२०२-२१४

भगवान बुद्ध

मांसाहार

14-10-2017
18-09-2017
18-09-2017
18-09-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

  1. बुद्ध आणि महावीरस्वामी मांसाहार करीत होते.
  2. आजकालचे बौद्ध भिक्षु देखील कमी जास्ती प्रमाणाने मांसाहार करतात.
  3. बुद्धसमकालीन काही तपस्वी लोक मांसाहार निषिद्ध समजत.
  4. प्रथम गोमांसाहाराच्या निषेधाबद्दल बौद्धांनीच चळवळ सुरू केली असावी.
  5. बौद्धांच्या आणि जैनांच्या प्रयत्नाने गोमांसाहाराचा निषेध होत गेला.
  6. ब्राह्मण लोकांत त्याची मनाई होण्यास बरीच शतके लागली.
  7. सम्राट अशोक हा प्राणिहिंसेविरुद्ध प्रचार करणारा पहिला ऐतिहासिक राजा होय.

सारांश

परिनिर्वाणाच्या दिवशी बुद्ध भगवन्ताने चुन्द लोहाराच्या घरी डुकराचे मास खाल्ले आणि आजकालचे बौद्ध भिक्षु देखील कमी जास्ती प्रमाणाने मांसाहार करतात. अत्यंत तपस्वी जैनसंप्रदायांतील श्रमण मांसाहार करीत होते. खुद्द महावीरस्वामी मांसाहार करीत होते, यासंबंधी सबळ पुरावा सध्या पुढे आला आहे. परंतु, बुद्धसमकालीन काही तपस्वी लोक मांसाहार निषिद्ध समजत. सर्वांत प्रथम गोमांसाहाराच्या निषेधाबद्दल बौद्धांनीच चळवळ सुरू केली असावी. बौद्धांच्या आणि जैनांच्या प्रयत्नाने गोमांसाहाराचा निषेध होत गेला, तरी ब्राह्मण लोकांत त्याची मनाई होण्यास बरीच शतके लागली. प्राणिहिंसेविरुद्ध प्रचार करणारा पहिला ऐतिहासिक राजा म्हटला म्हणजे अशोक होय.

पारिभाषिक शब्द

मांसाहार , चुन्द लोहार , गोमांसाहार , महावीर , जैन , प्राणिहिंसा , अशोक

1 . बुद्ध भगवंताचा मांसाहार

परिनिर्वाणाच्या दिवशी बुद्ध भगवन्ताने चुन्द लोहाराच्या घरी डुकराचे मास खाल्ले, आणि आजकालचे बौद्ध भिक्षु देखील कमी जास्ती प्रमाणाने मांसाहार करतात; तेव्हा असा प्रश्न उपस्थित होतो की, अहिंसेला परमधर्म समजणा-या बुद्धाचे आणि त्याच्या अनुयायांचे हे वर्तन क्षम्य आहे काय? या प्रश्नाची चर्चा करणे योग्य वाटते.

बुद्धाने परिनिर्वाणाच्या दिवशी जो पदार्थ खाल्ला त्याचे नाव ‘सूकरमद्दव’ होते. त्याच्यावर बुद्धघोषाचार्यांची टीका आहे ती अशी-

“सूकरमद्दवं ति नातितरुणस्स नातिजिण्णस्स एक जेट्ठकसूकरस्स पवत्तमंसं | तं किर मुदुं चेव सिनिद्धं च होति | तं पटियादापेत्वा साधुकं पचापेत्वा ति अत्थो | एके भणन्ति, सूकरमद्दवं ति पन मुदुओदनस्स पञ्चगोरसयूसपाचनविधानस्स नाममेतं, यथा गवपानं नाम पाकनामं ति | केचि भणन्ति सूकरमद्दवं नाम रसायनविधि, तं पन रसायनत्थे आगच्छति, तं चुन्देन भगवतो परनिब्बानं न भवेय्या ति रसायनं पटियत्तंति |”

‘सूकरमद्दव म्हणजे फार तरुण नव्हे व फार वृद्ध नव्हे, पण जो अगदी लहान पोराहून वयाने मोठा अशा डुकराचे शिजविलेले मांस. ते मृदु आणि स्निग्ध असते. ते तयार करवून म्हणजे उत्तम रीतीने शिजवून असा अर्थ समजावा. कित्येक म्हणतात, पंचगोरसाने तयार केलेल्या मृदु अन्नाचे हे नाव आहे, जसे गवपान हे एका विशिष्ट पक्वान्नाचे नाव. कोणी म्हणतात, 

सूकरमद्दव नावाचे एक रसायन होते. रसायनार्थी त्या शब्दाचा उपयोग करण्यात येतो. भगवन्ताचे परिनिर्वाण होऊ नये, एतदर्थ ते चुन्दाने भगवन्ताला दिले.’

या टीकेत सूकरमद्दव शब्दाचा मुख्य अर्थ सूकरमांस असाच करण्यात आला आहे. तथापि तो अर्थ बरोबर होता, याबद्दल बुद्धघोषाचार्याला खात्री नव्हती. का की, त्याच वेळी ह्या शब्दाचे आणखी दोन अर्थ करण्यात येत असत. या शिवाय दोन भिन्न अर्थ उदानअट्ठकथेत सापडतात, ते असे-

“केचि पन सूकरमद्दवं ति न सूकरमंसं, सूकरेहि मद्दितवंसकळीरो ति वदन्ति | अञ्‍ञे

सूकरेहि मद्दितपदेसे जातं अहिच्छत्तकं ति |”

‘कोणी म्हणतात, सूकरमद्दव म्हणजे डुकराचे मांस नव्हे. डुकरांनी तुडवलेल्या वेळूचा तो मोड. दुसरे म्हणतात, डुकरांनी तुडवलेल्या जागी उगवलेले अळंबे.’

