ठळक मुद्दे
- बुद्धाच्या मुखचर्येवरील प्रसन्नता शेवटपर्यंत कायम होती.
- बुद्ध भिक्षापात्रात सर्व जातींच्या लोकांकडून मिळालेले शिजवलेले अन्न एकत्रित घेऊन गावाबाहेर भोजन करीत असे.
- बुद्ध भोजन करून थोड्या विश्रांतीनंतर ध्यान करून संध्याकाळी पुन्हा प्रवास करी आणि रात्री कोठे तरी एखाद्या देवालयात, धर्मशाळेत किंवा झाडाखाली राही.
- बुद्धाच्या शय्येला सिंहशय्या म्हणतात.
- बुद्ध भगवंताचा आहार अत्यंत नियमित होता.
- बुद्ध भिक्षुसंघासह सावकाश चारिका करीत.
- श्रमणांची गुरुकुले प्रवास करता करताच शिक्षण घेत आणि सामान्य जनात मिसळून धर्मोपदेश करीत.
सारांश
बुद्धाच्या मुखचर्येवरील प्रसन्नता शेवटपर्यंत कायम होती. बुद्ध भगवान पहाटेला उठत असे आणि त्या वेळी ध्यान करी, किंवा आपल्या वसतिस्थानाच्या आजुबाजूला चंक्रमण करी. सकाळच्या प्रहरी तो गावात भिक्षाटनासाठी जाई. त्याच्या भिक्षापात्रात शिजवलेल्या अन्नाची सर्व जातींच्या लोकांकडून मिळालेली जी भिक्षा एकत्रित होई, ती घेऊन तो गावाबाहेर येत असे आणि तेथे भोजन करून थोड्या विश्रांतीनंतर ध्यानस्थ बसे. संध्याकाळी पुन्हा तो प्रवास करी. रात्री कोठे तरी एखाद्या देवालयात, धर्मशाळेत किंवा झाडाखाली राही.
रात्रीच्या तीन यामांपैकी पहिल्या यामात भगवान ध्यान करी, किंवा चंक्रमण करी. मध्यम यामात आपली संघाटी चतुर्गुणित दुडून हांतरीत असे आणि उशीला हात घेऊन उजव्या कुशीवर उजव्या पायावर डावा पाय ठेवून मोठ्या सावधगिरीने निजत असे. बुद्धाच्या ह्या शय्येला सिंहशय्या म्हणतात.
बुद्ध भगवंताचा आहार अत्यंत नियमित होता. कधी खाण्यापिण्यात त्याने अतिरेक केला नाही. चारिका म्हणजे प्रवास. बुद्ध सावकाश चारिका करीत. त्याची चारिका भिक्षुसंघासहवर्तमान होत असे. श्रमणांची गुरुकुले अशी मुळीच नव्हती. ते प्रवास करता करताच शिक्षण घेत आणि सामान्य जनात मिसळून धर्मोपदेश करीत. बुद्ध भगवंताच्या भिक्षुसंघात उत्तम शिस्त होती. जेव्हा बुद्ध भगवान भिक्षुसंघाला उपदेश करीत नसे, तेव्हा सर्व भिक्षु अत्यंत शांततेने वागत. बुद्ध शीलवान होता. तो यथार्थतया धर्मोपदेश करीत असे. तो प्रज्ञावान होता. भिक्षूंपैकी कोणी आजारी असला, तर बुद्ध भगवान दुपारी ध्यानसमाधि आटपून त्याच्या समाचाराला जात असे. भगवान आजारी असल्याचा उल्लेख फार थोडया ठिकाणी सापडतो.
पारिभाषिक शब्द
प्रसन्न मुखकान्ति , दिनचर्या , सिंहशय्या , मिताहार , चारिका , फिरती गुरूकुले , आर्यमौन , वर्षावास , एकांतवास
1 . प्रसन्न मुखकान्ति
गोतमाच्या बोधिसत्त्वावस्थेतील, म्हणजे त्याच्या गृहवासातील आणि तपस्याकालातील चर्येचा विचार चवथ्या व पाचव्या प्रकरणात करण्यात आलाच आहे. आता ह्या प्रकरणात बुद्धत्वप्राप्तीपासून परिनिर्वाणापर्यंत त्याच्या दिनचर्येचे दिग्दर्शन करण्याचे योजिले आहे.
तत्त्वबोध झाल्यानंतर बुद्ध भगवंताने बोधिवृक्षाखालीच आपला पुढील जीवनक्रम आखला. तपश्चर्या तर त्याने सोडून दिलीच होती; आणि पुन्हा कामोपभोगांकडे वळण्याची त्याला वासना राहिली नाही. तेव्हा शरीराच्छादनापुरते वस्त्र व क्षुधाशमनापुरते अन्न ग्रहण करून अवशेष आयुष्य बहुजनहितार्थ लावण्याचा त्याने बेत केला. ह्या निश्चयाचा बुद्धाच्या मुखकान्तीवर कसा परिणाम झाला, याचे वर्णन मज्झिमनिकायातील अरियपरियेसनसुत्तात आणि विनयाच्या महावग्गात आढळते.
बुद्ध भगवान पंचवर्गीयांना उपदेश करण्याच्या उद्देशाने गयेहून वाराणसीला चालला असता वाटेत त्याला उपक नावाचा आजीवक पंथातील श्रमण भेटला आणि म्हणाला, “आयुष्मान् गोतमा, तुझा चेहरा प्रसन्न आणि अंगकान्ति तेजस्वी दिसत आहे. तू कोणत्या आचार्याचा शिष्य आहेस?”
भ.- माझा धर्ममार्ग मी स्वत:च शोधून काढला आहे.
उपक - पण तू अरहन्त झाला आहेस काय? तुला जिन म्हणता येईल काय?
भ.- हे उपका, मी सर्व पापकारक वृत्तींना जिंकले आहे, म्हणून जिन आहे.
उपकाला दिसलेली बुद्धाच्या मुखचर्येवरील प्रसन्नता शेवटपर्यंत कायम होती, असे समजण्यास हरकत नाही.
2 . साधारण दिनचर्या
बुद्ध भगवान पहाटेला उठत असे आणि त्या वेळी ध्यान करी, किंवा आपल्या वसतिस्थानाच्या आजुबाजूला चंक्रमण करी. सकाळच्या प्रहरी तो गावात भिक्षाटनासाठी जाई. त्याच्या भिक्षापात्रात शिजवलेल्या अन्नाची सर्व जातींच्या लोकांकडून मिळालेली जी भिक्षा एकत्रित होई, ती घेऊन तो गावाबाहेर येत असे आणि तेथे भोजन करून थोड्या विश्रांतीनंतर ध्यानस्थ बसे. संध्याकाळी पुन्हा तो प्रवास करी. रात्री कोठे तरी एखाद्या देवालयात, धर्मशाळेत किंवा झाडाखाली राही.
