२४८-२६१

भगवान बुद्ध

परिशिष्ट ३: अशोकाचा भाब्रू शिलालेख आणि त्यात निर्देशिलेली सूत्रे

14-10-2017
18-09-2017
18-09-2017
18-09-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

सारांश

पारिभाषिक शब्द

1 . अशोकाचा भाब्रू शिलालेख आणि त्यात निर्देशिलेली सूत्रे

भाब्रू हे स्थान जयपूर संस्थानातील एका डोंगराळ प्रदेशात आहे. तेथे राहणा-या भिक्षुसंघाने अशोक राजापाशी संदेश मागितल्यामुळे अशोकाने हा संदेश पाठविला व तो एका शिलेवर कोरावयास लावला असावा. अशा प्रकारचे संदेश अशोक वारंवार पाठवीत असावा. परंतु त्यांपैकी जे त्याला महत्त्वाचे वाटत, तेच तो शिलांवर किंवा शिलास्तंभावर कोरावयास लावी. ह्या शिलालेखांत निर्देशिलेली सूत्रे मगधदेशातील बौद्धांनी वाचावी असे संदेश तोंडी किंवा पत्राने अशोकाने पाठविलेच असतील; पण ते कोरावयास लावले नाहीत. का की, आसपासचे संघ काय करतात, काय वाचतात, याचे वर्तमान त्याला वारंवार समजत होते. त्यासाठी त्याने खास अधिकारी नेमले होते. परंतु राजपुतान्यासारख्या दूरच्या प्रदेशातून बातम्या येण्यास उशीर लागत होता. तेव्हा असा एक शिलालेख तेथे राहणे अशोकाला योग्य वाटले असावे. माझ्या समजुतीप्रमाणे या शिलालेखाचे भाषांतर खाली देत आहे.

2 . भाब्रू शिलालेखाचे भाषांतर

“प्रियदर्शी मगधराजा संघाला अभिवादन करून संघाचे स्वास्थ्य व सुखनिवास विचारतो. भदन्त, आपणाला, माझा बुद्ध धर्म व संघ यांविषयी किती आदर व भक्ति आहे हे माहीत आहेच. भगवान बुद्धाचे वचन सर्वच सुभाषित आहे. पण, भदन्त, जे मी येथे निर्देशितो ते एवढ्याचसाठी की सद्धर्म चिरस्थायी व्हावा, आणि त्याचसाठी बोलणे योग्य वाटते. भदन्त, हे धर्मपर्याय (सूत्रे) आहेत- विनयसमुकसे, अलियवसानि, अनागतभयानि, मुनिगाथा, मोनेयसूते, उपतिसपसिने आणि राहुलाला केलेल्या उपदेशात खोटे बोलण्याला उद्देशून जे भगवान बुद्धाने भाषण केले ते. ह्या सूत्रांसंबंधाने, भदन्त, माझी इच्छा अशी की, ती पुष्कळ भिक्षूंनी व भिक्षुणींनी वारंवार ऐकावी व पाठ करावी. त्याचप्रमाणे उपासकांनी व उपासिकांनी. भदन्त, हा लेख मी कोरावयास लावला आहे; कारण, माझे अभिहित (संदेश) सर्वजण जाणोत.”

ह्या सात सुत्तांपैकी पहिले विनयसमुत्कर्ष किंवा धर्मचक्रप्रवर्तन. त्याचे रूपांतर पाचव्या प्रकरणात दिलेच आहे (पृ.१०३-१०४). बाकी राहिलेल्या सुत्तांची रूपान्तरे क्रमशः देत आहेत.

3 . अलियवसानि किंवा अरियवंससुत्त

हे सुत्त अंगुत्तरनिकायाच्या चतुक्कनिपातात सापडते. त्याचे रूपांतर येणेप्रमाणे-

भिक्षुहो, हे चार आर्यवंश अग्र व फार दिवसांचे वंश आहेत. ते प्राचीन व असंकीर्ण असून कधीही संकीर्ण झाले नाहीत, संकीर्ण होत नाहीत व संकीर्ण होणार नाहीत. त्यांना कोणत्याही श्रमणांनी व ब्राह्मणांनी दोष लावलेला नाही. ते चार कोणते?

