२३०-२४२

भगवान बुद्ध

परिशिष्ट १: गोतम बुद्धाच्या चरित्रात शिरलेले महापादनसुत्ताचे खंड

14-10-2017
18-09-2017
18-09-2017
18-09-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

सारांश

पारिभाषिक शब्द

1 . गोतम बुद्धाच्या चरित्रात शिरलेले महापदानसुत्ताचे खंड

अपदान (सं. अवदान) म्हणजे सच्चरित्र. अर्थात् महापदान म्हणजे थोरांची सच्चरित्रे. महापदान सुत्तात गोतम बुद्धापूर्वी झालेल्या सहा व गोतमबुद्ध यांची चरित्रे आरंभी संक्षेपाने दिली आहेत. गोतम बुद्धापूर्वी विपस्सी, सिखी, वेस्सभू, ककुसंघ, कोणागमन आणि कस्सप असे सहा बुद्ध झाले. पैकी पहिले तीन क्षत्रिय व बाकीचे ब्राह्मण होते. त्यांची गोत्रे, आयुर्मर्यादा, ते ज्या वृक्षाखाली बुद्ध झाले त्या वृक्षांची नावे, त्यांचे दोन मुख्य शिष्य, त्यांच्या संघात भिक्षुसंख्या किती होती, त्यांचे उपस्थायक (सेवकभिक्षु), मातापिता, त्या काळचा राजा व राजधानी, यांची नावे या सुत्ताच्या आरंभी दिली आहेत; आणि नंतर विपस्सी बुद्धाचे चरित्र विस्तारपूर्वक वर्णिले आहे. त्या पौराणिक चरित्राचे जे खंड गोतम बुद्धाच्या चरित्राला जोडण्यात आले, त्यांचा गोषवारा येथे देतो.१    

 

भगवान म्हणाला, “भिक्षुहो, यापूर्वीच्या एक्याण्णवाव्या कल्पात अर्हत् सम्यक् संबुद्ध विपस्सी भगवान या लोकी जन्मला. तो जातीने क्षत्रिय व गोत्राने कौण्डिन्य होता. त्याची आयुर्मर्यादा ऐंशी हजार वर्षे होती. तो पाटली वृक्षाखाली अभिसंबुद्ध झाला. त्याचे खंड व तिस्स असे दोन अग्रश्रावक होते. त्याच्या शिष्यांचे तीन समुदाय, पहिल्यात अडुसष्ट लक्ष, 

दुस-यात एक लक्ष व तिस-यात ऐंशी लक्ष भिक्षु असून ते सर्व क्षीणाश्रव होते. अशोक नावाचा भिक्षु त्याचा अग्रउपस्थायक, बंधुमा नावाचा राजा पिता, बंधुमती नावाची राणी माता आणि बंधुमा राजाची बंधुमती नावाची राजधानी होती.