रात्रीच्या तीन यामांपैकी पहिल्या यामात भगवान ध्यान करी, किंवा चंक्रमण करी. मध्यम यामात आपली संघाटी चतुर्गुणित दुडून हांतरीत असे आणि उशीला हात घेऊन उजव्या कुशीवर उजव्या पायावर डावा पाय ठेवून मोठ्या सावधगिरीने निजत असे.
3 . सिंहशय्या
बुद्धाच्या ह्या शय्येला सिंहशय्या म्हणतात. अंगुत्तरनिकायातील चतुक्कनिपातात (सुत्त २४४) चार प्रकारच्या शय्या वर्णिल्या आहेत. १) प्रेतशय्या, ही उताणा निजणा-या माणसांची, २) कामभोगिशय्या, कामोपभोगांत सुख मानणारे लोक बहुधा डाव्या कुशीवर झोपतात, म्हणून अशा शय्येला कामोपभोगिशय्या म्हणतात. ३) सिंहशय्या, उजव्या पायावर डावा पाय जरा कलता ठेवून आणि मनात मी अमुक वेळी उठणार असे स्मरण करून मोठ्या सावधपणे उजव्या कुशीवर झोपणे, याला सिंहशय्या म्हणतात. ४) तथागतशय्या, म्हणजे चार ध्यानाची समाधि.
यांपैकी शेवटच्या दोन शय्या बुद्ध भगवंताला पसंत असत. म्हणजे तो रात्रीच्या प्रहरी एक तर ध्यान करी, किंवा मध्यम यामात ही सिंहशय्या पतकरी. पुन्हा रात्रीच्या शेवटच्या यामात तो चंक्रमण किंवा ध्यान करित असे.
4 . मिताहार
बुद्ध भगवंताचा आहार अत्यंत नियमित होता. कधी खाण्यापिण्यात त्याने अतिरेक केला नाही. आणि हा उपदेश तो पुनःपुनः भिक्षूंना करी. भगवान आरंभी रात्री जेवीत असे, असे मज्झिमनिकायातील (नं. ७०) कीटागिरिसुत्तावरून दिसून येते. त्यात भगवान म्हणतो, “भिक्षुहो, मी रात्रीचे जेवण सोडले आहे, आणि त्यामुळे माझ्या शरीरात व्याधि कमी झाली आहे, जाड्य कमी झाले आहे, अंगी बळ आले आहे आणि चित्ताला स्वास्थ्य मिळत आहे. भिक्षुहो, तुम्ही देखील याप्रमाणे वागा. तुम्ही जर रात्रीचे जेवण सोडले, तर तुमच्या शरीरात व्याधि कमी होईल, जाड्य कमी होईल, अंगी शक्ति येईल आणि तुमच्या चित्ताला स्वास्थ्य मिळेल.”
तेव्हापासून भिक्षूंची दुपारचे बारा वाजण्यापूर्वी जेवण्याची वहिवाट सुरू झाली, आणि बारा वाजल्यानंतर जेवणे निषिद्ध मानण्यात येऊ लागले.
5 . चारिका
चारिका म्हणजे प्रवास. ती दोन प्रकारची, शीघ्र चारिका आणि सावकाश चारिका. यासंबंधाने अंगुत्तरनिकायाच्या पंचकनिपातात तिस-या वग्गाच्या आरंभी सुत्त आहे ते असे-
भगवान म्हणतो, “भिक्षुहो, शीघ्र चारिकेमध्ये हे पाच दोष आहेत. ते कोणते? पूर्वी जे धर्मवाक्य ऐकले नसेल, ते ऐकू शकत नाही; जे ऐकले असेल, त्याचे संशोधन होत नाही; काही गोष्टींचे पूर्ण ज्ञान मिळत नाही; त्याला कधी कधी भयंकर रोग जडतो; आणि मित्र मिळत नाहीत. भिक्षुहो, शीघ्र चारिकेत हे पाच दोष आहेत.”
“भिक्षुहो, सावकाश चारिकेत हे पाच गुण आहेत. ते कोणते? पूर्वी जे धर्मवाक्य ऐकले नसेल, ते ऐकू शकतो; जे ऐकले असेल, त्याचे संशोधन होते; काही गोष्टींचे पूर्ण ज्ञान मिळते; त्याला भयंकर रोग होत नाहीत; आणि मित्र मिळतात. भिक्षुहो, सावकाश चारिकेत हे पाच गुण आहेत.”
बुद्ध भगवंताने बोधिसत्त्वावस्थेतील हा आपला अनुभव सांगितला असला पाहिजे. त्वरित प्रवास करण्यापासून फायदा होत नसून सावकाश प्रवास करण्यात फायदा होतो, हा त्याचा स्वतःचा अनुभव होता. अशा रीतीने सावकाश प्रवास करूनच इतर श्रमणांकडून त्याने ज्ञान संपादन केले आणि शेवटी आपला नवा मध्यम मार्ग शोधून काढला.
6 . भिक्षुसंघासह चारिका
बुद्धत्व प्राप्त झाल्यावर भगवंताने बुद्धगयेहून काशीपर्यंत प्रवास केला आणि तेथे पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करून त्यांचा संघ स्थापला. त्यांना काशीला सोडून भगवान एकटाच परत राजगृहात गेला, अशी कथा महावग्गांत वर्णिली आहे. पण हे पाचही भिक्षु त्या चातुर्मासानंतर भगवंताबरोबर होते, असे समजण्याला बळकट आधार आहे. राजगृह येथे सारिपुत्त आणि मोग्गल्लान हे दोघे प्रसिद्ध परिव्राजक बुद्धाचे शिष्य झाल्यानंतर बौद्ध संघाच्या भरभराटीला आरंभ झाला. आणि तेव्हापासून बुद्ध भगवंताबरोबर बहुधा लहानमोठा भिक्षुसंघ राहत असे, व त्याची चारिका भिक्षुसंघासहवर्तमान होत असे. असे क्वचितच प्रसंग आहेत की, भगवान भिक्षुसंघाला सोडून एकटा राहिला.