याप्रमाणे सूकरमद्दव शब्दाच्या अर्थासंबंधाने पुष्कळच मतभेद आहेत. तथापि बुद्ध भगवान सूकरमांस खात होता, याला अंगुत्तरनिकायाच्या पंचकनिपातात आधार सापडतो. उग्ग गहपति म्हणतो-

“मनापं मे भन्ते संपन्नवरसूकरमंसं, तं मे भगवा पटिग्गण्हातु अनकम्पं उपादाया ति| पटिग्गहेसि भगवा अनुकम्पं उपादाया ति |”

‘भदन्त, उत्तम डुकराचे उत्कृष्ट रीतीने शिजवून तयार केलेले हे मांस आहे, ते माझ्यावर कृपा करून भगवन्ताने घ्यावे. भगवन्ताने कृपा करून ते मांस घेतले.’

2 . जैन श्रमणांचा मांसाहार

इतर श्रमणसंप्रदायांत जे अत्यंत तपस्वी होते त्यात प्रामुख्याने जैनांची गणना होत असे. असे असता जैनसंप्रदायांतील श्रमण मांसाहार करीत होते, असे आचारांग सूत्रातील खालील उता-यावरून दिसून येईल-

“से भिक्खू वा भिक्खुणी वा सेज्जं पुण जाणेज्जां बहुअट्ठियं मंसं वा, मच्छं वा, बहुकंटकं, अस्मिं खलु पडिगाहितंसि अप्पे सिया भोयणजाए बहुउज्झियधम्मिए | तहप्पगारं बहुअट्ठियं वा मंसं, मच्छं वा बहुकंटकं, लाभेवि संते णो पडिगाहेज्जा | से भिक्खू वा भिक्खुणी वा गाहावइकुलं पिंडवायपडियाए अणुपविट्ठे समाणे परो बहुअट्ठिएण मंसेण मच्छेण उवणिमंतेज्जा, आउसंतो समणा अभिकंखसि बहुअट्ठियं मंसं पडिगाहेत्तए? एयप्पगारं णिग्घोसं सोच्चा णिसम्म से पुव्वमेव आलोएज्जा, आउसोत्ति वा भइणीत्ति वा णो खलु मे कप्पइ बहुअट्ठियं मंसं पडिगाहेत्तए, अभिकंखसि से दाउं जावइयं तावइयं पोग्गलं दलयाहि मा अट्ठियाइं | से सेवं वदंतस्स परो अभिहट्ठु अंतोपडिग्गहगंसि बहुअट्ठियं मंसं परिभाएत्ता णिहट्ठु दलएज्जा, तहप्पगारं पडिग्गहणं परहत्थंसि वा परपायंसि वा अफासुयं अणेसणिज्जं लाभे वि संते णो पडिगाहेज्जा| से आहच्च पडिगाहिए सिया तं णोहित्ति वएज्जा, अणोवत्ति वएज्जा | से त्तमायाय एगंतमवक्कमेज्जा | अवक्कमेत्ता अहेआरामंसि वा अहेउवस्सयंसि वा अप्पंडए जाव संताणए मंसगं मच्छगं भोच्चा अट्ठियाइं कंटए गहाय से त्तमायाए एगंतमवक्कमेज्जा | अवक्कमेत्ता अहेज्झामथंडिलंसि वा अट्ठिरासिंसि वा किट्ठरासिंसि वा तुमरासिंसि वा गोमयरासिंसि वा अण्णयरंसि वा तहप्पगारंसि थंडिलंसि पडिलेहिय पडिलेहिय पमज्जिय पमज्जिय तओ संजायामेव पमज्जिय पमज्जिय परि वेज्जा |”

‘पुनरपि तो भिक्षु किंवा ती भिक्षुणी फार हाडे असलेले मांस किंवा पुष्कळ काटे असलेला मासा मिळाला तर जाणील की, यात खाण्याचा पदार्थ कमी व टाकण्याचा जास्त आहे. अशा प्रकारचे पुष्कळ हाडे असलेले मांस किंवा पुष्कळ काटे असलेला मासा मिळाला तर तो त्याने घेऊ नये. तो भिक्षु किंवा ती भिक्षुणी गृहस्थाच्या घरी भिक्षेसाठी गेला किंवा गेली असता गृहस्थ म्हणेल, आयुष्मान् श्रमणा, हे पुष्कळ हाडे असलेले मांस घेण्याची तुझी इच्छा आहे काय? अशा प्रकारचे भाषण ऐकून पूर्वीच त्याने म्हणावे, आयुष्मान् किंवा (बाई असेल तर) भगिनी, हे फार हाडे असलेले मांस घेणे मला योग्य नाही. जर तुझी इच्छा असेल, तर फक्त मांस तेवढे दे, हाडे देऊ नकोस. असे म्हणत असताही जर तो गृहस्थ आग्रहाने देण्यास प्रवृत्त झाला, तर ते अयोग्य समजून घेऊ नये. त्याने ते पात्रात टाकले, तर ते एका बाजूला घेऊन जावे आणि आरामांत किंवा उपाश्रयात प्राण्यांची अंडी तुरळक असतील अशा ठिकाणी बसून मांस आणि मासा तेवढा खाऊन हाडे व काटे घेऊन एका बाजूला जावे. तेथे जाऊन भाजलेल्या जमिनीवर, हाडांच्या राशीवर, गंजलेल्या लोखंडाच्या जुन्या तुकड्यांच्या राशीवर, तुसाच्या राशीवर, वाळलेल्या शेणाच्या राशीवर किंवा अशाच प्रकारच्या दुस-या स्थंडिलावर (उंचवट्यावर) जागा चांगल्या रीतीने साफसूफ करून ती हाडे किंवा ते काटे संयमपूर्वक त्या ठिकाणी ठेवून द्यावे.’