  1. आाणि भिक्षुहो, विपस्सी बोधिसत्त्व तुषित देवलोकातून च्युत होऊन स्मृतिमान् जागृत होत्साता मातेच्या उदरात प्रवेश करता झाला. हा येथे स्वभावनियम आहे.
  2. भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व तुषित देवलोकातून च्युत होऊन मातेच्या उदरात प्रवेश करतो, तेव्हा देव, मार, ब्रह्मा, श्रमण, ब्राह्मण आणि मनुष्य यांनी भरलेल्या या जगात देवांच्या प्रभावास मागे टाकणारा असा अप्रमाण आणि विपुल आलोक प्रादुर्भूत होतो. निरनिराळ्या जगतांच्या मधले प्रदेश जे सदोदित अंधकारमय व काळेकुट्ट असतात, जेथे एवढ्या प्रतापी आणि महानुभाव चंद्रसूर्यांचा प्रभाव पडत नाही, तेथे देखील देवांच्या प्रभावास मागे टाकणारा अप्रमाण व विपुल प्रकाश प्रादुर्भूत होतो. त्या प्रदेशात उत्पन्न झालेले प्राणी त्या प्रकाशाने परस्परांस पाहून आपणाशिवाय दुसरेही प्राणी तेथे आहेत असे जाणतात. हा दशसहस्र जगतींचा समुदाय हलू लागतो व त्या सर्व जगतीत देवांच्या प्रभावास मागे टाकणारा अप्रमाण आणि विपुल प्रकाश प्रादुर्भूत होतो, असा हा स्वभावनियम आहे.
  3. भिक्षुहो, असा स्वभावनियम आहे की, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो तेव्हा त्याला आणि त्याच्या मातेला मनुष्य किंवा अमनुष्य यांचा त्रास पोचू नये म्हणून चार देवपुत्र रक्षणाकरिता चारी दिशांना राहतात. असा हा स्वभावनियम आहे.
  4. भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो, तेव्हा त्याची माता स्वाभाविकपणे शीलवती होते; प्राणघात, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण आणि मद्यपान यांपासून मुक्त राहते. असा हा स्वभावनियम आहे.
  5. भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेच्या अंत:करणात पुरुषाविषयी कामासक्ति उत्पन्न होत नाही आणि कोणत्याही पुरुषास कामविकारयुक्त चित्ताने बोधिसत्त्वाच्या मातेचे अतिक्रमण करता येणे शक्य नसते. हा स्वभावनियम आहे.
  6. भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेला पाच सुखोपभोगांचा लाभ होतो. त्या पंचसुखोपभोगांनी संपन्न होऊन ती त्यांचा उपभोग घेते. हा स्वभावनियम आहे.
  7. भिक्षुहो, जेव्हा बोधिसत्त्व मातेच्या उदरात प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या मातेला कोणताही रोग होत नाही. ती सुखी आणि निरुपद्रवी असते आणि आपल्या उदरी असलेल्या सर्वेन्द्रियसंपूर्ण बोधिसत्त्वाला पाहते. ज्याप्रमाणे जातिवंत अष्टकोनी, घासून तयार केलेला, स्वच्छ, शुद्ध व सर्वाकारपरिपूर्ण वैडूर्यमणि असावा आणि त्यात निळा, पिवळा, तांबडा किंवा पांढरा दोरा ओवला, तर तो मणि व त्यात ओवलेला दोरा डोळस मनुष्याला स्पष्ट दिसतो, त्याप्रमाणे बोधिसत्त्वमाता आपल्या उदरातील बोधिसत्त्वाला स्पष्ट पाहते. असा हा स्वभावनियम आहे.
  8. भिक्षुहो, बोधिसत्त्व जन्मून सात दिवस झाल्यावर त्याची माता मरण पावते व तुषित देवलोकात जन्म घेते. असा हा स्वभावनियम आहे.
  9. भिक्षुहो, ज्याप्रमाणे इतर स्त्रिया नवव्या किंवा दहाव्या महिन्यात प्रसूत होतात, तशी बोधिसत्त्वमाता प्रसूत होत नाही. बोधिसत्त्वाला दहा महिने परिपूर्ण झाल्यावरच ती प्रसूत होते. असा हा स्वभावनियम आहे.
  10. भिक्षुहो, ज्याप्रमाणे इतर स्त्रिया बसल्या असता किंवा निजल्या असता प्रसूत होतात, त्याप्रमाणे बोधिसत्त्वमाता प्रसूत होत नाही. ती उभी असता प्रसूत होते. असा ही स्वभावनियम आहे.
  11. भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरातून बाहेर निघतो तेव्हा प्रथमतः त्याला देव घेतात आणि मग मनुष्य घेतात. असा हा स्वभावनियम आहे.
  12. भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरातून बोहर निघतो तेव्हा जमिनीवर पडण्यापूर्वी चार देवपुत्र त्याला घेतात व मातेच्या पुढे ठेवून म्हणतात, “देवी, आनंद मान; महानुभाव पुत्र तुला झाला आहे.” असा हा स्वभावनियम आहे.
  13. भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरातून बाहेर निघतो तेव्हा उदरोदक, श्लेष्मा, रुधिर अथवा इतर घाणीने लडबडलेला नसतो; शुद्ध आणि स्वच्छ असा बाहेर निघतो. भिक्षुहो, रेशमी वस्त्रावर बहुमूल्य मणि ठेवला तर तो ते वस्त्र घाण करीत नाही, किंवा ते वस्त्र त्या मण्याला मलिन करीत नाही, का तर दोन्ही शुद्ध असतात. त्याचप्रमाणे बोधिसत्त्व बाहेर निघतो तेव्हा शुद्ध असतो. असा हा स्वभावनियम आहे.
  14. भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या कुशीतून बाहेर निघतो तेव्हा अंतरिक्षांतून एक शीतल व दुसरी उष्ण अशा उदकधारा खाली येतात व बोधिसत्त्वाला व त्याच्या मातेला धुवून काढतात. असा हा स्वभावनियम आहे.
  15. भिक्षुहो, जन्मल्याबरोबर बोधिसत्त्व पायावर सरळ उभा राहून उत्तरेकडे सात पावले चालतो. त्या वेळी त्याच्यावर श्वेतछत्र धरण्यात येते आणि सर्व दिशांकडे पाहून तो गर्जतो, “मी जगात अग्रगामी आहे; ज्येष्ठ आहे; श्रेष्ठ आहे; हा शेवटचा जन्म; आता पुनर्जन्म नाही.” असा हा स्वभावनियम आहे.
  16. भिक्षुहो, बोधिसत्त्व मातेच्या उदरातून बाहेर निघतो तेव्हा देव, मार, ब्रह्मा (पुढील मजकूर कलम २ प्रमाणे)......

