loader
Skip to content
Gatha Cognition®
Cover of भगवान बुद्ध

Book Open Access

भगवान बुद्ध

2017 17 chapters Marathi ISBN 978-81-932622-2-1 DOI 10.21523/gcb6

About this book

धर्मानंद कोसंबी यांचा ‘भगवान बुद्ध’ हा गोतम बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या अभ्यासकांसाठी एक प्रमाण ग्रंथ आहे. सुविचार प्रकाशनाने १९४० साली हा ग्रंथ ‘नवभारत ग्रंथ मालिके’साठी प्रकाशित केलेला आहे. हा ग्रंथाचे अनेक भाषांमधून भाषांतर करण्यात आलेले आहे. साहित्य अकादमीने या ग्रंथाचा हिन्दी अनुवाद केलेला असून हा ग्रंथ २५०० व्या बुद्ध परीनिर्वाण जयंतीच्या दिवशी, २२ मे १९५६ रोजी भारताच्या राष्ट्रपतींना नजर करण्यात आलेला आहे.

१४ ऑक्टोबर १९५६ साली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. त्यांनी बौद्ध द्धाम्माची दिक्षा घेतली. या प्रसंगी या ग्रंथाची प्रमाण ग्रंथ म्हणून प्रसिद्धी झाली. १९५७ साली या ग्रंथाची दुसरी आवृत्ती सुविचार प्रकाशानेच छपून प्रसिद्ध केली. पहिली आवृत्ती दोन भागात (पूर्वार्ध व उत्तरार्ध) प्रसिद्ध केलेली होती. १९७४ साली तिसरे मुद्रण करण्यात आलेले आहे. अलीकडे, २०१२ साली कौशल्य प्रकाशन, औरंगाबाद यांनी हा ग्रंथ पुन्हा छापून अभ्यासकांसाठी उपलब्ध केलेला आहे.

Online आवृत्तीच्या निमित्ताने

GATHA COGNITION  ने धर्मानंद कोसंबी यांचा ‘भगवान बुद्ध’ हा ग्रंथ माहितीच्या जाळ्यात उपलब्ध केलेला आहे. सर्व प्रकरणे स्वतंत्रपणे PDF व HTML स्वरुपात उपलब्ध केलेली आहेत. त्यामुळे वाचकांना हा ग्रंथ संगणक व मोबाईल च्या पटलावर (screen) वाचता येईल, त्यांची सुलभ प्रिंट सुद्धा घेता येईल. वाचकांसाठी ही एक सुविधा ठरेल अशी आशा वाटते.

मुखपृष्ठावरील चित्र कॉम्रेड सुभाषचंद्र सोनार यांनी उपलब्ध करून दिलेले आहे.

धर्मानंद कोसंबी

भगवान बद्धावरील श्री. धर्मानंद कोसम्बींचा ग्रंथ मिळवून नवभारत ग्रंथमालेने ग्रंथकारांच्या कीर्तिमत्तेच्या बाबतीत उच्चांक गाठला आहे. पालि भाषा व बौद्ध धर्म यांत निष्णात म्हणून त्यांचे नाव जगातील विद्वन्मंडळास परिचित आहे.

धर्मानंद कोसंबी यांचे पूर्वायुष्य हे आधुनिक काळात अत्यंत विरलत्वाने आढळणा-या धर्मजिज्ञासेचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे. केवळ तेवीस वर्षांच्या वयात पत्नीला सोडून व संसाराला लाथ मारून कल्याणकारक अशा धर्माचे ज्ञान करून घेण्याच्या तीव्र तळमळीने घराबाहेर पडलेल्या धर्मानंदाची हकीकत वाचली म्हणजे जगतातील दु:खाचा नाश करणा-या धर्ममार्गाच्या संशोधनार्थ गृहत्याग करणा-या गोतामाचे चित्र डोळयापुढे आल्याखेरीज राहत नाही. सांसारिक आपत्ति कुणावर येत नाहीत ? हजारो लाखो लोकांवर त्या येतात. त्या प्रसंगी मनुष्य ज्या त-हेने वागतो, त्यावरूनच त्याची किंमत ठरते. गोवे प्रांतात एका लहानशा गावी १८७६ साली जन्मलेल्या धर्मानंदावर तरुणपणी काही सांसारिक आपत्ति आल्या आणि त्याचे “चित्त प्रपंचात रमेनासे झाले.” “बुद्धावर माझी अधिकाधिक श्रद्धा जडत चालली. प्रपंचाचा जसजसा वीट येत गेला, तसतशी माझी श्रद्धा दृढ होत गेली. माझे सर्वस्व बुद्ध आहे असे वाटू लागले. कितीहि संकटे येवोत. कितीहि विपत्ति भोगाव्या लागोत, बुद्धोपदेशाचे ज्ञान मला झाले म्हणजे माझ्या जन्माचे साफल्य झाले असे मला वाटू लागले.” असे धर्मानंदांनीच त्या काळातल्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन केले आहे.

