१५४-१६८

भगवान बुद्ध

कर्मयोग

14-10-2017
18-09-2017
18-09-2017
18-09-2017

आकृतीमय सारांश

ठळक मुद्दे

  1. बुद्धाने जसा शस्रत्याग केला तसाच कठोर तपश्चर्येचासुद्धा निषेध केला.
  2. बुद्धाने नवीन अभिनव मध्यममार्ग शोधून काढला.
  3. बुद्धाने तीन कायिक, चार वाचसिक व तीन मानसिक पापकर्मे (दहा) सांगितले.
  4. बुद्धाने पापकर्मांवर विजय मिळविण्यासाठी कुशल कर्मपथ सांगितला.

सारांश

बुद्धाने जसा शस्रत्याग केला तसाच कठोर तपश्चर्येचासुद्धा निषेध केला. बुद्धाने मानवी कल्याणासाठी नवीन अभिनव मध्यममार्ग शोधून काढला. प्राणघात, अदत्तादान (चोरी) आणि काममिथ्याचार (व्यभिचार) ही तीन कायिक पापकर्मे; असत्य, चहाडी, शिवीगाळ आणि वृथा बडबड ही चार वाचसिक पापकर्मे; आणि परद्रव्याचा लोभ, इतरांच्या नाशाची इच्छा व नास्तिक दृष्टि ही तीन मानसिक पापकर्मे होत. त्यांपासून निवृत्त होणे म्हणजे कुशल कर्मपथ होय. यांचा आर्य अष्टांगिक मार्गात समावेश होतोच. तीन प्रकारचे कुशल कायकर्म म्हणजे सम्यक् कर्म, चार प्रकारचे कुशल वाचसिक कर्म म्हणजे सम्यक् वाचा, आणि तीन प्रकारचे मानसिक कुशल कर्म म्हणजे सम्यक् दृष्टि व सम्यक् संकल्पाबाकी राहिलेली आर्य अष्टांगिक मार्गाची चार अंगे या कुशल कर्मपथांना पोषकच आहेत. सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या चार अंगांच्या यथातथ्य भावनेशिवाय कुशल कर्मपथाची अभिवृद्धि आणि पूर्णता व्हावयाची नाही.

पारिभाषिक शब्द

कुशल कर्मपथ , कर्मयोग , शस्रत्याग , सम्यक् मार्ग , अष्टांगिक मार्ग , क्रान्तिकारक तत्त्वज्ञान

1 . बुद्ध नास्तिक की आस्तिक?

एके समयी बुद्ध भगवान वैशालीजवळ महावनात राहत होता. त्या वेळी काही प्रसिद्ध लिच्छवी राजे आपल्या संस्थागारात काही कारणास्तव जमले असता, बुद्धासंबंधाने गोष्टी निघाल्या. त्यांतील बहुतेक बुद्धाची, धर्माची आणि संघाची स्तुति करू लागले. ती ऐकून सिंह सेनापतीला बुद्धदर्शनाची इच्छा झाली. तो निर्ग्रंथांचा उपासक असल्यामुळे त्यांच्या मुख्य गुरुला-नाथपुत्ताला-भेटला, आणि म्हणाला, “भदन्त, मी श्रमण गोतमांची भेट घेऊ इच्छितो.”

नाथपुत्त म्हणाला, “सिंहा, तू क्रियावादी असता अक्रियवादी गोतमाची भेट का घेऊ इच्छितोस?” हे आपल्या गुरूचे वचन ऐकून सिंह सेनापतीने बुद्धदर्शनाला जाण्याचा बेत सोडून दिला. पुन्हा एकदोनदा त्याने लिच्छवींच्या संस्थागारात बुद्धाची, धर्माची आणि संघाची स्तुति ऐकली. तथापि नाथपुत्ताच्या सांगण्यावरून बुद्धदर्शनाला जाण्याचा बेत त्याला पुन्हा तहकुब करावा लागला. शेवटी सिंहाने नाथपुत्ताला विचारल्यावाचूनच बुद्धाची भेट घेण्याचा निश्चय केला; व मोठ्या लवाजम्यासह महावनात येऊन तो भगवंताला नमस्कार करून एका बाजूला बसला, आणि भगवंताला म्हणाला, “भदन्त, आपण अक्रियवादी आहात व अक्रियवाद श्रावकांना शिकविता, हे खरे काय?”

भगवान म्हणाला, “असा एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगे सत्यवादी मनुष्य म्हणू शकेल, श्रमण गोतम अक्रियवादी आहे. तो पर्याय कोणता? हे सिंहा, मी कायदुश्चरिताची, वाग्दुश्चरिताची व मनोदुश्चरिताची अक्रिया उपदेशितो.”

“सिंहा, दुसराही एक पर्याय आहे की, ज्याच्यामुळे सत्यवादी मनुष्य म्हणू शकेल, श्रमण गोतम क्रियावादी आहे. तो कोणता? मी कायसुचरिताची, वाक्सुचरिताची आणि मन:सुचरिताची क्रिया उपदेशितो.”

“आणखी असाही एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगे सत्यवादी मनुष्य मला उच्छेदवादी म्हणू शकेल. तो कोणता? सिंहा, मी लोभ, द्वेष, मोह इत्यादि सर्व पापकारक मनोवृत्तींचा उच्छेद उपदेशितो.”

“असाही एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगे सत्यवादी मनुष्य मला जुगुप्सी म्हणू शकेल. तो कोणता? सिंहा, मी कायदुश्चचरिताची, वाग्दुश्चरिताची आणि मनोदुश्चरिताची जुगुप्सा (कंटाळा) करतो, पापकारक कर्मांचा मला वीट आहे.”

“असाही एक पर्याय आहे की, ज्याच्यायोगे सत्यवादी मनुष्य मला विनाशक म्हणू शकेल. तो कोणता? लोभाचा, द्वेषाचा आणि मोहाचा मी विनाश उपदेशितो.”

