१६९-१८४

भगवान बुद्ध

यज्ञयाग

14-10-2017
18-09-2017
18-09-2017
18-09-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

  1. पाश्चात्य देशात प्रसिद्ध फ्रेंच पंडित बर्नुफ यांचे लक्ष प्रथमत: बौद्ध धर्माकडे वेधले.
  2. इंग्रजी ग्रंथ वाचनामुळे हिंदूंची बुद्धाविषयी आदरबुद्धि वाढली.
  3. अहिंसा परमधर्म स्थापण्यासाठी बुद्धावतार झाला अशी समजुत होती.
  4. श्रमण संप्रदाय वेदाचा स्पष्ट निषेध करीत असत.
  5. बुद्धाला यज्ञयागात होणारी प्राण्यांची हिंसा पसंत नव्हती.

सारांश

पाश्चात्य देशात मॅक्सम्यूलर यांचे गुरू प्रसिद्ध फ्रेंच पंडित बर्नुफ यांचे लक्ष प्रथमत: बौद्ध धर्माकडे वेधले. एडविन् आर्नाल्ड (Edwin Arnold) यांच्या ‘लाइट ऑफ् एशिया’ (Light of Asia) (१८७९) च्या वाचनामुळे इंग्रजी भाषाभिज्ञ हिंदूंची बुद्धाविषयी आदरबुद्धि वाढली. अहिंसा परमधर्म स्थापण्यासाठी बुद्धावतार झाला अशी समजुतीला दृढत चालली होती. श्रमण संप्रदाय कमीजास्ती प्रमाणाने वेदाचा स्पष्ट निषेध करीत असत. बुद्ध  वेदनिंदा करीत नसला तरी यज्ञयागात होणारी गाईबैलांची आणि इतर प्राण्यांची हिंसा त्याला इतर श्रमणांप्रमाणेच पसंत नव्हती. बुद्धसमकालीन यज्ञयागात ब्राह्मणांनी तपश्चर्येचे मिश्रण केले होते. यज्ञ आणि तपश्चर्या यांचे मिश्रण दुप्पट दुःखकारक आहे असे बुद्धाचे म्हणणे होते. सामान्य लोकांनाही यज्ञातील हिंसा मान्य नव्हती.

पारिभाषिक शब्द

श्रमण पंथ , गोहिंसा , बेकारी

1 . पौराणिक बुद्ध

हिंदू लोक बुद्धाला विष्णूचा नववा अवतार मानतात. विष्णूने बुद्धावतार धारण करून असुरांना मोह पाडला व देवांकडून त्यांचा उच्छेद केला, अशी कथा विष्णुपुराणात आली आहे. तिचा सारांश भागवतातील खालील श्लोकात सापडतो-

ततः कलौ संप्रयाते संमोहाय सुरद्विषाम् |

बुद्धो नामाऽजनसुतः कीकटेषु भविष्यति ||

‘त्यानंतर कलियुग आले असता, असुरांना मोह पाडण्यासाठी बुद्ध नावाचा अजनाचा पुत्र कीकट देशात उत्पन्न होईल.’

सामान्य हिंदू लोकांना बुद्धावताराची विशेष माहिती नाही. शास्त्रीपंडितांना आणि पुराण श्रवण करणा-या भाविक हिंदूंना बुद्धासंबंधी जी काही माहिती आहे, ती विष्णुपुराणावरून किंवा भागवतावरून मिळालेली.

2 . विष्णुशास्त्री यांची कल्पना

पाश्चात्य देशात मॅक्सम्यूलर यांचे गुरू प्रसिद्ध फ्रेंच पंडित बर्नुफ यांचे लक्ष प्रथमत: बौद्ध धर्माकडे वेधले, परंतु भरपूर सामग्री न मिळाल्यामुळे त्यांना या धर्माची सांगोपांग माहिती पाश्चात्यांसमोर मांडता आली नाही. तथापि, बौद्ध धर्म केवळ त्याज्य असून विचारात घेण्याला योग्य नाही, अशी जी पाश्चात्य लोकांची समजूत होती, तिला बर्नुफच्या प्रयत्नाने बराच आळा बसला; आणि त्याचा परिणाम असा झाला की, डॉ. विल्सन् सारखे ख्रिस्तभक्त देखील बौद्ध धर्माचा अभ्यास करू लागले, आणि त्यांच्या सहवासामुळे आमच्या इकडील कॉलेजातून शिक्षण घेऊन निघालेल्या तरुण मंडळींची बौद्धधर्माविषयी कल्पना बदलत चालली.

विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या बाण कवीवरील निबंधात म्हणतात-

“आर्य लोकांचा मूळचा जो वैदिक धर्म त्यावर पहिला मतभेद बुद्ध याने काढला. त्याच्या मतास कालगत्या पुष्कळ लोक अनुसरून धर्मात दुफळी झाली व हे नवे लोक आपणास बौद्ध असे म्हणवू लागले. यांची नवी मते कोणती होती, यांचा उदय, प्रसार व लय केव्हा झाला व कशामुळे झाला, वगैरे गोष्टी इतिहासकारास मोठा मनोरंजक विषय होता; पण आता बोलून उपयोग काय? मागलीच दिलगिरीची गोष्ट पुनः एकवार येथे सांगितली पाहिजे की, इतिहासाच्या अभावास्तव या महालाभास आपण एकंदर जगासह अंतरलो. असो; बुद्धाविषयी जरी आपणास काही माहिती नाही, तरी एवढी गोष्ट स्पष्ट दिसते की, त्याची बुद्धि लोकोत्तर असावी. का की, त्याच्या प्रतिपक्षांनी म्हणजे ब्राह्मणांनीही त्यास ईश्वराचा साक्षात् नववा अवतार गणला! जयदेवाने ‘गीतगोविंदा’च्या आरंभी म्हटले आहे-

निंदसि यज्ञविधेरहह श्रुतिजातं |

सदयहृदयदर्शितपशुघातं |

केशव धृतबुद्धशरीर जय जगदीश हरे (ध्रुवपद)

...ख्रिस्ती शकाच्या आरंभाच्या सुमारास बुद्धाचे व ब्राह्मणांचे मोठे वाद होऊन त्यात शंकराचार्यांनी बौद्धधर्माचे खंडन केले, व पुन्हा ब्राह्मणधर्माची स्थापना केली. याप्रमाणे बौद्धांचा मोड झाल्यावर ते आपल्या खुषीने म्हणा किंवा राजाज्ञेने देशात्याग करून कोणी तिबेटांत, कोणी चीनांत, तर कोणी लंकेत असे जाऊन राहिले.”

या उता-यावरून त्या काळच्या इंग्लिश भाषाभिज्ञ हिंदूंची बौद्धधर्मविषयक कल्पना कशा प्रकारची होती याचे अनुमान करता येते.