येथे भिक्षु मिळेल तशा चीवराने संतुष्ट होतो, अशा संतुष्टीची स्तुति करतो, चीवरासाठी अयोग्य आचरण करीत नाही, चीवर नाही मिळाले तर त्रस्त होत नाही, मिळाले तर हावरा न होता, मत्त न होता, आसक्त न होता चीवरात दोष जाणून केवळ मुक्तीसाठी ते वापरतो. आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषात दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, भिक्षुहो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु मिळेल तशा भिक्षेने संतुष्ट होतो, अशा संतुष्टीची स्तुति करतो, भिक्षेसाठी अयोग्य आचरण करीत नाही. भिक्षा न मिळाल्यास त्रस्त होत नाही, मिळाल्यास हावरा न होता, मत्त न होता, आसक्त न होता, अन्नात दोष जाणून केवळ मुक्तीसाठी अन्न सेवन करतो; आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषात दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, भिक्षुहो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु कशाही प्रकारच्या निवासस्थानाने संतुष्ट होतो, तशा प्रकारच्या संतुष्टीची स्तुति करतो, निवासस्थानासाठी अयोग्य आचरण करीत नाही, निवासस्थान न मिळाले तर त्रस्त होत नाही, मिळाले तर हावरा न होता, मत्त न होता, आसक्त न होता, निवासस्थानात दोष जाणून केवळ मुक्तीसाठी ते वापरतो आणि त्या आपल्या तशा प्रकारच्या संतुष्टीने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो अशा संतोषात दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाला अनुसरून वागणारा भिक्षु म्हणतात.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु समाधिभावनेत आनंद मानतो, भावनारत होतो, क्लेश नष्ट करण्यात आनंद मानतो, क्लेश नष्ट करण्यात रत होतो. आणि तशा त्या भावनारामतेने आत्मस्तुति व परनिंदा करीत नाही. जो त्या आनंदात दक्ष, सावध, हुशार व स्मृतिमान होतो, त्यालाच प्राचीन अग्र आर्यवंशाप्रमाणे वागणारा भिक्षु म्हणतात.

भिक्षुहो, हे ते चार आर्थवंश... ह्यांना कोणत्याही श्रमणांनी व ब्राह्मणांनी दोष लावला नाही.

भिक्षुहो, ह्या चार आर्यवंशांनी समन्वित झालेला भिक्षु जर पूर्व दिशेला जातो, तर तोच अरतीला जिंकतो, अरति त्याला जिंकीत नाही...... पश्चिम ....... उत्तर ...... दक्षिण दिशेला जातो, तर तोच अरतीला जिंकतो, अरति त्याला जिंकीत नाही. ते का? कारण धीर अरतीवर आणि रतीवर जय मिळवतो.

धीराला जिंकणारी अरति नव्हे. अरति धीरावर जय मिळवू शकत नाही. अरतीला जिंकणारा धीर तो अरतीवर विजय मिळवितो.

सर्व कर्माचा त्याग करणा-या व रागद्वेषादिकांचे निरसन करणा-या त्या धीराच्या आड कोण येईल? शंभर नंबरी सोन्याच्या नाण्यासारख्या त्याला दोष कोण लावील? देवही त्याची प्रशंसा करितात, आणि ब्रह्मदेव देखील प्रशंसा करतो.

4 . अनागतभयानि

हे सुत्त अंगुत्तरनिकायाच्या पञ्चकनिपातात सापडते. त्याचे रूपांतर येणेप्रमाणे-

भिक्षुहो, ही पाच अनागतभये पाहणा-या भिक्षूला अप्राप्त पदाच्या प्राप्तीसाठी, जे जाणले नाही ते जाणण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार झाला नाही त्याच्या साक्षात्कारासाठी,  अप्रमत्तपणे, उद्यमशीलतेने आणि मन लावून वागण्याला पुरे आहेत. ती पाच कोणती?

येथे, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, मी सांप्रत तरुण व यौवनसंपन्न आहे. पण असा एक काळ येईल की, ह्या शरीराला जरा प्राप्त होईल. वृद्धाला, जराजीर्णाला बुद्धाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यात एकान्तवासात राहणे सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय दशा येण्यापूर्वीच म्यां अप्राप्तपदाच्या प्राप्तीसाठी, जे जाणले नाही ते जाणण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार झाला नाही त्याच्या साक्षात्कारासाठी प्रयत्न केलेला बरा! जेणेकरून वृद्धावस्थेत देखील मी सुखाने राहू शकेन. हे पहिले अनागतभय पाहणा-या भिक्षूला... मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, सध्या मी निरोगी आहे, माझा जठराग्नि चांगला आणि प्रयत्नाला अनुकूल आहे. पण असा एक काळ येतो की, हे शरीर व्याधिग्रस्त होते. व्याधिग्रस्ताला बुद्धाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यात एकान्तवासात राहणे सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय अवस्था प्राप्त होण्यापूर्वीच म्यां....... प्रयत्न केलेला बरा! जेणेकरून रुग्णावस्थेत देखील मी सुखाने राहू शकेन. हे दुसरे अनागत भय पाहणा-या भिक्षूला........मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, सध्या सुभिक्ष आहे, भिक्षा सहज मिळते, भिक्षेवर निर्वाह करणे सोपे आहे. पण असा एक काळ येतो की, दुर्भिक्ष होते, धान्य पिकत नाही, भिक्षा मिळणे कठिण जाते, भिक्षेवर निर्वाह करणे सोपे नसते. अशा दुर्भिक्षात लोक जिकडे सुभिक्ष असेल तिकडे जातात. तेथे गर्दी होते. तशा ठिकाणी बुद्धाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यात एकान्तवासात राहणे सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय परिस्थिति प्राप्त होण्यापूर्वीच.... प्रयत्न केलेला बरा! जेणेकरून मी दुर्भिक्षात देखील सुखाने राहू शकेन. हे तिसरे अनागत भय पाहणा-या भिक्षूला.... मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, आजला लोक मुदित मनाने न भांडता दूध आणि पाणी यांच्याप्रमाणे सख्याने परस्परांविषयी प्रेमदृष्टि ठेवून वागतात. पण असा एक काळ येतो की, एखादे भीतिप्रद बंड उपस्थित होते. लोक चीजवस्तू घेऊन यानाने किंवा पायी इकडे तिकडे पळत सुटतात. अशा संकटसमयी लोक जेथे सुरक्षित स्थान मिळेल, तेथे गोळा होतात. तेथे गर्दी होते. तशा ठिकाणी बुद्धाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यात एकांतवासात राहणे सुकर नाही, ती अनिष्ट अप्रिय परिस्थिति प्राप्त होण्यापूर्वीच.... प्रयत्न केलेला बरा! जेणे करून तशा संकटात देखील मी सुखाने राहू शकेन. हे चवथे अनागतभय पाहणा-या भिक्षूला मन... लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