“आणि सिंहा, असा देखील एक पर्याय आहे की ज्याच्यायोगे सत्यवादी मनुष्य मला तपस्वी म्हणू शकेल. तो कोणता? हे सिंहा, पापकारक अकुशल धर्म तापवून सोडावे असे मी म्हणतो. ज्याचे पापकारक अकुशल धर्म वितळून गेले, नष्ट झाले, पुन्हा उत्पन्न होणार नाहीत, त्याला मी तपस्वी म्हणतो.”

2 . नास्तिकतेचा आरोप

या सुत्तात बुद्धावर मुख्य आरोप अक्रियावादाचा केलेला आहे. तो खुद्द महावीर स्वामींनी केला असेल किंवा नसेल. तथापि त्या वेळी अशा प्रकारचा आरोप बुद्धावर करण्यात येत असे, यात शंका नाही.

गोतम क्षत्रिय कुलात जन्मला. शाक्य क्षत्रियांचे शेजारी आणि आप्त कोलिय क्षत्रिय. या दोघांमध्ये रोहिणी नदीच्या पाण्यासंबंधाने वारंवार मारामा-या होत, हे मागे सांगितलेच आहे (पृ.८१ पाहा). दुस-या एखाद्या टोळीने आपल्या टोळीतील माणसाचे 

नुकसान केले किंवा खून केला, तर त्याचा मोबदला त्या टोळीतील माणसाचे नुकसान करून किंवा खून करून घेण्याची पद्धति आजला सरहद्दीवरील पठाण लोकात चालू आहे; तशीच ती प्राचीन काळी हिंदुस्थानातील क्षत्रियांत असली, तर त्यात आश्चर्य मानण्याजोगे काही नाही. खरे आश्चर्य हे की, या क्षत्रियांच्या एका टोळीत जन्मलेल्या गोतमाने आपल्या शेजा-यांचा आणि आप्तांचा सूड उगवणे साफ नाकारले, आणि एकदम तपस्वी लोकांत प्रवेश केला.

गृहस्थाश्रमाचा कंटाळा आला, तर त्या काळचे ब्राह्मण आणि क्षत्रिय गृहत्याग करून परिव्राजक बनत, आणि खडतर तपश्चर्या करीत. तेव्हा गोतम तपस्वी झाला, यात कोणालाही विशेष वाटले नसावे. फार झाले तर हा तरुण गृहस्थ स्वाश्रमाला निरुपयोगी ठरला, असे लोकांनी म्हटले असेल. पण जेव्हा सात वर्षे तपश्चर्या करून गोतम बोधिसत्त्व बुद्ध झाला, आणि गृहस्थाश्रमातील चैनीचा व संन्यासाश्रमातील तपश्चर्येचा सारखाच निषेध करू लागला, तेव्हा त्याच्यावर टीका होऊ लागल्या.

ब्राह्मणांना चालू समाजपद्धति पाहिजे होती. त्यांचा कर्मयोग म्हटला म्हणजे ब्राह्मणांनी यज्ञयाग करावे, क्षत्रियांनी युद्ध करावे, वैश्यांनी व्यापार आणि शूद्रांनी सेवा करावी. हा कर्मयोग ज्याला पसंत नसेल त्याने अरण्यवास पत्करून तपश्चर्येच्या योगाने आत्मबोध करून घ्यावा, आणि मरून जावे; समाजाची घडी बिघडेल असे कोणतेही कृत्य करू नये.

निरनिराळ्या श्रमणसंघांत भिन्न भिन्न तत्त्वज्ञाने प्रतिपादिली जात असत; तथापि तपश्चर्येच्या संबंधाने त्यांपैकी अधिकतर श्रमणांची एकवाक्यता होती. त्यात निर्ग्रन्थांनी कर्माला विशेष महत्त्व दिले. हा जन्म दुःखकारक आहे, आणि तो पूर्वजन्मीच्या पापकर्मांनी आला असल्यामुळे ती पापे नष्ट करण्यासाठी खडतर तपश्चर्या केली पाहिजे, असे त्यांचे पुढारी प्रतिपादीत. आणि बुद्ध तर तपश्चर्येचा निषेध करणारा. तेव्हा त्याला निर्ग्रन्थांनी अक्रियवादी (अकर्मवादी) म्हणणे अगदी साहजिक होते. ब्राह्मणांच्या दृष्टीने बुद्धाने शस्रत्याग केला, म्हणून तो अक्रियवादी ठरतो, तर तपस्व्यांच्या दृष्टीने तपश्चर्या सोडली म्हणून अक्रियवादी ठरतो!

3 . क्रान्तिकारक तत्त्वज्ञान

येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, गोतमाने गृहत्याग केला तो केवळ आत्मबोध करून घेऊन मोक्ष मिळविण्यासाठी नव्हे. आपल्या शेजा-यांवर शस्त्र उगारणे त्याला योग्य वाटले नाही. शस्त्रावाचून परस्परांच्या सलोख्याने चालणारी अशी एक समाजरचना करता येईल की काय या संबंधाने त्याच्या मनात सतत विचार चालू होते. तपश्चर्येने आणि तपस्वी लोकांच्या तत्त्वज्ञानाने मनुष्यजातीसाठी असा एखादा सरळ मार्ग काढता येईल असे वाटल्यामुळेच त्याने गृहत्याग करून तपश्चर्या आरंभिली, आणि तिच्या योगे काही निष्पन्न होत नाही असे जाणून त्याने ती सोडून दिली, व एक नवीन अभिनव मध्यम मार्ग शोधून काढला.

आजकालच्या क्रांतिकारी लोकांना राजकारणी आणि धार्मिक लोक जसे विनाशक (nihilist) वगैरे विशेषणे लावतात, आणि त्यांचा अडाणीपणा समाजासमोर मांडतात, त्याप्रमाणे बुद्धाला तत्समकालीन टीकाकार अक्रियवादी म्हणत, आणि त्याच्या नवीन तत्त्वज्ञानाची निरर्थकता लोकांपुढे मांडीत, असे समजण्यास हरकत नाही.