प्रबल धर्मजिज्ञासेच्या पायी इ. स. १८९९ सालच्या अखेरीस निष्कांचन स्थितीत गृहत्याग केल्यानंतर या तरुणाने जे पर्यटन केले व ज्या अतर्क्य हालअपेष्टा सोसून बौद्धधर्माचे ज्ञान व त्याबरोबरच आत्मसमाधान संपादिले, त्यांचा वृत्तांत अतीव अद्भुत व विस्मयकारक आहे. धर्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी आरंभी संस्कृत शिकण्याचे धर्मानन्दांनी ठरविले. त्यासाठी प्रथम पुण्यास, तेथून ग्वालेरीस व तेथून काशीस त्यांनी गमन केले. संस्कृत विद्येच्या या माहेरघरात त्यांची अध्ययनाची सोय सहज व चांगल्या रीतीने लागली. जेवणाच्या सोयीसाठी मात्र अन्नछत्रच त्यांना पाहावे लागले; व तेथे प्रवेशही कष्टानेच मिळाला. सुमारे दीड वर्ष व्याकरण (कौमुदी) व साहित्य यांचे अध्ययन केल्यानंतर धर्मजिज्ञासेने धर्मानंदांना नेपाळात जाण्यास प्रवृत्त केले. बुद्ध भगवानाच्या धर्माचे जिवंत अवशेष, भगवंताची जन्मभूमि असण्याचा मान ज्या राज्यास मिळाला आहे, त्या नेपाळच्या राज्यात काही तरी पाहावयास मिळतील या आशेने नेपाळात गेलेल्या या आर्त व जिज्ञासु तरुणास तेथील विपरीत परिस्थिति पाहून अत्यंत विषण्णता प्राप्त झाली. तेथून ते बुद्धगयेला गेले. बौद्ध धर्मग्रंथांचे सम्यक् ज्ञान सिंहलद्वीपात गेल्याने होईल असे तेथील एका भिक्षूने सांगितल्यावरून धर्मानन्द तेथून तडक सिलोनास जाण्यास निघाले. अपरिमित त्रास, कष्ट व संकटे सोसून ते एकदाचे सिलोनास पोचले. तेथे त्यांस अखेर पाहिजे होते ते, म्हणजे धर्माचे ज्ञान मिळाले. कोलम्बो शहराजवळ असलेल्या ‘विद्योदय विद्यालय’ नावाच्या विहारात भिक्षुधर्माने राहून त्यांनी महास्थविर सुमंगलाचार्य यांच्या हाताखाली पालि ग्रंथांचा अभ्यास केला. परंतु सिलोनांत खाण्याची आबाळ होऊ लागल्यामुळे त्यांची प्रकृति नीट राहीना, म्हणून ते सुमारे एक वर्षाने परत फिरले व मद्रास येथे आले. तेथे सहा महिने राहून अधिक अध्ययन करण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेशात गेले. तेथे विहारात राहून ध्यानमार्गाचा अभ्यास केला; परंतु तेथेहि प्रकृति चांगली न राहिल्यामुळे ते पुनः हिंदुस्थानात आले. भिक्षुवेषातच सारनाथ, कुसिनारा, लुम्बिनीवन, कपिलवस्तु इत्यादि भगवान गोतमाच्या आयुष्यातील चिरस्मरणीय घटनांनी पावन झालेल्या बौद्ध क्षेत्रांच्या यात्रा त्यांनी केल्या. नंतर पुन: ब्रह्मदेशात जाऊन मंदाले शहराजवळ निरनिराळया विहारांत राहून एक वर्षभर बौद्ध धर्भग्रंथांचा व ध्यानमार्गाचा अभ्यास केला व तेथून १९०६ च्या आरंभी हे धर्मानन्द भिक्षु पुनः कलकत्यास आले.

यानंतर कोसम्बींचा आयुष्यक्रम सार्वजनिक स्वरूपाचा झाला असल्यामुळे त्यात इतकी अद्भुतरम्यता व लोकविलक्षणता अनुभवास येत नाही. तथापि त्यांचे यापुढील सर्व आयुष्य स्वदेशसेवेच्या हेतून प्रेरित झालेले असल्यामुळे ते पूर्वीच्या आयुष्याइतकेच उद्बोधक व उदात्त भासते. स्वतः एवढ्या कष्टांनी मिळविलेल्या बौद्ध धर्माच्या (व पाली वाड्मयाच्या) ज्ञानाचा स्वदेशबांधवांमध्ये प्रचार करावयाचा या ध्येयाने यापुढील त्यांच्या क्रिया प्रेरित झालेल्या दिसतात. वंगभंगाच्या चळवळीतून निघालेल्या कलकत्याच्या नैशनल कॉलेजात व कलकत्ता युनिवर्सिटीत पालि भाषेच्या अध्यापकाची जागा त्यांनी पतकरली. परंतु कोसम्बींची विशेष इच्छा आपल्या महाराष्ट्र बांधवांमध्ये बौद्ध धर्माच्या ज्ञानाचा प्रसार करावा अशी होती. त्यांनी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांची गाठ घेतली. त्या उदारधी नृपतीने थोड्याच अवकाशात तारेने पुढील संदेश पाठविला, “तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याहि शहरी राहत असाल तर तुम्हांला बडोदे सरकारातून दरमहा ५० रु. मिळतील व ही मदत तीन वर्षेपर्यंत चालू राहील. मात्र वर्षांतून एखादे पुस्तक बडोदे सरकारासाठी तुम्ही लिहून तयार केले पाहिजे.” बरीच भवति न भवति करून अखेर कोसम्बींनी गायकवाड सरकारचा हा आश्रय पत्करला. यासंबंधाने कोसंबी म्हणतात- “द. म. २५० रु. ची (कलकत्ता युनिवर्सिटीची) नोकरी सोडून श्रीमंत गायकवाड महाराजांनी दिलेल्या ५० रु. वेतनाचा स्वीकार केल्याबद्दल मला कधीहि पश्चाताप झाला नाही. हे वेतन स्वीकारले नसते तर डॉ. वुड्स यांची गाठ पडली नसती आणि अमेरिकेला जाण्याची संधि सापडली नसती. पुण्याला येऊन राहिल्यामुळे डॉ. भांडारकर यांचा निकट संबंध जडला व त्यांच्या प्रयत्नाने मुंबई युनिवर्सिटीत पालि भाषेचा प्रवेश करण्यात आला.”