याचाच अनुवाद दशवैशालिक सूत्रातील खालील गाथांत संक्षेपाने केला आहे-

बहु अट्ठियं पुग्गलं अरिमिसं वा बहुकंटयं |

अच्छियं तिंदुयं बिल्लं, उच्छुखण्डं व सिंबलिं ||

अप्पे सिआ भो अणज्जाए, बहुउज्झिय धम्मियं |

दिंतिअं पडिआइक्खे न मे कप्पई तारिंसं ||

‘पुष्कळ हाडे असलेले मास, पुष्कळ काटे असलेला मासा, अस्थिवृक्षाचे फळ, बेलफळ, ऊस, शाल्मलि अशा प्रकारचे पदार्थ-ज्यात खाण्याचा भाग कमी व टाकण्याचा जास्त-देणारीला, ते मला योग्य नाहीत, असे म्हणून प्रतिबंध करावा.’

3 . मांसाहाराविषयी प्रसिद्ध जैन साधूंचे मत

गुजरात विद्यापीठाची पुरातत्त्वमंदिर नावाची शाखा होती, तिच्या तर्फे ‘पुरातत्त्व’ त्रैमासिक निघत असे. या त्रैमासिकाच्या १९२५ सालच्या एका अंकात मी प्रस्तुत प्रकरणाच्या धर्तीवर एक लेख लिहिला आणि त्यात हे दोन उतारे देण्यात आले. मी त्यांचा स्वतः शोध लावला होता असे नव्हे. मांसाहाराविषयी चर्चा चालली असता प्रसिद्ध जैन पण्डितांनीच ते माझ्या निदर्शनास आणले आणि त्यांचा मी माझ्या लेखात उपयोग केला.

हा लेख प्रसिद्ध झाल्यावर अहमदाबादच्या जैन लोकांत फारच खळबळ उडाली. त्यांच्या धर्माचा मी उच्छेद करू पाहतो, अशा अर्थाच्या त्यांच्या तक्रारी पुरातत्त्वमंदिराच्या संचालकांकडे येऊन धडकल्या. संचालकांनी परस्पर त्या तक्रारींचा परिहार केला. मला त्यांची बाधा झाली नाही.

त्या वेळी वयोवृद्ध स्थानकवासी साधु गुलाबचंद व त्यांचे प्रसिद्ध शतावधानी शिष्य रतनचंद अहमदाबादेला राहत असत. एका जैन पंडिताबरोबर मी त्यांच्या दर्शनाला गेलो. संध्यासमय होता व जैन साधु आपणाजवळ दिवा ठेवीत नसल्यामुळे ह्या दोन साधूंचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. माझ्याबरोबरच्या जैन पंडिताने रतनचंद स्वामींना माझी ओळख करून दिली. तेव्हा ते म्हणाले, “तुमची कीर्ति मी ऐकत आहे. परंतु तुम्ही आमचे प्राचीन साधु मांसाहार करीत होते, असे लिहून आमच्या धर्मावर आघात केलात, हे ठीक नव्हे.”

मी म्हणालो, “बौद्ध आणि जैन हे दोनच श्रमण संप्रदाय आजला अस्तित्वात राहिले आहेत. आणि त्यांजविषयी माझे प्रेम किती आहे, हे या (माझ्याबरोबर असलेल्या) पंडितांनाच विचारा. परंतु संशोधनाच्या बाबतीत श्रद्धा, भक्ति किंवा प्रेम आड येऊ देता कामा नये. सत्यकथनाने कोणत्याही संप्रदायाचे नुकसान होईल, असे मला वाटत नाही. आणि सत्यार्थ प्रकाशित करणे संशोधकांचे कर्तव्य आहे असे मी समजतो.”

वृद्ध साधु गुलाबचंद काही अंतरावर बसले होते ते तेथूनच आपल्या शिष्याला म्हणाले, “या गृहस्थाने दोन उता-यांचा जो अर्थ लावला, तोच बरोबर आहे; आधुनिक टीकाकारांनी केलेले अर्थ ठीक नव्हते. ह्या दोन उता-यांशिवाय आणखी ब-याच ठिकाणी, जैन साधु मांसाहार करीत होते, याला आधार सापडतात.”

असे म्हणून त्यांनी जैन सूत्रांतील उतारे म्हणण्याला सुरवात केली. पण त्यांच्या विद्वान शिष्यांनी विषयांतर करून हा संवाद तसाच सोडून दिला. त्यांच्या गुरूंनी सांगितलेले आधार कोणते, हे मी विचारले नाही. तसे करणे मला अप्रस्तुत वाटले.

4 . महावीरस्वामींच्या मांसाहाराबद्दल वाद

खुद्द महावीरस्वामी मांसाहार करीत होते यासंबंधी सबळ पुरावा सध्या पुढे आला आहे. ‘प्रस्थान’ मासिकाच्या गेल्या कार्तिकाच्या अंकात (संवत् १९९५, वर्ष १४, अंक १) श्रीयुत गोपाळदास जीवाभाई पटेल यांनी ‘श्री महावीरस्वामीनो मांसाहार’ नावाचा लेख प्रसिद्ध केला आहे. त्यापैकी प्रस्तुत विषयाला लागू पडणारी माहिती संक्षेपाने येथे देतो.