पुनरपि, भिक्षुहो, भिक्षु असा विचार करतो की, आजला संघ समग्र समुदित, भांडणावाचून एका ध्येयाने चालत आहे. पण असा एक काळ येतो की, संघात फूट पडते. संघात फूट पडली, तर बुद्धाच्या धर्माचे मनन सुकर नाही, अरण्यात एकांतवासात राहणे सुकर नाही. ती अनिष्ट अप्रिय परिस्थिति प्राप्त होण्यापूर्वीच.... प्रयत्न केलेला बरा! जेणेकरून त्या प्रतिकूल परिस्थितीत देखील मी सुखाने राहू शकेन. हे पाचवे अनागतभय पाहणा-या भिक्षूला... मन लावून वागायला लावण्यास पुरे आहे.

भिक्षुहो, ही पाच अनागतभये पाहणा-या भिक्षूला, अप्राप्त पदाच्या प्राप्तीसाठी, जे जाणले नाही ते जाणण्यासाठी, ज्याचा साक्षात्कार झाला नाही त्याच्या साक्षात्काराठी, अप्रमत्तपणे, उद्यमशीलतेने आणि मन लावून वागायला लावण्यास पुरे आहेत.

5 . मुनिगाथा

हे मुनिसुत्त या नावाने सुत्तनिपातात सापडते. त्याचे भाषांतर येणेप्रमाणे-

स्नेहामुळे भय उत्पन्न होते व घरापासून मळ उद्भवतो; यास्तव अनागारिकता आणि नि:स्नेहता हेच मुनीचे तत्त्वज्ञान समजावे. १

जो उद्भवलेल्या मनोदोषाचा उच्छेद करून त्याला पुनः वाढू देत नाही व त्याविषयी स्नेह बाळगीत नाही, त्या एकाकी राहणा-याला मुनि म्हणतात. त्या महर्षीने शान्तिपद पाहिले. २

पदार्थ व त्यांची बीजे जाणून जो त्यांना स्नेह (ओलावा) देत नाही, तो खरोखर जन्मक्षयान्तदर्शी मुनि होय. तो तर्क सोडून देऊन नामाभिधान (जन्म) पावत नाही. ३

जो सर्व अभिनिवेश जाणतो व त्यांपैकी एकाचीही इच्छा धरीत नाही, तो वीततृष्ण निर्लोभी मुनि अस्थिर होत नाही; कारण तो पार जातो. ४

जो सर्व जिंकणारा, सर्व जाणणारा, सुबुद्धि, सर्व पदार्थांपासून अलिप्त राहणारा, सर्वत्यागी व तृष्णेचा क्षय झाल्याने मुक्त झालेला, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ५

प्रज्ञा ज्याचे बळ, जो शीलाने व व्रताने संपन्न, समाहित, ध्यानरत, स्मृतिमान, संगापासून मुक्त, काठिण्यरहित व अनाश्रव, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ६

एकाकी राहणारा, अप्रमत्त, मुनि, निंदेने आणि स्तुतिने न गडबडणारा, सिंहाप्रमाणे शब्दांना न घाबरणारा, वा-याप्रमाणे जाळ्यात न अडकणारा, पाण्यातील कमलाप्रमाणे अलिप्त राहणारा, इतरांचा नेता असून ज्याला नेता नाही, अशा त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ७

ज्याच्याविषयी लोक वाटेल ते बोलले, तरी जो घाटावरील स्तंभाप्रमाणे स्थिर राहतो, जो वीतराग व सुसमाहितेंद्रिय, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ८

जो स्थितात्मा घोट्याप्रमाणे सरळ जातो, पापकर्मांचा तिरस्कार करतो, विषमाची आणि समाची पारख करतो, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ९

लहान असो वा मध्यम वयाचा असो, जो संयतात्मा मुनि पाप करीत नाही, जो यतात्मा रागावत नाही व दुस-या कोणालाही राग आणीत नाही, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. १०