4 . दुश्चरिते व सुचरिते

येथे वर दिलेली दुश्चरिते आणि सुचरिते कोणती याचे थोडक्यात विवेचन करणे योग्य वाटते. भगवान सालेय्यक ब्राह्मणांना म्हणतो, “गृहस्थहो, कायेने घडणारे तीन प्रकारचे अधर्माचरण कोणते? एखादा मनुष्य प्राणघात करतो, रुद्र, दारुण, लोहितपाणि आणि मारहाण करण्यामध्ये गुंतलेला असतो; अथवा चोरी करतो, जी वस्तू आपली नव्हे ती-गावात किंवा अरण्यात असो-मालकाला न विचारता घेतो; किंवा व्यभिचार आचरतो, आई, बाप, भगिनी, पति किंवा आप्त यांनी रक्षण केलेल्या स्त्रीशी व्यभिचार करतो. याप्रमाणे कायेने त्रिविध अधर्माचरण घडते.”

“आणि, गृहस्थहो, वाचेने घडणारे चार प्रकारचे अधर्माचरण कोणते? एखादा मनुष्य खोटे बोलतो. सभेत, परिषदेत, आप्तमंडळात किंवा राजद्वारी गेला असता त्याची साक्ष विचारतात, तुला जे माहित असेल ते सांग. ती जे जाणत नाही, ते मी जाणतो, जे पाहिले नाही ते मी पाहिले, असे सांगतो. ह्याप्रमाणे स्वतःसाठी, परक्यासाठी किंवा थोड्याबहुत प्राप्तीसाठी जाणूनबुजून खोटे बोलतो. अथवा ती चहाडी करतो, ह्या लोकांचे ऐकून त्या लोकांत भेद पाडण्यासाठी कागाळ्या सांगतो, किंवा त्या लोकांचे ऐकून ह्या लोकांत विरोध उत्पन्न करण्यासाठी यांना येऊन सांगतो. याप्रमाणे एकोप्याने वागणा-यात भेद पाडतो, किंवा भांडणा-यांना उत्तेजन देतो. भांडण वाढविण्यात त्याला आनंद वाटतो, भांडण वाढविणारे वचनच तो बोलत असतो. अथवा तो शिवीगाळ करतो, दुष्टपणाने भरलेले, कर्कश, कटु, वर्मी लागणारे, क्रोधयुक्त आणि समाधानाचा भंग करणारे वचन बोलतो. अथवा तो वृथा बडबड करतो, भलत्याच वेळी बोलतो, न घडलेल्या गोष्टी रचून सांगतो, अधार्मिक, शिष्टाचाराविरुद्ध, दुर्लक्ष करण्याला योग्य, प्रसंगाला न शोभणारे, अकारण पाल्हाळीक आणि अनर्थक भाषण करतो. याप्रमाणे वाचेने चतुर्विध अधर्माचरण घडते.”

“आणि गृहस्थहो, तीन प्रकारचे मानसिक अधर्माचरण कोणते? एखादा मनुष्य   दुस-याच्या द्रव्याचे चिंतन करतो, दुस-याच्या संपत्तीची साधने आपणाला मिळावी, असे इच्छितो अथवा तो द्वेषबुद्धि असतो; हे प्राणी मारले जावोत, नाश पावोत, असा विचार करतो, अथवा मिथ्यादृष्टि होतो, दान नाही, धर्म नाही, सुकृतदुष्कृत कर्माचे फळ नाही, हा लोक नाही, परलोक नाही, अशा प्रकारचे नास्तिक विचार बाळगतो. याप्रमाणे मनाने त्रिविध अधर्माचरण घडते.”

“गृहस्थहो, तीन प्रकारचे कायेने घडणारे धर्माचरण कोणते? एखादा मनुष्य प्राणघात करीत नाही, तो इतरांवर शस्त्र उगारीत नाही, त्याला हत्या करण्यास लाज वाटते, सर्व प्राणिमात्रांविषयी त्याचे आचरण दयामय असते. तो चोरी करीत नाही, गावात किंवा अरण्यात दुस-याची वस्तु दिल्याशिवाय घेत नसतो. तो व्यभिचार करीत नाही; आई, बाप, बहीण, भाऊ, पति, आप्त इत्यादिकांनी रक्षिलेल्या स्त्रियांशी संबंध ठेवीत नाही. याप्रमाणे कायेने त्रिविध धर्माचरण घडते.”

“आणि गृहस्थहो, चार प्रकारचे वाचेने घडणारे धर्माचरण कोणते? एखादा मनुष्य खोटे बोलणे साफ सोडून देतो, सभेत, परिषदेत, किंवा राजद्वारी त्याची साक्ष विचारली असता, तो जे जाणत नाही, ते जाणत नाही, आणि जे पाहिले नाही, ते पाहिले नाही, असे म्हणतो. येणेप्रमाणे आपणासाठी, परक्यासाठी किंवा थोड्याबहुत फायद्यासाठी खोटे बोलत नाही. तो चहाडी करण्याचे सोडून देतो, ह्या लोकांचे ऐकून त्या लोकांचा भेद पाडण्यासाठी ती गोष्ट त्यांना सांगत नाही, किंवा त्या लोकांचे ऐकून ह्यांना सांगत नाही; याप्रमाणे ज्यांच्यात भांडणे झाली असतील त्यांची एकी करतो, आणि ज्यांच्यात एकोपा आहे त्यांना उत्तेजन देतो. एकोप्यात त्याला आनंद वाटतो आणि एकोपा होईल असे भाषण करतो. तो शिवीगाळ करण्याचे सोडून देतो. तो सरळ, कानाला गोड लागणारे, हृदयंगम, नागरिकाला शोभणारे आणि बहुजनाला आवडणारे भाषण करतो. तो बडबड करीत नाही, प्रसंगानुसार, तथ्य, अर्थयुक्त, धार्मिक, शिष्टाचाराला अनुसरणारे, लक्षात ठेवण्याजोगे, योग्य वेळी, सकारण, मुद्देसूद आणि सार्थक भाषण करतो. याप्रमाणे वाचेने चतुर्विध धार्मिक आचरण घडते.”

