१३६-१५३

भगवान बुद्ध

आत्मवाद

14-10-2017
18-09-2017
18-09-2017
18-09-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

  1. या प्रकरणात तत्वज्ञानातील वेगवेगळ्या प्रवाहांची चर्चा केलेली आहे.
  2. बुद्धाचे तत्वज्ञान सत्त्याच्या पायावर उभारलेले आहे.
  3. बुद्ध मध्यममार्ग स्वीकारतो.
  4. बुद्ध जातिभेद नाकारतो.

सारांश

अक्रियवाद, नियतिवाद, उच्छेदवाद, अन्योन्यवाद, विक्षेपवाद, चातुर्यामसंवरवाद, सांख्यमत, संसारशुद्धिवाद, नास्तिकवाद, वैशेषिक दर्शन, विक्षेपवाद, स्याद्वाद, निर्ग्रंथ, आजीवक, ईश्वरवाद, इत्यादींची चर्चा या प्रकरणात आलेली आहे. बुद्धाने आत्मवाद सोडून दिला आणि सत्त्याच्या पायावर तत्त्वज्ञान उभारले. त्यामुळे त्याचे श्रावक माराच्या जाळ्यात सापडले नाहीत. जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पाच विभागात आत्म्याचे वर्णन करून आत्मा शाश्वत किंवा अशाश्वत नसल्याचे बुद्ध सांगतो. बुद्ध मध्यममार्ग स्वीकारतो. बुद्धाने जातिभेदावर जोरदार हल्ला केला.

पारिभाषिक शब्द

ईश्वरवाद , शाश्वतवाद , आत्म्या , स्याद्वाद , अन्योन्यवाद , नास्तिकवाद , अक्रियवाद , चातुर्यामसंवरवाद , विक्षेपवाद , अन्योन्यवाद , उच्छेदवाद , नियतिवाद , अक्रियवाद , आत्मवाद

1 . आत्मवादी श्रमण

निवापसुत्तात बुद्धसमकालीन श्रमणब्राह्मणांचे स्थूल मानाने चार वर्ग करण्यात आले आहेत. त्यात पहिला वर्ग यज्ञयाग करून सोम पिणा-या ब्राह्मणांचा. अशा चैनीनेच मोक्ष मिळतो, ही त्यांची मति. यज्ञयागाला आणि सोमपानाला कंटाळून जे अरण्यात शिरले, आणि खडतर तपश्चर्या करू लागले, ते ऋषिमुनि दुस-या वर्गात येतात. ते चिरकाल अरण्यात टिकू शकले नाहीत. पुन्हा प्रपंचात आले, आणि चैनीत सुख मानू लागले. पराशर, ऋष्यशृङ्ग वगैरे ऋषींची उदाहरणे आहेतच. तिसरे श्रमणब्राह्मण म्हटले म्हणजे गावाच्या आसपास राहून मित भोजन करणारे श्रमण. पण ते आत्मवादात शिरले. कोणी आत्मा शाश्वत, तर कोणी आत्मा अशाश्वत, अशा वादात पडल्यामुळे ते देखील माराच्या जाळ्यात सापडले. बुद्ध भगवानाने हा आत्मवाद सोडून दिला आणि आपले तत्त्वज्ञान सत्त्याच्या पायावर उभारले. त्यामुळे त्याचे श्रावक माराच्या जाळ्यात सापडले नाहीत म्हणून त्यांचा समावेश चौथ्या श्रमणब्राह्मणांत केला आहे.

बुद्ध भगवंताने हा आत्मवाद का सोडून दिला याचा विचार करण्यापूर्वी तत्समकालीन श्रमणब्राह्मणांचे आत्मवाद कशा प्रकारचे होते हे पाहिले पाहिजे. त्या काळी एकंदरीत ६२ श्रमणपंथ होते, हे तिस-या प्रकरणात सांगितलेच आहे. त्यातला कोणताही पंथ  आत्मवादापासून मुक्त नव्हता. पण त्या सर्वांचे तत्त्वज्ञान आज उपलब्ध नाही. यांपैकी जे सहा मोठे संघ होते त्यांच्या तत्त्वज्ञानाचा बराच अंश पालि वाड्‍ःमयात शिल्लक राहिला आहे; आणि त्यावरून इतर श्रमणब्राह्मणांच्या आत्मवादाचे अनुमान करता येणे शक्य आहे. यास्तव प्रथमत: त्यांच्या तत्त्वज्ञानाचा विचार करणे योग्य वाटते.

2 . अक्रियवाद

या सहांपैकी पहिला पूरण कस्सप अक्रियवादाचा पुरस्कर्ता होता. तो म्हणे, “एखाद्याने काही केले किंवा करविले, कापले किंवा कापविले, कष्ट दिले किंवा देवविले, शोक केला किंवा करविला, एखाद्यास त्रास झाला अथवा दिला, भय वाटले किंवा त्याने दुस-यास भय दाखविले, प्राण्यास ठार मारले, चोरी केली, घरफोडी केली, दरवडा घातला, एकाच घरावर घाला घातला, वाटमारी केली, परदारागमन केले, किंवा असत्य भाषण केले, तरी त्यास पाप लागत नाही. तीक्ष्ण धारेच्या चक्राने एखाद्याने जरी या पृथ्वीवरील प्राण्यांच्या मासाची एक रास केली, एक ढीग केला, तरी त्यात मुळीच पाप नाही. त्यापासून काहीही दोष नाही. गंगा नदीच्या दक्षिण तीरावर जाऊन जरी एखाद्याने हाणमार केली, कापले, कापविले, त्रास दिला अथवा देवविला, तरी त्यात मुळीच पाप नाही. गंगा नदीच्या उत्तर तीरावर जाऊन जरी एखाद्याने दाने दिली व देवविली, यज्ञ केले अथवा करविले, तरी त्यापासून मुळीच पुण्य लागत नाही. दान, धर्म, संयम, सत्यभाषण यांच्यामुळे पुण्य प्राप्त होत नाही.”