इतरांनी दिलेल्या अन्नावर उपजीविका करणारा, जो शिजविलेल्या अन्नातून आरंभी, मध्याला अथवा शेवटी भिक्षा मिळाली असता स्तुति किंवा निंदा करीत नाही, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. ११

जो मुनि स्त्रीसंगापासून विरत झाला, तारुण्यात असूनही कोठेच बद्ध होत नाही, जो मदप्रमादापासून विरत, जो मुक्त, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. १२

इहलोक जाणुन ज्याने परमार्थ पाहिला, ओघ व समुद्र तरून ती तादृग्भाव पावला, ज्याने बंधने (ग्रंथि) तोडली, जो अनाश्रित व अनाश्रव, त्याला सुज्ञ लोक मुनि म्हणतात. १३

बायकोला पोसणारा गृहस्थ आणि निर्मम मुनि या दोघांची राहणी व वृत्ति फार भिन्न आहे. कारण, प्राणघात होऊ न देण्याविषयी गृहस्थ संयम बाळगीत नाही, पण मुनि सदोदित प्राण्यांचे रक्षण करतो. १४

जसा आकाशात उडणारा नीलग्रीव मोर हंसाच्या वेगाने जाऊ शकत नाही, तसा गृहस्थ एकान्ती वनात ध्यान करणा-या भिक्षु मुनीचे अनुकरण करू शकत नाही. १५

6 . मोनेय्यसुत्त

हे ‘नालकसुत्त’ या नावाने सुत्तनिपातात आढळते. याच्या प्रास्ताविक गाथा २० आहेत. त्यांचे भाषांतर येथे देत नाही. जिज्ञासूंनी जून १९३७ चा विविधज्ञानविस्ताराचा अंक पाहावा. त्यात या सुत्ताचे प्रास्ताविक गाथांसह भाषांतर दिले आहे. नालक असित ऋषीचा भाचा. तो अल्पवयी होता तेव्हा गोतम बोधिसत्त्व जन्मला. असितऋषीने बोधिसत्त्वाचे भविष्य वर्तविले की, तो थोर मुनि होणार. आणि नालकाला गोतम बुद्धाच्या धर्माला अनुसरण्याचा त्याने उपदेश केला. नालक मामाच्या वचनावर श्रद्धा ठेवून गोतम बोधिसत्त्व बुद्ध होईपर्यंत तापसी होऊन राहिला; आणि जेव्हा गोतमाला बुद्धपद प्राप्त झाले, तेव्हा त्याजपाशी येऊन त्याने मौनेयाबद्दल प्रश्न विचारले. त्या प्रश्नापासून या सुत्ताला सुरवात होते.

(तू श्रेष्ठ मुनि होणार) हे असिताचे वचन यथार्थ आहे असे मी जाणले. आणि म्हणून सर्व वस्तुजाताच्या पार गेलेल्या गोतमाला मी विचारतो. १

हे मुने, गृहत्याग करून भिक्षेवर उपजीविका करणा-याला उत्तम पद असे मौनेय कोणते हे विचारतो, ते मला सांग. २

मौनेय कोणते हे मी तुला सांगतो - असे भगवान म्हणाला - ते दुष्कर अणि दुरभिसंभव आहे. तथापि मी ते तुला सांगतो. संभाळून वाग व दृढ हो. ३

गावात कोणी निंदा केली किंवा स्तुति केली असता सर्वांविषयी समानभाव बाळगावा. मनातल्या मनात क्रोध आवरावा. शांत आणि निगर्वी व्हावे. ४

पेटलेल्या अरण्यातील अग्निज्वालांप्रमाणे गावात स्त्रिया फिरतात. या मुनीला भुलवितात. त्यांनी तुला मोहात पाडू नये याबद्दल सावध राहा. ५

लहानमोठे कामोपभोग सोडून स्त्रीसंगापासून विरत हो. स्थिरचर प्राण्यांचा विरोध आणि आसक्ति सोड. ६

जसा मी तसे हे, व जसे ते तसा मी, असे आपल्या उदाहरणाने जाणून कोणाला मारू नये व मारवू नये. ७

ज्या इच्छेत आणि लोभात सामान्यजन बद्ध होतो, त्या इच्छेचा आणि लोभाचा त्याग करून चक्षुष्मन्ताने हा नरक तरून पार जावे. ८

पोटभर चापून न खाणारा, मिताहारी, अल्पेच्छ व अलोलुप व्हावे. तोच इच्छा सोडून तृप्त झालेला अनिच्छ शांत होतो. ९

मुनीने भिक्षाटन करून वनात यावे व तेथे झाडाखाली आसनावर बसावे. १०

त्या ध्यानरत धीर पुरुषाने वनात आनंद मानावा. त्याने झाडाखाली बसून मनाला संतोषवीत ध्यान करावे. ११

त्यानंतर रात्र संपल्यावर गावात यावे. तेथे मिळालेल्या आमंत्रणाने किंवा भेटीने उल्लसित होऊ नये. १२

