८६-१०८

भगवान बुद्ध

तपश्चर्या व तत्त्वबोध

14-10-2017
18-09-2017
18-09-2017
18-09-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

  1. बोधिसत्त्वाने प्रव्रज्या घेतल्यावर परिव्राजकांकडून श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा शोध करीत प्रथमध्यानाची पद्धति शिकली.
  2. प्रसिद्ध श्रमणनायकांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याच्या उद्देशाने तो राजगृहाला आला.
  3. लोकोत्तर तत्त्वबोध करून घेण्यासाठी अनेक मार्गांचा आवलंब केला.
  4. तपश्चर्येचा मार्ग सोडून ध्यानमार्गानेच तत्त्वबोध करून घेतला.
  5. पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करून ‘धर्मचक्रप्रवर्तन’ केले.

सारांश

पारिभाषिक शब्द

अष्टांगिक मार्ग , आर्यसत्य , धर्मचक्रप्रवर्तन , तत्त्वबोध , बोधिवृक्ष , उपोषण , सुजाता , मार , राजयोग , निर्भयता , हठयोग , श्रमणपंथ , कोलीय , शाक्य , प्रव्रज्या

1 . आळार कालामाची भेट

घर सोडून बोधिसत्त्व थेट राजगृहाला गेला, तेथे त्याची व बिंबिसार राजाची भेट झाली, आणि तदनंतर तो आळार कालामाकडे जाऊन त्याचे तत्त्वज्ञान शिकला, अशा अर्थाचे वर्णन जातकाच्या निदानकथेत सापडते. अश्वघोषकृत बुद्धचरितकाव्यात निदानकथेचाच क्रम स्वीकारला आहे. ललितविस्तरात ‘बोधिसत्त्व प्रथम वैशालीला गेला व तेथे आळार कालामाचा शिष्य झाला, आणि नंतर राजगृहाला गेला, तेथे बिंबिसार राजाने त्याची भेट घेतल्यावर तो उद्रक रामपुत्रापाशी गेला,’ अशा प्रकारचे सविस्तर वर्णन आहे. पण ही दोन्ही वर्णने प्राचीन सुत्तांशी जुळत नाहीत. वर दिलेल्या आर्यपरियेसन सुत्ताच्या      उता-यात बोधिसत्त्वाने घरी असतानाच आईबापांसमक्ष प्रव्रज्या घेतली असे म्हटले आहे. त्यानंतर ताबडतोब हा मजकूर आढळतो-

सो एवं पब्बजितो समानो किंकुसलगवेसी अनुत्तरं सन्तिवरपदं परियेसमानो येन आळारो कालामो तेनुपसंकमिं |

(भगवान म्हणतो), “याप्रमाणे प्रव्रज्या घेतल्यावर हितकर मार्ग कोणता हे जाणण्याच्या उद्देशाने श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा शोध करीत मी आळार कालामापाशी गेलो.”

या उता-यावरून असे दिसून येते की, बोधिसत्त्व राजगृहाला न जाता प्रथमत: आळार कालामापाशी गेला. आळार कालाम कोसल देशाचाच रहिवाशी होता.

अंगुत्तरनिकायाच्या तिकनिपातात (सुत्त नं. ६५) कालाम नावाच्या क्षत्रियांच्या केसपुत्त शहराचा उल्लेख आला आहे. त्यावरून असे दिसते की, त्याच कालामांपैकी आळार कालाम हा एक होता. शाक्य आणि कोलिय राज्यांत त्याची बरीच ख्याती होती. त्याच्या एका शिष्याचा-भरण्डु कालामाचा-आश्रम कपिलवस्तूला होता, हे वर सांगितलेच आहे. दुसरे त्याचे किंवा फार झाले तर उद्दक रामपुत्ताचे शिष्य जवळच्या कोलियांच्या देशात राहत असत; आणि या संप्रदायाचे प्रस्थ शाक्य आणि कोलीय देशांत बरेच होते, यात शंका नाही. बोधिसत्त्व प्रथमध्यानाची पद्धति ह्याच परिव्राजकांकडून शिकला आणि त्यांनीच त्याला संन्यासदीक्षा दिली असली पाहिजे.

परंतु शाक्य किंवा कोलीय देशातील एखाद्या आश्रमात राहून काल कंठणे बोधिसत्त्वाला योग्य वाटले नाही. हितकर मार्गाचा आणि श्रेष्ठ, लोकोत्तर, शान्त तत्त्वाचा बोध करून घेण्यासाठी त्याने खुद्द आळार कालामाची भेट घेतली. त्या वेळी आळार कालाम कोठे तरी कोसल देशात राहत असावा. त्याने बोधिसत्त्वाला चार ध्याने व त्यांच्यावरच्या तीन पाय-या शिकविल्या. पण केवळ या समाधीच्या सात पाय-यांनी त्याचे समाधान झाले नाही. हा मनोनिग्रहाचा मार्ग होता खरा, पण सर्व मनुष्यजातीला त्याचा उपयोग काय? याचसाठी हितकर मार्गाचा शोध बोधिसत्त्वाने पुढे चालविला.

2 . उद्दक रामपुत्ताची भेट

आळार कालाम आणि उद्दक रामपुत्त हे दोघेही एकच समाधिमार्ग शिकवीत होते. त्यांच्यात एवढाच फरक होता की, आळार कालाम समाधीच्या सात पाय-या व उद्दक रामपुत्त आठ पाय-या शिकवीत असे. या दोघांचा कोणी तरी एकच गुरू असावा, आणि नंतर त्यांनी हे दोन पंथ काढले असावेत. आळार कालामाला सोडून बोधिसत्त्व उद्दकापाशी गेला. पण त्याच्याही मार्गात त्याला विशेष तथ्य दिसले नाही. तेव्हा राजगृहाला जाऊन तेथील प्रसिद्ध श्रमणपंथांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याचा त्याने निश्चय केला.

3 . बिंबिसार राजाची भेट

राजगृहात बोधिसत्त्वाच्या आगमनाचे वर्णन एका अज्ञात कवीने सुत्तनिपातातील पब्बज्जासुत्तात केले आहे. त्याचे भाषान्तर येणेप्रमाणे-

  1. चक्षुष्मन्ताने (बोधिसत्त्वाने) प्रव्रज्या का घेतली व कोणत्या विचारामुळे त्याला ती आवडली हे सांगून (त्याच्या) प्रव्रज्येचे मी वर्णन करतो.
  2.  गृहस्थाश्रम ही अडचणीची आणि कच-याची जागा व प्रव्रज्या म्हणजे मोकळी हवा असे जाणून त्याने प्रवज्जा घेतली.
  3. प्रव्रज्या घेऊन त्याने शारीरिक पापकर्म वर्ज्य केले. वाचसिक  दुर्वर्तन सोडून दिले आणि आपली उपजीविका शुद्ध मार्गाने चालविली.
  4. बुद्ध मगधांच्या गिरिव्रजाला (राजगृहाला) आला. सर्व शरीरावर उत्तम लक्षणे फैलावली आहेत अशा त्याने राजगृहात भिक्षाटनासाठी प्रवेश केला.
  5. आपल्या प्रासादावरून बिंबिसाराने त्याला पाहिले. त्याची लक्षणसंपत्ति पाहून बिंबिसार म्हणाला,
  6. “अहो माझे ऐका- हा सुंदर, भव्य, शुद्ध आणि आचरणाने संपन्न असून पायापाशी दोन हाताच्या अंतरावर दृष्टि ठेवून चालतो (युगमत्तं च पेक्खति).
  7. “हा दृष्टि पायापाशी ठेऊन चालणारा जागृत भिक्षु नीच कुळातला वाटत नाही. तो कोठे जात आहे, हे राजदूतांना धावत जाऊन पाहू द्या.”
  8. तो भिक्षु (बोधिसत्त्व) कोठे जातो व वस्तीला कोठे राहतो हे पाहण्यासाठी ते (बिंबिसार राजाने पाठविलेले) दूत त्याच्या मागोमाग गेले.
  9.  इन्द्रियांचे संरक्षण करीत घरोघरी भिक्षा घेऊन विवेकी आणि जागृत बोधिसत्त्वाने ताबडतोब पात्रभर भिक्षा मिळविली.
  10. भिक्षाटन पुरे करून तो मुनि नगरातून बाहेर पडला आणि वस्तीला येथे राहीन अशा उद्देशाने पाण्डव पर्वताजवळ आला.
  11. त्याला वस्तीला राहिला पाहून ते दूत त्याच्याजवळ बसले आणि त्यापैकी एकाने जाऊन राजाला खबर दिली.
  12. “महाराज, तो भिक्षु पाण्डव पर्वताच्या पूर्वेला व्याघ्रासारखा, ऋषभासारखा किंवा गिरिगव्हरात राहणा-या सिंहासारखा बसला आहे!”
  13. ते दूताचे वचन ऐकून तो क्षत्रिय (राजा) उत्तम यानात बसला व त्वरेने पाण्डव पर्वताकडे जाण्यास निघाला.
  14. जिथपर्यंत यानाने जाणे शक्य होते तिथपर्यंत जाऊन तो क्षत्रिय यानातून खाली उतरला आणि पायीच (बोधिसत्त्वाच्या) जवळ येऊन त्याच्या संनिध बसला.
  15. तेथे बसून राजाने त्याला कुशलप्रश्नादिक विचारले. कुशलप्रश्नादिक विचारून तो येणेप्रमाणे बोलला-
  16. “तू जवान आणि तरुण आहेस; मनुष्याच्या प्रथम वयातला आहेस. तुझी कांति कुलीन क्षत्रियासारखी अत्यंत रोचक दिसते.”
  17. “तू हत्तींचा समुदाय बरोबर घेऊन माझ्या सेनेला शोभा आण. मी तुला संपत्ति देतो, तिचा उपयोग घे; आणि आता तुझी जाति कोणती, हे मला सांग.”
  18. ‘हे राजा, येथून सरळ हिमालयाच्या पायथ्याशी धनाने आणि वीर्याने संपन्न-ज्याचा कोसल राष्ट्रात समावेश होतो- असा देश आहे.’
  19. “त्यांचे (तेथल्या महाजनांचे) गोत्र आदित्य आहे आणि त्यांच्या जातीला शाक्य म्हणतात. त्या कुलातून, हे राजा मी परिव्राजक झालो, तो कामोपभोगांच्या इच्छेने नव्हे.”
  20. “कामोपभोगात मला दोष दिसला आणि एकान्तवास सुखाचा वाटला. आता मी तपश्चर्येसाठी जात आहे. त्या मार्गात माझे मान रमते.”