डॉ. जेम्स एच. वुड्स हे अमेरिकेतील सुविख्यात हार्वर्ड युनिवर्सिटीचे प्रोफेसर होते. त्यांना पालि शिकविण्याच्या निमित्ताने कोसम्बींचा त्यांच्याशी परिचय झाला. परिचयाचे रूपांतर स्नेहात होऊन ‘विशुद्धिमार्ग’ नामक बौद्ध तत्वज्ञान ग्रंथाच्या संशोधनाच्या कामी मदत करण्याकरिता डॉ. वुड्सनी कोसम्बींना अमेरिकेत पाचारण केले. सयाजीराव महाराजांनी परवानगी घेऊन कोसम्बी यांनी १९१० च्या एप्रिल महिन्यात अमेरिकेस प्रयाण केले. हार्वर्डमधील संस्कृत प्रभुति पौरस्त्य भाषांचे प्रमुख आचार्य प्रा. ल्यानमन यांच्या सहकार्याने कोसम्बी यांचे काम सुरू झाले. कोसम्बींनी कसून काम करून ‘विशुद्धिमार्गा’चे संशोधन १९११ च्या अखेरपर्यंत संपविले. परंतु ल्यानमनशी त्यांचे पटेना. कोसम्बींचे प्रयत्न गौण लेखून झालेले सर्व संशोधन आपल्याच नावे प्रसिद्ध व्हावे असा ल्यानमन यांचा मानस दिसला व तो आपला बेत साधत नाही असे दिसताच ते चिडले व संतापले. तेव्हा कोसाम्बींनी अमेरिकेहून परत फिरण्याचा निश्चय केला व ते जानेवारी १९१२ मध्ये न्यूयॉर्कहून स्वदेशी यावयास निघाले.

हिंदुस्थानात आल्यानंतर प्रा. कोसम्बींनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या चालकांच्या निमंत्रणावरून फर्गसन कॉलेजात पाच वर्षांच्या कराराने पालि भाषेच्या प्राध्यापकाची नोकरी पतकरली. त्यांच्या अध्यापकत्वाच्या कारकीर्दीत बौद्धधर्माचे व पालिभाषेचे पुष्कळ विद्वान त्यांच्या हातून तयार झाले. कै. चिंतामण वैजनाथ राजवाडे, डॉ. पु. वि. बापट (फर्गसन कॉलेजातील पालीचे प्राध्यापक), प्रा. चिंतामणराव जोशी (बडोदा कॉलेजातील पालीचे प्राध्यापक), प्रा. ना. के. भागवत (सेंट झेविअर कॉलेज, मुंबई, येथील पालीचे प्राध्यापक) ही सर्व कोसम्बींच्याच शिष्यमालिकेतील चमकदार रत्ने होत.

सहा वर्षे फर्गसन कॉलेजात प्राध्यापकाचे काम केल्यानंतर डॉ. वुड्स यांनी अमेरिकेत येण्याबद्दल फार आग्रह केल्यावरून ते १९१८ साली पुनः अमेरिकेत गेले. त्या वेळी महायुद्ध सुरू असल्यामुळे अमेरिकेचा हा प्रवास कोसाम्बींनी पूर्वेकडून पॅसिफिक महासागरातून केला. त्यांजबरोबर त्यांची मुले व श्री. पार्वतीबाई आठवले या होत्या. या खेपेस अमेरिकेत कोसम्बींचा मुक्काम सुमारे ४ वर्षे झाला. १९२२ च्या ऑगस्टमध्ये ते परत आले. त्यांनी तेथे संशोधनकार्य बरेच केले, परंतु ल्यानमनच्या दुराग्रहामुळे त्यांना या खेपेसहि त्रास झालाच.

कोसंबींच्या विचारांना नवी दिशा १९११ सालच्या अमेरिकेच्या पहिल्या सफारी पासूनच लागत चालली होती. अमेरिकेत त्यांनी समाजशास्त्रावरील ग्रंथांचे--विशेषत: समाजसत्तावादाचे-- खूप वाचन केले. भांडवलशाही नष्ट करून समाजाची रचना साम्यवादाच्या पायावर केल्यानेच सामान्य जनतेला सुख मिळेल व समाजातील स्पर्धा, कलही इत्यादिकांचे मूळ नाहीसे होईल, अशी त्यांची खात्री होत चालली होती. परंतु पाश्चात्य देशात साम्यवाद मूळ धरू शकत नव्हता व सर्व राष्ट्रांचे हात हिंसा व अत्याचार यांनी बरबटलेले होते, हे त्यांस सहन होत नव्हते. “जगांतील श्रमजीवी वर्गाने अशा प्रकारचा प्रेमाचा मार्ग स्वीकारल्याशिवाय मनुष्यकृत मनुष्यहत्या बंद होणार नाही, परतु देशाभिमानाने उन्मत्त झालेल्यांना तो सापडणार कसा ?”

अशा मनःस्थितीत भांडवलशाहीचे आगर बनलेल्या अमेरिकेत अस्वस्थ चित्ताने कालक्रमणा करीत असता १९२०-२१ सालच्या गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाच्या बातम्या तेथे एकामागून एक येऊन पोचू लागल्या. त्या वाचून कोसम्बींचे अंतःकरण धन्यतेने भरून गेले. “राष्ट्रद्वेषाच्या आणि वर्णद्वेषाच्या रोगातून पार पडण्याला याच्याशिवाय दुसरा मार्ग कोणताही असू शकत नाही,” असा त्यांचा ठाम ग्रह झाला.

अशा रीतीने कोसम्बी अमेरिकेहून आले ते मनाने साम्यवादी, सत्याग्रहाचे पुरस्कर्ते बनून आले. हिंदुस्थानात आल्यावर १९२२ ते १९२५ पर्यन्त गांधीजींनी काढलेल्या गुजरात विद्यापीठाच्या पुरातत्त्वमंदिर शाखेत पालिभाषाचार्य या नात्याने त्यांनी काम केले. या अवकाशात मराठीत व गुजरातीत त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. प्रा. ल्यानमन सेवानिवृत्तू झाल्यामुळे ‘विसुद्धिमग्गा'चे संस्करण पूर्ण करण्याची संधि आता मिळेल या अपेक्षेने १९२६ च्या प्रारंभास धर्मानन्द पुनः अमेरिकेस गेले व सप्टेंबर १९२७ पर्यंत सर्व संस्करण छापून तयार झाल्यानंतर ते स्वदेशी परतले.