मुनीने गावातील कुटुंबाशी सलगी करू नये. भिक्षेसंबंधी काही बोलू नये, सूचक शब्द उच्चारू नयेत. १३

भिक्षा मिळाली तरी चांगले, न मिळाली तरी चांगले. दोन्हीविषयी तो समभाव ठेवतो व (आपल्या राहण्याच्या) झाडापाशी येतो. १४

हातात भिक्षापात्र घेऊन फिरणा-याने त्याने मुका नसता मुक्यासारखे वागावे आणि मिळालेल्या अल्प भिक्षेचा तिरस्कार व दात्याचा अनादर करू नये. १५

श्रमणाने (बुद्धाने) हीन मार्ग कोणता व उत्तम मार्ग कोणता याचे स्पष्टीकरण केले आहे. संसाराच्या पार दोनदा जात नसतात, तरी पण ज्ञान एकाच प्रकारचे असते असे नाही. १६

ज्या भिक्षूला आसक्ति नाही, ज्याने संसारस्त्रोत तोडले व जो कृत्याकृत्यापासून मुक्त झाला, त्याला परिदाह राहत नाही. १७

तुला मी मौनेय सांगतो, - असे भगवान म्हणाला - क्षुरधारेवरील मध चाटणा-या माणसाप्रमाणे सावध व्हावे; जीभ ताळूला लावून देखील जेवणात संयम बाळगावा. १८

सावधचित्त व्हावे, पण फार चिंतनही करू नये; हीन विचारापासून मुक्त, अनाश्रित आणि ब्रह्मचर्यपरायण व्हावे. १९

एकांतवासाची आणि श्रमणोपासनेची (ध्यानचिंतनाची) आवड धरावी. एकाकीपणाला मौन म्हणतात. जर एकाकी राहण्यात तुला आनंद वाटू लागेल. २०

तर ध्यानरत कामत्यागी धीरांचे वचन ऐकून तू दशदिशा प्रकाशित करशील. तरी (त्या पदाला पोचलेल्या) माझ्या श्रावकाने ऱ्ही (पापलज्जा) आणि श्रद्धा वाढवावी. २१

ते नद्यांच्या उपमेने जाणावे. ओढे धबधब्यावरून खिंडीतून मोठा आवाज करीत वाहतात; पण मोठ्या नद्या संथपणे जातात. २२

जे उथळ ते खळखळते, पण जे गंभीर ते संथच असते. मूढ अर्ध्या घड्याप्रमाणे खळखळतो; पण सुज्ञ गंभीर जलऱ्हदाप्रमाणे शांत असतो. २३

श्रमण (बुद्ध) जे पुष्कळ बोलतो ते योग्य आणि उपयुक्त असे जाणून बोलतो. जाणून तो धर्मोपदेश करतो व जाणून पुष्कळ बोलतो. २४

पण जो संयतात्मा जाणत असूनही पुष्कळ बोलत नाही, तो मुनि मौनाला योग्य आहे, त्या मुनीने मौन जाणले. २५

7 . उपतिसपसिने

हे ‘सारिपुत्तसुत्त’ या नावाने सुत्तनिपातात सापडते. अट्ठकथेत याला थेरपञ्ह असेही म्हटले आहे. त्यावरून असे दिसते की याला सारिपुत्तपञ्ह किंवा उपतिस्सपञ्ह असेही म्हणत असावे. याचे भाषांतर येणेप्रमाणे-

आयुष्यमान् सारिपुत्त म्हणाला, - असा गोड बोलणारा, संतुष्ट व संघाचा पुढारी शास्ता, मी यापूर्वी पाहिला नाही किंवा ऐकला नाही. १

सर्व तमाचा नाश करून श्रमणधर्मांत रत झालेला असा हा सदेवक जगाला एकच चक्षुष्मान् दिसत आहे. २

अनाश्रित व अदांभिक अशा त्या बुद्धपदाला पावलेल्या संघनायकापाशी मी पुष्कळ बद्ध माणसांच्या हितेच्छेने प्रश्न विचारण्यास आलो आहे. ३

संसाराला कंटाळून झाडाखाली स्मशानात किंवा पर्वतांच्या गृहांमध्ये एकांतवास सेवन करणा-या भिक्षूला. ४

तशा त्या ब-यावाईट स्थळी भये कोणती? त्या निःशब्द प्रदेशात कोणत्या भयांना त्या भिक्षूने घाबरता कामा नये?  ५

अमृत दिशेला जाण्यासाठी सुदूर प्रदेशात वास करणा-या भिक्षूने कोणती विघ्ने सहन केली पाहिजेत?  ६

त्या दृढनिश्चयी भिक्षूची वाणी कशी असावी? त्याची राहणी कशी असावी? आणि त्याचे शील व व्रत कसे असावे? ७

सोनार जसा रुपे आगीत घालून त्यातील हिणकस काढतो, त्याप्रमाणे समाहित, सावध आणि स्मृतिमान् भिक्षूने कोणता अभ्यासक्रम स्वीकारून आपले मालिन्य जाळून टाकावे? ८