3 . ‘लाइट ऑफ् एशिया’चा परिणाम

त्यानंतर १८७९ साली एडविन् आर्नाल्ड (Edwin Arnold) यांचा ‘लाइट ऑफ् एशिया’ (Light of Asia) नावाचा प्रख्यात काव्यग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याच्या वाचनामुळे इंग्रजी भाषाभिज्ञ हिंदूंची बुद्धाविषयी आदरबुद्धि वाढली; पण यज्ञयागांचा विध्वंस करून अहिंसा परमधर्म स्थापण्यासाठी बुद्धावतार झाला, या समजुतीला दृढता येत चालली, आणि ही कल्पना थोड्याबहुत प्रमाणाने अद्यापही प्रचलित आहे. या कल्पनेत कितपत तथ्य आहे हे पाहण्याच्या उद्देशाने बुद्धसमकालीन श्रमणांचे आणि खुद्द बुद्धाचे यज्ञयागासंबंधी काय म्हणणे होते, याचा विचार करणे योग्य वाटते.

4 . हरिकेशिबलाची कथा

श्रमणपंथांपैकी जैन आणि बौद्ध या दोन पंथांचेच तेवढे ग्रन्थ आजला उपलब्ध आहेत. त्यात जैनांच्या उत्तराध्ययनसूत्रात हरिकेशिबल याची गोष्ट सापडते. तिचा सारांश असा-

हरिकेशिबल हा चाण्डालाचा (श्वपाकाचा) मुलगा होता. तो जैन भिक्षु होऊन मोठा तपस्वी झाला. कोणे एके समयी महिनाभर उपास करून पारण्याच्या दिवशी भिक्षाटन करीत असता तो एका महायज्ञाच्या स्थानी पोचला. मलिनवस्त्राच्छादित त्याचे ते कृश शरीर पाहून याजक ब्राह्मणांनी त्याचा धिक्कार केला आणि त्याला तेथून जावयास सांगितले. तेथे तिंदुक वृक्षावर राहणारा यक्ष गुप्त रूपाने हरिकेशिबलाच्या स्वराने त्या ब्राह्मणांना म्हणाला, “ब्राह्मणांनो, तुम्ही केवळ शब्दांचा भार वाहणारे आहात; वेदाध्ययन करता, पण वेदांचा अर्थ तुम्हांला समजत नाही.” याप्रमाणे त्या भिक्षूने अध्यापक ब्राह्मणांचा उपमर्द केला असे मानून त्या ब्राह्मणांनी आपल्या तरुण कुमारांना त्याला मारहाण करावयास लावले. त्या कुमारांनी दांड्यांनी, छड्यांनी आणि चाबकांनी त्याला मारण्यास सुरवात केली. ते पाहून कोसलिक राजाची कन्या व पुरोहिताची स्त्री भद्रा यांनी त्यांचा निषेध केला. इतक्यात अनेक यक्षांनी येऊन त्या कुमारांना रक्तबंबाळ होईपर्यंत ठोकून काढले. त्यामुळे ब्राह्मण घाबरून गेले, आणि शेवटी त्यांनी हरिकेशिबलाची क्षमा मागून त्याला अनेक पदार्थांसह तांदळाचे उत्तम अन्न अर्पण केले.

ते अन्न ग्रहण करून हरिकेशिबल त्यांना म्हणाला, “ब्राह्मणांनो, आग पेटवून पाण्याच्या योगाने बाह्य शुद्धि मिळविण्याच्या मागे का लागला आहात? ही तुमची बाह्य शुद्धि योग्य नाही, असे तत्त्वज्ञ म्हणतात.”

त्यावर ते ब्राह्मण म्हणाले, “हे भिक्षु, आम्ही याग कशा प्रकारचा करावा, आणि कर्माचा नाश कसा करावा?”

हरि.- सहा जीवकायांची हिंसा न करता, असत्य भाषण आणि चोरी न करता, परिग्रह, स्त्रिया, मान आणि माया सोडून साधुलोक दान्तपणे वागतात. पाच संवरांनी संवृत्त होऊन, जीविताची चाड न ठेवता देहाची आशा सोडून, ते देहाविषयी अनासक्त होतात. व (अशा प्रकारे) श्रेष्ठ यज्ञ यजीत असतात.

ब्रा.-   तुझा अग्नि कोणता? अग्निकुंड कोणते? श्रुचा कोणती? गोव-या कोणत्या? समिधा कोणत्या? शांति कोणती? आणि कोणत्या होमविधीने तू यज्ञ करतोस?

हरि.- तपश्चर्या माझा अग्नि आहे; जीव अग्निकुंड, योग श्रुचा, शरीर गोव-या, कर्म समिधा, संयम शांति; अशा विधीने ऋषींनी वर्णिलेला यज्ञ मी करीत असतो.

ब्रा.-  तुझा तलाव कोणता, शांतितीर्थ कोणते?

हरि.- धर्म हाच माझा तलाव व ब्रह्मचर्य शांतितीर्थ आहे... येथे स्नान करून विमल, विशुद्ध महर्षि उत्तम पदाला जातात.

याशिवाय यज्ञयागांचा निषेध करणारी याच उत्तराध्ययन सूत्राच्या २५ व्या अध्यायात दुसरी एक गाथा सापडते ती अशी-

पसुबंधा सव्वे वेया जठ्ठं च पावकम्मुणा |

न तं तायंति दुस्सीलं कम्माणि बलवंतिह ||

‘सर्व वेदांत पशुमारण सांगितले असून यजन पापकर्माने मिश्रित आहे. यज्ञ    करणा-यांची ती पापकर्मे त्यांचे रक्षण करू शकत नाहीत.’

हरिकेशिबलाच्या कथेत यज्ञाचा तेवढा निषेध केला आहे. पण या गाथेत यज्ञाचाच नव्हे, तर वेदाचाही निषेध स्पष्ट दिसतो.

5 . श्रमण पंथाचा वेदविरोध

अजिकेसकंबल नास्तिकमतप्रवर्तक असल्यामुळे यज्ञयागांवरच नव्हे, तर वेदांवर देखील टीका करीत असावा असे सर्वदर्शनातील चार्वाक मताच्या वर्णनावरून अनुमान करता येते. चार्वाकमतप्रदर्शक जे काही श्लोक सर्वदर्शनात आहेत, त्यापैकी हा दीड श्लोक आहे-

पशुश्चेन्निहतः स्वर्ग ज्योतिष्टोमे गमिष्यति |

स्वपिता यजमानेन तत्र कस्मान्न हिंस्यते || ....