या सुत्ताच्या तिस-या गाथेत बोधिसत्त्वाने काया, वाचा व उपजीविका यांचे संशोधन केल्याचा उल्लेख आला आहे. हे कृत्य घरातून निघाल्यानंतर वाटेतल्या वाटेत त्याला करता येणे शक्य दिसत नाही. आळार कालाम व उद्दक रामपुत्त यांच्यापाशी राहून त्यांचे आचार-विचार नीट सांभाळून बोधिसत्त्वाने हे काम केले असावे असे दिसते. पण एवढ्यानेच त्याचे समाधान न होता प्रसिद्ध श्रमणनायकांचे तत्त्वज्ञान जाणून घेण्याच्या उद्देशाने तो राजगृहाला आला. तेथे त्या सर्व संप्रदायांमध्ये कमीजास्त प्रमाणाने तपश्चर्या आढळून आल्यामुळे आपणही अशीच तपश्चर्या केली पाहिजे, असे त्याला वाटले, आणि म्हणूनच या सुत्ताच्या शेवटच्या गाथेत, ‘आता मी तपश्चर्येसाठी जात आहे,’ असे तो म्हणतो. कामोपभोगातून त्याचे मन पूर्वीच निघाले असल्यामुळे मगधराजाने देऊ केलेला अधिकार त्याला आवडला नाही, हे सांगावयालाच नको.

4 . उरुवेलेला आगमन

राजगृहाहून बोधिसत्त्व उरुवेलेला आला आणि तपश्चर्या करण्यासाठी हे स्थान त्याने पसंत केले. त्याचे वर्णन अरियपरियेसन सुत्तात सापडते.

भगवान म्हणतो, “भिक्षुहो, तो मी कुशल कोणते हे जाणण्याच्या हेतूने लोकोत्तर शांतीच्या श्रेष्ठ स्थानाचा शोध करीत करीत क्रमश: प्रवास करून उरुवेला येथे सेनानिगमाला आलो. तेथे मी रमणीय भूमिभाग पाहिला. त्यात सुशोभित वन असून नदी मंद मंद वाहत होती. तिच्या दोन्ही बाजूला सफेत वाळवंट व उतार सोपा, अणि ती अत्यंत रमणीय. या वनाच्या चारी बाजूंना भिक्षाटन करण्यासाठी गाव दिसले. हा रमणीय भूमिभाग असल्यामुळे कुलीन मनुष्याला तपश्चर्या करण्याला योग्य वाटून मी त्याच ठिकाणी तपश्चर्या चालविली.”

राजगृहाच्या सभोवती ज्या टेकड्या आहेत त्यांच्यावर निर्ग्रंथ वगैरे श्रमण तपश्चर्या करीत असत, असा उल्लेख ब-याच ठिकाणी सापडतो. पण बोधिसत्त्वाला तपश्चर्येसाठी हे रुक्ष पर्वत आवडले नाहीत; उरुवेलेचा रम्य प्रदेश आवडला. यावरून सृष्टिसौंदर्यावर असलेले त्याचे प्रेम व्यक्त होते.

5 . तीन उपमा

तपश्चर्येला आरंभ करण्यापूर्वी बोधिसत्त्वाला तीन उपमा सुचल्या. त्यांचे वर्णन महासच्चकसुत्तात केले आहे. भगवान म्हणतो, “हे अग्गिवेस्सना, एखादे ओले लाकूड पाण्यात पडलेले असले, आणि एखादा मनुष्य उत्तरारणि घेऊन त्याच्यावर घासून अग्नि उत्पन्न करू लागला, तर त्यापासून आग उत्पन्न होईल काय?”

सच्चक- भो गोतम, त्या लाकडापासून आग उत्पन्न होणे शक्य नाही. का की, ते ओले आहे. त्या माणसाचे परिश्रम व्यर्थ जाऊन त्याला त्रास मात्र होईल.

भगवान- त्याचप्रमाणे, हे अग्गिवेस्सना, जे कोणी श्रमण आणि ब्राह्मण शरीराने आणि मनाने कामोपभोगांपासून अलिप्त झाले नाहीत आणि ज्यांचा कामविकार शांत झाला नाही त्यांनी कितीही कष्ट भोगले तरी त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्त व्हावयाचा नाही. हे अग्गिवेस्सना, दुसरी मला उपमा अशी सुचली की, एखादे ओले लाकूड पाण्याहून दूर पडले आहे आणि एखादा मनुष्य उत्तरारणि घासून त्यातून अग्नि उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला, तर त्यापासून आग उत्पन्न होईल काय?

सच्चक- नाही, भो गोतम, त्याचा प्रयत्न व्यर्थ जाऊन त्याला त्रास मात्र होईल. का की, हे लाकूड ओले आहे.

भगवान- त्याचप्रमाणे, हे अग्गिवेस्सना, जे श्रमण आणि ब्राह्मण कामोपभोग सोडून शरीराने आणि मनाने त्यापासून अलिप्त राहतात खरे, पण ज्यांच्या मनातील कामविकार शमलेले नसतात, त्यांनी जरी कितीही कष्ट सोसले तरी त्यांपासून त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्त व्हावयाचा नाही. हे अग्गिवेस्सना, आणखी तिसरी उपमा मला सुचली. एखादे कोरडे लाकूड, पाण्यापासून दूर पडले आहे, आणि एखादा मनुष्य त्याच्यावर उत्तरारणि घासून अग्नि उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू लागला, तर तो आग उत्पन्न करू शकेल की नाही?

सच्चक- होय, भो गोतम, कारण ते लाकूड साफ कोरडे आहे आणि पाण्यामध्ये पडलेले नाही.

भगवान- त्याचप्रमाणे, हे अग्गिवेस्सना, जे श्रमणब्राह्मण कायेने आणि चित्ताने कामोपभोगांपासून दूर राहतात आणि ज्यांच्या मनातील कामविकार साफ नष्ट झाले आहेत, त्यांनी शरीराला अत्यंत कष्ट दिले काय किंवा न दिले काय, त्यांना ज्ञानदृष्टि आणि लोकोत्तर संबोध प्राप्त होणे शक्य आहे.

ह्या तीन उपमा बोधिसत्त्वाला तपश्चर्येला आरंभ करताना सुचल्या. जे श्रमण ब्राह्मण यज्ञयागादिकांतच समाधान मानतात, त्यांनी तशा प्रसंगी तपश्चर्या करून शरीराला कष्ट दिले, तरी त्यांना तत्त्वबोध व्हावयाचा नाही. दुसरे श्रमण ब्राह्मण यज्ञयागाचा मार्ग सोडून देऊन जंगलात जाऊन राहिले, पण जर त्यांच्या अंत:करणातील कामविकार नष्ट झाले नाहीत, तर त्यांच्या तपश्चर्येपासून काही निष्पन्न होणार नाही. ओल्या लाकडावर उत्तरारणि घासून अग्नि उत्पन्न करण्याप्रमाणे त्यांचा प्रयत्न व्यर्थ जाणार. पण जर एखादा माणूस कामोपभोगांपासून दूर राहून मनातील कामविकार साफ नष्ट करू शकला, तर त्याला देहदंडावाचून तत्त्वबोध करून घेता येईल.

6 . हठयोग

बोधिसत्त्वाला ह्या उपमा सुचल्या, तरी त्याने त्या काळच्या श्रमणव्यवहाराला अनुसरून तीव्र तपश्चर्या करण्याचा निश्चय केला. प्रथमत: त्याने हठयोगावर भर दिला. भगवान सच्चकाला म्हणतो, “हे अग्गिवेस्सन, मी जेव्हा दातावर दात दाबून आणि जीभ टाळूला लावून माझ्या चित्ताचे दमन करी, तेव्हा माझ्या काखेतून घाम सुटे. ज्याप्रमाणे एखादा बलवान पुरुष दुर्बल माणसाला डोक्याला किंवा खांद्याला धरून दाबतो, त्याचप्रमाणे मी माझे चित्त दाबीत होतो.

