ.- पण, आनंदा, अनुरुद्ध संघातील भांडणे तोडण्याच्या कामी कधी हात घालीत असतो? तू आणि सारिपुत्त-मोग्गल्लान ही भांडणे मिटवीत नसता काय?

यावरून असे दिसून येईल की, बाहियामुळे हे भांडण उपस्थित होऊन विकोपाला गेले आणि ते मिटविण्याच्या कामी खुद्द भगवन्ताला प्रयत्न करावा लागला. त्या भिक्षूंच्या सभेतून भगवान काही काळ दुसरीकडे गेला असला, तरी ते भांडण कौशाम्बी येथेच मिटले असावे.

अशा प्रसंगी भांडखोर भिक्षूंना ताळ्यावर आणण्यासाठी उपासकांनी त्यांच्यावर बहिष्कार घालावा आणि ते शुद्धीवर आले म्हणजे कोणत्या तरी पद्धतीने ते भांडण मिटवावे, हे दाखविण्याच्या उद्देशाने महावग्गाच्या कर्त्याने ही गोष्ट रचली आहे, असे सिद्ध होते. असल्या लहानसहान भांडणाचा संघावर विपरीत परिणाम होणे मुळीच शक्य नव्हते.

22 . भिक्षुणीसंघाची स्थापना

भिक्षुणीसंघाच्या स्थापनेची हकीकत चुल्लवग्गात आली आहे. तिचा सारांश असा-

बुद्ध भगवान कपिलवस्तु येथे निग्रोधारामात राहत होता. तेव्हा महाप्रजापती गोतमी भगवंताजवळ येऊन म्हणाली, “भदन्त, बायकांना आपल्या संप्रदायात प्रव्रज्या घेण्यास परवानगी द्या.” भगवंताने ती विनंती तीनदा नाकारली आणि भगवान तेथून वैशाली येथे आला. महाप्रजापती गोतमी आपले केशवपन करून आणि ब-याच शाक्य स्त्रियांना बरोबर घेऊन भगवंताच्या मागोमाग वैशालीला आली. प्रवासाने तिचे पाय सुजले होते, अंग धुळीने माखले होते आणि तिच्या चेह-यावर उदासीनता पसरली होती. आनंदाने तिला पाहून तिच्या उदासीनतेचे कारण विचारले. “स्त्रियांना बौद्ध संप्रदायात प्रव्रज्या घेण्यास भगवान परवानगी देत नाही, म्हणून मी उदासीन झाले,” असे गोतमी म्हणाली. तिला तेथेच राहण्यास सांगून आनंद भगवंतापाशी गेला, आणि स्त्रियांस प्रव्रज्या घेण्यास परवानगी द्यावी, अशी त्याने भगवंताला विनंती केली. भगवंताने ती गोष्ट नाकारली, तेव्हा आनंद म्हणाला, “भदन्त, तथागताने निवेदिलेल्या धर्मसंप्रदायांत भिक्षुणी होऊन एखाद्या स्त्रियेला स्त्रोतआपत्तिफल, सकृदागामिफल, अनागामिफल आणि अर्हत्फल प्राप्त करून घेणे शक्य आहे की नाही?” भगवन्ताने ‘शक्य आहे’ असे उत्तर दिल्यावर आनंद म्हणाला, “असे जर आहे, तर ज्या मावशीने भगवंताला आईच्या अभावी दूध पाजून लहानाचे मोठे केले तिच्या विनंतीवरून भगवंताने स्त्रियांना प्रव्रज्या द्यावी.”

