सारांश
वेदकालापूर्वी देखील सप्तसिंधु प्रदेशात आणि मध्यहिंदुस्थानात जातिभेदधर्म अस्तित्वात होता. बुद्धाला जातिभेद निरुपयोगी वाटला, आणि त्याचा त्याने सर्वथैव निषेध केला. बुद्धाच्या संघात जातिभेदाला थाराच नव्हता. बुद्ध सांगतो माणसांचे अवयव जवळजवळ सारखेच असल्यामुळे मनुष्यांमध्ये जातिभेद ठरविता येत नाही. बुद्ध चातुर्वर्ण्य कृत्रिम आसल्याचे सांगतो. अशोकसमकालीन बौद्ध संघ जातिभेद मुळीच पाळीत नव्हता. बुद्धाने जातिभेदाला यत्किंचित् थारा दिला असता, तर त्याच्या अनुयायी भिक्षूंनी म्लेच्छ समजल्या जाणा-या देशात संचार करून बौद्ध धर्माचा प्रसार केला नसता. जातिभेदामुळे आमची हानि झाली.
पारिभाषिक शब्द
जातिभेद , क्षत्रिय , ब्राह्मण , अब्राह्मण , ब्राह्मणवर्ण , अशोक , जैन संघ , अस्पृश्यता
1 . जातिभेदाचा उगम
‘ब्राह्मणोऽस्य मुखमासीद्बाहू राजन्यः कृत: |
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भयां शूद्रो अजायत ||’
ऋ.१०|९०|१२
हिंदुस्थानातील जातिभेदाचे मूळ ह्या पुरुषसुक्ताच्या ऋचेत आहे असे समजले जाते. परंतु ही समजूत चुकीची आहे. वेदकालापूर्वी देखील सप्तसिंधु प्रदेशात आणि मध्यहिंदुस्थानात अहिंसा धर्माप्रमाणे जातिभेदधर्म देखील अस्तित्वात होता. आर्यांच्या आगमनामुळे आणि वैदिक संस्कृतीच्या प्रसारामुळे अहिंसाधर्माला अरण्यवास कसा पत्करावा लागला हे पहिल्या प्रकरणात दाखविण्यात आलेच आहे (पृ.१९ ते २१). पण जातिभेदाची अशी स्थिती झाली नाही. त्यात थोडा फेरफार होऊन तो तसाच चालू राहिला.
2 . क्षत्रियांचे वर्चस्व
सुमेरियात बहुधा पुजारीच राजा होत असे आणि तसाच प्रकार सप्तसिंधु प्रदेशात होता. ह्या प्रदेशात जी लहानसहान संस्थाने होती त्यांचा प्रमुख वृत्र याला इंद्राने ठार मारले, आणि त्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पाप लागले, असे वर्णन महाभारतात आढळते.१ आर्य येण्यापूर्वी कोणती स्थिति होती हे वरील ऋचेत सांगितले आहे. ऋषि म्हणतो, “एके काळी विराट पुरुषाचे मुख ब्राह्मण होता. बाहु राजन्य असे; त्याच्या मांड्या वैश्य, आणि त्याच्या पायांपासून शूद्र झाला.” आर्यांच्या आगमनामुळे क्षत्रियांना महत्त्व आले, आणि ब्राह्मणांचे वर्चस्व नष्ट झाले. तथापि पुरोहिताचे काम त्यांजकडे राहिले. ही स्थिति बुद्धकाळापर्यंत चालू होती. पालि वाड्ःमयात जिकडे तिकडे क्षत्रियांना प्रमुख स्थान देण्यात आले आहे. आणि उपनिषदात देखील त्याचाच प्रतिध्वनी उमटलेला दिसून येतो. उदाहरणार्थ खालील मजकूर पहा.
ब्रह्म वा इदमग्र आसीदेकमेव | तदेकं सन्न व्यभवत्तच्छ्रेयोरूपमत्यसृजत क्षत्रं यान्येतानि देवता क्षत्राणीन्द्रो वरुणः सोमो रुद्रः पर्जन्यो यमो मृत्युरीशान इति तस्मात् क्षत्रात्परं नास्ति | तस्माद्ब्राह्मणः क्षत्रियमधस्तादुपास्ते | (बृहदारण्यक १|४|११)
‘पूर्वी ब्रह्म तेवढे होते. पण ते एक असल्यामुळे त्याचा विकास झाला नाही. म्हणून त्याने उत्कृष्टरूप क्षत्रिय जाति उत्पन्न केली. ते क्षत्रिय म्हणजे देवलोकात इन्द्र, वरुण, सोम, रुद्र, पर्जन्य, यम, मृत्यू आणि ईशान. यास्तव क्षत्रियजातीहून श्रेष्ठ दुसरी जात नाही, आणि म्हणूनच ब्राह्मण आपणाकडे कमीपणा घेऊन क्षत्रियाची उपासना करतो.’
3 . जातिभेदाचा निषेध
याप्रमाणे क्षत्रिय जातीला महत्त्व आले असले, तरी त्यांचे प्रमुख कर्तव्य जे युद्ध ते बुद्धाला मुळीच पसंत नसल्याकारणाने सर्वच जातिभेद त्याला निरुपयोगी वाटला, आणि त्याचा त्याने सर्वथैव निषेध केला. इतर श्रमणांच्या पुढा-यांनी बुद्धाप्रमाणे जातीचा निषेध केल्याचा दाखला सापडत नाही. त्यांच्या संघात जातिभेदाला थाराच नव्हता. परंतु त्यांच्या उपासकवर्गात अस्तित्वात असलेल्या जातिभेदाला त्यांनी विरोध केला नसावा. ते काम बुद्धाने केले. ते कसे हे पाहू.
जातिभेदाविरुद्ध बुद्धाने उपदेशिलेले सर्वात प्राचीन असे वासेट्ठसुत्त सुत्तनिपातात आणि मज्झिमनिकायात सापडते. त्याचा सारांश असा-
एके समयी बुद्ध भगवान इच्छानंगल नावाच्या गावाजवळ इच्छानंगल उपवनात राहत होता. त्या काळी पुष्कळ प्रसिद्ध ब्राह्मण इच्छानंगल गावी होते. त्यांपैकी वासिष्ठ आणि भारद्वाज या दोन तरुण ब्राह्मणांमध्ये ‘मनुष्य जन्माने श्रेष्ठ होतो किंवा कर्माने’ हा वाद उपस्थित झाला.
भारद्वाज आपल्या मित्राला म्हणाला, “भो वासिष्ठ, ज्याच्या आईच्या बाजूला आणि बापाच्या बाजूला सात पिढ्या शुद्ध असतील, ज्याच्या कुलात सात पिढ्यात वर्णसंकर झाला नसेल, तोच ब्राह्मण श्रेष्ठ होय.”
वासिष्ठ म्हणाला, “भो भारद्वाज, जो मनुष्य शीलसंपन्न आणि कर्तव्यदक्ष असेल त्यालाच ब्राह्मण म्हणावे.”