“हे अग्गिवेस्सन, त्यानंतर आश्वासप्रश्वास दाबून मी ध्यान करू लागलो. त्या वेळी माझ्या कानातून श्वास निघण्याचा शब्द होऊ लागला. जसा लोहाराचा भाता चालतो, तसा माझ्या कानातून आवाज येऊ लागला. तरी पण हे अग्गिवेस्सन, मी आश्वासप्रश्वास आणि कान दाबून ध्यान करू लागलो. तेव्हा तीक्ष्ण तलवारीच्या टोकाने माझे डोके कोणी मंथन करीत आहे, असा मला भास झाला. तथापि हेच ध्यान मी पुढे चालविले. आणि माझ्या डोक्याला चामड्याच्या पट्टयाचे वेष्टन देऊन कोणी घट्ट आवळीत आहे असे वाटू लागले. तरी तेच ध्यान मी पुढे चालू ठेवले. त्यामुळे माझ्या उदरात वेदना उठल्या. कसाई शस्त्राने जसे गाईचे पोट कोरतो, तसे माझे पोट कोरले जात आहे असे मला वाटले. या सर्व प्रसंगी माझा उत्साह कायम होता, स्मृति स्थिर होती, पण शरीरामध्ये त्राण कमी झाले. तथापि त्या कष्टप्रद वेदना माझ्या चित्ताला बाधू शकल्या नाहीत.”

तिस-या प्रकरणात श्रमणांच्या नानाविध तपश्चर्या दिल्या आहेत. त्यांच्यात हठयोगाचा समावेश झालेला नाही. तथापि त्या काळी वरच्या सारख्या हठयोगाचा अभ्यास करणारे तपस्वी होते, असे गृहीत धरावे लागते. नाही तर बोधिसत्त्वाने तशा योगाचा अभ्यास आरंभिला नसता.

7 . उपोषणे

याप्रमाणे हठयोगाचा अभ्यास करून त्याच्यात तथ्य नाही असे दिसून आल्यावर बोधिसत्त्वाने उपोषणाला सुरुवात केली. अन्नपाणी साफ सोडून देणे त्याला योग्य वाटले नाही. पण तो अत्यंत अल्पाहार सेवन करू लागला. भगवान सच्चकाला म्हणतो, “हे अग्गिवेस्सन, मी थोडा थोडा आहार खाऊ लागलो. मुगांचा काढा, कुळथांचा काढा, वाटाण्याचा काढा किंवा हरभऱ्यांचा (हरेणु) काढा पिऊनच मी राहत होतो. तो देखील अत्यंत अल्प असल्यामुळे माझे शरीर फारच कृश झाले. आसीतकवल्लीच्या किंवा कालवल्लीच्या गाठीप्रमाणे माझ्या अवयवांचे सांधे दिसू लागले. उंटाच्या पावलाप्रमाणे माझा कटिबंध झाला. सुताच्या चात्यांच्या माळेप्रमाणे माझा पाठीचा कणा दिसू लागला. मोडक्या घराचे वासे जसे खालीवर होतात, तशा माझ्या बरगड्या झाल्या. खोल विहिरीत पडलेल्या नक्षत्रांच्या छायेप्रमाणे माझी बुबुळे खोल गेली. कच्चा भोपळा कापून उन्हात टाकला असता जसा कोमेजून जातो, तशी माझ्या डोक्याची चामडी कोमेजून गेली. मी पोटावरून हात फिरविला तर पाठीचा कणा माझ्या हाती लागे आणि पाठीच्या कण्यावरून हात फिरविला म्हणजे पोटाची चामडी हाती लागत असे. याप्रमाणे पाठीचा कणा आणि पोटाची चामडी एक झाली होती. शौचाला किंवा लघवीला बसलो, तर मी तेथेच पडून राही. अंगावरून हात फिरविला असता माझे दुर्बळ झालेले लोम आपोआप खाली पडत.”

8 . वितर्कांवर ताबा

बोधिसत्त्वाने सात वर्षे तपश्चर्या केली असा उल्लेख अनेक ठिकाणी सापडतो. या सात वर्षांत बोधिसत्त्व प्राध्यान्येकरून देहदंडन करीत असला, तरी त्याच्या मनात दुसरे विचार घोळत नव्हते, असे नाही. वर दिलेल्या तीन उपमा पाहिल्या तरी असे दिसून येते की, कामविकार पुरे नष्ट केल्यावाचून नानाविध कायक्लेशांचा उपयोग होणार नाही, हे त्याला स्पष्ट दिसत होते. याशिवाय आणखीहि सद्विचार त्याच्या मनात येत, असे अनेक सुत्तांवरून दिसते. त्यापैकी काही विचारांचा येथे थोडक्यात संग्रह करीत आहे.

मज्झिमनिकायातील द्वैधावितक्क सुत्तात भगवान म्हणतो, “भिक्षु हो, मला संबोध प्राप्त होण्यापूर्वी, मी बोधिसत्त्व असतानाच माझ्या मनात असा विचार आला की, वितर्कांचे दोन भाग करावे. त्याप्रमाणे कामवितर्क (विषयवितर्क), व्यापादवितर्क (द्वेषवितर्क) आणि विहिंसावितर्क (दुस-याला किंवा आपणाला त्रास देण्याचा वितर्क), ह्या तीन वितर्कांचा मी एक विभाग केला; आणि नैष्कर्म्य (एकान्तवास), अव्यापाद (मैत्री) आणि अविहिंसा (त्रास न देण्याची बुद्धि) या तीन वितर्कांचा दुसरा विभाग केला. त्यांनतर मी मोठ्या सावधगिरीने व दक्षतेने वागत असता पहिल्या तीन वितर्कांपैकी एखादा वितर्क माझ्या मनात उत्पन्न होत असे. त्या वेळी मी विचार करीत होतो की, हा वाईट वितर्क माझ्या मनात उत्पन्न झाला आहे. तो माझ्या दुःखाला, दुस-याच्या दुःखाला किंवा उभयतांच्या दुःखाला कारणीभूत होईल, प्रज्ञेचा निरोध करील, व निर्वाणाला जाऊ देणार नाही. या विचाराने तो वितर्क माझ्या मनातून नाहीसा होत असे.

“भिक्षु हो, शरदऋतूत जिकडे तिकडे शेते पिकाला आली असता गुराखी गुरांचे मोठ्या सावधगिरीने रक्षण करतो; काठीने बडवून देखील त्यांना शेतापासून दूर ठेवतो. का की, तसे केले नाही तर गुरे लोकांच्या शेतात शिरतील, आणि आपणाला दंड भरावा लागेल, हे तो जाणतो. त्याप्रमाणे काम, व्यापाद, विहिंसा इत्यादिक अकुशल मनोवृत्ति भयावह आहेत हे मी जाणले.

“त्या वेळी मी मोठ्या सावधगिरीने आणि उत्साहाने वागत असता माझ्या मनात नैष्कर्म्य, अव्यापाद आणि अविहिंसा ह्या तीन वितर्कांपैकी एखादा वितर्क उत्पन्न होत असे. तेव्हा मी असा विचार करत होतो की हा कुशल वितर्क माझ्या मनात उत्पन्न झाला आहे, तो आपणाला, परक्याला किंवा उभयतांना दुःख देणारा नव्हे, प्रज्ञेची अभिवृद्धि करणारा व निर्वाणाला पोचविणारा आहे. त्याचे सर्व रात्र किंवा सर्व दिवस चिंतन केले तरी त्यापासून भय नाही. तथापि पुष्कळ वेळ चिंतन केले असता माझा देह श्रान्त होईल, आणि त्यामुळे माझे चित्त स्थिर राहणार नाही. आणि अस्थिर चित्ताला समाधि कोठून मिळणार? म्हणून (काही वेळाने) माझे चित्त मी अभ्यन्तरीच स्थिर करीत असे... एखादा गुराखी उन्हाळ्याच्या शेवटी पिके लोकांनी घरी नेल्यावर गुरांना खुशाल मोकळे सोडून देतो. तो झाडाखाली असला किंवा मोकळ्या जागेत बसला तरी गाईंवर नजर ठेवण्यापलीकडे दुसरे काही करीत नाही. त्याप्रमाणे नैष्कर्म्यादि कुशल वितर्क उत्पन्न झाले असता ते कुशल धर्म आहेत एवढीच मी स्मृति ठेवीत होतो. (त्यांचा निग्रह करण्याचा प्रयत्न करीत नसे.)”

9 . निर्भयता

कुशल वितर्कांच्या साहाय्याने अकुशल वितर्कांवर जय मिळविला, तरी जोपर्यंत धार्मिक माणसाच्या मनात निर्भयता उत्पन्न झाली नाही, तोपर्यंत त्याला तत्त्वबोध होणे अशक्य आहे. दरोडेखोर किंवा सैनिक आपल्या विरोधकांवर धाडसाने तुटून पडतात. पण त्यांच्यात निर्भयता थोडीच असते! ते शस्त्रास्त्रांनी कितीही सज्ज असले, तरी भयभीत असतात; न जाणो, आपले शत्रू आपणावर कधी घाला घालतील याचा नेम नाही, असे त्यांस वाटते. अर्थात् त्यांची निर्भयता खरी नव्हे. अध्यात्ममार्गाने जी निर्भयता मिळते तीच खरी होय. ती बोधिसत्त्वाने कशी मिळविली हे खालील उता-यावरून समजून येईल.

