0 Reviews | Write Review
340 / $5 340.00 / $ 5.00
Shipping Charges
1. Minimum shipping charges will be Rs. 30/-
2. FREE delivery in Maharashtra on order above Rs 1500/-
3. Shipping charges for international orders at actual.
Summary of Book
परंपरागत पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रीला वस्तुमूल्य दिल्यामुळे पुरुषाच्या नजरेतून स्त्री ही वंशवृद्धी, कामोपभोग अशा त्याच्या दैनिक, नित्याच्या गरजा भागविणारी एक वस्तू' असाच सतत तिचा दर्जा राहिला. त्यामुळे 'स्त्री आणि पुरुष ही दोन स्वतंत्र व्यक्तिमत्त्वं' असा त्यांना एका पातळीवर घेऊन विचार करण्यात आला नाही. आज एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला या विचारपद्धतीमध्ये फारसा बदल झालेला नाही. काही अपवादात्मक माणसांनी परंपरेच्या विरोधात जाऊन स्त्रीपुरुष नात्याविषयी काही सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा या विषयासंबंधी विचार करण्याऐवजी समाजाने त्यांची बदनामी आणि निंदानालस्तीच केली.
स्त्रीपुरुष नात्यासंबंधाने मोकळेपणाने, निकोप, स्वच्छ दृष्टीने आजही चर्चा केली जात नाही. या नात्यात 'लैंगिकता' हाच घटक मुख्य मानून त्याविषयी कुजबूज करणं, अफवा पसरवणं अथवा ‘लफडं' म्हणून त्याची संभावना करणं या गोष्टी अधिक प्रमाणात होताना दिसतात. त्यामुळे हा विषय घेताना लिहिणारे त्याला कशा पद्धतीने प्रतिसाद देतील, प्रतिक्रिया देतील, यासंबंधी मनात अनेक गोष्टी होत्या. लोक मोकळेपणाने लिहितील, बोलतील का, हा प्रश्न होता. अतिशय वैयक्तिक अथवा खाजगी, नाजूक मानली गेलेली ही गोष्ट असल्यामुळे प्रामाणिकता हा निकष कितपत सांभाळला जाईल याविषयी शंका होती. यासाठी अपेक्षित लेखकांशी पत्रव्यवहार सुरू केला, तेव्हा अतिशय वेगवेगळ्या प्रतिक्रिया मिळाल्या. एकतर पत्र पाठवून झाल्यानंतर सुमारे दीड ते दोन महिन्यांनंतर होकार अथवा नकार कळविणारी पत्रं येऊ लागली.
विषय चांगला घेतलाय, इथून सुरुवात करून पुढे विषय डोक्यावरून जातोय,विषय बाळबोध आहे, स्त्रीपुरुष नातेसंबंधांविषयी लिहायचं म्हणजे आयुष्यात आलेल्या मित्रमैत्रिणींविषयी लिहायचं का, स्त्रीपुरुष नात्याचा मला उद्वेग आलाय - इथपर्यंत प्रतिक्रिया आल्या. तर काहींनी सुरुवातीला लिहायचं मान्य करून नंतर असमर्थता व्यक्त केली. काहींनी चर्चा केल्यानंतर लिहायचं मान्य केलं.
ज्यांनी लिहिलंय, जे बोललेत, त्यांनी अतिशय मन:पूर्वक आणि गांभीर्यानं ते केलंय. यात काही लेखक, लेखिकांनी बाजूला उभं राहून समोर दिसणारं मांडलंय, काहींनी मध्याशी उभं राहून भोवतालचं सांगण्याचा प्रयत्न केलाय, काहींनी मूठ बंद ठेवून आजूबाजूचं दाखवलंय, काहींनी स्वत:ला त्यात ठेवूनही अंगाला पान लावून न घेता चतुराईने सारं ओलांडलंय, तर काहींनी स्वत:ला तावूनसुलाखून शोधलंय. कुठल्याही आवरणाची आवश्यकता त्यांना वाटलेली नाहीये.