3 . नियतिवाद

मक्खलि गोसाल संसारशुद्धिवादी किंवा नियतिवादी होता. तो म्हणे, “प्राण्याच्या अपवित्रतेस काही हेतु नाही, काही कारण नाही. हेतूशिवाय, कारणाशिवाय प्राणी अपवित्र होतात. प्राण्याच्या शुद्धीला काही हेतु नाही, कारण नाही. हेतुवाचून, कारणावाचून प्राणी शुद्ध होतात. स्वतःच्या सामर्थ्याने काही होत नाही. दुस-याच्या सामर्थ्याने काही होत नाही. पुरुषाच्या सामर्थ्याने काही होत नाही. बल नाही, वीर्य नाही, पुरुषशक्ति नाही, पुरुषपराक्रम नाही. सर्व सत्त्व, सर्व प्राणी, सर्व भूते, सर्व जीव अवश, दुर्बल व निर्वीर्य आहेत. ते नियति (नशीब), संगति व स्वभाव यांच्या योगाने परिणत होतात, आणि सहांपैकी कोणत्या तरी एका जातीत (वर्गात) राहून सुखदुःखाचा उपभोग घेतात.... शहाणे व मूर्ख दोघेही चौ-यांशी लक्ष महाकल्पांच्या फे-यांतून गेल्यावर त्यांच्या दु:खाचा नाश होतो. या शीलने, व्रताने, तपाने अथवा ब्रह्मचर्याने मी अपरिपक्व कर्म पक्व करीन, किंवा परिपक्व झालेल्या कर्माची फळे भोगून ते नष्ट करून टाकीन, असे जर एखादा म्हणाला, तर ते त्याच्याकडून व्हावयाचे नाही. या संसारात सुखदुःखे परिमित द्रोणांनी (मापांनी) मोजता येण्यासारखी ठराविक आहेत. ती कमीजास्ती किंवा अधिकउणी करता येणार नाहीत. ज्याप्रमाणे सुताची गुंडी फेकली असता ती समग्र उलगडेपर्यंत जाईल, त्याप्रमाणे शहाणे व मूर्ख (संसाराच्या) समग्र फे-यातून गेल्यावरच त्यांच्या दुःखाचा नाश होईल.”

4 . उच्छेदवाद

अजित केसकम्बल उच्छेदवादी होता. तो म्हणे, “दान, यज्ञ, होम यात काही नाही; चांगल्या वाईट कर्माचे फळ व परिणाम नाही; इहलोक, परलोक, मातापिता अथवा औपपातिक (देव किंवा नरकवासी) प्राणी नाहीत; इहलोक आणि परलोक जाणून नीट ओळखून दुस-यास शिकविणारे तत्त्वज्ञ व योग्य मार्गाने जाणारे श्रमण-ब्राह्मण या जगात नाहीत. मनुष्य चार भूतांचा बनलेला आहे. तो मरतो तेव्हा त्याच्यातील पृथ्वीधातु पृथ्वीत, आपोधातु जलात, तेजोधातु तेजात व वायुधातु वायूत जाऊन मिळतो, आणि इंद्रिये आकाशाप्रत जातात. मेलेल्या माणसाला तिरडीवर घालून चार पुरुष स्मशानात नेतात. त्याच्या गुणावगुणांची चर्चा होते, पण अस्थि पांढ-या होऊन आहुति भस्मरूप होतात. दानांचे खूळ मूर्ख माणसांनी माजविले आहे. जे कोणी आस्तिकवाद सांगतात, त्यांचे ते बोलणे निव्वळ खोटे आणि वृथा बडबड आहे. शरीरभेदानंतर शहाण्यांचा आणि मुर्खांचा उच्छेद होतो; ते विनाश पावतात. मरणानंतर त्यांचे काहीही उरत नाही.”

5 . अन्योन्यवाद

पकुध कच्चायन अन्योन्यवादी होता. तो म्हणे, “सात पदार्थ कोणी केलेले, करविलेले, निर्मिलेले किंवा निर्माण करविलेले नसून, वन्ध्य, कूटस्थ व नगरद्वारावरील स्तंभाप्रमाणे अचल आहेत. ते हालत नाहीत, बदलत नाहीत, परस्परांना बाधत नाहीत, परस्परांचे सुखदुःख उत्पन्न करण्यास असमर्थ आहेत. ते कोणते? तर पृथ्वी, आप, तेज, वायु, सुख, दुःख व जीव हे होत. यांना मारणारा, मारविणारा, ऐकणारा, सांगणारा, जाणणारा अथवा यांचे वर्णन करणारा कोणीही नाही. जो तीक्ष्ण शस्त्राने एखाद्याचे डोके कापतो, तो त्याचा जीव घेत नाही. या सात पदार्थांच्या मधल्या अवकाशात शस्त्र शिरले एवढेच काय ते समजावे.”

6 . विक्षेपवाद

संजय बेलट्ठपुत्त विक्षेपवादी होता. तो म्हणे, “परलोक आहे काय, असे मला विचारले, आणि तसे मला वाटत असले, तर मी परलोक आहे असे म्हणेन. परंतु तसे मला वाटत नाही. परलोक नाही, असे देखील वाटत नाही. औपपातिक प्राणी आहेत किंवा नाहीत, चांगल्या वाईट कर्माचे फळ असते किंवा नसते, तथागत मरणानंतर राहतो किंवा राहत नाही, यांपैकी काही देखील मला वाटत नाही.”

7 . चातुर्यामसंवरवाद

निगण्ठ नाथपुत्त चातुर्यामसंवरवादी होता. या चार यामांची जी माहिती सामञ्‍ञफलसुत्तात सापडते ती अपुरी आहे. जैन ग्रंथांवरून दिसून येते की, अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह हे चार याम पार्श्वमुनीने उपदेशिले. त्यात ब्रह्मचर्याची महावीरस्वामीने भर घातली. तथापि बुद्धसमकालीन निर्ग्रंथात (जैन लोकांत) वरील चार यामांचीच महती होती. चार यामांच्या व तपश्चर्येच्या योगाने पूर्वजन्मी केलेल्या पातकांचे निरसन करून कैवल्य (मोक्ष) मिळवावे, हा जैनधर्माचा मथितार्थ होता.

8 . अक्रियवाद व सांख्यमत

पूरण काश्यपाचा अक्रियवाद सांख्य तत्त्वज्ञानासारखा दिसतो. आत्मा प्रकृतीपासून भिन्न आहे, आणि मारणे, मारविणे इत्यादि कृत्यांचा परिणाम त्याच्यावर होत नसतो, असे सांख्य मानतात. याचाच प्रतिध्वनि भगवद्गीतेत निरनिराळ्या ठिकाणी उमटला आहे.

प्रकृतेः क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः |

अहंकारविमूढात्मा कर्ताऽहमिति मन्यते ||

प्रकृतीच्या गुणांनी सर्व कर्मे केली जात असता अहंकाराने मोहित झालेला आत्मा मी कर्ता आहे, असे मानतो. (अ.३, श्लो.२७).

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् |

उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ||

हा (आत्मा) मारणारा आहे असे जो मानतो, किंवा हा मारला जातो असे जो समजतो, त्या दोघांनाही सत्य समजले नाही. कारण हा मारीत नाही, किंवा कोणाकडून मारला जात नाही. (अ.२, श्लो.२१).

यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते |

हत्वाऽपि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते ||

ज्याला अहंभाव नाही, ज्याची बुद्धि (त्यापासून) अलिप्स राहते, त्याने या लोकांना मारले, तरी तो त्यांना मारीत नाही; त्यात बद्ध होत नाही. (अ. १८, श्लो. १७).

9 . अक्रियवाद व संसारशुद्धिवाद

या अक्रियवादापासून मक्खलि गोसालाचा संसारशुद्धिवाद फार दूर नव्हता. त्याचे म्हणणे असे दिसते की, आत्मा जरी प्रकृतीपासून अलिप्त आहे, तरी त्याला ठराविक जन्म घ्यावे लागतात आणि त्यानंतर तो आपोआप मुक्त होतो. लक्ष चौ-यांशी जन्म घेऊन प्राणी उन्नत दशेला जातो, ही कल्पना अद्यापिही हिंदू समाजात आढळते. मक्खलि गोसालाच्या काळी ती फार प्रचलित होती, असे दिसते.