बुद्ध भगवान जानुश्रोणी ब्राह्मणाला म्हणतो: “हे ब्राह्मणा, जेव्हा मला संबोध प्राप्त झाला नव्हता, मी केवळ बोधिसत्त्व होतो, तेव्हा मला असे वाटले की जे कोणी श्रमण किंवा ब्राह्मण परिशुद्ध कायकर्मे न आचरिता अरण्यामध्ये राहतात, ते या दोषामुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझी कर्मे परिशुद्ध आहेत. परिशुद्ध कायकर्मे असलेले जे सज्जन (आर्य) अरण्यात राहतात त्यापैकी मी एक आहे, असे जेव्हा मला दिसून आले, तेव्हा अरण्यवासात मला अत्यंत निर्भयता वाटली. दुसरे कित्येक श्रमण किंवा ब्राह्मण अपरिशुद्ध वाचसिक कर्मे आचरीत असताना, अपरिशुद्ध मानसिक कर्मे आचरीत असताना, अपरिशुद्ध आजीव (उपजीविका) करीत असताना अरण्यामध्ये राहतात, आणि या दोषांमुळे ते भयभैरवाला आमंत्रण देतात. परंतु माझी वाचसिक आणि मानसिक कर्मे व उपजीविका परिशुद्ध आहेत. ज्या सज्जनांची ही सर्व परिशुद्ध आहेत त्यापैकी मी एक आहे, असे दिसून आल्यावर अरण्यवासात मला अत्यंत निर्भयता वाटली.

“हे ब्राह्मणा, जे श्रमण किंवा ब्राह्मण लोभी, प्रदुष्टचित्त, आळशी, भ्रान्तचित्त किंवा संशयग्रस्त होऊन अरण्यात राहतात, ते ह्या दोषामुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझे चित्त कामविकारापासून अलिप्त आहे, द्वेषापासून मुक्त आहे (म्हणजे सर्व  प्राणीमात्रांविषयी माझ्या मनात मैत्री वसते), माझे मन उत्साहपूर्ण, स्थिर व नि:शंक आहे. अशा गुणांनी युक्त जे सज्जन अरण्यात राहतात, त्यापैकी मी एक आहे. असे दिसून आल्यावर मला अरण्यवासात अत्यंत निर्भयता वाटली.

“हे ब्राह्मणा, जे श्रमण किंवा ब्राह्मण आत्मस्तुति आणि परनिंदा करतात, भ्याड असतात, मानमान्यतेची चाड धरून अरण्यात राहतात... किंवा जडबुद्धि असतात, ते या दोषामुळे भयभैरवाला आमंत्रण देतात. पण माझ्या अंगी हे दुर्गुण नाहीत, मी आत्मस्तुति किंवा परनिंदा करत नाही, भ्याड नाही, मानमान्यतेची मला इच्छा नाही.... आणि मी प्रज्ञावान् आहे. जे सज्जन अशा गुणांनी युक्त होऊन अरण्यात राहतात, त्यापैकी मी एक आहे, असे दिसून आल्यावर मला अरण्यवासात अत्यंत निर्भयता वाटली.

“हे ब्राह्मणा, चतुर्दशी, पूर्णिमा, अमावस्या आणि अष्टमी या रात्री (भयासंबंधाने) प्रसिद्ध आहेत. त्या रात्री ज्या उद्यानात, अरण्यात किंवा वृक्षाखाली लोक देवतांना बलिदान देतात, किंवा जी स्थळे अत्यंत भयंकर आहेत असे समजतात, त्या ठिकाणी मी (एकाकी) राहत असे; कारण भयभैरव कसे असते ते पाहण्याची माझी इच्छा होती. अशा स्थळी राहत असता एखादा हरिण त्या बाजूने जाई, एखादा मोर सुकलेले लाकूड खाली पाडी, किंवा झाडाची पाने वा-याने हालत त्या प्रसंगी मला वाटे, हेच ते भयभैरव होय, आणि मी म्हणे, भयभैरवाची इच्छा धरूनच या ठिकाणी आलो आहे, तेव्हा या स्थितीत असतानाच त्याचा नाश केला पाहिजे. मी चालत असताना ते भयभैरव आले, तर चालत असतानाच त्याचा नाश करीत असे. जोपर्यंत त्याचा नाश केला नाही, तोपर्यंत उभा राहत नसे आणि बसत नसे, किंवा अंथरुणावर पडत नसे. जर ते भयभैरव उभा असताना आले, तर उभा असतानाच त्याचा मी नाश करीत असे. जोपर्यंत त्याचा नाश केला नाही, तोपर्यंत चालत नसे, बसत नसे किंवा अंथरुणावर पडत नसे. बसलो असता जर ते भयभैरव आले तर मी निजत नसे, उभा राहत नसे किंवा चालत नसे. बसलो असताच त्याचा नाश करीत असे. अंथरुणावर पडलो असता ते आले तर बसत नसे, उभा राहत नसे किंवा चालत नसे; अंथरुणावर पडलो असताच त्याचा नाश करत असे.”

10 . राजयोग

बोधिसत्त्व केवळ हटयोग आणि तपश्चर्या यांच्यामध्येच आपला सर्व काळ कंठीत होता असे नाही. तसे करणे कोणत्याही तपस्व्यांना शक्य नव्हते. मधून मधून त्यांना चांगले अन्न खावे लागत असे. शरीरात थोडे बळ आले म्हणजे पुन्हा ते उपोषणादिकांच्या योगाने देहदंडन करीत. सात वर्षांच्या कालात बोधिसत्त्व प्राधान्येकरून तपश्चर्या आचरीत असला, तरी मधून मधून चांगले अन्न सेवन करीत होता, आणि शांत समाधीही अनुभवीत होता यात शंका नाही. हटयोग सोडून आपण आनापानस्मृतिसमाधीची भावना कशी करीत होतो, हे भगवान बुद्धाने आनापानसंयुत्ताच्या पहिल्या वग्गाच्या आठव्या सुत्तात सांगितले आहे.

भगवान म्हणतो- “भिक्षुहो, आनापानस्मृतिसमाधीची भावना केली असता मोठा फायदा होतो. तिची कशा रीतीने भावना केली असता मोठा फायदा होतो? एखादा भिक्षु अरण्यात झाडाखाली किंवा दुस-या एकांत जागी आसनमांडी घालून बसतो. तो दीर्घ आश्वास घेत असला, तर दीर्घ आश्वास घेत आहे, असे जाणतो; दीर्घ प्रश्वास सोडीत असला तर दीर्घ प्रश्वास सोडीत आहे, असे जाणतो; -हस्व आश्वास घेत असला, इत्यादि,... याप्रमाणे आनापानस्मृतिसमाधीची भावना केली असता मोठा फायदा होतो. भिक्षुहो, मी देखील संबोधिज्ञान होण्यापूर्वी बोधिसत्त्वावस्थेत असताना बहुधा हीच भावना करीत होतो. त्यामुळे माझ्या शरीराला आणि डोळ्यांना त्रास होत नसे, आणि माझे चित्त पापविचारांपासून मुक्त होत असे.”

11 . ध्यानमार्गाचा अवलंब

अशा रीतीने उपोषणे आणि आहार घेणे, हठयोग आणि राजयोग यांच्यामध्ये हेलकावे खात खात अखेरीस बोधिसत्त्वाच्या मनाचा एकाएकी असा निश्चय झाला की, तपश्चर्या निखालस निरर्थक आहे; तिच्यावाचून मुक्ति मिळणे शक्य आहे. म्हणून ती सोडून त्याने पुन्हा पूर्णपणे ध्यानमार्गाचे कसे अवलंबन केले, याचे थोडक्यात वर्णन महासच्चक सुत्तात केले आहे.

भगवान सच्चकाला म्हणतो, “हे अग्गिवेस्सन, माझ्या शाक्य पित्याच्या शेतावर काम चालले असता जंबुवृक्षाच्या शीतल छायेत बसून प्रथमध्यान प्राप्त करून घेतल्याची मला आठवण झाली, आणि त्या आठवणीला अनुसरून माझी समजूत झाली की, हाच बोधाचा मार्ग असला पाहिजे. आणि जे सुख चैनीच्या पदार्थांच्या उपभोगावाचून आणि अकुशल विचारांपासून लाभते, त्या सुखाला मी का भ्यावे? असा माझ्या मनात विचार आला, आणि त्यानंतर या सुखाला मी भिणार नाही, असा मी निश्चय केला. परंतु ते सुख अत्यंत कृश झालेल्या देहाने मिळणारे नव्हते. म्हणून थोडा थोडा आहार खाण्याचा विचार करून मी त्याप्रमाणे वागू लागलो. त्या वेळी पाच भिक्षु माझी सेवा करीत होते. का की, मला ज्या धर्माचा बोध होईल तो धर्म त्यांना शिकवीन, असे त्यास वाटे. परंतु जेव्हा मी अन्न खाऊ लागलो (तपश्चर्या सोडून दिली), तेव्हा, ‘हा गोतम तपश्चर्यपासून भ्रष्ट होऊन खाण्यापिण्याकडे वळला,’ असे वाटून ते पाच भिक्षु मला कंटाळून निघून गेले.”

तथापि बोधिसत्त्वाचा निश्चय ढळला नाही. तपश्चर्येचा मार्ग सोडून साध्या ध्यानमार्गानेच तत्त्वबोध करून घेतला पाहिजे, याबद्दल त्याची खात्री झाली.