त्रयो वेदस्य कर्तारो भण्डधूर्तनिशाचराः

‘अग्रिष्टोम यज्ञात मारलेला पशू जर स्वर्गाला जातो, तर त्या यज्ञात यजमान आपल्या पित्याचा वध का करीत नाही? ...वेदांचे कर्ते भण्ड, धूर्त, राक्षस हे तिघे आहेत.’

यावरून असे दिसून येते की, बहुतेक श्रमण संप्रदाय कमीजास्ती प्रमाणाने वेदाचा स्पष्ट निषेध करीत असत, आणि त्यांना वेदनिंदक म्हणण्यास हरकत नव्हती; परंतु बुद्धाने वेदाची निंदा केल्याचा दाखला कोठेच आढळत नाही. याच्या उलट वेदाभ्यासाचा जिकडे तिकडे गौरव सापडतो. बुद्धाच्या भिक्षुसंघात महाकात्यायनासारखे वेदपारंगत ब्राह्मण होते. तेव्हा बुद्ध भगवान वेदनिंदा करी, हे संभवतच नाही. पण यज्ञयागात होणारी गाईबैलांची आणि इतर प्राण्यांची हिंसा त्यांना इतर श्रमणांप्रमाणेच पसंत नव्हती.

6 . यज्ञांचा निषेध

कोसलसंयुत्तांत यज्ञयागांचा निषेध करणारे सुत्त आहे ते असे- “बुद्ध भगवान श्रावस्ती येथे राहत होता. त्या वेळी पसेनदि कोसल राजाच्या महायज्ञाला सुरवात झाली. त्यात पाचशे बैल, पाचशे गोहरे, पाचशे कालवडी, पाचशे बकरे व पाचशे मेंढे बलिदानासाठी यूपांना बांधले होते. राजाचे दास, दूत व कामगार दंडाच्या भयाने भयभीत होऊन आसवे गाळीत, रडत रडत यज्ञाची कामे करीत होते.”

“ते सर्व भिक्षूंनी पाहून भगवंताला सांगितले. तेव्हा भगवान म्हणाला,

अस्समेधं पुरिसमेधं सम्मापासं वाजपेयं |

निरग्गळं महारम्भा न ते होन्ति महप्फला ||

अजेळका च गावो च विविधा यत्थ हञ्‍ञरे |

न तं सम्मग्गता यञ्ञं उपयन्ति महेसिनो ||

ये च यञ्‍ञा निरारम्भा यजन्ति अनुकूलं सदा |

अजेळका च गावो च विविधा नेत्थ हञ्‍ञरे ||

एतं सम्मग्गता यञ्ञं उपयन्ति महेसिनो |

एतं यजेथ मेधावी एसो यञ्ञो महप्फलो ||

एतं हि यजमानस्य सेय्यो होति न पापियो |

यञ्ञो च विपुलो होति पसीदन्ति च देवता ||

“अश्वमेध, परुषमेध, सम्यक्पाश, वाजपेय आणि निरर्गल, हे यज्ञ मोठ्या खर्चाचे आहेत; पण ते महाफलदायक होत नाहीत. बकरे, मेंढे आणि गाई असे विविध प्राणी ज्यात मारले जातात, त्या यज्ञाला सद्वर्तनी महर्षि जात नाहीत. परंतु ज्या यज्ञात प्राण्यांची हिंसा होत नाही, जे लोकांना आवडतात, आणि बकरे, मेंढे गाई वगैरे विविध प्राणी ज्यात मारले जात नाहीत, अशा यज्ञात सद्वर्तनी महर्षि उपस्थित होतात. म्हणून सूज्ञ पुरुषाने असा यज्ञ करावा. हा यज्ञ महाफलदायक आहे. कारण ह्या यज्ञाच्या यजमानाचे कल्याण होते, अकल्याण होत नाही. आणि तो यज्ञ वृद्धि पावतो, व देवता प्रसन्न होतात.”

7 . यज्ञात पाप का?

यज्ञात प्राणिवध केल्याने कायावाचामने यजमान अकुशल कर्माचे आचरण करतो, म्हणून यज्ञ अमंगळ आहे, असे बुद्धाचे म्हणणे होते. यासंबंधी अंगुत्तर निकायाच्या सत्तकनिपातात एक सुत्त सापडते. त्याचे रूपांतर येणेप्रमाणे-

एके समयी भगवान श्रावस्ती येथे जेतवनात अनाथपिंडिकाच्या आरामात राहत होता. त्या वेळी उद्गतशरीर (उग्गतसरीर) ब्राह्मणाने महायज्ञाची तयारी चालविली होती. पाचशे बैल, पाचशे गोहरे, पाचशे कालवडी, पाचशे बकरे आणि पाचशे मेंढे यज्ञात बलि देण्याकरिता युपांना बांधले होते. तेव्हा उद्गतशरीर ब्राम्हण भगवंतापाशी येऊन, भगवंताला कुशल प्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला, आणि म्हणाला, “भो गोतम, यज्ञासाठी अग्नि पेटविणे आणि यूप उभारणे महत्फलदायक होते असे मी ऐकले आहे.”

भगवान म्हणाला, “हे ब्राह्मणा, यज्ञासाठी अग्नि पेटविणे आणि यूप उभारणे महत्फलदायक होते असे मीही पण ऐकले आहे.”

हेच वाक्य ब्राह्मणाने आणखी दोनदा उच्चारले, आणि भगवंताने त्याला तेच उत्तर दिले तेव्हा ब्राह्मण म्हणाला, “तर मग आपणा दोघांचे सर्वथैव जुळते.”

त्यावर आनंद म्हणाला, “हे ब्राह्मणा, हा तुझा प्रश्न बरोबर नाही.’ ‘मी असे ऐकले आहे’ असे न म्हणता तू असे म्हण, ‘यज्ञासाठी मी अग्नि पेटविण्याच्या व यूप उभारण्याच्या प्रयत्नात आहे, यासंबंधी भगवंताने मला असा उपदेश करावा की, ज्यामुळे माझे चिरकाल कल्याण होईल.”

आनंदाच्या म्हणण्याप्रमाणे ब्राह्मणाने भगवंताला प्रश्न केला. तेव्हा भगवान म्हणाला, “जो यज्ञासाठी अग्नि पेटवितो व यूप उभारतो, तो दु:खोत्पादक तीन अकुशल शस्त्रे उगारतो. ती कोणती तर कायशस्त्र, वाचाशस्त्र आणि चित्तशस्त्र. जो यज्ञाला सुरवात करतो, त्याच्या मनात इतके बैल, इतके गोहरे, इतक्या कालवडी, इतके बकरे, इतके मेंढे मारण्यात यावे, असा अकुशल विचार उद्भवतो. याप्रमाणे तो सर्वात प्रथम दुःखोत्पादक अकुशल चित्तशस्त्र उगारतो. नंतर हे प्राणी मारण्याला तो आपल्या तोंडाने आज्ञा देतो, आणि त्या योगे दुःखोत्पादक अकुशल वाचाशस्त्र उगारतो. तदनंतर त्या प्राण्यांना मारावे म्हणून प्रथम आपणच त्या त्या प्राण्यास मारण्यास आरंभ करतो, आणि त्या योगे दुःखोत्पादक अकुशल कायशस्त्र उगारतो.