काही काळाने पूरण काश्यपाचा संप्रदाय मक्खलि गोसालाच्या आजीवक पन्थांत सामील झाला असे अंगुत्तरनिकायातील छक्कनिपाताच्या एका (नं. ५७) सुत्तावरून दिसून येते. त्यात आनंद भगवन्ताला म्हणतो, “भदंत, पूरण कस्सपाने कृष्णा, नील, लोहित, हरिद्र, शुक्ल आणि परमशुक्ल अशा सहा अभिजाति सांगितल्या आहेत. खाटीक, पारधी, वगैरे लोकांचा कृष्णाभिजातीत समावेश होतो. भिक्षु वगैरे कर्मवादी लोकांचा नील जातीत; एक वस्त्र वापरणाच्या निर्ग्रंथांचा लोहिताभिजातीत, सफेत वस्त्र वापरणा-या अचेलक श्रावकांचा (आजीवकांचा) हरिद्राभिजातीत, आजीवकांचा आणि आजीवक भिक्षुणींचा शुक्लाभिजातीत, आणि नन्द वच्छ, किस संकिच्च व मक्खलि गोसाल, यांचा परमशुक्लाभिजातीत समावेश होतो.”

ह्यावरून पूरण कस्सपाचा संप्रदाय आणि आजीवकांचा संप्रदाय एकत्र झाले, असे स्पष्ट दिसते. नंद, वच्छ वगैर तीन आचार्य आजीवक परंपरेतील पुढारी होते. कस्सपाच्या आणि त्यांच्या आत्मवादांत फरक नव्हता व कस्सपाला त्यांचा देहदंडनाचा मार्ग पसंत होता, हेही यावरून सिद्ध होते.

10 . अजित केसकंबलाचा नास्तिकवाद

अजित केसकंबल पूर्ण नास्तिक होता, हे त्याचा उच्छेदवाद पाहिल्याबरोबर लक्षात येते. सर्वदर्शनसंग्रहात सापडणा-या चार्वाक मताचा तो संस्थापक नसला तरी एक प्रसिद्ध पुरस्कर्ता असावा. त्याला ब्राह्मणांचे यज्ञयाग जसे पसंत नव्हते, तशीच आजीवकादिक श्रमणांची तपश्चर्याही मान्य नव्हती. सर्वदर्शनसंग्रहात म्हटले आहे की,

अग्निहोत्रं त्रयो वेदास्त्रिदण्डं भस्मगुण्ठनम् |

बुद्धिपौरुषहीनानां जीविका धातृनिर्मिता ||

‘अग्निहोत्र, तीन वेद, त्रिदण्ड धारण, आणि भस्म लावणे ही ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेली बुद्धिहीन आणि पौरुषहीन पुरुषांची उपजीविका आहे.’

असे असले तरी अजिताची गणना श्रमणात होत असे. याचे कारण वैदिक हिंसा त्याला मुळीच पसंत नव्हती. आणि जरी तो तपश्चर्या करीत नसला, तरी श्रमणाचे आचारविचार पाळीत होता. श्रमणांच्या आत्मवादापासून देखील तो अलिप्त नव्हता. त्याची आत्म्याची कल्पना म्हटली म्हणजे, चार महाभूतांपासून आत्मा उत्पन्न होतो, आणि मेल्यावर तो पुन्हा चार महाभूतांत जाऊन मिसळतो, अशी होती. तेव्हा-

यावज्जीवं सुखं जीवेन्नास्ति मृत्योरगोचरः |

भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ||

‘जिवंत असेपर्यंत सुखाने राहावे; कारण मृत्यूच्या तडाक्यात न सापडणारा प्राणी नाही, आणि देहाची राख होऊन गेल्यावर तो परत कोठून येणार?’ असे त्यांचे मत असणे साहजिक होते.

ह्या केसकंबलाच्या तत्त्वज्ञानातूनच लोकायत अर्थशास्त्र निघाले, आणि त्याचा विकास कौटिल्यासारख्या आचार्यांनी केला.

11 . अन्योन्यवाद व वैशेषिक दर्शन

पकुध कच्चायनाचा अन्योन्यवाद वैशेषिक दर्शनासारखा होता. पण त्याच्या सात पदार्थांत आणि वैशेषिकांच्या पदार्थांत फार थोडे साम्य आहे. कच्चायनाचा मोठा श्रमणसंघ होता. तथापि त्याची परंपरा कायम राहिली नाही. अर्वाचीन वैशेषिक दर्शन त्याच्याच तत्त्वज्ञानातून निघाले असावे. पण तशा प्रकारचे तत्त्वज्ञान मानणारा श्रमणसंप्रदाय बुद्धकालानंतर अस्तित्वात राहिला नसावा. 

12 . विक्षेपवाद व स्याद्वाद

संजय बेलट्ठपुत्ताचा विक्षेपवाद जैनांच्या स्याद्वादाप्रमाणे होता. आणि त्याचा समावेश काही कालाने जैनांनी आपल्या तत्त्वज्ञानात करून घेतला. ‘असे असेल, असे नसेल’ (स्यादस्ति स्यान्नास्ति) इत्यादि स्याद्वाद आणि वर वर्णिलेला बेलट्ठपुत्ताचा विक्षेपवाद या दोहोंत फारसा फरक नाही. तेव्हा जैनसंप्रदायाने विक्षेपवादालाच आपले मुख्य तत्त्वज्ञान बनविले, असे म्हणण्यास हरकत कोणती?

13 . निर्ग्रंथ आणि आजीवक

बुद्धसमकालीन जैनांचा चोविसावा तीर्थंकर महावीरस्वामी (ज्याला निगण्ठ नाथपुत्त म्हणत) व मक्खलि गोसाल, या दोघांनी सहा वर्षेपर्यंत एकत्र राहून तपश्चर्या केली, असे जैन ग्रंथांवरून दिसून येते. आजीवकांचा आणि निर्ग्रंथाचा संप्रदाय एक करावा, असा त्या दोघांचा प्रयत्न असावा. पार्श्व मुनीचे संन्यासी एक वस्त्र किंवा तीन वस्त्रे बाळगीत असत. पण महावीरस्वामीने मक्खलि गोसालाचे दिगंबरव्रत स्वीकारले; आणि तेव्हापासून निर्ग्रंथ निर्वस्त्र झाले. परंतु निर्ग्रंथांच्या आणि आजीवकांच्या तत्त्वज्ञानाचा मिलाफ होऊ शकला नाही. महावीरस्वामीने लक्षचौ-यांशी फे-यांचे तत्त्वज्ञान अंगीकारले असते, तर निर्ग्रंथांच्या परंपरेत चालत आलेल्या चातुर्यामांची किंमत राहिली नसती. प्राणी नियति (नशीब), संगति (परिस्थिती) आणि स्वभाव यांच्या योगाने परिणत होत असतात, असे मानले तर अहिंसा, सत्य, अस्तेय आणि अपरिग्रह या चार यामांचा उपयोग काय? अर्थात् हे दोघेही आचार्य एकत्र राहू शकले नाहीत.