पुष्कळ वादविवाद झाला. तथापि ते दोघे परस्परांचे समाधान करू शकले नाहीत. शेवटी वासिष्ठ म्हणाला, “भो भारद्वाज, आमचा हा वाद येथे तुटावयाचा नाही. हा श्रमण गोतम आमच्या गावाजवळ राहत आहे. तो बुद्ध आहे, पूज्य आहे, आणि सर्व लोकांचा गुरू आहे, अशी त्याची कीर्ति सर्वत्र पसरली आहे. आपण त्याजपाशी जाऊन आपला मतभेद कळवू, आणि तो जो निकाल देईल, तो मान्य करू.”
तेव्हा ते दोघे बुद्धापाशी गेले आणि बुद्धाला कुशलप्रश्नादि विचारून एका बाजूला बसले. आणि वासिष्ठ म्हणाला, “भो गोतम, आम्ही दोघे सुशिक्षित ब्राह्मणकुमार आहोत. हा तारुक्ष्याचा शिष्य आणि मी पौष्करसादीचा शिष्य आहे. आमचा जातिभेदासंबंधाने विवाद आहे. हा म्हणतो, जन्मामुळे ब्राह्मण होतो, आणि मी म्हणतो कर्मामुळे ब्राह्मण होतो. आपली कीर्ति ऐकून आम्ही येथे आलो आहोत. आपण आमच्या वादाचा निकाल द्यावा.”
भगवान म्हणाला, “हे वासिष्ठा, तृण, वृक्ष इत्यादिक वनस्पतींमध्ये भिन्नभिन्न जाती आढळतात. तशाच त्या किडे, मुंग्या वगैरे क्षुद्र प्राण्यांमध्येही आहेत. सर्पांच्या, श्वापदांच्या, पाण्यात राहणा-या मत्स्यांच्या आणि आकाशात उडणा-या पक्ष्यांच्या देखील अनेक जाति आहेत. त्यांच्या भिन्नत्वाची चिन्हे त्या त्या प्राणिसमुदायात स्पष्ट दिसतात. पण मनुष्यांमध्ये भिन्नत्वाचे चिन्ह आढळत नाही. केस, कान, डोळे, तोंड, नाक, ओठ, भिवया, मान, पोट, पाठ, हात, पाय इत्यादिक अवयवांनी एक मनुष्य दुस-या माणसाहून अगदीच भिन्न होऊ शकत नाही. अर्थात् पशुपक्ष्यादिकात जशा आकारादिकांनी भिन्नभिन्न जाती आढळतात, तशा त्या मनुष्यप्राण्यात नाहीत. सर्व माणसांचे अवयव जवळजवळ सारखेच असल्यामुळे मनुष्यांमध्ये जातिभेद ठरविता येत नाही. परंतु मनुष्याची जात कर्मावरून ठरविता येणे शक्य आहे.
“एखादा ब्राह्मण गाई पाळून निर्वाह करीत असला, तर त्याला गवळी म्हणावे, ब्राह्मण म्हणून नये. जो शिल्पकलेने उपजीविका करतो तो कारागीर, जो व्यापार करतो तो वाणी, दूताचे काम करतो तो दूत, चोरीवर उपजीविका करतो तो चोर, युद्धकलेवर उपजीविका करतो तो योद्धा, यज्ञयागांवर उपजीविका करतो तो याजक, आणि जो राष्ट्रावर उपजीविका करतो तो राजा होय. परंतु यांपैकी कोणालाही जन्मामुळे ब्राह्मण म्हणता यावयाचे नाही.
“सगळी संसारबंधने छेदून जो कोणत्याही प्रापंचिक दुःखाला भीत नाही, कोणत्याही गोष्टीची ज्याला आसक्ति नाही, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. इतरांनी दिलेल्या शिव्यागाळी, वधबन्ध इत्यादी जो सहन करतो, क्षमा हेच ज्याचे बळ, त्याला मी ब्राह्मण म्हणतो. कमलपत्रावरील जलबिंदूप्रमाणे जो इहलेकी विषयसुखापासून अलिप्त राहतो, त्यालाच मी ब्राह्मण म्हणतो...
“जन्मामुळे ब्राह्मण होत नाही, किंवा अब्राह्मण होत नाही. कर्मानेच ब्राह्मण होतो आणि कर्मानेच अब्राह्मण होतो. शेतकरी कर्माने होतो, कारागीर कर्माने होतो, चोर कर्माने होतो, आणि राजा देखील कर्मानेच होतो. कर्मानेच हे सगळे जग चालत आहे. आसावर अवलंबून जसा रथ चालतो, तसे सर्व प्राणी आपल्या कर्मावर अवलंबून राहतात.”
हा बुद्धांचा उपदेश ऐकून वासिष्ठ आणि भारद्वाज त्याचे उपासक झाले.
4 . ब्राह्मण आणि अब्राह्मण सारखेच!
वर दिलेल्या पुरुषसूक्ताच्या ऋचेच्या आधारे ब्राह्मण प्रतिपादन करीत असत की ब्रह्मदेवाच्या मुखापासून झाल्यामुळे चारी वर्णांत आपण श्रेष्ठ आहोत. मज्झिमनिकायातील अस्सलायनसुत्तात यासंबंधी बुद्ध भगवंताचा संवाद फारच बोधप्रद आहे. त्या सुत्ताचा सारांश असा-
एके समयी बुद्ध भगवान श्रावस्ती येथे अनाथपिंडिकाच्या आरामात राहत होता. त्या वेळी निरनिराळ्या देशांतून पाचशे ब्राह्मण काही कारणास्तव श्रावस्तीला आले होते. त्या ब्राह्मणांमध्ये असा एक प्रश्न उपस्थित झाला की, हा श्रमण गोतम चारही वर्णांना मोक्ष मिळतो असे प्रतिपादन करतो. त्याजबरोबर वाद करून हे त्याचे म्हणणे कोण खोडून काढील? शेवटी या कामी आश्वलायन ब्राह्मणकुमाराची योजना करावी असे ठरले.
आश्वलायन कुमाराचे अध्ययन नुकतेच पुरे झाले होते. निघंटु, छंदःशास्त्र इत्यादि वेदांगांसहवर्तमान त्याला चारही वेद तोंडपाठ येत असत. तथापि बुद्ध भगवंताशी वाद करणे सोपे नव्हे हे तो जाणून होता. बुद्धाशी वाद करण्यास जेव्हा त्याची निवड झाली, तेव्हा तो त्या ब्राह्मणांना म्हणाला, “भो, श्रमण गोतम धर्मवादी आहे, धर्मवादी लोकांशी वाद करणे सोपे नाही. जरी मी वेदांमध्ये पारंगत असलो तरी गोतमाबरोबर वादविवाद करण्याला समर्थ नाही.”