भगवान म्हणाला, “जर महाप्रजापती गोतमी आठ जबाबदारीचे नियम (अट्ठ गुरुधम्मा) पत्करील तर स्त्रियांना प्रव्रज्या घेण्यास मी परवानगी देतो. १) भिक्षुणी संघात कितीही वर्षे राहिलेली असो, तिने लहान मोठ्या सर्व भिक्षूंना नमस्कार केला पाहिजे. २) ज्या गावी भिक्षु नसतील त्या गावी भिक्षुणीने राहता कामा नये. ३) दर पंधरवाड्यास उपोसथ कोणत्या दिवशी व धर्मोपदेश ऐकण्यास कधी यावे, या दोन गोष्टी भिक्षुणीने भिक्षुसंघाला विचाराव्या. ४) चातुर्मासानंतर भिक्षुणीने भिक्षुसंघाची व भिक्षुणीसंघाची प्रवारणा केली पाहिजे. ५) ज्या भिक्षुणीकडून संघादिशेष आपत्ति घडली असेल, तिने दोन्ही संघाकडून पंधरा दिवसांचे मानत्त१० घेतले पाहिजे. ६) दोन वर्षे अभ्यास केला असेल, अशा श्रामणेरीला दोन्ही संघांनी उपसंपदा दिली पाहिजे. ७) कोणत्याही कारणास्तव भिक्षुणीने भिक्षूला शिवीगाळ करता कामा नये. ८) भिक्षुणीने भिक्षूला उपदेश करता कामा नये; भिक्षूने भिक्षुणीला उपदेश करावा.”

 आनंदाने ते आठ नियम महाप्रजापती गोतमीला कळविले आणि तिला ते पसंत पडले. येथवर ही कथा अंगुत्तरनिकायाच्या अट्ठकनिपातातही आढळते आणि त्यानंतर भगवान आनंदाला म्हणतो, “हे आनंद, जर स्त्रीला या धर्मविनयांत प्रव्रज्या मिळाली नसती तर हा धर्म (ब्रह्मचर्य) एक हजार वर्षे टिकला असता. ज्या अर्थी आता स्त्रीला संन्यासाचा अधिकार देण्यात आला, त्या अर्थी हा सद्धर्म पाचशे वर्षेच टिकेल.”

याप्रमाणे विनय आणि अंगुत्तरनिकाय यांचा मेळ आहे, तरी देखील हे आठ गुरुधर्म मागाहून रचले असे म्हणावे लागते; का की, विनयाचे नियम घालून देण्याची जी भगवंताची पद्धति होती, तिचा या नियमांशी उघड विरोध आहे.

बुद्ध भगवान वेरंजा गावाजवळ राहत होता. त्या काळी वेरंजा गावाच्या आसपास दुष्काळ पडल्यामुळे भिक्षूंचे फार हाल होऊ लागले. तेव्हा सारिपुत्ताने भगवंताला विनंती केली की, भिक्षूंना आचारविचारासंबंधी नियम घालून द्यावे. भगवान म्हणाला, “सारिपुत्ता, तू दम धर. नियम घालून देण्याचा प्रसंग कोणता ते तथागतालाच माहीत आहे. संघात जोपर्यंत पापाचार शिरले नाहीत, तोपर्यंत तथागत तन्निवारक नियम घालून देत नसतो.”११

या बुद्धाच्या वचनानुसार सर्व नियमांची रचना केली आहे. प्रथमतः एखादा भिक्षु काही तरी गुन्हा किंवा चूक करतो. ती गोष्ट बुद्धाच्या कानी आल्यावर भिक्षुसंघ जमवून भगवान एखादा नियम घालून देतो; आणि त्या नियमाचा अर्थ बरोबर करण्यात येत नाही, असा अनुभव आला, तर पुढे सुधारणा करतो.

परंतु महाप्रजापती गोतमीच्या बाबतीत ह्या पद्धतीचा अंगीकार केलेला नाही. भिक्षुणीसंघात काही एक दोष घडून आले नसता आरंभीच भिक्षुणींवर हे आठ नियम लादण्यात यावे, हे विलक्षण दिसते; आणि भिक्षुसंघाने आपल्या हाती सर्व सत्ता ठेवण्यासाठी मागाहून हे नियम रचून विनयात व अंगुत्तरनिकायात दाखल केले, असे अनुमान करता येते.

विनयपिटकापेक्षा सुत्तपिटक प्राचीन तर आहे. तथापि त्यात काही सुत्ते मागाहून दाखल करण्यात आली आणि त्यांपैकी हे एक असावे असे वाटते. इसवी सनापूर्वी पहिल्या किंवा दुस-या शतकात जेव्हा महायान पंथाचा जारीने प्रसार होऊ लागला, अशा वेळी ते लिहिले असावे. त्यात सद्धर्म म्हणजे स्थविरवादी पंथ भिक्षुणीसंघाच्या स्थापनेमुळे पाचशे वर्षे टिकेल आणि नंतर जिकडे तिकडे महायान संप्रदायाचा प्रसार होईल, असा ह्या सुत्तकर्त्याचा भविष्यवाद असावा. हे सुत्त भगवान बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर पाचशे वर्षांनी लिहिले, असे या भविष्यावरूनच सिद्ध होते.