भगवान म्हणाला, हे सारिपुत्त, संसाराला कंटाळून एकान्तवास सेवन करणा-या संबोधिपरायण भिक्षूचे जे मला कर्तव्य वाटते ते मी तुला सांगतो? ९

एकान्तवासात राहणा-या स्मृतिमान् धीर भिक्षूने पाच भयांना भिऊ नये. डासांच्या चावण्याला, सर्पांना, मनुष्यांच्या उपद्रवाला, चतुष्पदांना. १०

आणि परधर्मिकांना घाबरू नये. परधर्मिकांची पुष्कळ भेसूर कृत्ये पाहून देखील त्यांना घाबरू नये. आणि त्या कुशलान्वेषी भिक्षूने दुसरीही विघ्ने सहन करावी. ११

रोगाने आणि भुकेने उत्पन्न होणारा त्रास, थंडी व उन्हाळा त्याने सहन करावा. त्या विघ्नांची अनेकविध बाधा झाली, तरी अनागरिक राहून त्याने आपला उत्साह, पराक्रम दृढ करावा. १२

त्याने चोरी करू नये, खोटे बोलू नये, स्थिरचर प्राण्यांवर मैत्रीची भावना करावी आणि मनाचा कलुषितपणा मारपक्षीय जाणून दूर करावा. १३

त्याने क्रोधाला व अतिमानाला वश होऊ नये, त्यांची पाळेमुळे खणून काढावी आणि खात्रीने वृद्धमार्गगामी होऊन प्रियाप्रिय सहन करावे. १४

कल्याणप्रिय माणसाने प्रज्ञेला महत्त्व देऊन ती विघ्ने सहन करावी, एकांतवासात असंतोष वाटला, तर तोही सहन करावा, आणि चार शोकप्रद गोष्टी सहन कराव्या. १५

(त्या ह्या-) मी आज काय खाईन वा कोठे जेवीन, गेल्या रात्री झोप न आल्यामुळे त्रास झाला, आज कोठे झोपावे? अनागरिक शैक्ष्याने (सेख) हे (चार) वितर्क त्यागावे. १६

वेळोवेळी अन्न आणि वस्त्र मिळाले असता त्यात प्रमाण ठेवावे, अल्पसंतोषी व्हावे. त्या पदार्थांपासून मनाचे रक्षण करणा-या व गावात संयमाने वागणा-या भिक्षूने, इतरांनी राग येण्याजोगे कृत्य केले असताही कठोर वचन बोलू नये. १७

त्याने आपली दृष्टि पायांपाशी ठेवावी, चंचळपणे चालू नये, ध्यानरत व जागृत असावे, उपेक्षेचा अवलंब करून चित्त एकाग्र करावे, तर्क आणि चांचल्य यांचा नाश करावा. १८

त्या स्मृतिमन्ताने आपले दोष दाखविणा-यांचे अभिवादन करावे, सब्रह्मचा-यांविषयी कठोरता बाळगू नये, प्रसंगोपात्त चांगलेच शब्द बोलावे, लोकांच्या वादविवादात शिरण्याची इच्छा धरू नये. १९

तदनंतर स्मृतिमन्ताने जगातील पाच रजांचा त्याग करण्यास शिकावे. (म्हणजे) रूप, शब्द, गंध, रस आणि स्पर्श (या पाच रजांचा) यांचा लोभ धरू नये. २०

या पदार्थांचा छन्द सोडून तो स्मृतिमान्, सुविमुक्तचित्त, वेळोवेळी सद्धर्माचे चिंतन करणारा, एकाग्रचित्त भिक्षु अंधकाराचा नाश करण्याला समर्थ होईल (असे भगवान म्हणाला). २१

8 . राहुलोवादसुत्त

याला चूळराहुलोवाद आणि अम्बलट्ठिकराहुलोवाद असेही म्हणतात. हे मज्झिमनिकायात आहे. त्याचा गोषवारा असा-

एके समयी बुद्ध भगवान राजगृहापाशी वेणुवनात राहत होता, व राहुल अम्बट्ठिका नावाच्या ठिकाणी राहत होता. एके दिवशी संध्याकाळी भगवान ध्यानसमाधि आटपून राहुल राहत होता तेथे गेला. राहुलाने भगवंताला दुरून पाहून आसन मांडले व पाय धुण्यासाठी पाणी आणून ठेवले. भगवान आला व त्या आसनावर बसून त्याने पाय धुतले. राहुल भगवन्ताला नमस्कार करून एक बाजूला बसला.

भगवन्ताने पाय धुण्याच्या पात्रात स्वल्प पाणी शिल्लक ठेवले, आणि भगवान राहुलाला म्हणाला, “राहुल, हे तु स्वल्प पाणी पाहतोस काय?”

“होय भदन्त,” राहुलाने उत्तर दिले.