“हे ब्राह्मणा, हे तीन अग्नि त्याग करण्याला, परिवर्जनाला योग्य आहेत; त्यांचे सेवन करू नये. ते कोणते? कामाग्नि, द्वेषाग्नि आणि मोहाग्नि. जो मनुष्य कामाभिभूत होतो, तो कायावाचामने कुकर्म आचरतो आणि त्यामुळे मरणोत्तर दुर्गतीला जातो. त्याचप्रमाणे द्वेषाने आणि मोहाने अभिभूत झालेला मनुष्य देखील कायावाचामने कुकर्मे आचरून दुर्गतीला जातो. म्हणून हे तीन अग्नि त्याग करण्याला, परिवर्जनाला योग्य आहेत; त्यांचे सेवन करू नये.

“हे ब्राह्मणा, या तीन अग्नींचा सत्कार करावा, त्यांना मान द्यावा, त्यांची पूजा आणि चांगल्या रीतीने, सुखाने परिचर्या करावी. ते अग्नि कोणते? आहवनीयाग्नि (आहुनेय्यग्गि), गार्हपत्याग्नि (गहपतग्गि), व दक्षिणाग्नि (दक्खिणेय्यग्गि). आईबापे आहवनीयाग्नि समजावा, आणि त्यांची मोठ्या सत्काराने पूजा करावी. बायकामुले, दास कर्मकार गार्हपत्याग्नि आहेत असे समजावे, व त्यांची आदरपूर्वक पूजा करावी. श्रमणब्राह्मण दक्षिणाग्नि समजावा आणि त्याची सत्कारपूर्वक पूजा करावी. हे ब्राह्मणा, हा लाकडाचा अग्नि कधी पेटवावा लागतो, कधी त्याची उपेक्षा करावी लागते व कधी विझवावा लागतो.”

हे भगवंताचे भाषण ऐकून उद्गतशरीर ब्राह्मण त्याचा उपासक झाला, आणि म्हणाला, “भो गोतम, पाचशे बैल, पाचशे गोहरे, पाचशे कालवडी, पाचशे बकरे व पाचशे मेंढे, या सर्व प्राण्यांना मी युपांपासून मोकळे करतो. त्यांना जीवदान देतो. ताजे गवत खाऊन आणि थंड पाणी पिऊन ते शीतल छायेत आनंदाने राहोत.’

8 . यज्ञात तपश्चर्येचे मिश्रण

बुद्धसमकालीन यज्ञयागात ब्राह्मणांनी तपश्चर्येचे मिश्रण केले होते. वैदिक मुनि जंगलात राहून तपश्चर्या करू लागले, तरी सवडीप्रमाणे मधून मधून लहान मोठा यज्ञ करीतच. याची एक दोन उदाहरणे तिस-या प्रकरणात दिली आहेतच. याशिवाय याज्ञवल्क्याचे उदाहरण घ्या. याज्ञवल्क्य मोठा तपस्वी आणि ब्रह्मिष्ठ समजला जात असे. असे असता त्याने जनक राजाच्या यज्ञात भाग घेतला, आणि शेवटी एक हजार गाईंची दहा हजार सुवर्णपादांसह दक्षिणा स्वीकारली.

परंतु यज्ञ आणि तपश्चर्या यांचे मिश्रण दुप्पट दुःखकारक आहे असे बुद्ध भगवन्ताचे म्हणणे होते. कन्दरक सुत्तात भगवन्ताने चार प्रकारची माणसे वर्णिली आहेत, ती अशी-

१) आत्मन्तप पण परन्तप नव्हे; २) परन्तप पण आत्मन्तप नव्हे; ३) आत्मन्तप आणि परन्तप, ४) आत्मन्तपही नव्हे आणि परन्तपही नव्हे.

ह्या चारात पहिला कडक तपश्चर्या करणारा तपस्वी होय. तो स्वत:ला ताप देतो, पण पराला ताप देत नाही. दुसरा खाटीक पारधी वगैरे. तो दुस-या प्राण्याला ताप देतो पण स्वतःला ताप देत नाही. तिसरा यज्ञयाग करणारा. तो स्वत:लाही ताप देतो आणि इतर प्राण्यांनाही ताप देतो. चवथा तथागताचा (बुद्धाचा) श्रावक. तो आपणाला किंवा पराला ताप देत नाही.

या चारांचेही सविस्तर विवरण त्या सुत्तात सापडते. त्यापैकी, तिस-या प्रकारच्या माणसाच्या वर्णनाचा सारांश येणेप्रमाणे- भगवान म्हणतो, “भिक्षुहो, आत्मन्तप आणि परन्तप माणूस कोणता? एखादा क्षत्रिय राजा किंवा एखादा श्रीमंत ब्राह्मण एक नवीन संस्थागार बांधतो, आणि मुंडण करून खराजिन पांघरून तुपातेलाने अंग माखतो, व मृगाच्या शिंगाने पाठ खाजवीत आपल्या पत्नीसह व पुरोहित ब्राह्मणासह त्या संस्थागारात प्रवेश करतो. तेथे तो शेण सारवलेल्या जमिनीवर काही न अंथरता निजतो. एका चांगल्या गाईच्या एका पान्ह्याच्या दुधावर तो राहतो, दुस-या पान्ह्याच्या दुधावर त्याची पत्नी राहते आणि तिस-या पान्ह्याच्या दुधावर पुरोहित ब्राह्मण राहतो. चौथ्या पान्ह्याच्या दुधाने होम करतात. चारही पान्ह्यांतून शिल्लक दुधावर वासराला निर्वाह करावा लागतो.

“मग तो म्हणतो, ‘ह्या माझ्या यज्ञाकरिता इतके बैल मारा, इतके गोहरे मारा, इतक्या कालवडी मारा, इतके बकरे मारा, इतके मेंढे मारा, यूपांसाठी इतके वृक्ष तोडा, कुशासनासाठी इतके दर्भ कापा.’ त्याचे दास, दूत आणि कर्मकार दंडभयाने भयभीत होऊन आसवे गाळीत रडत रडत ती कामे करतात. याला म्हणतात, आत्मन्तप आणि परन्तप.”