हिंदुस्थानात आल्यानंतर पत्नीला घेऊन त्यांनी सर्व क्षेत्रांच्या यात्रा केल्या व गुजरात विद्यापीठात ते पूर्वीप्रमाणे राहू लागले. १९२९ साली लेनिनग्राड (रशिया) येथील बैद्ध संस्कृतीच्या अभ्यासासाठी स्थापिलेल्या संस्थेत काम करण्यास ते रशियात गेले. रशियातील अनुभवांचा त्यांच्या अगोदरच साम्यवादी बनलेल्या मनावर बराच अनुकूल परिणाम झाला. रशियातील हवा, राहणी व अन्न न मानवल्यामुळे ते एका वर्षांच्या आतच, म्हणजे १९३० च्या प्रारंभी हिंदुस्थानास परत आले, येथे आले तो सर्व देश सत्याग्रहयुद्धासाठी सज्ज झालेला त्यांस दिसला. मार्चमध्ये सुप्रसिद्ध दांडीकूच झाले. धर्मानंदांनी या स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली. खेड्यापाड्यातून प्रचार केला, शिरोडे (रत्नागिरी), येथील मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला व अखेर विलेपार्ले येथील सत्याग्रह-छावणीचे प्रमुखत्व स्वीकारले येथे त्यांना पकडल्यानंतर लवकरच हायकोर्टाने सोडून दिले. ऑक्टोबर १९३१ मध्ये ते डॉ. वुड्सच्या आग्रहावरून चवथ्यांदा अमेरिकेस गेले व तेथून १९३२ साली परत आहे. त्यानंतर “१९३४ सालच्या ऑगस्ट महिन्यात मी बनारसला जाऊन राहिलो. तेथे सहा महिने हिंदु युनिवर्सितीचा पाहुणा होतो. त्यानंतर काशी विद्यापीठात आठ नऊ महिने राहिलो. विद्यापीठाच्या चालकांनी माझ्यासाठी एक लहानसे घर बांधून दिले. त्या घरात राहून मी ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ हे पुस्तक लिहिले.”

श्रष्मजीवी वर्गामध्ये बुद्धाच्या अहिंसा तत्वज्ञानाच्या प्रचाराने स्पृश्यस्पृश्य भेद नष्ट करून समता स्थापता येईल की काय हे पाहण्याच्या हेतूने परळच्या वस्तीत एक आश्रम स्थापन करण्याचे कार्य कोसम्बींनी यानंतर हाती घेतले. त्यांच्या हेतूनुसार १९३७ च्या जानेवारीत ‘बहुजनविहारा’ची स्थापना झाली. तेथे आपल्या उद्देशानुसार ते कार्य करू लागले.

तेथे राहून आपले उद्देश सिद्धीस जाणार नाहीत असे काही वर्षांच्या अनुभवानंतर त्यांच्या मनाने घेतले तेव्हा ते बनारसजवळ सारनाथ येथे जाऊन राहिले. आयुष्याच्या या अखेरीस जैन तीर्थकर पाश्र्वनाथप्रणीत ‘चतुर्यामधर्मा’ने त्यांचे मन विशेष आकृष्ट केले होते. त्यावर त्यांनी एक लहानसे पुस्तकहि लिहिले.

जैन धर्माच्या उपदेशानुसार त्यांच्या मनाने घेतले की शरीर दुर्बळ होऊन लोकांच्या सेवेसाठी त्याचा उपयोग होत नाहीसा झाल्यानंतर त्याला अन्न घालून त्याचे रक्षण करणे हे पाप होय. प्रायोप्रवेशन करून शरीरत्याग करणे हाच अशा स्थितीत धर्म होय, असे मानून त्यांनी अन्नत्यागास सुरवातहि केली. महात्मा गांधीजींना हे कळले तेव्हा त्यांनी कोसाम्बींना या त्यांच्या बेतापासून परावृत्त केले. तथापि पार्थिव देहाचे आवरण त्यांच्या आत्म्याला तेव्हापासून मानवेनासे झाले. अखेर गांधीजींच्या सन्निध असावे म्हणून ते सेवाग्राम येथे जाऊन राहिले व तेथे ता. ५ जून १९४७ रोजी त्यांचा देहान्त झाला.

याप्रमाणे या महाभागाचे लोकविलक्षण चरित्र आहे. बुद्ध भगवानाने उपदेशिलेला कल्याणकारक धर्ममार्ग त्यांना पटला. त्यांनी तो स्वत: आचरून सर्वांस उपदेशिला. पण त्यांचे मन, इथेच थांबले नाही. ते अखेरपर्यंत नवेनवे संस्कार ग्रहण करीत विकसित होत होते. मात्र हे संस्कार परस्परांशी सुसंगत असे असून एकाच मार्गावरील टप्पे असावेत तसे होते. अमेरिकेत गेल्यावर समाजशास्त्राचा अभ्यास घडून मार्क्सप्रणीत समाजवादाचे ग्रहण त्यांच्या मनाने केले. पण गांधीजींच्या समग्रजीवनव्यापी अहिंसेचे आणि सत्याग्रहाचे दर्शन जेव्हा त्यांना घडले तेव्हा खराखुरा समाजवाद, सत्य अहिंसा यांच्या मार्गानेच मानवसमाजात अवतरू शकेल अशी त्यांची दृढ धारणा झाली. त्यात अखेरीस जैनांच्या ‘चतुर्याममार्गा’च्या व्यासंगाची भर पडून वैयक्तिक जीवनाची कृतार्थता हेच परमध्येय, समाजवादाचे पर्यवसानहि त्यात झाले पाहिजे, अशी त्यांची समुच्चयात्मक जीवनदृष्टि बनली. स्वत:ला जे जे प्रतीत झाले त्याचा त्यांनी निर्भयतेने प्रचार केला.