भिक्षुहो, विपस्सी कुमार जन्मल्याबरोबर बंधुमा राजास कळविण्यात आले की, “महाराज, आपणाला पुत्र झाला आहे, त्याला महाराजांनी पाहावे.” भिक्षुहो, बंधुमा राजाने विपस्सी कुमाराला पाहिले आणि ज्योतिषी ब्राह्मणांना बोलावून त्याची लक्षणे पाहावयास सांगितली.

ज्योतिषी म्हणाले, “महाराज, आनंदित व्हा; आपणाला महानुभाव पुत्र झाला आहे. आपल्या कुळात असा पुत्र झाला हे आपले मोठे भाग्य होय. हा कुमार बत्तीस महापुरुष लक्षणांनी युक्त आहे. अशा महापुरुषाच्या दोनच गति होतात, तिसरी होत नाही. तो जर गृहस्थाश्रमात राहिला तर धर्मिक धर्मराजा, चारीसमुद्रांपर्यंत पृथ्वीचा मालक, राज्यात शांतता स्थापन करणारा, सात रत्नांनी समन्वित असा चक्रवर्ती राजा होतो. त्याची सात रत्ने ही- चक्ररत्न, हस्तिरत्न, अश्वरत्न, मणिरत्न, स्त्रीरत्न, गृहपतिरत्न व सातवे परिणायकरत्न. त्याला हजाराच्या वर शूरवीर, शत्रुसेनेचे मर्दन करणारे असे पुत्र होतात. तो समुद्रापर्यंत ही पृथ्वी दण्डावाचून आणि शस्त्रावाचून धर्माने जिंकून राज्य करतो. परंतु जर त्याने प्रव्रज्या घेतली तर तो या जगामध्ये अर्हन् सम्यक् संबुद्ध व अविद्यावरण दूर करणारा होतो.

महाराज, ती बत्तीस लक्षणे कोणती ती ऐका. १) हा कुमार सुप्रतिष्ठितपाद आहे; २) त्याच्या पादतलाखाली सहस्त्र आरे, नेमि व नाभि यांनी संपन्न व सर्वाकारपरिपूर्ण अशी चक्रे आहेत; ३) त्याच्या टाचा लांब आहेत; ४) बोटे लांब आहेत; ५) हातपाय मृदु व कोमल, ६) जाळ्यासारखे आहेत; ७) पायाचे घोटे शंकूसारखे वर्तुळाकार; ८) हरिणीच्या जंघांसारख्या जंघा; ९) उभा राहून न वाकता हाताच्या तळव्यांनी त्याला आपल्या गुढग्यास स्पर्श करता येतो, ते चोळता येतात; १०) त्याचे वस्त्रगुह्य कोशाने झाकले आहे; ११) त्याची कान्ति सोन्यासारखी; १२) कातडी सूक्ष्म असल्यामुळे त्याच्या शरीराला धूळ लागत नाही; १३) त्याच्या रोमकूपात एकएकच केस उगवलेला आहे; १४) त्याचे केस ऊर्ध्वाग्र, निळे, अंजनवर्ण, कुरळे व उजव्या बाजूला वळलेले आहेत; १५) त्याची गात्रे सरळ आहेत; १६) त्याच्या शरीराचे सात भाग भरीव आहेत; १७) त्याच्या शरीराचा पुढला अर्धा भाग सिंहाच्या पुढल्या भागाप्रमाणे आहे; १८) त्याच्या खांद्यावरील प्रदेश भरीव आहे; १९) तो न्यग्रोध वृक्षाप्रमाणे वर्तुलाकार आहे; जितकी त्याची उंची तितका त्याचा परिघ आणि जितका परिघ तितकी उंची; २०) त्याचे खांदे एकसारखे वळलेले आहेत; २१) त्याची रसना उत्तम आहे; २२) हनुवटी सिंहाच्या हनुवटीप्रमाणे आहे; २३) त्याला चाळीस दात आहेत; २४) ते सरळ आहेत; २५) ते निरंतर आहेत; २६) ते पांढरे शुभ्र आहेत; २७) त्याची जिव्हा लांब आहे; २८) तो ब्रह्मस्वर असून करवीक पक्षाच्या स्वराप्रमाणे त्याचा आवाज मंजुळ आहे; २९) त्याची बुबुळे निळी आहेत; ३०) गाईच्या पापण्यांप्रमाणे त्याच्या पापण्या आहेत; ३१) त्याच्या भुवयांमध्ये मऊ कापसाच्या तंतूप्रमाणे पांढरी लव उगवलेली आहे; ३२) त्याचे डोके उष्णीषाकार (म्हणजे मध्ये जरा उंच) आहे.

नंतर भिक्षुहो, बंधुमा राजाने विपस्सीकुमारासाठी तीन प्रासाद बांधविले; एक पावसाळ्याकरिता, एक हिवाळ्याकरिता आणि एक उन्हाळ्याकरिता; आणि त्या प्रासादात पंचेद्रियांच्या सुखाचे सर्व पदार्थ ठेवविले. भिक्षुहो, पावसाळ्याकरिता बांधलेल्या प्रासादात विपस्सीकुमार पावसाळ्याचे चार महिने केवळ स्त्रियांनी वाजविलेल्या वाद्यांनी परिवारित होऊन राहत असे, प्रसादाखाली उतरत नसे.