“आणि गृहस्थहो, तीन प्रकारचे मानसिक धर्माचरण कोणते? एखादा मनुष्य परद्रव्याचा लोभ धरीत नाही, परसंपत्तीची साधने आपली व्हावी असा विचार मनात आणीत नाही, त्याचे चित्त द्वेषापासून मुक्त असते, हे प्राणी अवैर, निर्बाध, दुःखरहित आणि सुखी होवोत, असा त्याचा शुद्ध संकल्प असतो. तो सम्यग्दृष्टि होतो. दानधर्म आहे, सुकृतदुष्कृत कर्माचे फळ आहे, इहलोक परलोक आहे, इत्यादि गोष्टींवर त्याचा विश्वास असतो. याप्रमाणे मनाने त्रिविध धर्माचरण घडते.”

संक्षेपाने सांगावयाचे म्हटले म्हणजे प्राणघात, अदत्तादान (चोरी) आणि काममिथ्याचार (व्यभिचार) ही तीन कायिक पापकर्मे; असत्य, चहाडी, शिवीगाळ आणि वृथा बडबड ही चार वाचसिक पापकर्मे; आणि परद्रव्याचा लोभ, इतरांच्या नाशाची इच्छा व नास्तिक दृष्टि ही तीन मानसिक पापकर्मे होत. ह्या दहांनाही अकुशल कर्मपथ म्हणतात. त्यांपासून निवृत्त होणे म्हणजे कुशल कर्मपथ. ते देखील दहा आहेत, आणि त्यांचे वर्णन वर आलेच आहे. दहा अकुशल आणि दहा कुशल कर्मपथांची वर्णने त्रिपिटक वाड्‍ःमयात पुष्कळ ठिकाणी सापडतात. वरच्या उता-यात अकुशल कर्मपथांना अधर्माचरण व कुशल कर्मपथांना धर्माचरण म्हटले आहे.

5 . कुशल कर्मे व अष्टांगिक मार्ग

यापैकी कुशल कर्मपथांचा आर्य अष्टांगिक मार्गात समावेश होतोच. तीन प्रकारचे कुशल कायकर्म म्हणजे सम्यक् कर्म, चार प्रकारचे कुशल वाचसिक कर्म म्हणजे सम्यक् वाचा, आणि तीन प्रकारचे मानसिक कुशल कर्म म्हणजे सम्यक् दृष्टि व सम्यक् संकल्पाबाकी राहिलेली आर्य अष्टांगिक मार्गाची चार अंगे या कुशल कर्मपथांना पोषकच आहेत. सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या चार अंगांच्या यथातथ्य भावनेशिवाय कुशल कर्मपथाची अभिवृद्धि आणि पूर्णता व्हावयाची नाही.

6 . अनासक्तियोग

केवळ कुशल करीत गेलो आणि जर त्यात आसक्त झालो, तर त्यायोगे अकुशल उत्पन्न होण्याचा संभव आहे.

कुसलो धम्मो अकुसलस्स धम्मस्स आरम्मणपच्चयेन पच्चयो | दानं दत्वा सीलं समादियित्वा उपासथकम्मं कत्वा तं अस्सादेति अभिनन्दति | तं आरब्भ रागो उप्पज्जति दिट्ठि उप्पज्जति विचिकिच्छा उपज्जति उद्धच्चं उप्पज्जति दोमनस्सं उप्पज्जति (तिकपट्ठान).

‘कुशल मनोविचार अकुशलाला आलंबन प्रत्ययाने प्रत्यक्ष होतो. (एखादा मनुष्य) दान देतो, शील राखतो, उपोसथकर्म करतो, आणि त्याचा आस्वाद घेतो, त्याचे अभिनंदन करतो. त्यामुळे लोभ उत्पन्न होतो, दृष्टि उत्पन्न होते, शंका उत्पन्न होते, भ्रान्तता उत्पन्न होते, दौर्मनस्य उत्पन्न होते.’

येणेप्रमाणे कुशल मनोवृत्ति अकुशलाला कारणीभूत होत असल्यामुळे कुशल विचारामध्ये आसक्ति ठेवता कामा नये, निरपेक्षपणे कुशल कर्म करीत राहिले पाहिजे. हाच अर्थ धम्मपदातील खालील गाथेत संक्षेपाने दर्शविला आहे.

सब्बपापस्स अकरणं कुसलस्स उपसम्पदा |

सचित्तपरियोदपनं एतं बुद्धान सासनं ||

‘सर्व पापांचे अकरण, सर्व कुशलाचे सम्पादन आणि स्वचित्ताचे संशोधन हे बुद्धाचे शासन होय.’

म्हणजे वर सांगितलेले सर्व अकुशल कर्मपथ पूर्णपणे वर्ज्य करावयाचे, आणि कुशल कर्मपथांचे सदोदित आचरण करून त्यात आपले मन आसक्त होऊ द्यावयाचे नाही. हे सर्व अष्टांगिक मार्गाच्या अभ्यासाने घडून येते.

7 . कुशलकर्मांत जागृति आणि उत्साह

कुशलकर्मांत अत्यंत जागृति आणि उत्साह ठेवला पाहिजे, अशा प्रकारचे उपदेश त्रिपिटक वाड्‍ःमयात अनेक सापडतात. त्या सर्वांचा संग्रह येथे करणे शक्य नाही, तथापि नमुन्यादाखल त्यापैकी एक लहानसा उपदेश येथे देतो.