 

9 . लोकांना गोहिंसा नको होती

हे दास, दूत आणि कर्मकार यज्ञाची कामे रडत रडत का करीत असावेत? कारण, या यज्ञात जी जनावरे मारली जात, ती गरीब शेतक-यांकडून हिरावून घेण्यात येत असत, आणि त्यामुळे शेतक-यांना फार दुःख होई. सुत्तनिपातातील ब्राह्मणधम्मिक सुत्तांत अतिप्राचीन काळच्या ब्राह्मणांचे आचरण वर्णिले आहे, त्यात खालील गाथा सापडतात-

यथा माता पिता भाता अञ्‍ञे वाऽपि च ञातका |

गावो नो परमा मित्ता यासु जायन्ति ओसधा ||

अन्नदा बलदा चेता वण्णदा सुखदा तथा |

एतमत्थवसं ञत्वा नास्सु गावो हनिंसु ते ||

‘आई, बाप, भाऊ आणि दुसरे सगेसोयरे, याप्रमाणेच गाई आमच्या मित्र आहेत. का की, शेती त्यांच्यावर अवलंबून असते. त्या अन्न, बल, कान्ति आणि सुख देणा-या आहेत. हे कारण जाणून प्राचीन ब्राह्मण गाईंची हत्या करीत नव्हते.’

यावरून असे दिसून येते की, सामान्य लोकांना गाई आपल्या आप्तेष्टांसारख्या वाटत, आणि यज्ञयागांत त्यांची बेसुमारपणे कत्तल करणे त्यांना मुळीच पसंत नव्हते. राजांनी आणि श्रीमंत लोकांनी स्वत:च्या गाईंचा वध केला असता, तर त्यांच्या दास, कर्मकारांना रडण्याचा प्रसंग कमी प्रमाणात आला असता. पण, ज्याअर्थी ही जनावरे त्यांच्याचसारख्या गरीब शेतक-यांकडून बळजबरीने घेतली जात, त्याअर्थी त्यांना अतोनात दु:ख होणे अगदी साहजिक होते. यज्ञासाठी लोकांवर जबरदस्ती कशी होत असे, हे खालील गाथेवरून दिसून येईल.

ददन्ति एके विसमे निविट्ठा

छेत्वा वधित्वा अथ सेाचयित्वा |

सा दक्खिणा अस्सुमुखा सदण्डा |

समेन दिन्नस्स न अग्घमेति ||

‘कोणी विषम मार्गात निविष्ट होऊन हाणमार करून लोकांना शोक करावयास लावून दान देतात. ती (लोकांच्या) अश्रूंनी भरलेली सदण्ड दक्षिणा समत्वाने दिलेल्या दानाची किंमत पावत नाही.’

त्या काळी जसे यज्ञयागासाठी तसेच उदरनिर्वाहासाठी अनेक प्राणी मारले जात; गाईला मारून तिचे मास चवाठ्यावर विकण्याची प्रथा फार होती. परंतु बुद्धाने जितका यज्ञयागांचा निषेध केला तितका या कृत्यांचा केलेला दिसून येत नाही. चवाठ्यावर मास विकण्याची पद्धति बुद्धाला पसंत होती असे समजता कामा नये. पण एखाद्या यज्ञयागासमोर तिची काहीच किंमत नव्हती. कसायाच्या हाती जी गाय आणि जो बैल पडे, ती गाय दुभती नसे आणि तो बैल शेतीला निरुपयोगी झालेला असे; त्याच्याबद्दल कोणी आसवे गाळीत नसत. यज्ञाची गोष्ट निराळी होती. पाचशे किंवा सातशे कालवडी किंवा गोहरे एका यज्ञांत मारावयाचे म्हणजे शेतीचे किती नुकसान होत असे, आणि त्याबद्दल शेतकरी लोक किती हळहळत, याची नुसती कल्पनाच केली पाहिजे! अशा जुलमांचा निषेध बुद्धाने केला, तर त्याला वेदनिंदक का म्हणावे?

10 . सुयज्ञ कोणता?

राजांनी आणि श्रीमंत ब्राह्मणांनी कशा रीतीने यज्ञ करावा, हे बुद्ध भगवंताने दीघनिकायातील कूटदन्तसुत्तात सुचविले आहे. त्या सुत्ताचा सारांश येणेप्रमाणे-

एके समयी बुद्ध भगवान मगध देशात संचार करीत असता खाणुमत नावाच्या ब्राह्मणग्रामाला आला. हा गाव मगध देशाच्या बिंबिसार राजाने कूटदन्त नावाच्या ब्राह्मणाला दान दिला होता. त्या ब्राह्मणाने महायज्ञासाठी सातशे बैल, सातशे गोहरे, सातशे कालवडी, सातशे बकरे आणि सातशे मेंढे आणले होते.

भगवान आपल्या गावाजवळ आल्याचे वर्तमान ऐकताच खाणुमत गावातील ब्राह्मण एकत्र जमून भगवंताच्या दर्शनाला कूटदन्त ब्राह्मणाच्या वाड्यावरून चालले. ते कोठे जातात, याची कूटदन्ताने चौकशी केली, आणि तो आपल्या हुज-याला म्हणाला, ‘‘या ब्राह्मणांना सांग की, मी देखील भगवंताच्या दर्शनाला जाऊ इच्छितो, तुम्ही जरा थांबा.”

कूटदन्ताच्या यज्ञासाठी पुष्कळ ब्राह्मण जमले होते. कूटदन्त भगवंताच्या दर्शनाला जाणार हे वर्तमान ऐकल्याबरोबर ते त्याजपाशी येऊन म्हणाले, “भो कूटदन्त, गोतमाच्या दर्शनाला तू जाणार आहेस, ही गोष्ट खरी काय?”

कूटदन्त- होय, मला गोतमाच्या दर्शनाला जावे असे वाटते.

ब्राह्मण-  भो कूटदन्त, गोतमाच्या दर्शनाला जाणे तुला योग्य नाही. जर तू त्याच्या दर्शनाला जाशील, तर त्याच्या यशाची अभिवृद्धि आणि तुझ्या यशाची हानि होईल. म्हणून गोतमानेच तुझ्या भेटीला यावे, आणि तू त्याच्या भेटीला जाऊ नये, हे चांगले. तू उत्तम कुलात जन्मला आहेस. धनाढ्य आहेस, विद्वान आहेस, सुशील आहेस, पुष्कळांचा आचार्य आहेस, तुजपाशी वेदमंत्र शिकण्यासाठी चोहीकडून पुष्कळ शिष्य येतात. गोतमापेक्षा तू वयाने मोठा आहेस, आणि मगधराजाने बहुमानपुरस्सर हा गाव तुला इनाम दिला आहे. तेव्हा गोतमाने तुझ्या भेटीला यावे, आणि तू त्याच्या भेटीला जाऊ नयेस, हेच योग्य होय.