“राहुल, ज्यांना खोटे बोलण्याला लाज वाटत नाही, त्यांचे श्रामण्य या पाण्याप्रमाणे क्षुल्लक आहे.”

नंतर ते पाणी फेकून देऊन भगवान म्हणाला, “राहुल, हे फेकलेले पाणी तू पाहतोस ना?”

“होय भदन्त,” असे राहुलाने उत्तर दिले.

“राहुल, ज्यांना खोटे बोलण्याला लाज वाटत नाही त्यांचे श्रामण्य या पाण्याप्रमाणे त्याज्य आहे.”

नंतर ते पात्र पालथे करून भगवान म्हणाले, “राहुल, ज्यांना खोटे बोलण्याला लाज वाटत नाही त्यांचे श्रामण्य या भांडयाप्रमाणे पालथे समजले पाहिजे.”

नंतर ते सुलटे करून भगवान म्हणाला, “राहुल, हे रिकामे पात्र तू पाहत आहेस ना?”

“होय भदन्त,” राहुलाने उत्तर दिले.

“राहुल, ज्यांना खोटे बोलण्याला लाज वाटत नाही, त्यांचे श्रामण्य ह्या भांड्याप्रमाणे रिकामे आहे.”

“हे राहुल, लढाईसाठी सज्ज केलेला राजाचा मोठा हत्ती, पायांनी लढतो, डोक्याने लढतो, कानांनी लढतो, दातांनी लढतो, शेपटीने लढतो, पण एक तेवढी सोंड राखतो. तेव्हा माहुताला वाटते की, एवढा मोठा हा राजाचा हत्ती सर्व अवयवांनी लढतो, फक्त सोंड राखतो; संग्रामविजयाला त्याने जीवित अर्पण केले नाही. जर त्या हत्तीने इतर अवयवांबरोबर सोंडेचाही पूर्णपणे उपयोग केला तर माहुत समजतो की, हत्तीने संग्रामविजयाला आपले जीवित अर्पण केले आहे, आता त्याच्यात कमीपणा राहिला नाही. त्याचप्रमाणे ज्यांना खोटे बोलण्यास लाज वाटत नाही, त्यांनी कोणतेही पाप सोडले नाही असे मी म्हणतो. म्हणून, हे राहुल, थट्टेने देखील खोटे बोलावयाचे नाही असा अभ्यास कर.

“राहुल, आरशाचा उपयोग कोणता?”

“प्रत्यवेक्षण (निरीक्षण) करण्यासाठी, भदन्त,” राहुलाने उत्तर दिले.

“त्याचप्रमाणे, राहुल, पुनःपुनः प्रत्यवेक्षण (नीट विचार) करून कायेने, वाचेने आणि मनाने कर्मे करावी.”

“जेव्हा तू, राहुल, कायेने, वाचेने अथवा मनाने एखादे कर्म करू इच्छिशील, तेव्हा प्रथमत: त्याचे प्रत्यवेक्षण कर आणि ते जर आत्मपरहिताच्या आड येणारे व परिणामी दुःखकारक असे दिसून आले तर ते मुळीच अमलात आणू नकोस. पण ते आत्मपरहिताच्या आड येणारे नसून परिणामी सुखकारक आहे असे दिसून आले, तर ते आचर.”

“कायेने, वाचेने अथवा मनाने कर्म आरंभिले असताही त्याचे प्रत्यवेक्षण कर आणि ते आत्मपरहिताच्या आड येणारे असून परिणामी दु:खकारक आहे असे दिसून आल्यास तेवढ्यावरच सोडून दे. पण ते आत्मपरहिताच्या आड येणारे नसून परिणामी सुखकारक आहे असे दिसून आल्यास, वारंवार करीत जा.”

“कायेने, वाचेने अथवा मनाने कर्म केल्यानंतर देखील तू त्याचे प्रत्यवेक्षण कर आणि ते कायिक अथवा वाचसिक कर्म आत्मपरहिताच्या आड येणारे व परिणामी दुःखकारक होते असे दिसून आल्यास शास्त्यापाशी किंवा विद्वान् सब्रह्मचा-यापाशी तू त्या पापाचा आविष्कार कर (ते कबूल करावे), आणि पुनः आपणाकडून तसे कर्म घडू नये अशी काळजी बाळग. ते मनःकर्म असेल, तर त्याबद्दल पश्चाताप कर, लाज धर, व पुनः तो विचार मनात येऊ देऊ नकोस. पण कायेने, वाचेने अथवा मनाने केलेले कर्म आत्मपरहिताच्या आड येणारे नसून परिणामी सुखकारक होते असे दिसून आल्यास मुदित मनाने ते कर्म पुन: पुन: करण्याला शीक.”