बुद्ध भगवान म्हणतो, “भिक्षुहो, स्त्रीने, पुरुषाने, गृहस्थाने किंवा प्रव्रजिताने, पाच गोष्टींचे सतत चिंतन करावे. १) मी जराधर्मी आहे, असा वारंवार विचार करावा. का की, ज्या तारुण्यमदामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात, तो मद या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. २) मी व्याधिधर्मी आहे, असा वारंवार विचार करावा. का की, ज्या आरोग्यमदामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात, तो मद या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. ३) मी मरणधर्मी आहे, असा वारंवार विचार करावा. का की, ज्या जीवितमदामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात, तो मद या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. ४) प्रियांचा व आवडत्यांचा (प्राण्यांचा किंवा पदार्थांचा) मला वियोग घडणार, असा वारंवार विचार करावा. का की, ज्या प्रियांच्या स्नेहामुळे प्राणी काया-वाचा-मने दुराचरण करतात, तो स्नेह या चिंतनाने नाश पावतो; निदान कमी होतो. ५) मी कर्मस्वकीय, कर्मदायाद, कर्मयोनि, कर्मबंधु, कर्मप्रतिशरण आहे, कल्याणकारक किंवा पापकारक कर्म करीन त्याचा दायाद होईन, असा वारंवार विचार करावा. का की, त्यामुळे कायिक, वाचसिक आणि मानसिक दुराचरण नाश पावते; निदान कमी होते.

“मी एकटाच नव्हे, तर यच्चयावत् प्राणी जराधर्मी, व्याधिधर्मी, मरणधर्मी आहेत, त्या सर्वांना प्रियांचा वियोग घडतो, आणि ते देखील कर्मदायाद आहेत, असा आर्यश्रावक सतत विचार करतो, तेव्हा त्याला मार्ग सापडतो. त्या मार्गाच्या अभ्यासाने त्याची संयोजने नष्ट होतात.”

ह्या उता-यात कर्मस्वकीय म्हणजे कर्मच काय ते माझे स्वकीय आहे; बाकी सर्व वस्तुजात माझ्यापासून कधी विभक्त होईल याचा नेम नाही; मी कर्माचा दायाद आहे, म्हणजे बरी कर्मे केली तर मला सुख मिळेल, वाईट केली तर दुःख भोगावे लागेल; कर्मयोनि म्हणजे कर्मामुळेच माझा जन्म झाला आहे; कर्मबंधु म्हणजे संकटात माझे कर्मच माझे बांधव आणि कर्मप्रतिशरण म्हणजे कर्मच माझे रक्षण करू शकेल. ह्यावरून बुद्ध भगवंताने कर्मावर किती जोर दिला आहे, हे चांगले समजून येईल. अशा गुरूला नास्तिक म्हणणे कसे योग्य होईल?

सत्कर्मे उत्साहित मनाने करावी, यासंबंधाने धम्मपदाची खालील गाथा देखील विचार करण्याजोगी आहे.

अभित्थरेथ कल्याणे पापा चित्तं निवारये |

दन्धं हि करोतो पुञ्ञं पापस्मिं रमतौ मनो ||

‘कल्याणकर्मे करण्यात त्वरा करावी, आणि पापापासून चित्त निवारावे. कारण, आळसाने पुण्यकर्म करणा-याचे मन पापात रमते.’

8 . ब्राह्मणांचा कर्मयोग

एथवर बुद्धाच्या कर्मयोगाचा विचार झाला. आता त्या काळच्या ब्राह्मणांत कोणत्या प्रकारचा कर्मयोग चालू होता, याचा थोडक्यात विचार करणे इष्ट आहे. ब्राह्मणांचे उपजीविकेचे साधन म्हटले म्हणजे यज्ञयाग असत आणि ते विधिपूर्वक करणे यालाच ब्राह्मण आपला कर्मयोग मानीत. त्यानंतर क्षत्रियांनी युद्ध, वैश्यांनी व्यापार आणि शूद्रांनी सेवा करावी, हे त्यांचे कर्मयोग होत, असे ते प्रतिपादीत. त्यात एखाद्याला कंटाळा आला, तर त्याने सर्वसंगपरित्याग करून रानावनात जावे व तपश्चर्या करावी याला संन्यासयोग म्हणत. त्यात त्याच्या कर्मयोगाचा अन्त होत असे. काही ब्राह्मण संन्यास घेऊन देखील अग्निहोत्रादिक कर्मयोग आचरीत असत आणि त्यालाच श्रेष्ठ समजत. यासंबंधाने भगवद्गीतेत म्हटले आहे-

यज्ञार्थात्कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबंधनः|

तदर्थं कर्म कौंतेय मुक्तसंगः समाचर ||

‘यज्ञाकरिता केलेल्या कर्माहून इतर कर्म लोकांना बंधनकारक होते. म्हणून हे कौंतेया, संग सोडून यज्ञासाठी तू कर्म कर.’

सहयज्ञाः प्रजाः सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः|

अनेक प्रसयिष्यध्वमेष वोऽस्त्विष्टकामधुक् ||

‘पूर्वी (सृष्टीच्या आरंभी) यज्ञासह प्रजा उत्पन्न करून ब्रह्मदेव म्हणाला, “तुम्ही या यज्ञाच्या योगाने वृद्धि पावाल; ही तुमची इष्ट कामधेनु होवो.” ’ आणि म्हणून,

एवं प्रवर्तितं चक्रं नानुवर्तयतीह यः|

आघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवति ||

‘याप्रमाणे हे सुरू केलेले (यज्ञयागाचे) चक्र या जगात जो चालवीत नाही, त्याचे आयुष्य पापरूप असून तो इंद्रियलंपट व्यर्थ जगतो.’