आजीवकांच्या चौ-यांशी लक्ष फे-यांच्या तत्त्वज्ञानापेक्षा निर्ग्रंथांचा चातुर्यामसंवरवाद लोकांना विशेष आवडला, यात आश्चर्य नाही. का की, त्याच्या आणि तपश्चर्येच्या योगे मागील जन्मी केलेले पाप धुवून टाकता येऊन एका जन्मातच मोक्ष संपादता येणे शक्य होते.

14 . निर्ग्रंथांची माहिती

निर्ग्रंथांच्या मताची बरीच माहिती सुत्तपिटकात सापडते. पैकी मज्झिमनिकायातील चूळदुक्खक्खन्ध सुत्तात बुद्धाचा आणि निर्ग्रंथांचा संवाद आहे. त्याचा सारांश असा-

राजगृह येथे काही निर्ग्रंथ उभे राहून तपश्चर्या करीत असता बुद्ध भगवान त्यांजपाशी जाऊन म्हणाला, “बंधु हो, अशा रीतीने तुम्ही आपल्या शरीराला कष्ट का देता?”

ते म्हणाले, “निर्ग्रंथ नाथपुत्त सर्वज्ञ आहे. चालत असता, उभा असता, निजला असता किंवा जागा असता आपली ज्ञानदृष्टि कायम असते असे तो म्हणतो, आणि आम्हास उपदेश करतो की ‘निर्ग्रन्थ हो, तुम्ही पूर्वजन्मी पाप केले आहे, ते अशा प्रकारच्या देहदंडनाने जीर्ण करा (निज्जरेथ), आणि या जन्मी कायावाचामनेकरून कोणतेही पाप करू नका. ह्यामुळे पूर्वजन्मीच्या पापाचा तपाने नाश व नवे पाप न केल्यामुळे पुढच्या जन्मी कर्मक्षय होईल, आणि त्यामुळे सर्व दु:ख नाश पावेल.’ हे त्यांचे म्हणणे आम्हास आवडते.”

भगवान म्हणाला, “निर्ग्रन्थ हो, तुम्ही पूर्वजन्मी होता किंवा नव्हता, हे तुम्हास माहीत आहे काय?”

नि.- आम्हांला माहीत नाही.

भ.-  बरे, पूर्वजन्मी तुम्ही पाप केले किंवा नाही, हे तरी तुम्हास माहीत आहे काय?

नि.-  तेही आम्हास माहीत नाही.

भ.-  आणि ते अमुक तमुक प्रकारचे पाप होते हे तरी तुम्हास माहीत आहे काय?

नि.-  ते देखील आम्हास माहीत नाही.

भ.-  तुमच्या एवढ्या दु:खाचा नाश झाला, आणि एवढे बाकी आहे, हे तरी तुम्ही जाणता काय?

नि.-  तेही आम्ही जाणत नाही.

भ.-  ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत नाहीत, तर तुम्ही मागल्या जन्मी पारध्यांसारखे क्रूरकर्मी हाता, आणि ह्या जन्मी त्या पापांचा नाश करण्याकरता तपश्चर्था करता, असे होणार नाही काय?

नि.- आयुष्मान गोतम, सुखाने सुख प्राप्त होत नसते; दुःखानेच सुख प्राप्त होत असते. सुखाने सुख प्राप्त झाले असते, तर बिंबिसार राजाला आयुष्मान गोतमापेक्षा अधिक सुख मिळाले असते.

भ.- निर्ग्रन्थहो, हे तुम्ही विचार न करता बोलला. येथे मी तुम्हाला एवढे विचारतो की, बिंबिसार राजा सात दिवसापर्यंत सरळ असून एकही शब्द न उच्चारता एकांतसुख अनुभवू शकेल काय? सात दिवस राहू द्या, एक दिवस तरी असे सुख अनुभवू शकेल काय?

“आयुष्मान, त्याला हे शक्य नाही,” असे निर्ग्रंथांनी उत्तर दिले. तेव्हा भगवान म्हणाला, “मी एक दिवसच नव्हे, तर सात दिवस अशा त-हेचे सुख अनुभवू शकतो; आणि तुम्हांला विचारतो की, बिंबिसार राजा (आपल्या वैभवाने) अधिक सुखी की मी अधिक सुखी?”

नि.-  असे आहे तर, आयुष्मान गोतमच बिंबिसार राजाहून अधिक सुखी आहे.

बौद्ध मताची विशेषता दाखविण्यासाठी हा संवाद रचला असला तरी जैन मताचा त्यात विपर्यास केलेला नाही. तपश्चर्येच्या आणि चातुर्यामाच्या अभ्यासाने पूर्व कर्मांचा क्षय करता येतो, असे त्यांचे म्हणणे होते; आणि ती परंपरा अद्यापि कायम आहे.

15 . आत्म्याच्या कल्पना

या आचार्यांच्या आणि तत्समकालीन इतर श्रमणांच्या आत्म्याविषयी किती विलक्षण कल्पना होत्या यांचा थोडासा मासला उपनिषदात सापडतो. उदाहरणार्थ, आत्मा तांदळापेक्षा आणि जवापेक्षाही बारीक आहे, आणि तो हृदयामध्ये राहतो, ही कल्पना घ्या.

एष मे आत्मान्तर्हृदयेऽणीयान्व्रीहेर्वा ययाद्वा सर्षपाद्वा

श्यामाकाद्वा श्यामाकतण्डुलाद्वा | (छान्दोग्य ३|१४|३)

‘हा माझा आत्मा अंतर्हृदयांत (राहतो.) तो भातापेक्षा, जवापेक्षा, मोहरीपेक्षा, श्यामाक नावाच्या देवभातापेक्षा किंवा त्याच्या तांदळापेक्षाहि लहान आहे.’

आणि तो यांच्या एवढाही आहे!

मनोमयोऽयं पुरुषो भाः सत्यस्तस्मिन्नन्तर्हृदये यथा

व्रीहिर्वा यथो वा... (बृहदारण्यक ५|६|१)

‘हा पुरुषरूपी आत्मा मनोमय भास्वान आणि सत्यरूपी असून त्या अंतर्हृदयामध्ये जसा भाताचा किंवा जवाचा दाणा (तसा असतो).’

त्यानंतर तो आंगठ्याएवढा आहे, अशी याची कल्पना प्रचलित झाली.

अङ्गुष्ठमात्रः पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति | (कठ २|४|१२)

‘आंगठ्याएवढा तो पुरुष आत्म्याच्या मध्यभागी राहतो.’

आणि मनुष्य झोपला असता तो त्याच्या शरीरातून बाहेर हिंडावयास जातो.