12 . मारयुद्ध

या प्रसंगी बोधिसत्त्वाशी माराने युद्ध केल्याचे काव्यात्मक वर्णन बुद्धचरितादिक ग्रंथातून आढळते. त्याचा उगम सुत्तनिपातातील पधानसुत्तात आहे. या सुत्ताचे भाषांतर येथे देतो-

  1. नैरंजन नदीच्या काठी तपश्चर्येला आरंभ करून निर्वाणप्राप्तीसाठी मोठ्या उत्साहाने मी ध्यान करीत असता-
  2. मार करुणस्वर काढून माझ्याजवळ आला. (तो म्हणाला) तू कृश आणि दुर्वर्ण आहेस. मरण तुझ्याजवळ आहे.
  3. हजार हिश्शांनी तू मरणार. एक हिस्सा तुझे जीवित बाकी आहे. अरे भल्या माणसा, तू जग. जगणे उत्तम आहे; जगलास तर पुण्यकर्मे करशील.
  4. ब्रह्मचर्याने राहिलास अणि अग्निहोत्राची पूजा केलीस तर पुष्कळ पुण्याचा साठा होईल. हा निर्वाणाचा उद्योग कशाला पाहिजे?
  5. निर्वाणाचा मार्ग अत्यंत कठीण आणि दुर्गम आहे. ह्या गाथा बोलून मार बुद्धापाशी उभा राहिला.
  6. असे बोलणा-या त्या माराला भगवान म्हणाला, हे निष्काळजी मनुष्याच्या मित्रा, पाप्या, तू इथे का आलास (हे मी जाणतो).
  7. तशा पुण्याची मला बिलकुल गरज नाही. ज्याला पुण्याची गरज असेल त्याला माराने ह्या गोष्टी सांगाव्या.
  8. मला श्रद्धा आहे, वीर्य आहे आणि प्रज्ञा पण आहे. येणेप्रमाणे मी माझ्या ध्येयावर चित्त ठेवले असता मला जगण्याबद्दल का उपदेश करतोस?
  9. नदीचा ओघ देखील हा वारा सुकवू शकेल. परंतु ध्येयावर चित्त ठेवणा-याचे (प्रेषितात्म्याचे) माझे रक्त तो सुकवू शकणार नाही.
  10. (पण माझ्याच प्रयत्नाने) रक्त शोषित झाले, तर त्याबरोबर माझे पित्त आणि श्लेष्म हे विकार देखील आटतात; आणि माझे मास क्षीण झाले असता चित्त अधिकतर प्रसन्न होऊन स्मृति, प्रज्ञा व समाधि उत्तरोत्तर वाढतात.
  11. याप्रमाणे राहून उत्तम सुखाचा लाभ झाला असता माझे चित्त कामोपभोगांकडे वळत नाही. ही माझी आत्मशुद्धि पाहा.
  12. (हे मारा), कामोपभोग ही तुझी पहिली सेना आहे. अरति ही दुसरी, भूक आणि तहान ही तिसरी, आणि तृष्णा ही तुझी चौथी सेना आहे.
  13. पाचवी आळस, सहावी भीति, सातवी कुशंका, आठवी अभिमान (किंवा गर्व),
  14. लाभ, सत्कार, पूजा (ही नववी), आणि खोट्या मार्गाने मिळविलेली कीर्ति (ही दहावी), जिच्या योगे मनुष्य आत्मस्तुति आणि परनिंदा करतो.
  15. हे काळ्या नमुचि, (लोकांवर) प्रहार करणारी ही तुझी सेना आहे. भ्याड मनुष्य तिला जिंकू शकत नाही. जो तिला जिंकतो, त्यालाच सुख लाभते.
  16. हे मी माझ्या शिरावर मुंज गवत धारण करीत आहे. माझा पराजय झाला, तर माझे जिणे व्यर्थ. पराजय पावून जगण्यापेक्षा संग्रामात मरण आलेले बरे.
  17. कित्येक श्रमण-ब्राह्मण तुझ्या सेनेत मिसळून गेल्यामुळे प्रकाशत नाहीत, आणि ज्या मार्गाने साधुपुरुष जातात तो मार्ग त्यांना माहीत नाही.
  18. चारी बाजूंना मारसेना दिसते, आणि मार आपल्या वाहनासह सज्ज झाला आहे. त्याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी मी पुढे सरसावतो. का की त्याने मला स्थानभ्रष्ट करू नये.
  19. देव आणि मनुष्य तुझ्या सेनेपुढे उभे राहू शकत नाहीत. त्या तुझ्या सेनेचा, दगडाने मातीचे भांडे फोडून टाकावे त्याप्रमाणे, मी माझ्या प्रज्ञेने पराभव करून टाकतो.
  20. संकल्प ताब्यात ठेवून आणि स्मृति जागृत करून अनेक श्रावकांना उपदेश करीत मी देशोदेशी संचार करीन.
  21. ते (श्रावक) माझ्या उपदेशाप्रमाणे सावधपणे चालून आणि आपल्या ध्येयावर चित्त ठेवून तुझ्या इच्छेविरुद्ध अशा पदाला जातील की, जेथे शोक करण्याचा प्रसंग येत नाही.
  22. (मार म्हणाला), सात वर्षेपर्यंत भगवंताच्या मागोमाग हिंडलो; परंतु स्मृतिमान बुद्धाचे काहीच वर्म सापडले नाही.
  23. तेथे काही मऊ पदार्थ सापडेल, काही गोड पदार्थ मिळेल, अशा आशेने कावळा मेदवर्ण पाषाणाजवळ आला.
  24. परंतु त्यात लाभ न दिसून आल्यामुळे कावळा तेथून निघून गेला. त्या कावळ्याप्रमाणे मी देखील गोतमापासून निवृत्त होऊन निघून जातो!
  25. याप्रमाणे शोक करीत असता माराच्या काखेतून वीणा खाली पडला; आणि तो दु:खी मार तेथेच अंतर्धान पावला.

या सुत्ताचे भाषांतर ललितविस्तराच्या अठराव्या अध्यायात आले आहे. त्यावरून याचे प्राचीनत्व सिद्ध होते. वर दिलेला भयभैरवसुत्तातील मजकूर वाचला असता या साध्या रूपकाचा अर्थ सहज लक्षात येतो. मनुष्यजातीच्या कल्याणाला कोणी पुढे सरसावला असता त्यावर पहिल्याने हल्ला करणारी मारसेना म्हटली म्हणजे कामोपभोगाची वासना होय. तिला दाबून पुढे पाऊल टाकतो न टाकतो, तो (अरति) असंतोष उत्पन्न होतो. त्यानंतर भूक, तहान वगैरे एकामागून एक उपस्थित होतात आणि त्या सर्व वासनांवर व विकारांवर जय मिळविल्याशिवाय कल्याणप्रद तत्त्वाचा साक्षात्कार होणे कधीही शक्य नाही. तेव्हा बुद्धाने माराचा पराभव केला म्हणजे अशा मनोवृत्तीवर जय मिळविला असे समजावे.

 

13 . सुजातेने दिलेली भिक्षा

बोधिसत्त्वाला संबोधिज्ञान वैशाख पूर्णिमेच्या रात्री झाले. त्या दिवशी दुपारी सुजाता नावाच्या कुलीन तरुण स्त्रीने त्याला उत्तम अन्नाची भिक्षा दिली. याचा उल्लेख सुत्तपिटकांत क्वचित सापडतो आणि या प्रसंगाशिवाय सुजातेचे नाव आलेले कोठे आढळत नाही. तथापि बौद्ध चित्रकलेत सुजातेला उत्तम स्थान मिळाले आहे; आणि बुद्धाच्या दृष्टीने देखील हा प्रसंग चिरस्मरणीय झाला. चुंद लोहाराने दिलेली भिक्षा ग्रहण करून भगवान आजारी पडला. त्यात आपले परिनिर्वाण होणार आहे असे त्यांनी ताडले. आणि आपल्या पश्चात चुंदाला लोकांनी दोष देऊ नये म्हणून भगवान आनंदाला म्हणाला, “ज्या दिवशी मला संबोधिज्ञान प्राप्त झाले, त्या दिवशी मिळालेली व आज मिळालेली अशा दोन्ही भिक्षा समसमान आहेत. असे तुम्ही चुंदाला सांगा व त्याचे सांत्वन करा.”

14 . बोधिवृक्षाखाली आसन

सुजातेने दिलेली भिक्षा घेऊन बोधिसत्त्वाने नैरंजरा नदीच्या तीरी भोजन केले; आणि त्या रात्री तो एका पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसला. हे झाड सध्या अस्तित्वात नाही. शशांक राजाने त्याचा विध्वंस केला, असे म्हणतात. पण त्याच्याच जागी लावलेला पिंपळ आणि त्यालाच टेकून बुद्धगयेचे प्रसिद्ध मंदिर आहे. त्या झाडाखाली बोधिसत्त्व बसला, तेव्हा पुन्हा एकवार ललितविस्तरात मारयुद्धाचा प्रसंग वर्णिला आहे. संयुत्तनिकायातील सगाथावग्गात माराने बुद्धाला भुलविण्यासाठी बोधिवृक्षाखाली (त्या पिंपळाखाली) तृष्णा, अरति आणि रगा या आपल्या तीन मुलींना पाठविले असे वर्णन आढळते. जातकाच्या निदानकथेत तर या प्रसंगी मारसेनेने बुद्धावर चारी बाजूंनी कसा हल्ला चढविला, याचे सविस्तर वर्णन आहे. माराचे सैन्य पाहून ब्रह्मादिक देव पळून जातात, बोधिसत्त्व तेवढा एकटा राहतो. मग मार ते स्थान आपले आहे, असे म्हणून बुद्धाला तेथून उठण्यास सांगतो; आणि त्या स्थानावर आपला हक्क शाबीत करण्यासाठी मारसेनेची साक्ष देतो. सर्व देव पळून गेल्यामुळे त्या प्रसंगी बुद्धाला कोणीच साक्षी सापडत नाही. तेव्हा बुद्ध उजवा हात खाली करून, ही सर्वसहा वसुंधरा साक्ष आहे, असे म्हणतो; आणि पृथ्वी देवता, विराटस्वरूप धारण करून मारसेनेचा पराभव करिते, इत्यादि पुराणमय वर्णन जातकअट्ठकथाकाराने केले आहे.