आणि भिक्षुहो, शेकडो हजारो वर्षांनंतर विपस्सीकुमार सारथ्याला बोलावून म्हणाला, “मित्रा सारथे, चांगली चांगली याने तयार ठेव. सृष्टीशोभा पाहण्यासाठी उद्यानात जाऊ.” सारथ्याने याने तयार केली आणि विपस्सीकुमार रथात बसून उद्यानाकडे जाण्यास निघाला. वाटेत गोपानसीप्रमाणे वाकलेल्या भग्नशरीर, काठी टेकीत कापत कापत चालणा-या, रोगी, गतवयस्क अशा एका म्हाता-या मनुष्याला पाहून तो सारथ्याला म्हणाला, “ह्या मनुष्याची अशी स्थिति का? त्याचे केस आणि शरीर इतरांप्रमाणे नाही.”

सा.-   महाराज, हा म्हातारा माणूस आहे.

वि.-    मित्रा सारथे, म्हातारा म्हणजे काय?

सा.-   म्हातारा म्हणजे त्याला फार दिवस जगावयाचे नाही.

वि.-    मी देखील असा जराधर्मी आहे काय?

सा.-   महाराज, आम्ही सर्वच जराधर्मी आहोत.

वि.-    तर मग सारथे, आता उद्यानाकडे जाणे नको. परत वाड्यात जाऊ या.

सा.-   ठीक महाराज.

असे म्हणून सारथ्याने अंत:पुराकडे रथ वळविला. तेथे विपस्सीकुमार दु:खी आणि उद्विग्न होऊन विचार करू लागला, की ह्या जन्माला धिक्कार असो, ज्याच्यामुळे जरा उत्पन्न होते!

बंधुमा राजा सारथ्याला बोलावून म्हणाला, “कायरे मित्रा सारथे, कुमार उद्यानात रमला काय? उद्यानात त्याला आनंद वाटला काय?”

सा.-   नाही, महाराज.

राजा.-   का? त्याने उद्यानाकडे जाताना काय पाहिले?

सारथ्याने घडलेले वर्तमान निवेदित केले. तेव्हा बंधुमा राजाने विपस्सीकुमार परिव्राजक होऊ नये म्हणून त्याची पंचेंद्रियांची सुखे अधिकच वाढविली आणि विपस्सी त्या सुखात गढून राहिला.

आणि, भिक्षुहो, शेकडो हजारो वर्षांनंतर विपस्सीकुमार पुन्हा उद्यानाकडे जाण्यास निघाला. वाटेत रोगी, पीडित, फार आजारी, आपल्या मलमूत्रात लोळणा-या, दुस-याकडून उठविला जाणा-या आणि इतरांकडून वस्त्रे सावरली जाणा-या अशा एका माणसाला पाहून तो सारथ्याला म्हणाला, “याला काय झाले आहे? याचे डोळे काय, की स्वर काय, इतरांसारखा नाही!”

सा.-   हा रोगी आहे.

वि.-    रोगी म्हणजे काय?

सा.-   रोगी म्हणजे या स्थितीत त्याला पूर्वीप्रमाणे वागता येणे कठीण आहे.

वि.-    मित्रा सारथे, याप्रमाणे मी देखील व्याधिधर्मी आहे काय?

सा.-   महाराज, आम्ही सगळेच व्याधिधर्मी आहोत.

वि.-    तर मग, आता उद्यानाकडे जाणे नको; अंत:पुराकडे रथ फिरव.

त्याप्रमाणे सारथि रथ घेऊन अंत:पुराकडे आला. आणि तेथे विपस्सीकुमार दु:खी व उद्विग्न होऊन विचारात पडला की, ज्यामुळे व्याधि प्राप्त होते, त्या जन्माला धिक्कार असो! 

सारथ्याकडून बंधुमा राजाला हे वर्तमान समजले, तेव्हा त्याने विपस्सीकुमाराची सुखसाधने आणखीही वाढविली, का की राज्य सोडून कुमाराने प्रव्रज्या न घ्यावी.

आणि भिक्षुहो, शेकडो हजारो वर्षांनंतर विपस्सीकुमार पूर्वीप्रमाणेच तयारी करून उद्यानाकडे जाण्यास निघाला. वाटेत मोठ्या लोकांचा समूह रंगीबेरंगी वस्त्रांची पालखी तयार करीत असलेला त्याने पाहिला आणि तो सारथ्याला म्हणाला, “हे लोक रंगीबेरंगी वस्त्रांची पालखी का तयार करतात?”

सा.-   महाराज, हा येथे मेलेला मनुष्य आहे (त्यासाठी).

वि.-    तर मग त्या मृत मनुष्याकडे रथ ने.