7 . फिरती गुरूकुले
बुद्धसमकालीन सगळे श्रमणसंघ व त्यांचे पुढारी अशाच रीतीने प्रवास करीत असत. बुद्धापूर्वी आणि बुद्धसमकाली ब्राह्मणांची गुरुकुले होती. त्या ठिकाणी वरिष्ठ जातीचे तरुण जाऊन अध्ययन करीत असत. परंतु, त्या गुरुकुलांचा फायदा बहुजनसमाजाला फार थोडा मिळे; ब्राह्मण वेदाध्ययन करून बहुधा राजाश्रय धरीत; क्षत्रिय धनुर्विद्या शिकून राजाच्या नोकरीत दाखल होत, आणि जीवक कौमारभृत्यासारखे तरुण आयुर्वेद शिकून वरिष्ठ जातीच्या उपयोगी पडत व अखेरीस राजाश्रय मिळविण्याची खटपट करीत. परंतु श्रमणांची गुरुकुले अशी मुळीच नव्हती. ते प्रवास करता करताच शिक्षण घेत आणि सामान्य जनात मिसळून धर्मोपदेश करीत. येणेकरून बहुजनसमाजावर त्यांचे वजन फार पडले.
8 . भिक्षुसंघात शिस्त
बुद्ध भगवंताच्या भिक्षुसंघात उत्तम शिस्त होती. भिक्षूंनी अव्यवस्थितपणे वागणे त्याला मुळीच पसंत नव्हते. यासंबंधी चातुमसुत्तात (मज्झिमनिकाय नं. ६७) आलेली कथा येथे थोडक्यात देणे योग्य वाटते.
भगवान चातुमा नावाच्या शाक्याच्या गावी आमलकीवनात राहत होता. त्या वेळी सारिपुत्त आणि मोग्गल्लान पाचशे भिक्षूंना बरोबर घेऊन चातुमेला आले. चातुमेतील रहिवासी भिक्षूंच्या आणि सारिपुत्त मोग्गल्लानाबरोबर आलेल्या भिक्षूंच्या परस्परांशी आगतस्वागतादिक गोष्टी सुरू झाल्या. बसण्या उठण्याच्या जागा कोठे, पात्रचीवरे कोठे ठेवावी इत्यादिक विचारपूस करीत असता गडबड होऊ लागली. तेव्हा भगवान आनंदाला म्हणाला, “कोळी मासे पकडताना जशी आरडाओरड होते, तशी येथे का चालली आहे?”
आनंद म्हणाला, “भदंत, सारिपुत्त आणि मोग्गल्लान यांजबरोबर आलेल्या भिक्षूंच्या गोष्टी चालल्या आहेत. त्यांच्या राहण्याच्या आणि पात्रचीवरे ठेवण्याच्या जागेसंबंधाने गडबड होत आहे.”
भगवंताने आनंदाला पाठवून सारिपुत्त मोग्गल्लानाला व त्या भिक्षूंना बोलावून आणले, आणि त्यांनी आपल्याजवळ न राहता तेथून निघून जावे असा दंड केला. ते सर्व वरमले, आणि बुद्धाला नमस्कार करून तेथून जावयास निघाले. चातुमेतील शाक्य त्या वेळी आपल्या संस्थागारात काही कामानिमित्त जमले होते. आजच आलेले भिक्षु परत जात आहेत, हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले, आणि ते का जातात याची त्यांनी विचारपूस केली. ‘बुद्ध भगवंताने आम्हास दंड केल्यामुळे आम्ही येथून जात आहोत,’ असे त्या भिक्षूंनी शाक्यांना सांगितले. तेव्हा चातुमेतील शाक्यांनी त्या भिक्षूंस तेथेच राहावयास सांगितले आणि बुद्ध भगवंताला विनंती करून त्यांना क्षमा करविली.
9 . धार्मिक संवाद किंवा आर्यमौन
सदोदित मौन धारण करून राहणारे मुनि बुद्धसमकाली पुष्कळ होते. मुनि शब्दावरूनच मौन शब्द साधला आहे. ही तपश्चर्या बुद्धाला पसंत नव्हती. “अविद्वान अडाणी मनुष्य मौनधारणाने मुनि होत नाही.”१ तथापि काही प्रसंगी मौन धारण करणे योग्य आहे, असे भगवंताचे म्हणणे होते. अरियपरियेसन सुत्तात (मज्झिमनिकाय नं.२६) भगवान म्हणतो, “भिक्षुहो, एक तर तुम्ही धार्मिक चर्चा करावी, किंवा आर्य मौन धरावे.”
10 . शांततेचा दाखला
जेव्हा बुद्ध भगवान भिक्षुसंघाला उपदेश करीत नसे, तेव्हा सर्व भिक्षु अत्यंत शांततेने वागत; गडबड मुळीच होत नसे. याचा एक उत्कृष्ट नमुना दीघनिकायातील सामञ्ञफलसुत्तात सापडतो. तो प्रसंग असा-
भगवान बुद्ध राजगृह येथे जीवक कौमारभृत्याच्या आम्रवनात मोठ्या भिक्षुसंघासह राहत होता. त्या समयी कार्तिकी पौर्णिमेच्या रात्री अजातशत्रु राजा आपल्या अमात्यासहवर्तमान प्रासादाच्या वरच्या मजल्यावर बसला होता. तो उद्गारला, “किती सुंदर रात्र आहे ही! असा कोणी श्रमण किंवा ब्राह्मण येथे आहे काय, की जो आपल्या उपदेशाने आमचे चित्त प्रसन्न करील?” त्या वेळी पूरण कस्सप, मक्खलि गोसाल, अजित केसकंबल, पकुध कच्चायन, संजय बेलट्ठपुप्त आणि निगण्ठ नाथपुत्त हे प्रसिद्ध श्रमण आपापल्या संघांसह राजगृहाच्या आसपास राहत होते. अजातशत्रूच्या अमात्यांनी अनुक्रमे त्यांची स्तुति करून त्यांच्या भेटीला जाण्यासंबंधाने राजाचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. परंतु अजातशत्रु काही न बोलता चुप्प राहिला.
त्या वेळी जीवक कौमारभृत्य तेथे होता. त्याला अजातशत्रु म्हणाला, “तु उगा का
बसलास?”
त्या वर जीवक महणाला, “महाराज, हे बुद्ध भगवान आमच्या आम्रवनात मोठ्या भिक्षुसंघासह राहत आहे. आज महाराजांनी त्याची भेट घ्यावी. तेणेकरून आपले चित्त प्रसन्न होईल.”
अजातशत्रूने वाहने सिद्ध करण्यासाठी जीवकाला आज्ञा केली. त्याप्रमाणे जीवकाने सर्व तयारी केल्यावर अजातशत्रु राजा आपल्या हत्तीच्या अंबारीत बसून आणि अंत:पुरातील स्त्रियांना निरनिराळ्या हत्तीणींवर बसवून मोठ्या परिवारासह बुद्धदर्शनाला निघाला.