बौद्ध चित्रकलेत हा प्रसंग चित्रकाराने छान रेखाटला आहे. लोभ, द्वेष, मोह, मद, मत्सर इत्यादि दुष्ट मनोवृत्तींना मूर्तिमंत स्वरूपे देण्याचा त्याचा प्रयत्न वाखाणण्याला योग्य वाटतो. प्रथमत: कवीने या प्रसंगाचे वर्णन केले आणि तदनुसार चित्रकारांनी त्याला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, किंवा चित्रकारांनी हा प्रसंग रेखाटल्यावर त्याच्या मागोमाग जाऊन कवींनी त्याचे वर्णन केले, हे सांगता येणे शक्य नाही. ते काही असो, पण एवढी गोष्ट खरी की, वर दिलेल्या मारसेनेला मूर्त स्वरूप देण्याचा हा प्रयत्न आहे.

15 . तत्त्वबोध

त्या वैशाखी पूर्णिमेच्या रात्री बोधिसत्त्वाला तत्त्वबोध झाला; आणि तेव्हापासून त्याला बुद्ध म्हणतात. म्हणजे तोपर्यंत गोतम बोधिसत्त्व होता, तो त्या दिवसापासून गोतम बुद्ध झाला. बुद्धाला झालेला तत्त्वबोध म्हटला म्हणजे चार आर्यसत्ये व तदन्तर्गत अष्टांगिक मार्ग होय. त्याचा उपदेश त्याने प्रथमतः आपल्या बरोबर राहणा-या पाच साथ्यांना केला. (तो प्रसंग पुढे येणार असल्यामुळे येथे त्याचे विवरण करीत नाही).

16 . विमुत्तिसुखाचा आस्वाद

तत्त्वबोध झाल्यावर बुद्ध भगवान त्याच बोधिवृक्षाखाली सात दिवस बसून विमुत्तिसुखाचा आस्वाद घेत होता; आणि त्या प्रसंगी रात्रीच्या तीन यामात त्याने खाली दिलेला प्रतीत्यसमुत्पाद सुलटउलट मनात आणला, असे महावग्गात म्हटले आहे. परंतु संयुत्तनिकायातील दोन सुत्तात बुद्धाने बोधिसत्त्वावस्थेत असतानाच हा प्रतीत्यसमुत्पाद जाणला असे सांगितले आहे. या सुत्तांचा व महावग्गातील मजकुराचा मेळ बसत नाही. महावग्ग लिहिला त्या वेळी या प्रतीत्यसमुत्पादाला भलतेच महत्त्व आले होते असे वाटते. नागर्जुनासारख्या महायानपंथाच्या आचार्यांनी तर या प्रतीत्यसमुत्पादाला आपल्या तत्त्वज्ञानाचा पाया बनविले.

17 . प्रतीत्यसमुत्पाद

तो प्रतीत्यसमुत्पाद संक्षेपतः येणेप्रमाणे-

अविद्येपासून संस्कार, संस्कारापासून विज्ञान, विज्ञानापासून नामरूप, नामरूपापासून षडायतन, षडायतनापासून स्पर्श, स्पर्शापासून वेदना, वेदनेपासून तृष्णा, तृष्णेपासून उपादान, उपादानापासून भव, भवापासून जाति (जन्म) आणि जातीपासून जरा, मरण, शोक, परिदेवन, दु:ख, दौर्मनस्य, उपासाय हे उत्पन्न होतात.

पूर्ण वैराग्याने अविद्येचा निरोध केला असता संस्कारांचा निरोध होतो. संस्कारांच्या निरोधाने विज्ञानाचा निरोध होतो. विज्ञानाच्या निरोधाने नामरूपाचा निरोध होतो. नामरूपाच्या निरोधाने षडायतनाचा निरोध, षडायतनाच्या निरोधाने स्पर्शाचा निरोध, स्पर्शाच्या निरोधाने वेदनेचा निरोध, वेदनेच्या निरोधाने तृष्णेचा निरोध, तृष्णेच्या निरोधाने उपादानाचा निरोध, उपादानाच्या निरोधाने भवाचा निरोध, भवाच्या निरोधाने जन्माचा निरोध, जन्माच्या निरोधाने जरा, मरण, शोक, परिदेवन, दु:ख, दौर्मनस्य, उपायास यांचा निरोध होतो.

दुःखाच्या मागे एवढी कारणपरंपरा जोडल्याने ते सामान्य जनतेला समजणे बरेच कठीण झाले. होता होता या प्रतीत्यसमुत्पादाला गहन तत्त्वज्ञानाचे स्वरूप आले, आणि त्याच्यावरच वादविवाद होऊ लागले. नागार्जुनाचार्याने आपली माध्यमककारिका या प्रतीत्यसमुत्पादाच्या पायावरच लिहिली आहे; आणि बुद्धघोषाचार्याने विशुद्धिमार्गाचा एकषष्ठांश भाग (जवळ जवळ शे सवाशे पृष्ठे) याच्या विवेचनात खर्च केला आहे. ही सगळी चर्चा वाचल्यावर विद्वान मनुष्य देखील घोटाळ्यात पडतो, मग सामान्य जनतेला हे तत्त्वज्ञान समजावे कसे? बुद्ध भगवन्ताचा धर्म ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे उच्च वर्णांच्या लोकांपेक्षा खालच्या वर्गाच्या लोकांत विशेष फैलावला तो अशा गहन तत्त्वज्ञानामुळे नव्हे. चार आर्यसत्यांचे तत्त्वज्ञान अगदी साधे आहे. ते सर्व प्रकारच्या लोकांना पटले, यात मुळीच नवल नाही. त्याचा विचार लौकरच करण्यात येईल.

18 . ब्रह्मदेवाची विनंती

तत्त्वबोध झाल्यानंतर बुद्ध भगवंताने एक आठवडा बोधिवृक्षाखाली (म्हणजे त्या पिंपळाखाली) घालवला, असे वर सांगितलेच आहे. यानंतर दुसरा आठवडा अजपाल न्यग्रोध वृक्षाखाली, तिसरा आठवडा मुचलिन्द वृक्षाखाली आणि चौथा आठवडा राजायतन वृक्षाखाली घालवून बुद्ध भगवान पुन्हा अजपाल वृक्षाखाली आला. तेथे त्याच्या मनात विचार आला की, हा धर्म मी अत्यंत कष्टाने जाणला आहे, तेव्हा तो लोकांना उपदेशून आणखी त्रास सोसणे बरे नव्हे. हा विचार ब्रह्मदेवाने जाणला आणि धर्मोपदेश करण्यासाठी भगवंताची प्रार्थना केली. ही कथा सविस्तरपणे महावग्गात आणि मज्झिमनिकायातील अरियपरियेसनसुत्तात आली आहे. पण ती गोतमबुद्धासंबंधाने मुळीच नसावी. कोणी तरी पुराणकाराने ती विपस्सी बुद्धासंबंधाने रचली व नंतर ती जशीच्या तशीच गोमत बुद्धाच्या चरित्रात दाखल झाली. ह्या रूपकाचा अर्थ ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ या पुस्तकात (पृ.१६-१९) लावण्याचा मी प्रयत्न केला आहे; तेव्हा त्याची चर्चा येथे करीत नाही.

19 . पंचवर्गीय भिक्षूंना उपदेश करण्याचा बेत

आपणाला प्राप्त झालेल्या चार आर्यसत्यांचे ज्ञान प्रथमतः कोणाला करून द्यावे असा विचार बुद्ध भगवंताला पडला. आळार कालाम व उद्दक रामपुत्त हे दोघे बोधिसत्त्वाचे गुरू जिवंत असते, तर हा नवीन धर्ममार्ग त्यांना तात्काळ पटला असता. परंतु ते हयात नव्हते. तेव्हा भगवंताने आपल्या पाच साथ्यांना (पंचवर्गीय भिक्षूंना) उपदेश करावा, असे ठरविले. हे भिक्षु त्या वेळी बनारस जवळ ऋषिपत्तनात राहत होते. भगवान तिकडे जाण्यास निघाला. वाटेत उपक नावाचा आजीवक श्रमण त्याला भेटला. आपणाला तत्त्वबोध झाला आहे, असे बुद्धाने त्याला सांगितले. पण उपकाला त्याबद्दल खात्री वाटली नाही. असेल कदाचित, असे म्हणून तो दुस-या मार्गाने चालत झाला. ह्या एका प्रसंगावरूनच दुस-या पंथाच्या श्रमणांना उपदेश करण्याची निरर्थकता भगवंताने जाणली असावी.