बराच वेळ भवति न भवति झाल्यावर ते ब्राह्मण आश्वलायनाला म्हणाले, “भो आश्वलायन, तू परिव्राजक धर्माचा अभ्यास केला आहेस, आणि युद्धावाचून पराजित होणे तुला योग्य नाही.”
आश्वलायन म्हणाला, “गोतमाशी वाद करणे जरी कठीण आहे, तरी तुमच्या आग्रहास्तव मी तुमच्याबरोबर येतो.”
तदनंतर आश्वलायन त्या ब्राह्मणसमुदायासह बुद्ध भगवंताजवळ गेला आणि कुशलसमाचारादिक विचारून झाल्यावर ते सर्वजण एका बाजूला बसले. तेव्हा आश्वलायन म्हणाला, “भो गोतम, ब्राह्मण म्हणतात, ‘ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे, इतर वर्ण हीन आहेत. ब्राह्मण वर्णच शुक्ल आहे, इतर वर्ण कृष्ण आहेत. ब्राह्मणांनाच मोक्ष मिळतो, इतरांना नाही. ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखापासून झाले, ते त्याचे औरस पुत्र. अर्थात् तेच ब्रह्मदेवाचे दायाद होत.’ भो गोतम, यासंबंधी आपले मत काय?”
भगवान- हे आश्वलायना, ब्राह्मणांच्या बायका ऋतुमती होतात, गरोदर होतात, प्रसूत होतात, आणि मुलांना दूध पाजतात. याप्रमाणे ब्राह्मणांची संतति इतर वर्णासारखीच मातेच्या उदरातून जन्मली असता, ब्राह्मणांनी आपण ब्रह्मदेवाच्या मुखापासून उत्पत्र झालो, असे म्हणावे, हे आश्चर्य नव्हे काय?
आ.- भो गोतम, आपण काही म्हणा. पण ब्राह्मण ब्रह्मदेवाचे दायाद आहेत, यावर ब्राह्मणांचा पूर्ण विश्वास आहे.
भ.- हे आश्वलायन, यौन, कांबोज वगैरे सरहद्दीवरील प्रदेशात आर्य आणि दास असे दोनच वर्ण असून कधी कधी आर्याचा दास आणि दासाचा आर्य होतो, ही गोष्ट तुझ्या ऐकण्यात आली आहे काय?
आ.- होय, असे मी ऐकले आहे.
भ.- असे जर आहे, तर ब्रह्मदेवाने ब्राह्मणांना मुखापासून उत्पन्न केले व ते सर्व वर्णांत श्रेष्ठ आहेत, ह्या म्हणण्याला आधार काय?
आ.- आपले म्हणणे काही असो. पण ब्राह्मणांची अशी बळकट समजूत आहे की, ब्राह्मण वर्णच काय तो श्रेष्ठ आणि इतर वर्ण हीन आहेत.
भ.- क्षत्रियाने, वैश्याने किंवा शूद्राने प्राणघात, चोरी, व्यभिचार, खोटे भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथा बडबड केली, लोकांच्या धनावर दृष्टि ठेवली, द्वेषबुद्धि वाढविली, नास्तिकपणा अंगीकारला, तर तोच काय तो देहत्यागानंतर नरकाला जाईल; पण ब्राह्मणाने ही कर्मे केली तर नरकाला जाणार नाही असे तुला वाटते काय?
आ.- भो गोतम, कोणत्याही वर्णाच्या मनुष्याने ही पापे केली असता तो मरणोत्तर नरकाला जाईल. ब्राह्मण काय, किंवा अब्राह्मण काय, सर्वांनाच आपल्या पापाचे प्रायश्चित्त भोगावे लागणार.
भ.- एखादा ब्राह्मण प्राणघातापासून निवृत्त झाला, चौर्यकर्म, व्यभिचार, असत्य भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथाप्रलाप, परधनाचा लोभ, द्वेष आणि नास्तिकता, या (दहा) पापांपासून निवृत्त झाला, तर तोच काय तो देहावसानानंतर स्वर्गाला जाईल, पण इतर वर्णांचे लोक या पापांपासून निवृत्त झाले, तर ते स्वर्गाला जाणार नाहीत, असे तुला वाटते कय?
आ.- कोणत्याही वर्णाचा मनुष्य या पापकर्मांपासून निवृत्त झाला तर स्वर्गाला जाईल; पुण्याचरणाचे फळ ब्राह्मणाला काय किंवा ब्राह्मणेतराला काय सारखेच मिळेल.
भ.- या प्रदेशात ब्राह्मणच काय तो द्वेषवैरविरहित मैत्रीभावना करू शकतो; पण क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ती भावना करू शकत नाहीत, असे तुला वाटते काय?
आ.- चारी वर्णांना मैत्रीभावना करता येणे शक्य आहे.
भ.- तर मग ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ, आणि इतर वर्ण हीन आहेत, या म्हणण्यात अर्थ कोणता?
आ.- आपण काही म्हणा. ब्राह्मण आपणाला श्रेष्ठ समजातात व इतर वर्णांना हीन समजतात, ही गोष्ट खरी आहे.
भ.- हे आश्वलायना, एखादा मूर्धावसिक्त राजा सर्व जातींच्या शंभर पुरुषांना एकत्र करील, त्यापैकी क्षत्रिय, ब्राह्मण आणि राजकुलात जन्मले असतील, त्यांना तो म्हणेल, ‘अहो इकडे या, आणि शाल किंवा चंदनासारख्या उत्तम वृक्षांची उत्तरारणी घेऊन अग्नि उत्पन्न करा.’ आणि त्यापैकी चांडाळ, निषाद इत्यादिक हीन कुलांमध्ये जन्मलेले असतील, त्यांना तो म्हणेल, ‘अहो इकडे या व कुत्र्याला खावयाला घालावयाच्या दोणीत, डुकराला खावयाला घालावयाच्या दोणीत किंवा रंगा-याच्या दोणीत एरंडाच्या उत्तरारणीने अग्नि उत्पन्न करा.’ हे आश्वलायना, ब्राह्मणादिक उच्च वर्णाच्या मनुष्याने उत्तम अरणीने उत्पन्न केलेला अग्नि तेवढा भास्वर आणि तेजस्वी होईल, आणि चांडालादिक हीन वर्णाच्या मनुष्याने एरंडादिकांच्या अरणीने उत्पन्न केलेला अग्नि भास्वर आणि तेजस्वी होणार नाही व त्यापासून अग्निकार्ये घडणार नाहीत, असे तुला वाटते काय?
आ.- भो गोतम, कोणत्याही वर्णाच्या माणसाने ब-या किंवा वाईट लाकडाची उत्तरारणी करून कोणत्याही ठिकाणी अग्नि उत्पन्न केला तर तो एकसारखाच तेजस्वी होईल व त्यापासून समान अग्निकार्ये घडून येतील.