कूटदन्त- आता माझे म्हणणे काय ते ऐका. श्रमण गोतम थोर कुलात जन्मलेला असून मोठ्या संपत्तीचा त्याग करून श्रमण झाला आहे. त्याने तरुण वयात संन्यास घेतला. तो तेजस्वी व सुशील आहे. तो मधुर आणि कल्याणप्रद वचन बोलणारा असून पुष्कळांचा आचार्य आणि प्राचार्य आहे. तो विषयापासून मुक्त होऊन शांत झाला आहे. तो कर्मवादी आणि क्रियावादी आहे. सर्व देशांतील लोक त्याचा धर्म श्रवण करण्याला येत असतात. तो सम्यक् संबुद्ध, विद्याचरणसंपन्न, लोकविद, दम्य पुरुषांचा सारथि, देव-मनुष्यांचा शास्ता, अशी त्याची कीर्ति सर्वत्र पसरली आहे. बिंबिसार राजा, तसाच पसेनदि कोसलराजा आपल्या परिवारासह त्याचा श्रावक झाला. या राजांना जसा, तसाच तो पौष्करसादीसारख्या ब्राह्मणांना पूज्य आहे. त्याची योग्यता एवढी असून सांप्रत तो आमच्या गावी आला असता त्याला आम्ही आमचा अतिथि समजले पाहिजे; आणि अतिथि या नात्याने त्याच्या दर्शनाला जाऊन त्याचा सत्कार करणे आम्हाला योग्य आहे.

ब्राह्मण- भो कूटदन्त, तू जी ही गोतमाची स्तुति केलीस, तिजमुळे आम्हाला असे वाटते की, सद्गृहस्थाने शंभर योजनांवर जाऊन देखील त्याची भेट घेणे योग्य होईल. चला, आपण सर्वच त्याच्या दर्शनाला जाऊ.

तेव्हा कूटदन्त या ब्राह्मणसमुदायासह आम्रयष्टिवनामध्ये भगवान राहत होता तेथे आला, आणि भगवंताला कुशलप्रश्नादिक विचारून एका बाजूला बसला. त्या ब्राह्मणांपैकी काही जण भगवंताला नमस्कार करून, काही जण आपले नामगोत्र कळवून आणि काही जण कुशलप्रश्नादिक विचारून एका बाजूला बसले.

आणि कूटदन्त भगवंताला म्हणाला, “आपणाला उत्तम यज्ञविधी माहीत आहे, असे मी ऐकले. तो जर आपण आम्हाला समजावून सांगाल, तर चांगले होईल.”

भगवंताने खालील कथा सांगितली-

प्राचीन काळी महाविजित नावाचा एक प्रख्यात राजा होऊन गेला. एके दिवशी एकान्तामध्ये बसला असता त्या राजाच्या मनात असा विचार आला की, आपणापाशी पुष्कळ संपत्ति आहे; तिचा महायज्ञात व्यय केला, तर ते कृत्य आपणास चिरकाल हितावह आणि सुखावह होईल. हा विचार त्याने आपल्या पुरोहिताला सांगितला आणि तो म्हणाला, “हे ब्राह्मणा, मी महायज्ञ करू इच्छितो. तो कोणत्या प्रकारे केला असता मला हितावह आणि सुखावह होईल ते सांगा.”

पुरोहित म्हणाला, “सध्या आपल्या राज्यात शांतता नाही; गावे आणि शहरे लुटली जात आहेत, वाटमारी होत आहे. अशा स्थितीत जर आपण लोकांवर कर बसविला, तर कर्तव्यापासून विमुख व्हाल आपणाला असे वाटेल की, शिरच्छेद करून, तुरुंगात घालून, दण्ड करून किंवा आपल्या राज्यातून हाकून देऊन चोरांचा बंदोबस्त करता येईल. परंतु ह्या उपायांनी बंडाळीचा पूर्णपणे बंदोबस्त हेणार नाही. का की, जे शिल्लक राहतील, ते चोर पुन्हा बंडे उपस्थित करतील, ती साफ नाहीशी करण्याचा खरा उपाय आहे तो असा-जे आपल्या राज्यात शेती करू इच्छितात, त्यांना बी-बियाणे भरपूर मिळेल अशी व्यवस्था करा. जे व्यापार करू इच्छितात, त्यांना भांडवल कमी पडू देऊ नका. जे सरकारी नोकरी करू इच्छितात, त्यांना योग्य वेतन देऊन यथायोग्य कार्याला लावा. अशा रीतीने सर्व माणसे आपापल्या कामात दक्ष राहिल्यामुळे राज्यात बंडाळी उत्पन्न होण्याचा संभव राहणार नाही; वेळोवेळी कर वसूल होऊन तिजोरीची अभिवृद्धि होईल. बंडवाल्यांचा उपद्रव नष्ट झाल्यामुळे लोक निर्भयपणे आपले दरवाजे उघडे टाकून मुलाबाळांसकट मोठ्या आनंदाने कालक्रमणा करतील.”

पुरोहित ब्राह्मणाने सांगितलेला बंडाळीचा नाश करण्याचा उपाय महाविजित राजाला पसंत पडला. आपल्या राज्यात शेती करण्याला समर्थ लोकांना बी-बियाणे पुरवून त्याने शेती करावयास लावले; जे व्यापार करण्याला समर्थ होते, त्यांना भांडवल पुरवून व्यापाराची अभिवृद्धि केली, आणि जे सरकारी नोकरीला योग्य होते त्यांची सरकारी कामावर यथायोग्य स्थळी योजना केली. हा उपाय अमलात आणल्याने महाविजिताचे राष्ट्र अल्पावकाशातच समृद्ध झाले. दरोडे आणि चो-या नामशेष झाल्यामुळे कर वसूल होऊन तिजोरी वाढली, आणि लोक निर्भपयपणे दरवाजे उघडे टाकून आपल्या मुलांना खेळवीत काळ कंठू लागले.

एके दिवशी महाविजित राजा पुरोहिताला म्हणाला, “भो ब्राह्मणा, तुम्ही सांगितलेल्या उपायाने माझ्या राज्यातील बंडाळी नष्ट झाली आहे. माझ्या तिजोरीची सांपत्तिक स्थिति फार चांगली असून राष्ट्रातील सर्व लोक निर्भयपणे आणि आंनदाने राहतात. आता मी महायज्ञ करू इच्छितो. त्याचे विधान मला सांगा.”

पुरोहित म्हणाला, “आपणाला महायज्ञ करावयाचा असेल तर त्या कामी प्रजेची अनुमती घेतली पाहिजे. यास्तव प्रथमतः राज्यातील सर्व लोकांना जाहीर रीतीने आपली इच्छा दर्शवून त्या कामी त्यांची सम्मति मिळवा.”