फेब्रुवारी १९१० मध्ये सयाजीराव महाराजांच्या सांगण्यावरून बडोदे येथे बौद्ध धर्मावर कोसम्बींनी व्याख्याने दिली. त्यांचे पुस्तक लगेच ‘बुद्ध, धर्म आणि संघ’ या नावाने प्रसिद्ध करण्यात आले. पुढे १९१४ साली त्यांचे ‘बुद्धलीलासारसंग्रह’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. या ग्रंथाचे तीन भाग असून गोतम हा बुद्ध होण्याच्या पूर्वीच्या जन्मातील काही कथा पहिल्या भागात, खुद्द गोतम बुद्धाच्या कथा दुस-या भागात व बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण वर्णन करणा-या कथा तिस-या भागात दिलेल्या आहेत. ‘समाधिमार्ग’ (१९२५) व ‘बौद्धसंघाचा परिचय’ (१९२६) ही पुस्तके गुजरात विद्यापीठात त्यांनी असताना लिहिली. त्यानंतर ‘हिंदी संस्कृति आणि अहिंसा’ (१९३५) हे पुस्तक काशी येथे असताना लिहिले. यात त्यांनी प्राचीन भारतासंबंधीचे आपले परिणतावस्थेतील विचार व आपले सामाजिक तत्त्वज्ञान प्रकट केले आहे. ‘विसुद्धिमग्गा’च्या संशोधनासंबंधी वर अनेकवार उल्लेख केलाच आहे. या ग्रंथाचे संस्करण अंधेरी (मुंबई) येथील ‘भारतीय विद्याभवन’ या संस्थेने नागरी लिपीत नुकतेच प्रसिद्ध केले आहे. गुजराती भाषेतहि त्यांची कित्येक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.

गांधीजींच्या प्रेरणेने धर्मानन्दांच्या स्मारकाची योजना करण्यात आली. तदनुसार बौद्ध धर्म आणि साहित्य यांचे श्रद्धापूर्ण अध्ययन करण्याकरिता काही विद्यार्थी लंकेमध्ये पाठविण्यात यावेत असे ठरले. शिवाय धर्मानन्दांच्या वाङ्मयाचे सर्व भारतीय भाषांमधून प्रकाशन व्हावे असाहि संकल्प झाला.

धर्मानन्दजींनी आपल्या पूर्वायुष्याचा वृत्तान्त लिहिला, तो ‘निवेदन’ या नावाने पुस्तकरूपाने १९२४ साली प्रसिद्ध झाला. उत्तर आयुष्याचा वृत्तान्त त्यांनी १९३७-३८ साली ‘खुलासा’ या नावाने लिहिला, तो वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाला होता.

निर्लोभता, निर्भयता, आणि ध्येयशीलता या तीन अमोल गुणांनी कोसम्बींचे चरित्र्य संपन्न होते. बौद्ध धर्म, तत्त्वज्ञान आणि साहित्य यांचे ते नुसते पंडित नव्हते; ते पंडितांचे पंडित होते. त्यांनी आपल्या पांडित्याचा बहुजनहिताय, बहुजनसुखाय वेच केला हे त्यांचे वैशिष्टय. या वैशिष्टयामुळे पंडितांमध्ये, तसेच लोकसेवकांमध्ये त्यांचे उच्चस्थान अढळ आहे.

*****

Contents

  1. भगवान बुद्ध
  2. pp. १-१२ Open access

    प्रस्तावना

    धर्मानंद कोसंबी

    पालि वाड्‍ःमयात तिपिटक (त्रिपिटक) नावाचा ग्रंथसमुदाय प्रमुख आहे. त्याचे सुत्तपिटक, विनयपिटक आणि अभिधम्मपिटक असे तीन भेद आहेत. सुत्तपिटकात बुद्धाच्या आणि त्याच्या अग्रशिष्यांच्या उपदेशाचा प्रामुख्याने संग्रह केला आहे. विनयपिटकात भिक्षूंनी कसे वागावे, यासंबंधाने बुद्धाने केलेले नियम, ते करण्याची कारणे, वेळोवेळी त्यात केलेले फेरफार आणि त्यांच्यावर केलेली टीका, यांचा संग्रह केला आहे. अभिधम्मपिटकात सात

  3. pp. १३-२२ Open access

    आर्यांचा जय

    धर्मानंद कोसंबी

    भगवान बुद्धाचे जीवन व तत्वज्ञान मांडण्यापूर्वी धर्मानंद कोसंबींनी बुद्धपुर्वीच्या समाज व्यवस्थेचे चित्रण केलेले आहे. उदार असलेले ‘दास’ आर्यांच्या आक्रमणाने गुलाम बनले व तंबूत राहणारे आर्य कालक्रमाने घरे बांधून राहू लागले. दास आपसात भांडत असत, त्याचा फायदा आर्यांनी घेतला. दिवोदासाच्या साहाय्याने इन्द्राने दासांची शहरे तोडली व आपले साम्राज्य स्थापन केले. कृष्णाने इन्द्राच्या यज्ञयागाची संस्कृति आणि वर्चस्व नाकारले. हिंसात्मक यज्ञपद्धतीला कंटाळून अनेकजन जंगलात जाऊन राहत. याही काळात लोक अहिंसात्मक संस्कृतीला चिकटून राहिले होते.

  4. pp. २३-४३ Open access

    समकालीन राजकीय परिस्थिती

    धर्मानंद कोसंबी

    या प्रकरणात बुद्ध काळातील सोळा राष्ट्रे आणि आठ कुलांचे वर्णन आलेले आहे. बौद्ध ग्रंथांमध्ये गोतम बुद्धाच्या शाक्य कुलाची माहिती सविस्तर आलेली आहे. या काळात गणराज्य व्यवस्था होती. गणमुख्य गणराज्यात ठरलेल्या कायद्यांप्रमाणे राज्यव्यवस्था चालवीत व न्यायदानाचे कार्य करीत असत. याच काळात अनेक राज्यात गणराज्यांचा नाश होऊन महाराजसत्ता स्थापन होत होत्या. गणराजे वंश परंपरेने सत्तेवर येत होते. त्यामुळे त्यांचा सामान्य जनांवर जुलूम वाढत चाललेला होता.