20 . पंचवर्गीयांची समजूत

आषाढी पूर्णिमेपूर्वी भगवान वाराणसीला पोचला. तो ऋषिपत्तनात आला, तेव्हा दुरूनच त्याला पाहून, त्याचा कोणत्याही प्रकारे आदरसत्कार करावयाचा नाही, असा पंचवर्गीयांनी बेत ठरविला. पण तो जसजसा जवळ येत गेला, तसतसा त्यांचा हा बेत ढासळत गेला. त्यांनी क्रमश: त्याचा योग्य आदरसत्कार केला. पण त्याचा नवीन धर्ममार्ग ऐकून घेण्याला ते तयार नव्हते. आपणाला एक नवीन धर्ममार्ग सापडला आहे असे भगवंताने जेव्हा त्यांना सांगितले, तेव्हा ते म्हणाले, “आयुष्यमान गोतम, तुझ्या तशा तऱ्हेच्या तपश्चर्येने देखील तुला सद्धर्ममार्गाचा बोध झाला नाही. आता तू तपोभ्रष्ट होऊन खाण्यापिण्याकडे वळला आहेस. त्या तुला सद्धर्माचा बोध कसा होईल?”

भगवान म्हणाला, “भिक्षुहो, यापूर्वी मी भलतीच वल्गना कधी केली होती काय? जर नाही, तर तुम्ही माझ्या म्हणण्याकडे लक्ष द्या. अमृताचा मार्ग मला सापडला आहे. या मार्गाचा अवलंब केला असता तुम्हाला लवकरच विमुक्ति मिळेल.”

अशा रीतीने पंचवर्गीय भिक्षूंची समजूत घालून काही काळाने आपला नवीन धर्म ऐकून घेण्यास भगवंताने त्यांना प्रवृत्त केले. त्या प्रसंगी त्याने केलेल्या उपदेशाला ‘धर्मचक्रप्रवर्तन’ म्हणतात. हे सुत्त सच्चसंयुत्ताच्या दुस-या वग्गात आणि विनयग्रंथातील महावग्गात सापडते. याचे संस्कृत भाषान्तर ललितविस्तराच्या सव्विसाव्या अध्यायात दिले आहे. पैकी पालि सुत्ताचे रूपान्तर येथे देतो.

21 . धर्मचक्रप्रवर्तन

असे मी ऐकले आहे. एके समयी भगवान वाराणसी ऋषिपत्तनात मृगवनात राहत होता. तेथे भगवान पंचवर्गीय भिक्षूंना उद्देशून म्हणाला, “भिक्षुहो, धार्मिक मनुष्याने (पब्बजितेन) या दोन अन्तांना जाऊ नये. ते दोन अन्त कोणते? पहिला कामोपभोगात सुख मानणे. हा अन्त हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनार्य आणि अनर्थावह आहे. दुसरा देहदंडन करणे. हा अन्त दुःखकारक, अनार्य आणि अनर्थावह आहे. या दोन अन्तांना न जाता तथागताने ज्ञानचक्षु उत्पन्न करणारा, उपशमाला, प्रज्ञेला, संबोधाला आणि निर्वाणाला कारणीभूत होणारा मध्यम मार्ग शोधून काढला आहे. तो कोणता? सम्यक् दृष्टि, सम्यक् संकल्प, सम्यक् वाचा, सम्यक् कर्मान्त, सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति, सम्यक् समाधि हा तो आर्य अष्टांगिक मार्ग होय.”

“भिक्षुहो, दुःख नावाचे पहिले आर्यसत्य असे आहे. जन्म दुःखकारक आहे. जरा दुःखकारक आहे. व्याधि दुःखकारक आहे. मरण दुःखकारक आहे. अप्रियाचा समागम आणि प्रियाचा वियोग दुःखकारक आहे. इच्छिलेली वस्तू मिळत नसली म्हणजे तेणेकरूनही दुःख होते. संक्षेपाने पाच उपादानस्कन्ध दु:खकारक आहेत.”

“भिक्षुहो, पुनः पुनः उत्पन्न होणारी आणि अनेक विषयांत रमणारी तृष्णा- जिला कामतृष्णा, भवतृष्णा आणि विनाशतृष्णा म्हणतात- ती दुःखसमुदय नावाचे दुसरे आर्यसत्य होय.”

“त्या तृष्णेचा वैराग्याने पूर्ण निरोध करणे, त्याग करणे, तिच्यापासून मुक्ति मिळविणे, हे दुःखनिरोध नावाचे तिसरे आर्यसत्य होय.”

“आणि (वर सांगितलेला) आर्य अष्टांगिक मार्ग हे दु:खनिरोधगामिनी प्रतिपदा नावाचे चौथे आर्यसत्य होय.”

“(क) हे दुःख आहे असे समजले तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली व ज्ञान उत्पन्न झाले, विद्या उद्भवली, आणि आलोक उत्पन्न झाला. हे दुःख जाणण्याला योग्य आहे असे समजले, तेव्हा मला अभिनव दृष्टि (इत्यादि)..... हे दु:ख मी जाणले, तेव्हा मला (इत्यादि)......”

“(ख) हे दुःखसमुदय आर्यसत्य आहे असे मी जाणले, ते त्याज्य आहे असे मी जाणले, त्याचा त्याग केला असे मी जाणले, तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली (इत्यादि पूर्वोक्त)......”

“(ग) हे दुःखनिरोध आर्यसत्य आहे असे मी जाणले, त्याचा साक्षात्कार करणे योग्य आहे असे मी जाणले, त्याचा साक्षात्कार मला झाला असे मी जाणले, तेव्हा मला अभिनव दृष्टि (इत्यादि पूर्वोक्त)......”

“(घ) हे दुःनिरोधगामिनी प्रतिपदा नावाचे आर्यसत्य आहे असे मी जाणले, त्याचा अभ्यास करणे योग्य आहे असे मी जाणले, त्याचा अभ्यास केला असे मी जाणले, तेव्हा मला अभिनव दृष्टि उत्पन्न झाली, ज्ञान उत्पन्न झाले, विद्या उद्भवली आणि आलोक उत्पन्न झाला. जोपर्यंत प्रत्येकी तीन व एकंदरीत बारा प्रकारचे या चार आर्यसत्यांविषयी ज्ञान मला झाले नाही, तोपर्यंत मला पूर्ण संबोधि लाभली नाही.”

बुद्धाने केलेले अनेक उपदेश सुत्तपिटकात संगृहीत केले आहेत, पण त्याच्या धर्माचा 

आधारभूत असा कोणता उपदेश असेल, तर तो हा आहे. एका सच्चसंयुत्तांत या चार आर्यसत्यांसंबंधाने एकंदर १३१ सुत्ते आहेत. याशिवाय इतर निकायात यांचा उल्लेख वारंवार येत असतो. बुद्धाचे इतर सर्व उपदेश या चार आर्यसत्यांना अनुसरून असल्यामुळे यांचे महत्त्व फार मोठे आहे.

वरील रूपान्तरात (क) पासून (घ) पर्यंत आलेला मजकूर फक्त सच्चसंयुत्ताच्या एका सुत्तात व महावग्गात सापडतो. त्याचा उल्लेख इतर ठिकाणी नाही. यावरून तो मागाहून दाखल केला असावा, अशी बळकट शंका येते. तथापि चार आर्यसत्यांच्या स्पष्टीकरणाला त्याची मदत होण्यासारखी असल्यामुळे तो येथे देण्यात आला आहे.

22 . चार आर्यसत्यांचे स्पष्टीकरण

जगात दुःख आहे हे कोणालाही नाकबूल करता येत नाही. परंतु जो तो आपले दु:ख कसे नष्ट होईल याच विचारात असतो. त्याचा परिणाम असा होतो की, दुस-याचा घातपात करून देखील प्रत्येकजण आपण सुखी होऊ इच्छितो. त्यात जे हिंसक असून बुद्धिमान असतात, ते पुढारी बनतात व इतरांना त्यांचे ताबेदार व्हावे लागते. हिंसक बुद्धीमुळे ह्या पुढा-यांत देखील एकोपा राहत नाही आणि त्यांना सगळ्यांत जास्त हिंसक आणि बुद्धिमान पुढा-याला आपला राजा करून त्याच्या तंत्राने वागणे भाग पडते. राजाला आपले राज्य दुसरा राजा घेईल असे भय वाटते आणि त्याच्या सुरक्षितपणासाठी तो यज्ञयाग करून अनेक प्राण्यांचे बळी देतो. अशा प्रकारची मनुष्यांना आणि इतर प्राण्यांना उपद्रवकारक समाजरचना नष्ट करून तिच्या जागी दुसरी हितसुखकर संघटना उभारावयाची असेल, तर प्रत्येकाला आपले आणि इतरांचे दुःख एक आहे अशी जाणीव झाली पाहिजे; आणि म्हणूनच बुद्ध भगवंताने पहिल्या आर्यसत्यांत सर्वसाधारण दु:खाचा समावेश केला.

जन्मजरामरणादिक सर्वसाधारण दुःख श्रमणांना मान्य होते, इतकेच नव्हे, तर त्या दुःखाचा नाश करण्यासाठीच त्यांची तपश्चर्या असे. परंतु दु:खाचे कारण कोणते, यासंबंधी त्यांचा मतभेद होता. कोणी म्हणत, दुःख आत्म्याने उत्पन्न केले (सयंकतं दुक्खं); दुसरे म्हणत, दुःख पराने उत्पन्न केले (परंकतं दुक्खं); तिसरे म्हणत, काही अंशी आत्म्याने आणि काही अंशी पराने दुःख उत्पन्न केले (सयंकतं व परंकतं च दुक्खं); आणि चवथे म्हणत, दुःख आत्म्याने किंवा पराने उत्पन्न केले नसून आकस्मिक आहे (असयंकारं अपरंकारं अधिच्चसमुप्पन्नं दुक्खं).