9 . ब्राह्मणांचा लोकसंग्रह

परंतु जर एखाद्याच्या मनात विचार आला की, प्रजापतीने प्रवर्तिलेले हे चक्र ठीक नाही, कारण त्याच्या बुडाशी हिंसा आहे, तर तो मनात येऊ देऊ नये; त्यामुळे अज्ञ जनांचा बुद्धिभेद होईल.

न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् |

जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान्युक्तः समाचरन् ||

‘कर्मात आसक्त असलेल्या अज्ञ जनांचा बुद्धिभेद करू नये, विद्वान मनुष्याने युक्त 

होऊन, म्हणजे सर्व कर्मे नीटपणे आचरून इतरांना करण्यास लावावीत’. (भ.गी., ३|२६. हा गीतेचा सर्वच अध्याय विचारणीय आहे.)

भगवद्गीता कोणत्या शतकात लिहिली या वादात पडण्याचे कारण नाही. परंतु कोणत्याही लेखकाने तिला बुद्धसमकालीन गणले नाही. बुद्धानंतर पाचशे वर्षांपासून एक हजार वर्षांपर्यंत तिचा काळ असावा अशी भिन्न भिन्न अनुमाने पाश्चात्य पण्डितांनी केली आहेत. यात शंका नाही की, ती बरीच आधुनिक आहे. तथापि येथे दर्शविलेले विचार बुद्धसमकालाच्या ब्राह्मणांत प्रचलित होते. आपणाला जरी कुशल तत्त्व समजले, तरी ते लोकांत प्रगट करू नये, असे लोहित्य नावाचा कोसलदेशवासी प्रसिद्ध ब्राह्मण प्रतिपादीत असे. संक्षेपाने त्याची गोष्ट येणेप्रमाणे-

भगवान कोसल देशात प्रवास करीत शालवतिका नावाच्या गावाजवळ आला. तो गाव पसेनदि कोसलराजाने लोहित्य ब्राह्मणाला इनाम दिला होता. लोहित्य असे एक पापकारक मत प्रतिपादन करी की, ‘जर एखाद्या श्रमणाला किंवा ब्राह्मणाला कुशल तत्त्वाचा बोध झाला, तर तो त्याने दुस-याला सांगू नये; एक मनुष्य दुस-याला काय करू शकणार? तो दुस-याचे जुने बंधन तोडून त्याला हे नवे बंधन उत्पन्न करील; यास्तव हे लोभी वर्तन असे मी म्हणतो.’

भगवान आपल्या गावाजवळ आल्याचे वर्तमान जेव्हा लोहित्य ब्राह्मणाला समजले, तेव्हा रोसिका नावाच्या न्हाव्याला पाठवून त्याने भगवंताला आमंत्रण दिले; आणि दुस-या दिवशी जेवण तयार करून त्याच न्हाव्याकडून जेवण तयार असल्याचे वर्तमान भगवंताला आणि भिक्षुसंघाला कळविले. भगवान आपले पात्र आणि चीवर घेऊन लोहित्य ब्राह्मणाच्या घरी येण्यास निघाला. वाटेत रोसिका न्हाव्याने लोहित्य ब्राह्मणाचे मत भगवंताला सांगितले; आणि तो म्हणाला, “भदन्त, ह्या पापकारक मतापासून लोहित्याची सुटका करा.”

लोहित्याने भगवंताला आणि भिक्षुसंघाला आदरपूर्वक भोजन दिले. भोजनोत्तर भगवान त्याला म्हणाला, “हे लोहित्य, एखाद्याला कुशल तत्त्वाचा बोध झाला, तर तो त्याने इतरांना सांगू नये, असे तू प्रतिपादन करतोस काय?”

लो.-  होय, भो गोतम.

भ.-   हे लोहित्य, तू ह्या शालवतिका गावात राहात आहेस. आता कोणी असे म्हणेल की ह्या शालवतिका गावाचे जेवढे उत्पन्न आहे, ते सर्व एकट्या लोहित्यानेच उपभोगावे,   दुस-या कोणालाहि देऊ नये. असे बोलणारा तुझ्यावर अवलंबून असणा-या (ह्या गावच्या) लोकांचे अकल्याण करणारा होणार नाही काय?

लोहित्याने ‘होईल’ असे उत्तर दिल्यावर भगवान म्हणाला, “जो इतरांना अंतराय करणारा तो त्यांचा हितानुकंपी होईल की अहितानुकंपी?”

लो.- अहितानुकंपी, भो गोतम.

भ.-  अशा माणसाचे मन मैत्रीमय असेल की, वैरमय असेल?

लो.-  वैरमय, भो गोतम.

भ.-   वैरमय चित्त असलेला माणूस मिथ्यादृष्टि होईल की सम्यग्दृष्टि?

लो.-  मिथ्यादृष्टि, भो गोतम.

10 . कुशल कर्माने अकुशलावर जय मिळवावा

येथे आणि दुस-या अनेक ठिकाणी बुद्ध भगवंताचे म्हणणे असे की, चालत आलेल्या अकुशल रूढीविरुद्ध कुशल विचार सुचला तर तो लोकांत प्रचलित करणे हे सज्जन मनुष्याचे श्रेष्ठ कर्तव्य होय; वाईट कर्म आचरणा-याला काही एक न बोलता किंवा आपण त्याच्यासारखेच वागून ती तशीच आचरू देणे हे कर्तव्य नव्हे.