  5. pp. ४४-६५ Open access

    समकालीन धार्मिक परिस्थिती

    धर्मानंद कोसंबी

    या प्रकरणात बुद्ध काळातील धार्मिक परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे. आर्य आणि दासांच्या संघर्षामुळे सप्तसिंधूच्या प्रदेशात यज्ञयागाची संस्कृति अस्तित्त्वात आली. असे असले तरी समाजातील अनेक लोक अहिंसा हे तत्त्व मानीत. या तपस्वींमध्ये जातिभेदाला थारा नव्हता. त्यामुळे कोसंबी रामायणात आलेली शंबूकाची कथा काल्पनिक असल्याचे सांगतात. त्याकाळी अनेक श्रमणसंघ होते. संघातील श्रमण अनेक प्रकारच्या तपश्चर्या करीत. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी आदर होता. असे असले तरी राजे लोक युद्धात जय मिळावा म्हणून यज्ञयाग करीत असत. तर सामान्य लोक कर्मकांडात बुडालेले होते. गुप्तांच्या काळापासून जातिभेद बळावला होता. बालविवाहाची प्रथा देखील अस्तित्त्वात आलेली होती.

  6. pp. ६६-८५ Open access

    गोतम बोधिसत्त्व

    धर्मानंद कोसंबी

    गोतमाच्या जन्मतिथीसंबंधाने अर्वाचीन पंडितात बराच मतभेद आढळतो. दिवाण बहादूर स्वामीकन्नू पिल्ले यांच्या मते बुद्धाचे परिनिर्वाण ख्रिस्तापूर्वी ४७८ व्या वर्षी झाले. इतर काही पंडितांचे म्हणणे की, ते ख्रिस्तापूर्वी ४८६-८७ व्या वर्षी घडले. पण आजकाल लागलेल्या नवीन शोधावरून महावंस आणि दीपवंस यात दिलेली बुद्धपरिनिर्वाणाची तिथीच योग्य ठरते.१ या ग्रंथावरून बुद्धाचे परिनिर्वाण ख्रिस्तापूर्वी ५४३ व्या वर्षी झा

  7. pp. ८६-१०८ Open access

    तपश्चर्या व तत्त्वबोध

    धर्मानंद कोसंबी

    घर सोडून बोधिसत्त्व थेट राजगृहाला गेला, तेथे त्याची व बिंबिसार राजाची भेट झाली, आणि तदनंतर तो आळार कालामाकडे जाऊन त्याचे तत्त्वज्ञान शिकला, अशा अर्थाचे वर्णन जातकाच्या निदानकथेत सापडते. अश्वघोषकृत बुद्धचरितकाव्यात निदानकथेचाच क्रम स्वीकारला आहे. ललितविस्तरात ‘बोधिसत्त्व प्रथम वैशालीला गेला व तेथे आळार कालामाचा शिष्य झाला, आणि नंतर राजगृहाला गेला, तेथे बिंबिसार राजाने त्याची भेट घेतल्यावर तो उद्रक

  8. pp. १०९-१३५ Open access

    श्रावकसंघ

    धर्मानंद कोसंबी

    गोतम बोधिसत्त्व बुद्धाने सर्वप्रथम कोण्डञ्‍ञ (कौण्डिन्य), वप्प (वाष्प), भद्दिय (भद्रिक), महानाम आणि अस्सजि (अश्वजित्) यांना नवीन धर्ममार्ग, ‘धम्म’ सांगितला. हे पंचवर्गीय भिक्षू बुद्धाच्या मार्गाने चालू लागले. या पाचांचा भिक्षूसंघ बनला. भिक्षूसंघात मोठ्या संख्येने तरुण सामील झाले. त्याच्या मार्गाने चालू लागले. भिक्षूसंघ बहुजनहितासाठी धर्मप्रचार करीत होता. भिक्षूसंघात एकोपा राहून तो अधिक कार्यक्षम व्हावा यासाठी बुद्धाने त्याच्या संघटनात्मक रचनेवर विशेष लक्ष दिले. अनेक नियम लोकरूढीवरून ठरविले. साधेपणावर भर देवून वागणुकीचे नियम केले. शरीरोपयोगी पदार्थांच्या वापराबाबत सावधगिरी बाळगली. बुद्धाने स्त्रियांना प्रवज्जा घेण्यास परवानगी देवून भिक्षुणीसंघाची स्थापना केली. भिक्षुणीसंघासाठी त्याने खास नियम केले. बुद्धाने भिक्षूसंघाच्या प्रतिष्ठेला विशेष महत्व देऊन संघच सर्वांचा पुढारी असल्याचे सांगितले.

  9. pp. १३६-१५३ Open access

    आत्मवाद

    धर्मानंद कोसंबी

    अक्रियवाद, नियतिवाद, उच्छेदवाद, अन्योन्यवाद, विक्षेपवाद, चातुर्यामसंवरवाद, सांख्यमत, संसारशुद्धिवाद, नास्तिकवाद, वैशेषिक दर्शन, विक्षेपवाद, स्याद्वाद, निर्ग्रंथ, आजीवक, ईश्वरवाद, इत्यादींची चर्चा या प्रकरणात आलेली आहे. बुद्धाने आत्मवाद सोडून दिला आणि सत्त्याच्या पायावर तत्त्वज्ञान उभारले. त्यामुळे त्याचे श्रावक माराच्या जाळ्यात सापडले नाहीत. जड पदार्थ, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान या पाच विभागात आत्म्याचे वर्णन करून आत्मा शाश्वत किंवा अशाश्वत नसल्याचे बुद्ध सांगतो. बुद्ध मध्यममार्ग स्वीकारतो. बुद्धाने जातिभेदावर जोरदार हल्ला केला.