राजाच्या इच्छेला अनुसरून सर्व लोकांनी यज्ञाला अनुमति दिली. आणि त्याप्रमाणे पुरोहिताने यज्ञाची तयारी केली व तो राजाला म्हणाला, “या यज्ञात पुष्कळ संपत्ति खर्च होणार असा विचार यज्ञारंभी मनात आणू नका. यज्ञ चालला असता आपली संपत्ति नाश पावत आहे, आणि यज्ञ संपल्यावर आपली संपत्ति नाश पावली, असा विचार तुम्ही मनात आणता कामा नये. आपल्या यज्ञात बरेवाईट लोक येतील. पण त्यांतील सत्पुरुषांवर दृष्टि देऊन यज्ञ करावा व आपले चित्त आनंदित ठेवावे.”

त्या महाविजिताच्या यज्ञामध्ये गाई, बैल, बकरे आणि मेंढे मारण्यात आले नाहीत; झाडे तोडून यूप करण्यात आले नाहीत; दर्भांची आसने बनविण्यात आली नाहीत; दासांना, दूतांना आणि मजुरांना जबरदस्तीने कामावर लावण्यात आले नाही. ज्यांची इच्छा होती, त्यांनी कामे केली व ज्यांची नव्हती त्यांनी केली नाहीत. तूप, तेल, लोणी, मध आणि काकवी या पदार्थांनीच तो यज्ञ समाप्त करण्यात आला.

तदनंतर राष्ट्रांतील श्रीमंत लोक मोठमोठे नजराणे घेऊन महाविजित राजाच्या दर्शनाला आले. त्यांना राजा म्हणाला, “गृहस्थहो, मला तुमच्या नजराण्यांची मुळीच गरज नाही. धार्मिक कराच्या रूपाने माझ्याजवळ पुष्कळ द्रव्य साठले आहे, त्यापैकी तुम्हांला काही पाहिजे असेल, तर खुशाल घेऊन जा.”

याप्रमाणे राजाने त्या धनाढ्य लोकांचे नजराणे घेण्याचे नाकारल्यावर त्यांनी ते द्रव्य खचून यज्ञशाळेच्या चारी बाजूंना धर्मशाळा बांधून गोरगरीबांना दानधर्म केला.

ही भगवंताने सांगितलेली यज्ञाची गोष्ट ऐकून कूटदन्ताबरोबर आलेले ब्राह्मण उद्गारले, “फारच चांगला यज्ञ! फारच चांगला यज्ञ!”

त्यानंतर भगवंताने कूटदन्त ब्राह्मणाला आपल्या धर्माचा विस्ताराने उपदेश केला. आणि तो ऐकून कूटदन्त ब्राह्मण भगवंताचा उपासक झाला, व म्हणाला, “भो गोतम, सातशे बैल, सातशे गोहरे, सातशे कालवडी, सातशे बकरे आणि सातशे मेंढे, या सर्व  प्राण्यांना मी यूपांपासून मोकळे करतो, त्यांना जीवदान देतो. ताजे गवत खाऊन आणि थंड पाणी पिऊन ते शीतल छायेत आनंदाने राहोत!” 

11 . बेकारी नष्ट करणे हाच खरा यज्ञ

वरील सुत्तात महाविजित याचा अर्थ ज्याचे राज्य विस्तृत आहे असा. तोच महायज्ञ करू शकेल. त्या महायज्ञाचे मुख्य विधान म्हटले म्हणजे राज्यात बेकार लोक राहू द्यावयाचे नाहीत; सर्वांना सत्कार्याला लावावयाचे हेच विधान निराळ्या त-हेने चक्कवत्तिसीहनाद सुत्तात सांगितले आहे. त्याचा सारांश असा-

दृढनेमि नावाचा चक्रवर्ती राजा होऊन गेला. वृद्धापकाळी आपल्या मुलाला अभिषेक करून तो योगाभ्यासासाठी उपवनात जाऊन राहिला. सातव्या दिवशी राजाच्या प्रासादासमोर असलेले देदीप्यमान चक्र अंतर्धान पावले. तेव्हा दृढनेमीचा पुत्र फार घाबरला आणि राजर्षि पित्याजवळ जाऊन त्याने त्याला हे वर्तमान विदित केले. राजर्षि म्हणाला, “मुला, तू घाबरू नकोस. हे चक्र तुझ्या पुण्याईने उत्पन्न झाले नव्हते. तू जर चक्रवर्ती राजाचे व्रत पालन करशील, तर ते पुन्हा जागच्या जागी येऊन स्थिर राहील. तू लोकांचे न्यायाने आणि समतेने रक्षण कर, तुझ्या राज्यात अन्यायाची प्रवृत्ति होऊ देऊ नकोस. जे दरिद्री असतील त्यांना (उद्योगाला लावून) धन मिळेल अशी व्यवस्था कर आणि जे तुझ्या राज्यात सत्पुरुष श्रमणब्राह्मण असतील त्यांजपासून वेळोवेळी कर्तव्याकर्तव्याचा बोध करून घे. त्यांचा उपदेश ऐकून अकर्तव्यापासून दूर हो, व कर्तव्यात दक्ष रहा.”

तरुण राजाने हा उपदेश मान्य केला आणि त्याप्रमाणे वागल्याने ते देदीप्यमान चक्र पुन्हा स्वस्थानी आले. राजाने डाव्या हातात पाण्याची झारी घेतली, आणि उजव्या हाताने ते चक्र प्रवर्तित केले. ते त्याच्या साम्राज्यात चोहोकडे फिरले. त्याच्या मागोमाग जाऊन राजाने सर्व लोकांना उपदेश केला की, ‘प्राणघात करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटे बोलू नये. यथार्थतया निर्वाह करावा.’

त्यानंतर ते चक्ररत्न परत फिरून चक्रवर्ती राजाच्या सभास्थानासमोर खडे राहिले. राजवाड्याला त्याने शोभा आणली.

हा चक्रवर्तिव्रताचा प्रकार सात पिढ्यांपर्यंत चालला. सातव्या चक्रवर्तीने संन्यास घेतल्यावर सातव्या दिवशी ते चक्र अन्तर्धान पावले, आणि त्यामुळे तरुण राजाला फार दुःख झाले. पण राजर्षि पित्याजवळ जाऊन त्याने चक्रवर्तिव्रत समजावून घेतले नाही. त्याच्या अमात्यांनी आणि इतर सद्गृहस्थांनी त्याला ते चक्रवर्तिव्रत समजावून दिले. ते ऐकून घेऊन राजाने लोकांचे न्याय्य रक्षण आरंभिले; पण दरिद्री लोकांना उद्योग मिळेल अशी व्यवस्था केली नाही. त्यामुळे दारिद्रय भयंकर वाढले. आणि एका मनुष्याने चोरी केली. त्याला लोकांनी राज्याच्या स्वाधीन केल्यावर राजा म्हणाला, “रे माणसा, तू चोरी केलीस हे खरे काय?”