भ.- एखाद्या क्षत्रियकुमाराने ब्राह्मण कन्येबरोबर शरीरसंबंध केला व त्या संबंधातून जर त्याला पुत्र झाला, तर तो पुत्र आईबापांसारखाच मनुष्य होईल असे तुला वाटत नाही काय? त्याचप्रमाणे एखाद्या ब्राह्मणकुमाराने क्षत्रियकन्येशी विवाह केला व त्या संबंधापासून त्याला पुत्र झाला, तर तो आईबापांसारखा न होता भलत्याच प्रकारचा होईल असे तुला वाटते काय?
आ.- अशा मिश्र विवाहाने जो मुलगा होतो, तो त्याच्या आईबापांसारखाच मनुष्य असतो. त्याला ब्राह्मणही म्हणता येईल किंवा क्षत्रियही म्हणता येईल.
भ.- पण आश्वलायना, एखाद्या घोडीच्या आणि गाढवाच्या संबंधापासून जे शिंगरू होते त्याला त्याच्या आईसारखे किंवा बापासारखे म्हणता येते काय? त्याला घोडाही म्हणता येईल, आणि गाढवही म्हणता येईल काय?
आ.- भो गोतम, त्याला घोडा किंवा गाढव म्हणता येत नाही. तो एक तिस-याच जातीचा प्राणी होतो. त्याला आपण खेचर म्हणतो. परंतु ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या संबंधापासून झालेल्या मुलामध्ये असा प्रकार आढळून येत नाही.
भ.- हे आश्वलायना,दोघा ब्राह्मण बंधूंपैकी एक वेदपठण केलेला चांगला सुशिक्षित, व दुसरा अशिक्षित असेल, तर त्यांत ब्राह्मण कोणत्या भावाला श्राद्धामध्ये व यज्ञामध्ये प्रथम आमंत्रण देतील?
आ.- जो सुशिक्षित असेल त्यालाच प्रथम आमंत्रण दिले जाईल.
भ.- आता असे समज की, या दोघा भावांपैकी एकजण मोठा विद्वान, पण अत्यंत दुराचारी आहे; दुसरा विद्वान नाही, पण अत्यंत सुशील आहे; तर त्या दोघांमध्ये प्रथमतः कोणाला आमंत्रण दिले जाईल?
आ.- भो गोतम, जो शीलवान असेल त्यालाच प्रथम आमंत्रण दिले जाईल, दुराचारीमनुष्याला दिलेले दान महाफलदायक कसे होईल?
भ.- हे आश्वलायना, प्रथमत: तू जातीला महत्व दिलेस, नंतर वेदपठनाला, आणि आता शीलाला महत्त्व देत आहेस. अर्थात् मी जी चातुर्वर्ण्यशुद्धि प्रतिपादितो, तिचाच तू अंगीकार केलास.
हे बुद्ध भगवंताचे भाषण ऐकून आश्वलायन मान खाली घालून चुप्प राहिला. पुढे काय बोलावे हे त्याला सुचेना. नंतर भगवंताने असितदेवल ऋषीची गोष्ट सांगितली. आणि शेवटी आश्वलायन बुद्धाचा उपासक झाला.
5 . अधिकार लोकांनी दिला पाहिजे
ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ आहे आणि इतर वर्ण हीन आहेत, असे म्हणून ब्राह्मण जातीचे पुढारी स्वस्थ बसत नसत. ते चारही वर्णांची कर्तव्याकर्तव्ये कोणती हे सांगण्याचा अधिकार आपणाकडे घेत, असे मज्झिमनिकायातील (नं.९६) एसुकारिसुत्तावरून दिसून येते. त्यातील मजकुराचा सारांश असा-
एके समयी बुद्ध भगवान श्रावस्ती येथे जेतवनात अनाथपिंडिकाच्या आरामात राहात होता. त्या वेळी एसुकारी नावाचा ब्राह्मण त्याजपाशी आला, आणि कुशलसमाचारादिक विचारून एका बाजूला बसला व म्हणाला, “भो गोतम, ब्राह्मण चार परिचर्या (सेवा) सांगतात. ब्राह्मणांची परिचर्या चारही वर्णांना करता येते, क्षत्रियांची परिचर्या क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या तीन वर्णांनी करावी, वैश्याची परिचर्या वैश्य आणि शूद्र यांनीच करावी, आणि शूद्राची परिचर्या शूद्रानेच करावी. इतर वर्णाचा मनुष्य त्याची परिचर्या कशी करील? या परिचर्यासंबंधाने आपले म्हणणे काय आहे?”
भ.- हे ब्राह्मणा, या ब्राह्मणांच्या म्हणण्याला सर्व लोकांची संमति आहे काय? अशा परिचर्या सांगण्याला लोकांनी त्यांना अधिकार दिला आहे काय?
एसु.- भो गोतम, असे नाही.
भ.- तर मग, एखाद्या मांस खाऊ न इच्छिणा-या गरीब माणसावर त्याचे शेजारी मांसाचा वाटा लादतील आणि म्हणतील की, हे मांस तू खा आणि याची किंमत दे! त्याचप्रमाणे लोकांवर ब्राह्मण ह्या परिचर्या लादीत आहेत, असे म्हणावे लागते. माझे म्हणणे असे की, कोणत्याही वर्णाचा मनुष्य असो, त्याची परिचर्या केल्याने कल्याण होते, अकल्याण होत नाही, त्याचीच परिचर्या करणे योग्य आहे. चारी वर्णांच्या समंजस माणसांना विचारले असता ते देखील असेच मत देतील. उच्च कुलात, उच्च वर्णात किंवा श्रीमंत घराण्यात जन्म घेणे चांगले किंवा वाईट असे मी म्हणत नाही. उच्च कुलात, उच्च वर्णात किंवा श्रीमंत घराण्यात जन्मलेला मनुष्य जर प्राणघातादिक पापे करू लागला, तर त्याची कुलीनता चांगली नव्हे. पण तो प्राणघातादिक पापापासून विरत झाला तर त्याची कुलीनता वाईट नव्हे. ज्या माणसाची परिचर्या केली असता, श्रद्धा, शील, श्रुत, त्याग आणि प्रज्ञा यांची अभिवृद्धि होते, त्याची परिचर्या करावी असे मी म्हणतो.
एसु.- भो गोतम, ब्राह्मण ही चार धने प्रतिपादितात. भिक्षाचर्या ब्राह्मणाचे स्वकीय धन होय, बाणभाता हे क्षत्रियाचे, शेती आणि गोरक्षा हे वैश्याचे आणि कोयता व टोपली हे शूद्राचे. चारही वर्णांनी आपापल्या स्वकीय धनाची हेळसांड केली, तर ते चोरी करणा-या राखणदाराप्रमाणे अकृत्यकारी होतात. यासंबंधी आपले म्हणणे काय आहे?
भ.- हे ब्राह्मणा, ही चार धने सांगण्याला ब्राह्मणांना लोकांनी अधिकार दिला आहे काय?