त्याप्रमाणे सारथ्याने तिकडे रथ नेला आणि त्या मनुष्याला पाहून विपस्सी म्हणाला, “मित्रा सारथे, मृत म्हणजे काय?”

सा.-    तो आता आईबाप व दुसरे नातेवाईक यांच्या दृष्टीस पडणार नाही, किंवा तो त्यांना पाहू शकणार नाही.

वि.-    मित्रा सारथे, मी देखील मरणधर्मी आहे काय? राजा, राणी आणि दुसरे नातेवाईक यांच्या दृष्टीस मी पडणार नाही काय? आणि त्यांना मी पाहू शकणार नाही काय ?

सा.-    नाही महाराज.

वि.-    तर मग आता उद्यानाकडे जाणे नको. अंत:पुराकडे रथ फिरव.

त्याप्रमाणे सारथ्याने अंत:पुराकडे रथ नेला. तेथे विपस्सीकुमार दु:खी आणि उद्विग्न होऊन विचारात पडला की, ज्याच्या योगे जरा, व्याधि, मरण प्राप्त होतात त्या जन्माला धिक्कार असो!

सारथ्याकडून बंधुमा राजाला हे वर्तमान समजले, तेव्हा त्याने कुमाराची सुखसाधने आणखीही वाढविली. इ.

आणि भिक्षुहो, शेकडो हजारो वर्षांनंतर पुन्हा सर्व सिद्धता करून विपस्सीकुमार सारथ्याबरोबर उद्यानाकडे जाण्यास निघाला. वाटेत एका परिव्राजकाला पाहून तो सारथ्याला म्हणाला, “हा पुरुष कोण आहे? याचे डोके आणि वस्त्रे इतरांसारखी नाहीत.”

सा.-    महाराज, हा प्रव्रजित आहे.

वि.-    प्रव्रजित म्हणजे काय?

सा.-    प्रव्रजित म्हणजे, धर्मचर्या चांगली, समचर्या चांगली, कुशलक्रिया चांगली, पुण्यक्रिया चांगली, अविहिंसा चांगली, भूतदया चांगली, असे समजणारा.

वि.-    तर मग त्याच्याकडे रथ ने.

त्याप्रमाणे सारथ्याने प्रव्रजिताकडे रथ नेला, तेव्हा विपस्सीकुमार त्याला म्हणाला, “तू कोण आहेस? तुझे डोके आणि वस्त्रे इतरांसारखी नाहीत.”

प्र.-     महाराज, मी प्रव्रजित आहे. धर्मचर्या, समचर्या, कुशलक्रिया, पुण्यक्रिया, अविहिंसा, भूतानुकंपा चांगली, असे मी समजतो.

‘ठीक आहे’, असे म्हणून विपस्सीकुमार सारथ्याला म्हणाला, “मित्रा सारथे, तू रथ घेऊन अंत:पुराकडे परत जा. मी केस व दाढीमिशा काढून, काषाय वस्त्रे धारण करून अनागरिक (गृहवियुक्त) प्रव्रज्या घेतो.”

सारथि रथ घेऊन अंत:पुराकडे गेला. पण विपस्सी कुमाराने तेथेच प्रव्रज्या घेतली.

आणि भिक्षुहो, विपस्सी बोधिसत्त्व एकांतात विचार करीत असता त्याच्या मनात विचार आला की, लोकांची अत्यंत वाईट स्थिति आहे. ते जन्माला येतात, म्हातारे होतात आणि मरतात; च्युत होतात आणि उत्पन्न होतात; तरी या दु:खापासून सुटका कशी करून घ्यावी हे जाणत नाहीत. ते हे कधी जाणतील?

आणि भिक्षुहो, जरामरण कशाने उत्पन्न होते याचा विपस्सी बोधिसत्त्व विचार करू लागला. तेव्हा त्याने प्रज्ञालाभाने जाणले की, जन्म आला म्हणजे जरामरण येते. आणि जन्म कशामुळे येतो? भवामुळे. भव कशामुळे? उपादानामुळे. उपादान तृष्णेमुळे, तृष्णा वेदनेमुळे, वेदना स्पर्शामुळे, स्पर्श षडायतनामुळे, षडायतन नामरूपामुळे, नामरूप विज्ञानामुळे उत्पन्न होते. ही कारणपरंपरा विपस्सी बोधिसत्त्वाने अनुक्रमाने जाणली. त्याचप्रमाणे जन्म नसला तर जरामरण येत नाही. भव नसला तर जन्म होत नाही... विज्ञान नसले तर नामरूप होत नाही, हे देखील त्याने जाणले. आणि तेणेकरून त्याच्या मनात धर्मचक्षु, धर्मज्ञान, प्रज्ञा, विद्या आाणि आलोक उत्पन्न झाला.