ब्राह्मणांचे म्हणणे होते की, यज्ञयाग आणि वर्णव्यवस्था प्रजापतीनेच उत्पन्न केली असल्यामुळे त्यांना अनुसरून घडणारी कर्मे पवित्र होत. परंतु भगवान बुद्धाचे म्हणणे हे की, तृष्णेपासून उत्पन्न झालेली हिंसादिक कर्मे कधीही शुद्ध होऊ शकत नाहीत. त्यामुळे मनुष्य विषम मार्गात बद्ध झाला आहे आणि त्या कर्मांविरुद्ध कुशल कर्मे आचरल्यानेच त्याची ह्या विषम मार्गापासून सुटका होईल. मज्झिमनिकायांतील उल्लेख सुत्तांत (नं. ८) भगवान म्हणतो, ‘हे चुन्द, दुसरे हिंसक वृत्तीने वागतात तेथे आपण अहिंसक होऊ या, अशी सफाई करावी. दुसरे प्राणघात करतात तर आपण प्राणघातापासून निवृत्त होऊ या, अशी सफाई करावी. दुसरे चोर होतात तर आपण चोरीपासून निवृत्त होऊ या. दुसरे अब्रह्मचारी, तर आपण ब्रह्मचारी होऊ या. दुसरे खोटे बोलतात, तर आपण खोटे बोलण्यापासून निवृत्त होऊ या. दुसरे चहाडी करतात, तर आपण चहाडीपासून निवृत्त होऊ या. दुसरे शिवीगाळ करतात, तर आपण शिवीगाळीपासून निवृत्त होऊ या. दुसरे वृथाप्रलाप (बडबड) करतात, तर आपण वृथाप्रलापासून निवृत्त होऊ या. दुसरे परकीय धनाचा लोभ धरतात तर आपण परकीय धनाच्या लोभापासून मुक्त होऊ या. दुसरे द्वेष करतात तर आपण द्वेषापासून मुक्त होऊ या. दुसरे मिथ्यादृष्टि आहेत, तर आपण सम्यग्दृष्टि होऊ या, अशी सफाई करावी....

“हे चुन्द, एखाद्या विषम मार्गात सापडलेल्या माणसाला त्यातून बाहेर पडण्यासाठी सरळ मार्ग सापडावा त्याप्रमाणे विहिंसक माणसाला विहिंसेपासून बाहेर निघण्याला अविहिंसा आहे. प्राणघाती माणसाला मुक्त होण्याला प्राणघातापासून विरति, चोराला मुक्त होण्याला चोरीपासून विरति, अब्रह्मचा-याला मुक्त होण्याला अब्रह्मचर्यापासून विरति, लबाडाला मुक्त होण्याला लबाडीपासून विरति, चहाडखोराला मुक्त होण्याला चहाडीपासून विरति, कर्कश वचन बोलणा-याला मुक्त होण्यास कर्कश वचनापासून विरति, आणि वृथाप्रलाप करणा-यास मुक्त होण्याला वृथाप्रलापापासून विरति, हाच उपाय आहे... ”

“हे चुन्द, जो स्वतः गंभीर पंकात रुतलेला आहे, तो दुस-याला त्या चिखलातून वर काढील हे शक्य नाही. त्याचप्रमाणे ज्याने स्वत:चे दमन केले नाही, स्वत:ला शिस्त लावून घेतली नाही, जो स्वतः शान्त नाही, तो दुस-याचे दमन करील, दुस-याला शिस्त लावील, दुस-याला शांत करील, हे संभवत नाही. पण जो स्वतः दान्त, विनीत आणि परिनिर्वृत्त असेल, तोच दुस-याचे दमन करील, दुस-याला विनय शिकवील आणि दुस-याला परिनिर्वृत्त (शान्त) करील, हे संभवनीय आहे.”

हाच अर्थ धम्मपदाच्या एका गाथेत संक्षेपाने निर्देशिला आहे. ती गाथा ही-

अक्कोधेन जिने कोधं असाधुं साधुना जिने |

जिने कदरियं दानेन सच्चेनालीकवादिनं ||

‘क्षमेने क्रोधाला जिंकावे, असाधूला साधुत्वाने जिंकावे, कृपणाला दानाने जिंकावे व लबाडाला सत्याने जिंकावे’ (धम्मपद २२३).

11 . दश कुशल कर्मपथांत ब्राह्मणांनी केलेला फेरफार

बरेच आढेवेढे घेऊन वैदिक ग्रन्थकारांना वर निर्देशिलेल्या कुशल आणि अकुशल कर्मपथांना मान्यता द्यावी लागली. पण त्यात त्यांनी आपल्या हक्कावर गदा येऊ नये अशी खबरदारी घेतली. मनुस्मृतीत हे दहा अकुशल कर्मपथ कशा प्रकारे स्वीकारले आहेत ते पहा.

स तानुवाच धर्मात्मा महर्षीन्मानवो भृगुः |

अस्य सर्वस्य शृणुत कर्मयोगस्य निर्णयम् ||

‘तो मनुकुलोत्पन्न धर्मात्मा भृगु त्या महर्षींना म्हणाला, ह्या सर्व कर्मयोगाचा निर्णय ऐका.’

परद्रव्येष्वभिध्यानं मनसानिष्टचिंतनम् |

वितथाभिनिवेशश्च त्रिविधं कर्म मानसम् ||  

‘परद्रव्याचा अभिलाष धरणे, दुस-याचे वाईट चिंतणे आणि भलत्याच मार्गाला लागणे (नास्तिकता), ही तीन मानसिक (पापकर्मे) जाणावी.’

पारुष्यमनृतं चैव पैशुन्यं चापि सर्वशः |

असंबद्धप्रलापश्च वाड्‍ःमयं स्याच्चतुर्विधम् ||

‘कठोर भाषण, असत्य भाषण, सर्व प्रकारची चहाडी आणि वृथा बडबड, ही चार वाचिक पापकर्मे होत.’

अदत्तानामुपादानं हिंसा चैवाविधानत: |

परदारोपसेवा च शारीरं त्रिविधं स्मृतम् ||

‘अदत्तादान (चोरी), वेदविहित नसलेली हिंसा व परदारागमन, ही तीन कायिक पापकर्मे होत.’

त्रिविधं च शरीरेण वाचा चैव चतुर्विधम् |

मनसा त्रिविधं कर्म दश कर्मपथांस्त्जेत् ||

‘(याप्रमाणे) त्रिविध कायिक, चतुर्विध वाचसिक आणि त्रिविध मानसिक असे दहा (अकुशल) कर्मपथ त्यजावे.’ (मनु., १२|५-९).