महावीरस्वामी श्रावस्ती नगरीत राहत होते. मक्खलि गोसाल देखील तेथे पोचला. आणि ते दोघे परस्परांच्या जिनत्वाविरुद्ध कडक टीका करू लागले. परिणामी गोसालाने महावीरस्वामीला शाप दिला की माझ्या तपोबलाने तू सहा महिन्यांच्या अन्ती पित्तज्वराने मरण पावशील. महावीरस्वामीने त्याला उपटा शाप दिला की, तू सातव्या रात्री पित्तज्वराने पीडित होऊन मरण पावशील. त्याप्रमाणे गोसाल सातव्या रात्री मरण पावला पण त्याच्या प्रभावाने महावीर स्वामीला अत्यंत दाह होऊन रक्ताचे झाडे सुरू झाले.

त्या वेळी महावीरस्वामीने सिंह नावाच्या आपल्या शिष्याला सांगितले, “तू मेंढिक गावात रेवती नावाच्या बाईपाशी जा. तिने माझ्यासाठी दोन कबुतरे शिजवून ठेवली आहेत, ती मला नकोत. ‘काल मांजराने मारलेल्या कोंबडीचे मास तू तयार केले आहेस, तेवढे दे,’ असे तिला सांग.”

श्रीयुत गोपाळदास यांनी, मूळ भगवती सूत्रांतील उतारा आपल्या लेखात दिला नाही. तो येथे देणे योग्य आहे-

“तं गच्छह णं तुमं सीहा, मेढियगामं नगरं रेवतीए गाहावतीणीए गिहे तत्थ णं रेवतीए गाहावतीणीए ममं अट्ठाए दुवे कवोयसरीरा उवक्खडिया, तेहिं नो अट्ठो | अत्थि से अन्न परियासिए मज्जारकडए कुक्कुडमंसए तं आहराहि एएणं अट्ठो |”

ज्याला अर्धमागधीचे अल्पस्वल्प ज्ञान आहे, त्याने नि:पक्षपातीपणाने हा उतारा वाचला, तर तो म्हणेल की श्री.गोपाळदास यांनी केलेला अर्थ बरोबर आहे. पण आजला श्री. गोपाळदास यांच्या विरुद्ध अनेक जैन पंडितांनी कडक टीका चालविली आहे!

5 . बौद्ध आणि जैन श्रमणांच्या मांसाहारात फरक

मांसाहारासंबंधाने जैनांचा आणि बौद्धांचा वाद कशा प्रकारचा होता, याचा विचार केला असताही श्री. गोपाळदास यांचेच म्हणणे बरोबर आहे असे ठरते.

वैशालीतील सिंह सेनापति निर्ग्रंथांचा उपासक होता, याचा उल्लेख आठव्या प्रकरणात आलाच आहे. (पृ.१५४). बुद्धाचा उपदेश ऐकून तो बुद्धोपासक झाला व त्याने बुद्धाला आणि भिक्षुसंघाला आपल्या घरी आमंत्रण देऊन आदरपूर्वक त्यांचे संतर्पण केले. पण निर्ग्रंथांना ही गोष्ट रुचली नाही. त्यांनी वैशाली नगरीत अशी वदंता उठवली की, सिंहाने मोठा पशू मारून गोतमाला आणि भिक्षुसंघाला मेजवानी दिली आणि गोतमाला हे माहीत असता, सिंहाने दिलेल्या भोजनाचा त्याने स्वीकार केला! ही बातमी एका गृहस्थाने येऊन हळूच सिंहाला सांगितली, तेव्हा तो म्हणाला, ‘‘यात काही अर्थ नाही. बुद्धाची नालस्ती करण्यात निर्ग्रंथांना आनंद वाटतो. पण मी जाणूनबुजून मेजवानीसाठी प्राण्यांची हिंसा करीन हे अगदीच असंभवनीय आहे.”

अशाच त-हेचा दुसरा एक उतारा मज्झिमनिकायातील (५५ व्या) जीवकसुत्तात सापडतो तो असा-

एके समयी भगवान राजगृह येथे जीवक कौमारभृत्याच्या आम्रवनात राहत होता. तेव्हा जीवक कौमारभृत्य भगवंताजवळ आला, भगवंताला अभिवादन करून एका बाजूला बसला आणि म्हणाला, “भदन्त, आपणाला उद्देशून प्राणी मारून तयार केलेले अन्न आपण खात असता, असा आपणावर आरोप आहे, तो खरा आहे काय?” भगवान म्हणाला, “हा आरोप साफ खोटा आहे. आपल्यासाठी प्राणिवध केलेला आपण पाहिला, ऐकला किंवा तशी आपणास शंका आली, तर ते अन्न निषिद्ध आहे, असे मी म्हणतो.”

यावरून जैनांचा बुद्धावर आरोप कशा प्रकारचा होता हे समजून येते. बुद्ध भगवंताला कोणी आमंत्रण करून मांसाहार दिला असता जैन म्हणत, श्रमण गोतमाकरिता पशू मारून तयार कलेले (उद्दिस्सकटं) मास तो खातो! स्वतः जैन साधु कोणाचे आमंत्रण स्वीकारीत नसत. रस्त्यातून जात असताना मिळालेली भिक्षा घेत आणि त्या प्रसंगी मिळालेले मांस खात.

6 . काही तपस्वी मांसाहार वर्ज्य करीत

बुद्धसमकालीन काही तपस्वी लोक मांसाहार निषिद्ध समजत. त्यांपैकी एका तपस्व्याचा आणि काश्यप बुद्धाचा संवाद सुत्तनिपातातील (१४ व्या) आमगंध सुत्तात सापडतो. त्या सुत्ताचे भाषांतर असे-

१.     (तिष्य तापस-) श्यामक, चिंगूलक, चीनक, झाडांची पाने, कंदमूळ आणि फळे धर्मानुसार मिळाली असता त्यांजवर निर्वाह करणारे चैनीच्या पदार्थासाठी खोटे बोलत नसतात.