जीवकाच्या आम्रवनाजवळ आल्यावर अजातशत्रु भयभीत होऊन जीवकाला म्हणाला, “बा जीवका, मला तू ठकवीत नाहीस ना? मला माझ्या शत्रूंच्या स्वाधीन करण्याचा तुझा बेत नाही ना? येथे येवढा मोठा भिक्षुसमुदाय आहे म्हणतोस, पण शिंक, खोकला किंवा दुसरा कोणताच आवाज ऐकू येत नाही!”
जीवक- महाराज, भिऊ नका, भिऊ नका! आपणाला मी ठकवीत नाही, किंवा शत्रूंच्या स्वाधीन करीत नाही. पुढे व्हा, पुढे व्हा. समोर मंडलमालात२ दिवे जळताहेत. (अजातशत्रूचे वैरी दिवे पेटवून बसतील हे संभवनीय नाही, असा याचा भावार्थ).
जेथपर्यंत हत्तीवरून जाणे शक्य होते, तेथवर जाऊन अजातशत्रु खाली उतरला, आणि जीवकाच्या आम्रवनातील मंडलमालाच्या द्वारावर पायी चालत गेला, व तेथे उभा राहून जीवकाला म्हणाला, “भगवान कोठे आहे?”
जीवक- महाराज, मंडलमालाच्या मधल्या खांबाजवळ पूर्वेला तोंड करून भगवान बसला आहे.
अजातशत्रु भगवंताजवळ जाऊन उभा राहिला आणि मौन धारण करून शांतपणे बसलेल्या भिक्षुसंघाकडे पाहून उद्वारला, “या संघात जी शांति नांदत आहे, त्या शांतीने (माझा) उदयभद्र कुमार समन्वित होवो! अशी शांति उदयभद्र कुमाराला लाभो!”
भगवान म्हणाला, “महाराज, तुम्ही आपल्या प्रेमाला अनुसरूनच बोललात.”
यानंतर अजातशत्रूचा आणि भगवंताचा बराच मोठा संवाद आहे. तो येथे देण्याचे कारण नाही. संघाबरोबर भगवान राहत असे, तेव्हा भिक्षुसमुदायांत कोणतीही गडबड होत नसे, एवढे दाखविण्यासाठीच हा प्रसंग येथे दिला आहे.
11 . भिक्षुसंघाच्या शिस्तीचा प्रभाव
सकाळच्या प्रहरी भगवान भिक्षेला जात असता कधी कधी निरनिराळ्या परिव्राजकांच्या आश्रमांना भेट देई. भगवंताला पाहून परिव्राजकांचे पुढारी आपल्या शिष्यांना म्हणत, “हा श्रमण गोतम येत आहे. त्याला गडबड आवडत नाही. यास्तव तुम्ही मोठमोठ्याने गोष्टी न करता जरा शांत बसा.” अशाच एका प्रसंगाचे वर्णन मज्झिमनिकायातील महासकुलुदायिसुत्तात (नं. ७७) आहे. त्यात बुद्धाच्या दिनचर्येतील दुस-याही काही गोष्टींचा खुलासा आला असल्यामुळे त्याचा संक्षिप्त गोषवारा येथे देतो.
भगवान राजगृह येथे वेणुवनातील कलंदकनिवापात राहत होता. त्या वेळी काही प्रसिद्ध परिव्राजक मोरनिवापातील परिव्राजकांच्या आरामात राहत असत. एके दिवशी सकाळी भगवान राजगृहात भिक्षाटन करण्याला निघाला. भिक्षाटनाला जाण्याचा समय झाला नसल्यामुळे भगवान वाटेत त्या परिव्राजकांच्या आश्रमाकडे गेला. तेथे सकुलुदायि३ आपल्या मोठया परिव्राजकसभेत बसला होता; आणि ते परिव्राजक राजकथा, चोरकथा, महामात्यकथा, सेनाकथा, भयकथा, युद्धकथा इत्यादि भलत्यासलत्या४ गोष्टी मोठमोठ्याने बोलत होते. सकुलुदायीने आश्रमाच्या काही अंतरावर भगवंताला पाहिले; आणि तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “बाबांनो, मोठ्याने बोलू नका. गडबड बंद करा. हा श्रमण गोतम येत आहे त्याला हळू बोलणे आवडते, व हळू बोलण्याची तो स्तुति करतो. आम्ही गडबड केली नाही, तरच या सभेत येणे त्याला योग्य वाटेल.”
ते परिव्राजक शांत झाले. आणि भगवान सकुलुदायि परिव्राजक होता तेथे आला. तेव्हा सकुलुदायि भगवंताला म्हणाला, “भगवान, या! भगवंताचे स्वागत असो! भगवान चिरकालाने आमच्या सभेत आले. आपणासाठी हे आसन तयार केले आहे, त्यावर बसा.”
त्या आसनावर भगवान बसला आणि आपल्याजवळ बसलेल्या सकुलुदायि परिव्राजकाला म्हणाला, “उदायि, येथे तुमच्या काय गोष्टी चालल्या होत्या?”
उदायि- भगवान, आमच्या गोष्टी राहू द्या. त्या दुर्लभ नाहीत. पण मला एक गोष्ट आठवते. काही कालामागे निरनिराळ्या संप्रदायांचे श्रमणब्राह्मण एका कौतूहलशालेत५ जमले होते. त्यांच्यात प्रश्न उपस्थित झाला की, पूरण कस्सप, मक्खलि गोसाल,
अजित केसकंबल, पकुध कच्चायन, संजय बेलट्ठपुत्त, निगण्ठ नाथपुत्त आणि श्रमण गोतम, असे हे मोठमोठाल्या संघाचे पुढारी आजला राजगृहाजवळ वर्षावासासाठी राहत आहेत, हे अंगमगधांतील लोकांचे मोठे भाग्य समजले पाहिजे! पण या पुढा-यांत श्रावक ज्याचा योग्य मानमरातब राखतात, असा पुढारी कोण! आणि श्रावक त्याच्या आश्रयाखाली कसे कसे वागतात?