 भारतवर्षांत पहिला भिक्षुणीसंघ बुद्धानेच स्थापन केला असता, तर कदाचित् या आठ गुरुधर्मांची अल्पस्वल्प प्रमाणात इतिहासात गणना करता येणे शक्य होते.  पण वस्तुस्थिती तशी नव्हती. जैन आणि इतर संप्रदाय बौद्ध संप्रदायापेक्षा एक दोन शतकांपूर्वी अस्तित्वात आले होते आणि त्या संप्रदायांत भिक्षुणींचे मोठमोठाले संघ असून त्यांपैकी काही भिक्षुणी हुशार व विदुषी होत्या, अशी माहिती पालि वाड्‍ःमयात ब-याच ठिकाणी सापडते. त्याच धर्तीवर बुद्धाचा भिक्षुणीसंघ स्थापन करण्यात आला. गणसत्ताक राज्यात, आणि ज्या देशात एकसत्ताक राज्यपद्धति उदयास आली होती तेथे देखील, स्त्रियांचा मान चांगलाच ठेवण्यात येत असे. त्यामुळे भिक्षुणीसंघाच्या रक्षणासाठी विचित्र नियम करण्याची मुळीच गरज नव्हती. अशोक कालानंतर ही परिस्थिती पालटली. या देशावर यवन आणि शक लोकांच्या स्वा-या होऊ लागल्या आणि उत्तरोत्तर बायकांचा दर्जा अगदी खालचा ठरून समाजात त्यांचा मान राहिला नाही. त्या काळी भिक्षुणीसंबंधाने अशा प्रकारचे नियम अस्तित्वात आले तर त्यात नवल कोणते?

23 . राहुल श्रामणेर

भिक्षुसंघ आणि भिक्षुणीसंघ स्थापन झाल्यावर त्यात श्रामणेर आणि श्रामणेरी दाखल करून घ्याव्या लागल्या. प्रथमतः बुद्ध भगवंताने राहुलाला श्रामणेर करून

 

घेतल्याची कथा महावग्गात आली आहे. ती अशी-

भगवान काही काळ राजगृहात राहून कपिलवस्तूला आला. तेथे ते निग्रोधारामात राहत असे. एके दिवशी भगवान शुद्धोदनाच्या घराजवळून भिक्षाटन करीत असता राहुलमातेने त्याला पाहिले. तेव्हा ती राहुलाला म्हणाली, “बा राहुला, हा तुझा पिता आहे. त्याच्याजवळ जाऊन आपला दायभाग माग.” मातेचे वचन ऐकून राहुल भगवंतापुढे जाऊन उभा राहिला आणि म्हणाला, “श्रमणा, तुझी सावली सुखकर आहे.” भगवान तेथून चालता झाला. राहुल त्याच्या मागोमाग, माझा दायभाग द्या, असे म्हणत गेला. विहारात गेल्यावर आपले दायाद्य राहुलाला देण्याच्या उद्देशाने सारिपुत्ताला बोलावून भगवंताने राहुलाला श्रामणेर करविले. ती गोष्ट शुद्धोदनाला आवडली नाही. लहान मुलांना प्रव्रज्या दिली असता त्यांच्या पालकांना दु:ख कसे होते, हे सांगून त्याने भगवंताला असा नियम करावयाला लावला की, अल्पवयी माणसाला प्रव्रज्या देऊ नये.

ही कथा ऐतिहासिक कसोटीला टिकत नाही. एक तर शुद्धोदन शाक्य कपिलवस्तूमध्ये राहत नव्हता. दुसरे, निग्रोधाराम बुद्धाच्या उतारवयात बांधण्यात आला आणि त्या वेळी राहुल अल्पवयी नव्हता. तेव्हा, ही गोष्ट पुष्कळ शतकानंतर रचून महावग्गात दाखल केली आहे, असे म्हणावे लागते.