एसु.- नाही, भो गोतम.
भ.- तर मग मांस न खाऊ इच्छिणाच्या गरीब माणसावर मांसाचा वाटा लादून त्याची किंमत मागण्यासारखे हे ब्राह्मणांचे कृत्य समजले पाहिजे. हे ब्राह्मणा, श्रेष्ठ आर्य धर्म हेच सर्वांचे स्वकीय धन आहे, असे मी म्हणतो. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र या चार कुळांत जन्मलेल्या माणसांना अनुक्रमे क्षत्रिय, वैश्य, शूद्र म्हणतात. ज्याप्रमाणे लाकूड, शकलिका, गवत आणि गोव-या या चार पदार्थांपासून उत्पन्न झालेल्या अग्नीला अनुक्रमे काप्ठाग्नि, शकलिकाग्नि तृणाग्नि आणि गोमयाग्नि म्हणतात, त्याप्रमाणे ह्या चार संज्ञा आहेत. परंतु ह्या चारी कुलांतील मनुष्य प्राणघातादिक पापांपासून निवृत्त झाले, तर त्यांपैकी ब्राह्मण तेवढाच मैत्रीभावना करू शकेल, व इतरवर्णी लोक मैत्रीभावना करू शकणार नाहीत, असे तुला वाटते काय?
एसु.- भो गोतम, असे नव्हे. कोणत्याही वर्णाचा मनुष्य मैत्रीभावना करू शकेल.
भ.- ब्राह्मणच तेवढा नदीवर जाऊन स्नानचूर्णाने आपले अंग साफ करू शकेल, पण इतर वर्णाचेच लोक आपले अंग साफ करू शकणार नाहीत, असे तुला वाटते काय?
एसु.- भो गोतम, असे नव्हे. चारही वर्णांचे लोक नदीवर जाऊन स्नानचूर्णाने आपले अंग साफ करू शकतील.
भ.- त्याचप्रमाणे, हे ब्राह्मणा, सर्व कुलांतील लोक तथागताच्या उपदेशाप्रमाणे वागून न्याय्य धर्माची आराधना करू शकतील.
6 . ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ हा नुसता आवाज
बुद्ध भगवंताच्या परिनिर्वाणानंतर देखील बुद्धाचे प्रमुख शिष्य चातुर्वर्ण्याला संमति देत नसत. हे चातुर्वर्ण्य कृत्रिम आहे, असे ते प्रतिपादीत. याचे एक चांगले उदाहरण मज्झिमनिकायांतील (नं. ८४) माधुरसुत्तात सापडते. त्याचा सारांश असा-
एके समयी आयुष्यमान् महाकच्चान मधुरेजवळ२ गुंदावनात राहत होता. मधुरेच्या राजाने-अवंतिपुत्राने-महाकच्चानाची कीर्ति ऐकली. मोठ्या परिवारासह तो त्याजपाशी गेला व कुशलसमाचारादिक विचारून एका बाजूला बसला आणि म्हणाला, “भो कात्यायन, ब्राह्मणवर्णच श्रेष्ठ आहे, इतर वर्ण हीन आहेत, ब्राह्मणवर्णच शुक्ल आहे, इतर वर्ण कृष्ण आहेत; ब्राह्मणांनाच मुक्ति मिळते, इतरांना मिळत नाही, ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या मुखापासून झालेले, ब्रह्मदेवाचे औरस पुत्र आहेत, असे ब्राह्मण प्रतिपादितात. यासंबंधी आपले म्हणणे काय आहे?”
का.- हे महाराज, हा नुसता आवाज (घोष) आहे! समजा एखादा क्षत्रिय धनधान्याने किंवा राज्याने समृद्ध झाला, तर त्याची सेवा चारी वर्णांचे मनुष्य करतील की नाही?
राजा.- भो कात्यायन, चारी वर्णांची माणसे त्यांची सेवा करतील.
का.- त्याचप्रमाणे इतर कोणत्याही वर्णाचा मनुष्य जर धनधान्ये व राज्याने समृद्ध झाला, तर त्याची सेवा चारही वर्णांचे लोक करतील किंवा नाही?
राजा.- चारी वर्णांचे लोक त्याची सेवा करतील.
का.- तर मग चारी वर्णांचे मनुष्य समान ठरत नाहीत काय?
राजा.- या दृष्टीने चारही वर्ण खात्रीने समान ठरतात. त्यात मला कोणताही भेद वाटत नाही.
का.- म्हणून मी म्हणतो की, ब्राह्मणच श्रेष्ठ वर्ण इत्यादि जे ब्राह्मणांचे म्हणणे आहे, तो केवळ आवाज होय. क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य आणि शूद्र या चारी वर्णांतील माणसांनी
प्राणघातादिक पापे आचरिली, तर ते सारखेच दुर्गतीला जातील, असे महाराजाला वाटत नाही काय?
राजा.- चारही वर्णांपैकी कोणत्याही मनुष्याने पापकर्म केले तर तो दुर्गतीला जाईल.
का.- ठीक. महाराज, असे जर आहे, तर चारही वर्ण समान ठरत नाहीत काय? तुम्हांला यासंबंधी काय वाटते?
राजा.- या दृष्टीने चारही वर्ण खात्रीने समान ठरतात. त्यांच्यात मला भेद दिसत नाही.
का.- चारही वर्णांपैकी कोणी मनुष्य प्राणघातादिक पापांपासून विरत झाला, तर तो स्वर्गाला जाईल की नाही?
राजा.- तो स्वर्गाला जाईल असे मी समजतो.
का.- आणि म्हणूनच मी म्हणतो की, ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ, हा नुसता आवाज आहे. हे महाराज, समजा, तुमच्या राज्यात चारही वर्णांपैकी कोणत्याही माणसाने घरफोडी, लुटालूट, परदारागमन इत्यादिक अपराध केले, आणि त्याला राजपुरुषांनी आणून तुमच्यासमोर उभे केले, तर त्याला तुम्ही (त्याच्या जातीकडे न पाहाता) योग्य तो दंड कराल की नाही?
राजा.- तो जर वधार्ह असला, तर त्याचा मी वध करीन; दंडनीय असला, तर त्याला मी दंड करीन; आणि हद्दपार करण्याला योग्य असला, तर त्याला हद्दपार करीन. का की, क्षत्रियब्राह्मणादिक जी त्याची पूर्वीची संज्ञा होती, ती नष्ट झाली आणि तो गुन्हेगार आहे, असे ठरले.
का.- तर मग हे चारही वर्ण समान नाहीत काय?
राजा.- ह्या दृष्टीने पाहू गेले असता चारही वर्ण समान ठरतात.
का.- समजा, ह्या चारही वर्णांपैकी कोणताही मनुष्य जर परिव्राजक झाला आणि सदाचार पाळू लागला, तर तुम्ही त्याच्याशी कसे वागाल?