आणि भिक्षुहो, अर्हन्, सम्यक् संबुद्ध विपस्सी भगवंताच्या मनात धर्मोपदेश करण्याचा विचार आला. पण त्याला वाटले, हा गंभीर, दुर्दर्श, समजण्यास कठीण, शांत, प्रणीत, तर्काने न कळण्यासारखा, निपुण, पंडितांनीच जाणण्याला योग्य असा धर्म मी प्राप्त करून घेतला आहे. पण हे लोक चैनीत गढलेले, चैनीत रमणारे, अशांना कारणपरंपरा, प्रतीत्यसमुत्पाद समजणे कठीण आहे. सर्व संस्कारांचे शमन, सर्व उपाधींचा त्याग, तृष्णेचा क्षय, विराग, निरोध, निर्वाण देखील त्यांना दुर्गम आहे. मी धर्मोपदेश केला आणि तो त्यांना समजला नाही, तर मलाच त्रास; मलाच उपद्रव होईल.

आणि भिक्षुहो, विपस्सी भगवंताला पूर्वी कधी न ऐकलेल्या पुढील गाथा अकस्मात सुचल्या-

जे मी प्रयासाने मिळविले आहे, ते इतरांस सांगणे नको

रागद्वेषाने भरलेल्यांना या धर्माचा बोध सहज होण्याजोगा नाही ||

प्रवाहाच्या उलट जाणारा, निपुण, गंभीर, दुर्दर्श आणि अणुरूप

असा हा धर्म अंधकाराने वेढलेल्या कामासक्तांना दिसणार नाही ||

भिक्षुहो, अर्हन्त सम्यक्संबुद्ध विपस्सी भगवंताचे ह्या विचाराने धर्मोपदेशाकडे चित्त न वळता एकाकी राहण्याकडे वळले. महाब्रह्म तो विचार जाणून आपल्याच मनात उद्वारला, “अरेरे! जगाचा नाश होत आहे! विनाश होत आहे!! का की, अर्हन् सम्यक् संबुद्ध विपस्सी भगवंताचे मन धर्मोपदेश करण्याकडे न वळता एकाकी राहण्याकडे वळते!”

तेव्हा भिक्षुहो, जसा एखादा बलवान पुरुष आखडलेला हात पसरतो, किंवा पसरलेला आखडतो, इतक्या त्वरेने तो महाब्रह्मा ब्रह्मलोकात अंतर्धान पावून विपस्सी भगवंतापुढे प्रकट झाला आणि आपले उपवस्त्र एका खांद्यावर करून उजवा गुढगा जमिनीला टेकून हात जोडून भगवंताला म्हणाला, “भगवन्, धर्मदेशना कर! सुगत, धर्मदेशना कर! काही प्राणी असे आहेत की, त्यांचे डोळे धुळीने भरले नाहीत. ते धर्म ऐकण्यास न मिळाल्यामुळे नाश पावत आहेत. असे धर्म जाणणारे लोक मिळतील.”

विपस्सी भगवंताने आपल्या मनातील विचार तीनदा प्रगट केला आणि ब्रह्मदेवाने तीनदा भगवंताला तशीच विनंती केली. तेव्हा भगवंताने ब्रह्मदेवाची विनंती जाणून आणि प्राण्यांवरील दयेमुळे, बुद्धनेत्राने जगाचे अवलोकन केले आणि ज्यांचे डोळे धुळीने थोडे भरले आहेत, ज्यांचे फार भरले आहेत, तीक्ष्णेंद्रियांचे, मृदु इंद्रियांचे, चांगल्या आकाराचे, वाईट आकाराचे, समजावून देण्यास सोपे, समजावून देण्यास कठीण; आणि काही परलोकाचे व वाईट गोष्टींचे भय बाळगणारे, असे प्राणी त्याला दिसले. ज्याप्रमाणे कमलांनी भरलेल्या सरोवरात काही कमले पाण्याच्या आतच बुडून राहतात, काही पाण्याच्या सपाटीवर येतात, आणि काही पाण्याहून वर उगवलेली असतात, पाण्याचा ज्यांना स्पर्श होत नाही, तशा प्रकारे विपस्सी भगवंताने भिन्न भिन्न प्रकारचे प्राणी पाहिले.

आणि भिक्षुहो, विपस्सी भगवंताच्या मनातील हा विचार जाणून ब्रह्मदेवाने पुढील गाथा म्हटल्या-

“शैलावर, पर्वताच्या मस्तकावर उभा राहून ज्याप्रमाणे सभोवारच्या लोकांकडे पाहावे, त्याप्रमाणे हे सुमेध, धर्ममय प्रासादावर चढून समन्तात् पाहणारा असा तू शोकरहित होत्साता जन्म आणि जरा यांनी पीडलेल्या जनतेकडे पाहा! ||

“वीरा, ऊठ. तू संग्राम जिंकला आहेस. तू ऋणमुक्त सार्थवाह आहेस. अतएव जगात संचार कर ||

‘‘भगवन् धर्मोपदेश कर, जाणणारे असतीलच ||”

आणि भिक्षुहो, अर्हन् सम्यक् संबुद्ध विपस्सी भगवंताने ब्रह्मदेवाला गाथांनी उत्तर दिले.