सोबत दिलेलं टिपण साऱ्या लेखकांना पाठवलं होतं. त्यात म्हटल्याप्रमाणे, हे आम्हाला पडलेले प्रश्न होते, आहेत. अंकातील लेखन समोर आल्यावर आमच्या मनाशी, मेंदूशी असलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत का, असा विचार करताना जाणवलं ते असं, की यातून आणखी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नच समोर आलेले आहेत. अशा प्रकारच्या प्रश्नांची काही निश्चित किंवा ठाम उत्तरं नसतात हे मनाशी होतंच. तरीही शोध घेणं ही आमच्या मनाची तीव्रतर गरज होती. त्यामुळे एवढ्या लेखनानंतरही ठामपणे काही निष्कर्षापर्यंत येता आलेलं नाही, हे मान्य करूनही एका प्रश्नाने पुन्हा अनेक नवे प्रश्न निर्माण केलेले आहेत, हेदेखील आम्ही महत्त्वाचं मानतो.
स्त्रीपुरुषांसंबंधी रूढी, नियम या मनुष्यनिर्मित गोष्टी आहेत आणि व्यक्तीच्या इच्छा, भावभावना, भुका ही जीवशास्त्रीय सत्यं आहेत. परंपरागत व्यवस्थेत स्त्रीला दुय्यम वा गौण स्थान मिळणं, तिला ‘अबला' असं संबोधलं जाणं याचं मूळ पुरुषाला स्त्रीमधील सर्व प्रकारची शक्ती माहीत होणं, असणं यात आहे. स्त्रीची आंतरिक आणि बाह्य, मानसिक आणि शारीरिक, दोन्ही प्रकारची ताकद त्याला कळल्यामुळेच कदाचित स्वत:च्याही नकळत पुरुषाच्या मनात स्त्रीसंबंधी एक प्रकारची भीती असावी. त्यामुळेच पुरुषत्वाच्या विकृत कल्पनेची बीजं रोवली गेली असावीत. त्यातून स्त्रियांसाठी वागणुकीचे वेगवेगळे आदर्श निर्माण करण्यात आले. स्त्रीने मोठ्याने हसू-बोलू नये, खाली पाहून चालावं, पुरुषाच्या नजरेला नजर भिडवून बोलू नये, पुरुष आसनावर बसलेला असेल तर तिनं जमिनीवर बसावं, (काही खेड्यांमध्ये अजूनही स्त्रिया गावातून चालताना वहाणा हातात घेऊन चालतात - थोरामोठ्यांसमोर त्या पायात घालायच्या नसतात.) पती जेवल्यानंतर त्याच्या उष्ट्या ताटातच जेवावं. असे कितीतरी नियम आणि रिवाज. पती हाच परमेश्वर मानावा असं मुलीला सांगितलं जातं, परंतु पतीनेही पत्नीला देवीच्या रूपात बघावं, असं कुठेही सांगितलेलं नाही. स्त्रीपुरुष हे एकमेकांना पूरक आहेत, असं म्हणत असतानाच पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी नीतिनियमांच्या वेगवेगळ्या कसोट्या, निकष बनविण्यात आले. त्यांच्या जगण्याच्या स्तरात सतत विषमता ठेवण्यात आली. नीती-अनितीच्या गोष्टी स्त्रियांसाठी काटेकोर करण्यात आल्या आणि नीती-अनिती ही गोष्ट सतत 'लैंगिक वर्तणुकीशी' जोडण्यात आली.
बदलत्या सामाजिक वास्तवात आता या गोष्टी टिकणाऱ्या नाहीत. सामाजिक आर्थिक बदलांचा परिणाम स्त्रीपुरुष नात्यावरदेखील होणारच. स्वत:ला अधिक डोळसपणे पाहण्याची वृत्ती स्त्रीमध्ये निर्माण झाल्यामुळे 'व्यक्ती' म्हणून असलेल्या आपल्या नैसर्गिक हक्कांची जाणीव तिला होते आहे. यात समाजाने हवालदिल होण्यासारखं काही नाही. तरीही तो खूप मोठ्या प्रमाणात विचलित झाल्यासारखा, स्त्रीच्या कर्तृत्वाने भांबावल्यासारखा दिसतो. खरं तर स्त्रीमधल्या या बदलामळे स्त्रीपुरुषातील नातं अधिक समृद्ध होऊन त्यातून अधिक विकसित समाजरचना निर्माण होऊ शकते. म्हणून आज या नात्याकडे अधिक समंजसपणे पाहणं अपरिहार्य झालेलं आहे.
आयुष्य गंभीरपणे घेणारी माणसं स्त्रीपुरुष नातंही फार समजदारीने घेतात, तसंच एरवी खूप बाळबोध आणि भाबडी वाटणारी माणसंही एकमेकांमधलं नातं फार उत्कटपणे जपताना दिसतात.