स यथा शकुनिः सूत्रेण प्रबद्धो दिशं दिशं पतित्वान्यत्रायतनमलब्ध्वा बन्धनमेवोपश्रयत एवमेव खलु सोम्य तन्मनो दिशं दिशं पतित्वान्यत्रायतनमलब्ध्वा प्राणमेवोपश्रयते प्राणबन्धनं हि सोम्य मन इति || (छान्दोग्य ६|८|२).

‘तो (आत्मा), जसा दोरीने बांधलेला पक्षी चारी दिशांना उडतो आणि तेथे राहू न शकल्यामुळे बंधनातच येतो, त्याचप्रमाणे, हे सोम्य, मनाच्या योगे आत्मा चारी दिशांना उडतो, आणि तेथे स्थान न मिळाल्यामुळे प्राणाचा आश्रय धरतो; कारण प्राण हे मनाचे बंधन आहे.’

16 . शाश्वतवाद व उच्छेदवाद

अशा विचित्र आणि विविध आत्मविषयक कल्पना बुद्धसमकालीन श्रमणब्राह्मणांत पसरल्या होत्या त्या सर्व दोनच वर्गात येत असत. त्यापैकी एकाचे म्हणणे असे की,

सस्सतो अत्ता च लोको च वंझो कूटट्ठो एसिकट्ठायी ठितो ||

‘आत्मा आणि जग शास्वत आहे. तो वन्ध्य कूटस्थ आणि नगरद्वारावरील स्तंभाप्रमाणे स्थिर आहे.

या वादात पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, पकुध कच्चायन आणि निगण्ठ नाथपुत्त यांची मते समाविष्ट होत असत.

आणि दुसरे श्रमणब्राह्मण उच्छेदवाद प्रतिपादन करीत. ते म्हणत-

अयं अत्ता रूपी चातुम्माहाभूतिको मातोपेत्तिसंभवो

कायस्स भेदा उच्छिज्जति विनस्सति न होति परं मरणा ||

‘हा आत्मा जड, चार महाभूतांचा बनलेला आणि आईबापांपासून उत्पन्न झालेला, शरीरभेदानंतर छिन्न होतो, विनाश पावतो तो मरणानंतर राहत नाही.’

हे मत प्रतिपादणा-या श्रमणांत अजित केसकम्बल प्रमुख होता. यांच्या दरम्यान आत्मा काही अंशी शाश्वत व काही अंशी अशाश्वत, असे म्हणणारे देखील श्रमणब्राह्मण

होते, संजय बेलट्ठपुत्ताचा वाद तशाच प्रकारचा दिसतो. आणि तेच तत्त्वज्ञान पुढे जैनांनी उचलले.

17 . आत्मवादांचे परिणाम

ह्या सर्व आत्मवादांचे परिणाम बहुतांशी दोन होत असत. एक चैनीत सुख मानणे, आणि दुसरा तपश्चर्या करून शरीर कष्टविणे. पूरण कस्सपाच्या मताप्रमाणे जर आत्मा कोणाला मारीत नाही, किंवा मारवीत नाही, तर आपल्या चैनीसाठी इतरांची हत्या करण्यास हरकत कोणती? जैनांच्या मताप्रमाणे तोच आत्मा पूर्वजन्मीच्या कर्माने बद्ध झालेला असे म्हटले, तर ह्या कर्मांपासून सुटण्याला खडतर तपश्चर्या केली पाहिजे असे तत्त्वज्ञान उत्पन्न होणे साहजिक आहे. आत्मा अशाश्वत आहे, तो मेल्यानंतर राहत नाही, असे गृहीत धरले, तर जिवंत असेपर्यंत मौजमजा करून काल कंठावा, किंवा ह्या भोगांची शाश्वती तरी काय असे म्हणून तपश्चर्या करावी, अशी दोन्ही प्रकारची मते निष्पन्न होऊ शकतील.

18 . आत्मवादाचा त्याग

परंतु बुद्ध भगवन्ताला चैनीचा आणि तपश्चर्येचा असे दोन्ही मार्ग त्याज्य वाटले. का की, त्यापासून मनुष्यजातीचे दुःख कमी होत नाही. परस्परांशी भांडणा-या जनतेला दोन्ही अंतांपासून शांतीचा मार्ग सापडणे शक्य नाही. ह्या अंतांना कारणीभूत आत्मवाद आहे अशी बोधिसत्त्वाची खात्री झाली, आणि तो सारा बाजूला सारून त्याने एक नवाच मार्ग शोधून काढला. आत्मा शाश्वत असो किंवा अशाश्वत असो, या जगात दु:ख आहेच आहे. आणि ते मनुष्यजातीच्या तृष्णेचे फळ होय. आर्य अष्टांगिक मार्गाच्या द्वारे या तृष्णेचा क्षय केला तरच मनुष्याला आणि मनुष्यजातीला शांतिसमाधान मिळेल. हा नवा मार्ग आत्मवाद सोडून दिल्याशिवाय लक्षात येण्याजोगा नव्हता. म्हणून बुद्ध भगवन्ताने पञ्चवर्गीय भिक्षूंना चार आर्य सत्यांच्या मागोमाग अनात्मवाद उपदेशिल्याचा दाखला खन्धसंयुत्तात सापडतो.

भगवान वाराणसी येथे ऋषिपत्तनात मृगदावात राहत होते. तेथे भगवान पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हणाला, “भिक्षुहो, जड शरीर अनात्मा आहे, शरीर जर आत्मा असते तर ते उपद्रवकारक झाले नसते, आणि माझे शरीर असे होऊ द्या, व याप्रमाणे न होऊ द्या, असे म्हणता आले असते. पण ज्या अर्थी शरीर अनात्मा आहे, त्या अर्थी ते उपद्रवकारक होते, आणि ते याप्रमाणे होऊ द्या, आणि ह्याप्रमाणे होऊ नये, असे म्हणता येत नाही.”

“भिक्षु हो, वेदना अनात्मा आहे. ती जर आत्मा असती तर उपद्रवकारक झाली नसती, आणि म्हणता आले असते की माझी वेदना याप्रमाणे व्हावी, आणि याप्रमाणे होऊ नये. पण ज्या अर्थी वेदना अनात्मा आहे, त्या अर्थी ती उपद्रवकारक होते, आणि ती अशी व्हावी आणि अशी न व्हावी असे म्हणता येत नाही. त्याचप्रमाणे संज्ञा, संस्कार आणि विज्ञान अनात्मा आहे. जर विज्ञान आत्मा असते, तर ते उपद्रवकारक झाले नसते, आणि म्हणता आले असते की माझे विज्ञान याप्रमाणे व्हावे व याप्रमाणे होऊ नये. पण ज्या अर्थी विज्ञान अनात्मा आहे, त्याअर्थी विज्ञान उपद्रवकारक होते, आणि म्हणता येत नाही की, माझे विज्ञान असे व्हावे आणि असे होऊ नये.”

“भिक्षु हो, जड शरीर, वेदना, संज्ञा, संस्कार आाणि विज्ञान नित्य आहेत की अनित्य आहेत?”

“भदन्त, ती अनित्य आहेत,” असे भिक्षूंनी उत्तर दिले.