२.      हे काश्यपा, परक्यांनी दिलेले निवडक व चांगल्या रीतीने शिजविलेल्या तांदळांचे सुरस व उत्तम अन्न स्वीकारणारा तू आमगंध (अमेध्य पदार्थ) खातोस!

३.      हे ब्रह्मबंधु, पक्ष्याच्या मांसाने मिश्रित तांदळांचे अन्न खात असता तू आपणाला आमगंध योग्य नाही, असे म्हणतोस! तेव्हा हे काश्यपा, मी तुला विचारतो की तुझा आमगंध कशा प्रकारचा?

४.      (काश्यप बुद्ध-) प्राणघात, वध, छेद, बंधन, चोरी, खोटे भाषण, ठकवणे, नाडणे, जारणमारणादिकांचा अभ्यास आणि व्यभिचार, हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

५       ज्यांना स्त्रियांच्या बाबतीत संयम नाही, जे जिव्हालोलुप, अशुचिकर्ममिश्रित, नास्तिक, विषम आणि दुर्विनीत त्यांचे कर्म हा आमगन्ध होय; मांसभोजन हा नव्हे.

६.      जे रुक्ष, दारूण, चहाडखोर, मित्रद्रोही, निर्दय, अतिमानी, कृपण, कोणाला काहीही देत नाहीत, त्यांचे कर्म हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

७.      क्रोध, मद, कठोरता, विरोध, माया, ईर्ष्या, वृथा बडबड, मानातिमान आणि खळांची संगति हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

८.      पापी, ऋण बुडवणारे, चहाडखोर, लाच खाणारे खोटे अधिकारी, जे नराधम इहलोकी कल्मष उत्पन्न करतात त्यांचे कर्म हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

९.      ज्यांना प्राण्यांविषयी दया नाही, जे इतरांना लुटून उपद्रव देतात, दुःशील, भेसूर, शिवीगाळ देणारे व अनादर करणारे (त्यांचे कर्म) - हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

१०.     अशा कर्मांत आसक्त झालेले, विरोध करणारे, घात करणारे, सदोदित अशा कर्मांत गुंतलेले की जे परलोकी अंधकारांत शिरतात व वर पाय, खाली डोके होऊन नरकात पडतात (त्यांचे कर्म) - हा आमगंध होय; मांसभोजन हा नव्हे.

११.    मत्स्यमांसाचा आहार वर्ज्य करणे, नागवेपणा, मुंडण, जटा, राख फासणे, खरखरीत अजिनचर्म, अग्निहोत्राची उपासना किंवा इहलोकीच्या दुस-या विविध तपश्चर्या, मंत्राहुति, यज्ञ आणि शीतोष्णसेवनाने तप करणे, या गोष्टी कुशंकांच्या पार न गेलेल्या मर्त्याला पावन करू शकत नाहीत.

१२.    इंद्रियात संयम ठेवून व इंद्रिये जाणून वागणारा, धर्मस्थित, आर्जव व मार्दव यांत संतोष मानणारा, संगातीत व ज्याचे सर्व दु:ख नाश पावले असा जो धीर पुरुष, तो दृष्ट आणि श्रुत पदार्थांत बद्ध होत नाही.

१३.    हा अर्थ भगवंताने पुनः पुनः प्रकाशित केला आणि त्या मंत्रपारगाने (ब्राह्मणतापसाने) तो जाणला. हा अर्थ त्या निरामगंध, अनासक्त आणि अदम्य मुनीने रम्य गाथांनी प्रकाशित केला.

१४.      निरामगंध आणि सर्व दुःखांचा नाश करणारे असे बुद्धाचे सुभाषित वचन ऐकून तो (तापस) नम्रपणे तथागताच्या पाया पडला आणि त्याने येथेच प्रव्रज्या घेतली.

 

7 . श्रमणांनी केलेले मांसाहाराचे समर्थन

हे सुत्त फार प्राचीन आहे. पण ते खास काश्यप बुद्धाने उपदेशिलेले होते, असे समजण्याला बळकट आधार नाही. बुद्धसमकालीन भिक्षु मांसाहाराचे समर्थन येणेप्रमाणे करीत, एवढेच समजावे.

या सुत्तात तपश्चर्या निरर्थक गणली आहे. हे मत जैन श्रमणांना पसंत पडले नसते. का की, ते वारंवार तपश्चर्या करीत असत. तथापि मांसाहाराचे त्यांनी अशाच प्रकारे समर्थन केले असते. कारण, ते पूर्वकालीन तपस्व्यांप्रमाणे जंगलातील फळामुळांवर निर्वाह करून न राहता लोकांनी दिलेल्या भिक्षेवर अवलंबून राहत; आणि त्या काळी निर्मासमत्स्य भिक्षा मिळणे अशक्य होते. ब्राह्मण यज्ञांत हजारो प्राण्यांचा वध करून त्यांचे मांस आजूबाजूच्या लोकांना वाटीत. खेड्यातील लोक देवतांना प्राण्यांचे बलिदान करून त्यांचे मांस खात. याशिवाय खाटीक लोक भर चौकात गाईला मारून तिचे मांस विकावयास बसत. अशा परिस्थितीत पक्व अन्नाच्या भिक्षेवर अवलंबून राहणा-या श्रमणांना मांसाशिवाय भिक्षा मिळणे कसे शक्य होते?