तो-    खरे महाराज.

राजा- का चोरी केलीस?

तो-    महाराज, निर्वाह होत नाही ना!

त्याला यथायोग्य द्रव्य देऊन राजा म्हणाला, “ह्या द्रव्याने तू स्वतः निर्वाह कर, तुझ्या कुटुंबाला पोस, व्यापारउद्योग आणि दानधर्म कर.”

ही गोष्ट दुस-या एका बेकाराला समजली. तेव्हा त्यानेही चोरी केली. राजाने त्यालाही यथायोग्य द्रव्य दिले. लोकांना समजून चुकले की जो चोरी करतो, त्याला राजा बक्षीस देतो. तेव्हा जो तो चो-या करू लागला. त्यापैकी एकाला पकडून राजाकडे नेले. राजाने विचार केला, ‘जर चो-या करणा-यांना मी द्रव्य देत गेलो, तर सर्व राज्यात बेसुमार चो-या होतील! म्हणून या माणसाचा शिरच्छेद करावयास लावणे चांगले.’ त्याप्रमाणे त्या माणसाला त्याने दो-यांनी बांधावयास लावले, त्याचे मुंडन करवले आणि रस्त्यातून धिंड काढावयास लावून नगराच्या दक्षिणेला त्याचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली.

तो प्रकार पाहून चोर लोक घाबरून गेले. यापुढे सरळपणे चो-या करणे धोक्याचे आहे, असे जाणून त्यांनी तीक्ष्ण शस्त्रे तयार करविली, व उघडपणे दरोडे घालू लागले...

याप्रमाणे दरिद्री लोकांना व्यवसाय न मिळाल्यामुळे दारिद्रय वाढत गेले. दारिद्रय वाढल्याने चो-या लुटालुटी वाढल्या, चो-या लुटालुटी वाढल्याने शस्त्रास्त्रे वाढली, शस्त्रास्त्रे वाढल्याने प्राणघात वाढले, प्राणघात वाढल्याने असत्य वाढले, असत्य वाढल्याने चहाडखोरी वाढली, चहाडखोरी वाढल्याने व्यभिचार वाढला, आणि त्यामुळे शिवीगाळ आणि वृथा बडबड वाढली. त्यांची अभिवृद्धि झाल्यामुळे लोभ आणि द्वेष यांची अभिवृद्धि झाली. आणि त्यांच्यामुळे मिथ्यादृष्टि वाढून इतर सर्व असत्कर्मे फैलावली.

महाविजित राजाला पुरोहिताने सांगितलेल्या यज्ञ विधानाचा खुलासा या चक्कवत्तिसीहनाद सुत्तावरून होतो. लोकांकडून जबरदस्तीने जनावरे हिरावून घेऊन त्यांचा यज्ञांत वध करणे हा खरा यज्ञ नव्हे, तर राज्यातील लोकांना समाजोपयोगी कार्याला लावून बेकारी नष्ट करणे हा होय. बलिदानपूर्वक यज्ञयागांचा कधीच लोप होऊन गेला आहे. पण अद्यापि खरा यज्ञ करण्याचा प्रयत्न क्वचित दिसून येतो. बेकारी कमी करण्यासाठी जर्मनीने आणि इटलीने युद्धसामुग्री वाढविली; त्यामुळे फ्रान्स, इंग्लंड आणि आता अमेरिका या राष्ट्रांना देखील युद्धसामुग्री वाढवावी लागली. आणि आता प्रसंग हातघाईवर येण्याचा संभव दिसतो. इकडे जपानने चीनवर आक्रमण केलेच आहे; आणि तिकडे मुसोलिनी व हिटलर उद्या काय करतील याचा कोणालाच भरवसा वाटत नाही. एक गोष्ट खरी की या, सगळ्याचे पर्यवसान प्रणयज्ञातच होणार! आणि त्यात इतर प्राण्यांपेक्षा मनुष्य प्राण्यांच्याच आहुति जास्त पडणार! हा रणयज्ञ थांबवावयाचा असेल, तर लोकांना युद्धसामुग्रीकडे न लावता समाजोन्नतीच्या कामाकडे लावले पाहिजे. तेव्हाच बुद्ध भगवंताने उपदेशिलेले यज्ञविधान अंमलात येईल. अस्तु.

हे थोडे विषयांतर झाले. बुद्धाच्या यज्ञविधानाच्या स्पष्टीकरणार्थ ते योग्य वाटले. वर दिलेली सुत्ते बुद्धानंतर काही काळाने रचली असली, तरी त्यांत बुद्धाने उपदेशिलेल्या मूलभूत तत्वांचा खुलासा करण्यात आला आहे. असा सुयज्ञ उपदेशिणा-या गुरूला वेदनिंदक म्हणून त्याची अवहेलना करणे योग्य आहे की काय याचा विचार सुज्ञांनी करावा.

12 . तळटीपा

१. पृथ्वीकाय, अपकाय, वायुकाय, अग्निकाय, वनस्पतिकाय आणि त्रसकाय असे सहा जीवभेद. पृथ्वीपरमाण्वादिकात जीव आहे, असे जैन मानतात. वनस्पतिकाय म्हणजे वृक्षादिक वनस्पतिवर्ग. त्रसकायात सर्व जंगम किंवा चर प्राण्यांचा समावेश होतो.

२. पाच संवर म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. यांनाच योगसूत्रांत यम म्हटले आहे. साधनपाद, सूत्र ३० पाहा.

३. हे तीन अग्नि ब्राह्मणी ग्रंथांत प्रसिद्ध आहेत ‘दक्षिणाग्निर्गार्हपत्याहवनीयौ त्रयोऽग्नय:|’ (अमरकोश). यांची परिचर्या कशी करावी व तिचे फळ काय इत्यादि माहिती गृह्यसूत्रादि ग्रंथांत सापडते.

४.  मागे- पृ. ४१,४२ पाहा.

५. बृहदारण्यक उपनिषद् ३|१|१-२ पाहा

६. मज्झिमनिकाय नं. ५१.

७. सेय्यथापी भिक्खवे दक्खो गोघातकी वा गोघातकन्तेवासी वा गाविं वधित्वा चातुम्महापथे बिलसो विभजित्वा निसिन्नो अस्स | (सतिपट्ठानसुत्त).

८. हा मजकूर दुस-या जागतिक महायुद्धापूर्वी लिहिला होता, तो तसाच राहू दिला आहे. सांप्रत देखील परिस्थिति जवळ जवळ अशीच आहे.

संदर्भ