तेव्हा काही जण म्हणाले, “हा पूरण कस्सप प्रसिद्ध पुढारी आहे. परंतु श्रावक त्याचा मान ठेवीत नाहीत आणि त्याच्या आश्रयाखाली राहू इच्छित नाहीत. त्यांच्यात तक्रारी उत्पन्न होतात.” त्याचप्रमाणे दुस-या काही जणांनी मक्खलि गोसाल इत्यादि पुढा-यांच्या श्रावकांमध्ये कशा तक्रारी होतात, याचे वर्णन केले. अखेरीस काही जण म्हणाले, “हा श्रमण गोतम प्रसिद्ध पुढारी आहे. त्याचे श्रावक त्याचा योग्य मान राखतात, आणि त्याच्या आश्रयाखाली राहतात. एकदा गोतम मोठ्या सभेत धर्मोपदेश करीत होता. तेथे श्रमण गोतमाचा एक श्रावक खोकला. त्याला गुढग्याने दाबून दुसरा हळूच म्हणाला, ‘गडबड करू नकोस, आमचा शास्ता (गुरु) धर्मोपदेश करीत आहे.’ ज्या वेळी श्रमण गोतम शेकडो लोकांच्या परिषदेत धर्मोपदेश करतो, त्या वेळी त्याच्या श्रावकांचा शिंकेचा किंवा खोकल्याचा देखील शब्द ऐकू येत नसतो. लोक मोठ्या आदराने त्याचा धर्म ऐकण्यास तत्पर असतात... ”
भगवान- हे उदायि, माझे श्रावक माझ्याशी आदराने वागतात, व माझ्या आश्रयाखाली राहतात, याला कोणती कारणे असावीत असे तुला वाटते?
उदायि- याला पाच कारणे असावीत असे मी समजतो. ती कोणती? १) भगवान अल्पाहार करणारा असून अल्पाहाराचे गुण वर्णितो. २) तो कशाही प्रकारच्या चीवरांनी संतुष्ट असतो, व तशा संतुष्टीचे गुण वर्णितो. ३) जी भिक्षा मिळेल तिच्याने संतुष्ट असतो, आणि तशा संतोषाचे गुण वर्णितो. ४) राहण्याला मिळालेल्या जागेत संतुष्ट असतो, आणि तशा संतुष्टीचे गुण वर्णितो; ५), एकांतात राहतो, आणि एकांताचे गुण वर्णितो. ह्या पाच कारणांनी भगवंताचे श्रावक भगवंताचा मान ठेवतात, आणि आश्रयाखाली राहतात, असे मला वाटते.
भगवान- श्रमण गोतम अल्पाहारी असून अल्पाहाराचे गुण वर्णितो, एवढ्याचसाठी जर, हे उदायि, श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाखाली राहिले असते, तर माझ्या श्रावकात माझ्याहीपेक्षा अत्यंत अल्पाहार करणारे जे श्रावक आहेत, त्यांनी माझा मान ठेवला नसता, आणि ते माझ्या आश्रयाखाली राहिले नसते.
मिळेल त्या चीवराने श्रमण गोतम संतुष्ट राहत असून तशा संतुष्टीचे गुण वर्णितो, एवढ्याचसाठी, जर उदायि, माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले असते, तर माझ्या श्रावकांत, जे स्मशानातून, कच-याच्या राशीतून किंवा बाजारातून चिंध्या गोळा करून त्यांची चीवरे करतात आणि वापरतात, त्यांनी माझा मान ठेवला नसता, व ते माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधी कधी गृहस्थांनी दिलेल्या वस्त्रांची देखील चीवरे धारण करतो.
श्रमण गोतम मिळालेल्या भिक्षेने संतुष्ट असतो आणि तशा संतोषाचे गुण वर्णितो, एवढ्याचसाठी जर माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाखाली राहिले असते, तर त्यांत जे केवळ भिक्षेवरच अवलंबून राहतात, लहान मोठे घर वर्ज्य न करता भिक्षा घेतात आणि त्या भिक्षेवर निर्वाह करतात, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण मी कधी कधी गृहस्थाचे आमंत्रण स्वीकारून चांगले अन्न खातो.
श्रमण गोतम मिळालेल्या राहण्याच्या जागेत संतोष मानतो, आणि तशा संतुष्टीचे गुण वर्णितो, एवढ्याचसाठी जर हे, उदायि, माझे श्रावक मला मान देऊन माझ्या आश्रयाखाली राहिले असते, तर त्यांत जे झाडाखाली किंवा उघड्या जागेत राहतात आणि आठ महिने आच्छादिलेल्या जागेत प्रवेश करीत नाहीत, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधी कधी मोठाल्या विहारात देखील राहतो.
श्रमण गोतम एकांतात राहत असून एकांताचे गुण वर्णितो, एवढ्याचसाठी जर माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले असते, तर त्यांत जे अरण्यातच राहतात, केवळ पंधरा दिवसांनी प्रातिमोक्षासाठी संघात येतात, ते माझा मान ठेवून माझ्या आश्रयाने राहिले नसते. कारण, मी कधी कधी भिक्षु, भिक्षुणी, उपासक, उपासिका, राजा, मंत्री इतर संघाचे पुढारी आणि त्यांचे श्रावक यांना भेटतो.
परंतु हे उदायि, दुसरे पाच गुण आहेत की, ज्यामुळे माझे श्रावक माझा मान ठेवून माझ्या आश्रयाखाली राहतात. १) श्रमण गोतम शीलवान आहे. २) तो यथार्थतया धर्मोपदेश करतो. ३) तो प्रज्ञावान आहे. म्हणून माझे श्रावक मला मानतात आणि माझ्या आश्रयाने राहतात. ४) याशिवाय मी माझ्या श्रावकांना चार आर्यसत्यांचा उपदेश करतो, आणि ५) आध्यात्मिक उन्नतीचे निरनिराळे प्रकार दाखवितो. या पाच गुणांमुळे माझे श्रावक माझा मान ठेवतात आणि आश्रयाने राहतात.
12 . भिक्षुसंघाबरोबर असता भगवंताची दिनचर्या
आपल्या संघात बुद्ध भगवान कशी शिस्त ठेवतो, हे सर्व परिव्राजकांना माहीत झाले होते. तो जेव्हा त्यांच्या परिषदेत जाई, तेव्हा ते देखील मोठ्या शांततेने वागत, हे या सुत्तावरून दिसून येईलच. बुद्ध भगवान कधी कधी गृहस्थांचे आमंत्रण व गृहस्थांनी दिलेले वस्त्र स्वीकारीत असे, तथापि अल्पाहार करण्यात, अन्नवस्त्रादिकांच्या साधेपणात आणि एकान्तवासाच्या आवडीत देखील त्याची प्रसिद्धि होती. तो जेव्हा भिक्षुसंघाबरोबर प्रवास करी, तेव्हा एखाद्या गावाबाहेर उपवनात किंवा अशाच दुस-या सोयीवार जागी राहत असे. रात्री ध्यानसमाधि आटपून मध्यम यामात वर सांगितल्याप्रमाणे सिंहशय्या करी. आणि पहाटेला उठून पुन्हा चंक्रमण करण्यात किंवा ध्यानसमाधीत निमग्न असे.