“त्यांच्याकरिता अमरत्वाची द्वारे उघडली आहेत. ज्यास ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी भाव धरावा ||”

“उपद्रव होईल म्हणून मी लोकांना, हे ब्रह्मदेवा, श्रेष्ठ प्रणीत धर्म उपदेशिला नाही||”

आणि भिक्षुहो, विपस्सी भगवंताने धर्मोपदेश करण्याचे वचन दिले, असे जाणून तो महाब्रह्मा भगवंताला अभिवादन आणि प्रदक्षिणा करून, तेथेच अंतर्धान पावला.

ह्या सात खंडात तिसरा खंड पहिल्याने रचण्यात आला असावा. का की, तो त्रिपिटकामधील सर्वांत प्राचीन सुत्तनिपात ग्रन्थातील सेलसुत्तात सापडतो. हेच सुत्त मज्झिमनिकायात (नं.९२) आले आहे. त्यापूर्वीच्या (नं.९१) ब्रह्मयुसुत्तात आणि दीघनिकायातील अंबट्ठसुत्तातही याचा उल्लेख आला आहे. बुद्धकालीन ब्राह्मण लोकांत ह्या लक्षणाचे फार महत्त्व समजले जात असे. तेव्हा बुद्धाच्या शरीरावर ही सर्व लक्षणे होती असे दाखवून देण्याच्या उद्देशाने बुद्धानंतर एक दोन शतकांनी ही सुत्ते रचण्यात आली असावी, आणि त्यानंतर ह्या महापदान सुत्तात ती दाखल केली असावी. गोतम बोधिसत्त्व बुद्ध झाल्यानंतर ब्राह्मण पंडित त्याची लक्षणे पाहत. परंतु ह्या सुत्तात विपस्सी कुमाराची लक्षणे त्याच्या जन्मानंतर लौकरच पाहण्यात आली असे दर्शविले आहे आणि त्यामुळे एक मोठी विसंगती उत्पन्न झाली आहे. ती ही की, त्यास चाळीस दात आहेत, ते सरळ आहेत, त्यांच्यात विवरे नाहीत आणि त्याच्या दाढा शुभ्र पांढ-या आहेत, ही चार लक्षणे त्यात राहून गेली. जन्मल्याबरोबर मुलाला दात नसतात, याची आठवण या सुत्तकाराला राहिली नाही!

त्यानंतर दुसरा खंड तयार करण्यात आला असावा. त्यात जे स्वभावनियम सांगितले आहेत ते मज्झिमनिकायातील अच्छरियअब्भुतधम्मसुत्तात (नं.१२३) सापडतात. बोधिसत्त्वाला विशेष महत्त्व आणण्यासाठी ते रचले आहेत. यांपैकी त्याची माता उभी असता प्रसवली, आणि तो सात दिवसाचा झाल्यावर परलोकवासी झाली, हे दोन खरोखरच घडून आले असावेत. बाकी कविकल्पना.

त्यानंतरचा किंवा त्याच्या मागेपुढे काही काळाने लिहिलेला सातवा खंड होय. हा मज्झिमनिकायातील अरियपरियेसनसुत्तात, निदानवग्गसंयुत्तात (६|१), आणि महावग्गाच्या आरंभी सापडतो. ब्रह्मदेवाने केलेल्या प्रार्थनेमुळे बुद्धाने धर्मोपदेशाला सुरवात केली, हे दाखवून देण्यासाठी हा खंड रचला गेला. मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या चार उदात्त मनोवृत्तीवर हे रूपक आहे असे मी बुद्ध, धर्म आणि संघ या पुस्तकातील पहिल्या व्याख्यानात दाखवून दिले आहे.

यानंतर चौथा तीन प्रासादांचा खंड. त्याचा उल्लेख अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपातात (सुत्त ३८) आणि मज्झिमनिकायातील मागन्दियसुत्तात (नं. ७५) आला आहे. पहिल्या ठिकाणी, मी पित्याच्या घरी असताना मला राहण्यासाठी तीन प्रासाद होते, असा उल्लेख आहे. पण दुस-यात, तरुणपणी मी तीन प्रासादात राहत होतो. असा मजकूर असून पित्याचा उल्लेख नाही. शाक्य राजे वज्जींएवढे संपन्न नव्हतेच, आणि वज्जींचे तरुण कुमार देखील अशा रीतीने चैनीत राहत होते, याबद्दल कोठेच पुरावा सापडत नाही. याच्या उलट, ते अत्यंत साधेपणाने वागत व चैनीची मुळीच पर्वा करीत नसत, असे वर्णन ओपम्मसंयुत्तांत (वग्ग १, सुत्त ५) सापडते. भगवान म्हणतो, “भिक्षुहो, सध्या लिच्छवी लाकडाच्या ओंडक्याच्या उशा करून राहतात, आणि मोठय़ा सावधगिरीने आणि उत्साहाने कवाईत शिकतात. यामुळे मगधाच्या अजातशत्रु राजाला त्यांच्यावर हल्ला करता येत नाही. परंतु भविष्यकाळी लिच्छवी सुकुमार होतील, आणि त्यांचे हातपाय कोमल बनतील. ते मऊ बिछान्यावर कापसाच्या उशा घेऊन निजतील आणि तेव्हा अजातशत्रु राजा त्यांच्यावर हल्ला करण्यास समर्थ होईल.”