  10. pp. १५४-१६८ Open access

    कर्मयोग

    धर्मानंद कोसंबी

    बुद्धाने जसा शस्रत्याग केला तसाच कठोर तपश्चर्येचासुद्धा निषेध केला. बुद्धाने मानवी कल्याणासाठी नवीन अभिनव मध्यममार्ग शोधून काढला. प्राणघात, अदत्तादान (चोरी) आणि काममिथ्याचार (व्यभिचार) ही तीन कायिक पापकर्मे; असत्य, चहाडी, शिवीगाळ आणि वृथा बडबड ही चार वाचसिक पापकर्मे; आणि परद्रव्याचा लोभ, इतरांच्या नाशाची इच्छा व नास्तिक दृष्टि ही तीन मानसिक पापकर्मे होत. त्यांपासून निवृत्त होणे म्हणजे कुशल कर्मपथ होय. यांचा आर्य अष्टांगिक मार्गात समावेश होतोच. तीन प्रकारचे कुशल कायकर्म म्हणजे सम्यक् कर्म, चार प्रकारचे कुशल वाचसिक कर्म म्हणजे सम्यक् वाचा, आणि तीन प्रकारचे मानसिक कुशल कर्म म्हणजे सम्यक् दृष्टि व सम्यक् संकल्पाबाकी राहिलेली आर्य अष्टांगिक मार्गाची चार अंगे या कुशल कर्मपथांना पोषकच आहेत. सम्यक् आजीव, सम्यक् व्यायाम, सम्यक् स्मृति आणि सम्यक् समाधि या चार अंगांच्या यथातथ्य भावनेशिवाय कुशल कर्मपथाची अभिवृद्धि आणि पूर्णता व्हावयाची नाही.

  11. pp. १६९-१८४ Open access

    यज्ञयाग

    धर्मानंद कोसंबी

    पाश्चात्य देशात मॅक्सम्यूलर यांचे गुरू प्रसिद्ध फ्रेंच पंडित बर्नुफ यांचे लक्ष प्रथमत: बौद्ध धर्माकडे वेधले. एडविन् आर्नाल्ड (Edwin Arnold) यांच्या ‘लाइट ऑफ् एशिया’ (Light of Asia) (१८७९) च्या वाचनामुळे इंग्रजी भाषाभिज्ञ हिंदूंची बुद्धाविषयी आदरबुद्धि वाढली. अहिंसा परमधर्म स्थापण्यासाठी बुद्धावतार झाला अशी समजुतीला दृढत चालली होती. श्रमण संप्रदाय कमीजास्ती प्रमाणाने वेदाचा स्पष्ट निषेध करीत असत. बुद्ध वेदनिंदा करीत नसला तरी यज्ञयागात होणारी गाईबैलांची आणि इतर प्राण्यांची हिंसा त्याला इतर श्रमणांप्रमाणेच पसंत नव्हती. बुद्धसमकालीन यज्ञयागात ब्राह्मणांनी तपश्चर्येचे मिश्रण केले होते. यज्ञ आणि तपश्चर्या यांचे मिश्रण दुप्पट दुःखकारक आहे असे बुद्धाचे म्हणणे होते. सामान्य लोकांनाही यज्ञातील हिंसा मान्य नव्हती.

  12. pp. १८५-२०१ Open access

    जातिभेद

    धर्मानंद कोसंबी

    वेदकालापूर्वी देखील सप्तसिंधु प्रदेशात आणि मध्यहिंदुस्थानात जातिभेदधर्म अस्तित्वात होता. बुद्धाला जातिभेद निरुपयोगी वाटला, आणि त्याचा त्याने सर्वथैव निषेध केला. बुद्धाच्या संघात जातिभेदाला थाराच नव्हता. बुद्ध सांगतो माणसांचे अवयव जवळजवळ सारखेच असल्यामुळे मनुष्यांमध्ये जातिभेद ठरविता येत नाही. बुद्ध चातुर्वर्ण्य कृत्रिम आसल्याचे सांगतो. अशोकसमकालीन बौद्ध संघ जातिभेद मुळीच पाळीत नव्हता. बुद्धाने जातिभेदाला यत्किंचित् थारा दिला असता, तर त्याच्या अनुयायी भिक्षूंनी म्लेच्छ समजल्या जाणा-या देशात संचार करून बौद्ध धर्माचा प्रसार केला नसता. जातिभेदामुळे आमची हानि झाली.

  13. pp. २०२-२१४ Open access

    मांसाहार

    धर्मानंद कोसंबी

    परिनिर्वाणाच्या दिवशी बुद्ध भगवन्ताने चुन्द लोहाराच्या घरी डुकराचे मास खाल्ले आणि आजकालचे बौद्ध भिक्षु देखील कमी जास्ती प्रमाणाने मांसाहार करतात. अत्यंत तपस्वी जैनसंप्रदायांतील श्रमण मांसाहार करीत होते. खुद्द महावीरस्वामी मांसाहार करीत होते, यासंबंधी सबळ पुरावा सध्या पुढे आला आहे. परंतु, बुद्धसमकालीन काही तपस्वी लोक मांसाहार निषिद्ध समजत. सर्वांत प्रथम गोमांसाहाराच्या निषेधाबद्दल बौद्धांनीच चळवळ सुरू केली असावी. बौद्धांच्या आणि जैनांच्या प्रयत्नाने गोमांसाहाराचा निषेध होत गेला, तरी ब्राह्मण लोकांत त्याची मनाई होण्यास बरीच शतके लागली. प्राणिहिंसेविरुद्ध प्रचार करणारा पहिला ऐतिहासिक राजा म्हटला म्हणजे अशोक होय.