राजा.- त्याला आम्ही वंदन करू, त्याचा योग्य मान ठेवू, व त्याला अन्नवस्त्रादिक जरूरीचे पदार्थ देऊ. का की, त्याची क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र इत्यादिक संज्ञा नष्ट होऊन तो श्रमण या संज्ञेनेच ओळखला जातो.
का.- तर मग हे चारही वर्ण समसमान ठरत नाहीत काय?
राजा.- या रीतीने हे चारही वर्ण खात्रीने समान ठरतात.
का.- म्हणून मी म्हणतो की ब्राह्मण वर्णच श्रेष्ठ आहे, हा नुसता आवाज होय.
हा संवाद झाल्यावर अवंतिपुत्र राजा महाकात्यायनाला म्हणाला, “भो कात्यायन, आपला उपदेश फारच सुंदर आहे. जसे एखादे पालथे घातलेले भांडे ऊर्ध्वमुख करून ठेवावे, झाकलेली वस्तू उघडी करावी, वाट चुकलेल्याला वाट दाखवावी, किंवा डोळसांना पदार्थ दिसावे म्हणून अंधारामध्ये मशाल पाजळावी, त्याप्रमाणे भगवान कात्यायनाने अनेक पर्यायांनी धर्मोपदेश केला. म्हणून मी भगवान कात्यायनाला, धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जातो. मी आजपासून आमरण शरण गेलेला उपासक आहे असे समजा.”
का.- महाराज, मला शरण जाऊ नका. ज्या भगवंताला मी शरण गेलो, त्याला तुम्ही देखील शरण जा.
राजा.- भो कात्यायन, तो भगवान सध्या कोठे आहे?
का.- तो भगवान परिनिर्वाण पावला.
राजा.- तो भगवान हयात असता, तर आम्ही त्याच्या दर्शनासाठी शंभर योजने देखील प्रवास केला असता. पण आता परिनिर्वाण पावलेल्या देखील त्या भगवंताला आम्ही शरण जातो, त्याचप्रमाणे त्याच्या धर्माला आणि भिक्षुसंघाला शरण जातो. आजपासून आमरण शरण गेलेला मी उपासक आहे असे समजा.
बुद्धाच्या हयातीत मथुरेत बौद्ध धर्माचा फारसा प्रसार झाला नव्हता, हे दुस-या प्रकरणात दिलेल्या अंगुत्तरनिकायातील सुत्तावरून दिसून येईलच. (पृ.३२-३३). अंवतिपुत्र राजा बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर गादीवर आला असावा. का की, तो जर बुद्धाच्या हयातीत गादीवर असता, तर त्याला बुद्धासंबंधाने थोडीबहुत माहिती असतीच. वरील सुत्ताच्या शेवटल्या मजकुरावरून दिसून येईल की, बुद्ध परिनिर्वाण पावला हे देखील त्याला माहीत नव्हते. बुद्धाच्या हयातीत त्याचा बाप गादीवर होता व त्याला ब्राह्मणधर्माचे फार महत्त्व वाटत होते आणि त्यामुळे बुद्धाकडे त्याने दुर्लक्ष केले असावे. महाकात्यायन अवन्तीचा राहणारा, मूळचा ब्राह्मण आणि विद्वान असल्याकारणाने या तरुण अवंतिपुत्र राजावर त्याचा प्रभाव पडला असे समजणे योग्य आहे.
7 . श्रमणांना जातिभेद मोडता आला नाही
वर दिलेल्या चार सुत्तांपैकी पहिल्या वासिष्ठसुत्तात जातिभेद नैसर्गिक कसा नाही हे बुद्ध भगवंताने स्पष्ट करून दाखविले आहे. दुस-या अस्सलायनसुत्तात ब्रह्मदेवाच्या मुखापासून ब्राह्मण झाले ही कल्पना खोडून काढली आहे. आणि तिस-या एसुकारिसुत्तात ब्राह्मणांना इतर वर्णांची कर्तव्याकर्तव्ये ठरविण्याचा अधिकार कसा पोचत नाही, हे सिद्ध केले आहे. चौथ्या माधुरसुत्तात महाकात्यायनाने आर्थिक आणि नैतिक दृष्ट्या जातिभेदाची कल्पना कशी निरर्थक ठरते, हे स्पष्ट केले आहे. या सर्व सुत्तांचा नीट विचार केला असता असे दिसून येते की, बुद्धाला किंवा त्याच्या शिष्यांना जातिभेद मुळीच पसंत नव्हता, आणि तो मोडून टाकण्यासाठी त्यांनी बरीच खटपट केली. परंतु हे कृत्य त्यांच्या आवाक्याबाहेरचे होते. ब्राह्मणांनी मध्यहिंदुस्थानातच नव्हे, तर गोदावरीच्या तीरापर्यंत जातिभेदाची लागवड करून ठेवली होती आणि तो सर्वस्वी उपटून टाकणे कोणत्याही श्रमणसंघाला शक्य झाले नाही.
8 . श्रमणांत जातिभेद नव्हता
तथापि ऋषिमुनींच्या परंपरेला अनुसरून श्रमणांनी आपल्या संघात जातिभेदाला थारा दिला नाही. कोणत्याही जातीच्या मनुष्याला श्रमण होऊन एखाद्या श्रमणसंघात दाखल होता येत असे. हरिकेशिबल चांडाळ असून निर्ग्रंथांच्या (जैनांच्या) संघात होता हे नवव्या प्रकरणात सांगितलेच आहे. (पृ.१८१-१८२ पाहा). बुद्धाच्या भिक्षुसंघात तर श्वपाक नावाचा चांडाळ आणि सुनीत नावाचा भंगी यांच्यासारखे अस्पृश्य वर्गात जन्मलेले मोठे साधु होऊन गेले.३ आपल्या संघात जे मोठे गुण आहेत त्यांपैकी जातिभेदाला थारा नाही हा एक होय, असे बुद्ध भगवंताचे म्हणणे आहे. भगवान म्हणतो, “भिक्षुहो, गंगा, यमुना, अचिरवती, सरभू (शरयू), मही, या महानद्या महासमुद्राला मिळाल्या म्हणजे आपली नावे टाकून महासमुद्र हे एकच नाव पावतात. त्याप्रमाणे क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य, शूद्र हे चार वर्ण तथागताच्या संघात प्रवेश केल्यावर पूर्वीची नामगोत्रे टाकून ‘शाक्यपुत्रीय श्रमण’ या एकाच नामाभिधानाने ओळखले जातात.” (उदान ५|५ व अंगुत्तरनिकाय, अट्ठकनिपात).
9 . अशोककाली बौद्धसंघात जातिभेद नव्हता
अशोकसमकालीन बौद्ध संघ जातिभेद मुळीच पाळीत नव्हता, असे दिव्यावदानातील यश अमात्याच्या गोष्टीवरून दिसून येते.