भ.- जे अनित्य आहे ते दुःखकारक की सुखकारक?

भि.- भन्ते, ते दुःखकारक आहे.

भ.- आणि जे दुःखकारक, विपरिणाम पावणारे, ते माझे आहे, ते मी आहे, तो आत्मा आहे, असे समजणे योग्य होईल काय?

भि.- नाही भदन्त.

भ.- म्हणून, भिक्षुहो, जो काही जड पदार्थ अतीत, अनागत, प्रत्युत्पन्न, आपल्या शरीरातील किंवा शरीराबाहेरचा, स्थूल, सूक्ष्म, हीन, उत्कृष्ट, दूरचा किंवा जवळचा तो सर्व माझा नाही, तो मी नाही, तो माझा आत्मा नाही, असे यथार्थतया सम्यक् ज्ञानाने जाणावे. त्याचप्रमाणे कोणतीही वेदना, कोणतीही संज्ञा, संस्कार, जे काही विज्ञान, अतीत, अनागत, प्रत्युत्पन्न, आपल्या शरीरातील किंवा शरीराबाहेरचे स्थूल, सूक्ष्म, हीन, उत्कृष्ट, दूरचे किंवा जवळचे ते सर्व माझे नव्हे, तो माझा आत्मा नव्हे, असे यथार्थतया सम्यक् ज्ञानाने जाणावे. भिक्षु हो, याप्रमाणे जाणणारा विद्वान आर्यश्रावक जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, याविषयी विरक्त होतो, आणि विरागामुळे विरक्त होतो.

19 . आत्म्याचे पाच विभाग

आत्मा शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, असा प्रश्न केला असता त्याचे सरळ उत्तर दिल्याने घोटाळा होण्याचा संभव होता, म्हणून बुद्ध भगवन्ताने आत्मा म्हणजे काय याची नीट कल्पना येण्यासाठी त्याचे पृथक्करण या पंचस्कन्धात केले आहे. जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, असे या आत्म्याचे पाच विभाग करता येतात. आणि ते विभाग पाडल्याबरोबर स्पष्ट दिसते की, आत्मा शाश्वत किंवा अशाश्वत नाही. का की, हे पाचही स्कन्ध सदोदित बदलणारे म्हणजे अनित्य आहेत, दुःखकारक आहेत, आणि म्हणूनच ते माझे किंवा तो माझा आत्मा असे म्हणणे योग्य होणार नाही. हाच बुद्धाचा अनात्मवाद होय. आणि तो शाश्वतवाद व अशाश्वतवाद या दोन टोकांना जात नाही. भगवान कात्यायनगोत्र भिक्षूला उद्देशून भगवान म्हणतो, “हे कात्यायन, जनता बहुतकरून अस्तिता आणि नास्तिता ह्या दोन अन्तांना जाते. हे दोन्ही अन्त सोडून तथागत मध्यममार्गाने धर्मोपदेश करतो.”

20 . अनावश्यक वाद

एवढे स्पष्टीकरण करून झाल्यावर जर कोणी हट्ट धरून बसला की, शरीर आणि आत्मा एक आहे किंवा भिन्न आहे हे सांगा, तर भगवान म्हणे, “ह्या ऊहापोहात मी पडत नसतो. का की, त्यामुळे मनुष्यजातीचे कल्याण होणार नाही.” याचा थोडासा मासला चूळमालुंक्यपुत्तसुत्तात सापडतो. त्या सुत्ताचा सारांश असा-

‘बुद्ध भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडिकाच्या आरामात राहत असता मालुंक्यपुत्त नावाचा भिक्षु त्याजपाशी आला आणि नमस्कार करून एका बाजूला बसला. नंतर तो भगवन्ताला म्हणाला, “भदंत, एकान्तात बसलो असता माझ्या मनात असा विचार आला की, हे जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, शरीर व आत्मा एक आहे की भिन्न, मरणोत्तर तथागताला पुनर्जन्म आहे की नाही, इत्यादि प्रश्नांचा भगवन्ताने खुलासा केला नाही; तेव्हा भगवन्ताला मी हे प्रश्न विचारावे, आणि जर भगवन्ताला या प्रश्नाचा निकाल लावता आला, तरच भगवन्ताच्या शिष्यशाखेत राहावे. पण जर भगवन्ताला हे प्रश्न सोडवता येत नसले, तर भगवन्ताने सरळ तसे सांगावे.”

 भ.- मालुंक्यपुत्ता, तू माझा शिष्य होशील, तर या प्रश्नांचे स्पष्टीकरण करीन असे मी तुला कधी सांगितले होते काय?

मा.- नाही, भदन्त.

भ.- बरे, तू तरी मला म्हणालास का की, जर भगवन्ताने या सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण केले, तरच मी भगवन्ताच्या भिक्षुसंघात समाविष्ट होईन.

मा.- नाही भदन्त.

भ.- तर मग आता ह्या प्रश्नांचा खुलासा केल्याशिवाय मी भगवन्ताचा शिष्य राहणार नाही असे म्हणण्यात अर्थ कोणता? मालुंक्यपुत्ता, एखाद्या मनुष्याच्या शरीरामध्ये बाणाचे विषारी शल्य शिरून तो तळमळत असता त्याचे आप्तमित्र शस्त्रक्रिया करणा-या वैद्याला बोलावून आणतील. पण तो रोगी जर त्याला म्हणेल, ‘हा बाण कोणी मारला? तो ब्राह्मण होता की क्षत्रिय होता? वैश्य होता की शूद्र होता? काळा होता की गोरा होता? त्याचे धनुष्य कोणत्या प्रकारचे होते? धनुष्याची दोरी कोणत्या पदार्थाची केली होती? इत्यादिक गोष्टींचा खुलासा केल्यावाचून मी या शल्याला हात लावू देणार नाही; तर हे मालुंक्यपुत्ता, अशा परिस्थितीत त्या माणसाला या गोष्टी न समजताच मरण येईल. त्याचप्रमाणे जो असा हट्ट धरील की, जग हे शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे, इत्यादि गोष्टींचे स्पष्टीकरण केल्यावाचून मी ब्रह्मचर्य आचरणार नाही, तर त्याला ह्या गोष्टी समजल्यावाचूनच मरण येईल.

‘हे मालुंक्यपुत्ता, जग शाश्वत आहे किंवा अशाश्वत आहे अशी दृष्टि आणि विश्वास असला, तरी त्यापासून धार्मिक आचरणाला मदत होईल असे नाही. जग शाश्वत आहे असा विश्वास ठेवला, तरी जरा, मरण, शोक, परिदेव, यांजपासून मुक्तता होत नाही. त्याचप्रमाणे जग शाश्वत नाही, शरीर आणि आत्मा एक आहे, शरीर आणि आत्मा भिन्न आहे, मरणोत्तर तथागताचा पुनर्जन्म होतो, किंवा होत नाही, इत्यादिक गोष्टींवर विश्वास ठेवला, न ठेवला, तरी जन्म, जरा, मरण, परिदेव आहेतच आहेत. म्हणून, मालुंक्यपुत्ता, या गोष्टींचा खल करण्याच्या भरीला मी पडलो नाही. का की, त्या वादविवादाने ब्रह्मचर्याला कोणत्याही प्रकारे स्थैर्य येण्याचा संभव नाही. त्या वादाने वैराग्य उत्पन्न होणार नाही, पापाचा निरोध होणार नाही, आणि शांति, प्रज्ञा, संबोध व निर्वाण यांचा लाभ व्हावयाचा नाही.’