  14. pp. २१५-२२९ Open access

    दिनचर्या

    धर्मानंद कोसंबी

    बुद्धाच्या मुखचर्येवरील प्रसन्नता शेवटपर्यंत कायम होती. बुद्ध भगवान पहाटेला उठत असे आणि त्या वेळी ध्यान करी, किंवा आपल्या वसतिस्थानाच्या आजुबाजूला चंक्रमण करी. सकाळच्या प्रहरी तो गावात भिक्षाटनासाठी जाई. त्याच्या भिक्षापात्रात शिजवलेल्या अन्नाची सर्व जातींच्या लोकांकडून मिळालेली जी भिक्षा एकत्रित होई, ती घेऊन तो गावाबाहेर येत असे आणि तेथे भोजन करून थोड्या विश्रांतीनंतर ध्यानस्थ बसे. संध्याकाळी पुन्हा तो प्रवास करी. रात्री कोठे तरी एखाद्या देवालयात, धर्मशाळेत किंवा झाडाखाली राही. रात्रीच्या तीन यामांपैकी पहिल्या यामात भगवान ध्यान करी, किंवा चंक्रमण करी. मध्यम यामात आपली संघाटी चतुर्गुणित दुडून हांतरीत असे आणि उशीला हात घेऊन उजव्या कुशीवर उजव्या पायावर डावा पाय ठेवून मोठ्या सावधगिरीने निजत असे. बुद्धाच्या ह्या शय्येला सिंहशय्या म्हणतात. बुद्ध भगवंताचा आहार अत्यंत नियमित होता. कधी खाण्यापिण्यात त्याने अतिरेक केला नाही. चारिका म्हणजे प्रवास. बुद्ध सावकाश चारिका करीत. त्याची चारिका भिक्षुसंघासहवर्तमान होत असे. श्रमणांची गुरुकुले अशी मुळीच नव्हती. ते प्रवास करता करताच शिक्षण घेत आणि सामान्य जनात मिसळून धर्मोपदेश करीत. बुद्ध भगवंताच्या भिक्षुसंघात उत्तम शिस्त होती. जेव्हा बुद्ध भगवान भिक्षुसंघाला उपदेश करीत नसे, तेव्हा सर्व भिक्षु अत्यंत शांततेने वागत. बुद्ध शीलवान होता. तो यथार्थतया धर्मोपदेश करीत असे. तो प्रज्ञावान होता. भिक्षूंपैकी कोणी आजारी असला, तर बुद्ध भगवान दुपारी ध्यानसमाधि आटपून त्याच्या समाचाराला जात असे. भगवान आजारी असल्याचा उल्लेख फार थोडया ठिकाणी सापडतो.

  15. pp. २३०-२४२ Open access

    परिशिष्ट १: गोतम बुद्धाच्या चरित्रात शिरलेले महापादनसुत्ताचे खंड

    धर्मानंद कोसंबी

    अपदान (सं. अवदान) म्हणजे सच्चरित्र. अर्थात् महापदान म्हणजे थोरांची सच्चरित्रे. महापदान सुत्तात गोतम बुद्धापूर्वी झालेल्या सहा व गोतमबुद्ध यांची चरित्रे आरंभी संक्षेपाने दिली आहेत. गोतम बुद्धापूर्वी विपस्सी, सिखी, वेस्सभू, ककुसंघ, कोणागमन आणि कस्सप असे सहा बुद्ध झाले. पैकी पहिले तीन क्षत्रिय व बाकीचे ब्राह्मण होते. त्यांची गोत्रे, आयुर्मर्यादा, ते ज्या वृक्षाखाली बुद्ध झाले त्या वृक्षांची नावे, त्य

  16. pp. २४३-२४७ Open access

    परिशिष्ट २: वज्जींच्या अभ्युन्नतीचे सात नियम

    धर्मानंद कोसंबी

    भगवान राजगृह येथे गृध्रकूट पर्वतावर राहत होता. त्या वेळी अजातशत्रु राजा वज्जींवर स्वारी करण्याच्या विचारात होता. त्या बाबतीत बुद्ध भगवंताचे मत काय हे जाणण्यासाठी त्याने आपल्या वस्सकार नावाच्या ब्राह्मण अमात्याला भगवंताजवळ पाठविले. त्या अमात्याने अजातशत्रूचा बेत भगवंताला निवेदन केला. तेव्हा आनंद भगवंताला वारा घालीत होता. त्याजकडे वळून भगवान म्हणाला, “आनंदा, वज्जी वारंवार सभा भरवतात आणि एकत्र होतात,

  17. pp. २४८-२६१ Open access

    परिशिष्ट ३: अशोकाचा भाब्रू शिलालेख आणि त्यात निर्देशिलेली सूत्रे

    धर्मानंद कोसंबी

    भाब्रू हे स्थान जयपूर संस्थानातील एका डोंगराळ प्रदेशात आहे. तेथे राहणा-या भिक्षुसंघाने अशोक राजापाशी संदेश मागितल्यामुळे अशोकाने हा संदेश पाठविला व तो एका शिलेवर कोरावयास लावला असावा. अशा प्रकारचे संदेश अशोक वारंवार पाठवीत असावा. परंतु त्यांपैकी जे त्याला महत्त्वाचे वाटत, तेच तो शिलांवर किंवा शिलास्तंभावर कोरावयास लावी. ह्या शिलालेखांत निर्देशिलेली सूत्रे मगधदेशातील बौद्धांनी वाचावी असे संदेश तोंड

  18. pp. २६२ Open access

    आधारभूत ग्रंथ

    धर्मानंद कोसंबी

    हे पुस्तक मुख्यत: पालिभाषेतील सुत्तपिटक व त्यावरील अट्ठकथांवर आधारलेले आहे. विनयपिटकांतील गोष्टींचा यात उपयोग केला असला, तरी त्या सुत्तपिटकाच्या आधारावाचून ऐतिहासिक मानण्यात आल्या नाहीत. अभिधम्मपिटकाचा (एका उता-याशिवाय) उपयोग केला नाही. जैन वाड्‍ःमयापैकी आचारांगसूत्र, भगवतीसूत्र, दशवैकालिकसूत्र व प्रवचनसारोद्धार या ग्रंथांतील उतारे घेतले आहेत. पहिल्या प्रकरणात ऋग्वेदाचा बराच उपयोग केला आहे. उपनिषा

Bibliographic information

Published
15 Oct 2017
ISBN
978-81-932622-2-1
Language
Marathi
व्यवस्थापकीय संपादक
Dr. Kalpana Bhagat
Gatha Cognition.
Chapters
17