सकाळी भगवान त्या गावात किंवा शहरात बहुधा एकटाच भिक्षाटनाला जात असे, वाटेत किंवा भिक्षाटन करीत असता प्रसंगानुसार गृहस्थांना उपदेश करी. सिगलोवादसुत्त भगवंताने वाटेत उपदेशिले, आणि कसिभारद्वाजसुत्त व अशीच दुसरी सुत्ते भिक्षाटन करीत असता उपदेशिली.
पोटापुरती भिक्षा मिळाल्याबरोबर भगवान गावाबाहेर येऊन एखाद्या झाडाखाली किंवा अशाच दुस-या प्रशस्त जागी बसून ते अन्न जेवी, व विहारात येऊन थोडा वेळ विश्रांति घेऊन ध्यानसमाधीत काही काळ घालवीत असे. संध्याकाळच्या वेळी त्याला भेटण्यासाठी गृहस्थ लोक येत असत आणि त्याच्याशी धार्मिक संवाद करीत. अशाच वेळी सोणदंड, कूटदंड वगैरे ब्राह्मणांनी मोठ्या ब्राह्मणसमुदायासह बुद्धाची भेट घेऊन धार्मिक चर्चा केल्याचा दाखला दीघनिकायात सापडतो. ज्या दिवशी गृहस्थ येत नसत, त्या दिवशी भगवान बहुधा बरोबर असलेल्या भिक्षूंना धर्मांप्रदेश करी.
पुन्हा एक दोन दिवसांनी भगवान प्रवासाला निघे आणि अशा रीतीने पूर्वेला भागलपूर, पश्चिमेला कुरूंचे कल्माषदम्य नावाचे शहर, उत्तरेला हिमालय व दक्षिणेला विंध्य या चतुःसीमांच्या दरम्यान आठ महिने भिक्षुसंघासह प्रवास करीत राही.
13 . वर्षावास
बुद्ध भगवंताने उपदेशाला आरंभ केला तेव्हा त्याचे भिक्षू वर्षाकाळात एका ठिकाणी राहत नसत; चारी दिशांना हिंडून धर्मोपदेश करीत. इतर संप्रदायांचे श्रमण वर्षाकाळात एका ठिकाणी राहत असल्यामुळे सामान्य जनांना बुद्ध भिक्षूंचे हे वर्तन आवडले नाही. ते भिक्षूंवर टीका करू लागले; तेव्हा त्यांच्या समाधानाकरिता बुद्ध भगवंताने, भिक्षूंनी वर्षाकाळात निदान तीन महिने एका ठिकाणी राहावे असा नियम केला.६
महावग्गात वर्षावासाची जी कथा आली आहे, तिचा हा सारांश. परंतु ती कथा सर्वथैव बरोबर असेल असे वाटत नाही. एक तर सगळे श्रमण वर्षाकाळी एकाच स्थळी राहत होते असे नाही, आणि भगवंताने केलेल्या नियमालाहि पुष्कळच अपवाद आहेत. चोरांचा किंवा असाच दुसरा उपद्रव उत्पन्न झाला असता वर्षाकाळालाही भिक्षूला दुसरीकडे जाता येते.
बुद्ध भगवंताने उपदेशाला सुरुवात केली, तेव्हा त्याची फारशी प्रसिद्धि नसल्यामुळे त्याला किंवा त्याच्या लहानशा भिक्षुसमुदायास वर्षावासासाठी एका ठिकाणी राहता येणे शक्य नव्हते. जेव्हा त्याची चोहोकडे प्रसिद्धि झाली, तेव्हा प्रथम: अनाथपिंडिक श्रेष्ठीने श्रावस्तीजवळ जेतवनात त्याच्यासाठी एक मोठा विहार बांधला;७ आणि काही काळाने विशाखा उपासिकेने त्याच शहराजवळ पूर्वाराम नावाचा प्रासाद बांधून बौद्धसंघाला अर्पण केला. बुद्ध भगवान उत्तर वयात बहुधा या दोन ठिकाणी वर्षाकाळी राहत असे. इतर ठिकाणच्या उपासकांनी आमंत्रण केले असता वर्षाकाळासाठी भगवान बुद्ध त्यांच्या गावी देखील जात असावा. वर्षाकाळापुरत्या झोपड्या बांधून लोक भिक्षूंच्या राहण्याची व्यवस्था करीत. भगवंतासाठी एक निराळी झोपडी असे. तिला गंधकुटी म्हणत.
वर्षाकाळात आजूबाजूचे उपासक बुद्धदर्शनाला येत अणि धर्मोपदेश ऐकत. परंतु ते नित्य विहारात आणून भिक्षा देत नसत. भिक्षूंना आणि बुद्ध भगवंताला वहिवाटीप्रमाणे भिक्षाटन करावे लागे; क्वचितच गृहस्थांच्या घरी आमंत्रण असे.
14 . आजारी भिक्षूंची चौकशी
भिक्षूंपैकी कोणी आजारी असला, तर बुद्ध भगवान दुपारी ध्यानसमाधि आटपून त्याच्या समाचाराला जात असे. एकदा महाकाश्यप राजगृह येथे पिप्फली गुहेत आजारी होता. त्या वेळी भगवान वेळुवनात राहत असे; आणि तो संध्याकाळी महाकाश्यपाच्या समाचाराला गेल्याची कथा बोज्झंगसंयुत्ताच्या चौदाव्या सुत्तात आली असून पंधराव्या सुत्तात दुस-या एका प्रसंगी भगवान महामोग्गल्लानाच्या समाचाराला गेल्याची कथा आहे. या दोघांनाहि भगवंताने सात बोध्यंगांची आठवण करून दिली आणि त्यामुळे त्यांचा आजार शमला.