यात पहिल्या प्रकारचे श्रमण म्हटले म्हणजे निर्ग्रंथ (जैन) वगैरे होत. पूर्वजन्मी आत्म्याने पाप केल्यामुळे दु:ख उत्पन्न झाले, असे ते समजत आणि त्यांच्या परिहारार्थ देहदंडन करून आत्म्याला कष्टवीत. दुसर्‍या प्रकारचे श्रमण सांख्यासारखे होते. ते जड प्रकृतीमुळे दुःख उत्पन्न झाले असे मानीत आणि आत्म्याला प्रकृतीच्या तडाक्यातून सोडविण्यासाठी खडतर तप करीत. तिस-या प्रकारचे श्रमण आत्मा आणि प्रकृति मिळून दुःख उत्पन्न करतात असे प्रतिपादीत आणि आत्म्याला त्यातून सोडविण्यासाठी देहदण्डन करीत. चवथ्या प्रकारचे श्रमण दुःख आकस्मिक समजत असल्यामुळे अक्रियवादाकडे झुकत. अशा रीतीने श्रमण एक तर निष्फल तपश्चर्या करीत, किंवा निष्क्रिय बनत. बहुजन समाजाला त्यांचा फारच थोडा उपयोग होई.

दु:खाचे खरे कारण आत्मा किंवा प्रकृति नसून मनुष्याची तृष्णा आहे हे प्रथमतः बुद्ध भगवंताने दाखवून दिले. पूर्वजन्मीच्या आणि ह्या जन्मीच्या तृष्णेमुळेच सर्व दुःख उत्पन्न होते. तृष्णा कोठून आली, हा प्रश्न निरर्थक आहे. ती जोपर्यंत असेल तोपर्यंत दुःख उत्पन्न होणारच. हे दुसरे आर्यसत्य.

तृष्णेचा नाश करण्यानेच मनुष्य दुःखातून मुक्त होतो, हे तिसरे आर्यसत्य.

आणि तृष्णानाशाचा उपाय म्हटला म्हणजे दोन अंतांच्या मधून जाणारा आर्य अष्टांगिक मार्ग, हे चवथे आर्यसत्य.

23 . अष्टांगिक मार्गाचे स्पष्टीकरण

ह्या आर्य अष्टांगिक मार्गाची सम्यक् दृष्टि ही पहिली पायरी आहे. सम्यक् दृष्टि म्हणजे चार आर्यसत्यांचे यथार्थ ज्ञान. जगामध्ये दुःख भरले आहे. ते मनुष्यजातीच्या तीव्र तृष्णेमुळे उत्पन्न झाले, त्या तृष्णेचा क्षय केला असता सर्वांना शांति मिळणे शक्य आहे आणि परस्परांशी कायावाचामनेकरून सदाचाराने, सत्याने, प्रेमाने आणि कळकळीने वागणे, हा आर्य अष्टांगिक मार्ग त्या शांतीचा मार्ग आहे. अशी सम्यक् दृष्टि लोकांत उद्भवली नाही, तर अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या पायी होणारे तंटेबखेडे थांबावयाचे नाहीत, आणि जगाला शांति मिळावयाची नाही.

आपले ऐश्वर्य आणि सत्ता वाढविण्याचा संकल्प प्रत्येक व्यक्तीने केला तर त्यापासून त्याची आणि इतरांची सारखीच हानी होणार आहे. यासाठी कामोपभोगात बद्ध न होण्याचा, इतरांशी पूर्ण-मैत्री करण्याचा, आणि इतरांच्या सुखसमाधानात भर घालण्याचा शुद्ध संकल्प बाळगणे योग्य आहे.

खोटे भाषण, चहाडी, शिवीगाळ, वृथा बडबड, इत्यादि असद्वाणीच्या योगे समाजाची घडी बिघडते, व तंटेबखेडे उद्धवून ते हिंसेला कारणीभूत होतात; म्हणून सत्य, परस्परांचे सख्य साधणारे, प्रिय आणि मित भाषण करणे योग्य आहे. यालाच सम्यक् वाचा म्हणतात.

प्राणघात, चोरी, व्यभिचार इत्यादि कर्मे कायेने आचरली, तर त्यापासून समाजात मोठे अनर्थ उत्पन्न होतील. यास्तव प्राणघात, चोरी, व्यभिचार इत्यादिक कर्मांपासून अलिप्त राहून, लोकांचे कल्याण होईल, अशीच कायकर्मे आचरली पाहिजेत यालाच सम्यक् कर्मान्त म्हणतात.

सम्यक् आजीव म्हणजे समाजाला अपाय होणार नाही अशा रीतीने आपली उपजीविका करणे. उदाहरणार्थ, गृहस्थाने मद्यविक्रय, जनावरांची देवघेव, इत्यादि व्यवसाय करता कामा नये. यापासून समाजाला मोठा त्रास होतो, हे उघड आहे. असे व्यवसाय वर्ज्य करून शुद्ध आणि सरळ व्यवहाराने आपली उपजीविका करणे, यालाच सम्यक् आजीव म्हणतात.

जे वाईट विचार मनात आले नसतील त्यांना मनात येण्यास सवड न देणे, जे वाईट विचार मनात आले असतील त्यांचा नाश करणे, जे सुविचार मनात उद्भवले नसतील ते उत्पन्न करण्याचा प्रयत्न करणे, आणि जे सुविचार मनात उद्भवले असतील ते वाढवून पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करणे, या चार मानसिक प्रयत्नांना सम्यक् व्यायाम म्हणतात. (शारीरिक व्यायामाशी याचा संबंध नाही.)

शरीर अपवित्र पदार्थांचे बनले आहे, हा विवेक जागृत ठेवणे, शरीरांतील सुख-दु:खादि वेदनांचे वारंवार अवलोकन करणे, स्वचित्ताचे अवलोकन करणे आणि इंद्रिये व त्यांचे विषय यापासून कोणती बंधने उत्पन्न होतात आणि त्यांचा नाश कसा करता येतो इत्यादि मनोधर्मांचा विचार करणे, याला सम्यक् पद्धती म्हणतात.

आपल्या शरीरावर, मृतशरीरावर, मैत्री करुणादिक मनोवृत्तींवर किंवा पृथ्वी, आप, तेज, इत्यादिक पदार्थांवर चित्त एकाग्र करून चार ध्याने संपादन करणे याला सम्यक्-समाधि म्हणतात.

दोन अन्ताला न जाता या मध्यम मार्गाची भावना केली पाहिजे. पहिला अन्त म्हणजे कामोपभोगात सुख मानणे. त्याला हीन, ग्राम्य, सामान्यजनसेवित, अनार्य आणि अनर्थावह (हीनो गम्मो पोथुज्जनिको अनरियो अनत्थसंहितो) ही पाच विशेषणे जोडली आहेत. मनुष्यजाति दारिद्रयात आणि अज्ञानात खितपत पडली असता आपण मौजमजेत आनंद मानणे यासारखी हीन गोष्ट कोणती? हा अन्त ग्राम्य म्हणजे गांवढळ लोकांचा आहे. तो सामान्य लोकांचा आहे. आर्यांना (धीरवीरांना) शोभण्याजोगा नाही आणि तो अनर्थकारक आहे. दुसरा अन्त देहदण्डन करणे हा. त्याला हीन आणि ग्राम्य ही विशेषणे लावली नाहीत. पण तो दुःखकारक आहे. धीरवीरांना शोभण्यासारखा नाही आणि अनर्थावह आहे (दुक्खो अनरियो अनत्थसंहितो). अष्टांगिक मार्गाची सर्व अंगे हे दोन अन्त वर्ज्य करतात.

उदाहरणार्थ, खावे, प्यावे, मजा करावी ही चैनी लोकांची दृष्टि, आणि उपोषणादिक व्रतांनी देह झिजवावा ही तपस्व्याची दृष्टि, यांच्या मधली दृष्टि म्हटली म्हणजे चार आर्यसत्यांचे ज्ञान. याप्रमाणे बाकीच्या अंगांची देखील मध्यवर्तिता जाणावी.

24 . तळ टिपा

१. समाधौमार्ग, पृ.३८-४८ पाहा.

२.  संग्रामातून पराजय पावून मागे फिरावयाचे नाही, यासाठी मुंज नावाचे गवत डोक्याला बांधून प्रतिज्ञा करीत असत.

३. अंगुत्तरनिकाय एककनिपात. ‘बौद्धसंघाचा परिचय’ पृ.२२६ पाहा.

४. निदानवगसंयुत्त, सुत्त १० व ६५ पाहा.

५. माध्यमककारिकेचा आरंभ पाहा.

६.  स्कन्ध पाच आहेत. ते वासनामय असले म्हणजे त्यांना उपादानस्कन्ध म्हणतात. ‘बुद्ध, धर्म आणि संघ’, पृ. ९०-९१ पाहा.

७. निदानवगसंयुत्त, वर्ग २, सुत्त ७ पाहा.

८. ह्या सर्व पदार्थांवर ध्याने कशी संपदता येतात, याचे विवरण ‘समाधिमार्गां’त केले आहे.

९.  चार आर्यसत्यांची माहिती ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ या पुस्तकाच्या तिसऱ्या परिशिष्टात (पृ. ९४-९९) दिली आहे.

संदर्भ