टिपणामध्ये स्त्रीपुरुष नात्याची वर्गवारी करताना सांकेतिक आणि असांकेतिक अशी दोन नावे वापरली आहेत. पैकी असांकेतिक नात्याविषयीच लिहिणाऱ्यानी अधिक लिहिलं आहे. सांकेतिक नात्याविषयी, नात्यातील विसंवादाविषयी वसंत पळशीकरांनी तपशिलाने लिहिले आहे. असांकेतिक नात्याची तरफदारी हा या अंकाचा हेतू नाही. परंतु बव्हंशी साऱ्या लेखकांनी स्त्रीपुरुषांमधलं असांकेतिक नातं जगण्याला अधिक बळ देतं, श्रेष्ठ प्रतीचा जीवनानुभव देतं, असं म्हटलेलं आहे. खरं तर, स्त्रीपुरुषांमधल्या सांकेतिक नात्यातही पुरेसा संवाद, एकमेकांना समजावून घेणं; प्रसंगी समजावून देणं, एकमेकांबद्दल आस्था, आदर बाळगणं, विश्वास; सामंजस्य असणं, एकमेकांच्या जगण्यामध्ये रस असणं, आवश्यक असेल तेव्हा दुसऱ्यासाठी स्वत:ला बदलण्याची, मुरड घालण्याची तयारी असणं, काही वेळा एकमेकांना सोसण्याची, सहन करण्याची तयारी ठेवणं, या आणि अशासारख्या गोष्टी असतील, तर ते नातंही अर्थपूर्ण होऊ शकतं. ते तसं असावं, असं आम्हाला वाटतं. परंतु दुर्दैवाने वस्तुस्थिती तशी आढळत नाही. घराला घरपण देणारा पतिपत्नींमधला संवादही काही ठिकाणी आढळतो, पण त्याचं प्रमाण मात्र नगण्य दिसतं. एकुणात विसंवादच अधिक. या आधिक्यानं असणाऱ्या विसंवादाचीच चर्चा अधिक व्हावी अशी अपेक्षा होती. परंतु या मुद्याविषयी फारसं कोणी लिहिलं-बोललं नाही. हा विसंवाद तरुण जोडप्यांपासून ते अगदी वृद्धावस्थेतील जोडप्यांपर्यंत सारीकडे आढळतो.
विसंवादाविषयी अधिक लिहिलं-बोललं गेलं तर त्याची कारणं स्पष्ट होतील, त्यातून काही मार्ग काढता येतील, अशी अपेक्षा होती. (नात्यातील विसंवाद हाच मुळी इतका व्यापक आणि महत्त्वाचा विषय आहे की त्यावरच एक अंक काढता येईल!).
विजया दीक्षित यांची त्यांच्या लेखात मांडलेली नवी प्रमेये आणि आधुनिक जाणिवांशी सुसंगत निरोगी दृष्टिकोनातून घेतलेला संस्कृत साहित्यातील स्त्रीपुरुष नात्याचा शोध आम्हाला लक्षणीय वाटतो. दिलीप चित्रे यांनी केलेलं मानवी एकाकीपणाचं विवेचन, त्यांचा अनिच्छित घर्षणाचा मुद्दा, तसेच कौमार्याविषयीचा सिद्धांत, शिवशक्ती-संकल्पना या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वसंत पळशीकरांनी स्त्रीपुरुष नात्यातील नीतिविवेकाकडे आपलं लक्ष वेधलेलं आहे. विद्या आपटे यांनी निःसंकोच निर्भयतेने घेतलेला स्वत:चा शोध. 'अनामिका' च्या निवेदनातील प्रांजळता आणि स्त्रीपुरुष नात्यातील आदिम जाणिवेचा आविष्कार या तीव्रतेने भिडणाऱ्या गोष्टी. यातील सगळेच लेख भरपूर ताकदीचे, गांभीर्याने, लिहिणाऱ्यांच्या व विषयांच्या वैशिष्ट्यांसह आलेले आहेत. त्यात – अधिक-उणं करणं योग्य नाही. त्याविषयी वाचकांनी ठरवावं. प्राचीन संस्कृत साहित्यापासून ते ओशो रजनीशांपर्यंत तत्त्वज्ञांनी स्त्रीपुरुष नात्याकडे कसं पाहिलं आहे, हेही शोधण्याचा प्रयत्न झालेला आहे.
Preview
Reviews
Fill out all required fields to send a message. You have to login to your account to post any review.