15 . काही दिवसांचा एकांतवास
भगवान प्रवासात असले काय, किंवा वर्षाकाळी एका ठिकाणी राहिला काय, दुपारी एक दोन तास आणि रात्रीच्या पहिल्या व शेवटल्या यामात बराच वेळ ध्यानसमाधीत घालवीत असे, हे वर सांगितलेच आहे. याशिवाय, भगवान एकदा वैशालीजवळ महावनातील कूटागार शाळेत राहत असता पंधरा दिवसपर्यंत एकान्तात राहिला, भिक्षा घेऊन येणा-या एका भिक्षूला तेवढी त्याने जवळ येण्यास परवानगी दिली होती, अशी कथा आनापानस्मृतिसंयुत्ताच्या नवव्या सुत्तात आली आहे. याच संयुत्ताच्या अकराव्या सुत्तात मजकूर आहे तो असा-
एके समयी भगवान इच्छानंगल गावाजवळ इच्छानंगल वनात राहत होता. तेथे भगवान भिक्षूंना म्हणाला, “भिक्षुहो, मी तीन महिनेपर्यंत एकान्तात राहू इच्छितो. माझ्याजवळ एका तेवढ्या पिण्डपात आणणा-या भिक्षूशिवाय दुस-या कोणी येऊ नये.” त्या तीन महिन्यानंतर भगवान एकान्तातून बाहेर आला आणि भिक्षूंना म्हणाला, “जर अन्य संप्रदायांचे परिव्राजक तुम्हाला विचारतील की, ह्या वर्षाकाळात भगवान कोणती ध्यानसमाधि करीत होता? तर त्यांना म्हणा, भगवान आनापानस्मृतिसमाधि८ करून राहिला.”
वरच्या सुत्तात देखील भगवान पंधरा दिवस आनापानस्मृतिसमाधि करीत होता असे म्हटले आहे. याचा अर्थ एवढाच की, त्या समाधीचे महत्त्व लोकांना समजून यावे. पंधरा दिवस किंवा तीन महिने देखील तिची भावना केली, तरी कंटाळा येत नाही आणि तिच्यामुळे शरीरस्वास्थ राहते.
दुस-या एका प्रसंगी भगवान भिक्षुसंघ सोडून एकटाच पारिलेय्यक वनात जाऊन राहिल्याचा उल्लेख सहाव्या प्रकरणात (पृ.१२४) आलाच आहे. यावरून असे दिसते, की भगवान कधी कधी जेथे आपणास कोणी ओळखत नसे, अशा ठिकाणी एकान्तात जाऊन राही. पण जेव्हा त्याची सर्वत्र प्रसिद्धि झाली आणि सर्व लोक त्याला ओळखू लागले, तेव्हा संघात असतानाच काही काळ संघापासून अलिप्त राहण्याचा उपक्रम त्याने सुरू केला असावा. परंतु त्याच्या पंचेचाळीस वर्षांच्या कारकीर्दीत असे प्रसंग फार नसावेत.
आजकाल कायाकल्पाची बरीच ख्याती झाली आहे. महिना दीड महिना माणसाला एका कोठडीत कोंडून आणि पथ्यावर ठेवून औषधोपचार करण्यात येतो. त्या योगे मनुष्य पुन्हा तरुण होतो अशी समजूत आहे. या कायाकल्पाचा आणि भगवंताच्या
एकान्तवासाचा संबंध नाही. का की, भगवान त्या अवधीत औषधोपचार करीत नसे; केवळ आनापानस्मृतिसमाधीची भावना करी.
एकान्तात पुष्कळ काळ राहण्याची प्रथा सिंहलद्वीपात, ब्रह्मदेशात किंवा सयामात क्वचितच आढळते; पण तिबेटात मात्र ती चालू आहे. एवढेच नव्हे, तर काही ठिकाणी तिचा अतिरेक झाल्याचे दिसून येते. काही तिबेटी लामा वर्षांची वर्षे एखाद्या गुहेत किंवा अशाच दुस-या ठिकाणी आपणाला कोंडून घेतात आणि सर्व सिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात.
16 . आजारीपणा
भगवान आजारी असल्याचा उल्लेख फार थोडया ठिकाणी सापडतो. एकदा राजगृहाजवळ वेळुवनात तो आजारी होता. त्याला महाचुंदाने त्याच्या सांगण्यावरून सात बोध्यंगे म्हणून दाखविली, आणि त्या योगे तो बरा झाला, अशी कथा बोज्झंगसंयुत्ताच्या सोळाव्या सुत्तात आढळते.
विनयपिटकांतील महावग्गांत भगवान थोडासा आजारी होता व त्याला जीवक कौमारभृत्याने जुलाब दिला असा उल्लेख आहे.९ चुल्लवग्गात देवदत्ताची कथा आहे. त्याने गृध्रकूट पर्वतावरून भगवंतावर एक धोंड टाकली. तिचे तुकडे तुकडे होऊन एक चीप भगवंताच्या पायाला लागली व त्यामुळे भगवान आजारी झाला. देवदत्त भगवंताचा खून करील, अशी भीति वाटून काही भिक्षूंनी भगवान राहत होता त्याच्या आसपास पहारा करण्यास सुरवात केली. त्यांची हालचाल पाहून भगवान आनंदाला म्हणाला, “हे भिक्षु येथे का फिरत आहे?” आनंदाने उत्तर दिले, “भदन्त, देवदत्ताकडून आपल्या शरीराला धक्का पोचू नये म्हणून हे भिक्षु येथे पहारा करीत आहेत.”
भगवंताने आनंदाकडून त्या भिक्षूंना बोलावून आणले आणि भगवान त्यांना म्हणाला, “माझ्या देहाची इतकी काळजी घेण्याचे काही कारण नाही. माझ्या शिष्यांपासून माझे रक्षण व्हावे, अशी अपेक्षा नाही. तेव्हा तुम्ही येथे पहारा न करता आपल्या कामाला लागा.”
या विनयपिटकातील गोष्टींना सुत्तपिटकात आधार सापडत नाही. जुलाबाची गोष्ट तर अगदीच साधी आहे; आणि देवदत्ताची कथा त्याला अत्यंत अधम ठरविण्यासाठी रचली असण्याचा संभव आहे. जरी ती खरी असली, तरी त्या जखमेमुळे भगवान फार दिवस आजारी होता असे वाटत नाही. असे हे लहानसहान आजार खेरीज करून बुद्ध झाल्यापासून भगवंताचे आरोग्य एकंदरीत चांगले होते, असे म्हणण्यास हरकत नाही.
17 . आरोग्याचे कारण
बुद्ध भगवान आणि त्याचे शिष्य सर्व जातींच्या लोकांनी दिलेली भिक्षा घेत व दिवसातून एकदा जेवीत. असे असता त्यांचे आरोग्य चांगले राहून मुखचर्या प्रसन्न दिसत असे. याचे कारण खालील काल्पनिक संवादात दिले आहे.
(प्रश्न-) अरञ्ञे विचरन्तानं सन्तानं ब्रह्मचारिनं |
एकभत्तं भुञ्जमानानं केन वण्णो पसीदति ||
‘अरण्यात राहतात, ब्रह्मचर्याने वागतात आणि एकदा जेवतात, असे असून साधूंची कान्ति प्रसन्न कशी?’