बुद्ध भवगवंताने राहुलाला श्रामणेर दीक्षा दिली, त्या वेळी त्याचे वय सात वर्षांचे होते, असे अम्बलट्ठिकराहुलोवाद सुत्ताच्या अट्ठकथेत म्हटले आहे आणि हीच समजूत बौद्ध लोकांत अद्यापिही प्रचलित आहे. बोधिसत्त्वाच्या गृहत्यागाच्या दिवशी राहुलकुमार जन्मला, असे गृहीत धरले, तर तो श्रामणेरदीक्षेच्या वेळी सात वर्षांचा होता हे संभवत नाही. का की गृहत्यागानंतर बोधिसत्त्वाने सात वर्षे तपश्चर्या केली आणि तत्त्वबोध झाल्यावर पहिला चातुर्मास वाराणसीला घालविला; अणि त्यानंतर संघस्थापनेला एक वर्ष तरी लागले असले पाहिजे. तेव्हा राहुलकुमार श्रामणेरदीक्षेच्या वेळी सात वर्षांचा राहणे शक्यच नव्हते.

राहुलाला श्रामणेर कशा प्रकारे करण्यात आले, ह्याचे अनुमान सुत्तनिपातातील  राहुलसुत्तावरून करता येण्याजोगे आहे, म्हणून त्या सुत्ताचे भाषांतर येथे देतो.

(भगवान-) (१) सतत परिचयाने तू पंडिताची अवज्ञा करीत नाहीस ना? मनुष्यांना ज्ञानप्रद्योत दाखवणा-याची (त्याची) तू योग्य सेवा करतोस काय?

(राहुल-) (२) मी सतत परिचयामुळे पंडिताची अवज्ञा करीत नाही. मनुष्यांना ज्ञानप्रद्योत दाखवणा-याची मी सदोदित योग्य सेवा करतो.

(ह्या प्रास्ताविक गाथा होत.)

(भगवान-) (३) प्रिय वाटणारे मनोरम (पंचेन्द्रियाचे) पाच कामोपभोग सोडून श्रद्धापूर्वक घरातून बाहेर नीघ आणि दु:खाचा अन्त करणारा हो.

(४) कल्याण मित्रांची संगति धर. जेथे फरशी गडबड नाही अशा एकांत स्थळी तुझे वसतिस्थान असू दे; आणि मिताहारी हो.

(५) चीवर (वस्त्र), पिण्डपात (अन्न), औषधि पदार्थ आणि राहण्याची जागा, यांची तृष्णा धरू नकोस आणि पुनर्जन्म घेऊ नकोस.

(६) विनयाच्या नियमांत आणि पंचेन्द्रियांत संयम ठेव; कायगता स्मृति असू दे; आणि वैराग्यपूर्ण हो.

(७) कामविकाराने मिश्रित असे विषयांचे शुभ निमित्त सोडून दे व एकाग्रता आणि समाधि प्राप्त करून देणा-या अशुभ निमित्ताची भावना१२ कर.

(८) आणि अनिमित्ताची (निर्वाणाची) भावना कर व अहंकार सोड. अहंकाराचा नाश केल्यावर तू शांतपणे राहशील.

याप्रमाणे भगवान ह्या गाथांनी राहुलाला पुनः पुनः उपदेश करता झाला.

ह्या सुत्तात एकंदरीत आठ गाथा आहेत. पैकी दुसरी राहुलाची व बाकीच्या भगवंताच्या असे अट्ठकथाकाराचे म्हणणे आहे. पहिल्या गाथेत भगवंताने ज्याला पंडित म्हटले आहे, तो सारिपुत्त होता, असेही अट्ठकथाकार म्हणतो; आणि ते बरोबर असावे असे वाटते. राहुल अल्पवयस्क असतानाच त्याच्या शिक्षणासाठी भगवंताने त्याला सारिपुत्ताच्या स्वाधीन केले, आणि एक दोन वर्षांनी राहुल वयात आल्यावर त्याला भगवंताने हा उपदेश केला असावा. का की, ह्या सुत्तात सांगितलेल्या गोष्टी अल्पवयस्क मुलाला समजण्याजोग्या नाहीत. राहुल श्रामणेर झाला असता, तर त्याला ‘श्रद्धापूर्वक घरातून बाहेर निघून दु:खाचा अन्त करणारा हो,’ असा उपदेश करण्याची जरूरच नव्हती.