अशोक राजा नुकताच बौद्ध झाला होता व तो सर्व भिक्षूंच्या पाया पडे. ते पाहून यश नावाचा त्याचा अमात्य म्हणाला, “महाराज, या शाक्य श्रमणांत सर्व जातीचे लोक आहेत, त्यांपुढे आपले अभिषिक्त डोके नमवणे योग्य नव्हे.”
अशोकाने काही उत्तर दिले नाही आणि काही काळाने बकरे, मेंढे वगैरे प्राण्यांची डोकी मागवून ती विकावयास लावली; यशाला मनुष्याचे डोके आणावयास लावून विकावयास लावले. बकरे, मेंढे वगैरे प्राण्यांच्या डोक्यांची काही किंमत आली; पण माणसाचे डोके कोणी घेईना. तेव्हा अशोकाने ते कोणाला तरी फुकट द्यावे असे फर्मावले. परंतु ते फुकट घेणारा मनुष्य यश अमात्याला आढळला नाही. ही गोष्ट त्याने अशोकाला निवेदिली. तेव्हा अशोक म्हणाला, “हे मनुष्याचे डोके फुकट दिले तरी लोक का घेत नाहीत?”
यश.- कारण ते ह्या डोक्याचा कंटाळा करतात.
अ.- याच माणसाच्या डोक्याचा कंटाळा करतात, की सर्वच माणसांच्या डोक्याचा ते कंटाळा करतील?
यश.- महाराज, कोणत्याही माणसाचे डोके कापून लोकांजवळ नेले, तरी ते असाच कंटाळा करतील.
अ.- माझ्या डोक्याचा देखील कंटाळा करतील काय?
या प्रश्नाचे उत्तर देण्यास यश धजेना. पण अशोकाने अभयदान दिल्यावर तो म्हणाला, “महाराज, आपल्या डोक्यालाही लोक असेच कंटाळतील.”
अ.- तर मग मी असे डोके भिक्षूंच्या पायावर ठेवून त्यांचा बहुमान केला, तर तुला वाईट का वाटावे?
या संवादानंतर काही श्लोक आहेत त्यांपैकी हा एक-
आवाहकालेऽथ विवाहकाले
जाते: परीक्षा न तु धर्मकाले |
धर्मक्रियाया हि गुणा निमित्ता
गुणाश्च जातिं न विचारयन्ति ||
‘मुलाच्या आणि मुलीच्या लग्नात४ जातीचा विचार करणे योग्य आहे. धार्मिक बाबतीत जातीचा विचार करण्याचे कारण नाही. का की, धार्मिक कृत्यांत गुण पाहावे लागतात; आणि गुण जातीवर अवलंबून नसतात.’
10 . जैन संघाने जातिभेद स्वीकारला
इतर श्रमणसंघांपैकी एक तेवढ्या निर्ग्रंथ संघाची अल्पस्वल्प माहिती आजला उपलब्ध आहे. ह्या श्रमणसंघाने जातिभेदाला अशोकापूर्वीच महत्त्व देण्याला सुरुवात केली, असे आचारांगसूत्राच्या निरुक्तीवरून दिसून येते. ही निरुक्ति भद्रबाहूने रचली आणि तो चंद्रगुप्ताचा गुरू होता अशी समजूत जैन लोकांत प्रचलित आहे. ह्या निरुक्तीच्या आरंभीच जातिभेदाविषयी जो मजकूर सापडतो, त्याचा सारांश असा- ‘चार वर्णांच्या संयोगाने सोळा वर्ण उत्पन्न झाले. ब्राह्मण पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून प्रधान क्षत्रिय किंवा संकर क्षत्रिय उत्पन्न होतो. क्षत्रिय पुरुष आणि वैश्य स्त्री यांजपासून प्रधान वैश्य किंवा संकर वैश्य उत्पन्न होतो. वैश्य पुरुष व शूद्र स्त्री यांजपासून प्रधान शूद्र किंवा संकर शूद्र उत्पन्न होतो. ह्याप्रमाणे सात वर्ण होतात. आता ही नववर्णान्तरे- १) ब्राह्मण पुरुष व वैश्य स्त्री यांजपासून अम्बष्ठ; २) क्षत्रिय पुरुष आाणि शूद्र स्त्री यांजपासून उग्र; ३) ब्राह्मण पुरुष आणि शूद्र स्त्री यांजपासून निषाद; ४) शूद्र पुरुष आणि वैश्य स्त्री यांजपासून अयोगव; ५) वैश्य पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून मागध; ६) क्षत्रिय पुरुष व ब्राह्मण स्त्री यांजपासून सूत; ७) शूद्र पुरुष आणि क्षत्रिय स्त्री यांजपासून क्षता; ८) वैश्य पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांजपासून वैदेह; ९) शूद्र पुरुष आणि ब्राह्मण स्त्री यांजपासून चांडाळ उत्पन्न होतो.’
(आचारांग निर्युक्ति, अ. १, गाथा २१ ते २७)
आजला अस्तित्वात असलेली मनुस्मृति ह्या निर्युक्तीपेक्षा फारच अर्वाचीन आहे, तथापि ह्या निर्युक्तिसमकाली ब्राह्मण लोक मनुस्मृतीतील अनुलोम प्रतिलोम जातींची अशाच प्रकारे व्युत्पत्ति लावण्याचा प्रयत्न करीत होते, असे अनुमान करण्यास मुळीच हरकत नाही. आणि जैनांनी ही व्युत्पत्ति ब्राह्मणांकडूनच घेतली असावी, अशी बळकट शंका येते. काही असो, निर्ग्रंथ श्रमणांनी जातिभेदाला पूर्ण संमति दिल्याचा हा एक उत्तम दाखला आहे.