‘परंतु मालुंक्यपुत्ता, हे दुःख आहे, हा दु:खाचा समुदय आहे, हा दुःखाचा निरोध आहे, आणि हा दुःख निरोधाचा मार्ग आहे, हे मी स्पष्ट करून दाखविले आहे. कारण ही चार आर्यसत्ये ब्रह्मचर्याला स्थैर्य आणणारी आहेत, यांजमुळे वैराग्य येते, पापाचा निरोध होतो, शांति, प्रज्ञा, संबोध व निर्वाण यांचा लाभ होतो. म्हणून हे मालुंक्यपुत्ता, ज्या गोष्टींची मी चर्चा केली नाही, त्या गोष्टींची चर्चा करू नका; ज्या गोष्टींचे मी स्पष्टीकरण केले आहे, त्या स्पष्टीकरणाला योग्य होत असे समजा.’

याचा अर्थ असा की, आत्मा पंचस्कंधांचा बनलेला आहे, तरी त्याचा आकार वगैरे कसा असतो, तो जसाच्या तसा परलोकी जातो की काय, इत्यादी गोष्टींचा खल केल्याने ब्रह्मघोटाळा माजून राहणार. जगात दु:ख विपुल आहे, आणि ते मनुष्यजातीच्या तृष्णेने उत्पन्न झाले असल्यामुळे अष्टांगिक मार्गाच्या द्वारे त्या तृष्णेचा निरोध करून जगात सुखशांति स्थापन करणे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. हा सरळ रस्ता, व हेच बुद्धाचे तत्त्वज्ञान.

21 . ईश्वरवाद

बुद्ध ईश्वराला मानीत नव्हते, म्हणून तो नास्तिक होता, अशी काही लोकांची समजूत आहे. बौद्ध वाड्‍ःमय किंवा प्राचीन उपनिषदे वाचली असता या समजुतीत तथ्य नाही, असे दिसून येते. तथापि हा लोकभ्रम दूर करण्यासाठी बुद्धसमकाली प्रचलित असलेल्या ईश्वरवादाचे दिग्दर्शन करणे योग्य वाटते.

खास ईश्वर शब्दाचा अङ्गुत्तरनिकायाच्या तिकनिपातात (सुत्त नं. ६९) आणि मज्झिमनिकायातील देवदहसुत्तात (नं. १०१) उल्लेख आला आहे. त्यापैकी ईश्वरासंबंधीचा पहिल्या सुत्तातील मजकूर असा-

भगवान म्हणतो “भिक्षुहो, जे काही सुख, दुःख किंवा उपेक्षा मनुष्य प्राणी भोगतो ते सर्व ईश्वरनिर्मित आहे (इस्सरनिम्मानहेतु) असे प्रतिपादणा-यांना आणि मानणा-यांना मी विचारतो की, त्यांचे हे मत आहे काय? आणि त्यांनी ‘होय’ असे उत्तर दिल्यावर मी म्हणतो, तुम्ही प्राणघातकी, चोर, अब्रह्मचारी, असत्यवादी, चहाडखोर, शिवीगाळ करणारे, बडबडणारे, दुस-याचे धन इच्छिणारे, द्वेष्टे आणि मिथ्यादृष्टिक ईश्वराने निर्मिल्यामुळेच झाला की काय? भिक्षुहो, हे सर्व ईश्वराने निर्माण केले असे सत्य मानले, तर (सत्कर्माविषयी) छंद आणि उत्साह राहणार नाही; अमुक करावे, किंवा अमूक करू नये, हे देखील समजणार नाही.”

या ईश्वरनिर्माणाचा उल्लेख देवदहसुत्तात देखील आला आहे, परंतु हा मजकूर प्रक्षिप्त असावा, अशी बळकट शंका येते. कारण, दुस-या कोणत्याही सुत्तात ही कल्पना आढळत नाही. बुद्धसमकालीन मोठा देव म्हटला म्हणजे ब्रह्मा होय. पण तो निराळ्या   त-हेचा कर्ता आहे. बायबलातील देवासारखा नाही. जग होण्यापूर्वी तो नव्हता. विश्व उत्पन्न झाल्यावर प्रथमतः तो अवतरला. आणि त्यानंतर इतर प्राणी झाले, त्यामुळे त्याला भूतभव्यांचा कर्ता म्हणू लागले. ब्रह्मजालसुत्तात आलेल्या त्याच्या वर्णनाचा सारांश असा-

“पुष्कळ काळानंतर ह्या जगाचा संवर्त (नाश) होतो. आणि त्यातील बहुतेक प्राणी आभास्वर देवलोकात जातात. त्यानंतर पुष्कळ काळाने या जगाचा विवर्त (विकास) होऊ लागतो. तेव्हा प्रथमत: रिकामे ब्रह्मविमान उत्पन्न होते. तदनंतर आभास्वर देवलोकींचा एक प्राणी तेथून च्युत होऊन या विमानात जन्मतो. तो मनोमय, प्रीतिभक्ष्य, स्वयंप्रभ, अन्तरिक्षचर, शुभस्थायी आणि दीर्घजीवी असतो. त्यानंतर दुसरे अनेक प्राणी आभास्वर, देवलोकातून च्युत होऊन या विमानात जन्मतात. त्यांना वाटते हा जो भगवान ब्रह्मा, महाब्रह्मा, तो अभिभू, सर्वदर्शी, वशवर्ती, ईश्वर, कर्ता, निर्माता, श्रेष्ठ, सर्जिता, वशी आणि भूतभव्याचा पिता आहे.”

‘ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता |’ ह्या मुण्डकोपनिषदाच्या (१|१) वाक्यात ब्रह्मदेवाची वर दिलेली कल्पना संक्षेपत: निर्देशिलेली आहे. यावरून ब्रह्मदेवाला जगताचा कर्ता बनविण्याचा ब्राह्मणांचा प्रयत्न स्पष्ट दिसतो. परंतु तो त्या काळाच्या श्रमणसंस्कृतीसमोर टिकू शकला नाही. खुद्द ब्राह्मणांनाच हा प्रयत्न सोडून देऊन ब्रह्म हा नपुंसकलिंगी शब्द स्वीकारावा लागला. आणि बहुतेक सर्व उपनिषदांतून या ब्रह्म शब्दालाच महत्त्व दिले आहे.