ब्राह्मण तरुण गुरुगृही जाऊन ब्रह्मचर्यपूर्वक वेदाध्ययन करीत आणि त्यानंतर यथारुचि गृहस्थाश्रम किंवा तपश्चर्येचा मार्ग अवलंबीत. तसाच प्रकार राहुलाच्या बाबतीत घडून आला असावा. त्याला सर्वसाधारण ज्ञान मिळावे या उद्देशाने भगवंताने सारिपुत्ताच्या स्वाधीन केले आणि सारिपुत्ताबरोबर तो राहत असल्यामुळे त्याला ब्रह्मचर्य पाळणे आवश्यकच होते. वयात आल्यावर त्याने पुनरपि गृहस्थाश्रमात जाऊ नये म्हणून भगवंताने त्याला उपदेश केला. आणि ह्या राहुलाच्या गोष्टीच्या पायावर महावग्गकाराने श्रामणेरांची विस्तृत कथा रचली.

24 . इतर श्रामणेर

बुद्ध भगवंताच्या हयातीत अल्पवयात संघात दाखल झालेले श्रामणेर फारच थोडे होते. पण दुस-या संप्रदायातून जे परिव्राजक येत त्यांना चार महिने उमेदवारी करावी लागे; आणि अशा प्रकारच्या श्रामणेरांचाच भरणा जास्त होता असे दिसते. दीघनिकायातील महासीहनाद सुत्ताच्या शेवटी काश्यप परिव्राजक बुद्धाच्या भिक्षुसंघात प्रवेश करू इच्छितो, तेव्हा भगवान त्याला म्हणतो, “काश्यपा, या संप्रदायात जो प्रव्रज्या घेऊन संघात प्रवेश करू इच्छितो, त्याला चार महिने उमेदवारी करावी लागते. चार महिन्यानंतर भिक्षूंची खात्री झाली, म्हणजे ते त्याला प्रव्रज्या देऊन संघात दाखल करतात. ह्या बाबतीत काही अपवाद आहेत, हे मी जाणतो.”

त्याप्रमाणे काश्यपाने चार महिने उमेदवारी केली आणि भिक्षूंची खात्री झाल्यावर त्याला संघात दाखल करून घेण्यात आले.

25 . श्रामणेरसंस्थेची वाढ

श्रामणेरांची संस्था भगवंताच्या परिनिर्वाणानंतर वृद्धिंगत होत गेली आणि होता होता लहानपणी श्रामणेर होऊन भिक्षु होणा-यांचीच संख्या फार मोठी झाली. त्यामुळे संघात अनेक दोष शिरले. खुद्द भगवान बुद्ध आणि त्याचा भिक्षुसंघ यांना प्रपंचाचा अनुभव चांगला होता आणि पुन्हा प्रपंचाकडे त्यांचे मन धावणे शक्य नव्हते. पण लहानपणीच संन्यासदीक्षा देऊन प्रपंचातून ज्यांना बाहेर काढले, त्यांचा ओढा संसाराकडे जाणे साहजिकच होते. पण रूढि त्यांच्या आड येऊ लागली आणि त्यांच्या हातून मानसिक दोष पुष्कळ घडू लागले. संघाच्या नाशाला जी अनेक कारणे झाली त्यापैकी हे एक प्रमुख कारण समजले पाहिजे.

श्रामणेरांच्या धर्तीवरच श्रामणेरींची संस्था उभारली गेली होती. श्रामणेर भिक्षूंच्या आणि श्रामणेरी भिक्षुणींच्या आश्रयाने राहत, हाच काय तो फरक.

26 . श्रावकसंघाचे चार विभाग

परंतु संघाच्या चार विभागात श्रामणेरांची आणि श्रामणेरींची गणना केलेली नाही. त्यामुळे भगवंताच्या हयातीत त्यांना मुळीच महत्त्व नव्हते असे समजले पाहिजे. भिक्षु, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका हेच काय ते बुद्धाच्या श्रावकसंघाचे विभाग आहेत.