यांपैकी पहिल्या श्लोकात ‘कर्मयोग’ हा शब्द फार उपयुक्त आहे. मनुस्मृतीच्या कर्त्याला बुद्धाने उपदेशिलेला कर्मयोग पसंत होता खरा, तरी त्याने त्यात एक अपवाद ठेवून दिला. तो हा की, हिंसा वेदविहित नसली तरच ती करावयाची नाही, वेदाच्या आधारे केलेली हिंसा, हिंसा नव्हे.

12 . युद्ध धार्मिक ठरल्याने अकुशल कर्मपथ उपयुक्त ठरले

यज्ञयागातील हिंसा त्याज्य मानिली असती, तर यज्ञयाग करण्याचे कारणच राहिले नसते. आणि ते यज्ञयाग कशासाठी होते? तर युद्धात जय मिळावा व जय मिळाल्यानंतर मिळविलेले राज्य चिरस्थायी व्हावे म्हणून. अर्थात् युद्धातील हिंसा धार्मिक गणण्यात आली नसती, तर वैदिक हिंसेचे कारणच राहिले नसते; आणि म्हणूनच युद्धाला पावित्र्य देणे भाग पडले.

श्रीकृष्ण म्हणतात-

स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि |

धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ||

‘आणि स्वधर्माचा विचार करून देखील, माघार घेणे तुला योग्य होणार नाही. क्षत्रियांना धर्म्य युद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर असे दुसरे काही नाही.’

यदुच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतम् |

सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् ||

‘आणि, हे पार्था, सहज दैवगत्या उघडलेले स्वर्गाचे द्वार असे हे युद्ध भाग्यवान क्षत्रियांना लाभते.’

अथ चेत्त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि |

ततः स्वधर्मं कीर्ति च हित्वा पापमवाप्स्यसि ||

‘आणि जर हा धार्मिक संग्राम तू करणार नाहीस तर स्वधर्म आणि कीर्ति गमावून पाप पावशील.’ (गीता, अ. २|३१-३३).

युद्ध धार्मिक ठरल्याने सर्व अकुशल कर्मपथ धार्मिक होणे साहजिक होते. म्हणजे युद्धावाचून इतर ठिकाणी हिंसा करू नये, युद्धावाचून लूटफाट करू नये, युद्धावाचून व्यभिचार करू नये, त्याचप्रमाणे असत्य भाषण, चहाडी, कर्कश वचन हे युद्धाला उपयोगी असल्याशिवाय म्हणजे राजकारणावाचून उपयोगात आणू नये. परद्रव्याचा लोभ तर युद्धात फारच उपयोगी आहे. आपल्या सैन्यात परक्यांविषयी द्वेष फैलावल्याशिवाय सैनिक युद्धाला तयार व्हावयाचेच नाहीत; आणि आपण स्वधर्मासाठी, स्वराष्ट्रासाठी, किंवा अशाच कोणत्या तरी काल्पनिक पवित्र कार्यासाठी भांडत आहोत अशी तीव्र मिथ्यादृष्टि उत्पन्न झाल्याशिवाय युद्धात जय मिळणे शक्य नाही. तात्पर्य, एका युद्धासाठी सगळ्या कुशल कर्मांवर पाणी सोडणे पवित्र ठरते!

अश्वत्थामा मेला असे स्पष्ट खोटे बोलण्यास युधिष्ठिर तयार नव्हता, तेव्हा त्याला श्रीकृष्णाने ‘नरो वा कुंजरो वा’ (माणूस किंवा हत्ती मेला) असे म्हणावयास लावले. आजकालचे राजकारण अशाच प्रकारचे असते; अर्धवट खरे आणि अर्धवट खोटे. आणि आपल्या देशाचे घोडे पुढे घालता आले, तर कोणतेही अकुशल कर्म अत्यंत पवित्र ठरू शकते!

13 . धार्मिक युद्धाचा विकास

जैन आणि बौद्ध धर्माच्या प्रभावाने वैदिक हिंसा बंद पडली. पण क्षत्रियाक्षत्रियांतील धार्मिक युद्ध या देशात कायम राहिले; त्यांच्या भाऊबंदकीला उत्तेजन मिळाले. तशा धार्मिक युद्धाचा विकास महंमद पैगंबराने केला. आपसात युद्ध करणे योग्य नसून इतर संप्रदायांच्या लोकांवर जिहाद (युद्ध) पुकारणे अत्यंत धार्मिक आहे, असे त्याने प्रतिपादिले. त्याची प्रतिक्रिया ख्रिस्ती धर्मयुद्धांनी (क्रुसेडस्नी) घडून आली; आणि त्या सर्वांचा लोप देशाभिमानाने केला. आज तो अभिमान अत्यंत धार्मिक समजला जातो. त्याच्यासाठी कोणतेही कुकर्म करणे योग्य ठरते. पण त्यामुळेच सर्व मनुष्यजाति विषम मार्गात सापडली आहे. त्यातून बाहेर निघण्याला बुद्धाच्या कर्मयोगाशिवाय दुसरा मार्ग असू शकेल काय?

14 . तळटीपा

१. बुद्धलीलासारसंग्रह, पृ. २७९-२८१ पाहा.

२. मज्झिमनिकाय (नं. ४१) सालेय्यकसुत्त पाहा.

३. अंगुत्तरनिकाय, पञ्चकनिपात, सुत्त ५७.

४. भगवद्गीता अ. ३, श्लोक.  ९, १० व १६.

५. दीघनिकाय भाग १, लोहिच्चसुत्त पाहा.

६. शंख वगैरे पदार्थ घासून साफ करतात, त्याला सल्लेख म्हणतात. या ठिकाणी आत्मशुद्धीला सफाई म्हटले आहे.

 

संदर्भ