(उत्तर-) अतीतं नानुसोचन्ति नप्पजप्पन्ति नागतं |
पच्चुपन्नेन यापेन्ति तेन वण्णो पसीदति ||
‘गेल्या गोष्टींचा शोक करीत नाहीत, अनागत गोष्टींची बडबड करीत नाहीत आणि वर्तमानकाळी संतोषाने वागतात, म्हणून कान्ति प्रसन्न राहते.’१०
18 . शेवटचा आजार
बुद्ध भगवंताच्या शेवटच्या आजाराचे वर्णन महापरिनिब्बानसुत्तात आले आहे.११ त्या पावसाळ्यापूर्वी भगवान राजगृहाला होता. तेथून मोठ्या भिक्षुसंघासह प्रवास करीत वैशालीला आला आणि जवळच्या बेलुव नावाच्या गावात स्वतः वर्षावासासाठी राहिला. भिक्षूंना सोयीप्रमाणे वैशालीच्या आसपास राहण्यास त्यांनी परवानगी दिली. त्या पावसाळ्यात भगवान भयंकर आजारी झाला. परंतु त्याने आपली जागृति ढळू दिली नाही. भिक्षुसंघाला पाहिल्याशिवाय परिनिर्वाण पावणे त्याला योग्य वाटले नाही; आणि त्याप्रमाणे त्याने ते दुखणे सहन करून आपल्या आयुष्याचे काही दिवस वाढविले. ह्या दुखण्यातून भगवान बरा झाला, तेव्हा आनंद त्याला म्हणाला, “भदन्त, आपण दुखण्यातून उठला हे पाहून मला समाधान वाटते. आपल्या या दुखण्यामुळे माझा जीव दुर्बळ झाला, मला काही सुचेनासे झाले आणि धार्मिक उपदेशाची देखील विस्मृति पडू लागली. तथापि भगवान भिक्षुसंघाला अखेरच्या गोष्टी सांगितल्यावाचून निर्वाणाप्रत जाणार नाही, अशी मला आशा वाटत होती.”
भगवान- आनंदा, भिक्षुसंघ मजपासून कोणत्या गोष्टी समजून घेण्याची इच्छा करतो? माझा धर्म मी उघड करून सांगितला आहे. त्यात गुरुकिल्ली ठेवली नाही. ज्याला आपण भिक्षुसंघाचा नायक राहावे व भिक्षुसंघ आपल्यावर अवलंबून असावा असे वाटते, तोच भिक्षुसंघाला अखेरच्या काही गोष्टी सांगेल. पण हे आनंद, तथागताची भिक्षुसंघाचा नायक होण्याची किंवा भिक्षुसंघ आपणावरच अवलंबून राहावा अशी इच्छा नाही. तेव्हा तथागत शेवटी भिक्षुसंघाला कोणती गोष्ट सांगणार? हे आनंदा, मी आता जीर्ण आणि वृद्ध झालो आहे. मला ऐंशी वर्षे झाली. मोडका खटारा जसा बांबूचे तुकडे बांधून कसा तरी चालतो, तसा माझा काय कसाबसा चालला आहे. ज्या वेळी मी विरोध समाधीची भावना करतो, त्या वेळीच काय ते माझ्या देहाला बरे वाटते. म्हणून आनंदा, आता तुम्ही स्वत:वरच अवलंबून राहा. आत्म्यालाच द्वीप बनवा. धर्मालाच द्वीप बनवा. आत्म्यालाच शरण जा, आणि धर्मालाच शरण जा.
अशी स्थिति होती तरी भगवान बेलुव गावाहून परत वैशालीला आला. तेथे आनंदाला पाठवून त्याने भिक्षुसंघाला महावनातील कूटागार शाळेत गोळा केले व बराच उपदेश केला. त्यानंतर भगवान भिक्षुसंघासह भांडग्राम, हस्तिग्राम, आम्रग्राम, जंबुग्राम, भोगनगर, इत्यादि ठिकाणी प्रवास करीत पावा नावाच्या नगराला येऊन चुन्द लोहाराच्या आम्रवनात उतरला. चुंदाच्या घरी भगवंताला आणि भिक्षुसंघाला आमंत्रण होते. चुंदाने जी पक्वाने केली होती, त्यांत ‘सूकरमद्दव’ नावाचा एक पदार्थ होता.१२ तो भगवंताने खाल्ल्याबरोबर भगवान अतिसाराच्या विकाराने आजारी झाला. तथापि त्या वेदना सहन करून भगवंताने ककुत्था आणि हिरण्यवती या दोन नद्या ओलांडल्या आणि कुसिनारेपर्यंत प्रवास केला. तेथील मल्लांच्या शालवनात त्या रात्रीच्या पश्चिम यामात बुद्ध भगवान परिनिर्वाण पावला.
येणेप्रमाणे भगवंताच्या अत्यंत बोधप्रद आणि कल्याणप्रद जीवनाचा अन्त झाला. तथापि त्यांचे सुपरिणाम भिन्नभिन्न रूपाने आजतागायत घडत आले आहेत आणि तसेच ते पुढेही मानवजातीच्या इतिहासात घडत राहतील.
19 . तळटीपा
१. न मोनेत मुनि होति मूळहरूपो अविद्दसु | (धम्मपद २६८).
२. मंडलमाल म्हणजे तंबूच्या आकाराचा मंडप, ज्याची जमीन आजूबाजूच्या जमिनीहून उंच केली जात असे.
३. सकुल+उदायि म्हणजे कुलीन उदायि.
४. तिरच्छानकथा | अनिय्यानिकत्ता सग्ग-मोक्ख-मग्गानं तिरच्छावभूता कथा ति तिरच्छानकथा | (अट्ठकथा).
५. वादविवादाची जागा.
६. बौद्धसंघाचा परिचय, पृ. २४ पाहा.
७. बुद्धलीलासारसंग्रह, पृ. १६७-१७९ पाहा.
८. आन म्हणजे आश्वास व अपान म्हणजे प्रश्वास. त्यांच्यावर साधणा-या समाधीला आनापानस्मृतिसमाधि म्हणतात. तिचे विधान समाधिमार्गात आलेच आहे. समाधिमार्ग, पृ. ३८-४८.
९. बौद्धसंघाचा परिचय, पृ. ३४ पाहा.
१०. देवतासंयुत्त, वग्ग १, सुत्त १० पाहा.
११. बुद्धलीलासारसंग्रह, पृ.२९२-३१२ पाहा.
१२. या पदार्थाबद्दल चर्चा मागल्या प्रकरणाच्या आरंभी केली आहे. ती तेथे पाहावी.