11 . हीनजातीयांना जैन साधुसंघात घेण्याची मनाई
बाले वुड्ढे नपुंसे य कीवे जड्ढे वाहिए |
तेणे रायावगारी या उम्मत्ते य अदंसणे |
दासे दुट्ठे य मूढे य अणत्ते जुंगिए इ य |
उबद्धए च भयए सेहनिप्फेडिया इ य ||
१) बाल, २) वृद्ध, ३) नपुंसक, ४) क्लीब, ५) जड, ६) व्याधित, ७) चोर, ८)राजापराधी, ९) उन्मत्त, १०) अदर्शन (?), ११) दास, १२) दुष्ट, १३) मूढ, १४) ऋणार्त, १५) जुंगित, १६) कैदी, १७) भयार्त, आणि १८) पळवून आणलेला शिष्य, या अठरांना जैन साधुसंघात घेण्याची मनाई आहे. यांच्यापैकी ब-याच व्यक्तींना बौद्ध भिक्षुसंघात देखील घेता येत नाही. ह्या दोन संघांतील प्रवेशविधींची (उपसंपदांची) तुलना अत्यंत उपयुक्त होईल.५ पण तो या प्रकरणाचा विषय नव्हे. वर दिलेल्या अठरा असामींपैकी पंधराव्याचा तेवढा विचार आवश्यक आहे. त्या शब्दावरची टीका अशी-
“तथा जाति-कर्म-शरीरादिभिर्दूषितो जुंगितः | तत्र मातंग-कोलिक बरुड-सुचिक- छिंपादयोऽस्पृश्या जातिजुंगिताः | स्पृश्या अपि स्त्री-मयूर-कुक्कुट-शुकादिपोषका वंशवर- त्रारोहण-नखप्रक्षालन-सौकरिकत्व-वागुरिकत्वादिनिंदितकर्मकारिणः कर्मजुंगिता: | करचरणवर्जिताः पंगुकुब्ज-वामनककाणप्रभृतयः शरीरजुंगिताः | तेऽपि न दीक्षार्हा लोकेऽवर्णवादसंभवात् |”
‘त्याचप्रमाणे जाति, कर्म, शरीर इत्यादिकांनी दूषित जुंगित समजावा. त्यांत मांग, कोळी, बुरूड, शिंपी, रंगारी इत्यादिक अस्पृश्य जातिजुंगित होत. स्पृश्य असून देखील, स्त्री, मोर, कोंबडी, पोपट वगैरे पाळणे, बांबूवरची व दोरीवरची कसरत करणे, नखे साफ करणे, डुकरे पाळणे, पारध्याचे काम करणे, इत्यादि निंद्य कर्मे करणारे कर्मजुंगित होत. हातपाय नसलेले, पंगु, कुबडे, ठेंगणे, तिरचे इत्यादिक शरीरजुंगित होत. लोकांत टीका होण्याचा संभव असल्यामुळे ते देखील दीक्षा देण्थास योग्य नाहीत.’६
बौद्ध भिक्षुसंघात प्रवेश करण्याला जाति मुळीच आड येत नाही. कर्मे निंद्य असली, तर ती त्याला सोडावीच लागतात, पण त्यामुळे तो दीक्षेला अयोग्य ठरत नाही.
12 . अहिंदूंचा हिंदुसमाजात प्रवेश
असे जरी आहे, तरी बौद्ध आणि जैन या दोनही संप्रदायांनी परकीय लोकांना हिंदुसमाजात दाखल करून घेण्याचे महत्त्वाचे कार्य केले. ग्रीक, शक, हूण, मालव, गुर्जर इत्यादिक बाहेरच्या जाती हिंदुस्थानात आल्या, आणि या दोन धर्मांच्या महाद्वारांनी त्यांनी हिंदुसमाजात प्रवेश केला. प्रथमतः हे लोक जैन किंवा बौद्ध होत असत, आणि मग यथारुचि ब्राह्मण, क्षत्रिय किंवा वैश्य बनत. एकाच घराण्यातील एका भावाच्या संततीने क्षत्रियत्व व दुस-या भावाच्या संततीने ब्राह्मणत्व पत्करल्याचा दाखला सापडला आहे.७
13 . अस्पृश्यतेचा परिणाम
याप्रमाणे जेते लोक हिंदुसमाजात मिसळून गेले तरी अस्पृश्यांची परिस्थिति सुधारली नाही. जैन आणि बौद्ध श्रमणांनी त्यांची हेळसांड केली, आणि त्यामुळे उत्तरोत्तर अस्पृश्यांविषयी तिटकारा वाढत गेला; नाहक त्यांचा छळ होऊ लागला; आणि त्याचा परिणाम हळूहळू सर्व समाजाला व खुद्द जैनांना आणि बौद्धांना भोगावा लागला.
जातिभेद दृढ होत गेल्यावर जैन व बौद्ध सर्व जातींची भिक्षा स्वीकारतात म्हणून निंद्य ठरावयाला लागले. जैन संघात अस्पृश्याला घेण्याची मनाई होती, तरी शूद्राला घेत असत असे वाटते. बौद्ध संघात तर शेवटपर्यंत जातिभेदाला थारा नव्हता. पण समाजात जातिभेद बळावला, आणि ब्राह्मणांना शंबूकाच्या गोष्टीसारख्या गोष्टी रचून लोकप्रिय पुराणांत दाखल करणे शक्य झाले. होता होता बौद्ध श्रमण निखालस नष्ट झाले, व जैन श्रमण जेमतेम कसेबसे जीव बचावून राहिले! त्यांच्या हातून समाजसंशोधनाचे कोणतेही महत्कार्य घडून आले नाही.
14 . भिक्षूसंघाची अन्य देशांतील कामगिरी
जातिभेदासमोर बौद्ध भिक्षुसंघ हिंदुस्थानात टिकाव धरून राहू शकला नाही. तथापि बाहेरच्या देशात त्याने मोठीच कामगिरी बजावली आहे. दक्षिणेला सिंहलद्वीप, पूर्वेला ब्रह्मदेशापासून तहत जपानपर्यंत, आणि उत्तरेला तिबेट, मंगोलिया वगैरे देश या सर्व ठिकाणी बौद्ध संघाने बहुजनसमाजाला एका काळी सुसंस्कृत करून सोडले. उत्तरेला हिमालयावरून आणि दक्षिणेला व पूर्वेला समुद्रातून प्रवास करून अनेक भिक्षूंनी बौद्ध संस्कृतीची पताका या सर्व देशांवर फडकत ठेवली. याचे बीज वर दिलेल्या बुद्धाच्या उपदेशात आहे. बुद्धाने जातिभेदाला यत्किंचित् थारा दिला असता, तर त्याच्या अनुयायी भिक्षूंनी म्लेच्छ समजल्या जाणा-या देशात संचार करून बौद्ध धर्माचा प्रसार केला नसता. जातिभेदामुळे आमची हानि झाली, पण पूर्व आशिया खंडाचा फायदा झाला, असे म्हणावे लागते!
15 . तळटीपा
१. ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ पृ.१५ पाहा.
२. हीच सध्याची मथुरा.
३. बौद्ध संघाचा परिचय, पृ.२५३-२५६ पाहा.
४.आवाह म्हणजे सुनेला घरी आणणे आणि विवाह म्हणजे आपल्या मुलीचे लग्न करून सासरी पाठविणे.
५. बौद्ध भिक्षुसंघातील प्रवेशविधीसंबंधी ‘बुद्ध, धर्म आणि संघ,’ पृ. ५६-६० व ‘बौद्धसंघाचा परिचय’, पृ.१७-१९ पाहा.
६. प्रवचनसारोद्धार, द्वार १०७. हा उतारा मुनि श्री.जिनविजयजी यांनी काढून दिला, ह्याबद्दल त्यांचे आभार मानतो.
७. ह्या संबंधी Dr. D. R. Bhandarkar यांचा Indian Antiquary, Vol. 40, January 1911, pp.7-37 मध्ये प्रसिद्ध झालेला The Foreign Elements in the Indian Population हा लेख पाहावा. विशेषतः पृ.३५-३६ वरील मजकूर अवश्य वाचावा.