जैनांच्या समजुतीप्रमाणे पृथ्वीकाय, अप्काय, वायुकाय, अग्निकाय, वनस्पतिकाय, आणि त्रसकाय असे सहा जीवभेद आहेत (पृ. १८१). पृथ्वीकाय म्हणजे पृथ्वीपरमाणु त्याचप्रमाणे जल, वायु आणि अग्नि यांचे परमाणु सजीव आहेत. वनस्पतिकाय म्हणजे वृक्षादिक वनस्पति. ते सजीव आहेत, हे सांगावयाला नकोच. त्रसकाय म्हणजे किडामुंगीपासून तहत हत्तीपर्यंत लहानमोठे सर्व प्राणी. या सहा कायांपैकी कोणत्याही प्राण्याची हिंसा करणे जैन श्रमण पाप समजतात. म्हणून ते रात्रीचा दिवा लावीत नसत, थंड पाणी पीत नसत आणि पृथ्वीपरमाणुआदिकांचा संहार होऊ नये, याबद्दल फार काळजी घेत.

परंतु जैन उपासक शेत नांगरीत, धान्य पेरीत आणि ते शिजवून अन्न तयार करीत. या कृत्यात पृथ्वी, अप्, तेज, वायु, वनस्पति आणि त्रस या सहाही प्रकारच्या जीवांचा संहार होत असे. पृथ्वी नांगरीत असता पृथ्वीपरमाणुच नष्ट होतात असे नव्हे, तर किडे, मुंग्या इत्यादिक बारीकसारीक लाखो प्राणी मरतात. धान्य शिजवताना वनस्पतिकाय, अप्काय, अग्निकाय व वायुकाय या सर्व प्राण्यांचा उच्छेद होतो. असे असता त्या अन्नाची भिक्षा जैन साधु घेतातच. तर मग एखाद्या जैन उपासकाने तयार केलेली मांसभिक्षा घेण्याला प्राचीन जैन श्रमणांना हरकत कोणती होती? आणि त्या कृत्याचे समर्थन त्यांनी आमगंधसुत्ताच्या धर्तीवरच केले नसते काय?

8 . गोमांसाहाराविरुद्ध चळवळ

आता मांसाहाराविरुद्ध चळवळ कशी सुरू झाली याविषयी थोडक्यात विचार करू. सर्वांत प्रथम गोमांसाहाराच्या निषेधाबद्दल बौद्धांनीच चळवळ सुरू केली असावी. नवव्या प्रकरणात (पृ. १८७-१८८) गायींची योग्यता दर्शविणा-या ब्राह्मण-धम्मिक-सुत्तांतील दोन गाथा दिल्या आहेत; त्याशिवाय ह्या गाथा पाहा.

न पादा न विसाणेन नास्सु हिंसन्ति केनचि |

गावो एळकसमाना सोरता कुम्भदूहना |

ता विसाणे गहेत्वान राजा सत्थेन घातयि ||

ततो च देवा पितरो इन्दो असुरक्खसा |

अधम्मो इति पक्कन्दुं यं सत्थं निपती गवे ||

‘मेंढराप्रमाणे नम्र आणि घडाभर दूध देणा-या गाई पायाने, शिंगाने किंवा दुस-या कोणत्याही अवयवाने कोणाचीही हिंसा करीत नाहीत. त्यांना (ब्राह्मणाच्या सांगण्यावरून) इक्ष्वाकु राजाने शिंगांना धरून ठार मारले. तेव्हा गाईंवर शस्त्रप्रहार झाल्यामुळे देव, पितर, इंद्र, असुर आणि राक्षस अधर्म झाला म्हणून आक्रोश करते झाले!’

9 . पुष्कळ काळ ब्राह्मणांनी गोमांस सोडले नाही

बौद्धांच्या आणि जैनांच्या प्रयत्नाने गोमांसाहाराचा निषेध होत गेला, तरी ब्राह्मण लोकांत त्याची मनाई होण्यास बरीच शतके लागली. प्रथमत: यज्ञासाठी दीक्षा घेतलेल्याने गोमांस खाऊ नये अशी एक शक्कल निघाली.

“स धेन्वै चानडुहश्च नाश्नीयात् | धेन्वनडुहौ वाऽइदं सर्वं बिभृतस्ते देवा अब्रु वन् धेन्वनडुहौ वाऽइदं सर्वं बिभृतो हन्त यदन्येषां वयसां वीर्यं तद्धेन्वनडुहयोर्दधामेति... तस्माद्धेन्वनडुहयोर्नाश्नीयात् तदु होवाच याज्ञवल्क्योऽश्नाम्येवाहं मांसलं चेद्भवतीति ||”

‘गाई आणि बैल खाऊ नयेत. गाई आणि बैल हे सर्व धारण करतात. ते देव म्हणाले, गाई आणि बैल हे सर्व धारण करतात, अतएव दुस-या जातीच्या पशूचे जे वीर्य ते गाई अणि बैलामध्ये घालू या ... म्हणून गाईबैल खाऊ नयेत. पण याज्ञवल्क्य म्हणतो, शरीर मांसल होते, म्हणून मी (हे मांस) खाणारच.’ (शतपथ ब्राह्मण ३|१|२|२१).

हा वाद यज्ञशाळेपुरताच होता. कित्येकांचे म्हणणे होते की दीक्षिताने यज्ञशाळेत प्रवेश केल्यावर गोमांस खाऊ नये. परंतु याज्ञवल्क्याला हे मत पसंत नव्हते. शरीर पुष्ट होत आहे म्हणून ते वर्ज्य करण्यास तो तयार नव्हता. इतर प्रसंगी गोमांसाहार करण्यासंबंधाने ब्राह्मणांमध्ये वाद मुळीच नव्हता. इतकेच नव्हे तर कोणी तसाच प्रतिष्ठित पाहुणा आला असता मोठा बैल मारून त्याचा आदरसत्कार करण्याची पद्धति फार प्रसिद्ध होती. एक तेवढ्या गौतमसूत्रकाराने गोमांसाहाराचा निषेध केला आहे. पण त्याला देखील मधुपर्कविधि पसंत असावा. ब्राह्मणांमध्ये हा विधि भवभूतीच्या कालापर्यंत तुरळक चालू होता, असे वाटते. उत्तररामचरिताच्या चौथ्या अंकाच्या आरंभी सौधातकि आणि दण्डायन यांचा संवाद आहे, त्यापैकी थोडासा भाग असा-

सौधातकि- काय वसिष्ठ!