भिक्षुसंघाची कामगिरी फार मोठी होती, यात शंका नाही. तथापि भिक्षुणी, उपासक आणि उपासिका यांनी देखील संघाच्या अभ्युन्नतीत पुष्कळ भर घातल्याचे अनेक दाखले त्रिपिटक वाड्‍ःमयात सापडतात.

27 . स्त्रियांचा दर्जा

बुद्धाच्या धर्ममार्गात स्त्रियांचा दर्जा पुरुषाएवढाच होता, हे सोमा भिक्षुणीच्या माराबरोबर झालेल्या खालील संवादावरून दिसून येईल.

दुपारच्या प्रहरी सोमा भिक्षुणी श्रावस्तीजवळच्या अंधवनात ध्यान करण्यासाठी बसली, तेव्हा मार तिजपाशी येऊन म्हणाला,

यन्तं इसीहि पत्तब्बं ठानं दुरभिसंभवं|

न तं द्वंगुलपञ्ञाय सक्का पप्पोतुमित्थिया ||

‘जे (निर्वाण) स्थान ऋषींना मिळणे कठीण, ते (भात शिजला असता तपासून पाहण्याची) दोन बोटांची जिची प्रज्ञा, त्या स्त्रीला मिळणे शक्य नाही.’

सोमा भिक्षुणी म्हणाली,

इत्थिभावो किं कयिरा चित्तम्हि सुममाहिते|

ञाणम्हि वत्तमानम्हि सम्मा धम्मं विपस्सतो||

  यस्स नून सिया एवं इत्थाहं पुरिसो ति वा|

किञ्चि वा पन अस्मीति तं मारो वत्तुमरहति||१३

‘चित्त उत्तम प्रकारे समाधान पावले असता आणि ज्ञानलाभ झाला असता सम्यक् पणे धर्म जाणणा-या व्यक्तीला (निर्वाण मार्गात) स्त्रीत्व कसे आड येणार? ज्या कोणाला मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, किंवा मी कोणी तरी आहे, असा अहंकार१४ असेल, त्याला माराने या गोष्टी सांगाव्या!’

आपणाला सोमा भिक्षुणीने ओळखले, असे जाणून मार दु:खित अन्तःकरणाने तेथेच अन्तर्धान पावला.

हा संवाद काव्यमय आहे. तथापि त्यावरून बौद्ध संघात स्त्रियांचा दर्जा कसा असे, हे स्पष्ट होते.

28 . निर्वाणमार्गातील श्रावकांचे चार भेद

निर्वाणमार्गात श्रावकांचे सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहा, असे चार भेद असत. सक्काय दिट्ठि (आत्मा हा भिन्न पदार्थ असून तो नित्य आहे अशी दृष्टि), विचिकिच्छा (बुद्ध, धर्म आणि संघ याजविषयी शंका किंवा अविश्वास), सीलब्बतपरामास (स्नानादिक व्रतांनी आणि उपोषणांनी मुक्ति मिळेल असा विश्वास) या तीन संयोजनाचा (बंधनांचा) नाश केला असता श्रावक सोतापन्न होतो; आणि त्या मार्गांत तो स्थिर झाला म्हणजे त्याला सोतापत्तिफलट्ठो१५ म्हणतात. त्यानंतर कामराग (कामवासना), आणि पटिघ (क्रोध) ही दोन संयोजने शिथिल होऊन अज्ञान कमी झाले म्हणजे तो सकदागामी होतो; आणि त्या मार्गांत स्थिर झाल्यावर त्याला सकदागामिफलट्ठो म्हणतात. या पाचही संयोजनांचा पूर्णपणे क्षय केल्यावर श्रावक अनागामी होतो; आणि त्या मार्गात स्थिर झाल्यावर त्याला अनागामिफलट्ठो म्हणतात. त्यानंतर रुपराग (ब्रह्मलोकादिप्राप्तीची इच्छा), अरूपराग (अरूप देवलोक प्राप्तीची इच्छा), मान (अहंकार), उद्धच्च (भ्रान्तचित्तता), आणि अविज्जा (अविद्या), या पाच संयोजनांचा क्षय करून तो अरहा (अर्हन्) होतो; आणि त्या मार्गात स्थिर झाला म्हणजे त्याला अरहप्फलट्ठो (अर्हत्फलस्थ) म्हणतात. याप्रमाणे श्रावकांचे चार किंवा आठ भेद करण्यात येतात.