वज्जींसारखे संपन्न गणराजे जर इतक्या सावधानपणे वागत तर त्यांच्या मानाने बरेच गरीब असलेले शाक्य राजे मोठमोठाल्या प्रासादात चैनीत राहत असत हे संभवतच नाही. जर खुद्द शुद्धोदनालाच शेती करावी लागत असे, तर आपल्या मुलाला तो तीन प्रासाद कसे बांधून देईल? तेव्हा ही प्रासादांची कल्पना बुद्धाच्या चरित्रात मागाहून शिरली यात शंका राहत नाही. ती महापदानसुत्तावरून घेतली किंवा स्वतंत्रपणेच एखाद्या भाविकाने बुद्धचरित्रात दाखल केली, हे सांगता येणे शक्य नाही.

वर दिलेला सहावा खंड आणि निदानवग्गसंयुत्ताची नं. ४ ते ६ सुत्ते तंतोतंत एकच आहेत. यावरून असे दिसते की, या महापदानसुत्तावरूनच ती सुत्ते घेतली असावीत. गोतम बुद्धाच्या पूर्वीचे सहाही बुद्ध विचार करीत असताना त्यांना ही प्रतीत्यसमुत्पादाची कारणपरंपरा जशी सापडली, तशीच ती गोतमाला देखील बोधिसत्त्वावस्थेत असतानाच सापडली असे निदानवग्गसंयुत्ताच्या दहाव्या सुत्तात वर्णिले आहे. परंतु महावग्गात बुद्ध झाल्यानंतर गोतमाने ही कारणपरंपरा मनात आणली असा आरंभीच उल्लेख आहे. हा प्रतीत्यसमुत्पाद गोतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर एक दोन शतकांनी लिहिला असावा आणि त्याला महत्त्व आणण्यासाठी पूर्वीच्या चरित्रात तो दाखल केला गेला असावा. होता होता खुद्द बुद्धाच्या चरित्रात देखील त्याला विशेष महत्त्व देण्यात आले. याचा परिणाम एवढाच झाला की, चार आर्यसत्यांचे साधे तत्त्वज्ञान मागे पडून या गहन तत्त्वज्ञानाला नसतेच महत्त्व आले.

उद्यानयात्रेचा पाचवा खंड त्रिपिटक वाड्‍ःमयात गोतम बुद्धाच्या चरित्रात मुळीच घालण्यात आला नाही. तो ललितविस्तर, बुद्धचरित्र आणि जातकाची निदानकथा यात जशाचा तसा किंवा थोडीबहुत अतिशयोक्ति करून घेण्यात आला. या शेवटल्या प्रकरणात तर ‘ततो बोधिसत्तो सारथिं सम्म को नाम एसो पुरिसो केसा पिस्स न यथा अञ्‍ञेसं ति महापदाने आगतनयेन पुच्छित्वा’ असे म्हटले आहे. त्यावरून या सर्व ग्रंथकारांनी हा मजकूर महापदानसुत्तावरून घेतला असे सिद्ध होते.

पहिल्या खंडात सांगितल्याप्रमाणे गोतम बुद्धाचे अग्रश्रावक वगैरेंची नावे या सुत्ताच्या प्रस्तावनेत दिलीच आहेत. गोतम बुद्ध क्षत्रिय असल्यामुळे त्याच्या बापाची राजधानी कपिलवस्तु होती असे म्हटले आहे. याशिवाय त्याचे गोत्र गोतम ठरविले आहे. याची चर्चा चौथ्या प्रकरणात केली असून शुद्धोदन कपिलवस्तूत कधीच राहत नव्हता हे सिद्ध केलेच आहे. शाक्यांचे गोत्र आदित्य होते आणि त्यांना शाक्य या नावानेच विशेष ओळखत असत. तसे नसते तर बुद्ध भिक्षूंना शाक्यपुत्रीय श्रमण ही संज्ञा मिळाली नसती. बुद्धाचे गोत्र गोतम असते तर त्यांना गोतम किंवा गोतमक श्रभण म्हणण्यात आले असते.

2 . तळटीपा

१. ह्या सर्व सुत्ताचे भाषांवर चिं.वै.राजवाडेकृत दीघनिकाय, भाग २ यांत दिले आहे.

२. परिणायक म्हणजे मुख्य प्रधान.

संदर्भ