दण्डयन-   मग काय?

सौ.-         मला वाटले होते की, हा कोणी तरी वाघासारखा असावा.

द.-          काय म्हणतोस?

सौ-         त्याने आल्याबरोबर ती आमची बिचारी कपिला कालवड झट्दिशी गट्ट करून टाकली !

द.-         मधुपर्कविधि समांस असला पाहिजे, ह्या धर्मशास्त्राच्या आज्ञेचा बहुमान करून गृहस्थ लोक श्रोत्रिय पाहुणा आला असता कालवड किंवा मोठा बैल मारून त्याचे मास रांधतात. कारण धर्मसूत्रकारांनी तसाच उपदेश केला आहे.

भवभूतीचा काळ सातव्या शतकात गणला जातो. त्या काळी आजच्या सारखा गोमांसभक्षणाचा अत्यंत निषेध असता, तर वसिष्ठाने कालवड खाऊन टाकल्याचा उल्लेख त्याला आपल्या नाटकात करता आला नसता. आजला असा संवाद नाटकात घातला, तर ते नाटक हिंदुसमाजाला कितीसे प्रिय होईल?

10 . प्राणिवधाविरुद्ध अशोकाचा प्रचार

प्राणिहिंसेविरुद्ध प्रचार करणारा पहिला ऐतिहासिक राजा म्हटला म्हणजे अशोक होय. त्याचा पहिलाच शिलालेख असा आहे-

‘ही धर्मलिपि देवांचा प्रिय प्रियदर्शिराजाने लिहविली. ह्या राज्यात कोणत्याही प्राण्याला मारून होमहवन करू नये आणि जत्रा करू नये. कारण जत्रेत देवांचा प्रिय प्रियदर्शिराजा पुष्कळ दोष पाहतो. काही जत्रा देवांच्या प्रिय प्रियदर्शिराजाला पसंत आहेत. पूर्वी प्रियदर्शिराजाच्या पाकशाळेत स्वयंपाकासाठी हजारो प्राणी मारले जात असत. जेव्हा हा धर्मलेख लिहिला, तेव्हापासून दोन मोर आणि एक मृग असे तीनच प्राणी मारले जातात. तो मृगहि रोज मारण्यात येत नाही. आणि पुढे हे तीन प्राणी देखील मारण्यात येणार नाहीत.’

ह्या लेखात अशोकाने गाईबैलांचा उल्लेख केला नाही. यावरून असे अनुमान करता येते की, ब्राह्मणेतर वरिष्ठ जातीत त्या काळी गोमांसाहार जवळ जवळ बंदच पडला होता. इतकेच नव्हे, तर अशोकाने अन्नासाठी देखील कोणत्याहि प्राण्याचा वध करू नये, असा प्रचार चालविला. समाज या शब्दाचे भाषांतर मी जत्रा असे केले आहे. ते जरी तंतोतंत नसले तरी साधारणपणे ग्राह्य वाटले. आजकाल जशा महाराष्ट्रात जत्रा किंवा उत्तर हिंदुस्थानात मेळे होतात, तशा प्रकारचे अशोकाच्या वेळी समाज होत असावेत त्यांत देवदेवतांना प्राण्यांचे बळी देऊन मोठा उत्सव करणारे समाज अशोकाला पसंत नव्हते. ज्यांत प्राण्यांचा बळी देण्यात येत नसे, अशा जत्रा भरवण्यास त्याची हरकत नव्हती. यज्ञात काय, किंवा जत्रेत काय, प्राण्यांचे बलिदान होऊ नये, यावर त्याचा मुख्य कटाक्ष होता.

11 . आमचे पूर्वज निवृत्तमांस नव्हते

आजकाल यज्ञयाग बंद पडल्यासारखेच झाले आहेत. पण जत्रांतील बलिदान अनेक ठिकाणी अद्यापिही चालू आहे. तथापि इतर कोणत्याही देशापेक्षा हिंदुस्थानचे लोक अधिक निवृत्तमांस आहेत. या कामी जैनांचा आणि बौद्धांचाच धर्मप्रचार कारणीभूत झाला, यात शंका नाही. अर्थात् आजला आम्ही शाकाहारी आहोत, म्हणून आमचे पूर्वज तसेच शाकाहारी होते, असे प्रतिपादन करणे वस्तुस्थितीला धरून नाही.

12 . चिनात डुकरांचे महत्त्व

आता खास डुकराच्या मांसासंबंधी चार शब्द लिहिणे योग्य वाटते. प्राचीन कालापासून चिनी लोक डुकराला संपत्तीचे लक्षण समजतात. त्यांची लिपि आकारचिन्हांनी बनलेली आहे. ह्या चिन्हांच्या मिश्रणाने भिन्न भिन्न शब्द तयार करता येतात. उदाहरणार्थ, माणसाचे चिन्ह काढून त्यावर तलवारीचे चिन्ह काढले, तर त्याचा अर्थ शूर असा होतो. घराच्या चिन्हाखाली मुलाचे चिन्ह काढले, तर त्याचा अर्थ अक्षर, स्त्रीची दोन चिन्हे काढली, तर भांडण आणि डुकराचे चिन्ह काढले, तर त्याचा अर्थ संपत्ति असा होतो. म्हणजे घरात डुकर असणे हे संपत्तीचे लक्षण आहे, असे प्राचीन चिनी लोक समजत; आणि सध्या देखील चिनात डुकराला तेवढेच महत्त्व आहे.