चित्र आणि विशाख हे गृहस्थ असून अनागामी होते. आणि आनंद भिक्षु असता बुद्ध भगवंताच्या हयातीत केवळ सोतापन्न होता. क्षेमा, उत्पलवर्णा वगैरे भिक्षुणी अर्हत् पदाला पावल्या होत्या. म्हणजे निर्वाणमार्गात प्रगति करण्याला स्त्रीत्व किंवा गृहस्थत्व मुळीच आड येत नसे.

29 . संघाची प्रतिष्ठा

बुद्ध सरणं गच्छामि |

धम्मं सरणं गच्छामि |

संघं सरणं गच्छामि |

ह्याला शरणगमन म्हणतात. आजला देखील बौद्ध जनता हे त्रिशरण म्हणत असते. ही वहिवाट बुद्धाच्या हयातीतच सुरू झाली असावी. आपल्या धर्माइतकेच महत्त्व बुद्ध भगवंताने संघाला देऊन ठेवले, हे लक्षात ठेवण्याजोगे आहे. कोणत्याही दुस-या धर्मात हा प्रकार नाही. येशू ख्रिस्त म्हणतो, “कष्टी आणि भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व मजकडे या. म्हणजे मी तुम्हांला विश्रांति देईन.”१६

आणि कृष्ण भगवान म्हणतो,

सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज |

अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच ||१७

‘सर्व धर्म सोडून तू मला एकट्यालाच शरण जा; मी तुला सर्व पापापासून मुक्त करीन. तू शोक करू नकोस.’

पण बुद्ध भगवान म्हणतो, “तुम्ही बुद्ध, धर्म आणि संघ यांचा आश्रय धरून स्वत:च्या परिश्रमाने आपल्या आणि इतरांच्या दुःखाचा नाश करा; जगाचे दु:ख कमी करा.”

जगातील सुज्ञ आणि शीलवान स्त्रीपुरुषांचा मोठा संघ बनवून त्याला जर आपण शरण गेलो, तर दुःखविनाशाचा मार्ग सुगम होणार नाही काय?

30 . संघच सर्वांचा पुढारी

बुद्ध भगवंताने आपल्या मागे संघाचा पुढारी नेमला नाही; सर्व संघाने मिळून संघकार्ये केली पाहिजेत, असा नियम घालून दिला. एकसत्ताक राजपद्धतीत रुळलेल्या लोकांना ही बुद्धाची पद्धति चमत्कारिक वाटली, तर त्यात नवल नाही.

भगवान परिनिर्वाण पावून फार काळ झाला नव्हता. त्या काळी आनंद राजगृहात

 राहत असे. प्रद्योताच्या भयाने अजातशत्रु राजाने राजगृहाची डागडुजी चालविली; आणि 

त्या कामावर गोपक मोग्गल्लान ब्राह्मणाची नेमणूक केली. आयुष्मान आनंद राजगृहात भिक्षेसाठी जाण्यास निघाला. पण भिक्षाटनाला अद्यापि समय आहे असे वाटून तो गोपक मोग्गल्लान ब्राह्मणाच्या कामावर गेला. ब्राह्मणाने त्याला आसन दिले आणि स्वतः कमी दर्जाच्या आसनावर बसून प्रश्न विचारला, “भगवंतासारखा गुणी भिक्षु आहे काय?” आनंदाने “नाही” असे उत्तर दिले.