ब्रह्मापासून किंवा आत्म्यापासून जगाची उत्पत्ति कशी झाली याची एक कल्पना बृहदारण्यक उपनिषदात सापडते, ती अशी-

आत्मैवेदमग्र आसीत् पुरुषविधः...स वै नैव रेमे तस्मादेकाकी न रमते | स द्वितीयमैच्छत् | स हैतावानास यथा स्त्रीपुमांसौ संपरिष्वक्तौ | स इममेवात्मानं द्वेधा पातयत्ततः पतिश्च पत्नी चाभवतां तस्मादिदमर्धबृगलमिव स्व इति |

‘सर्वांपूर्वी पुरुषरूपी आत्मा तेवढा होता... तो रमला नाही; म्हणून (मनुष्य) एकाकी रमत नसतो. तो दुस-याची इच्छा करू लागला, आणि जसे स्त्रीपुरुष परस्परांना आलिंगन देतात, तसा होऊन राहिला. त्याने स्वत:ला द्विधा फोडले. त्यामुळे पति आणि पत्नी झाली. म्हणून हे शरीर (द्विदल धान्याच्या) दलाप्रमाणे आहे.’ (बृ. उ. १|४|१-३).

आता बायबलातील उत्पत्तिकथा पाहा. “मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य बनविला... मग देवाने आदामावर (त्या माणसावर) गाढ निद्रा पाडली, आणि त्याची बरगडी काढून तिची स्त्री बनविली... यास्तव पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” (बायबल, उत्पत्ति, अ. २).

ह्या आणि वरील उत्पत्तीत केवढा फरक! येथे देव सर्व पृथ्वी निर्माण करून मग माणसाला, व त्याच्या बरगडीपासून स्त्रीला उत्पन्न करतो; देव जगापासून अगदीच भिन्न; आणि तेथे पुरुषरूपी आत्मा स्वतःच द्विधा होऊन स्त्री आणि पुरुष बनतो.

22 . प्रजापतीची उत्पत्ति

प्रजापति म्हणजे जगत्कर्ता ब्रह्मा, त्याची उत्पत्ति बृहदारण्यकात सांगितली आहे, ती येणेप्रमाणे-

आप एवेदमग्र आसुस्ताः आपः सत्यमसृजन्त, सत्यं ब्रह्म, ब्रह्म प्रजापतिं, प्रजापतिर्देवांस्ते देवाः सत्यमेवोपासते | (५|५|१).

‘सर्वापूर्वी पाणी तेवढे होते. त्या पाण्याने सत्य, सत्याने ब्रह्म, ब्रह्माने प्रजापति व प्रजापतीने देव उत्पन्न केले; ते देव सत्याचीच उपासना करतात.’

बायबलात देखील जलप्रलयानंतर सृष्टीची उत्पत्ति पुनरपि झाल्याची कथा आहे. पण देवाने आगाऊच नोहाचे कुटुंब व पशुपक्षादिकांच्या नर व माद्या जहाजात भरून ठेवावयास लावल्या, आणि मग जलप्रलय केला. उपनिषदात जलप्रलयापूर्वी काय होते ते मुळीच सांगितले नाही. एवढेच नाही, तर सत्य ब्रह्मदेवाच्या आणि ब्रह्मतत्त्वाच्या देखील वरच्या पायरीवर ठेवले आहे. ब्रह्मजालसुत्तात दिलेली ब्रह्मोत्पत्तीची कथा या कथेशी निकटतर आहे.

ईश्वर जगापासून भिन्न असून त्याने जग निर्माण केले, ही कल्पना हिंदुस्थानात शकांनी आणली असावी. का की, त्यापूर्वीच्या वाड्‍ःमयात ती तशा रूपाने आढळत नाही. तेव्हा, बुद्ध ईश्वर मानीत नसल्यामुळे नास्तिक होता, असा त्याच्यावर आळ आणणे संभवनीयच नव्हते. तो वेदनिंदक असल्यामुळे नास्तिक आहे, असा ब्राह्मण आरोप करीत,पण बुद्धाने वेदाची निंदा केलेली कोठे आढळत नाही. आणि ब्राह्मणांना मान्य झालेल्या सांख्यकारिकेसारख्या ग्रंथात वेदनिंदा काय कमी आहे?

 दृष्टवदानुश्रविक:

स ह्यविशुद्धिक्षयातिशययुक्तः|

“दुष्ट उपायाप्रमाणेच वैदिक उपाय देखील (निरुपयोगी) आहे. कारण तो अविशुद्धि, नाश आणि अतिशय यांनी युक्त आहे.”

आणि ‘त्रैगुण्यविषया वेदाः’ इत्यादिक वेदनिंदा भगवद्गीतेत सापडत नाही काय? पण सांख्याने ब्राह्मणांच्या जातिभेदावर हल्ला केला नाही, आणि भगवद्गीतेने तर त्या जातिभेदाला उघड उघड उचलून धरले आहे. तेव्हा त्यांना वेदनिंदा पचणे शक्य होते. याच्या उलट बुद्धाने वेदनिंदा केली नसली, तरी जातिभेदावर जोराचा हल्ला केला. मग तो वेदनिंदक कसा ठरणार नाही? वेद म्हणजे जातिभेद, आणि जातिभेद म्हणजे वेद, असे ह्या दोहोंचे ऐक्य आहे! जातिभेद नसला, तर वेद राहील कसा? आणि जातिभेद अस्तित्वात राहून वेदाचे एक अक्षरसुद्धा कोणाला माहीत नसले, तरी वेदप्रामाण्यबुद्धि कायम असल्यामुळे वेद राहिलाच म्हणावयाचा!

बुद्धसमकालीन श्रमणब्राह्मणांत ईश्वरवादाला मुळीच महत्त्व नव्हते, हे वरील विवेचनावरून दिसून येईलच. यापैकी काही ईश्वराच्या जागी कर्माला मानीत, आणि कधी कधी बुद्ध कर्मवादी नाही, अतएव नास्तिक आहे, असा बुद्धावर आरोप करीत. त्याचे निरसन पुढील प्रकरणात करण्यात येईल.

23 . तळटीपा

१. पाहा, मागे, पृ. ४७-४८.

२. पाहा, मागे, पृ. ३४-३५.

३. नगरद्वारावर हत्तीला सरळ हल्ला करता येऊ नये, म्हणून त्याच्या समोर एक बळकट खांब बांधीत. त्याला पालि भाषेत एसिका किंवा इन्दखील म्हणतात.

४. सामञ्‍ञफलसुत्तात निगण्ठ नाथपुत्ताचा चातुर्यामसंवरवाद विक्षेपवादापूर्वी घातला आहे. परंतु मज्झिमनिकायांतील चूळसारोपम सुत्तात व इतर अनेक सुत्तांत नाथपुत्ताचे नाव शेवटी येते.

५. हे आणि दुसरे अनेक आत्मवाद दीघनिकायातील ब्रह्मजालसुत्तात दिले आहेत. इतर निकायात देखील भिन्न भिन्न आत्मवादांचा उल्लेख सापडतो.

६. हेच सुत्त महावग्गातही आहे.

७. निदानसंयुत्त, वग्ग २, सुत्त ५.

८. मज्झिमनिकाय, नं. ६३.

 

संदर्भ