“हे राहुल, अतीतकाली ज्या श्रमणब्राह्मणांनी आपली कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्मे परिशुद्ध केली, त्यांनी ती पुनःपुनः प्रत्यवेक्षण करूनच परिशुद्ध केली. भविष्यकाली जे श्रमणब्राह्मण ही कर्मे परिशुद्ध करितील ते पुनःपुनः प्रत्यवेक्षण करूनच ही कर्मे परिशुद्ध करितील. सांप्रत जे श्रमणब्राह्मण ही कर्मे, परिशुद्ध करतात, ते पुनःपुनः प्रत्यवेक्षण करूनच ही कर्मे परिशुद्ध करतात. म्हणून हे राहुल, पुनःपुन: प्रत्यवेक्षण करून कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्मे परिशुद्ध करण्यास शीक.”

असे भगवान बोलला. आयुष्मान् राहुलने मुदित मनाने भगवन्ताच्या भाषणाचे अभिनंदन केले.

ह्या सात सुत्तांपैकी सुत्तनिपातात असलेली, मुनिगाथा, नाळकसुत्त व सारिपुत्तसुत्त ही तीन पद्यात व बाकी चार गद्यात आहेत. गद्य सुत्तात पुनरुक्ति फार आढळते. त्या काळच्या वाड्‍ःमयाची ही पद्धति समजली पाहिजे. का की, जैनांच्या सूत्रांत आणि काही ठिकाणी उपनिषदात देखील पुनरुक्ति आहे. पण ती त्रिपिटकात एवढी आहे की, हे सर्व पूर्ववत् असावे असे वाचकाला वाटते आणि एखादा महत्त्वाचा मुद्दा त्या पुनरुक्तीत तसाच राहून जातो; त्याच्याकडे वाचकाचे लक्ष जात नाही. उदाहरणार्थ, ह्या राहुलोवादसुत्तात कायिक, वाचसिक आणि मानसिक कर्मांच्या प्रत्यवेक्षणात तोच तोच मजकूर पुन:पुन: आला आहे. परंतु कायिक आणि वाचसिक अकुशल कर्म आचरणात आले तर शास्त्यापाशी किंवा विद्वान् सब्रह्मचा-यांपाशी त्याचा आविष्कार करावा, व तसे कर्म पुनः होऊ देऊ नये असे म्हटले आहे. मानसिक अकुशलाला हा नियम लागू केला नाही. का की, विनयपिटकात कायिक आणि वाचसिक दोषांनाच आविष्कारादिक (पापदेशना इत्यादिक) प्रायश्चित्ते सांगितली आहेत; मनोदोषासाठी प्रायश्चित्तविधान नाही. त्याला प्रायश्चित्त म्हटले म्हणजे त्याबद्दल पश्चात्ताप करावा व लाज धरावी आणि तसा अकुशल विचार पुनः मनात आणू नये. कायिक व वाचसिक अकुशल कर्मातील आणि मानसिक अकुशल कर्मातील हा फरक राहुलोवादसुत्त वरवर वाचणा-याच्या लक्षात यावयाचा नाही.

अशोकाच्या वेळी ही सर्व सुत्ते अशीच होती, की संक्षिप्त होती हे सांगता येणे कठीण आहे. ती संक्षिप्त असली तरी सारभूत मजकूर हाच होता यात शंका नाही. सुत्तपिटकातील प्राचीनतम सुत्ते ओळखण्याला ही सात सुत्ते फार उपयोगी आहेत.

9 . तळटीपा

१.  ब्राह्मण प्राचीन वंशपरंपरेला फार महत्त्व देत. पण ती परंपरा महत्वाची नसून ह्या सुत्तात वर्णिलेली आर्यवंशपरंपराच महत्त्वाची, तिला श्रमणब्राह्मण दोष लावू शकत नाही, असा येथे ध्वन्यर्थ आहे.

२.  पालि शब्द ‘पमाय’ टीकाकाराने याचा ‘हिंसित्वा वधित्वा’ असा अर्थ केला आहे. पण प्रपूर्वक मा धातूचा अर्थ मोजणे, किंवा यथार्थतया जाणणे असा होतो.

३.  नदीच्या घाटावर चौकोनी किंवा अष्टकोनी खांब बांधीत असत. त्यावर सर्व जातीचे लोक स्नान करताना पाठ घाशीत.

४.  घोटा विषम व सम धाग्यातून सरळ जातो व धाग्यात बद्ध होत नाही, त्याप्रमाणे सरळ जातो.

५.  संतुष्ट शब्दाबद्दल मुळात ‘तुसितो’ आहे. पण अट्ठकथेत तुसिता असा पाठ असून त्याचा तुषितदेवलोकातून इहलोकी आलेला असा अर्थ केला आहे.

६.  हा एक प्रासाद होता असे अट्ठकथेत म्हटले आहे. पण ते संभवनीय दिसत नाही. राजगृहापाशी हा एक गाव होता असे वाटते.

७. कानांनी बाण बचावण्याचे काम करतो, शेपटीला बांधलेल्या दगडी किंवा लोखंडी दांड्याने फोडतोड करतो, असा अट्ठकथेत अर्थ केला आहे.

८. असत्य राखून इतर पापांचा त्याग केला, तर श्रमण खरा योद्धा नव्हे; त्याने श्रामण्याला आपले जीवित अर्पण केले नाही.

संदर्भ