ही गोष्ट चालली असता मगध देशाचा प्रमुख मंत्री वस्सकार ब्राह्मण तेथे आला; आणि त्याने चाललेली गोष्ट ऐकून घेऊन आनंदाला प्रश्न केला, “त्या भगवंताने अशा एखाद्या भिक्षुची निवड केली आहे काय, की भगवंताच्या अभावी संघ त्या भिक्षूला शरण जाईल?” आनंदाने “नाही” असे उत्तर दिल्यावर वस्सकार ब्राह्मण म्हणाला, “असा कोणी एखादा भिक्षु आहे काय, की ज्याला संघाने भगवंताच्या स्थानी निवडले आहे?” आनंदाने “नाही” असे उत्तर दिले. वस्सकार म्हणाला, “तेव्हा तुमच्या या भिक्षुसंघाला कोणताही नेता नाही. असे असता या संघात सामग्री कशी राहते?” आनंद म्हणाला, “आम्हांला नेता नाही असे समजू नये. भगवंताने विनयाचे नियम घालून दिले आहेत. जेवढे भिक्षु एका गावात राहतात, तेवढे एकत्र जमून त्या नियमाची आम्ही उजळणी करतो; ज्याच्याकडून दोष झाला असेल तो आपला दोष प्रगट करतो आणि त्याबद्दल प्रायश्चित्त घेतो........एखादा भिक्षु शीलादिक गुणांनी संपन्न असला तर त्याचा आम्ही मान ठेवतो आणि त्याचा सल्ला घेतो.”१८

वस्सकार ब्राह्मण अजातशत्रु राजाचा दिवाण होता. कोणीतरी सर्वाधिकारी व्यक्ति असल्याशिवाय राज्यव्यवस्था सुरळीत चालणे शक्य नाही असे त्याचे ठाम मत असले पाहिजे. बुद्धाने आपल्या गादीवर कोणाला बसविले नाही तरी निदान संघाने एखाद्या भिक्षूला निवडून त्या गादीवर त्याची स्थापना केली पाहिजे, असे वस्सकार ब्राह्मणाचे म्हणणे. पण अशा सर्वाधिका-यावाचून बुद्धाच्या पश्चात् देखील संघाचे काम सुरळीत चालले; यावरून बुद्धाने केलेली संघाची रचना योग्य होती असे म्हणावे लागते.

31 . तळ टिपा

१. ‘बुद्धलीलासारसंग्रह’,  पृ. १६०-१६५ आणि ‘बौद्धसंघाचा परिचय’ पृ. ७-८ पाहा.

२. ‘बौद्धसंघाचा परिचय’, पृ.९७ पाहा.

३. येणेप्रमाणे चार शरीरोपयोगी पदार्थ सावधानपणे वापरण्याला पच्चवेक्खण (प्रत्यवेक्षण) म्हणतात आणि त्याची वहिवाट आजलाही चालू आहे.

४. ‘बुद्धलीलासारसंग्रह’, पृ. १७९-१८८ पाहा.

५. ‘संयुत्तनिकाय’ (Pali Text Society) भाग-२, पृ.२४१, आणि ‘अंगुत्तरनिकाय’, (P.T.S.) भाग-२, पृ.७३.

६. ‘बुद्धलीलासारसंग्रह’, पृ.१८७-१८८ पाहा.

७. ‘बौद्धसंघाचा परिचय’, पृ.३७-४३ पाहा.

८. या चार फलांचे स्पष्टीकरण पुढे याच प्रकरणात आले आहे. पृ.१६६ पाहा.

९. स्वदोष सांगण्याविषयी संघाला विनंती करणे. ‘बौद्धसंघाचा परिचय’, पृ.२४-२६ पाहा.

१०. संघाचा संतोष होण्यासाठी विहाराबाहेर रात्री काढणे. ‘बौद्धसंघाचा परिचय’ पृ.४७ पाहा.

११. ‘बौद्धसंघाचा परिचय’, पृ.५२-५३ पाहा.

१२.अशुभ भावनेसंबंधी ‘समाधिमार्ग’, पृ. ४९-५८ पाहा.

१३. भिक्खुणीसंयुत्त, सुत्त २.

१४. अहंकार तीन प्रकारचा. १) मी श्रेष्ठ आहे हा मान, २) मी सदृश आहे हा मान आणि  ३) मी हीन आहे हा   मान. विभंग(P.T.S.), पृ. ३४६ आणि ३५३.

१५. फलट्ठो-फलस्थः

१६. Matthew, 11, 28.

१७. भगवद्गीता, अ.१८, श्लोक ६६.

१८. मज्झिमनिकाय, गोपकमोगल्लानसुत्त (नं. १०८) पाहा.

संदर्भ