13 . प्राचीन हिंदु डुकराला संपत्तीचा भाग मानीत

हिंदुस्थानात डुकराला इतके महत्त्व आले नाही, तरी संपत्तीचा तो एक विभाग समजत असत. अरियपरियेंसनसुत्तात (मज्झिमनि. २६) ऐहिक संपत्तीची अनित्यता वर्णिली आहे, ती अशी-

“किं च भिक्खवे जातिधम्मं? पुत्तभरियं भिक्खवे जातिधम्मं | दासीदासं... अजेळकं... कुक्कुटसूकरं... हत्तिगवास्सवळवं... जातरूपरजतं जातिधम्मं |”

म्हणजे हत्ती, गाई, घोडे वगैरे संपत्तीतच कोंबडी आणि डुकरे यांचा देखील समावेश होत असे. असे असता डुकराच्या मांसासंबंधी इतका तिटकारा कसा उद्भवला? यज्ञयागात मारल्या जाणा-या प्राण्यांत डुकराचा उल्लेख पालि वाड्‍ःमयात सापडत नाही. अर्थात् बुद्धसमकाली हा प्राणी अमेध्य होता. पण तो अभक्ष्य होता, याला काही आधार सापडत नाही. तसे असते तर क्षत्रियांच्या घरच्या संपत्तीत त्याचा समावेश झाला नसता. सूकरमांसाचा निषेध प्रथमतः धर्मसूत्रांत सापडतो. आणि पुढे त्याचाच अनुवाद मनुस्मृति वगैरे स्मृतिग्रंथात येतो. परंतु अरण्यसूकराचा कधीच निषेध झाला नाही. त्याचे मांस पवित्र गणले गेले आहे.

14 . बुद्धावर अमिताहाराचा खोटा आरोप

बुद्ध भगवंताने परिनिर्वाणापूर्वी खाल्लेला पदार्थ सूकरमांस होता, असे गृहीत धरून चाललो, तरी तो त्याने अजीर्ण होईपर्यंत खाल्ला व त्यामुळे तो मरण पावला, हे जे कुत्सित टीकाकारांचे म्हणणे, ते मात्र सपशेल खोटे आहे. गोतम बुद्धाने अमित आहार केल्याचे उदाहरण किंवा दाखला कोठेच सापडत नाही. तेव्हा याच प्रसंगी त्याने हा पदार्थ प्रमाणाबाहेर खाल्ला, असे म्हणणे निव्वळ खोडसाळपणाचे आहे. बुद्ध भगवान त्या प्रसंगापूर्वी तीन महिने वैशाली येथे भयंकर आजारी झाला होता आणि त्यामुळे त्याच्या अंगात त्राण राहिले नव्हते. चुंदाने दिलेले जेवण केवळ त्याच्या परिनिर्वाणाला निमित्तकारण झाले. त्यायोगे चुंद लोहारावर लोकांनी भलताच आळ आणू नये म्हणून परिनिर्वाणापूर्वी भगवान आनंदाला म्हणाला, “आनंदा, चुंद लोहाराला कोणी म्हणेल की, हे चुंदा, तथागत तू दिलेली भिक्षा घेऊन परिनिर्वाण पावला, यात तुझी मोठी हानि आहे. असे म्हणून जर त्याने चुंद लोहाराला वाईट वाटू दिले, तर तुम्ही चुंदाचे दौर्मनस्य याप्रमाणे नष्ट करा. त्याला म्हणा, चुंदा, ज्या तुझा पिंडपात खाऊन तथागत परिनिर्वाण पावला, त्या तुला ते तुझे दान खरोखरच लाभदायक आहे. आम्ही तथागताकडून ऐकले आहे की, इतर भिक्षांपेक्षा तथागताला मिळालेल्या दोन भिक्षा अधिक फलदायक व अधिक प्रशंसनीय आहेत. त्या कोणत्या? जी भिक्षा घेऊन तथागत संबोधिज्ञान मिळवतो ती, आणि जी भिक्षा घेऊन परिनिर्वाण पावतो ती. चुंदाने जे कृत्य केले आहे, ते आयुष्य, वर्ण, सुख, यश, स्वर्ग आणि स्वामित्व देणारे आहे, असे समजावे. आनंदा, याप्रमाणे चुंदाचे दौर्मनस्य घालवावे.”

15 . तळटीपा

१. म्हणजे १९३८ साली.

२. बुद्धलीलासारसंग्रह, पृ.२७१-२८१ पाहा.

३. ह्या आमगंध सुत्तातील उपदेशाची तुलना ख्रिस्ताच्या खाली दिलेल्या वचनाशी करावी. ‘‘जे तोंडात जाते, ते माणसाला विटाळवीत नाही; पण जे तोंडातून निघते, ते विटाळविते.” (म्याथ्यू १५|११).

४.  ‘काककंकगृध्रश्येना जलजरक्तपादतुण्डा ग्राम्यकुकुटसूकरा:|’ गौतमसूत्र, अ. ८|२९.‘एकखुरोष्ट्रगवयग्रामसूकरसरभगवाम् |’ आपस्तम्बधर्मसूत्र प्रश्न १, पटल ५, खण्डिका १७|२९.

५.  मनुस्मृति, अ. ५|१९.

६.  मनुस्मृति, अ. ३|२७०.

 

संदर्भ